Wednesday, 23 April 2025

स्वछंदाचा मार्ग मोकळा !

 स्वछंदाचा मार्ग मोकळा !

विचारात पडलात ना ? मी सांगते स्वछंदाचा मार्ग मोकळा म्हणजे रजोनिवृत्ती , मेनोपॉज वगैरे वगैरे. मग काय तर ! हेच म्हणायचं योग्य आहे हे मी मागच्या काही महिन्यातल्या सहवासात आलेल्या प्रसंगावरून ठरवलं आहे. गेले काही महिने अनेक मत्रिणींत झालेल्या गप्पांवरुन निघालेला निष्कर्ष असा कि पाळी जाणं हा वयाचा टप्पा ही  गोष्ट स्त्रीने स्वछंदाचा मार्ग मोकळा अशा दृष्टीने घ्यायला हवा.  अवघड आहे पण जमेल आणि समजुन घेतल तरच समजेल.

एक (पीडित ) : तुला होतो का ग त्रास त्याचा.?
दोन (अनभिद्य) : कसला?
एक : मेनोपॉज चा ग ?
तीन (सकारात्मक ): त्रास का म्हणते ग ? पाळीत दर महिना काही ना काही असतंच कि, आता इतकी वर्ष झाली तो काय त्रास वाटून घेतलं का आपण. 
एक : ज्याला होतो त्यालाच समाजत. 
चार (समजूतदार) : अस नाही ग..  आम्ही पण बायकाच आहोत समजू शकतो, कि शरीरात ठराविक वयानंतर बदल होतात ते व्यक्तीपरत्वे वेगवेगळ्या स्वरूपात असतात. 
एक : जे काही त्रास होतात उदाहरणार्थ फ्लो जास्त असतो, तो दहा दहा दिवस सुरु राहतो, पाय दुखतात, चिडचिड होते, घाम येत राहतो, जीव घाबरा होतो, मग असा होत असेल तर काय आनंद होणारे?
दोन: अरे बाप रे! सगळ्यांना होतो? 
तीन : होतो पण तो आपण थोडं विसरून लक्ष दुसरीकडे वेधून घालवू शकतो. हा बदल होणं म्हणजे आपलं निसर्गानं दिलेलं देणं कर्तव्यदक्षतेने पूर्ण करून आपण आराम करायचं स्वछंद जगायचं वळण आलं असं विचार कर. 
चार : बरोब्बर! आजवर ज्या पिशवीने लेकरू सांभाळली त्या संदर्भात काम केलं तीच काम संपत आल आहे तर तिला हि आतून त्रास होणारच ना? कल्पना करा कि तीच काम परिपूर्ण पणे करून झालय आता तिला आराम करायचा आहे. जस आपण ऑफिस मधून निवृत्त होताना त्रास होतो तसेच समजायचं. त्याला थोडे दिवस गेले कि ते सुरळीत होईलच. 
दोन : हे फार छान वाटलं. विचाराची दिशा आपण देऊ तशी शरीराची दशा.  आधीच्या काळी म्हणजे, आपल्या पणजी किंवा आजीच्या काळी  म्हणूनच चार दिवसात आराम करायला देत असावेत. तो आराम त्यांनी जोवर पाळी असेल तोवर केलेला असायचा म्हणून त्या पिढीला शेवटच्या रजोनिवृत्तीच्या वळणावर जड जात नसेल. 
तीन : असू शकत कारण आपल्या आजीच्या आईच्या तोंडी मेनोपॉज चा त्रास होतो अस कधी ऐकलं नाही बघा आपण. 
चार : आपली आई काकू यात कधी असेल तर कधी नसतील. पिढी बदलली, राहणीमान बदललं म्हणजे मला म्हणायचंय कि त्या चार दिवसात पण त्या कधी दमल्या बाजूला बसल्या असा नव्हतं. आपली पिढी तर कधीच चार दिवस आराम करत नाही तो करून आपलं कसं चालणार ? कदाचित पूर्वजांनी हि पद्धत स्वीकारण्यामागे हा हेतू असेल. 
तीन : खरंय आजीच्या काळात बायकांना कामचं इतकी असायची कि स्वतःकडे इतकं बघितलं जात नसेल. या वळणाचा विचार करायला ती मोकळीच नसेल, लग्न लवकर झाल्यानं तिची बाई म्हणून पुढची जबादारी आतापेक्षा आधीच गळ्यात आलेली असेल. 
