Thursday 21 November 2019

गिरनार यात्रा

"गिरनार यात्रा - अविस्मरणीय अनुभुती"
(वैकुंठ चतुर्दशी -त्रिपुरी पौर्णिमा )
(९ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०१९)

साधारणपणे एक वर्षांपूर्वी मनात श्री क्षेत्र गिरनार दत्त पादुका दर्शनाची ईच्छा झाली. मी दिर , जाऊ व नवरा याना ती बोलून दाखवली. मागच्याच वर्षी जाण्याचा योग त्यांचा होता. मी मुलाच्या दहावी मुळे नाही म्हटले. तेव्हाच यावर्षी जायचं ठरवलं. बरोबर वर्षांनी कार्तिकी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी योग आला. दत्तमहाराजांनीच तो घडवुन आणला. मागच वर्ष कुठंतरी मनात यंदा दर्शन घडवा  प्रभू हाच जप सुरु होता.  कामावर जाताना  एक बलभीम मंदिर लागतं, रोज मला शक्ती दे अस आपसुखच म्हटलं जात होतं. जाऊन आलेल्यांचे अनुभव विचारण्याचा जणु  नादच  लागला होता. 

आणि तो दिवस ९-नोव्हेंबर-२०१९ उजाडला. डेक्कन एक्सप्रेसने मी आणि नवरा दुपारी ३ . १५ ला ठाण्याला जायला निघालो. प्रवासाचा पहिला टप्पा सुरु झाला. नागपूरहुन नणंद आधीच ठाण्याला आली होती. पाच जणं ठाण्याला एकत्र जमलो. दीर, जाऊ, नणंद, नवरा आणि मी. जावेनं छान जेवू घातलं . प्रसादाचा शिरा खाल्ला. सामान, तिकीट वगैरेंच्या गप्पा  झाल्या. जय गिरिनारी म्हणत  एकमेकांचा उत्साह वाढवत मस्त सेल्फि झाला.  रात्री १० वाजता टीम गिरिनार निघाली. ठाण्याहुन दादर ला लोकल ने गेलो. लोकल पकडताना, प्लॅटफॉर्म बदलतांना झालेले धावपळ, गंमत, हसून हसून पुरेवाट झाली होती. दादर  ते सेंट्रल परत लोकल प्रवास. सेंट्रल हुन राजकोट ची दुरांतो रात्री ११ वाजता होती. आतुरता, विश्वास, श्रद्धा, ओढ, अश्याने तुडुंब भरलेली मन गाडीत स्थिरावली. 


सकाळी १०. ५५ ला राजकोट येणार स्टेशन होतं. ९.०० वाजता गाडीतच पराठा, चिवडा, चकली, नाश्ता झाला. दत्तकृपेने दुरांतो मधे छान चहा सुद्धा मिळाला. राजकोट ला गाडी १०.२० ला म्हणजे बिफोरे टाइम पोचल्याने छान वाटत होते. स्टेशन स्वच्छ छान होते. हवा पण फार गरम नाही , फार थंड नाही अशी होती. राजकोट ला दिराचे एक स्नेही असतात. त्यांच्यामुळे राजकोट ते जुनागड गाडी ची सोया झाली. स्टेशन वर चहा घेऊन तात्काळ जुनागड कडे रवाना झालो. 

राजकोट  शहर  रविवार असल्याने शांत होते. थोड्यावेळाने ईदची तयारी - जुलूस, अन्नछत्रे रस्त्यात दिसत होती. नटून थटुन  लोकं  दिसत होती.  मोठंमोठ्या भांड्यात अन्न  शिजत होतं.  ठिकठिकाणी  केकचे स्टॉल होते.  मज्जा आली बघायला. जाताना वीरपूर आणि जेधापूर लागले.  भरपूर  शेती - विविध झाडं कशाची? यावर चर्चा सुरु झाली . पार पांढुर्णा गावात मंडळी पोचली. बंधेजची फॅक्टरी ची कामं  दिसली. अचानक पुसटसा डोंगर कडा दिसला आणि ज्याचा ध्यास घेतलेला,  ज्याची आस आतुरता होती तोच  पवित्र श्री गिरनार पर्वत प्रथम दर्शन देत होता. डोळे विस्फारून आम्ही पाहात होतो. हळुहळू तो जवळ येत होता. मनात चलबिचल सुरु होती. दोन तासात आम्ही जुनागढला पोचलो. कमानीतुन आत जाण्यास प्रायव्हेट वाहनांना मज्जाव होता. दोघा भावांनी  टमटम शोधली. सामानासकट आम्ही गडगडाट टमटम मध्ये चढलो.  एका पोलिसाला विनंती करून अमर पराठा लॉज पर्यंत नेण्याची परवानगी घेतली.  चला उतरा  आपलं ठिकाण  आलं  - दीर म्हटले. उतरून समोर पाहते  तर डोळ्याच्या याकडेपासून त्या कडेपर्यंत गिरनारचा विस्तार  होता. जत्रा असल्यानं रस्ता शृंगारल्या सारखा नटलेला वाटत होता. जागा वेगळी  भाषा वेगळी माणसे वेगळी पण तरीही आपलेपणा वाटत होता.  तिसरा मजला गाठला. सामान ठेवलं. आंघोळी आटोपल्या. जो आवरून होईल तो गॅलरीतून गिरनार पाहत होता.  रस्ता पाहत होता. सर्वत्र चैतन्यमय वातावरण होतं. 


आवरून खाली उतरलो. जवळच असलेल्या नरसी मेहता धर्मशाळेत गेलो. पाचच मिनिटं अंतरावर होती ती. सात्विक-घरगुती अस जेवण जेवलो. (घराची आठवण झाली. ) आजूबाजूस चढून व जाणारे बघुनच ओळखू लागलो. आपण कसे दिसणार आहोत उद्या याचा अंदाज पण आला. गंमत अपार्ट पण छान वाटलं. रात्री इकडेच हलकीच खिचडी कढी खाऊन चढण सुरु करू अस ठरलं. रूमवर गेलो. तास दोन तास आराम करून मग सामान भरू असा विचार होता. सगळ्यांनाच झोप लागली अस नाही. चार वाजले. चहा खालीच जाऊन प्यायचा म्हणून आवरून निघालो. अजून पोट जड होत. रात्री जेवूच नये ठरलं.

