Friday 13 September 2019

माहेरपण माहेरवाशिणींचं...

माहेरवाशिणींचा क्काचा सण "गौरी " "महालक्ष्म्या". या जेष्ठा कनिष्ठा माहेरवाशीणींच प्रतिक म्हणुन पुजल्या जातात. किती विचार व नियोजनबद्ध आहे ना आपली संस्कृती.
माझ्या माहेरी खड्यांच्या गौरी तर सासरी ऊभ्या महालक्ष्म्या असतात. यंदा पांढुर्णा नागपुरला जायची ईच्छा होती परंतु तीची ईच्छा मी ठाण्याला जावेकडे जाऊन सेवा करावी अशीच होती.

जायच यायच तिकीट झालं पण अगदी आदल्या दिवशीच ठाण्यात पावसानं थैमान घातलं होतं. जवळ जवळ सगळेच नकारात्मक सुर लागत होते. पण नवरा मात्र म्हणाला भर बॅग आणि ऊद्या सकाळच्या परिस्थितीवर ठरवु. सोबत पुतणी पण होती. दोघींचाच असा पहिलाच प्रवास.

सकाळीच पाऊस कमी झाला समजलं आनंद झाला. बाराला कामावरून परस्परच बस स्टाॅपवर पोचले. सव्वा वाजता बस कोथरुड ला पोचली. तिन्हीसांजेला महालक्ष्म्या बसवतात या अंदाजाने पाचला पोचु म्हणुन साडेबाराची बस घेतली होती. गौरी बसवताना पासुनच सगळं करायच बघायच होतं. ईच्छा तर होतीच पण तीनच छान योग आणला. रस्त्यात मस्त पाऊस, ढग आणि गप्पा मारत बसमधल्या गमती जमतींचा आनंद घेत साडेपाचला ठाण्याच्या घरी पोचलो. पाहतो तर काय गणपतीची आरती नुकतीच संपलेली. अंभईकरांच्या बाप्पांचं पण दर्शन नशिबात होतं. क्या बात है!

महालक्ष्म्या बसवताना प्रत्येक घरची वेगळी पद्धत, रीत असते. यांच्याकडे पुरुष मंडळी गणपती विसर्जन करून येईपर्यंत बायकांनी गौरी / महालक्ष्म्या वाजत गाजत घरात आणायच्या अशी पद्धत आहे. टेबलवर अतिशय सुंदर तयारी केलेली आढळली - दोन तबकांत मुखवटे काठाच वस्त्र पांघरून तयार होते, हळदीकुंकवाची ताट पाणी घालुन तर पावलांचा ठसा रांगोळी कोयरीसकट तयार होता. साड्या, दागिने, ज्वारीच्या २ पिशव्या आणि महत्वाचं म्हणजे मावशींच्या हातचा वाफाळता चहा सुद्धा!

हळदुकुंकवाचे हातांचे ठसे दारातुन आत महालक्ष्म्या बसवण्याच्या जागेपर्यंत तर दुसरे देवघरापासुन असे काढले. गौरीच्या पावलांचे ठसे हळदीकुंकू वाहुन दोन्ही दिशांनी आगमनाचा रस्ता तयार केला.

एका सुनेनं जेष्ठा व मुलगा असलेल तबक दारातुन तर दुसरीने कनिष्ठा व मुलगी असलेलं तबक देवघराकडुन वाजत गाजत जागेवर आणलं. वाजत गाजत म्हणजे पळीनं ताटावर वाजवत व टाळ वाजवत गजर करत महालक्ष्म्या आणल्या. त्या येताना आपण विचारायचं "कोण आलं?" "कसं आलं?" मग सुनांनी म्हणायच जेष्ठा आली कनिष्ठाला भेटायला. येताना गव्हाची रास पेरत आली. अस म्हणत दोन्ही तबकं जागेवर आली.
एकमेकींना कुंकु लावलं. माहेरवाशीणी घरी आल्या. मुली घरी आल्या की घरची शोभाच वाढते.

ती ईतकी आनंदात घरी येते की खाली बसायलाही न घेता सुख दुःखाच्या गप्पा सुरू होतात. म्हणुनच यांच्याकडे जमिनीवरच महालक्ष्म्या बसवण्याची पद्धत आहे. हे प्रथमच ऐकलं पण पटकन पटलं. माहेरी आल्यावर पाणी आसन हे सोपस्कार खरच नकोच असतात.

