Monday, 29 September 2025

९ स्त्रीयांमधील स्त्री तत्वांचा अनुभव आणि आभार

स्त्री तत्वाचा जागर, 
नवरात्र निमित्त आभार व्यक्त करण्यासाठी.

वर्षभर मी परमेश्वर कृपेने काही ना काही विविध विषयांवर वाचत आलेय, त्यातुन हे सुचल. मनापासून वाटलं की या शारदीय नवरात्रात आपण आपल्या रोजच्या जीवनात आलेल्या खंबीर स्त्रीया आठवु विचार करू पाहुन. ज्यांना बघुन मला नेहमीच कौतुक वाटत आदर वाटत आलाय.

गेल्या २५-३० वर्षात पाहण्यात आलेल्या अशा ९ स्त्रीयांना नोंद करून त्यांच्यातील स्त्री तत्वाचे कौतुक आणि आभार मानु. काही ना काही कारणान मी काही ना काही या प्रत्येकी कडून शिकत आलेय. नकळत नोंद होत जाते. काही छान पाहिल की ते जस जमेल तस आपण जीवनात ऊतरवतो सुद्धा ते पण नकळत बरका!  सगळ्यांच असच असत, माझ फार काही वेगळ नाही.

मागच्या वर्षी पण असा एक उपक्रम मी माझ्यापुरता मर्यादित न ठेवता ईतर मैत्रिणींना पण सहभागी करत केला होता. यंदा मी माझ्या आयुष्यात आलेल्या २५-३० वर्षातल्या ९ जणींना आठवुन त्यांच्यातल्या स्त्री तत्वाचे आभार मानायच ठरवलं, म्हणून हा प्रपंच.

खर तर हे अवघड आहे कारण अशा अनेक कर्तृत्ववान 'स्त्री' शक्तीचा मला अनुभव आलेला आहे. तरी एक प्रयत्न करतेय त्यातल्या ९ समोर मांडण्याचा.

ॐ जगदंबा माता की जय ॐ
१) पंपावरची ताई : २२ सप्टेंबर २०२५
आज जवळजवळ २०-२२ वर्ष ऑफिसला जाताना पेट्रोल भरतानाची आमची ओळख. ओळख म्हणजे ती काय तर त्या हसणार मी मी हसणार, काय म्हणता? ईतकीच. ईतकी वर्ष सलग मी त्यांना मन लावून पंपावर काम करतात बघत आलेय. मला नेहमी वाटायच की  एवढाले तास सतत ऊभ राहून धुळीत काम करण तस कष्टाचच.  रोजच्या जीवनात हे काम करताना किती जुळवून जगाव लागत असेल ना यांना. पण या सगळ्यात असुनही सदा आनंदीच  बघत आलेय मी यांना. संयमान सहकार्यान समोरच्याशी हसुन या काम करताना दिसतात. 
आज खुप दिवसांनी आलात ?
पंप बदलला की काय?
अरे व्वा! नवीन गाडी मस्त. 
अरेच्चा! आज ऊशिरा कशा काय तुम्ही?
असे आमचे संवाद आणि ईतकाच संवाद. 
माणसान फक्तं हसुन दखल घेतली तरी ती दूर दूर संबंध नसला तरी आपली वाटतात. अशा या पंपावरच्या ताईंना मी परवा मी फोटो मागितला आणि पळतच निघत म्हटल नुसत की काहीतरी लिहायचय मला झाल की दाखवते. गोड हसत बरं बरं म्हणत विश्वासान तो त्यांनी काढु दिला. मी त्यांची आभारी आहे. आज नवरात्रीच्या पहिल्या माळेला मी त्यांच्यातील स्त्री तत्वाचं कौतुक करते आणि आभार मानते.
२) रेखा काकु सातपुते. २३ सप्टेंबर २०२५
मटार करंजी म्हटल की रेखा काकुच बाकी सगळे गौण, हा माझाच नाही तर आमच्या घरच्यांचा, आप्तेष्टांचा मित्र मंडळींचा विचार. खर सांगायच तर रेखा काकुना मी लग्नाच्या आधीपासून ओळखते. गोऱ्यापान, मोठ्ठ कुंकु नीटनेटकी मस्त साडी. त्यांना सतत स्वयंपाकघरात ऊत्तम पदार्थ करताना पाहून वाटायच एवढ काम करून चेहऱ्यावर दमल्याचा मागमूसही नसतो. त्या वयात याचं आश्चर्य ही वाटायचं.
रेखा काकुंनी कष्टानी लावलेलं सकाळच नाश्ता सेंटर, जे आम्ही सकाळी बरेचदा जाऊन चट्टा मट्टा करतो ते आज वटवृक्ष झालय. यंदाच २५ व वर्ष. अन्नपूर्णा रेखाकाकुनी कष्टानं हे तर ऊभ केलच पण माणसं पण खुप छान जोडली. या सेंटरच्या कामात लेकाचा पण काही वर्षांपासून सहभाग असतो. त्यांच मुलं सुना नातवंडांनी भरल घर बघुन आणखी छान वाटतं.
माणस जोडणं ही कला या पिढीलाच जास्त छान जमते जी आपण आत्मसात केली पाहिजे अस मला नेहमी वाटतं. काकूंचा मटार करंजी वर्क शॉप जो घरात चालतो तो मी पाहिलाय, एकदम पद्धतशीर आणि स्वच्छतेच काटेकोर पालन करत. काकु घरचं मुलांच पाहात हे सगळ करत ईथवर आल्याच मी जेव्हा पाहते तेव्हा कौतुक तर वाटतच पण आदरही वाटतो. त्या पिढीतील अशा सगळ्याच बायकांना मानलच पाहिजे. या नवरात्रात दुसऱ्या माळेला मी रेखा काकु मधल्या स्त्री तत्वांचे कौतुक करते आणि आभार मानते. 

