Thursday 29 June 2023

९) भाद्रपद (ऑगस्ट - सप्टेंबर ) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका २०२३

 भाद्रपद महिना महत्वं :  

चातुर्मासातला दुसरा महिना भाद्रपद. श्रावण महिन्याच्या शेवटी भाद्रपद सुरू होतो. श्रावणानंतर भाद्रपदामध्येही पावसाळ्यामुळे पृथ्वी ओलसर होत राहते. यासोबतच भाद्र महिन्यात घर बांधणे, लग्न, लग्नकार्य व इतर कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. त्यालाही काही कारणं आहेतच. भक्ती, स्नान आणि उपासनेसाठी भादौ / भादूर / भाद्रपद  महिना सर्वोत्तम मानला जातो. भद्रा हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ कल्याण असा होतो. या महिन्यात भाद्रा लवकर आल्याने म्हणजेच चांगले फळ देत असल्याने याला भाद्र महिना असे म्हणतात. हा महिना संयम, व्रत, उपवास, नियम आणि निष्ठा पाळण्यासाठी ओळखला जातो.

महिन्यातील सण :
हरितालिका पूजन : तृतीया

कोणी वाळुचा महादेव करःन पुजा करतं तर कोणी पार्वतीची मूर्ती आणुन करतं. हरितालिका पुजा करण्याची प्रांता प्रांतात वेगळी पद्धत आहे. भाव महत्वाचा तो असा की एकाग्र चित्तान महादेवाची आराधना करून योग्य जोडीदार लाभो हा आशिर्वाद मागणे. मनापासून केलेलं काम असेल तर फल पण योग्य लाभते. त्यात आपले मन असते. सगळा विचारांचा खेळ आहे. जसे विचार तशी भावना तशीच क्रिया. 

श्री गणेश चतुर्थी : 
श्रीगणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे, त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. हिंदू धर्मात श्रीगणेशाचे स्थान प्रथम पुजेचा मान असे आहे. अशी बुद्धीची देवता महर्षि व्यासांबरोबर महाभारत लिहीत होती. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यासांनी  गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात शिरवले / बुडवले. या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली. असा ऊल्लेख सापडतो. अतिशय भक्तीभावान हिंदु धर्मिय बाप्पांना घरी आणतात. प्राणप्रतिष्ठा करून जीव सक्रिय होतो. आणि दहा नंतर ते तत्व निसर्गात विलीन होते ते शिरवून.  दहा दिवस भूतलावर बाप्पा सूक्ष्म स्पंदानी वावरतात. अनंत चतुर्दशीला ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातो.
प्रत्येक कुळाच्या कुलगुरूंनी त्यांना योग्य असेल तितके  दिवस गणपती बसवावा असा नियम करून दिला असावा.

श्री गौरी / महालक्ष्म्या :
पहिला दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरीचे आगमन, दुसऱ्या दिवशी तिची पूजा आणि आदरातिथ्य ज्याला पाचर म्हणतात आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन. अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन, म्हणजे गौराई असते अवघ्या तीन दिवसांची पाहुणी आणि त्यामुळेच तिचं कौतुकही न्यारंच. वेगवेगऴ्या रीतिरिवाजांनुसार पूजन, गोडधोडाचा नैवेद्य करून माहेरवेशीणीचा कौतुक सोहळाच जणू पार पडतो.  ज्येष्ठा गौरींच्या घरी प्रवेश करण्यापूर्वी संपूर्ण घर स्वच्छ केल जातं. संपूर्ण घराला हार, तोरण, फुले, रांगोळ्या अशा सुंदर सजावट केल्या जातात. घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.  हे असण्याला या नक्षत्राची निसर्गाची बहुमोल साथ असते.
गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात. महालक्ष्मी /गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमीच्या सुफलीकरणाचा आहे. माहेरवाशिणींचा क्काचा सण "गौरी " "महालक्ष्म्या". या जेष्ठा कनिष्ठा माहेरवाशीणींच प्रतिक म्हणुन पुजल्या जातात. मानवजातीने स्त्री तत्वास योग्य सन्मान देण महत्वाच आहे हे हा सण दाखवतो. लेकीचा सण म्हणजे सुना पण आल्याच की! नवनिर्मितीस आकार देणारं स्त्री तत्व ज्यात प्रचंड क्षमता आहे वाट्टेल ते पेलण्याची त्या स्त्री तत्वास कृतज्ञताच जणू .

 ॠषिपंचमी : 

ॠषीतुल्य असे पूर्वज यांना कृतज्ञता म्हणुन या दिवशी पुजा केली जाते. या दिवशी स्वकष्टार्जित अन्न खावे हा हेतु आहे. बैलाना एराम दिला जातो. ॠषिपंचमी व्रत पुजा ही, आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ॠषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करावे याची आठवण देण्यासाठी आहे. याच दिवशी संत श्री गजानन महाराजांनी समाधी घेतली. संजीवन समाधी दिवस.

