Monday, 18 May 2026

ओघवत मन


"ते" चार दिवस "त्या" चार आठवणी 

वसंत ऋतूच्या आगमनानं कसं पालवी मार्फत निसर्गातील बदलांची चाहूल लागते. अगदी तस्सच त्या दिवसा आधी व्यष्टीच्या आतमध्ये पेशी गोल गोल फिरू लागल्याची चाहूल लागली कि समजायचं ती येतेय. तिच्या आगमनाची पावती पूर्वी त्रासदायक असायची पण व्यष्टीच्या योग्य हालचालींची सवय सातत्याने ठेवल्याने ती आता सहज समजते. तर अशी हि ती चार दिवस आली आणि तिच्या बरोबर चार आठवणी देऊन गेली. चार दिवस वेगळे विचार आणि अनुभव.
हल्ली ती आली कि काही वेळ आधी घुटमळते, मगच येते. पण चार दिवस छान नवनवीन अनुभव देऊन जाते. यावेळी आली ती पण थोडी घुटमळतच पण खुश होती. तिच्या व्यष्टीमधल्या सगळ्या नातलगांना सांभाळून ती आलेली. आज तिचा पहिलाच दिवस होता. तिच्या बरोबर व्यष्टीपण दिवसभर खूप आनंदात होती. तिला सकारात्मकतेने सामोरे गेल्यामुले दिवसाअखेर काय एव्हरग्रीन आहेस तू? असे कौतुकाचे बोल ऐकायला मिळाले. तिला बरोबर घेऊनच तो दिवस वाऱ्यासारखा आला आणि वाऱ्यासारखा गेलाही. आईच्या भाषेत मुडद्या
यासारखी झोपही लागली.
तीनं दुसरा दिवस गाजवलाच, व्यष्टीतल्या सगळ्यांना सकाळीच बजावलं होत कि काय कोण जाणे. लवकर उठायचं भरपूर चालायचं आणि आज दिवसभर खूप कामही उरकायचीत आहेत. आणि काय आश्चर्य ! तिने व्यष्टीबरोबर जे जे काही ठरवलं होतं ते ते सर्व पार पाडलंच. आज तीच खूप खुप कौतुक वाटलं. तीन पाठ थोपटायला कोणाचीही वाट बघितली नाही. या कामासाठी तीच तिला खूप पुरेशी आहे. तू स्वतः पुरेशी आहेस यासाठी कारण तू व्यष्टीच्या योग्य हालचालींची सवय सातत्याने ठेवली आहेस. 
तिचा आज येऊन झालेला तिसरा दिवस होता. आज सकाळपासून मनात विविध विचार होते. भावनिक कल्लोळ होता. आज व्यष्टीला वेळ हवा होता तिचा स्वतःचा असा खास. तिनं तो घेतला. ती आणि व्यष्टी मिळून अवांतर गप्पा मारल्या एकमेकींशी सुसंवाद साधला, माया केली आणि मनमुराद हवा तसा सकाळचा वेळ घालवला. तीन ठरवलं आणि विश्वानी पण मग पदर खोचून तिला साथ दिली. आज तिला तो वेळ घालवणं गरजेचं होतं कारण दिवसा अखेर तिला त्यातून चार्जरची भूमिका बजावायची होती. दुपार कामात गेली. संध्याकाळी भावनांचा न सुटू शकणारा गुंता तिला समोरा जाणार होता. तीन केलेली कामं, ती करत असलेलं कामं आणि तिला भावी आयुष्यात करावं लागणारी कामं या सगळ्याचा लेखाजोखा ती उजळणी करत होती. ती संध्याकाळी तिच्या खूप जवळच्यांना भेटली पण दिवसाअखेर तिला जड वाटत होत. व्यष्टीच्या बाह्य मनाला ते उलघाल वाटत होत. मग  सातत्यान चिंत्तन करायची सवय लावलेल अंतर्मन सरसावल त्यानं गोंजारले, थोपटलं, समजावलं, हलक्या आवाजातल्या अंगाईनी ते बाह्यमन कधी झोपी गेलं समाजलच नाही. तिचा येऊन झालेला आजचा तिसरा दिवस जास्त शिकवून गेला.
