Thursday 19 January 2023

२) माघ ((जानेवारी - फेब्रुवारी ) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका २०२३

माघ महिन्याचे महत्व :

हिंदू धर्मात हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. माघ महिन्यात स्नान, दान आणि उपासनेचे विशेष महत्त्व सांगितले आहे. या महिन्यात सूर्यदेवाचे विशेष महत्त्व आहे. कल्पवास माघ महिन्यात केला जातो. भगवान विष्णूचे सान्निध्य मिळवण्यासाठी माघ महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते असे मानले जाते. ही ऊर्जा अनेक प्रकारच्या आजारांपासूनही बचाव करते. या काळात शिस्तबद्ध जीवनशैलीचा अवलंब केल्यास अनेक प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते. 

माघ महिन्यातील सण :
वसंत पंचमी : या दिवशी, नृत्यादि कला शिकवणाऱ्या संस्थांत, विद्येची देवता सरस्वतीची पूजा करण्याची प्रथा आहे. वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, निसर्गाचे सौदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठते. वसंत पंचमी च्या मुहूर्तावर साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणीचा विवाहसोहळा संपन्न होत असतो. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालत आली आहे. वसंतपंचमी ते रंगपंचमी या काळात देवाला व रुक्मिणीमातेला पांढरे कपडे वापरण्याची परंपरा असल्याने देवासाठी खास पांढऱ्या रंगाची अंगी व उपरणे बनवण्यात येतात. देवतांनी या दिवशी शंकर पार्वतीचा विवाहपूर्व तिलक केला.  हा  दिवस वसंत ऋतूचा आगमन दिवस होता, तेव्हा पासून वसंत पंचमी आनंदाचा, उत्साहाचा सण साजरा होऊ लागला. 


 रथसप्तमी :  हा संक्रांतीच्या हळदीकुंकवाचा शेवटचा दिवस असतो. आधुनिक कालात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. यादिवशी घरातील आणि गावच्या मंदिरातील देवाला तीळ-तांदूळ वाहतात. सुगडात (सुघटात) गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरे, द्रव्य इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे. वर्षभर सूर्यप्रकाश देणार्या सूर्याप्रती कृतज्ञता मानण्यासाठी सूर्याची या दिवशी पुजा करतात.

 
महाशिवरात्र :  माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भारतभरात विविध तीर्थक्षेत्रे, तसेच प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगांच्या स्थानी विशेष यात्रा भरतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. या दिवशी महादेव पार्वती माता यांचा विवाह संपन्न झाला. 
 


भीष्म अष्टमी  : माघ शुक्ल पक्ष अष्टमी ला पितामह भीष्म यांचे निर्वाण झाले.  उत्तरायणच्या कालावधीला सकारात्मकतेच प्रतीक मानलं जात. उत्तरायणात मनुष्याला मृत्यू आला तर सद्गती प्राप्त होते, तो जन्म मृत्यु च्या बंधनातून मुक्त होतो. म्हणूनच पितामह भीष्म यांनी  इच्छा मरणाच वरदान असल्याने उत्तरायण सुरु झाल्यावर प्राण सोडला. 

 
महिन्यातील यात्रा, जयंत्या :
 १) गणेश जयंती   : तिलकंद चतुर्थी : माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्त्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. भगवान महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणपती प्रथम पूजनीय मानले गेले आहेत. कोणत्याही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते.
 

२) नर्मदा जयंती : माघ शुक्ल पक्ष सप्तमी नर्मदा नदीचा प्रकट दिवस हा तिची जयंती म्हणून साजरा केला जातो. अमरकंटक या नर्मदा नदीच्या उगमस्थानी आणि मध्य प्रदेशातील अनेक अन्य ठिकाणी साजरी होते. होशंगाबाद येथील घाटांवर दिवसभर हा उत्सव साजरा होतो. नदीच्या घाटांवर अनेक भाविक दिवे लावतात आणि नदीच्या पात्रात सोडतात. वशिष्ठ ऋषींच्या मते माता नर्मदा माघ शुक्ल सप्तमी, अश्विनी नक्षत्र, मकरशिगत सूर्य, रविवारी प्रकट झाली. म्हणून या दिवशी “नर्मदा-जयंती” माता नर्मदाची जयंती म्हणून साजरी केली जाते. भारतीय धर्म आणि संस्कृतीत नर्मदा परिक्रमा या संकल्पनेला आध्यात्मिक महत्त्व आहे.
अमरकंटक, नर्मदा नदी


