Monday 3 July 2023

११) कार्तिक (ऑक्टोबर - नोव्हेंबर) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका

कार्तिक महिना महत्व : 
भगवान विष्णूचा प्रिय कार्तिक महिना. प्रमाणे वेदासारखे शास्त्र नाही, गंगासारखे तीर्थ नाही आणि सतयुगसारखे युग नाही. त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यासारखा महिना नाही. शरद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून हा महिना सुरू होतो. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि संपूर्ण सृष्टीवर सुख आणि कृपेचा वर्षाव करतात. हा चातुर्मासाचा शेवटचा महिना आहे.  या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नानाचे महत्व आहे. पवित्र नदीमध्ये दीप दान करतात. 

महिन्यातील सण :
बलिप्रतिपदा / पाडवा :
या दिवशी श्री विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले अस म्हणतात.  उत्तर भारतात बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा, गौ क्रीडा आणि अन्नकूट हेही सण असतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी  अर्धा मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. 

विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात. (अन्नकोट )

भाऊबीज :
हा दिवाळीचा सहावा दिवस. भाव बहिणीच्या आनंदाचा.  भाऊ चिरंजीवी राहावा हि मनिषा ठेवून बहिण भावाला ओवाळते. भाऊ तिला ओवाळणी देतो इतकेच नाही तर हा  ऐक्याचा दिवस म्हणू शकतो. विदर्भात सगळ्या स्त्रिया चंद्र उगवायची वाट पाहतात.  तोच भाऊ मानून ओवाळतात, अंगावरच्या कपड्याचा धागा त्याला देऊन जुन घे नवं घे म्हणतात. मग भावाला ओवाळले जाते. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात.


पांडव पंचमी :
अतिशय अटीतटीच्या काळ असूनही अथक परिश्रम करून भगवान श्री कृष्णाच्या सहकार्यांनी पांडव युद्ध जिंकून आले तो हा विजय दिवस. भावांच्या विरुद्ध विचार आणि मतांचा आदर करत आपल्यातील एकजूट कायम ठेवली. आईचा प्रत्येक आदेश शिरोधार्य मानला. आपल्यावरील अन्यायाचे निराकरण केले. अशी गुणी व विजयी मुले आपल्यालाही व्हावीत म्हणून प्रत्येक आई पांडवपंचमीच्या दिवशी पांडवांची पूजा करून गुणी, आज्ञाधारक व बलवान मुले व्हावी म्हणून हि पूजा करते. 

देव ऊठणी / प्रबोधिनी एकादशी :
हरिशयनी/ आषाढी एकादशीला  एकादशीला योगनीद्रेत गेलेले भगवंत कार्तिक एकादशीला योगनीद्रेतुन बाहेर येतात हीच देवऊठणी एकादशी. चातुर्मास समाप्ती दिवस. 
 
तुळशीचं लग्न / कार्तिक पौर्णिमा / त्रिपुरारी पौर्णिमा :


हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. मात्र कार्तिक महिन्यात तुळशीपूजेचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे आणि माता तुळशीचा म्हणजेच वृंदाचा विवाह भगवान विष्णूचा अवतार असलेल्या शालिग्रामशी झाला होता. या दिवसापासून लग्नाचे मुहूर्त सुरु होतात. 


(महादेवाच्या देवळात आवल्यावर लावलेली वात  )

कार्तिक पौर्णिमेला महादेवाच्या देवळात त्रिपुर वात लावतात. आणल्यावर वात लावून दिवे लावतात.  या दिवशी फक्त कार्तिक स्वामींचे दर्शन स्त्रिया घेऊ शकतात. भगवान महादेवाने त्रिपुरासुराचा वध  केला ती त्रिपुर पौर्णिमा. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून देवळात दीपोत्सव साजरा करण्यात येतो हे या दिवसाचे वैशिष्ट्य आहे. 

महिन्यातील यात्रा व जयंत्या :
काकडा / काकड आरती :
काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय. या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत, वात) ओवाळले जाते, म्हणून याला काकडारती असे म्हणतात. भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. आश्विन-कार्तिक महिना सुरु झाला की, थंडीची चाहूल लागतेच. आश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमैपर्यंत काकड आरती होते. 