ती दरवेळी येते ना तेव्हा काही ना काही वानवळा आणतेच बरोबर. यावेळी व्यष्टीमधील संप्रेरकांवर फुंकर मारून संतुलन कसं साधायचं त्याची कुपी आणली होती.
आज होता तिचा चौथा दिवस. ती सकाळपासूनच जायचं परत म्हणून आपापलं आवारतच होती, पण वानवळा खूपच मस्त असल्यानं तिची व्यष्टीशी झालेली गट्टी तिला त्यातही मदत करत होती. जे जे आज सकाळपासून केलं त्यात त्यात ती भावनिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून जगू लागलेलं दिसत म्हणा किंवा जाणवत होत. मग तिनंच सुचवलं आज जाताना चार दिवसांच कोंदण नोंदच करून टाक सं सुचवलं. कस वाटत ना! खरं तर आज तिचा वर्षातला अतिशय दुःखद दिवस पण ती सकाळ पासूनच बरीच बरी होती. हा तिच्यातला बदल होता. चौदा वर्षातला. तिनं भावनिकतेवर मात करून अनुभवाची शिदोरी कशी वापर हे वाणं जाताना पदरात घातलं होत. ती आणि व्यष्टी दोघीही खूप खुश होत्या. 
ये परत वेळेवर गं ... अस  म्हणत कधी दिवस संपला आणि निघायची वेळ झाली समजलच नाही. व्यष्टीन तिचे आभार मानले, तिच्यामुळे सक्रियपणे समष्टीत मुक्त संचार करू शकते याबद्दल. तसेच व्यष्टीत पण योग्य हालचालींची सवय सातत्याने ठेवल्याने व्यवस्थित ठेवली आहेस  यासाठी तिनसुद्धा पाठ थोपटली. छान न्ऊहा माखू घालून ती परत जायला निघाली. जाताना Do and Don'ts ची यादी पण देऊन गेली. 
ती आली आणि चार दिवस मोलाच्या आठवणी अनुभव आणि शिकवणं देऊन गेली. त्या कोणत्या? हे तीच आणि व्यष्टीचं  गुपितच आहे. 
--
सौ. गौरी अनिरुद्ध पाठक
९९७०१६८०१४
११ मे २०२६
#####

आई ची आई होताना...
आई हि आपली आई जेव्हा असते तेव्हा ती काय काय करते आपल्यासाठी. अचानक ४० वर्ष मी मागे गेले हो कारण तेच कळतं वय असत. आई जेवू घालते, केसांची निगा राखते, स्वच्छता शिकवते, चांगलं वाईट वागण्यातला फरक शिकवते, रट्टे देते, रागावते सुद्धा. आईशिवाय त्या वयात पानही हालत नाही. काहीही झालं कि आधी भडाभडा आईला सांगायचं हे वय. तिनी सांगितलेली काम करताना अनेकदा धांदरटपणा होतो तो ती निस्तरते, लेकराला कोणीही काही बोलल तर धावून जाते, कपडे कसे घालायचे? शिकायचं महत्व काय ? नातेवाईक का महत्वाचे? कोणते किती महत्वाचे ? अचानक कोण आलं घरी तर काय काय करायचं? आपली माणसं आपली का असतात यावर आईच तिच्या बरोबरीच्यांशी होणार वागणं बघून ८ वयापुढं मुलगी जगत असते. आता ती आईकडून चापून चुपून वेण्या घालायच्या वयात आलेली असते. आई खेरीच कोणाचीही घालून दिलेली वेणी तेव्हा रास्त नसते. नंतरच्या वयाच्या टप्प्यात आईचे इथंवरचे कष्ट समजू लागतात. तिची घराप्रतीची तळमळ समजू लागते. तिनी अनुभवलेल्या गोष्टीवरून सुधारित आवृत्ती ती मुलीस सांगू लागते. काळजी पोटीच म्हणा पण आता ते वय आलेले असते. नंतर येते ती पाळी, जीवणातला अत्यंत महत्वाचा टप्पा पाळी. ४० वर्षांपूर्वी मुलींना १४-१५ व्य वर्षी पाळी यायची. तेव्हा तर आईशिवाय कोणीच नकोसे वाटते. आता कपडे कोणते घालायचे यावरही संशोधन सुरु होते. पचनी पडायला जड अश्या अनंत घटना या वयात येतात, तेव्हा आई हि आई न राहता विश्वासू  मैत्रीणच होते. अशा आणि अश्या अनंत गोष्टी जेव्हा एक मुलगी आईला बघताना अनुभवते. पुढे
हीच लेक कालांतरानं आई होऊ लागते.