 दोनदा चहा घेतला आणि दादाच्या म्हणण्यानुसार काश्मिरी बापू आश्रम पाहून येऊ असच ठरलं. ते पण आधी गेले नसल्यानं शोधतच जावं  लागणार होत. जितक्या सहजतेने आम्ही  तिघी जाऊन येऊ म्हटलो  तितक्याच  शंकेमुळे  जावं कि नाही द्विधा वाटू लागलं होत. याच कारण अंधारातला जंगलातला माहित नसलेला रास्ता. परंतु दोघा भावांनी उचल खाल्ली आणि काळजी करू नका, मोबाईलचा टॉर्च  लावु आणि जाऊ म्हटलं. मग एकमतानं निघालो. यात दत्तमहाराजांनी आम्हाला वॉर्म अप घडवला. अंधारातली पायवाट, घनदाट झाडी, झरना, पाणी, डबकी, आवाज अशात मधे  मधे भेटणारे वाटसरू दिलासा देत होते. साधारणपणे ३-४  किलोमीटर  नंतर घंटानाद ऐकू आला. तोवर आमची रामरक्षा, भीमरूपी, रामाचं अष्टक म्हणून झाली होती.  महाराजांची कृपादृष्टी असेल तर काळजीचं  कारणच नसतं. आश्रम आलं. पायऱ्या चढून वर गेलो. तोच समोरून दिशा दाखवत दोघे आले. आम्हाला काश्मिरी बापू याचे दर्शन घडवले. त्यांना नमस्कार करताना खरं सांगते आपसूखच डोळे वाहू लागले. ते थोडे दूर बसले होते. दोन हात उंचावून आशीर्वाद दिले. तिकडून पुढे मोठी पडवी होती.  तेजस्वी चेहऱ्याच्या अशा केशरी वस्त्र परिधान करून त्यांच्या  शिष्या  जपमाळ करत होत्या. आनंदी हसतमुख चेहरा आम्हाला आशीर्वाद देत होता. त्यांच्या जवळच्या बाईंना त्यांनी आम्हास जेवणाची खुण केली. मँगो बाईटची गोळी प्रसाद म्हणून दिली. मागच्या अंगणात  ताडपत्रीचा मांडव होता. उंच सखल टोकेरी दगड अशीच ती जमीन होती.  त्यावर निळी ताडपत्री होती.  प्रसाद म्हणून वरण, भात, भाजी, पोळी ताटात होती. चवदार जेवण जेवलो. जणु काही महाराज म्हणत होते कि पोटभर जेवा आणि मग या वर. आज आम्हा सर्वांचे ग्रह फारच प्रबळ झाले असावेत. शांत मनानं  ती प्रसादाची गोळी खात, दत्तगुरूंच्या नामाचा जप करत परत  कधी  पोचलो कळलंच नाही. आश्चर्यच वाटलं दीड तासात आपण जाऊन आलो सुद्धा. का कोण जाणे आता आधी पेक्षा जास्त धीर वाटत होता. रूमवर जाताना रघुनाथ द्वार भवनात देवळा जवळ काठ्या खरेदी झाली. लंगर सुरु होता तिकडे ताक पिऊन खोलीत गेलो.

आपापल्या जवळ सामान कस कोणी घ्यायच ते घेतलं. बुट चढवले, काठ्या पकडल्या आणि स्वतःस श्रीदत्तगुरुना स्वाधीन करून आम्ही लंबे हनुमान देवळात पोचलो. या देवळात हनुमानास नमस्कार करून चढण्यासाठी बळ व शक्ती दे म्हणून पुढे जाण्याची प्रथा आहे. नारळ फोडला, भिमरूपी म्हणुन निघालो. पुढे कमान  आहे व पायऱ्या सुरु होतात. चौकात चढावाव मारुतीच सुरेख  देऊळ आहे. पहिल्या पायरीची पूजा आरती करून, मनोभावे नमस्कार करून, स्वतःस श्रद्धेने श्रीदत्तगुरुंचा स्वाधीन करून चढायला सुरवात केली. एका लाईन मध्ये धीमे धीमे चाल सुरु केली. आजुबाजुस पाणी,  लिम्लेटच्या गोळ्या, ताक, सरबतं अशी दुकाने होती. सुरवातीच्या काही पायऱ्यांवर आकडे आहेत. ५० पायऱ्या झपकन झाल्या. प्रवास सुखकर होवो असे शुभेच्छांचे दोन फोन येऊन गेले. साधारणपणे १०:४५  ला रात्री आम्ही चढणं सुरु केले. नामस्मरणाचे विविध ताल ऐकत चालत चालत २५० पायऱ्या आल्या. आता घामानं डोकं काढलं होत. श्वासाचा जोर वाढला होता. वहिनींनी भीमसेनी कापराचा तुकडा जवळ ठेवण्यास दिला. अजुनही आम्ही वस्तीतच होतो असं वाटत होता. जय गिरनारी, अवधूत चिंतन श्रीगुरुदेवदत्त, गुरूदेव दत्त असं म्हणत चढत होतो. ५०० व्या पायरी पर्यंत पोचलो. मांड्या, पोटऱ्या जाणवु लागल्या परंतु त्रास त्रागा वाटत नव्हंता . आता ठराविक पायऱ्यांवर आकडे आहेत. वर्दळही खुप होती. डोली वाले पाहुन तर काटाच येत होता. त्यांची कमालच  आहे. म्हणता-म्हणता १००१  पायरी गाठली. वरून जुनागड, गिरनार पायथा दिव्यांची झगमगाट  दिसू लागली . दोनतीन फोटो झाले. ठराविक अंतरान एक दोन मिनीटं उभा राहत होतो. काठीची कमाल जाणवत होती. काठी म्हणजे प्रत्यक्ष दत्तमहाराजच हात देत आहेत असं वाटत होता. आता पायऱ्या लगेच जास्त होत्या तसाच कातळ दगड सुरु झाला. गारवा वाटत होता. पण तो आल्लाहदायक होता. आम्ही घाम  पुसत होतो.

अबब!! ३००० पायऱ्या झाल्या. विश्वासच बसेना. अंबामाता देऊळाजवळ  थोडं थांबु असं दादा म्हणाले . अजुन २५०० पायरी नंतर ते होतं. आधी नेमीनाथांचं देऊळ आलं. बांधकामाचं सामान पडला होतं. चढताना बरेचजण पुण्याचे ओळखीचे झाले . चढताना कोणीच बोलत  नसे .  दम खायला थांबलं कि बोलणं होत असे . नंतर जरा उतारांच्या पायर्यांचच वळण वाढतं. जैन मंदिराजवळ पोचण्या आधी (थोडंसच) मारुतीचा देऊळ लागतं. चौथरा पांढऱ्या फारश्यांनी भरला होता. तिकडे बसलो पाठ पाच मिनीट टेकु म्हणून बसल्या बसल्या मागे झुकलो. काही जण पाय सरळ करून बसलो. इतक्यात भरभरा  बोचरा वर सुरु झाला. अचानक गारठा वाढला. जस जस वर जातो तस तस गारठा जाणवतो. १०-१५ मिनटात इकडून निघालो . गडावर दरवाजे असतात तसे दरवाजे होते.  घुssघुss वारा होता. आत गेलो तर गार  पाण्याचा स्टॉल , हसतमुख ती माणसं पाणी प्या ताजे व्हा वर जा असा म्हणत होती . ती जागा जैन मंदिर होती. अंबाजी देवळाची वाट आता सुरू झाली. वाटेत लहान लहान देवळं आहेत. गुफा आहे बाबाजी महाराजांची. रामाचं देऊळ आहे. या सर्व ठिकाणी परतताना थांबायचं ठरल आणि ६००० पायरीला नंतर अंबाजी देऊळ आलं . आता वरून दूरवर पर्यंत दिवे दिसत नव्हते.  देऊळ बंद होत . सकाळी पाच वाजता दर्शन घेऊ शकणार होतो. वाटेत बरेच वेळा - झाल निम्मच आहे, चालत रहा पोचाल अस म्हणणारे ऊत्साह वाढवत होते.