शैव आणि वैष्णव संप्रदायामध्ये ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या आधी देवाची आरती करण्यात येत असे. कालांतराने ही परंपरा सर्व हिंदू संप्रदायांनी स्वीकारली. संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास यांनी काकड आरतीच्या रचना केलेल्या दिसतात.  भक्तिभाव वाढवणे हे काकड आरतीचे प्रयोजन आहे. चातुर्मासात भगवान विष्णु म्हणजेच विठ्ठल निद्राधीन असतात. भगवंतास जागे करण्यासाठी जी केली जाते ती काकड आरती. 

काकड्याला विविध भजने, अन्य आरती व स्तोत्रे म्हटली जातात. कृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीतेही यामध्ये असतात. 

पहाटे पाच ला भगवंतास उठवणे त्याचे आवरणे सर्व करताना भजन पदे म्हणतात. सुंदर रुपडे साजरे झाले कि त्याची दृष्ट काढतात. हि आरती करता करता आपण भगवंताजवळ सहज पोचू शकतो. भजन करताना च्या सुरांचा देवाशी संगम होऊन आपण एकरूप होतो. काकड आरतीत विविधता असते. संतांनी केलेले अभंग यात म्हणतात. पहाटे पाच ते सात वेळात देवळं मनमोहक असतात कार्तिक महिन्यात. काकड्याची सांगता पण सुरेख होते.
गीते, कविता व गाणी :

भाऊबीज आली सण भाऊ बहिणीचा
ऋणानुबंध नाती संस्कृती ,परंपरेचा
आतुरलेली बहिण येते वर्षाकाठी
जीव लागला भावाच्या भेटीसाठी
भाऊबीजेच्या दिवशी ओवाळीते भाऊराया
इडापिडा जाऊ दे ,ही मागणी भाऊराया
गरीब बहीण नका समजू प्रेम गरीब
सुपाएव्हढे काळीज मन तिचे अजब
तिच्या प्रेमाची सर नाही कुणाला येणार
निःस्वार्थ प्रेम, जीव भावासाठी तुटणार
खाईल मिरची भाकर मोठ्या आनंदाने
गुण गाईल गरीब भावाचे लई अभिमानाने 
सुख समृद्धी नांदू दे आशीर्वाद बहिणीचा
तिचे समाधान, काळ येईल भरभराटीचा
दोन शब्द प्रेमाचे हा आधार बहिणीला द्यावा
लोभ नाही तिच्या रक्तात, मायेने जीव लावा 
संगे काही नाही आधार एक दुसऱ्यास असावा
मायेचा झरा आयुष्यभर वाहताना दिसावा
निर्मळ पाण्याचा रे गुणधर्म प्रत्येकाने पाळावा
भेटीगाठीचा आनंद धना पेक्षाही निराळा
आठवण रक्ताची प्रत्येकानेे कायम सांभाळा

भाऊबीज दिवाळी

फट फटाका फुटला
धम धमाका झाला
लावा दिवा पणती
उजळू दे भिंती…

सण आला घरा
फराळाचं करा
गुळसाखर हसली
करंजीत बसली…

कुरकुरीत चकली
पोटभर खाल्ली
चंदनाचा पाट
सोनीयाचे ताट…

आली आली दिवाळी
बहीण भावा ओवाळी…


लाॅजिक नवीन पिढीसाठी :
दिवाळीच्या पाडव्याला नवऱ्याला का ओवाळतात?
पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गादेवीचे प्रतीक आहे. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. त्यामुळे पत्नीमध्ये दुर्गातत्त्व कार्यान्वित होते आणि पतीचे औक्षण केल्यानंतर त्याची कुंडलिनीशक्ती जागृत होऊन त्याच्यातील सुप्तावस्थेत असणारे शिवतत्त्व प्रगट होते.

