Monday, 16 June 2025

बदलाला सामोरे जाताना...

 


आज सलग २१-२२ वर्ष कामावर जातानाचा रस्ता माझा दोस्त झालाय. रोजचा सहवास माणसाला जीव लावतो खरंय. पण अनेक वर्ष सलग सतत त्याच रस्त्यावरून त्या ठराविक वेळी प्रवास करताना तो आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटकच होऊन जातो. 

मला आठवतंय : रोज सकाळी निघालं कि समोर दिसणारी फुल तोडून पिशवीत भरून जाणारी एक आजी, एक उंच माणूस तिरक्या चालीनी चालत जातानाचा, चौकात लाल दिवा लागला कि थांबल्यावर दिसणारे फुल विक्रेते, यांची तर पूर्ण परिवाराची ओळख झालेली आहे, जे लेकरू ती बाई कडेवर घेऊन फुल विकते तीच मोठी होऊन गर्भारशी होईतोवर मी बघत आले आहे, आता ती बाई फुटपाथवर बसलेली असते, यांच्यात पुरुष कधी दिसत नाहीत, ठराविक वेळेला एका देवळा समोर उभं राहून घट्ट डोळे मिटून आर्त विनवणी करणारे एक काका, जे कोडं आहेत मला कि रोज आर्ततेने हे काय मागतात?, थोडं पुढं माग झालं कि ते दिसत नाहीत मग समजायचं आज एक तर लवकर किंवा उशिरा निघाले मी. अनेक वर्ष सकाळी भेटणारी पेट्रोल पंपावरची ताई आता कुठंपण दिसली तर हसून ओळख देते, हक्कानं विचारणा होते कि ताई खूप दिवस पेट्रोल भरायला आल्या नाहीत? घरातून निघताना पासून कामावर पोचेपर्यंत चे माझे सुप्रभात चे मानकरी...  बरेच आहेत. एक आजोबा मला म्हणतात भेटलं कि - "काय ग काल सुटी होती का ? " तुझं सुप्रभात ऐकलं नाही कि सकाळची सुरुवात होत नाही. तू माझी सुप्रभात क्वीन आहेस. असा सकाळचा प्रवास असणार असेल तर कोणाचं जगणं कंटाळवाणं असेल. जिना साफ करणाऱ्या, सकाळी कामावर पोचतानाच दिसणाऱ्या रास्ता सफाई कामगार बायका, कशा विसरू शकेन मी, सणासुदीला नटून थाटून कामावर जाताना कधी त्या मला तर कधी मी त्यांना हातानं छान दिसतंय खुणावल जायचोच. कशी मौल्यवान आठवण आहे हि! गाडीवर असताना दिसणारे सम सुखी अनेक आहेत. घरी जाताना दिसणारी गजरेवाली ताई, कॅलेंडर विकणारे काका, असे अनेक अनेक आहेत.

आयुष्यात नोकरी कारण गरजेचं आहेच पण ती करताना गेले २१-२२ वर्षात असे सकाळचे संध्याकाळचे घड्याळ असणारे अपरिचित असूनही मला आपले वाटतात. कोणी कोणाला काहीही देत नाही घेत नाही फक्त हसतो, काय जादु आहे ना स्मितहास्यात !

काल अचानक मेट्रोने ये जा करायचा योग आला. तो मार्ग खरंच सोयीचा आहे. कालांतरानं तो अवलंबला जाणार आहे, ती गरज असणार आहे आणि सोय सुद्धा. याची काल हलकीशी जाणीव झाली. मी प्रथमच एकटीनं मेट्रोचा प्रवास केला. पूर्णवेळ मी काचेतून खाली पुणं बघत होते, परंतु मला माझा २२ वर्षाचा कामावर जातानाचा सगळ्या घड्याळांचाच विचार येत होता. ती वीस मिनिटं मी माझ्या आयुष्यातली २२ वर्षातली कामावर जातानाची येतानाची सगळी घड्याळं डोळ्यासमोर काचेवर पाहत होते. दुचाकी सोडून मेट्रोची प्रवासाची सुरुवात होतानाच्या बदलला सामोरं कसं जाईन याच विचारात मी होते. मन आनंदी पण होतं पण तळमळ, हुरहूर पण वाटत होती. या घड्याळांची मला खूप आठवण येईल. जर या नवीन वळणावरच्या बदलला मला समोर खरोखर जायची वेळ आली तर माझं कसं  होईल?