३) जया एकादशी व भागवत एकादशी
 ४) गजानन महाराज प्रकट दिन   : माघ वद्य सप्तमी बुलडाणा येथील शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत लोकांच्या दृष्टीस पडले. हा दिवस गजानन महाराज प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. शेगाव ला श्री गजानन महाराजांचा मठ प्रसिद्ध आहे. 
 
५) गुरूप्रतिपदा  : माघ कृष्ण प्रतिपदेला दत्तात्रयांचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती यांनी अवतार कार्य कर्दळीवनी संपवले.

 
गीते, कविता, गाणी :
रथ सप्तमी  दोहा:

भानु चालीसा प्रेम युत, गावहिं जे नर नित्य।
सुख सम्पत्ति लहै विविध, होंहि सदा कृतकृत्य।।
कनक बदन कुंडल मकर, मुक्ता माला अंग।
पद्मासन स्थित ध्याइए, शंख चक्र के संग।।

सरस्वती वंदना
या कुन्देन्दुतुषारहारधवला
या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा
या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता

सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा ॥
 

श्री नर्मदाष्टकम
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे।
नमामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे।
सबिंदु सिन्धु सुस्खल तरंग भंग रंजितम।
द्विषत्सु पाप जात जात कारि वारि संयुतम।।
कृतान्त दूत काल भुत भीति हारि वर्मदे।
त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे।।

 शिव रूद्राष्टकम

नमामीशमिशान निर्वाण रूपं विभुं व्यापकं ब्रह्म वेद: स्वरुपम् ।
निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं चिदाकाश मकाशवासं भजेऽहम्‌ ॥

निराकामोंकारमूलं तुरीयं गिरा ध्यान गोतीतमीशं गिरिशम ।
करालं महाकाल कालं कृपालं गुणागार संसारपारं नतोअहम ॥

तुषाराद्रि संकाश गौरं गभीरं मनोभूत कोटि प्रभा श्री शरीरम् ।
स्फुरन्मौलि कल्लोलिनी चारू गंगा लासद्भाल बालेन्दु कंठे भुजंगा ॥

चलत्कुण्डलं शुभ नेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकंठ दयालम ।
मृगाधीश चर्माम्बरं मुण्डमालं प्रिय शंकरं सर्वनाथं भजामि ॥

प्रचण्डं प्रकष्ठं प्रगल्भं परेशं अखण्डं अजं भानु कोटि प्रकाशम ।
त्रयशूल निर्मूलनं शूल पाणिं भजेऽहं भवानीपतिं भाव गम्यम ॥

कलातीत कल्याण कल्पान्तकारी सदा सच्चीनान्द दाता पुरारी ।
चिदानन्द सन्दोह मोहापहारी प्रसीद प्रसीद प्रभो मन्मथारी ॥

न यावद् उमानाथ पादारविन्दं भजन्तीह लोके परे वा नराणाम ।
न तावद् सुखं शांति सन्ताप नाशं प्रसीद प्रभो सर्वं भूताधि वासं ॥

न जानामि योगं जपं पूजा न तोऽहम्‌  सदा सर्वदा शम्भू तुभ्यम् ।
जरा जन्म दुःखौघ तातप्यमानं, प्रभोपाहि आपन्नामामीश शम्भो ॥

रुद्राष्टकं इदं प्रोक्तं विप्रेण हर्षोतये
ये पठन्ति नरा भक्तयां तेषा शंभो प्रसीदति ॥

॥ इति श्रीगोस्वामितुलसीदासकृतं श्रीरुद्राष्टकं सम्पूर्णम् ॥

लॉजिक नवीन पिढी साठी :