भाऊबीज का साजरी केली जाते ?
पौराणिक मान्यतेनुसार सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांना यमराज आणि यमुना ही दोन मुले होती. दोघांमध्ये खूप प्रेम होते. एकदा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला दुपारी यमराज यमुनेच्या घरी पोहोचले. यमुना आपल्या भावाला दारात पाहून आनंदित झाली. यानंतर यमुनेने बंधू यमराजाला ओवाळले आणि भोजन दिले. बहिणीची ममता पाहून यमदेवांनी तिला वरदान मागायला सांगितले. यानंतर यमुनेला यमराजांना दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला भोजनासाठी यावे असे वचन मागितले. तसेच या दिवशी आपल्या भावाशी आदराने व आदरातिथ्य करणाऱ्या बहिणीला यमराजांनी भयमुक्त करावे असे वरदान मागितले. तेव्हापासून दरवर्षी या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते.

दरवर्षी तुळशीचे लग्न का करतात ?
या दिवशी श्रीहरी विष्णू  चातुर्मासाच्या निद्रेतून जागे होतात. दिवशी भगवान विष्णूचे रूप असलेल्या शालिग्रामशी तुळशीच लग्न करण्याची प्रथा आहे. जे भक्त तुळशीविवाहाचा विधी करतात त्यांना कन्यादानाचे पुण्य मिळते, अस म्हणतात. हिंदू धर्मात तुळशी विवाहनांतर लग्न आणि इतर शुभ कार्याला सुरुवात केली जाते.

कार्तिक पौर्णिमेला आवळी भोजन का करायचे ?
आवळ्याच्या सावलीत बसले असता त्यातून निघणाऱ्या तरंगांमुळे मोठा फायदा होऊ शकतो. आवळे सेवन केल्यावर किंवा आवळ्यापासून योग्य विधीने बनविलेली रसायने सेवन केल्यावर होणारा फायदा द्विगुणित होण्यासाठी आवळ्याच्या झाडाच्या सावलीत बसावे, खेळावे, अन्न खावे अशी योजना भारतीय संस्कृतीत सांगितलेली आहे. यातून आवळीभोजनाची योजना केलेली आहे. ज्या झाडावर आवळे लागले आहेत, आवळे परिपक्व झाले आहेत त्या झाडाची शक्‍ती वेगळी असणारच. या दृष्टीने कार्तिक महिन्यात आवळ्याच्या झाडाचे पूजन, आवळी भोजन केले जाते. आवळ्याच्या झाडातून निघणारे तरंग आपल्या चेतासंस्थेला प्रभावित करून ताकद देणारे असतात, त्या ठिकाणी श्री विष्णूंचा वास असतो असे मानले जाते. श्री विष्णू ही चलनवलनाची, तरंगांची, चेतनेची व वर्तमानकाळाची देवता आहे. श्री विष्णूंचे पूजन करण्याच्या निमित्ताने सकारात्मक होऊन आवळ्याच्या झाडाखाली बसावे, आवळे खावेत.

१०) अश्विन (सप्टेंबर - ऑक्टोबर ) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका २०२३

अश्विन महिना महत्वं : 
या महिन्यात नवरात्रीचे सारखे अनेक  प्रमुख सण आहेत.  हिंदू धर्मात चार महिन्यांपैकी हा महिना जास्त  शुभ मानला जातो. सर्वांगीण कल्याणासाठी योगदान देतो हा महिना. अश्विन महिना देव, दृष्टी आणि आयुर्वेदिक औषधाचे महत्त्व दर्शवतो. तरीही २७ नक्षत्रांमधील हे पहिले नक्षत्र आहे. हे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या तेजाचे प्रतीक आहे. 

