नवरात्रीचे नऊ दिवस आयुष्यातली स्त्रीरूपातली नऊ तत्व आठवली ती कागदावर उतरवली. तेव्हाच मनात विचार आला होता की पुरुष पण बरेच मोलाचे काम करतात त्यांच कर्तृत्व उजागर होत नाही.
मी मनापासून नमन करते, आठवते, मानते असे निदान नऊ तरी बाबा लोक / पुरूष तत्वं नोंद करू शकते का ? विचार सुरू झालेला. लगेच रात्रीच नोट्स मध्ये नोंदी सुरु केल्या. यादी तयार होत होती पण सविस्तर लिखाण काही झालं नव्हतं. नुसतं मनात होत. आज अष्टमी माझ्या आप्पा काकाचा आणि या दिवसाचा माझा खूप घनिष्ठ संबंध. मग काय खाल्ली उचल काढलं लिहून. काही काही विचार केला नाही फक्त रीती झाले.
---
१) बोरकर काका
बाबांचे अगदी जवळचे दोस्त बोरकर काका. तसं बाबांचे खूप खास दोस्त खूप खूप कमी होते. बाबांचा फॅन क्लब मात्र खूप होता. दोनच व्यक्ती दोस्त म्हणून मला आठवतात एकांच नाव आठवत नाही चेहरा मात्र लक्षात आहे आणि हे दुसरे बोरकर काका. आज बाबा गेल्यानंतरही ते त्याच हक्कानं बरोब्बर ठराविक वेळेला फोन करतात. अजूनही बाबांच्या गेल्याच्या तारखेला भरभरून आठवण आली ग दिलीपची म्हणून मन मोकळं करतात त्यांचंही आणि माझही होतं.. माणूस जिवंत असताना वाढदिवस लक्षात ठेवतो आपण पण तो नसतानाचा तो हृदयदारक दिवस लक्षात ठेवून त्या दिवशी आठवण काढणारा हा त्यांचा मित्र माझ्यासाठी बहुमूल्य आहे. भारत पाकिस्तान क्रिकेटची मॅच जिंकली कि ते फोन करतात. आज दिलीप असता तर जल्लोष साजरा केला असता. निवडणूक झाल्या कि भाजप तसेच आर एस एस च काही असल कि हमखास त्यांना बाबांची आठवण येते. दिलीप आज असता ना गौरी मोदींचा फोटो डोक्यावर घेऊन नाचला असता, आज मोदींच ७५ वर्ष आपला दिलीप पण आज इतकाच असता. दिलीप अस म्हटला असता दिलीप तस म्हटला असता. काय नातं ना मैत्रीचं गाढ. दोस्त हयात नसताना पण आठवणीनं व्याकुळ होणार जिगरी माणूस बाबानी कमावला. असा हे सदाबहार व्यक्तिमत्व! दहा बाय दहाच्या खोलीत ४-५ मुलांचं कुटुंब, त्यात आई, आला गेला सगळं पाहत नोकरी करून उरलेला वेळ रिक्षा चालवत घरात सुबत्ता नांदवणारा, अत्यंत मेहनती खरंच कुठून आली असेल या पिढीला इतकी शक्ती. आज १३ वर्ष बाबा दिवस आला कि मी मुद्दाम काकांना फोन करते. जुन्या आठवणी उजाळा मिळतो. काका न चुकता सणाला शुभेच्छांचा फोन करतात जो मला काही अजूनही जमत नाही. त्यांच्या मनातला दिलीप दोस्तीच्या टॅग मधला खूप मस्त आहे. कान्हजी काकांना आरोग्य संपन्न आयुष्य प्रादन करो.