रथसप्तमीला सूर्याची पूजा करायची कारण हा दिवस सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस मानला जातो. रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हटले जाते. सर्वांत तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तीवान, बुद्धीवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे. सृष्टीचा जगत्चालक असून, तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे. सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सात घोडे, असा संदर्भ रथसप्तमीला आहे. निसर्गाचे आभार मानायचे हेच आपली संस्कृती शिकवते. जे जे मिळते त्याचे त्याचे आभार मानले पाहिजेत. जीवन साठी सूर्यप्रकाश महत्वाचा आहे. शरीरास पोषक असे सूर्य किरण या दिवशी असावेत जेणे करून त्याचा मानव जातीने लाभ घ्यावा असा पण हेतू आढ्यातिमिक वैज्ञानिकांचा असू शकतो.  सूर्याचा जन्म देखील हा दिवस चिन्हांकीत करतो. ऋतू बदलून वसंत ऋतू आणि कापणीचा हंगाम सुरु होण्याचे प्रतीक आहे रथ सप्तमी. केलेल्या कष्टाचे फळ म्हणजे पीक आल्याने मानव आनंदी असतो. पीक येण्यासाठी पूरक अश्या सूर्यदेवतेचे आभार मानाने हाच या पूजेचा मानस असावा.  आपण यथासांग पूजा जरी करू शकलो नाही तरी तो मौल्यवान सूर्यप्रकाश फुकट घेतो त्यामुळे  ठणठणीत राहतो म्हणून त्या सूर्यदेवाचे आभार मानलेच पाहिजेत. 

महाशिवरात्रीला पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. याचा वापर करून घेण्यासाठी, आपल्या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. तो महाशिवरात्रीचा दिवस. त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने पाहतात.  हा दिवस अध्यात्माची ओढ असणार्‍या व्यक्तींना प्रचंड संधी उपलब्ध करून देतो. तसेच हा हलाहल प्राशन  दिवस पण आहे. 

