Monday 23 August 2021

माणसाच्या जंगलाला भेट Sipna - A man made Jungle

Sipna - A man made Jungle  सिपना वनराई
जंगल म्हटलं कि डोळ्यासमोर हिरवागार परिसर येतो. माणसाचं जंगल म्हणजे काय ? तर मानव निर्मित वनराई. सिपना मॅन मेड फॉरेस्ट पाहण्याचा योग्य आला. वनसंवर्धन हि काळाची गरज होणार हे ओळखून श्री व सौ नारगोळकर यांनी पुण्यात सिंहगड जवळ माळरानावर फुलवलेलं - माणसाचं जंगल. हे जेव्हा ऐकलं तेव्हा वाटलेलं कि असा आपणहुन कसं वसवलं असेल जंगल? परंतु अनेक वर्षांच्या मेहनती नंतर दिसणारं ते हिरवंगार माळरान पाहून खरंच आश्चर्य वाटलं.
इतक्यात कोरोनामुळे वनराई, निसर्ग याकडे आपण जरा जास्त आपुलकीनं पाहु लागलोय खरं . निसर्ग पाहायची अनुभवायची आवड तशी मला आहेच, सिपनाला भेट देऊन अजुन छान वाटलं. आपल्या जवळच इतका छान प्रकल्प आहे हे ठाऊकच नव्हतं.
श्री. नारगोळकरांनी २५ वर्ष पुर्वी हि जमीन घेऊन हा प्रकल्प हि वनराई वसवली आहे. एकंदर २२ एकर जमीन होती. सिपनाला भेट द्यायची तर आगाऊ कल्पना द्यावी लागते. नयना ताई योग्य मार्गदर्शन करतात. आम्ही चौघे जण सकाळी साडे आठ ला येतो असा पक्कं झालं . पोचायला फार शोध शोध करावी लागली नाही. मुख्य रस्त्याला लागून आत गेलं कि लाल रंगाचा बैठा बंगला आपला स्वागत करतो. दारातच मस्त मनमोहक फुलं असलेलं डाळींबाच झाड आहे. आत बसायला छान सोय आहे. मनापासून स्वागत करणारा एक दादा आहे. आम्ही पोचलो तोवर नयना ताई आल्या नव्हत्या मग जागेभोवती चक्कर मारून चिंच, मोगरा, कांचन वृक्ष बघितले. कोरांटी बांबू ची झाडे दिसली. इतक्यातच ताई आल्या. मस्त गप्पा मारत नाश्ता झाला.
दादा बरोबर जंगल पाहायला निघालो. घरामागे मोठ्ठी तुडुंब भरलेली विहीर होती. दोन बाकडे होते. मुक्त बसून घेतलं. निवांत शांत जागेच  सुख वेगळच. पक्ष्यांचा आवाज येतच होता. रानटी झाडांचा, सालांचा वेगळाच वास प्रकर्षानं जाणवत होता.  हिरव्या रंगाच्या अनंत छटा डोळे भरून बघत होतो आम्ही. दादाच्या मागे मागे जात होतो. सूर्यप्रकाश पानांमधून आत येत होता, त्यामुळे बदलणारा पानाचा रंग अवर्णनियच  होता. वाटेत लहान अंडी फुटलेली दिसली, नुकतेच कोणी तरी जन्मले होते. आता मात्र पावले जपून टाकू लागलो आम्ही.
 बाजूला गर्द झाडी मध्ये पाऊलवाट मातीची.. अहाहा ! मुंग्यांसारखी दादाच्या मागे आमची ओळ होती. कोवळ्या पानावर पडलेलं दवबिंदूच दिसणं फार मनमोहक होतं. कांचन वृक्षाला असणारी गोड गुलाबी फुलं प्रथमच बघितली मी. मोठं मोठी सीताफळाची झाडं डवरली होती. एक विशेष आहे इकडचं कि फुलं फळं तोंडात नाहीत ते. ती फक पक्ष्यांच्याच मालकीची. डवरलेली फळ झाडं , ओली झालेली झाडांची खोडं , त्यावरचे कीटक, मुंग्या, कोळ्यांची जाळी , फुलपाखरं गुण्या गोविंदानी नांदत होती.
हिरवा चाफा, सोन चाफा झाडं दादानी दाखवली. आता पक्ष्यांचे आवाज वाढलेले होते. आत्तापर्यंत जमीन पाऊलवाट थोडी कोरडी होती. पण इथून पुढे तिचा ओलावा वाढत होता. चंदनाचे झाड त्याची माहिती घेतली. त्याला फळं येतात ती पक्षी खाऊन विष्ठा पडते तिचा पण यात सहभाग आहे याचा उलगडा झाला. दादा छान माहिती देत होता. निसर्गाची कमालच बघत होतो! 
पुढे ऐक बनवलेलं तळ आहे. प्राणी पक्षी त्याचा छान वापर करतात. उन्हाळ्यात जास्त वापर होत अस्वा. बेहडा, हिरडा झाडं त्यांचं औषधी महत्व समजलं. पुढे होता पांढरा पळस. हा क्वचितच सापडतो. काही झाडं नारगोळकरांची दुरून रोपं आणुन लावली आहेत. केशरी पळस वेगळा असतो, तो सहज सापडतो. रिठा, बेल झाडं दिसली. या वनस्पतीच्या खोडांचा एक विशिष्ठ वास येत होता. भुरकट पांढरट खोडाचे वृक्ष, ताटभर मोठ्या पानांचा भरगच्चं वृक्ष लक्ष वेधत होते.
आता पाऊलवाट निम्मी होत गेली. एकमेकांत गुंतलेल्या वेली जास्त दिसू लागल्या. पाऊलवाटेजवळ पोपटी पण बारीक विविध आकाराची झुडूप होती. फुलपाखरं स्वछंद फिरत होती. आता मात्र फोटो काढण्याचा मोह आवरेना. एक झाड तर वाकवलेल्या काळ्या हँगर सारखी शेंगा असलेलं होत. चालताना सावध चालावं लागत होतं कारण अचानक कोळ्याची जाळी समोर येऊन तुटतील अस होत होतं . आपण सिमेंटच्या जंगलातले कोळी ते माणसाच्या जंगलातले कोळी भिडत होतो. मोहक झाडाची जांभळी फुलं असतात असं दादा म्हटला. सिझन नाही म्हणून फुल दिसली नाही. या फुलांच्या पिठावर आदिवासी लोक उदरनिर्वाह करतात म्हणे. भक्कम मोठी खुरदरी खोडं त्याचा स्पर्श अजूनही आठवतो. नंतर थोडा दगडी उंच सखल भाग लागतो. कुठून कोणतं झाड सुरु होतं आणि संपतं समजतच नाही. दगडी भाग उतरून दादांनी नेलं. त्याजागी बिडी करतात ती झाड होती. त्या पानाची  झाडणी पण करून वापरतात आदिवासी लोक.
नंतर दिसला तो गुळवेल. हा फार ऐकलेला. उंची कमी पण झुपकेदार झाड होती ती होती अर्ध सुपारी ची झाडं. आधी फुलं येतात मग सुपारी. मायग्रेनवर गुणकारी. गिलिया झाडाची माहिती हुकली माझी. पुढे दिसले ते पुत्रंजीवा झाड. तुळशीची माळ करतात ते . नंतर येतात सागवान , आजवर फक्त सागवानी फर्निचर बघितलं होतं, मोठ्या खोडाची झाडं पाहण्याचा योग आज आला. पूर्वी सागवानाचीच पान वापरून पोलिश कसं करायचे ते पण चुरून दादांनी दाखवलं. हल्ली हे वापरात नाही. अगदी ओरिजिनल पोलिश सारखाच रंग.
ऊंदिर पाला खाऊन मरतात ते झाड बघितलं. शेतकरी ही झाडं बांधावर लावतात. ही झाडं दिडशे फुटावरून पाणी खेचुन घेतात. नाव _____