२) आप्पा काका
आज अष्टमी आप्पा काकाला मी बघिलेलं बोललेलं मायेचा ओलावा अनुभवलेला शेवटचा दिवस. नंतर तो नसेल असं वाटलंच नव्हतं. तसा हा कडक आणि तापट दिसणारा पण प्रत्यक्षात अत्यंत प्रेमळ. कोणी काहीही केलं कसाही वागलं तरी तो इतका सकारात्मक होता कि जाऊ दे गौरी दे सोडून कुठं विचार करून त्रास करायचा हेच आणि फक्त हेच सांगायचं. तुला अध्यात्माची आवड आहे ती सोडू नको तीच कायम कामी येते. आयुष्यात तीच कृती बळ देत असते. देवाचं रोज म्हणायला जमल नाही तरी जमेल तसे करत राहा. पोथी वाचायचा मार्ग सोडू नको. तू आहेस ती खूप छान आहेस तुझा आवडता मार्ग, वागण्याची पद्धत जगाच्या लेखी कशी ते पाहू नको आहे तशीच राहा. मी याचा चांगला अनुभव घेतला आहे. सगळ्यांना धरून राहायची सवय खूप चांगली. तू आलीस कि खूप बर वाटत. तो पोथी खूप मोठं मोठ्यानं वाचायचा, सगळं घर तेव्हा शांत हव असायचं. इतरांना तो हातवारे करून कुजबुज केली कि रोखायचा. काय हा असा वाच कि तुझं तुझं असा आम्हाला वाटायचं. हल्ली हल्ली मलाही जाणवत कि मी पोथी वाचताना जर कोणी आवाज केला, कुजबुजला कि माझा पण पोथीचा आवाज वाढतो. हे जेव्हा होता ना तेव्हा मी मनात खूप हसते. आप्पाला एकदम कडक इस्त्रीचे कपडे आवडायचे. चपचपीत तेल आणि भांग पाडणे म्हणजे आवरणे हा त्याचा फंडा होता. भारी होता तो. माझे बाबा भाऊ आणि तो आप्पा! नवरात्रीतल्या अष्टमीला त्याचा विचार आजही माझ्या मनात काहूर माजवतो. त्याला माझा मनापासून नमस्कार.
३) आप्पा बामगुडे
बामगुडे आप्पा हे एक बहारदार व्यक्तिमत्व होतं. काय शाही जगायचे ते, मुंबईत राहायला छोट्याश्या चाळीतल्या छोट्याश्या दोन खोल्यातच. पण राहणीमान एकदम शाही, म्हणजे मनाने दिलदार, कधीही आले ना घरी कि दमदार आवाजात मुंबईच्या भाषेत बोलायचे. एक शब्द आहे तो फार आवडायचा मला : बाबु. अशी आम्हाला हाक मारणार कोणी नव्हतंच. खूप खूप आपुलकी असायची त्या शब्दात. ओतप्रोत माया असायची त्या शब्दात. आमच्या बाबांवर खूप जीव होता. दोघे साडू मनानं खूप मोठे होते. अशी दिलदार जोडी मी फोटोत टिपलेली आहे. घरात पाच मुलांचं करून गावाचं मोठं खाटलं पण आपलं समजून सांभाळायचे. गावाला जायचं असल कि पुण्यात येत आणि न चुकता दिलीपरावांना भेटून जात. बामगुडे आप्पा जगाला सामावून घेण्याच्या वृत्तीचे होते. आमच्या घरी जे वाढू दे जेवायचे कधीही कुरकुर नसायची. कर्तृत्वान माणसाच्या नेहेमी पाठीशी असायचे. नीट राहायचं बारका ग बायांनो! असा आम्हा दोघीना नेहेमी म्हणायचे. मी खेड्यातला तुम्ही सरकारी कामातलं पण पोरांना खूप शिकवायचं दिलीप राव. त्यांना काही कमी पडलं नाही पाहिजे. यावर दोघे एकमत असल्यानं खूप गप्पा होत असत. माहिमचा हलवा त्यांच्यामुळे मला ठाऊक झाला. अश्या दिलदार कष्टकरी सतत कोणासाठी काहीतरी करायची धडपड असणाऱ्या बामगुडे आप्पाना माझा मनापासून नमस्कार.
४) आप्पा भांडवलकर
भांडवलकर आप्पा हे माझ्या माहेरचे शेजारी. कायम तंबाखू तोंडांत. त्यांना बोललेलं ऐकलं ते खूप खुप कमी. कमालीचे शांत होते. घरात पाच मुलं, दुसरी बायको आक्रमक वृत्तीची, (परिस्थिती माणसाला तसे बनवते हे अक्कल आली तेव्हा समजलं ) आधीच्या बायकोचा एक मुलगा तो पण सांगू ते तसच करणारा सद्गुणी. ते सगळं सांभाळून घेत जगायचे. एवढ्या मोठ्या कुटुंबात कधीही आप्पांचा आवाज आलेलं आम्हाला कोणालाही आठवत नाही. आप्पा कामावरून आले कि मुलं पिशवीत काय आणलाय बघायला धावत असायची. आप्पांचा पेहराव म्हणजे जुनी मळकी बंडी, तिला पोटावर दोन खिशे, उभा चेहरा कायम, तंबाखूचा तोबरा आणि पांढरा पायजमा. त्यांच्याकडे बघून नेहेमी वाटायचं कस भागवत असतील हे एवढं कुटुंब ते पण विविधतेतलं. जमवून घेणं खूप खूप कठीण असत. आप्पाना ती कला खूप छान जमे. काहीही असल तरी सण मात्र दणक्यात साजरे होत त्यांचे. अनेक वर्ष झाली त्यांच्या परिवाराशी संबंध नाही. पण कायम आहे त्या परिस्थितीत आनंदी असणारे भांडवलकर आप्पा कायम लक्षात आहेत.