Thursday 5 January 2023

ज्योतिर्लिंग दर्शन, मध्य प्रदेश २०२२


हर हर महादेव! बम बम भोले !
संधी आली की देवदर्शन करून घायायचं ठरवलय मी. संधी येते म्हणजेच बोलावणं येतं असच मी समजते.
२०२२ डिसेंबर महिन्यात इंदोरला जाण्याचा योग आला आणि मध्य प्रदेशातली ऊरलेली ज्योतिर्लिंग करण्याचा मानस पुरा होणार या कल्पनेनं आनंद झाला.
योगायोगान ट्रेनच बुकिंग पण पुणे-खंडवा असच मिळालं. रात्रभराचा प्रवास करून खंडवाला सकाळी ८ वाजता आम्ही पोचलो.
पोचल्यावर मुलाला फोन केला तर ऊत्तर आलं "जय किशोर दा!" हो मला पण समजल नव्हतं,  मग म्हटला "सुप्रसिद्ध गायक किशोरकुमार यांच्या जन्मभुमीवर पोचलीयस ना तू आई" किशोरदांच घर म्युझिअम म्हणुन सर्वांना बघायला आहे. खंडवा स्टेशनपासुन कॅबनी मोजुन आठ मिनीटांवर आहे. भक्तांनी जरूर पहाव असच आहे.
खंडवा ते ओंकारेश्वर कॅब केली होती. कधी एकदा रूम मिळतेय , सामान ठेवतेय आणि नर्मदा मय्या दर्शन घेतेय अस झालं होतं.
हा रस्ता सिंगल रोड होता, वाहनांची गर्दी भरपूर तसेच मोठाले डोंगर फोडुन हमरस्ता करण्याच काम ही जोरात सुरू होतं, त्यामुळे प्रचंड धुळ आणि सतत डायव्हरशन होतं. डोंगर ईतका खोलवर खणलेला दिसत होता की चार रंगाचे मातीचे स्तर दिसत होते. दगडांचा सद्ध्याच्या चांदणीचौका सारखा पसाराच डिकटो. पावसाळ्यात मात्र हा रस्ता सुरेख दिसत असणार, गव्हाच, लाल मिरचीच पिक बरच दिसत होतं. लहान काय मोठी काय सगळ्या दुकानांत कचोरी, समोसे आणि पोह्यांचे ढिग होते. 
सनावद गावाशी आम्ही पोहे खाऊच म्हणुन थांबलो. मस्त ताव मारला, मी तर डबल चहा घेतला. ईतक्यात समोर हरभरे म्हणजे घाटे काढलेली भाजुन देणारी गाडी दिसली. लहानपणच आठवलं मला, हात काळे झालेली बकरी सारखे हरभरे खाणारी मी मला आठवली. 
मजा आ गया| 
हो आता मी इंदोरला होते ना!
बघता बघता ओंकारेश्वर आल पण, आम्ही गुगलवर शोधत होतो तेव्हा श्रीक्षेत्र शेगाव संस्थानचा भक्तनिवास ईकडे आहे अस सापडल होतं, दिवसभरासाठी खोली मिळेल का बघु म्हणुन आम्ही खंडवाहुन तिकडेच ऊतरलो. खोली मिळेल का दिवसभराची ठाऊक नव्हतं म्हणुन मुख्य दाराबाहेरच थांबुन जवळच खोलीची चौकशी केली. कृष्णा नामक प्रसन्न व्यक्तिशी बोलण झालं. खोली नाही मिळाली तर याला सांगु अस ठरलं. मग आत गेलो पण अकरा वाजता गजानन महाराजांच्या कृपेने चार वाजेपर्यंत खोली मिळाली. देताना एक दिवस असच देतात पण नोंदणीत चार लिहायच म्हणजे आपल्या सारख्या ईतर भक्तांना ती वापरता येते.
अतिशय स्वच्छ आणि शिस्तीत काम सुरू होतं, काही क्षण वाटल मी शेगावमधेच आहे. सेवेकरी लोकांचे मनापासुन धन्यवाद. 
ईकडे आल्यावर मला समजल की हे भक्त निवास ओंकारेश्वर ला कसा?