'तिसरा टुंक आ गया' असा कोणतरी म्हटलं. पुढे दोन्ही बाजूला दरी  मध्ये रस्ता  कधी सपाट तर कधी पायरी असा होता. कुट्ट अंधार होता. आता होते ते फक्त काट्यांचे ठक ठक आवाज. अंबाजी माता डोंगर ते गोरक्षनाथ डोंगर पायऱ्यांनी डोंगराच्या टोकावरून जोडले आहेत. चढताना फारस वाटलं नाही परंतु उतरताना वाटलं. ... आश्चर्य वाटलं. .. इकडून आलो आपण! उताराच्या पायऱ्या त्यापण जास्त व तीव्र चढण अस करत गोरक्षनाथ धुनी जवळ आलो. डावीकडे नवीन मूर्ती मंदिर तर उजवीकडे गोरक्षनाथ जुनं मंदिर होत. चार पायऱ्यांनंतर डावीकडे चौकोनी तट, तटावर मधोमध छानसा घुमत त्यात गोरक्षनाथ मूर्ती (पांढरी शुभ्र) हिरवा केशरी फरशीचा वापर सजावटीत होता. समोर काळी  पाषाणाची नितळ आणि मोहक गणपतीची मूर्ती होती. भगवा फडफडत होता. गारवा असूनही उबदारपणा इकडून जाताना जाणवला. पायऱ्या किती झाल्या हा विचार इकडे येताच नाही. आपण हलकं फील करतो. परत पुढचं टुक / टोक येताना दोन्हीकडे दरी , अंधार पायऱ्यांवर लक्ष ... अंबामाता टुक नंतर एकही स्टॉल नाही. आता चंद्र हळूहळू मोठा होतोय जाणवू लागला. स्वच्छ नितळ प्रकाशात न्हाहून निघत होतो. इच्छापूर्तीच्या जवळ जवळ जात होतो. भावुक वाटण साहजिकच होतं . आता श्री दत्त पादुका टोक / टुक नजरेच्या टप्प्यात आलेलं दिसत होत. फक्त कातळ दगड अंधार . आनंदामुळे पावलांची गती वाढली. दोन कमानी आल्या. एक वर जाते ती श्री गुरु दत्त पादुका स्थळ तर एक खाली जाते. कमंडलू तीर्थ कडे. (११ नोव्हेंबर १९ पहाटे ४.३० वाजता) इतक्यात ऐकू आलं. 'अरे चालो धुनी लाग गई .. , आज सोमवार होता. सोमवारी या ठिकाणी म्हणजेच श्री गुरुदत्त यांच्या अक्षय निवास स्थानी धुनी आपोआपच प्रज्वलित होते. आम्ही आधी गुरु पादुका दर्शन घेण्याचं ठरवलं.  ब्रह्ममुहूर्तास आम्ही  पोचलो होतो. आतुरता , आनंदभाव श्रद्धापूर्ण अंतःकरणानं आम्ही चढू लागलो. सर्वात तीव्र उतारावरच्या या पायऱ्या, चंद्राचा प्रकाश आणि नामस्मरणात कसे चढलो कळलचा नाही. ५० एक पायऱ्यांवर आम्ही होतो. ज्याचा ध्यास , ओढ वर्षांपूर्वीपासून होती ते श्रीगुरु दत्त पादुका ठिकाण जवळ येत होत. हात थरथरत होते. आनंद वाचा फोडणार , अश्रूंचा आधार घेणार याची मला जाणीव होत होती. जेमतेम २० पायऱ्या उरल्या. प्रत्येक पायरीस डोकं टेकवत नमस्कार करत चढत  होते. आनंदाश्रु  मी थोपवू शकत नव्हते.पायऱ्यांवर चंद्राचा प्रकाश होता.  गुलाबदाणीच्या पाण्याचा, गावठी  गुलाबाच्या फुलांचा सुवास पायरीसही येत होता. वर पाहते तर भगवा झेंडा शुभ्र पांढऱ्या चंद्रप्रकाशात न्हाऊन निघत होता. अंगावर ते वारं , तो प्रकाश, गावठी गुलाबाच्या सुवासासकट आत जात आहे असं वाटत होतं. तो मनास शांती देणारा  वारा आरपार न जाता शरीरात मुरतोय, आत खोलवर जातोय असच वाटत होतं. ताईनी व मी घट्ट हात धरले. नजरेनंच भावना टिपल्या. परत नमस्कार करत चढु लागलो. समोर गुरु पादुका ठिकाण उजवीकडे मोठा गोल दुधाळ चंद्र वर बरोबर वर सप्तर्षी आजुबाजूस चमचम तारे आणि .... चार पायऱ्या उरल्यावर एक रेलिंग आलं. आणि तो क्षण आला त्या पावित्र्य भूमीस स्पर्श केला . जन्माचं सार्थक झालं. आत डावीकडे वळुन समोर परमेश्वर, पवित्र दत्त पादुका, मोठ्या ठसठशीत सुंदर गंध लावलेल्या मनाला भावणाऱ्या मोहकशा होत्या. पाच मिनिटात भरभरून त्या डोळ्यात साठवल्या जात होत्या. मागे गोड हसणारी श्री दत्तात्रयाची पांढरी मूर्ती होती. जवळच एक गुरुजी बसले होते. ते मराठीत बोलत होते. शाल नारळ पैसे वहिनींनी व नवर्याने दिले. प्रसाद पादुकांना टेकवून त्यांनी परत दिला. एक चुंबक आपल्याला धरून ठेवतं तस वाटत होतं. ही स्पंद, हा आनंद, अद्भुत अनुभुती आयुष्यभर कुठेही डोळे मिटले तरी आठवेल अशीच आहे. गुरू पादुकांना स्पर्श करण्यास मज्जाव आहे. दुरूनच नमस्कार करायचा. मस्त ठसठशीत पावलं सुंदर झेंडुच्या फुलांनी सजवलेली होती. जणु ते महाराजांच पायघोळ धोतरच- भगवं! हे परमेश्वर दर्शनाची ईच्छा निर्माण करणारा तूच आणि ती पुरी करण्याची शक्ती देणारा पण तुच!  परमेश्वरास समर्पण करणं याच महत्व आज मला समजलं. प्रदक्षिणा पुरी करून परत डोकं टेकुन त्या पवित्र भूमीवरून १०,००० व्या पायरीवर पाय ठेवून बाहेर पडलो. दर्शननंतरचे आनंदी चेहेरे, भारावलेली मनं घेऊन हे परमेश्वराचे मंदिर - "शरीर" घेऊन २० पायऱ्या खाली आलो. चपला बूट घातले. आता उजवीकडचा चंद्र नव्हता, तो पूर्ण अंधारात होता. परंतु डावीकडे तांबडं फुटु लागलं होत. पुसटसची लालसर रेघ नारायण येण्याची चाहूल देत होती. ते चित्र कॅमेऱ्यामध्ये टिपलं. गिरनार टीम चा पण  फोट काढला. आंतरिक समाधानी असे कायमच भक्तीच्या दोऱ्यात बांधले गेलेले आम्ही पाच मणी अनुभूतीने भारावलेले असे. त्याच भावात कमांडलु क्षेत्र कमानी जवळ पोचलो. फारसं कोणी कोणाशी बोलत नव्हतं. बारिकस हसत होतो.


आधी सारख्याच तीव्र उतारावरून कमांडलुतीर्थ ला पोचलो. सूर्यनारायण उगवताना मागे दिगंबर स्वर आणि गिरनार पर्वत खरंच खुपच सुखद होत सगळं. थोड्या थोड्या लोकांना आत सोडत होते. आत पायऱ्या उतरुन गेल कि एक मोठी खोली आहे, त्यात एका मोठ्या घमेल्यात एक फूट मोठी अशी लाकडं होती. उबदार जागा होती. आम्ही धुनीस नमस्कार करून निरीक्षण करत होतो. ती मानस एकाग्रता देते. अंगारा घेऊन पुढे गेलो. एका खोलीत पाटावर बसलो . गरम गरम शिरा प्रसाद दिला. हवा तितका मागा म्हणत प्रेमान  वाढत शिष्य फिरत होते. प्रसाद बाहेर नेण्यास मज्जाव आहे. तो खाल्ला कि एक शिष्य हातावर पाणी घालतो. पुढे तीर्थ प्राशन (पाणी पिऊन) हे बाटलीत भरून घरी नेतात . (या तिर्थीस महत्व आहे.) आता ताजे तवान वाटु लागलं होत. हा प्रसादच उतरण्याची ऊर्जा देतो म्हणतात. परत तोच उतार - तीव्र चढण झाला होतं. आता नारायणाचं छान आगमन झालेलं होत. कोवळ्या किरणांचा थाट पाहत, अंगावर झेलत परत निघालो. पाचव टुंक/टोक श्री गुरु पादुका उजेडात पाहत पाहत चालत होतो. चौथ टुंक/टोक गोरक्षनाथ पर्यंतचा रस्ता उजेडात पाहुन भारी होत. वाट उजेडात पाहताना सोनेरी किरणातला हिरवा निसर्ग धुकं झाक दिसत होत. गोरक्षनाथ देवळात दर्शन घेतलं. हे जरा ऊंचावर आहे. देवळा बाहेर फोट काढला.