महिन्यातील सण :
घटस्थापना :
घटस्थापना हा नवरात्रीच्या दरम्यान केला जाणारा एक अत्यंत महत्वाचा हिंदू सण आहे. कलश स्थापना हे घटस्थापनेचे दुसरे नाव आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये नवरात्रीच्या सुरुवातीला विशिष्ट वेळेत घटस्थापना विधी करण्यासाठी चांगले नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ असून हा सण नऊ रात्री आणि दहा दिवस साजरा होतो, सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या शक्तींचे दैवतीकरण होऊन त्या शक्तिरूप मूर्तीला देवी असे नाव मिळाले. या काळात केले जाणारे उपवास, ध्यान, प्रार्थना आणि इतर अध्यात्मिक पद्धती या  सिंहावलोकनासाठी  मदत करतात. या काळात इंद्रिय वस्तूंचा अतिरेक करण्यापासून परावृत्त केल्याने या प्रक्रियेस मदत होते. आपला आत्मा:  या विश्वाच्या उर्जेचा अमर्याद आणि शाश्वत स्रोत आहे. नवरात्रीच्या काळात, वातावरणातील सूक्ष्म ऊर्जा देखील एखाद्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचण्याचा अनुभव वाढवतात आणि मदत करतात. नवरात्रीमध्ये केलेली प्रार्थना, जप आणि ध्यान आपल्यामध्ये सकारात्मक गुण वाढवतात. मरगळ, गर्व, लालसा आणि तिरस्कार नष्ट होतो. जेव्हा नकारात्मक भावनांच्या रूपात तणाव नष्ट होतो तेव्हा आपण आणखीन जास्त ताजेतवाने होतो.  आपल्या दैनंदिन जीवनात आपण जी समृद्धी अनुभवतो ती देवीचीच प्रचिती असते. देवी अनेक रूपांत आपल्यासाठी सतत अविरत कार्य करत असते. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण जी पूजा करतो ती देवीचा सन्मान करण्याचा आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. आपल्या सर्वांमध्ये ऊर्जा (शक्ती) आहे. देव कोठेही नाही ते परमेश्वरी तत्व आपल्यातच आहे ते शोधायचे तर आपण ध्यान करणे गरजेचे आहे.  नवरात्री आपल्या विचारांना, मनाला आणि शरीराला मार्गदर्शक ठरते. नवरात्रीच्या नऊ रात्री मौल्यवान असतात कारण सृष्टीत सूक्ष्म ऊर्जा असते जी या वेळी जास्त उच्च पातळीवर सक्रिय असतात. ही अशी ऊर्जा आहे जिने संपूर्ण विश्वाला जन्म दिला आहे.  हा काळ असा आहे जेव्हा ही ऊर्जा वापरता येते.  जेव्हा नकारात्मक भावना घालवून सकारात्मकतेने परिपूर्ण होण्यास या कालावधीत निसर्ग  पण मदत करतो. जेव्हा तुमची बुद्धी या नकारात्मक प्रवृत्तींपासून मुक्त होते, तेव्हा तुम्हाला हलके वाटते, आनंदी आणि उत्साहीआहे. खऱ्या अर्थाने हा विजय आहे. 

दसरा / विजयादशमी 
या दिवशी देवी दुर्गाने महिषासुर या म्हशीच्या राक्षसावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते. उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमध्ये, या सणाला दसरा म्हणतात (तसेच याला दशहरा देखील म्हणतात). या प्रदेशांमध्ये, या सणाला रामलीलाची समाप्ती होते आणि श्रीरामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण केले जाते. विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते.
विजयादशमीला संध्याकाळी पुरूष मारूतीला जाऊन येतात. घरातल्या बायका ओवाळुन भाकर तुकडा ओवाळुन त्यांना आत घेतात. ते घरी येईपर्यंत  तांदळाचा रावण भावली स्वरूपात करून ठेवायचा. आलेल्या पुरूषांना ओवाळायचं मग नंतर तो रावण फोडायचा आतलं सोन ज्याला मिळेल तो विजयी. नंतर घरातील मोठ्यांना सोन देऊन नमस्कार करायचा. अशी प्रतिकात्मक प्रथा विदर्भात आहे.

(रावण फोडताना)

(रावणाच्या पोटात सोन्याची अंगठी लपवताना)

(तांदळाचा रावण /भावली)

कोजागिरी पौर्णिमा : शरद पौर्णिमा 
कोजागरी पौर्णिमा हा अश्विन पौर्णिमेला येणारा भारतीय हिंदू संस्कृतीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो.  पौराणिक कथांनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो, ज्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. कोजागिरीला वृन्दावनातील निधिवनात आजही श्रीकृष्ण आणि गोपिका रासलीला  रचतात असे मानतात. त्या विशेष प्रसंगाची आठवण करून म्हणून संप्रदायाचे भक्त रासोत्सव साजरा करतात. श्रीकृष्ण आणि राधेची  विशेष उपासना केली जाते या दिवशी केली जाते. मध्यरात्री कोजागिरीचा उत्सव करतात. दूध आटवून मध्यरात्री अगदी बाराचे चंद्रप्रकाशात ते सर्व जण प्राशन करीत असतात. चंद्रप्रकाशात असे आटवलेले दूध म्हणजे अमृतच होय