महाराजांच्या कृपेने नर्मदा मय्यानं वाचवलेली गोष्ट ईकडे घडली ते ठिकाण म्हणुन हे आहे. या आवारात आदरणीय अहिल्याबाई होळकर यांचं देऊळ पण आहे. धप्प पांढरी, कर्तृत्ववान प्रसन्न हावभाव अशी मूर्ती पाहुन कोणाच्या  ही अंगात ऊत्साह सळसळेल.
मला माझ्या भाग्याच खुपच कौतुक वाटत होतं.... पवित्र स्थल श्रीक्षेत्र ओंकारेश्वर, नर्मदा मय्याच्या पाण्यानी स्नान आणि ते पण आपल्या सारख्या भौतिकात राहणार्याना जपण्यासाठी महाराजांच्या कृपेने गरम मिळालं. 
हर गंगे भागिरथी ऊमा पार्वती पार्वती पते हर हर महादेव!! अतिशय प्रसन्न आणि हलक वाटत होतं, हवामान पण सुखद अस बेताच्या गारठ्याचच होतं. खरतर या दिवसात ईकडे कडक गारठा असतो. पटकन आवरून ओंकारेश्वर मधलं काय काय बघायचं ठरवलं आणि छोटी सॅक घेऊन निघालो. 
श्री मामलेश्वर ज्योतिर्लिंग चालत पाच मिनीटावर होतं. पांडवांनी बांधलेलं हे देऊळ असा ऊल्लेख बरेच ठिकाणी मिळतो. लालसर पिवळा दगड असलेल देऊळ ऊठावदार दिसतं. देवळाच्या आतील भिंतीवर स्तोत्रं कोरलेली दिसतात. आतील शिवलिंग कडेनी पितळी आहे . गर्दी होती पण तरी दर्शन छान झालं. शिवलिंगास हात लाऊ देत होते. तो ओलसर पण थंडगार स्पर्श अदभुत अनुभुती देऊन जातो. मागे देवी शक्तीची मूर्ती आहे. बाहेर पाषाणातला दणकट नंदी आहे. देवालयात आत जायचा दरवाजा फारच छोटा आहे.देवळातील खांब भिंती कोरीव काम केलेल्या आहेत.नर्मदा नदी किनारी दक्षिणेस हे देऊळ आहे. मुख्य देवळाबरोबरच शेजारी छोटी तीन देवळं आहेत. दर्शनाच्या ओळीत थांबल्यान ती आतुन बघु शकले नाही. जय भोलेनाथ, बम बम भोले अशा आवाजात ओळ कधी सरकते समजतच नाही. अर्थात ढकला ढकली, मधे घुसणे हे होतच होतं. असो...
पुढे गोमुख घाटाकडे आम्ही निघालो. मोठाल्या ऊंच ऊतरत्या पायरीवरून पाच मिनीटात गोमुख घाट येतो. घाट मोठा व स्वच्छ आहे. बोटीची फेरी करा म्हणुन ईतके लोक विचारतात की लक्षपूर्वक घाट बघावा लागतो. 
गोमुख घाटा जवळच विष्णु नारायण देऊळ आहे. छान वाटतं बघुन. ईकडे प्रत्येक देवळात पोचताच वेगळ वेगळं वाटतं.  भावनिक अनुभुतीचे बदल चढऊतार सूक्ष्म का होईना पण जाणवतातच... त्यात हवा मोकळी व ऊल्हासीत असतेच त्यामुळे आधीच आपण ताजेतवाने असतो हा नैसर्गिक बदल पूरक ठरतो.
गोमुख घाटावरूनच बोट करून पुढ जायच ठरवलं. मोठ्ठ नर्मदा मय्याच पात्र ओलांडुन पलिकडे जायचं ५०.०० रू. नर्मदा कावेरी संगम फेरी १५०.०० रू नुसतं ओंकारेश्वर घाट दर्शन १५०.०० असा विविध आकार घेतात. बोटीचा अनुभव घ्यावाच घ्यावा.
नितळ निळं पाणी, घाटांवरची लगबग आणि नर्मदे हर चा जयघोष ऐकत फार फार छान वाटत.
अहाहा! काय सुखद अनुभव होता तो.... दुपारी दीडचं ऊन होतं ते पण वाटतच नव्हतं.
दोनतीन घाट मधे मधे लोक बोटीतुन ऊतरत होती. आम्ही कोटीतीर्थ घाटावर आम्ही ऊतरलो... वेध ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाचे लागले होते.
