Thursday 24 June 2021

लहानपणची आठवण आमचा वाडा!

वाडा म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे वेगवेगळी  कल्पना येते. आमचा वाडा म्हणजे मांगल्य होता. मुलांच्या खळखळाट  हास्यानी भरलेला, शेजारणीच्या घरात सहज ये-जा असणार्या बायकांनी गजबजलेला, एकमेकांच्या मायेनी जोडलेला दुवाच होता. हमरस्ता शिवाजी रस्त्यावर शुक्रवार पेठेतला आमचा हा वाडा, बाहेरून चिरेबंदी कडी कोयंडा दार असलेला. नवख्याला बाहेरून आतली कडी कधी ऊघडता न येणारा, आम्ही  मात्र यात तरबेज होतो.
दारातुन आत आल की एक मोठी काळ्या पाषाणाची एकसंध दगडाची पायरी होती. ऊजवीकडे मिटर होते डावीकडे अंधारी जीना. सांगितल तरच समजणारा. बोळ संपुन पुढं आली की मस्त बंदिस्त अंगण, आजकालच्या भाषेतलं फोर्च सारखं. वर चारी बाजुंनी घराच्या खिडक्या, पदार्थांची देवाण घेवाणही बायकांची होत असे. तिकडे एक मोरी होती. डावीकडे किराणामालाच्या दुकानाची आतली बाजु होती; सरळ पुढं आलं की डावी ऊजवीकडे घरं होती, आहेत अजुनही. या अंगणात लहानपणचे खेळ रंगायचे, मेंदी लावणे, रात्री जेवल की गप्पा मारणे ईकडेच असायचं. ऊजवीकडे जीना वर आमच घर वन रून किचनमधे बावीस वर्ष छान गेली. तशी आठेक बिर्हाडंच होतो पण मजा यायची. मधे परत दोन खोल्या नंतर आमच मागचं अंगण. डावीकडे मोठ्ठी मोरी आहे. सकाळी सगळ्यांचा कामाचा कलकलाट असे ईकडे. नळावरची भांडणं रंगायची. जवळच मोठी विहीर होती, बुजवली नंतर ती. संध्याकाळी  भकास वाटणारं अंगण पण दिवसभर चेहेल पेहेलच. अंगणात कापसाचं, ऊंबराचं, आंब्याच झाड होतं. याच अंगणात होळी पेटवायचो. 
ऊन्हाळ्याच्या सुटीत हे अंगण अड्डाच असायचा. कोण पत्ते खेळायचे, कोणी भांडीकुंडी तर कोणी प्लॅस्टीकचा कॅरम. तेव्हा विश्व मय्यादीत होतं, पण एकोपा खुप होता. दिवाळीचे फराळ, पापड, नागपंचमीची मेहेंदी, रंगपंचमी सगळं एकत्र असायचं. सगळ्या बायका दुपारी कामं करायच्या. वर्कशाॅप भरल्या सारखं चित्र असायचं. कोणी ब्लाऊज शिवत, कोणी फाॅल पिको, तर कोणी ब्लाऊजला हातशिलाई. सुटीत आम्ही खरी कमाई करायचो. महिना संपला की पैसे मिळायचे मग सिनेमाला जायचो.
आमच्या वाड्यात आजुबाजुच्या वाड्यातली मुलं पण खेळायला येत, लेकुरवाळाच होता. लपाछपी, गोट्या, पत्ते, नवावव्यापार असे डाव रंगत. भिंतीवरच्या सावल्यांचे सिनेमे पण बहारदार वाटायचे. ते वाड्यातले माहेरपणाचे दिवस सोनेरीच होते. वाड्याच्या साक्षीन बरीच कार्य पार पडली. कार्य कोणाच असेना वाडाभर आनंद असायचा.
असा आमचा हा आठवणींचा खजिना वाडा मला कायम कायम आठवतो. आठवणीच्या या वास्तुला माझा मनापासुन नमस्कार आणि वाड्याच्या आठवणी सांगता आल्या म्हणुन या ग्रुपचे आभार!
सौ. गौरी पाठक (घाणेकर)

No comments:

Post a Comment