कराष्टमी :
कराष्टमीलाच आठवी ची पूजा असाही म्हणतात. लेकरांसाठी आईनं केलेली हि पूजा विदर्भात जास्त प्रमाणात दिसून येते. आश्विन कृष्ण अष्टमीला हि पूजा  करतात. या दिवशी आंबिल केली जाते . ही ज्वारीचे पीठ , दही, खोबर व हिरवी मिरची च्या मिश्रण पासून करतात. जिवतीच्या पूजे सारखा कराष्टमीचा पण कागद बाजारात मिळतो. नवीन आलेले पीक वापरायला सुरु करण्या आधी पूजा करून वापरले जाते.  पूर्वजांनी निसर्गाचे आभार मानायची सवय या ना त्या कारणाने लावून दिलेली आहे.  आठवीची / कराष्टमी किंवा कालाष्टमीची पूजा संध्याकाळी केली जाते.  दोन कपूरी पान घेऊन दुधामध्ये चंद्राला अर्धीतून त्याची पूजा केली जाते आणि नंतर सकाळी कणकेच्या सूर्याची पूजा केली जाते आणि नारळ फोडला जातो आणि आंबील चा खाल्ला जातो त्याबरोबर पंचपक्वाना चा नैवेद्य पण केला जातो अशा प्रकारे आठवी मातेची पूजा असते.


वसुबारस :
वसुबारस पासून दीपावली ची सुरुवात होते. मुद्रमंथनाच्या वेळेस कामधेनू उत्पन्न झाली होती. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते.  तसेच भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. गाय वासरू पुजून स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीची  भाजी नैवेद्य दाखवता. 

धनत्रयोदशी:
धनतेरस म्हणजेच धनत्रयोदशी ला वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.  हाच दिवाळीचा पहिला दिवस!
नरक चतुर्दशी :
भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध करून मोक्ष दिला होता, म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात. असुरांच्या संहाराचा दिवस, म्हणजेच एकप्रकारे नरकातील पृथ्वीवर अवतीर्ण झालेल्या वाईट लहरींच्या विघटनाचा दिवस म्हणून नरकचतुर्दशीला विशेष महत्त्व आहे.
आकाशात तारे असतांना ब्राह्ममुहूर्तावर अभ्यंगस्नान करतात. विदर्भात नेहमीच्या तबका व्यतिरीक्त प्रत्येकाला कणकेच्या दिव्यान पण ओवाळतात मग तेल ऊटण लावुन आंघोळ  असते. नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करते लक्ष्मी अस म्हणतात. .

लक्ष्मीपूजन :
लक्ष्मीपूजन ही भारतीय संस्कृतीतील वैशिष्ट्यपूर्ण पूजा आहे. या निमित्ताने अष्टदल कमलावर लक्ष्मीची स्थापना करून तिची पूजा करतात. लक्ष्मी हे सौंदर्याचे, प्रेमाचे व वैभवाचे प्रतिक आहे. संयमपूर्वक धन संपादन केल, तर तर मनुष्याचे कल्याण होते. यासाठी धनलक्ष्मीची या दिवशी पूजा करायची असते. लक्ष्मी या दिवशी सर्वत्र संचार करीत असते. जेथे स्वच्छता मांगल्य, प्रकाश आढळेल तेथे ती निवास करते अशी समजूत असल्यामुळे या रात्री दिव्याची रोषणाई करतात. घरातील कचरा घाण म्हणजे अलक्ष्मी दूर करणारी केरसुणी हिला लक्ष्मी मानून तिची पूजा करण्याची चाल काही ठिकाणी आहे. सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य !



महिन्यातील यात्रा, जयंत्या :
खंडेनवमी : हत्यार पुजा दिवस. ऑफिसमधे आयुधं पुजन करतात. 