परत घाट चढुन वर गेलो ती गल्ली पुण्याच्या तुळशीबागेचीच ठवण करून देत होती. चपला स्टँड पासुन सुमारे अडीच तासाच्या अथक प्रतिक्षेनंतर दर्शन होतं. दर्शनाच्या प्रतिक्षेत असताना अनंत प्रकारचे भक्त दिसतात.  प्रत्येकाचे भाव वेगवेगळ्या प्रकारे पण अनोळखी असुनही त्या कालावधीत दर्शनास आसुसलेले भक्त या लेबल खाली एकच होऊन जातो आपण.
एक भडजी भरलेले माठ घेऊन चक्क पाणी देण्याच काम निरपेक्ष भावनेन करत होते. देताना म्हणत होते, "पैसे नही चाहिये मय्या ही तो है ऊसने भक्तों की तृष्णा बुझाने को बोला है|" प्रत्येकाची भक्ती एकच पण मार्ग वेगवेगळे. 
या वर चढत्या क्रमान असणार्या पायर्याच्या ऊजवीकडुन नदीकिनारीचा मार्ग आहे. तिकडे जवळच शंकराचार्य गुफा आहे. फार वेळ ईकडे देता आला नाही पण शांत जागा. चालता चालता  ईतक झपकन जाते ही जागा की लक्षच ठेवावं लागतं.
आदी शंकराचार्यांना त्यांचे गुरू श्री गोविंद भगवतपद  यांची प्रथम भेटलेली ही गुफा  आहे. आणखी बघण्यासारखं खुप आहे १२~५ वेळ कमी पडला. 
जाताना जुन्या मोठया पुलावरून गेलो. डोळे भरून नर्मदा मय्याच साजरं रूप डोळ्यात साठवत साठवत फोटो काढत आम्ही अन्नपूर्णा देवी देवळाच्या रस्त्यावर आलो. विराटरूप दर्शन विष्णुचं देऊळ पण बघण्या सारख आहे.
तिकडची थाळी घेऊनच जेवलो तेव्हा साडेचार वाजले होते. आलो तोच घाट चढताना समजलं एकेक पायरी किती ऊंच आहे ते.
नागरघाट, अमर घाट, चक्रतीर्थ घाट, समीक्षा घाट, ओंकार घाट, गोमुख घाट, ब्रहामपुरी घाट, भरपुर आश्रम, घाट आणि देवळं जस २४ अवतार असलेल देऊळ,  गौरी सोमनाथ देऊळ,  ओंकार मांधाता देऊळ, बेट बघण्या सारख आहे.
अशी अनेक पाहण्या सारखी ठिकाणं आहेत. एक दिवस एक रात्रच हवी सगळं बघायला. ईकडे आकारानं मोठ्ठी माकडं बरीच आढळली. कधी समोर येतील भरवसा नाही. खाण्याच्ये वस्तु जपुनच वर धरणे ऊत्तम.
मनात महादेवाची बारा ज्योतिर्लिंगातली ओंकारेश्वरची छबी घेऊनच भक्त निवासमधे आलो. श्री गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. गर्भगृहात दोघच जण होते, बाहेर भजन सुरू होतं. देवाला आळवणारे शब्द मधुर होते. मन मानत नव्हतं निघायला. श्री गजानन विजय ग्रंथाची एक पोथी घेतली आणि मुख्य दारापाशी आलो. 
ओंकारेश्वर ते इंदोर कॅब बघत असताना सकाळचा कृष्णा धावत आला "साहेब अजुन खोली नाही मिळाली? " "आम्ही आता कॅब शोधतोय, जवळच दिसतेय पण तो सवारी घेत नाहीये" अस म्हणताच तो म्हटला एक नंबर लिहुन घ्या, त्याला फोन करा- त्याच नाव आहे 'संतोष'. तो मदत करेल, त्याला सांगा कृष्णानी नंबर दिलाय. नंबर टिपुन घेतला आणि मी स्तब्ध ऊभी राहिले..... परमेश्वर कसा कधी कोणत्या वेशात मदत करेल सांगता येत नाही. त्या पावनभूमीत तो मला भगवान श्रीकृष्णासारखा पाठीराखाच वाटला.
मनोहर अनुभुतीचे स्पंद घेऊनच निघतो आपण ...