५) बाबा : दिलीप भालचंद्र घाणेकर.
लहानपणापासून आईच्या हातच सुग्रास जेवत आलेले, आईच्या माहेरच्या गोतावळ्यात रमणारे, आईच आजारपण असल्यामुळे घरासाठी कष्ट करणारे, परिवारासाठी नातेवाईकांनसाठी जीव टाकणारे आई वडिल पाहात मोठे झालेले बाबा. कमालीचे हळवे होते. लहान वयात कष्ट करून मोठेपणा अंगावर आलेला, भावांच भरभरून प्रेम लाभलेला मातृभक्त माणूस!
अत्यंत प्रामाणिक आणि आध्यात्मिक असा यांचा समाजातला वावर, कोणाचही मन आपलेपणान वेधून घेत असे. ते फार वेगळे होते कायम आणि कायमच काहीही केल तरी एकच विचार आधी यायचा त्यांना की जे करतोय त्याचा ईतरांना त्रास तर नाही ना होणार. अशी माणस खुप कमी असतात. त्यांची सुखाची व्याख्या खुप वेगळी होती. कोणी कसही वागो आपण आपल्या परीन सगळ्यांचच जास्तीत जास्त चांगल करायच गौरी. ही खुप मोलाची गुरूकिल्ली त्यांनी आम्हाला दिली आहे. त्यांच्या पुण्याईन आयुष्यात लाख मोलाची माणस लाभली. या बाप माणसाला माझा सलाम! आणि घट्ट मिठी.....
६) साठे सर
आपल्याला ज्या गोष्टी केल्यान समाधान वाटत त्या सातत्यान करत राहायची इच्छा असते. तेव्हा त्या सुसूत्रतेन कशा करायच्या याला कोणीतरी मनाला पटून समजवेल अशी व्यक्ती लाभावी लागते. यासाठी मला लाभलेले हे साठे सर.
वागताना शिस्तीच पण मिश्किल अस गुरूच व्यक्तिमत्त्व. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी कस शोधून ते जगतील यावर भर त्यांचा. हे माझे कोणत्या विषयाचे गुरूजी हे महत्वाच नाही तर विद्यार्थी सराव आणि सातत्या वापरून ठोकुन पुढ गेला पाहिजे असा हा हाडाचा शिक्षक.
एक शिक्षक म्हटल की आदरयुक्त भिती ही असतेच पण मला ते मनापासून आठवणीत राहतील आणि राहतात. कारण जो अभ्यास मला करायचा होता तो शिकताना मी ईतकी पद्धतशीर आणि तपशीलवार शिकु, वागु आणि जगु शकले आणि शकतेय हे फक्त आणि फक्त यांच्या च मुळे. सुरवातीपासुनच अध्ययनातच्या पद्धतीच्या नियमांचा काटेकोरपणा ईतका मस्त मनावर कोरला ना यांनी मी यासाठी यांची शतश: आभारी आहे. असे बाप माणूस शिक्षक लाभण भाग्यच!
७) अक्षय शहापूरकर सर
आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर योग्य वेळी योग्य गुरु लाभण नशिबच लागतं. रांगोळी काढण्याची मनातली सुप्त ईच्छा मी जशी जमेल तशी काढुन मनान सुखावत असतानाच अक्षय सरांच गुरूंबद्दलच्या रांगोळी च प्रदर्शन बघण्यात आलं. झाल की ठरवलच या बहुमूल्य कलाकाराकडून ही कला शिकण्याची मनातून तीव्र इच्छा पुरी करायचीच.