आईची आई होतानाचे मुलींच्या आयुष्यातले हे अत्यंत महत्वाचं वळण जगताना उच्च कोटीची सहनशीलता परमेश्वर आपोआपच अंगी देतो. धरलं तर चावतय सोडलं तर पळतंय अस होतं मुलीच आयुष्य. उतार वयातल्या आईचे कोणाही समोर काही बोलणे वागणे जेव्हा होते तेव्हा तिची बाजू सावरताना होणारी भंभेरी वर्णन करणे जगातली अश्यक्य गोष्टच आहे. हि आधी अशी नव्हती हे ती मुलगी सतत सिद्ध करू पाहू लागते. आपल्या आईला समोरचे काय म्हणतील? तीचं बोलणं वागणं कसं घेतील? तिला जे म्हणायचं तेच समजतील का? याची सिद्धता करतानाची आईची आई होतानाची लेक फार फार घामाघूम असते. "अस नसतं आई अगं " ... हे सांगताना तिला तिच्यावर ओरडावे लागतेच. यावरच त्याच दुसऱ्या क्षणी भयंकर काहूरही मनात माजते ते मात्र पाहायला कोणीच नसते. आई असतानाचा समंजस पणा, ती समोरच्याशी पारखून बोलायची वृत्ती असणारी आई आणि हि आताची आई बराच फरक असतो. अस बोलून तूच वाईट किंवा चुकीची दिसतेयस हि गोष्ट काही केल्या तिला समजत नाही. तिला त्याची गरजच नसते. यावर आजूबाजूचे अचानक "का ग आईला असं म्हणतेस?"  म्हणत दुजोरा देणारे तर काळकूट विषाचे नमुनेच वाटतात तेव्हा. भिजलेला स्पंज पिळला कि कसा दिसेल तसे आतडे पिळवटून जाते तेव्हा पण त्यास कोणीही बघायला नसतेच.  पण यावर उपाय नाही. आईची आई होताना हे मी बऱ्याच मुलींना बघितले आहे कि तेव्हा अचानक पोटची लेक आईला आगाऊ आहे असे वाटू लागलेलं असते. हसू नका खरय हे. या वयात तिला "हे तुला सांगतेय कारण तू तिथे गडबड करशील. आधीच कोणास बोलू नको " असे सांगणे तर महा धोक्याचे असते. कारण सगळं सोडून तेच नेमके सर्वाना सांगून झालेले असते. आईला जगात सर्वानी नीट जोखावे यासाठीच हा आईची आई होतानाचा सर्वच मुलींचा प्रयत्न ९९ टक्के फसलेलाच असतो.  असे जेव्हा होते तेव्हा मी तरी मनापासून खळखळून हसलेली मला आता आठवते आहे. लोकांसमोर व्यक्त होणारी आताची वयस्क आई आणि तिला जोखणारे समोरचे पाहून होणारी आताच्या मुलीची मनातली खळबळ ती मुलगीच जाणो. ती उकळत्या पाण्यासारखी मनाची स्थिती त्या परिस्थितीतली मुलगीच फक्त समजू शकेल. 