श्राद्धपक्ष :
पितृ पंधरवड्यायात  हिंदू त्यांच्या पूर्वजांना प्रार्थना करतात, विशेषत: ज्ञात असलेल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना प्रार्थना, अन्न आणि पाणी अर्पण ज्या  विधीद्वारे करतात ते श्राद्ध. शुभ कार्यासाठी पित्रृ पक्ष अशुभ मानतात. अशुभ म्हणजे हा कालावधी दूर गेलेल्या आप्तीयांनसाठीच आहे म्हणुन. या कालावधीत श्राद्ध करताना मृत सदस्याला जीवनात आवडलेल्या विविध प्रकारचे अन्न केले जाते. या १५ दिवसांमध्ये मृत पूर्वजांच्या आत्म्यांना सुखी करण्यासाठी एक शक्तिशाली वेळ आहे अस मानतात. दिवंगत पूर्वजांच्या आत्म्यांना पृथ्वीवरील लोकांशी संलग्न होण्यापासून मुक्त करते. या प्रथेमुळे स्वर्गाचा त्यांचा प्रवास सुरळीत होतो. परंपरेनुसार मागील जन्माचे कर्म या जीवनात केले जाते, आणि म्हणून आपण अपूर्ण कर्म पूर्ण केले पाहिजे. जे आपले कर्म स्वर्गीय  मार्गावर असणार्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे जाण्यासाठी मदत करतात. अग्नी पुराण, वायु पुराण, गरुड पुराण यांसारख्या पवित्र ग्रंथांमध्ये श्राद्धाचा सविस्तर ऊल्लेख आढळतो. हिंदू धर्मात आणि इतर अनेक धर्मांमध्ये केले जाणारे हे कार्य ही एक प्रदीर्घ परंपरा आहे. आत्मा अमर आहे तो शरीर बदलत असतो यासाठी ते त्यागताना संतुष्टी असण ऊत्तम.

महिन्यातील यात्रा, जयंत्या :
वराह जयंती :
वराह अवतार विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार आहे अस म्हणतात. या अवतारात श्रीविष्णूने वराहाचे म्हणजेच डुकराचे रूप धारण केले होते. भगवान विष्णूंनी अवतार घेऊन मानवानं परमेश्वरी तत्व जागृत आहे याची अनुभूती दिली आहे. 


गीते, कविता, गाणी :

हरितालिकेची आरती
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥ आरती ओवाळीते । ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥
हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥
तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. १ ॥
रिघसी हिमाद्रिच्या पोटी । कन्या होसी तूं गोमटी ॥
 उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ॥ जय.॥ २ ॥
तपपंचाग्निसाधने । धुम्रपाने अघोवदने । 
केली बहु उपोषणे ॥ शुंभ भ्रताराकारणें ॥जय. ॥ ३ ॥
लीला दाखविसी दृष्टी । हे व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावे संकटी ॥ जय. ॥ ४ ॥
काय वर्णू तव गुण । अल्पमती नारायण ॥
माते दाखवी चरण । चुकवावे जन्म मरण ॥ जय देवी ॥ ५ ॥

गौराई आली
आली आली लक्ष्मी, आली तशी जाऊ नको
बाळाला सांगते, धरला हात सोडू नको.
मला आहे हौस, चांदीच्या ताटाची
लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखरभाताची
लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी
ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली
मालकाच्या घरी लक्ष्मी आली

लॉजिक नवीन पिढी साठी :
हरतालिका पुजा व ऊपवास का करायचा?
या दिवशी महादेव व पार्वतीचा मिलाप झाला. बायका ऊपवास करून सुखी संसारासाठी प्रार्थना करतात. शिवपिंडीची पुजा करताना प्रकट होणारे शिवतत्व त्या स्त्रीस लाभते. वायुमंडलातील लहरीतील बदल शरीरास ऊपयुक्त असतात. शक्तीच्या कणांचे प्रक्षेपण स्त्रीकडे आकर्षित होते. वाळुच्या महादेवातुन शिवपिंडीतुन चैतन्याचे वलय निर्माण होते. या पूजनामुळे निर्गुण तत्वात्मक वलय निर्माण होते.  ऊपवासाला आद्ध्यात्मिक महत्व आहे. पाचन अग्नी जागृत होऊन शरीर शुदेध व मन एकाग्र होते जे व्रत करताना ऊपयुक्त ठरते.