आता पुढे चिखल सुरू आणि चपलांचा आकार बदलु लागतो. साधी चप्पल तर ओळखण्या पलीकडचीच होते. त्यामुळे सावधपणे चालण गरजेच. 
माणसाच्या गुडघ्याइतपत झाडं, लहान लहान पण तीन चार रंगाची फुलझाडं कास पठार सारखी मधेमधे होत. चिमणी वजा बरेच पक्षी दिसु लागले की आपण रमुन जातो. रोजचं आयुष्यच विसरून जातो.  कोणाला गारवा जाणवतो तर कोणाला डास चावतो, कोणाला पक्षी साद घालतात तर कोणाला हिरवळ कॅमेराबंद करायची असते. मजा सुरू होती. रस्ता म्हणजे अगदी -
भिजलेल्या वाटा... 
चिंब पावसाची ओली.....
 या गाण्यासारखाच वाटु लागतो.
चिखलात पांढरे ठिपके असलेले मोठ्ठे पैसे, गांडुळ आणि अनेक नाव ठाऊक नसलेले त्यामुळे न समजलेले असेही प्राणी दिसतात.
पुढे मोहरीच्या शेतेत सारखं शेत त्याच्या पलिकडे गिर गाईंचा गोठा होता.
जवळच वाहणारे चिखलाचे ओहोळ, गोठ्याचा तो टिपीकल वास आसमंतात भरून जाणवतो. भारद्वाज ,कोकिळा अनेक पक्षी लक्ष दिल तर दिसतात.
दादाला सिपनासाठी काम करून ३५ वर्ष झाली आहेत. २००४ साली नारगोळकर सर अंदमान जवळच्या बेटावर गेले होते तिकडे त्सुनामी मधे बेपत्ता झाले असे समजले. पण हार न मानता नयना ताईंनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट पुढे चालु ठेवलाय.  सरांचा पाच सहा वर्ष सहवास लाभला त्यातुन ईतकं शिकलो अस कौतुकान दादा सांगत होता. आता काही भाग जाळला लोकांनी, झाडं तोडली म्हणुन कमी झालय जंगल. परंतु ताई हे ठेवणार आहेत ते फक्त आपल्याला ऑक्सिजन मिळेवा म्हणुन! सलामच त्यांना.
पुढे काटेसावर झाड होतं, खोडाला अक्षरशः काटे. या काट्यांपासुन सौदर्यपिटीकांवरचे औषध बनते. यंदाच्या पावसात याच्या फांद्या तुटल्या. पण निसर्ग पहा थांबत नाही सृजनशील तत्व वापरून शिल्लक असलेल्या फांदीला पण पालवी फुटण सुरू झालेलं दिसलं.
नंतर होतं समुद्रफळाच झाडं कावीळीवर रामबाण ऊपाय. त्याच फळ ऊभ लंबगोलाकार दाखवलं दादानी. कर्मळ नावाचा वृक्ष दिसतो पुढे. गणपतीच्या केवड्याची झाडं, रसरशीत काटेरी पोपटी पिवळी पानं.
सीता लंकेत अशोकवनात होती ती अशोकाची झाडं सेम आंब्यासारखी पानं त्याची. जाणकारालाच ओळखता येईल फरक. नंतर एरंडा, मुगली एरंडा, गुलमोहराची जवळजवळ झाडं. बहावा -अमलताश व्वा!  चालताना वाकुन चालाव लागत होतं मधेमधे वेली फांद्या येत होत्या. नंतर होती मोहोगणी, महागणीची झाडं. गर्द झाडीत मस्त फोटो काढले. निसर्गाच्या विविधतेची कल्पना आली. 
दादा पण न कंटाळता सर्व प्रश्नांची उत्तर देत होता. एकाचवेळी पाच पान असलेल झाड वर पाहता चांदण्यांनी भरून गेलेलं छतच दिसत होतं. आणि मोकळा श्वास घेणारे आम्ही खाली.