आधीच घड्या ऊघडुन निर्या पाडुन साड्या देवापुढे ठेवल्या होत्या. मुखवट्यांवरची चमक आणखीन तरतरीत होणार होती. सासु सुन नणंद जावा महालक्ष्म्यांना सजवायला सरसावल्या. तिन ठिकाणच्या तिघी होतो पण एक संघ काम सुरू झालं. मला त्या नणंदा भावजयांची नावही ठाऊक नव्हती पण त्यांनी सहज आपलसं करून सेवेत सहभागी करून घेतलं.
महालक्ष्म्यांना साडी नेसवणं, पोटात धान्य भरणं, सरळ दिशा पाहणं, दागिने घालणं, मुलांना नवीन कपडे घालणं अशा अनेक गोष्टी टप्प्या टप्प्यानं होत होत्या.

आधीच्या टवटवीत मुखवट्यात एकदम जानच आली. सोन्यास लाजवतील असे पितळी मुखवटे, त्यावरचं रंगकाम, आखीव रेखीव डोळे, भावमुद्रा, गळाभर दागिने, पारंपारिक सुंदर नथ, चांदिचे मुकुट, मेंदीचे हात, हातात तोडे सगळ कस खुलुन दिसत होतं. लेकरं तर आत्ता ऊठुन बसतील की काय असच वाटत होतं. ताटात गहु घेऊन त्यात मुलगा मुलगी बसवली होती. चौघही खुप गोड दिसत होते. घर एकदम भरल्यासारखंच वाटलं.

नंतर आजोबांनी सांगुन दादानी गौरी आवाहन केलं. स्थापना झाली. महालक्ष्म्यांपुढे लहानशी रांगोळी काढण्याच भाग्य लाभलं. जे जे करायची अनुभवायची ईच्छा होती ती ती गौरीनं पुरवली. दोन्ही महालक्ष्म्यांच्या मधे मोठ पडवळ, काकडी, कणिस दोरा बांधुन ठेवलं. मागच डेकोरेशनच लायटिंग आता अजुन खुलल होतं. आज प्रसाद नव्हता.समाधानी आणि तृप्त चेहर्याच्या जेष्ठा कनिष्ठा आपल्या पाल्यांबरोबर स्थानापन्न झालेल्या डोळ्यात साठवतच संध्याकाळ संपली.

आज गौरी पुजन व जेवण दिवस. दादाकडे तिन्हीसांजेला पुजा आणि मग नैवेद्य असतो. (साडेचारला पुजा) दिवसभर बायकांचा ऊपवास असतो. आज मात्र सगळ्या घरानच ऊपवास केला होता. मावशी असल्यानं तिखटाची खमंग खिचडी मिळाली. महालक्ष्म्या रथात बसुन आल्या अस समजुन दारात रथात देवीची पावलं असलेली रांगोळी काढली.
साधारण अकरा वाजता स्वयंपाकाची सुरूवात झाली. भाज्या चिरणे इ. काम तरी सुरू झाली.

सोळा भाज्यांची एक भाजी, पुरणपोळी, पंचामृत, वडे, भजी, गवल्याची खीर, तीन कोरड्या तर एक ओली चटणी, दोन कोशिंबीरी, वाटली डाळ, भात वरण, कढी, पातळ भाजी, लाल भोपळा भाजी अशा मस्त स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. माझी खारीणी मदत झाली फार समाधान वाटलं.
बरोबर चार वाजता गुरूजी आले. सुंदर पुजा सांगितली. गुलाबी फुलांचे मनमोहक हार महालक्ष्म्यांना खुलुन दिसत होते. बालके तर हारामुळे आणखी गोजिरी दिसत होती. पिवळ्या धम्मक्क शेवंतीच्या वेणीनं तर महालक्ष्म्यांच्या सौंदर्यात भर पडली. आता मात्र सकाळी लावलेल्या फुलोर्याकडे लक्ष जाऊ लागलं. सकाळी पोटात १६-१६ करंज्या भरल्याच आठवलं. सुरेख खणखणीत गजरात पाचसहा आरत्या झाल्या. स्थान अजुन जागृत झालं. नेहमीच्या घरातली आणि आत्ताच्या क्षणाची घरातली ऊच्च स्पंदं फरक जाणवु लागली. काही म्हणा तो आनंद, त्याची अनुभूती स्वत:च घ्यावी. सांगुन समजणे अशी ती गोष्टच नाही मुळी. नंतर नैवेद्य दाखवला गेला, विडे ठेवले गेले. अनेक ओट्या भरल्या गेल्या. पंक्ति ऊठल्या.मन आणि पोट भरलं ते समाधान सर्वांच्या चेहर्यावरच समजत होतं.

रात्री झोपायला उशीर झाला. दुसर्या दिवशी लवकर परत निघायच होतं. झोप झाली नव्हती परंतु त्रास वाटत नव्हता.
काही झालं तरी गौरीला आज निघायच होतं, परत येण्यासाठी.....