Tuesday 13 June 2023

पत्रास कारण की...

१३.०६.२०२३

सलग दोन वर्ष तुझ्याच इच्छेने व कृपेने आळंदी ते पुणे पायी वारी आय टी दिंडी मार्फत पार पडली. पंढापूर पर्यतच्या वारीचा विचार करता २१ कि मी पायी वारी म्हणजे नखाच्या टोकावरचा अनुभव असा इतकाच म्हणावा लागेल. परंतु माझ्या सारख्या सर्वसामान्यास तो अनुभव पण भरपुर शिकवुन गेला. यावरूनच संपूर्ण पायी वारी करून घरी परतणारे पुण्यात्मे काय तेजाने झळकत घरी पोचत असतील याची स्पष्ट कल्पना आली.
आज मी माझ्या पालक, मालक, सखा, आणि विश्वचालक अशा अनाथांच्या नाथाला भक्तांच्या, परमप्रिय, आदरणीय, पूजनीय अशा तुला पत्र लिहून माझी वारी पूर्ण होण्यासाठी माध्यम ठरणाऱ्या सर्वाप्रती धन्यवाद कृतज्ञता पोचवत आहे. 
नखाच्या टोकाइतका पण प्रगल्भ अनुभव ज्या वारीत लाभला त्या वारीत जाण्यासाठी योगदान, मध्यम अथवा सहकार्य करणाऱ्या  अपरिचित परिचितांना धन्यवाद पोचवावा. 
 
वारी मधील आम्हाला जंगली महाराज देवळा पाशी पोचल्या नंतर सापडेल त्या रस्त्यान घरी पोचवलं,  त्या रिक्षा चालकांना  -  हे पांडुरंगा आमचे धन्यवाद व अनंत आभार पोचवावे. जंगलीमहाराज रोडवर त्या दिवशी रिक्षा मिळाल्याचा आनंद काही औरच असतो. मागच्यावर्षी रिक्षाचालकानं चक्क ऊतरून नमस्कार केला.  का? तर वारी करून आलो. यंदाच्या रिक्षाचालकान  वारीत सेवा म्हणुन घरी सोडल पण पैसे घेत नाही म्हणाला. मनापासून धन्यवाद. 

आय टी वारीत जेवणाची, शौचालयाची व्यवस्था करण्यास माध्यम ठरणारे सर्व माऊली मंडळी व सहकारी यांना तसेच वाटेत मुबलक पाणी देणाऱ्या सर्व हातांना हे पांडुरंगा धन्यवाद पोचवावे. 

तसेच वारीसाठी सुटी देणाऱ्या बाँसला,  घरी आल्यावर गरम उत्तप्पा देणाऱ्या सासुला,  सकाळी निघताना तयार सरबत देणाऱ्या नवऱ्याला, जवळ पोचल्यावर घरी नेण्यास येणाऱ्या मुलाला , घरपोच टाळ पोचवणाऱ्या मैत्रिणीला, पायी चालताना खांदयाला खांदा लावून एकत्रित पणे चालणाऱ्या  र्सव माउलींना मनापासून धन्यवाद पोचवावे. हे पांडुरंग तूच आमची नाळ आहेस. 

हे पांडुरंगा या सर्व माध्यम ठरणाऱ्या माझ्या माणसांना सुख समृद्धी आरोग्य व योग्य कर्म करण्याची बुद्धी प्रदान करा. या सर्वांच्यात अपरिचित असे दोन्ही वर्षी भेटणारे रिक्षाचालक जे परत भेटणार नाहीत त्यांना आमचा विशेष धन्यवाद पोचवावा.
पाठीराख्या पांडुरंगा आम्हावर अशीच मायेची पाखर राहु दया. "हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा...."

तुझीच
 गौरी माऊली.

3 comments:

  1. माऊली धन्यवाद,समृध्द पत्रलेखन 🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏🙏

    ReplyDelete
  3. धन्यवाद माऊली, जय पांडुरंगा🙏

    ReplyDelete