आईची आई होतानाचे हे वळणं सगळ्याच मुलींना कठीण असेल असे नाही पण सहज सुकर असेल हे पण नक्कीच नाही. वयाच्या मोठ्या टप्प्यावर असतानाच्या आईची आई होणे हे फार फार जोखमीचे काम आहे रे बाबा. यावर उपाय एकच शांतीस धरणे. जगाचे ताशेरे दुर्लक्ष करून स्मितहास्यात सर्वाना सामोरे जाणे.  आता मुद्दा हा कि असे त्या वयातल्या आईला का होत असेल किंवा का वाटत असेल? बुद्धी ज्या प्रमाणात कार्यान्वयीत असेल त्यावर हे असावे. स्मरणशक्ती आणि बुद्धीचा समन्वय असेल तर या गोष्टी कमी होत असाव्यात. पण एकंदरच या वयात तीन प्रकारची भीती मनात येत असावी. एक माझं करायची वेळ आली तर कोण असेल ना? माझ्यासाठी मी जपलेली माणसं वेळ पडली तर तितक्याच संवेदनशीलतेने सहकार्य करतील ना? मी केलेलं माझ्यावर वेळ आली तर विसरणार तर नाहीत ना? यासगळ्यासाठी या वयात कदाचित मन ते सतत सिद्ध करू पाहत. काळाची गरज असेलही ती. म्हणूनच मगाशी म्हटलं कि बुद्धी आणि स्मरणशक्तीच्या समन्वयावरच हे जे काही वाटणं आहे ते अवलंबून असावं. जगात आपलं असं कोणी आहे हि भावना किती मौल्यवान आहे हे या नात्यात दिसतं. आहे तोवर भूतलावर हा या आई टू आई नात्याचा आनंद घ्यायचा मग काय तर काळान सयोर हाडामासाची आई दाखवलीय तोवरच हे मग काय आठवणीच तर असणारेत.
एकंदरच एका मुलीचं आयुष्य मुलगी ते आई / सासू जे काही असेल तोवर अनेकानेक गुंतागुंतीच्या जबाबदाऱ्यां युक्त तसेच मल्टि टास्किंग (हो ईकडे मराठी शब्द सापडेचना)असतेच असते. हे मात्र खरे!
सौ. गौरी पाठक 
९९७०१६८०१४
१२ मे २०२६

Sunday, 17 May 2026

विषय

काहूर

आधीच ठरल होतं सगळं तो आज येणार होता. खरतर सकाळीच येऊन थबकण अपेक्षित होतं. काय झालं असेल? तस पाठवणारी व्यक्ती वेळेची पक्की आहे आणि तो येणार म्हणून मी पण खुप खुप ऊत्सुक होते सकाळपासून.
तो आला की दिवसभर त्याला कसा वेळ देऊ ? कसा असेल तो?  आपण वाट बघत असलेल कोणी आल नाही की काहूर माजतं मनात. मग मी ठरवल ही भावनाच लिहून काढू कारण एरवी ही भावना निर्माण होण अवघडच.
चाळीसेक जणींनी यांच्याबरोबर दंगा करायच योजलेल पण हा पठ्ठा आलाच नाही अजून.
अहो कोण म्हणून काय विचारताय? तोच तो विजयाताईचा "विषय".
२१ दिवस तो रोज येणार आहे आणि आमचा अधिकमास माधवांना अर्पित मोहून जाणार आहे तोच "तो - विषय!"

प्रतिक्षेतली..