३) वैशाली महाजन. २४ सप्टेंबर २०२५
आजुबाजुच्या सुंदरींना आणखी सुंदर ठेवणारी ही पार्लर चालवणारी वैशाली. राहणीमान एकदम टापटीप आणि माझ्यासारखी फोटो वेडी.
वैशाली ला मी २२-२३ वर्ष ओळखतेय. माझं सुंदर तजेल दिसणार व्यक्तीमत्व निखरण यात हीचा मोलाचा हात. आम्ही समवयस्क आणि समसुखी सुद्धा!  मला कायम तीच कौतुक वाटतं कारण लहानशा गावातुन शिकुन लग्न होऊन ही पुण्यात आली. गावातुन सौंदर्य प्रसाधन वापरून निखरून टाकण्याची कला घेऊन आलेली अशी ही. पुण्यात येऊन एकत्र कुटुंब सावरत स्वःताला या कलेत सिद्ध करत आज ती आमच्या आजूबाजूला फेमस झालीय. प्रत्येक ग्राहकाला योग्य सल्ला व वागणुक देणं, आलेल्या सगळ्याच स्त्रीयांना सुंदर करून सोडण आणि ते पण स्मितहास्यानी. वैशालीनी छान दिसतेय म्हटल की सगळ्या हूश्श करतात.
तुझे कामाचे पैसे वेगळे साठव हे सांगत खुप वर्षांपुर्वी मी तीला कॅश बाॅक्स दिलेला आज आठवला. मी हक्कानं दिलेला आणि तीनी प्रेमानं घेतलेला. खरतर तो घेणं तीला जड नव्हतं पण मला नको म्हटली नव्हती. ते मला आवडलं होतं. आधी एका कोपऱ्यात पार्लर होत, मग फेशिअल ची सोय झाली मग ईतरही सोई एकाच ठिकाणी केल्या हा तीचा बढतीचा चढताक्रम. कौतुकाचाच आहे कारण लहानशा गावातुन शिकुन पुण्या सारख्या शहरात बस्तान बसवणं सोप नाही. कितीही ढिगभर फाॅल पिकोला असु दे ही कायम हसतमुख बागडणारी आनंदी तसेच वेळेला खंबीर व्यक्ती म्हणून मी आज तिसऱ्या माळेला हीच्यातल्या स्त्री तत्वाच कौतुक करते आणि आभार मानते.