आता काठी म्हणजे तिसरा पायच झाली होती. पुढे उतारावर बाकडे/ कठडे होते. तिकडं थांबलो. साधारण  सातला परत निघालो. ८:४० ला अंबाजी देवळा जवळ चहा घेतला. अंबाजी माता देवळा जवळ बॉबी बटाटा नवीन पदार्थ खाल्ला. कसा खायचा?? हा !हा !हा ! तो प्रत्येकाने आवडीचा मार्ग निवडला. "आता जैन मंदिराजवळ जमु  मागे पुढे झालो तरी." असं वहिनींनी सांगितलं. जवळ जवळ ६००० पायऱ्या उतरण  शिल्लक होत. श्रद्धेनं विश्वासानं मनं मजबुत झाली होती. त्यात काठी होतीच. पायऱ्या ऊतरताना आपण रात्री काय रास्ता चढलोय याची कल्पना येत होती. साधारपणे ४००० पायरीच्या जवळ थांबलो. एक एक जण नजरेच्या टप्प्यात  पुढे सरकत होतो. उतरताना एक  दोन फोटो काढले. परतीच्या वाटेवर  घड्याळावर  लक्ष नव्हतं,   लक्ष  होतं ते पुढच्या पायरीवर. फक्त पायरी फोकस होता. जवळजवळ ३००० पायऱ्या उरल्या असतील  तेव्हा जाणवलं की ऊन वाढतंय. बरं झालं रात्री चढलो. मधेच  चढणारे लोक आम्हाला विचारात त्यांना आम्ही बक अप करत होतो. अनेक अपंग, अतिवृद्ध, बालकं सगळे चढत होते. जुनागढ रहिवासी जास्त करून अंबाजी देवळापर्यंत जातात. पुढच्या ४००० पायर्यांवर महाराष्टीरन लोक जे श्रीगुरूदत्त पादुका दर्शनाच्या ध्यासानं आलेत ते दिसतात. २७०१ पायरीवर आकडा दिसला तेव्हा मी बाकडा पकडला. १० मिनीटं वाट पाहिली. मंडळी दिसेचना. फोन लागेना. तेवढ्यात एक भडजी ग्रुप आला. "ऊठो जय गिरनारी बोलो, हो जाएगा" नारा होता. एकदम संचारल्या सारखं झालं आणि त्यांच्यात चालु लागले. वरती - मागे गुलाबी रंगावरून वहिनी व पांढरा रंग नवरा  ओळखु येत होते. तेवढच समाधान. अचानक ठिकठिकाणी लोक माकडांना खाऊ घालत आढळले. दोन तीव्र वळणं ऊतरले तर वाळका पाला पाचोळा ऊडावा तशी माकडांची सेना ऊजवीकडुन डावीकडे धावली. त्यात मी ५० तरी पायरी धाडधाड ऊतरले असेन. नवर्याचा फोन आला. पहिल्या पायरीशी थांबते बोलणं झालं. तेव्हा १९००  व्या पायरीशी होते. त्यावेळी जे सुचत होतं ते केलं. मधे वहिनी दादा थांबले, ताक घेतलं. तरतरीत झाले. नणंद व नवरा जवळच होते. ऊतरताना गुडघ्यांची कमाल असते. एरवी या अवयवाकडे आपण दुर्लक्ष करतो. शरीराची काळजी घ्या असच परमेश्वर सुचवतात. ६५० पायर्यया ऊरल्या तेव्हा पाय ऊभं राहिलं की डगडगत होते. पण चालत राहिलं की टकाटक. शेवटच्या ६५० पायर्या पुन्हा गुरूदेव दत्त म्हणतच खाली ऊतरलो. दैवी जाणिवेतुन परत मानवी जाणिवेत जाताना हे होणारच होतं. चढावाव मारूती जवळ येऊन पोचलो. आनंद गगनात मावेना. नणंदा भावजया भावुक झालो.आम्ही चक्क मिठीच मारली. परमेश्वर कृपेनं काय साद्ध्य झालय यावर विश्वासच बसत नव्हता. पोटभर पाणी प्यायलो. दुपारचे १२. ३० वाजले होते. पहिले बुट काढले. पाय मोकळे केले. नवय्याने मालिशवाल्याकडुन  पायाला मालिश करून घेतली. आम्हाला करायची होती पण आडोसा नव्हता. परत लंबे हनुमान मंदिराजवळ नारळ फोडला. यात्रा सफल झाली. त्याचे आभार मानले. संथ गतीनं पाचही जणांची पावलं पडत होती. मनात तेच दृष्य फ्रीज झालं होतं. नरसी मेहता धर्मशाळा गाठली. भोजन केलं. काहींनी फक्त ताक घेतलं. चुरम्याचा लाडु ताटात मिळाला. काय आनंद झाला म्हणुन सांगु. परत जत्रेत घुसलो. आता तिसरा पाय परत देण्याची वेळ आली. जड अंत:करणाने तो दिला. मागे वळुन पाहता तोच डोळाभर मावणारा पवित्र गिरनार पर्वत, पवित्र गुरू पादुका टुंक अनुभव डोळ्यात तरळला. हलके हलके पावलं रूमवर पोचली. ती प्रसन्न, अद्भुत स्पंद ऊराशी कवटाळुन गाढ झोपी गेलो ते दुपारी १. ३० वाजता.

संध्याकाळी ५ वाजताच जाग आली. बरच फ्रेश वाटत होतं. दोन तीन ठिकाणी पायाला दुखत होतं पण तीव्रता नव्हती. दोन तास यात्रा, चढणं, अनुभव यावर गप्पा झाल्या. कशी गंमत झाली? कोण कुठं मागे होतं? कोणाला काय दिसलं? वगैरे. तसच यात्रा सफल झाल्याचे फोनही झाले. त्यांना आम्ही काहीतरी ग्रेट केल अस वाटत होतं परंतु आमच्याकडून ते महाराजांनी करवुन घेतलं हे आमचं आम्हालाच समजत होतं. नंतर सामान आवरून घेतलं. दादानी चहा वर आणुन दिला. बसल्या जागी चहा मिळण्याच सुख दोन्ही भावांनी आम्हास दिलं. साधारण साडेसातला खाली ऊतरलो. आज यात्रेत फिरताना लोकाअंकडे पाहण्याचा नजरीयाॅ कालच्यापेक्षा १०० पटीनं वेगळा होता. काल आम्ही नदीकिनारी होतो, आज आम्ही नखशिखांत नदीत होतो. परत एकदा लंबे हनुमान पर्यंत गेलो. रात्री नरसी मेहता मधे जेवलो. बाकडयावर तिघी गप्पा मारत बसलो.  आज गारवा जास्त होता. अंधारात पाऊलवाटांवरचे डोंगरावरचे दिवे पाहात बसलो. चला झोपुया गारठा वाढलाय लगेचच रूमवर गेलो. (रात्रीचे १०.30) गाढ झोपी गेलो. पाच तृप्त आत्मे झोपले होते.
(१२ नोव्हेंबर १९) सकाळी सातला जाग आली. आज त्रिपुरो पौर्णिमा होती. चहा नवर्याने आणला तो घेतला. तिघीनी आधी आंघोळ आटोपुन रघुनाथद्वार भवनाथ देवळाजवळच शिवमंदिर गाठलं. मनोभावे नमस्कार केला. त्रिपुरवात लावली. आवळ्याची वात लावुन नतमस्तक झालो. वहिनींनी छानस स्तोत्र म्हटलं. जवळच तुळस होती. आमच्यासाठी योगायोगानं तीन पणत्या होत्या, वात लावायला. तुळशीजवळ दिवा लावला. आणखी एक महादेव होता, तिकडे पण आवळ्याची वात लावली. त्रिपुरी पौर्णिमा दिपोत्सवाचा योग पवित्र गिरनार भुमीवर लाभला. तिघी पण (जाऊ , नणंद आणि मी) आनंदुन गेलो. तेवढ्यात फोन आला की गाडी आलीय चला.