गौरी पाठक 
१८ मे २०२६

Monday, 4 May 2026

लवली फिलींग

५ मे २०२६
आज अशा एका सासुचा वाढदिवस आहे जी घर आणि नोकरी दोन्हीत संतुलनात जगून पुढच्या पिढीच्या सुनांना आदर्श आहेत. माझी यांची खरी ओळख मे २०११ ची मुलाच्या मुंजीतली जवळपास १५-१६ वर्ष सहवास. तोवर मी नावापुरतच ओळखत होते. सणासुदीचे मेसेज करत होते तो नंबर होता पांढुर्णा पाठक ईतकच. मुंजीत खरी दोस्ती झाली कारण तेव्हाच आईंचा साठावा होता मी वाढदिवस शुभेच्छा पत्र मागवली होती. काकूंचा मनाचा मोठेपणा मी तेव्हा बघितला अनुभवला. त्यांच्या लग्नाच्या गप्पा, जगतानाचे चढ उतार खुप खुप मोकळ्या झालो. मला पण हक्काच मायेच स्थान मिळालं. माझ्या प्रत्येक यशात त्यांचे कौतुकाचे शब्द मला पोचतातच. एक गोष्ट खुप छान आहे त्यांची त्या परिवर्तनाला सामोर जायला सदैव तत्पर असतात. आहे त्या परिस्थितीत जुळवून घेण कस जमवायच हे मी त्यांच्यात नेहमीच बघत आलेय.
एक गोष्ट त्यांची भारीय ती म्हणजे कोणत्याही लवाजम्याच्या कामाच्या ठिकाणी म्हणजे लग्न मुंज अस काहीही असलेल्या ठिकाणी मग भरल घर म्हणा कार्यालयातली गडबड म्हणा त्या चुमडीत उठून आंघोळ कपडे आवरून एकदम तयार आसतात. आणि यजमान घरी म्हणतात सांगा काय काम आता करायचय मी तयार आहे. तोवर ईतर आम्ही कुठ न्हाऊ? कुठ आवरू? आधी काय करायच? कोण आधी जातय ? यातच तोवर सौ. वंदना काकु साडी नेसून तयार, कपडे आवरून बॅग बिग आवरून रेडी. काही मिळालं नाहीचा बाऊ नाही की कुठं पसारा नाही की कुठं गाजावाजा नाही कशाचाच!
आपल्यासारखीच नोकरी-घर सांभाळून जगणार्या  मोठ्या जावेच कौतुक असणारी ही धाकटी जाऊ मनानं मोठी आणि धैर्यवान म्हटली पाहिजे.
मला कौतुक वाटलेली आणखी एक गोष्ट - त्यांच्या मुलांच्या लग्नात मी गेलेले तेव्हा त्यांनी प्रचंड गडबडीत असूनही मला त्यांच्या ऑफिसमधल्या सहसाधीका मैत्रिणीची भेट करवली होती. तूच समजू शकतेस ही मैत्रिण मला किती मोलाची आहे म्हणून मला तीला तुला भेटवायच होतं.
आज वंदना काकुचा वाढदिवस म्हटल चला जरा माणसं वाचुया. मग मन श्रीमंतीची मोजदाद पाहून सुखावतं. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार वंदना काकु!
तुमचीच सौ. गौरी 
++++++
२७ एप्रिल २०२६
आज मी साठ वर्षे पूर्ण सुखासमाधानाने घालवलेल्या व्यक्ती बरोबर आमचा २५ वर्ष मैत्रीचा दिवस साजरा करतेय. कळल नाही ना? थांबा सांगते.  ही आमची नीलूताई आज तीला ६० वर्ष पूर्ण होत आहेत आणि आमची ओळख २५ वर्षांपूर्वी माझ्या लग्नात झाली म्हणून आमचा २५ वा मैत्री दिवस! आहे की नाही मजा. खरतर ही नणंद कमी आणि सखीच जास्त होती. घरातल्या प्रत्येकाच्या स्वभावाचे पैलू सांगत तीनं मला कधी आपलसं केलं कळलच नाही. आज खुप छान वाटल जेव्हा विचार आला की एका ६० पूर्ण करत असणार्याच्या आयुष्यातली आपण २५ वर्ष त्याला ओळखतोय! खुपच वेगळी अनुभूती, असो. या व्यक्तीनं आम्हा भावजयांना सासरच्या गराड्यात कधीच तिराईत भासू दिलं नाही. नीटनेटक राहायची  फार आवड असणारी, भावांवर जीव ओवाळून टाकणारी, घरासाठी खंबीर ऊभी राहणारी, कौतुकानं खाऊ घालणारी, वेळ आली तर तडफदार बोलणारी पण फणसासारखी अशी ही खुप प्रेमळ आणि हक्काची आहे.  