जास्वंदासारखीच पण बारीक फुलाची झाडं मस्त होती. तेंदुरपत्ताची डार्क पानाची झाडं जास्त लक्षवेधक होती. औषधी शिवण झाड बघितलं. पक्ष्यांच्यां किलबिलाटात शिसम शिसवीची ऊंच झाडं होती. झाडीच्या बोगद्यातुन चालल्या सारखी पायवाट होती. जंगलात थोडा अंधार जाणवला.
साधुंचा दंड कमंडलु बनवतात ती झाडं पाहिली. मोठ्ठी अवाढव्य. भिक्षापात्र बनवत ते झाड दाखवलं, त्याच फळ अर्ध फोडुन ते बनवतात समजलं. सगळच अनोख होतं.
एका पानाच्या टोकातुन तीन पानं फुटलेलं कमालीच झाड दिसलं. काय निसर्ग म्हणावा तरी. नंतर होता कृष्ण वड. पानं त्याची मोठी होताना द्रोणासारखी होतात. भगवान कृष्ण म्हणे यातच माखन खायचे. नंतर होतं अर्जुनारिष्ट्य झाड. त्याच्या सालाचे औषधी वापर समजले. याच साल खोड वेगळच.. जवळच अशोक वेलाची गुंतागुंत त्यात फिकट जांभळ्या फुलांचा सडा झकासच.
अष्टगंध शेंदुर वृक्ष पाहण्याचा योग आला. शेंदुर फळ केशरी आत छोट्या बिया तो शेंदुर, दाखवला दादानी. अष्टगंधाची गोल गोल फळं. 
अत्तराच झाड त्याच साल पान रगडुन सुवासाची अनुभुती आली. नंतर कित्येक वर्षाची लाजाळु पाहायची ईच्छा पुरी झाली. मनातला बालक बाहेर आला आणि मी पान मिटवत गेले. आता ऊजेड वाढलेला जाणवला तो मिचमीच्या डोळ्यांमुळे.
पुढे रीकामे प्लाॅट दाखवले दादानी. 
रबडा चिखल जोड्यांवर मिरवत दीड दोन तासाची सफारी संपली. साडे अकरा झालेले, पाय चपला धुवुन आम्ही परत निघालो.
नयना ताईंना धन्यवाद देऊन एक फोटो काढला. आता डोळ्यासमोर फक्त हिरवच दिसत होतं. गाडीत प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या झाडाबद्दलच बोलत होतो.
एकदा निवांत बसुन पक्षी ऐकायला जायच ठरलं. मनातल्या निसर्गाचा ओलावा वाढवुन काॅक्रीटच्या जंगलात दिसेनासे झालो. मात्र मनात माणसान बनवलेलं जंगल घेऊनच!
 
एकदा भेट द्यावी अशीच हि सिपना वनराई आहे.


--
--
सौ. गौरी अनिरुद्ध पाठक 
 
A) https://www.languagetheque.com/diwaliank2021/
 
 B) Maharashtra times Pune & nashik

 
 
17th oct 2021 nashik maharashtra times