दादांचे स्नेही भावेनभाई यांची गाडी राजकोटला नेण्यासाठी आली होती. (सकाळी 10 वाजता) अमर पराठा मधे पापडी, फाफडा आणि अननस असा नाश्ता केला. जुनागढ सोडण्याची वेळ आली. मागे वळुन नमस्कार केला. पावलं जड झाली होती. "गिरनार - अविस्मरणिय अनुभुती" ची शिदोरी घेऊन गाडीत बसलो.

आमच्या वाहनचालकाची वाटेत असणार्या वीरपुरला जलाराम बापु देवळाची भेट घ्यावी, दर्शनाचा लाभ घ्यावाही जबरदस्त ईच्छा होती. महाराष्ट्रात जसं गजानन महाराजांना मानतात, तसं गुजरातला जलाराम बापुंना मानतात हे दर्शनानंतर समजलं. आम्ही अजाण होतो परंतु या दर्शनाचा लाभ झाला. चालकाच्या माध्यमातुन महाराजाअंनी तो आणला. प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांनी श्री जलाराम बापुंना दृष्टांत दिला ती काठी व झोळी तिकडे रामाच्या देवुआत आहे. जलारामाअंचा जुना फोटो आहे. आजवर पाहिलेल्या रामाच्या मूर्तीपेक्षा ही वेगळी होती.(मिशी). वीरपुर ते राजकोट फास्ट गाडी आणली. गप्पा टप्पा करत राजकोट आलं. भावेन दादा व सौ जेवणासाठी वाट पाहत होते. छान जेवलो. दादाच ऑफिस पाहिलं.   
 तीन वाजता दादा विमान तालावर गेला. त्यांचे दिल्लीचे विमान होते. आम्ही चौघ भावेन दादांकडे थांबलो. रात्री ७  वाजता आमची गाडी असल्याने राजकोट मार्केट ला चक्कर मारण्याचा मानस सौ. भावेन वाहिनीनमुळे  उत्तम पार पडला.


बंधेज ड्रेस खरेदी झाली.  आग्रह आणि आदरातिथ्य या  श्री व सौ भावेन दादा वहिनींचा हात कोण धरू शकणार नाही. राजकोटच्या पॉट आईस्क्रिमची चव पण घेतली. पुण्याला नक्की या असा म्हणत ६ वाजता  राजकोटचा निरोप घेऊन आम्ही स्टेशनवर पोचलो. आता सामान पण वाढला होतं. वेळेवर गाडी आली आणि सुटली सुद्धा. गाडी रिकामी होती. गिरनारी  बरेच होते. अहमदाबादला गाडी भरते असं समजलं. ९.३० ला झोपायची तयारी करू म्हटलं.   भूक नव्हती  पण न  खाता झोपणं सवय नव्हती.  जवळच्या स्टेशनवर सुरेंद्रनगरला पाहू काही घेता आलं तर असं नवरा म्हणाला. पण दुरांतो २ मिनिट फक्त तिकडे थांबते  अशक्य वाटलं. पण आश्चर्य म्हणजे महाराजांनी  परत जातानाची हि पण ईच्छा पुरी केली. समोसे आणि खरी प्याटीस घेऊन नवरा आला. जय गुरुदेव दत्त! एक एक समोसा आणि अर्धा प्याटीस खाऊन झोपलो. 

दुसऱ्या दिवशी ६ वाजता सकाळी (१३ नोव्हेंबर १९) मुंबईला गाडी पोचली. ७ वाजताची इंटरसिटी गाडी पकडून आम्ही पुण्याला आलो.  लोकल पकडून जाऊ आणि नणंद ठाण्याला गेल्या. 

गुरुदेव दत्त! गुरुदेव दत्त!! गुरुदेव दत्त!!!
चदवावं मारुती , लांबे हनुमान देऊळ आणि श्री दत्त पादुका गिरनार 

या पूर्ण यात्रेत अनेक माणसं  भेटली ज्यांचा उल्लेख करायचा राहिला आहे तो असा -
१) दोन काकू भेटल्या. आदल्या  हो घाबरू नका. 
२)जुनागढ चे आजोबा. काश्मिरी बापूक मथ्था  टेक कारही जाओ .
३) ६००० पायरी नंतर चा माणूस. हो गया आपणे  जीत लिया दिल को  भगवान के बस चलते  रहो. सिडीया मत गिनो. 
४) जातानाचा वाहन चालक. भरपूर वजनी होता. उसमे क्या है ? प्रणाम करो चढो. में दो बार हो आय हू. 
५) ७० वर्षीय आजी . ना  बाटली. ना चप्पल. तुरुतुरु धावे. (गरजा मोजक्याच ... महाराज दाखवत होते. )
६) काही अनुभव लिहू शकत नाही ते अनुभवायचे असतात. 

 +_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_+_


!!! श्री गुरुदेव दत्त !!!!
आदेश बांदेकर यांच्या पैठणीच्या मालिके सारखं  "आज आभार मानाल? आणि क्षमा कोणाची ?  असा मी स्वतःला विचारलं. आभार मानल्या शिवाय काहीच शक्य नाही. 
आभार मान्यचेत ते -
१) माझ्यातल्या परमेश्वराचे ज्यानं हि ईच्छा निर्माण केली. 
२) माझ्या नवऱ्याचे ज्यानं प्रत्येक गोष्टीत सहमती दाखवली. सोबत केली. 
३) दादा वाहिनीचे. गिरनारच्या पोचण्यापर्यंत काय कसं करायचं  याचं मार्गदर्शन केलं. 
४) गिरीश  काकांचे आभार आमचं राहण्याचं बुकिंग केलं .
५) दादांच्या स्नेह्यांचे भावेन दादा वाहिनीचे. 
६) जुनागढ ते राजकोट वाहन चालकाचे वीरपूर साठी. 
७) दंडवते काकू आणि जोशी दाम्पत्य अनुभव सांगून मनाला दिलासा दिला यासाठी. 
८) आई / सासूबाईंचे आभार. घरची काळजी नाही. त्यांच्या  असण्यानं मुलाची चिंता नव्हती. शांत मनाने यात्रा करू शकले. 

सर्वात महत्वाचं आणि पाहिलं  श्री दत्त  गुरूंचे आभार, सगळ्याच साठी. तसेच माझ्या  सहकाऱ्यांचे सुद्धा साथी  साठी. 

मी  आपली आभारी आहे. 
क्षमा मागायची ती -
१) चढताना अनवधानानं किडा मुंगीस ठेच लागली  असल्यास. 
२) पूर्ण यात्रेत अनवधानानं कोणास दुखावलं असल्यास त्याची. 

श्री गुरुदेव दत्त!
शुभम भवतु!
सौ. गौरी अनिरुद्ध पाठक


Friday 13 September 2019

माहेरपण माहेरवाशिणींचं...

माहेरवाशिणींचा क्काचा सण "गौरी " "महालक्ष्म्या". या जेष्ठा कनिष्ठा माहेरवाशीणींच प्रतिक म्हणुन पुजल्या जातात. किती विचार व नियोजनबद्ध आहे ना आपली संस्कृती.
माझ्या माहेरी खड्यांच्या गौरी तर सासरी ऊभ्या महालक्ष्म्या असतात. यंदा पांढुर्णा नागपुरला जायची ईच्छा होती परंतु तीची ईच्छा मी ठाण्याला जावेकडे जाऊन सेवा करावी अशीच होती.