त्या २१-२२ वर्षातली माझी घड्याळं कालांतरानं पुसट होतील या भीतीनं आज मी लिहायला बसले आहे.  मला ती कधीही आठवतील अगदी स्पष्ट मला खात्री आहे पण तरी आज बदलला सामोरं जाताना लिहावंच असं वाटलं. आयुष्यात पुढे अनेक वळणं येणं बाकी आहे. हि तर सुरुवात आहे. नवीन घड्याळ वाट पाहत असतीलच कि... कान्हाजी म्हणतात कि आपण जिथे आहोत तिकडचे असावे. कधीही बदलाला सामोरे जाताना सकारात्मकच असायला हवं. आयुष्यातलील सुंदर अनुभवांनी शिकावं आणि चुकांनी सुधारावं. समोरच्यांचे नकारात्मक विचार पण चांगलं शोधून सकारात्मकता वाढवण्यासाठी अमलात आणायला शोधायचे हा टास्क अश्या प्रकारच्या बदलांना सामोरे जाताना खूप उपयोगी पडेल. 

मग विचार आला लग्नानंतर नवीन दिनचर्या झाली त्या बदलाला पण मी किती दृढ विश्वासाने सामोरी गेले होते. आपलच आपल्याला आठवत जातं कधी कधी. आपण केलेली डबा करून, घर आणि स्वतःला यावरून कामावरची वेळ गाठायची खटपट,  त्या गडबडीतही केली व्रतवैकल्यं, दुखणी खुपणी सगळं. जीवन किती सुंदर असत ना ... सतत काहीतरी नवीन घडत असत अवती भोवती. इतके वर्ष काम करताना जीवनात आलेले दोस्त लोकं. किती बहुमूल्य आठवणी आहेत. कोणी कोणी बरोबर कामाला नाही आता, पण १२ -१६ वर्ष एकत्र ८-८ तास जगलॊ. आनंद, दुःख, त्रागा सगळं एकमेकींना समजू लागलेलं इतकं एकमेकींना ओळखू लागलेलो. हे घड्याळ तर नशिबानीच मिळतं कि.. आयुष्यात सुंदर आईपण अनुभवलं हा सर्वात सुरेख बदल होता आज वरचा आणि वयाप्रमाणे शरीरातील बदलाला पण तर मी किती छान सामोरी जातेय.. खरंच कि...  

काल मेट्रोत बदलाला सामोरे जातानाचा जेव्हा विचार आला तेव्हा लक्षात आलं कि हा होणार बदल फारच लहान आहे. आजवर अश्या अनेक बदलांना सामोरे गेलेली आहे कि मी. पुढे अनेक बदलांना सामोरे जायचे आहेच , कदाचित त्यासाठीच कान्हाजीनी आज सिंहावलॊकन करावलं कि काय कोण जाणे. त्या योगे अनेक लोकांची आठवण झाली ज्यांना अश्या अनेक मोठाल्या बदलांना सामोरे जावे लागले आहे. शिकण्यासारखेच आहे. 

असो आज उजाळा मिळाला त्या सगळ्या घड्याळाच्या आठवणींना.... सगळ्यांना धन्यवाद.  त्यांच्यामुळे कामाचा काळ सुंदर गेला आणि थँक यु त्या छोट्या ताईला जिच्यामुळे मेट्रोचा प्रवास समजून घेताना मजा आली. मला ठाऊक आहे हे फार काही अवघड नाही असं म्हणून काही जण हसतील सुद्धा मला. परंतु माझी काही हरकत नाही कारण त्यांना तो अनुभव अजून यायचा आहे ना ! एखादी गोष्ट अनुभवली कि तिची सुलभता समजते. ते करायची क्षमता असतेच पण वेळ यावी लागते. हे समजायला अवघड आहे, बघा समजतंय का काय म्हणायचंय ते. मी मात्र आज खूप आनंदी आहे खुश आहे. कोणती पण लहानशी गोष्ट मिळाली कि तो आनंद साजरा करायचा, मी श्रीमंत झाले म्हणायचं. माझी जुनी सवय आहे. त्यामुळे पेशी पण आनंदी होतात त्यायोगे मी पण. 

Lets time to party now!

जय श्रीकृष्ण !

सौ. गौरी पाठक 

९९७०१६८०१४


No comments:

Post a Comment