एक : ते तेव्हाच झालं. आताच बोला ? जे होतंय ते गप गुमान सहन करायचं? का पण ? त्रास होतोय सांगायचं पण नाही?
तीन : अस नाही त्या त्रासावर उपाय आहेत ते करायचे, ते करताना स्वतःच मन आनंदी कस राहील ते वळण संपेल तोवर आपण कसे स्वतःवर ताबा ठेवू हे पाहायचं. 
पाच (संकुचित ): सांगायचं पण कसं ग? नको वाटतं. 
चार : स्वतःत कमीपणा घेत जगायचं मग शरीरावर निघत. मोकळ जगायचं ग सुंदरी. सगळ्यांनाच हेच होतं काही कमी काही जास्त. 
दोन : पण मग यातून मार्ग काय? 
चार : एक म्हणजे अश्यावेळी स्वतःच्या शरीराची काळजी घेणे, पौष्टिक खाणे, योग्य झोपणे, असा त्रास होत असलेल्या स्त्री ला "मला नाही बाई असा त्रास " असा धसका वाटेल असा बोलू नये, सर्वात महत्वचं म्हणजे व्यायाम करायचा नेमानं. 
एक : खरंच हे मात्र पटलं सगळ्या कामाला बायका आहेत. व्यायाम तरी नियमित केला जायला हवा. आय अग्री.
चार : नेहेमी पेक्षा खाण्याचं पण रात्रीच थोडं कमी करून झोपायचं. चिट डे असेलच पण बरंका. जे करू त्याचा बाऊ नको.
दोन : हो समजलं. 
तीन : मन मोकळं बोलयला सोयीची व्यक्ती शोधायची आणि नियमित डॉक्टरकडे तपासात आनंदी जगायचं. 
चार : हो खरंच ! नकारात्मक चर्चा जास्तीत जास्त टाळायची. हा आजार या वयात होतोच अस नाही वागायच. हा आजार नाही हे परिवर्तन आहे.
तीन : आपण जसे आहोत तसे स्वीकारायचं काय समजलं का?
पाच :  ?
चार : कालपरत्वे प्रजनन क्षमता कमी होत जाते तेव्हा शरीरातून बाकीची संप्रेरके सहकार्य करत असतातच. पेशींकडून शिकायला हवे त्यांच्या सारखं मदतीला धावून येणारे कोणी नाही. 
दोन : क्या बात है !
पाच : मस्तच!
तीन : गर्भाशयाच्या कामात घट झाल्याने होणारे बदल हे, जगण्यासाठी थेट आव्यश्यक नसले तरी हे गरजेचे आहेत. तेव्हा शांत मनानी स्वतःला शोधु, काळजी घेऊ आणि स्वछंदाचा मार्ग मोकळा होती तो पाहायला शिकू. 
दोन : येस मॅडम (हसत)
एक : हो, जेव्हा आराम करावा वाटेल तेव्हा करायचा, जेव्हा आनंदी वाटेल ते क्षण मात्र जगायचे. 
तीन : हो खरंच कारण या वळणावर पुढची जबाबदारी येतेच आहे हळूच ... तिला वेलकम करायचंय आनंदानी. जाताय कुठ नैतिक जबाबदारी संपत नाही.
चार : बाईचं आयुष्य सोप्प नाही पण स्वछंदाचा मार्ग मोकळा होताना मदत केली तर ते वळण  सहज सरेल. 
पाच : मस्तच. 
(सगळ्या पाचकडे हसुन बघत खळखळाट)
काय मग आहे कि नाही बरोबर? मी पण खूप विचार केलाय यावर. एक डॉक्टर, एक व्यवसाय करणारी, एक गृहिणी, एक एकटी पालक, दोन लेकराची आई, (आजी, पणजी शी पण बोलले) अश्या सगळ्या या वळणावरच्या भेटत गेल्या आणि मी उत्तरं शोधात गेले. थोडक्यात काय मन रिकामं होणं गरजेचं ना... तरच छान छान त्यात भरायला जागा होईल. 
चला काळजी घेऊ काळजी न करता... काय म्हणता? 
सौ. गौरी पाठक 
१४ मे २०२५