ताई माहेरवाशीण म्हणून घरी आल्यावर ओटी भरल्याखेरीज मी कधीच जाऊ दिलेल नाही. ती आमची जुळलेली वेगळीच नाळच म्हणा हवं तर! लहानपण हट्ट करत मामा मामींकडून लाड पुरवत घालवलेली ही नीलू -  मामींच्या तोंडी (आईंच्या) नेहमीच असते. मी तीला तीच्या अरुणा मामींच्या आठवणींतून नेहमीच बघत आलेय आणि येतेय. आज २००१ सालच्या पुतण्याच्या मुंजीपासून ते २०२५ मधल्या आई बाबांच्या कार्यक्रमातला तीच्याबरोबरचा सगळा काळ आठवला. दिवस जात राहतील आम्ही पण वयान मोठ्या होऊ पण या सुंदर आठवणी हृदयाच्या कुपीतच राहतील.  माहेरवाशीण म्हणून ये, रहा आणि ओटी भरू दे हे आमंत्रण ताई तुला कायमचच बरं का! आजच्या तुझ्या सुंदर दिवसासाठी तुला अनंत शुभेच्छा व नमस्कार आणि मिठी २५ व्या मैत्री दिवसासाठी!
तुझीच गौरी
+++++++
९ एप्रिल २०२६
माझ्या आयुष्यातील २०१० मधला ट्वीनस डेचा हा आमचा हा फोटो.  खर वाटणार नाही आमच एकमेकींच मोजुन दोन महिन्यांत जे सुत जुळलं तेआज १९-२० वर्ष जवळजवळ आहे तस्सच आहे. मागची दोन वर्ष आम्ही रोज भेटण शक्य नसल तरी ते आहे तसच आहे. आज मिताला ५८ वर्ष सुरू झालं पण ती आजही ४० शीच वाटते मला.
गरजेपेक्षा ईतरांचा विचार जास्त करणारी, कोणाच्या कोणी केलेला पदार्थ त्याची कृती लक्षात ठेवणारी, घरातल्या  मुंग्याना छोटा ढीग साखर उंबरठ्यावर ठेवणारी, जगातलं कोणी येऊ दे गरम करून वाढायची कायम तयारी असणारी, मनातल दु:ख कधीही डोळ्यांच्या किनारीवरही दिसू न देणारी, माझ्या फुसक्या सहलीचे फोटोही दुसर्या दिवशी तितक्याच तन्मयतेनं पाहणारी, कामाला दैवत मानणारी, आद्ध्यात्माची आवड असणारी मिता मला अशीच अखंड ९० पर्यंत पाहायची आहे. हो जाऊ ना आम्ही तेव्हाही ९०-८०च्या असू तरी विष्णू जी की रसोईला. तीच्या माझ्या आयुष्यातील ही १९-२० वर्ष आमच्या आयुष्यातील चंगळ होती. ती सोबत होती तेव्हा तीला बघून बघून मी पण अनेक गोष्टीत तयार झाले ती अजुन  काही गोष्टीत मात्र मला बघून तयार होण बाकी आहे. तीला वाढदिवसाच्या अमोघ शुभेच्छा आणि पापी😘 
तुझीच गौरी
++++
७ एप्रिल २०२६
सुप्रभात! 
ही माझ्या आयुष्यातील बालपणीचा काळ कसा सुखद होता हे सांगणारी आणि त्यात सहभागी असणारी व्यक्ती - छाया काकू! कायम हसतमुख, आल्या गेल्या सगळ्यांच कायम स्वागत करणारी, जे घरात असेल ते मायेन खाऊ घालणारी, इतरांपेक्षा जरा कमी चपळ पण त्याची तमा न बाळगता सतत सतत घरासाठी कष्ट करणारी, आहे त्यात मन:पूर्वक समाधानी राहून जगणारी अशी माझी काकु खुप मायाळु तर आहेच पण ती आजही माझ्यासाठी तश्शीच आहे. मी माॅन्टेसरीत असताना भावे प्राथमिक शाळेत सोडायला येणारी काकू ते कालपर्यंतची म्हणजे तीच्या पुतणीच्या मुलाच्या मुंजीत गेटपर्यंत बरोबर चालत येणारी काकु आहे तशीच आहे. खरतर मला तेव्हाच हा प्रवास आठवला होता..