*********************************
ओंकारेश्वर ते इंदोर प्रवास छान झाला. 

इंदोरला होळकरांचा वाडा पाहण्याची प्रचंड ईच्छा होती ती आज पुरी झाली. जे जे वाचलेल ते ते पाहत होते. मालवा प्रांत तसेच होळकर वंशाचा इतिहास सतत वाचनात आला होताच त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मालिका बघत ते ठिकाण पाहायचा मानस प्रबळ झाला होता.

अहिल्याबाई होळकर यांचा वाडा खुप छान जतन केलाय, देवघर तर काय सुरेख होतं. ताजी पुजा झालेली समजत होती. वरचा मजला म्युझिअम केलय ते बघायलाच तासभर हवा.
शांत चित्ताची आहिल्याबाईंची बैठी मूर्ती आणि तीनेक फुट दगडातल शिवलिंग लक्ष वेधक वाटलं. राजवाडा बघुन छप्पन दुकानला गेलो. अनेक प्रकारचे गजक घेतले. गराडु नामक पदार्थाची नवी ओळख झाली. हा साधारण सुरणाचा चुलत भाऊ. जीरावन पावडर बरोबर मिटक्या मारत संपतो.
सराफा बाजार ची मजा रात्रीच...  जोशींचा दहीवडा न खाता जातच नाही कोण पण म्हणे. तसच माहेश्वरी सिल्क साडी घ्यायचीच. आपल्याला सगळीकडे हल्ली सगळे सिल्कचे कपडे मिळतात पण ज्यात पिकतं त्यातच घेऊन त्या कारागिरांची कदर केली जाते अस मला वाटतं. हे काम मी माहेश्वरला केलं.
फार वेळ इंदोरमधे न घालवता आम्ही श्री क्षेत्र ऊज्जैनला दुपारीच निघालो.
***************
संध्याकाळी पावणेपाचला पोचलो असु. कॅबनी जास्तीत जास्त जवळ म्हणजे भारतमाता देवळाजवळ सोडलं. महाकाल लोक मधे काॅरीडोर बघत महाकालेश्वर ज्योतिर्लिंग देवळाजवळ पोचलो.
महाकालेश्वर मंदिर  पाच मजली असून त्यातील खालील पहिला मजला हा जमिनीत आहे. या शेजारी रुद्र्सागर सरोवर आहे. मुख्य गर्भगृहा समोर सभामंडप बराच मोठा आहे त्यामुळे लांब ऊभ राहुन पण छान दर्शन होतं. शांतपणे पाच सात मिनीटं न गडबड करता दर्शन झालं. 
कुठ बघु ...काय बघु अन काय नको ...अस होतं ओळीत ऊभ असताना. कोणत्या वळणावर भोलेनाथ दिसणार? नजरेतली शोधकता वाढते... मन शांत करत नमामि शमीशान म्हणत असतानाच डावीकडे काळभोर स्वयंभु शिवलिंग दिसतं, समोरच्या चौकात मस्त नंदी विराजमान आणि बरोब्बर मागे आपण येतो.
 कच्चे दाणे ढब्बु साखरफुटाणे प्रसाद अतिशय प्रेमान हातावर येतो. भरपुर गुरूजींचा वावर होता पण कामात सुसुत्रता जाणवली. पाच सहा पायर्या ऊतरून येई पर्यंत मनभर दर्शन होतं.आम्ही गेट नंबर चारनी दर्शन घेतलं. मोबाईल चपला ठेवण्याची ऊत्तम व खात्रीशीर सोय होती. 
भारावलेले चार जीव लगेचच कालभैरव देवळाकडे प्रस्थान झालो. कोण कुठल्या मावशी आणि मी जगाच्या दोन टोकावरच्या, पण योग होता एकत्र महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाचा. कोणी असच भेटत नसं परमेश्वराचं प्लॅनींग त्यालाच ठाऊक. हर हर महादेव!
येता जाताची रीक्षा ठेवल्यामुळे चपला रीक्षातच काढुन क्षिप्रा काठच्या कालभैरव दर्शनासाठी बारीत ऊभे राहिलो.
ही भली मोठी रांग पण झपाट्याने सरकत होती. अंधार होत चालला होता. 
गडाच्या दारासारखं प्रवेशद्वार दिमाखात ऊभं होतं. आत जाताच कालभैरव व माँ कालीच गाण ऐकु आलं. शब्द नवीन होते पण चाल ठेक्याची होती.
फोटो काढण्यास मनाई होती. 
जेजुरीच्या खंडेरायाची आठवण झाली. अघोरी पंथाचे आणि काही जण कुलदैवत आहे म्हणुन तर काही आमच्या सारखे म्हणजे महाकालेश्वर दर्शन कालभैरव दर्शना नंतर पुर होत मानणारे लोक तिकडे येतात. अंधार पडायला लागलेला मग जवळची क्षिप्रा नदी पाहण्याच रद्द केलं. परत महाकाल लोक पाशी रीक्षान आलो.
बाहेर आलो तर लायटींग सुरू झालेल होतं.
महाकाल लोक मधेच हरीसिद्धी शक्तीपीठ, सिंहासन बत्तीशीचे ठिकाण, जवळच सांदिपनी आश्रम , भारतमाता देऊळ न चुकता बघण्यासारख आहे. 
महाकालेश्वरची भस्म आरती बघण्यासारखी असते तो श्रृंगार सकाळी बघु शकतो. आम्ही संध्याकाळी गेलो. कालभैरव दर्शन करून आलो तर बाहेर टीव्हीवर श्रृंगारा नंतरची आरती मिळाली.
संधीकाली परत दर्शन झालं. महाकाल लोक फिरत फिरत मुख्य दाराशी आलो. मन मानत नव्हतं पण कॅबवाला ऊभा होता निघावच लागलं. परत इंदोरला जाताने कॅबमधे बसल्यावर जाणवलं की पाय बोलतायत.
इंदोरची काम करून दुसर्या दिवशी साडेतीनच्या कॅबनी माहेश्वरला निघालो. ईतके दमलेलो हलकीशी डुलकी घेतो तोच धामनोद जवळ आलो. हिरवा निसर्ग, हवेत गारवा, थोडासा खेडेगावचा माहोल मस्त वाटत होतं. अगदी अहिल्याबाई किल्ल्याच्या पायथ्याशी पार्किंग मधे पोचलो. सामान कॅबमधेच ठेऊन किल्ल्याकडे कूच केलं.
या प्रवासातले हा शेवटचा टप्पा होता. तीव्र चढ होता नंतर ऊंच पायर्या. पन्हाळगडा सारखं वर गाव वसलेलं दिसलं. माहेश्वरी साडीची गल्लो गल्ली घरगुती दुकानं होती. मधेच दोन चार सुधारीत दुकान पण दिसली. 