Monday, 21 April 2025

चोर पोलिस

चोरपोलिस
ती : अगं काल तू कुठे होतीस? सगळ्या भेटलो तुझी खूप आठवण झाली. 
मी : गावाकडे वास्तुशांत होती माहेरच्या शेजारी होत्या त्यांच्याकडे. . 
ती : अच्छा ! कशी झाली ? गावाकडचं वातावरण दोन दिवस मस्त गेले असतील. 
मी : खरंय! मुख्य शहर ते गाव प्रवास अनुभव मस्त होता. काही घ्याव अस आणि काही आपलं बरय रे बाबा असं होतं.
ती : भर उन्हाळ्यात विदर्भात गावी जायचं सोपं नाही. 
मी : मी त्यांच्या गावी प्रथमच गेले. फार जायची वेळ आलीच नाही कधी. एप्रिल चा उन्हाळा बघून आले. ४३-४५ डिग्रीच्या झळा अंगावर घेतल्या अनेक वर्षांनी.

पुण्यातल्या बस आणि गावातल्या एसटीतला जबरदस्त फरक बघून आले. महिलांच्या राखीव जागा पण पुरुष बसतात. दोन दोन तास दूर असल तरी अगदी सामान्य वर्गातली बाई आणि कलेक्टर ऑफिस ची बाई पण एसटीतूनच प्रवास करताना दिसली. मुंबईच्या मेकअपच्या बायका  आठवल्या या पण तश्याच आवरून मुख्य शहरात मीटिंग साठी जायला बसमध्ये होत्या. आधी मला वाटलं लग्नाच्या गडबडीत आहेत. त्यांना ते उकाड्यातलं बसनी ये जा नेहेमीच असावं. दोन तास उभं राहून एसटीतून जायची हि पहिलीच वेळ असेल माझी. विविध नमुने अनुभवले. कोणी निरखून पाहत होतं, तर कोणी डोळे मोठे करून. आपण शहरी लगेच ओळखू येतो. त्यात एका माणसांनी सहानुभूती दाखवली दोन सीटवर मला तिसरीला बूड टेकायला तरी जागा दिली. कान्हजी त्यांना सुखी ठेवो. आपण छान हसून बघितलं बोललो कि सगळं सहज होतं हे मला जाणवलं. 

किती का तापेना डोक्याला पंचा बांधून सायकलवर, दुकानात, एस टी स्टॅडवर शो मस्ट गो ऑन म्हणत काम करणारे दिसले. नेहमीपेक्षा वेगळ जग बघितलं. फरक काही नाही नैतिक जबाबदारीत अडकलेलेच सगळे जीव खर तर!

आपण कुठही गेलो तरी घरातल मोठ माणूस समोर बघितलं की छान वाटतं. तशीच आत्त्या सामोर आली.
पाणी द्या गss, चहा मांडा, पांघरूण दिल का सगळ्यांना?, झोप लागली का? अशा अनेक गोष्टी जातीन तपासणारी पिढी संपुष्टात येऊ लागलीय याची तीव्रतेने जाणीव झाली. आपल्या पिढीला ही दिसली पण पुढच्या पिढीला सगळ्यांना ही दिसेल का? हा प्रेमळ अनुभव त्यांना मिळेल का? मिळाला तर त्याची त्यांना कदर असेल का? अनेक प्रश्न समोर फिरत होते.
आपण कस असल पाहिजे याच्या चेकलीस्टमधे मनात नोंदी झाल्या.

मला आवडेल म्हणून चांगला वास असलेलं कढीपत्ता झाडाच रोप एकान आणलं, एकिन ते मातीत बांधून दिलं, नंतर पुढे एकीन जाईतोवर मोकळ करून ठेऊ म्हणत पाणी शिंपडलं, ते बघुन बाबांचे शब्द आठवले. आपल्यासाठी कणभर का होईना कोणी दिल ना तरी मणभर प्रेमान ते जपायच अस बाबा मला सांगायचे. गावाला अस देण्याची पद्धत असतेच ठाऊक आहे पण मी पण ते पुण्यापर्यंत जपलं. प्रत्येकात काही तरी चांगल शोधावं तस मी त्यात फक्त माया बघितली. बघु वाढत कस ते?