काहीवेळा आपण सुद्धा खुप काही करतो, जे फार मोलाच असत पण जगात त्याची ऊचल किंवा दखल घेतली जात नाही, झाकोळलं राहत एखादं व्यक्तिमत्त्व पण तस असल तरी त्याचीही दखल घ्यायची गरज न वाटणारं अथवा त्याची गरजच नाही असा विचार करणारी निर्मळ अशी ही खरच मोलाचा साथीदार होती माझ्या काकाची... माझ्या आदराच्या माणसांच्या सूचीत ही कायमच असतेच असते. काकानंतर माझ तीच्याकडे जाणं तस कमी झालय ती बरेचदा घरी नसते. मला वाटल की मी काकाकडे जाऊन तीला भेटण आता शक्य होत नाही. पण मला आनंदच आहे कारण ती आता मस्त फिरतेय, ट्रीप करते, आनंदी राहते. तीचा आजी आजोबा गट भन्नाट आहे. भारीच वाटत मी भेटते त्यांना आणि त्यांच्या प्रवासाच्या कथा ऐकायचा ग्राहकही बनते. हे कान्हाजी माझ्या लहानपणच्या चंदेरी पानावरच्या या सोनेरी माणसाचा आशिर्वादाचा हात मला अनंतकाल लाभावा.
छायाकाकूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि नमस्कार 🫂
तुझीच (चप्पल शेणात भरली म्हणून ती तिथच सोडून एकच चप्पल घालून घरी येणारी आणि हे अस केल म्हणून मला बघून पोट धरून हसणार्या छायाकाकूची लाडकी)
गौरी
++++++
२७ मार्च २०२६
प्रिय कान्हाजींना माझा नमस्कार 
मला या भूतलावर येऊन ईकडच सौंदर्य पाहण विविध नात्यांमधील प्रेम अनुभवणं यासाठी जन्म देणाऱ्या म्हणजेच माध्यम असणाऱ्या आईला अनेक धन्यवाद.आज आईची वयाची ७० वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्या कळत्या वयापासून ते आत्तापर्यंत म्हणजे जवळपास ४० वर्ष मी तीला सतत काहीना काही करतानाच बघत आले आहे. बाबांसारखी आद्ध्यात्माची गोडी पण माझ्यात हीच्याच मुळे आली आहे. आपल्या मुलींनी स्वतःच्या पायावर ऊभं राहायला शिकावं यासाठीची तीची धडपड आम्हाला मोलाची शिकवण होती. त्या सवयीमुळे आजही मी खंबीरपणे ऊभी आहे. आई... ती स्पष्टवक्ती आहे. भरभरून करण्याची, देण्याची दानत तीच्यामधे आहे. ती स्वावलंबी आहेच पण खमकेपणा आणि सतत कोणाला न कोणाला काहीतरी नोंद दाखवणे या गोष्टींवर ती बाबांच्या माघारी स्वतः च स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करून ऊभी आहे. खरतर सहज कोणाला समजेल अस व्यक्तीमत्व अजिबात नाही. त्यामुळे दरवेळी ती वेगळी वाटणं साहजिकच आहे. बाबांच्या आठवणी आम्ही दोघी व ती माझ्या पूर्ण माहेरची चौकट आहे. माझ्या चौकटीच्या या टोकावर लक्ष ठेवा कान्हाजी.
आईला वयाच्या सत्तर वर्ष पूर्तीच्या अनंत शुभेच्छा आणि माझा मन:पूर्वक नमस्कार 🙏🏻
सौ. गौरी पाठक