माळवाची होळकर गादी वाड्यात आहे, एकदम शांत परिसर. पुर्वजांचे फोटो वस्तु या जुन्या वास्तुत जतन केलेल्या आहेत. वाड्याच दार सहाला बंद होतं. म्युझिअम स्वरूपात आपल्याला पाहता येतं. आम्ही नशिबवान ठरलो अर्धा तास आधी पोचलेलो. वाड्या बाहेर मोठ्ठीच्या मोठी अहिल्याबाईंची मूर्ती आहे. तीची नजर पाहताच मन ऊचंबळुन येतं.  क्षणभर थांबल्या शिवाय मी पुढं जाऊच शकले नाही. शेजारी मारूतीच देऊळ दिसल मी गेले नाही. घाटावरचा सूर्यास्त हुकवायचा नव्हता.
महादेवाच अत्यंत पुरातन कोरीवकामाच सुरेख देऊळ पाहात घाटावर पोचलो.
किल्ला बघताच राजस्थानचा भास जाणवत होता. 

कधीतरी कल्पना केलेला क्षण की माहेश्वर घाटावर आम्ही दोघं नर्मदा मय्यासमोर आहोत... आज तो क्षण मी प्रत्यक्ष जगत होते.
काढु का फोटो? म्हणत सहकार्य केलेला पण हौशी होता, ऊगाच फोटो छान नाही आला. सगळ कस जुळुन आलेलं.
मनाप्रमाणे मय्याची पुजा झाली. थंडगार पावन पाण्यानं मन व शरीर ताजतवानं झालं. काठावर सूर्यास्त पहात वेळ पुढे सरकत होता.
 
नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!
घाटावरची देवळ बघत घाट फिरून परत वर आलो. आता चहाची निकड जबरदस्त होती.
परत ऊतरताना कुल्हडमधे चहा घेतला, मस्त माहेश्वरी साडी, ड्रेस खरेदी करून मोठ्ठे पेरू घेतले आणि पेरू खात खात गड ऊतार झालो.
सामानासकट कॅबमधे ड्रायव्हर वाटच बघत होता. तीन दिवस कसे गेले समजलच नाही. धामनोद ते पुणे बसनी परत येताना मन मात्र नर्मदा मय्याच्या घाटांवरच रेंगाळत होतं......

या प्रवासात सहकार्य केलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांना मनापासुन धन्यवाद!

परमेश्वराची ईच्छा होईल तेव्हा पुढची ज्योतिर्लिंग होतीलच मला खात्री आहे.

हर हर महादेव ! नर्मदे हर!

सौ. गौरी अनिरूद्ध पाठक