जायच यायच तिकीट झालं पण अगदी आदल्या दिवशीच ठाण्यात पावसानं थैमान घातलं होतं. जवळ जवळ सगळेच नकारात्मक सुर लागत होते. पण नवरा मात्र म्हणाला भर बॅग आणि ऊद्या सकाळच्या परिस्थितीवर ठरवु. सोबत पुतणी पण होती. दोघींचाच असा पहिलाच प्रवास.

सकाळीच पाऊस कमी झाला समजलं आनंद झाला. बाराला कामावरून परस्परच बस स्टाॅपवर पोचले. सव्वा वाजता बस कोथरुड ला पोचली. तिन्हीसांजेला महालक्ष्म्या बसवतात या अंदाजाने पाचला पोचु म्हणुन साडेबाराची बस घेतली होती. गौरी बसवताना पासुनच सगळं करायच बघायच होतं. ईच्छा तर होतीच पण तीनच छान योग आणला. रस्त्यात मस्त पाऊस, ढग आणि गप्पा मारत बसमधल्या गमती जमतींचा आनंद घेत साडेपाचला ठाण्याच्या घरी पोचलो. पाहतो तर काय गणपतीची आरती नुकतीच संपलेली. अंभईकरांच्या बाप्पांचं पण दर्शन नशिबात होतं. क्या बात है!

महालक्ष्म्या बसवताना प्रत्येक घरची वेगळी पद्धत, रीत असते. यांच्याकडे पुरुष मंडळी गणपती विसर्जन करून येईपर्यंत बायकांनी गौरी / महालक्ष्म्या वाजत गाजत घरात आणायच्या अशी पद्धत आहे. टेबलवर अतिशय सुंदर तयारी केलेली आढळली - दोन तबकांत मुखवटे काठाच वस्त्र पांघरून तयार होते, हळदीकुंकवाची ताट पाणी घालुन तर पावलांचा ठसा रांगोळी कोयरीसकट तयार होता. साड्या, दागिने, ज्वारीच्या २ पिशव्या आणि महत्वाचं म्हणजे मावशींच्या हातचा वाफाळता चहा सुद्धा!

हळदुकुंकवाचे हातांचे ठसे दारातुन आत महालक्ष्म्या बसवण्याच्या जागेपर्यंत तर दुसरे देवघरापासुन असे काढले. गौरीच्या पावलांचे ठसे हळदीकुंकू वाहुन दोन्ही दिशांनी आगमनाचा रस्ता तयार केला.

एका सुनेनं जेष्ठा व मुलगा असलेल तबक दारातुन तर दुसरीने कनिष्ठा व मुलगी असलेलं तबक देवघराकडुन वाजत गाजत जागेवर आणलं. वाजत गाजत म्हणजे पळीनं ताटावर वाजवत व टाळ वाजवत गजर करत महालक्ष्म्या आणल्या. त्या येताना आपण विचारायचं "कोण आलं?" "कसं आलं?" मग सुनांनी म्हणायच जेष्ठा आली कनिष्ठाला भेटायला. येताना गव्हाची रास पेरत आली. अस म्हणत दोन्ही तबकं जागेवर आली.
एकमेकींना कुंकु लावलं. माहेरवाशीणी घरी आल्या. मुली घरी आल्या की घरची शोभाच वाढते.

ती ईतकी आनंदात घरी येते की खाली बसायलाही न घेता सुख दुःखाच्या गप्पा सुरू होतात. म्हणुनच यांच्याकडे जमिनीवरच महालक्ष्म्या बसवण्याची पद्धत आहे. हे प्रथमच ऐकलं पण पटकन पटलं. माहेरी आल्यावर पाणी आसन हे सोपस्कार खरच नकोच असतात.

आधीच घड्या ऊघडुन निर्या पाडुन साड्या देवापुढे ठेवल्या होत्या. मुखवट्यांवरची चमक आणखीन तरतरीत होणार होती. सासु सुन नणंद जावा महालक्ष्म्यांना सजवायला सरसावल्या. तिन ठिकाणच्या तिघी होतो पण एक संघ काम सुरू झालं. मला त्या नणंदा भावजयांची नावही ठाऊक नव्हती पण त्यांनी सहज आपलसं करून सेवेत सहभागी करून घेतलं.
महालक्ष्म्यांना साडी नेसवणं, पोटात धान्य भरणं, सरळ दिशा पाहणं, दागिने घालणं, मुलांना नवीन कपडे घालणं अशा अनेक गोष्टी टप्प्या टप्प्यानं होत होत्या.

आधीच्या टवटवीत मुखवट्यात एकदम जानच आली. सोन्यास लाजवतील असे पितळी मुखवटे, त्यावरचं रंगकाम, आखीव रेखीव डोळे, भावमुद्रा, गळाभर दागिने, पारंपारिक सुंदर नथ, चांदिचे मुकुट, मेंदीचे हात, हातात तोडे सगळ कस खुलुन दिसत होतं. लेकरं तर आत्ता ऊठुन बसतील की काय असच वाटत होतं. ताटात गहु घेऊन त्यात मुलगा मुलगी बसवली होती. चौघही खुप गोड दिसत होते. घर एकदम भरल्यासारखंच वाटलं.

नंतर आजोबांनी सांगुन दादानी गौरी आवाहन केलं. स्थापना झाली. महालक्ष्म्यांपुढे लहानशी रांगोळी काढण्याच भाग्य लाभलं. जे जे करायची अनुभवायची ईच्छा होती ती ती गौरीनं पुरवली. दोन्ही महालक्ष्म्यांच्या मधे मोठ पडवळ, काकडी, कणिस दोरा बांधुन ठेवलं. मागच डेकोरेशनच लायटिंग आता अजुन खुलल होतं. आज प्रसाद नव्हता.समाधानी आणि तृप्त चेहर्याच्या जेष्ठा कनिष्ठा आपल्या पाल्यांबरोबर स्थानापन्न झालेल्या डोळ्यात साठवतच संध्याकाळ संपली.

आज गौरी पुजन व जेवण दिवस. दादाकडे तिन्हीसांजेला पुजा आणि मग नैवेद्य असतो. (साडेचारला पुजा) दिवसभर बायकांचा ऊपवास असतो. आज मात्र सगळ्या घरानच ऊपवास केला होता. मावशी असल्यानं तिखटाची खमंग खिचडी मिळाली. महालक्ष्म्या रथात बसुन आल्या अस समजुन दारात रथात देवीची पावलं असलेली रांगोळी काढली.
साधारण अकरा वाजता स्वयंपाकाची सुरूवात झाली. भाज्या चिरणे इ. काम तरी सुरू झाली.

सोळा भाज्यांची एक भाजी, पुरणपोळी, पंचामृत, वडे, भजी, गवल्याची खीर, तीन कोरड्या तर एक ओली चटणी, दोन कोशिंबीरी, वाटली डाळ, भात वरण, कढी, पातळ भाजी, लाल भोपळा भाजी अशा मस्त स्वयंपाकाची तयारी सुरू झाली. माझी खारीणी मदत झाली फार समाधान वाटलं.
बरोबर चार वाजता गुरूजी आले. सुंदर पुजा सांगितली. गुलाबी फुलांचे मनमोहक हार महालक्ष्म्यांना खुलुन दिसत होते. बालके तर हारामुळे आणखी गोजिरी दिसत होती. पिवळ्या धम्मक्क शेवंतीच्या वेणीनं तर महालक्ष्म्यांच्या सौंदर्यात भर पडली. आता मात्र सकाळी लावलेल्या फुलोर्याकडे लक्ष जाऊ लागलं. सकाळी पोटात १६-१६ करंज्या भरल्याच आठवलं. सुरेख खणखणीत गजरात पाचसहा आरत्या झाल्या. स्थान अजुन जागृत झालं. नेहमीच्या घरातली आणि आत्ताच्या क्षणाची घरातली ऊच्च स्पंदं फरक जाणवु लागली. काही म्हणा तो आनंद, त्याची अनुभूती स्वत:च घ्यावी. सांगुन समजणे अशी ती गोष्टच नाही मुळी. नंतर नैवेद्य दाखवला गेला, विडे ठेवले गेले. अनेक ओट्या भरल्या गेल्या. पंक्ति ऊठल्या.मन आणि पोट भरलं ते समाधान सर्वांच्या चेहर्यावरच समजत होतं.