एक गोड अनुभव सांगते. पोचले तिकडच्या घरी एक लहान मुलगा आणि मुलगी होती. सगळे कामात व्यस्त होते. संध्याकाळी मी तेनाली रामा २ चा कालचा भाग फोनमध्ये बघू अश्या विचारानी  फोन हातात घेतला सोनीवर तेनाली ऊघडलं. ते एका लहानगीन बघितलं. ती मुलगी आनंदून म्हटली, "अरे काकू तेनाली रामा पाहतायत." मी म्हटलं, "हो मला आवडतंच ते." तर मला टाळी देत ती खुश होऊन म्हटली, "हो मी पण बघते काकू, आज बुडल आठ वाजत लागत ते." मी म्हटलं, "झालेलं पण पाहत येतं कि चल टीव्ही वर पाहू." पण नाही अस दिसत नाही बरोब्बर आठला ते दिसतं असा पटकन ती म्हटली. मग समजलं कि गावात केबल वर जुने एइपिसोड दिसत नाहीत. किती छान सवय होती वेळेत पाहायची. आपण शहरी लोक कालचे पण पाहू शकतो त्यामुळे वेळेची किंमतच नाही आपल्याला. ते लेकरू खूप आश्चर्यात विचारात होतं कि काकू तुमच्याकडे असं कधी पण दिसत का ? किती निरागस मन असतं लहान मुलांचं. मी पटकन म्हटलं,  "तुमचच बरय वेळ पाळून बघायचं."  तीच्या डोळ्यातली ती चमक वेगळीच होती. मला आनंद हा होता कि गावात असूनही ती तेनाली रामा बघायची आवड बाळगून होती. खूप खूप आनंद झाला. बाकीचे दोघे आमच्या भोवती घुटमळत होते. त्यांना काही इंटरेस्ट नसावा. त्यांना आश्चर्य हे होत कि शहरातली काकू पण बघते याचंच. मी म्हटलं, "ते मस्तच असतं" तर ती मुलगी काय म्हणावी त्यांना ठाउकें का ? सी आयडी सारखा जुन्या काळी  चतुर म्हणून ओळखले जायचे तेनाली रामा. हे ऐकून तर मला आनंद झालाच कि इतक्या खेडेगावात राहून पण इतकी माहिती असून हे लहान लेकरू त्यात इंटरेस्ट दाखवत त्याच महत्व तिच्या बरोबरीच्यांना सांगत होतं. पुढच्या पिढीला हे माहित आहे, ते पण गावातल्या हे बघून मन भरून आलं.  दुसरी म्हणाली, "ठीके आता ते उद्या बघ ग." आणि  मला म्हणाली, "चार जण लागतात चोर पोलीस खेळायला, काकू तुम्ही आमच्या बरोबर खेळता का?" मी म्हटलं, "इकडे लपायची जागा मला माहित नाही ग?" मला झपकन लहानपण आठवलं. वयानी काय वेळ आणली चोर पोलीसला नाही म्हणतोय आपण जरा हसू आलंच. तर मला म्हणते कि "अहो काकू कागदातला चोर पोलीस खेळायचं." " ते कसं ? मला माहित नाही ग." मी बाळबोधपणे विचारलं. मला खूप हसल्या दोघी. मला त्यांना बघुन भारी वाटलं. हो शहरात हे खेळत नाहीत ? मला काय ठाऊक खेळाच नाव वेगळय, पण हरकत नाही ही माघार घेण आवडलं मला. मी म्हटलं शहरातले काहीही शिकायला केव्हाही तयार असतात. शिकवलं तर खेळेन. मस्त शिकवणी झाली आणि तासभर खेळ झाला. तो तास बालपणात रमून गेले मी. चिठ्ठी घेतानाच आनंद, चिठ्ठ्या फ़ेकतानाचा आनंद मनमुराद घेतला. कार्यक्रम काय होता हे मला तेव्हा महत्वाचं नव्हतं. आला क्षण आनंदी जगायचं, हे मी नुसतं म्हणत नव्हते तर तो जगत होते. खेळताना केलेला डॅंबिसपणा ती खुणवाखुणवी मला समजत होती. पण ती पण माझ लहापण आठवून गेली. मुख्य शहरापासून लांबच्या गावातल्या अशा मुलांना जवळून पाहता आलं. काय सुरेख योग होता. ज्या कामासाठी मी गावाला गेले होते ते झालच होतं. पण तेनाली रामा आवडतं अशी एक छोटुशी मैत्रीण पण मिळाली होती. चार लहानांत लहान होऊन मला खेळता आलं. मस्त वाटलं. 

दुसऱ्या दिवशी रिक्षा बोलावली होती मी निघाले होते. रिक्षातून ती मला दिसली. मला न समजताच मी तीला पटकन टाटा केला. तिनी पण तितक्याच आपुलकीनं चाललात काकू ? अशा म्हणत हात वर हलवत  टाटा केला, सायंकावरून थांबत. किती क्षणिक भेट पण मला ती जवळची वाटून गेली. त्या चारही लेकरांना कान्हजी भरभरून प्रेम देतो आणि योग्य मार्ग दाखवित हीच मनापासून इच्छा !

याच टीमला काल संध्याकाळी भातुकली खेळताना मी दुरून पाहत होते. मला माझी लहानपणची जिन्यातली भातुकली आठवली. आजकाल शहरात भातुकली खेळ दिसतच नाही. इकडे तो बघून मनातला एक कप्पा उघडला होताच तो निघताना परत आणखी आठवणींनी भरून बंद केला आणि परत आले. 

सगळ्यात आनंददायक गोष्ट ही वाटली की त्यांना मला खेळायला बोलवावं वाटलं. भले घरात गडबड केली म्हणून काकुला विचार खेळते का? अस ही असेल. मला माहित नाही पण त्यांना मी खेळायला चालणार होते चौथी सवंगडी म्हणून याचा मला फार आनंद झाला.

ती :  खरच तु खुप छान अनुभवलस. जे दिसेल ते वेगळ्या नजरेनं पाहायला तु शिकवलस. 
मी : धन्यवाद सुंदरी!  खर सांगू तशा खुप गोष्टी बघितल्या पण मांडून ठेवण्यासारख मात्र मांडलच. तुझ्यामुळे त्याला व्यक्त रूप आलं हे छान झालं. माझही मन हलकं झालं.
--
सौ. गौरी अनिरुद्ध पाठक
२१ एप्रिल २०२५