Tuesday 2 March 2021

पहिली दिलदार भेट

मला मिळालेली पहिली दिलदार भेट

कोणाचाही वाढदिवस असो वा आनंदाचा दिवस असो, मला फुलं (निशीगंध) किंवा गजरा द्यायला आवडतो.फुलांच्या सुगंधाप्रमाणे तो आनंद सर्वत्र पसरावा या हेतुनं. 

परवा माझाच लग्नाचा वाढदिवस होता, सहजीवनाचा वीस वर्षपूर्तीचा आनंद मी घेत होते. ऑफिसमधुन घरी जाताना आज आपणच आपल्याला गजरा घेऊ अस ठरवलं. नेहमीच्या फुलवाल्या दुकानापाशी गाडी थांबवली, वहिनींना म्हटलं की मस्त पैकी बघुन गजरा द्या, ऊद्या पर्यंत टिकेल असा. त्यांनी विचारलं किती देऊ? मी हसत एकच हवाय म्हटलं. त्यावर त्या म्हटल्या की, का हो आज एकच एरवी चारच्या खाली नेत नाही तुम्ही? ऐकुन मला जरा हसुच आलं.

अहो आज कोणासाठी नाही मलाच द्यायचाय. हो का! आज काय विशेष त्यांनी विचारलं. मंद हसत मी सांगुन टाकलं की आज लग्नाचा वाढदिवस आहे, म्हटल चला आज आपणच आपल्याला देऊ.

तर वहिनींनी पटकन फुललेला भरगच्च गजराच हातात ठेवला. हा माझ्याकडुन तुम्हाला.... कळीचा ठेवा ऊद्याला. (जो आधी कागदात बांधुन झाला होता). मी हात मागे करत नको म्हटलं, एक घेतलाय की.
त्यावरच वहिनींच ऊत्तर ऐकुन फार फार छान वाटलं.

अहो ताई, हा माझ्याकडुन तूमच्यासाठी खास, मला पण वाटलं तुमचं ऐकुन आपण सतत करत राहतो ईतरांसाठी. घर नोकरी घर. मी पण बघा फुलांची गाडी चालवते पण एक फुल माळणं होत नाही.

आपल्याजवळ काय आणि किती आहे? याला महत्व नाही, पण आहे त्यातुन योग्य कसंआपण ईतरांना/दुसर्यांना देऊ शकतो. तो आनंद घेऊ शकतो हे आज फुलवाल्या वहिनींनी शिकवलं. त्यांचा फुलांचा धंदा असा तो किती असणार.... हातावरचं पोट ते. पण त्यातुन मला झपकन भरगच्च गजरा द्यायची दानत वहिनींमधे दिसली. परमेश्वराची अनमोल देणगी वहिनींजवळ आहे म्हणुनच त्यांच्या फुलांसारख्या त्याही कायम टवटवीत आनंदी असाव्यात.

लग्नाच्या विसाव्या वाढदिवशी मिळेलेली ही दिलदार भेट पहिलीच! कायम लक्षात राहिल एशी आहे.

शुभः भवतु!

गौरी पाठक