पहिल्याच दिवशी वर्गात सरांनी मन बुद्धी दोन्ही भारावून टाकलं. इंजिनिअर असूनही ऊत्तम आध्यात्मिक बैठक आणि वैश्णवपंथी भक्तीची सुंदर झालर त्यात सामाजिक जबाबदारी च भान अस सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व कलेचा गुरू म्हणून लाभलं. हाताच्या बोटानी रांगोळी कशी धरायची त्याबरोबर आद्ध्यात्माचही बोट कसं धरायच गरजेच हे शिकले सरांकडून. चालत बोलत माणुस रांगोळीतून ऊभ करणारे हे सर अतिशय प्रगल्भ आहेत. काय काय शिकायच यांच्याकडून, अबब!
रांगोळी ची पहिली लेवल केली त्यानंतर पुढच अजुन झाल नाही पण रांगोळीतून जग बघायला शिकले. अक्षय सरांच्या विविध कलाना पाहुन वाटत की ठरवल तर मानव काहीही शिकू शकतो. माझ्या कलेच्या गुरूना आदराचा नमस्कार.
८) आपटे काका
नागावच्या वाडीचे हे मालक. नागावच्या समुद्र किनार्यालगतची यांची छोटीशीच वाडी, दोन दोन खोल्या अशी चार घरं लागुन लागुन, मोठ्ठं स्वयंपाकघर आणि समोर व्हरांडा. बाह्याचा पांढरा बनीयन आणि हिरवे निळे पट्टे असलेली हाफ पॅन्ट ऊर्फ विजार.
दिवसभर वाडीच काम करणारे हे दमलेले मी कधीच बघितले नाहीत. घरातल्या सहा कुंड्या आवरून ठेवताना माझी ओढाताण होते, आवडीनच करते मी प्रश्नच नाही पण मी दमते आणि हे एवढी वाडी आवरणारे काय मेहनत ती! आमची सुट्टी वाडीत मस्त जात असे. ते आजही लक्षात आहेत ते त्यांच्या वाडीतल्या अफाट कष्टामुळेच. त्यांच्या सारखा स्टॅमिना हवा.
९) गायधनी आजोबा
पूर्वी पोस्टाच सेव्हिंग करायचा कल जास्त होता. तेव्हा हे गायधनी वय वर्षे ७९ - ८० आमच्या ऑफिस मधे यायचे. दरमहा पोस्टाच रीकरींग नेणे नवी योजना सांगणे. नंतर ते म्युच्युअल फंड च पण सजेस्ट करायचे. २००६-७ साली मला पण पकडलेल बचत का आणि कशी करण गरजेच आहे. मला वाटायच पगार तो किती बचत काय होणार त्यात. पण ते म्हणत पगाराचे ५% गुंतवणूक करायची सवय लाव तर ती हळूहळू १०-१५% पर्यंत करण्याची सवय लागते. मी फक्त हसुन हो म्हणायची.
एकदा करच १०००.०० च तरी गौरी तू पण, या म्युच्युअल फंडमधे आग्रह धरला. माझा अनुभव आहे की याचे दोन वर्षांत चांगले रीटर्न येणार. सगळ्यांनी केल कुणी १००००.००, २००००.००, ५००००.००. मला १०००.०० गुंतव म्हटले मी ठिक म्हटलं आणि गुतवले. दोन वर्षानंतर गायधनी आले आणि चक्क १०००.०० चे २२००.०० झालेत अस सांगितल. अचानक समोर आलेलं हे फार मस्त वाटलं. बचतीच महत्व पटलं. आपुलकीन सगळ्यांना ते बचतीच सांगायचे. त्यांच वय पाहता कौतुक वाटायचं. कोरोनाच्या आसपास वय वर्षे ९५ असतानाच ते जगात नसल्याच समजलेलं.
बचतीची सवय लाऊन महत्व पटून देणारे गायधनी कायम स्मरणात राहतील.
आयुष्यात येणाऱ्या सर्व बाप लोकांना आज नमस्कार
जय श्रीकृष्ण
गौरी पाठक
९९७०१६८०१४
खूप छान आणि सुंदर वर्णन गौरी. माझ्या आप्पांचे वर्णन केल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद 🫶🫶
ReplyDeleteकान्हाजींची ईच्छा
Deleteअतिशय छान लेख आहे - सुजय सातपुते
ReplyDeleteजय श्रीकृष्ण
DeleteBahot hi sunder avismarniya❤️
ReplyDeleteधन्यवाद
Delete