गीते, कविता, गाणी :

नवदुर्गा :
प्रथमं शैलपुत्रीति, द्वितीयं ब्रह्मचारिणी । तृतीयं चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच । सप्तमं कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः । उक्तान्येतानि नामानि, ब्रह्मणैव महात्मना ।।

दीपावली :

दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी
गाई म्हशी कोणाच्या
गाई म्हशी गवळीच्या
गाई म्हशी पळाल्या
कोणाला मिळाल्या
दूध लोणी खाणार कसं ?
कृष्णांनी वाजवली बासरी
गाई म्हशी आल्या घरी
दिन दिन दिवाळी
गाई म्हशी ओवाळी 


लॉजिक नवीन पिढी साठी :
 नवरात्रीचा उपवास का करायचा किंवा नवरात्र का महत्वाचे ?
नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो. यामुळे आपल्यात नवीन शक्ती, नवा उत्साह, उमेद निर्माण होत असते. बृहत संहितेनुसार सूर्य तसेच इतर ग्रहांमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा प्रभाव मनुष्याच्या आरोग्यावर आणि व्यवहारांवर होत असतो. सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे. ब्रह्मचर्य, संयम, उपासना, यज्ञ केल्याने शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. स्मरणशक्ती चांगली होऊन बौद्धिक विकास होतो. म्हणून नवरात्र हा शारीरिक व आत्मिक शुद्धतेचा काळ आहे असे मानले जाते.

कोजागिरी का जागून साजरी करायची ?
हिंदू मान्यतेनुसार या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मीदेवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री  को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे म्हणत मनुष्याचे प्रयत्न पहात पृथ्वीतलावर संचार करीत असते अशी धारणा आहे.  कोण जागे आहे याचा मथितार्थ आहे कोण सजग आहे आणि ज्ञानासाठी आतुर आहे असे देवी विचारत येते. कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र आपल्या संपूर्ण १६ कलांमध्ये असतो. चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात. भगवान श्रीकृष्णास १६ कलांचे अवतार मानले जातात. द्वापार युगात भगवान श्रीकृष्णांनी  गोपिकांसोबत रात्री रासक्रीडा (महारासलीला) केली होती. या निसर्गाचे साक्षीदार होऊन त्याची लयलूट अनुभवावी हा हेतू. 

नरक चतुदर्शीला पहाटे अभ्यंगस्नान का करायचं?
आदल्या रात्री १२ वाजल्यापासूनच वातावरण दूषित लहरींनी युक्त असे बनू लागते; कारण या तिथीला ब्रह्मांडातील चंद्रनाडीचे सूर्यनाडीमध्ये स्थित्यंतर घडून येते. या स्थित्यंतराचा अपेक्षित असा लाभ पाताळातील वाईट शक्तींकडून उठवला जातो. पाताळातून प्रक्षेपित होणार्‍या नादयुक्त कंपन लहरी वातावरणात त्रासदायक अशा ध्वनीची निर्मिती करतात. या ध्वनीची निर्मिती लहरींतील रज-तमात्मक कणांच्या  हालचालींतून उत्पन्न झालेल्या ऊर्जेतून केली जाते. या लहरी विस्फुटित लहरींशी संबंधित असतात. या लहरींतील  ध्वनीकंपनांना आवर घालण्यासाठी पहाटेच्या वेळी अभ्यंगस्नान करून तुपाचे दिवे लावून दीपाची मनोभावे पूजा करतात. यामुळे दीपातून प्रक्षेपित होणार्‍या तेजतत्त्वात्मक लहरींच्या माध्यमातून वातावरणातील त्रासदायक लहरींतील रज-तम कणांचे विघटन केले जाते. या विघटनात्मक प्रक्रियेमुळे अनेक सूक्ष्म शक्तींच्या कोषांतील रज-तम कणही विरघळले जातात आणि वाईट शक्तींच्या भोवती असलेले संरक्षककवच नष्ट होण्यास साहाय्य होते. यालाच ‘आसुरी शक्तींचा वातावरणात दिपाच्या साहाय्याने झालेला संहार’ असे म्हणतात; म्हणून या दिवशी वाईट शक्तींचे निर्दालन करून पुढच्या शुभकार्याला दिपावलीच्या इतर दिवसांच्या माध्यमातून जिवाने आरंभ करावयाचा असतो.