रात्री झोपायला उशीर झाला. दुसर्या दिवशी लवकर परत निघायच होतं. झोप झाली नव्हती परंतु त्रास वाटत नव्हता.
काही झालं तरी गौरीला आज निघायच होतं, परत येण्यासाठी.....


Friday 28 June 2019

अनुभवाची खाण - आजी




"आजी " माझ्या मते प्रत्येकाच्या आयुष्यात आजी असावीच. आईची आई असो, बाबांची आई असो अथवा नुसती आजी. "आजी " या नात्याच्या टप्प्यावर पोचलेली स्त्री अनुभवाची खाणच  असते. आयुष्यात आलेल्या गणितांची उत्तरं योग्य कशी सोडवायची हे करताना आपल्यासाठी गाईड असते. कोणता फॉर्मुला कधी वापरायचा ते आपण ठरवायचं पण ती अनलिमिटेड सोल्युशन असणारी गुगलच असते. 

माझ्या आयुष्यात पण अशी एक आजी आहे. गेली २३ वर्ष ती मला योग्य वेळी भेटली जाते. जेव्हा जेव्हा भेट होते तेव्हा तेव्हा ती भरभरून देते. कोणताही आडपडदा न ठेवता देते. आधी वाटायचं कि रक्ताच्या नात्याचीच आजी नातवंडांना खरा प्रेम देते. पण हि आजी वेगळीच आहे. तिची स्मरणशक्ती तल्लख आहे. आताच्या जगाशी ती बरोब्बर अपडेट असते. कोणत्याची विषयावर आपण तिच्याशी मनमुराद गप्पा मारू शकतो.  सहज बोलताना ती आपली मनातली दबती, दुखती  नस ओळखून त्यावर झपकन मलम पण शोधून देते. आपण काहीच सांगायची गरज पडत नाही आणि उत्तर समोर असतं. सकारात्मकतेचे सचोटीचे असतात ते उपाय.
ती दूर दूरच्या आपल्या नातेवाईकांना पण लक्षात ठेवते. कसा कळतं तिला कोण जाणे आम्ही येतोय पण प्रेमानी खाऊ हातावर ठेवते. आठवणींनी लावून ठेवते. सतत नवनवीन पदार्थ करत असते. एकटी आहे म्हणून करायचा कंटाळा अजिबात नाही. 

२३ वर्षातल्या माझ्या प्रत्येक भेटीत मी काही ना काही शिकूनच तिच्या घरून निघाले आहे. माझा नवीन संसार मांडला होता तेव्हा स्वतःच्या घरातली  सोलणी, लहान पातेल्या वरच्या झाकण्या अशा दोन तीन वस्तू तिनं मला दिल्या होत्या. त्याच महत्व मला तेव्हा समजलच नव्हत. त्या अजूनही वापरात आहेत आणि बायकांचा घरातल्या चमच्यात पण जीव असतो अशा संसारातून त्या वस्तू देतानाचं मोठं मन मला हळूहळू उमगलं. 

पूर्वी आप्पा असताना आम्ही जायचो तेव्हा पेप्सीकोला आणून ठेवलेला असायचा. शनिवारचा रतीबचं जणू. आजीच्या सगळ्या चाली रीती पण पाठ असायच्या. मुलींना कमी लेखायचं नाही आणि घरटी दोन तरी लेकरं हवीतच हे सांगायचं जणू त्यांनी वसाचं घेतलाय. अजूनही त्या हे सांगताना मी पाहते. माझ्या बरोबर येणाऱ्या मित्र मैत्रिणींना पण त्यांचा लळा लागला होता. कॉलेज नंतर कुठं कुठे गेले सगळे तरी आजीची चौकशी हमखास करत असतात. 

कोणाचा कोण तो.. काय शिकतो?, कोणाच्या माहेरचं कोणीतरी त्यांचं काय विशेष आहे ते, कोण पास झालं , कोणाला हि माहित पोचावं, उपयोगी पडेल, कोण बरेच दिवसात आलं नाही खुशाली पण नाही, कोणाचं नाव पेपर मध्ये आलं त्याला फोन करायला हवा, अशा अनेक अनंत गोष्टी त्या आधी करायच्या त्या अजूनही करतात. 

८० चा पुढे वय असणारी हि आजी १८ वर्षाच्या मुलाच्या उत्साहाला लाजवेल अशी आहे.  शरीर थकलय थोडं पण मनं भक्कम आधीसारखच आहे. 

वेळेला खंबीर पणे सामोरं जाणं , कचऱ्यातून कला करून वस्तू बनवणं त्या जपणं त्यांना छान जमतं. कोणत्याही कामासाठी , प्रवास साठी , कार्यासाठी, यौग्य क्लुप्त्या त्यांच्याकडे भन्नाट आहेत. गवले करणं , वाती करून देणं हा सध्याचा साईड बीसीझनेस.  पण रिकामं बसणं नाही. आपल्या छोट्याश्या पेन्शन मधून अजूनही काही रक्कम सियाचीनच्या जवानांना त्या पाठवतात. जवानांना ऑक्सिजन हवा ना आपणच  द्यायला हवं आपल्यातला थोडं असं नेह्मीच म्हणतात. ऐकलं कि वाटत अशा भरपूर आज्ज्या जगात हव्या. आपण गेलो कि आनंद  होतो अशी हि आजी. आपण चुकलो असू वाटलं तिला तर गुपचूप मनात शिरुन  पटवणारी आजी, आपण केलेलं कर्तृत्व समाजलंं कि न चुकता फोन करणारी आजी, आनंदाच्या दुःखाच्या प्रसंगी योग्य तिथं उभी सापडणारच. 

अशी हि आजी मी खूप सल्ले देते पंतवंडे ऐकून कंटाळून जातात हे पण समजणारी आजी.  पण त्या पंतवंडानाही मनात "कधी जायचं पणजी आजीकडे?" हा विचार करायला लावणारी मायाळू पणजी आजी .  देवांनी एक भलताच चुंबक घालून पाठवलाय जणु ! एकदा भेटलेला माणूस पुन्हा भेटण्याची इच्छा धरणारच .

आजी हे एक आनंदी, सतत हसतमुख व्यक्तिमत्व. माझ्या नात्यातली हि आजी नाही तर मनानी जुळलेल्या नात्याची आजी आहे.  खर तर माझ्या चुलत सासऱ्यांच्या ऑफिसमध्ये आजोबा होते. त्या आजोबांच्या या सौ. संबंध तसे दूरचे , नाळ जोडली गेली ती नागपुरात. पण ती घट्ट असण्याचं कारण फक्त आजीच "साने आजी "

या आजीची भरपूर नातवंड असतील जगात त्यांना हे वाचून नक्की समजेल आणि आवडेल पण.

आजीला उदंड असे आरोग्य संपन्न उदंड आयुष्य लाभो !




सौ. गौरी अनिरुद्ध पाठक

Wednesday 8 May 2019

पाहिलं वाहिलं - श्रमदान !