गौरी गणपती का बसवायचे?
जी गोष्ट केल्याने समाधान, एकोपा व सेन्ट्रलाईज एनर्जी तयार होते, ती गोष्ट मानवास हितकारक ठरते. एखादं तत्व एका ठिकाणी केंद्रीत होऊन कार्य करत असते तेव्हा निसर्ग पण सहाय्यक बनत असतो. अशावेळी एकत्र जमुन ते अनुभवले पाहिजेत.  सहवासानं प्रेम वाढतं आणि प्रेम वाढलं की आपुलकी. गौरी गणपती सारखे सण साजरे करून मानव नकळत ते सुंदर स्पंद आकर्षित करतो. वातावरण पण या काळात आनंदी असते. गौरी च्या निमित्ताने लांबची लेक भेटते. गणपती बसवल्यावर आरतीमुळे सामुहिक फायदे होतात. अस कोणी सापडणार नाही की या दिवसात ऊदास वाटतय. असा निसर्ग पण जर साथीला असेल तर नेमुन दिलेले पदार्थ पण पचन नीट होते. पूर्वजांनी आखलेले नियम समजुन घेतले पाहिजेत. 

गजाननाच्या रूपाचे निरूपण समजुन घेतले तर समजतं की अशी देवता का घरी आणली पाहिजे. 
गजमुख : हत्ती बुद्धिमान प्राणी मानला जातो. हत्ती विशाल असतो आणि स्मृती अतिशय तल्लख असते. हत्तीचे तोंड, कान, डोळे सर्व एकत्र होऊन तोंड तयार होते. विशाल तोंड निर्भयता आणि आत्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते.
मोठे कान : मोठे कान हे एकाग्रतेचे प्रतीक मानले जातात. 
एकदंत : गणपतीचा एक सुळा दुष्ट लोकांना भीती दाखविण्यासाठी आहे. सरळमार्गी चालणार्‍यांना त्रास देणे सोपे आहे, असे समजणे नुकसान करेल, असा संदेश यातून मिळतो.
लंबोदर : ज्ञानी व्यक्ती निंदा, स्तुती, जय, पराजय, उच्च - नीच अशा अनेक प्रकारच्या परिस्थिती आपल्यात सामावून घेत असतात. मोठे पोट हे ज्ञानवानाच्या या गुणाचे प्रतीक असल्याचे मानले जाते.
मोदक :  मोदक परिपूर्ण स्थितीचे द्योतक आहे. मोदक हा ज्ञाननिष्ठा, ज्ञानरस आणि ज्ञानाद्वारे प्राप्त मुदित अवस्थेचा परिचय देणारे आहे. मोदक बुद्धी, परिश्रम आणि तपस्याच्या बळावर यश मिळवण्याचे सूचक आहे.
वाहन ऊंदीर : गणपतीसारख्या विशाल काया आणि ज्ञानी असलेल्या देवतेचे वाहन छोटा मूषक असण्यामागे विशेष कारण आहे. तो  प्रत्येक गोष्ट कामाची आहे की नाही ते तपासून पाहतो (कुरतडणे ). समाजात प्रत्येक गोष्टीवर टीका करणाऱ्या अनेक वृत्ती आपणास दिसतात. अशा प्रवृत्तीवर नियंत्रणासाठी मूषक. म्हणजेच विवेकाचा अविवेकावर विजयाचे प्रतिक आहे. 
खूप जणांना प्रश्न असतो कि गणपतीची गौरी कोण ? बहीण कि आई ? तर गौरी हे देवी पार्वतीचे रूप आहे. पुरुष आणि प्रकृती मधील प्रकृतीचे प्रतिक गौरी. स्त्री तत्वाचे ती प्रतिनिधित्व करते अस म्हणू शकतो आपण. मग ती बहीण आई कोणीही असो. त्या तत्वाचे महत्त्व अपार आहे.  ज्या कालावधीत त्या तत्वाचे महत्त्व सांगायचे असेल त्यावेळे नुसार पूर्वजांनी आखणी केलेली असावी. (आणखी माहित सापडली कि नोंद करेनच. )

श्राद्ध का करायचं?
आपल्या पासुन दूरावलेल्यांना स्मरण करणे. त्यांच्यामुळे आपण या भूतलावर आहोत यासाठी कृतज्ञ राहायला हवे. कोणतेही ॠण फेडल्या शिवाय मुक्तीचा मार्ग मोकळा होत नाही. पितृॠणातून मुक्त होण्यासाठी श्राद्ध विधी करतात.

5 comments:

  1. Khup chhan mahiti vachlya var June divas aathvale

    ReplyDelete
  2. मनापासून धन्यवाद

    ReplyDelete
  3. 🙏🙏👌👌

    ReplyDelete
  4. 👌👌🙏🙏

    ReplyDelete
  5. 👌👌🙏🙏

    ReplyDelete