पाहिलं वाहिलं - श्रमदान 
१ मे कामगार दिवस आणि  महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो. यावर्षी आयुष्यात प्रथमच हा दिवस खऱ्या अर्थानी अनुभवाला, तो महाश्रमदानात भाग घेऊनच. मागच्या वर्षी पासून पाणी फौंडेशनच काम कानावर होताच. बऱ्याच क्लिप बघून झाल्या होत्या. मागच्या वर्षी मी यात सहभागी होण्याचं ठरवलं होत. श्रमदानाचा हा मार्ग पाणी फौंडेशन मुले मिळाला.
मागच्या महिन्यात मी पाणी फौंडेशन मध्ये नाव नोंदवला. चार जणांचं श्रमदान पुरंदर तालुक्यासाठी नोंदवलं . यात नवरा आणि मुलगा सोबत असेल याची खात्रीच होती . चौथं बघू कोणीतरी असा विचार होता. कोथरुडपासून पुरंदर तालुका जायला जवळ आणि सोयीचा हॊत. २७ एप्रिलला गावाचं नाव ईमेलवर समजणार होत. मी खूप आनंदात होते. माझ्या विशलिस्ट मधलं एक स्वप्न पूर्ण होणार होत. आज पर्यंत श्रम म्हणजे कष्ट हेच तौक होत. कामावरून दमून घरी आलो कि श्रम झाले असाच वाटायचं. दिवसभर किती कास्ट करतो असा समाज होता. बैठं काम असल्यानी श्रम, कष्ट याचा खरा अर्थ माहितीच नव्हता बहुतेक.
३० एप्रिलला समजले कि उदाची वाडी सासवड हे गाव मिळालाय. चौथा मेम्बर पुतणी ठरली. सगळे जण पहाटे साडे तीन वाजता उठलो. आवरून घर सोडला ते साडेचारला. पाणी फौंडेशनच्या आधीच्या क्लिप बघून ते अनुभवायचा ध्यासच  होता त्यामुळे पहाटे उठण्याचा त्रास वाटलाच नाही. पाणी फौंडेशनच
व्यवस्थापन चोख होतं. रस्ता विचारणं किंवा अडचणीच्या निराकरणासाठी योग्य व्यक्तीचे नंबर एस एम एस द्वारा पोचले होते. याच गावात श्रमदानासाठी पी एम आय मध्ये नाव नोंदवलेले चार सहकारी पण आमच्या बरोबर होते. संस्था दोन पण काम एकाच. पी एम आय ची मला फारशी माहिती नव्हती . दोन गाड्या एकत्रच निघाल्या. भोपदेव घाटाचा रस्ता निवडला. पहाटेची बारीकशी चंद्रकोर सोबत घेऊन श्रमिक निघाले - कोथरूडहून!

गुगल मॅप मुले पहाटे रस्ता सोपा गेले. जस जसं सासवड जवळ आलं तास तसं आकाशात चंद्रकोरीच्या जागा सूर्यनारायण घेऊ लागले. सुंदर मोकळी गावाची हवा नुकताच फुटलेले तांबडं फारच सुंदर वाटत होतं . सासवड येताच स्वागत फलक दिसले. उदाची वाडी श्रमदान फारच सुरेख वातावरण, अगदी घरचाच कार्य जणु . काही अंतरावरच गाव लागल. २४ तास पाण्यातले शहरी आणि पाण्यासाठी २४ तास धावणारे गावकरी  सरमिसळ झाले होते. लहान मुली छानशी साडी नेसून श्रमिकांना तिलक करून स्वागत करत होत्या. त्याच फारच कौतुक वाटलं . स्वागत करणारे आनंदी गावकरी पाहून कष्टाची अशीही किंमत असते हा वेगळाच अनुभव आला.
सुसंगतपणे गाडी पार्क करायचे ठिकाण दाखवाव्यात आले. लहान लहान मुलं पण स्वयंसेवक झालेली पाहून भारी वाटलं . ऑन लाईन नाव नोंदणी असली तरी वैयक्तिक नाव नोंदवून आठ जणांचा एक असा गट करून काम मिळणार होत. मजा वाटत होती एक गटाला एक फावडं, एक कुदळ आणि दोन घमेली देत होते. शूर वीर लढायला चालल्याच भासत होतं . पुढे एका लहानश्या गावातल्याच मुळीं आम्हाला डोंगराच्या अगदी पायथ्याला नेलं. ती जमीन, ते काम याबद्दल तिला असलेल्या कामाची माहितीची कल्पना तिच्या चेहऱ्यावरून अजिबात येत नव्हती. त्याक्षणी ती आम्हाला सरस होती. तिनं आमचा खड्डा खणण्याची जागा दाखवली. पांढरी रेघ असलेली आयताकृती जागा, खणून माती कुठं आणि कशी टाकायची याची जुजबी माहिती देऊन ती गेली.

आता खरं एकी हेच बळ दाखवायची वेळ होती. पांढऱ्या रेगेजवळून आम्ही कुदळीने काम सुरु केलं. साधारण साडेसहा वाळजे होते. आलटून पालटून कुदळीन खड्डा खणंण सुरु केलं . फावड्याने माती जमा करून घमेल्यानी जवळच मातीचे डोंगर कारण सुरु झालं . साडेसातला चॅन जम बसला. हुरूप आला. शेजारच्या गटाचे अनोळखी असूनही दोस्ती होऊ लागली. आटा पर्यंत हात हा अखंड एक अवयव आहे असा वाटत होती. आज हाताचे लहान लहान अवयव आणि स्नायू  प्रथमच काम करत होते याची जाणीव झाली. बोटाच्या पेरांची कुदळी वरची पकड , खांद्यातून होणारी लयबद्ध हालचा, जमिनीवर रोवले जाणारे पाय, अश्या हात पाय कंबरेच्या विशिष्ठ हालचाली ज्या रोजच्या आयुष्यात कमी होतोत त्या जाणवल्या. फावड्याने माती ओढून तळहातावर येणार गट्टे , दंडावरचा फुगीरपणा असे बरेच बदल शरीरावर जाणवत होते. वर्षभर चोवीस तास पाणी मिळत ते सुख इतरांना गावातल्यान मिळावं यासाठी एकदा तरी श्रमदान करायला मिळावं हा हेतू मनातला. श्रमदानाचा खरा अर्थ समजून सफल होत होता . श्रमाचा कष्टाचा खरा अर्थ खरी व्याख्या आज उमगत होती ती पाणी फौंडेशन मुळेच. आपल्याला धान्य पिकवून देतो त्या शेतकऱ्यांसाठी दिलेले हे तीन तास मौल्यवान होते. जगण्यासाठी प्रकाश जसा महत्वाचा तसं पाणी पण महत्वाचं. जे सुख आपण उपभोगतो ते दुसऱ्यास मिळण्यासाठी हा खारीचा वाटा. आम्ही निसर्गाच्या नियमच - "जेवढं द्याल त्याच्या चौपट मिळवलं " या  तत्वच पालन करत होतो.  इतर रहिवाश्यांच्या हा नियम पाळावा आणि श्रमदान करून मानसिक आनंदाचा लाभ घ्यावा हेच आज सांगावासा वाटतंय.




या निसर्गाच्या नियमच, श्रमदानाचं महत्व मला पाणी फौंडेशनमुळे समजलं, मी आभारी आहे. या ठिकाणी पी एम आय चे पण लोक होते. गावकरी योग्य मदत करत होते खड्डा खणून होताच तो योग्य आहे ना ? पाहण्यासाठी दोन तज्ज्ञ येऊन गेले. गावकर्यांनी सुंदर मुगाच्या खिचडीचा श्रमपरिहार दिला. त्याक्षणी पंचपक्वान्नाला लाजवेल असा त्याचा स्वाद होता. १२' x ४' x १' फूट खड्डा खणून आमचं संपवून आम्ही परत निघालो. श्रमदान करूनही आनंदी उत्साही आणि काहीतरी जिंकल्याच्या भावात परत निघताना उदाची वाडी चे गावकरी धन्यवाद म्हणायचे पण विसरले नाहीत. माझ्या आयुष्यातलं पाहिलं वाहिलं श्रमदान अविस्मरणीय होत. पुन्हा एकदा जलमित्र पाणी फौंडेशनचे आणि गटातल्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
सौ गौरी अनिरुद्ध पाठक
(01.05.19)