४) गौरी वाघमारे. २५ सप्टेंबर २०२५
जेव्हा आपल्याला एखाद्याच काम आवडत, ते करण्याची पद्धत आवडते तेव्हा आपल्याला छान वाटतं. यात काम कोणत याचा विचार नाही ते कस करताना दिसतय हे महत्त्वाचं अस माझ म्हणण आहे. आज चौथ्या माळेला मी माझ्या पाहण्यात आलेल्या अशा स्त्री तत्वाचं कौतुक करणार आहे आणि तीच्यातल्या स्त्री तत्वाचे आभार मानणार आहे ती आमची गौरी. 
मी माझ्या घरचे आमचं घर छान ठेवतोच पण गौरीच्या मदतीशिवाय ते शक्य नाही. तीचा हात फिरला की घर चकाचक. गौरीला  पण मी साधारण १५ वर्ष ओळखते, ती कामाला आहे याला पण बरीच वर्ष झाली. घरात पुजा असो वा काही कार्य आधी गौरी आहे ना हाच विचार येतो. ती आहे म्हणजे काम हलक होतं. एकदम मितभाषी, विश्वासू आणि काहीही विचारलं सांगितल की हलकस गोड हसणारी, मेहनती, ऊत्साही आणि वेळप्रसंगी मात्र खमकी व्यक्ती.
स्वकष्टाने ऊभ राहून मुलांना ऊज्वल भविष्य देणारी, माहेरच्यांवर जीव ओवाळून टाकणारी, त्यांच्या पाठबळासाठी परमेश्वराचे आभार मानणारी,  लहानवयात स्वतः ला सिद्ध करणारी कौतुक करण्याजोगीच आहे. आजचा दिवस तीचा.
५) मंजु कोचर. २६ सप्टेंबर २०२५
"सुनो sss" असा आवाज आला रे आला की आम्ही बिल्डींगमधल्या सुंदर सद्गुणी मुली कान देऊन ऐकतो. हा करडा खणखणीत आवाज आमच्या मंजुचा. पेशानं ही शिक्षिका पण आमच्यात वावरते मात्र जवळघ्या घट्ट मैत्रीणीसारखीच. जगमित्र हे बिरूद तीला चपखल लागू होतं. ईतकं जोमदार ऊत्साही कोणी कस असू शकतं?  हे मंजु कडे बघून मला कायमच वाटतं. १५-२० वर्ष एकाच बिल्डिंगमधे राहुन सहवासान एखादी जस वागेल तश्शीच ही तीन वर्षाच्या सहवासात आम्हाला लाभली आहे.  ती फिटनेसवर पण बारकाईने लक्ष देते, टापटीप राहणं व वक्तशीरपणा हे तीचे गुण, ती कोणत्याही अडचणीत केव्हाही मदतीला हजर असते.
माझ्यापेक्षा मोठी असली तरी मी काय सगळ्याच तीला एकेरीच हाक मारतो. ती आपली वाटते. नोकरीमुळे माझा तीचा सहवास ईतरांपेक्षा किंचित कमी आहे पण तरी ही तुफानमेल मला बरच काही शिकवून जाते.
यंदाच्या नवरात्रातील पाचव्या माळेला मी मंजुमधल्या स्त्री तत्वाचं कौतुक करते आणि आभार मानते. आम्हा सगळ्यांना मंजुसारखं एनर्जेटिक राहण्याच कर्म करण्याची बुद्धी दे ग जगदंबे!

६) काकुबाई. २७ सप्टेंबर २०२५
काकुबाई हे पासष्ठच्या आसपासच्या वयाची नऊवारी लुगडं नेसणारी एक स्त्री. सौभाग्य खुप आधी गमावलेलं... माझ्या लहानपणातलं महत्वाचं मायाळु अन्नपूर्णा असं प्रेमळ व्यक्तिमत्त्व!
कायम डोक्यावर पदर, सतत स्वयंपाघरात कामात, कधी दुर्मुखलेल्या नसणार, आख्या वाड्यातल कोणाचही कोणी आलं आणि आपण घरी नसलो तर या अदबीन आदरसत्कार करणार, चुलीवर काम करायचा हातखंड, गौरी गणपतीत भिंत सारवणं तीला गेरू लावणं निगुतीन करणार, वाड्यातली सगळी लेकरं काकुबाईंनी भरलेल्याच माठातच पाणी पिणार तेच फक्त कस गार असतं? हे कोडच होतं आम्हाला.
१० बाय १२ च्या खोलीत अतिशय सुखानं कुटुंब नांदू शकतं हे यांच्याकडे बघुनच समजेल असं. कधीही पितळीच्या त्यांच्या सगळ्या भांड्यांची चकाकी कमी दिसणार नाही. सगळ कसं लख्खं असणार. खुप खुप प्रेमळ होत्या त्या. तश्या काकुबाई परत आयुष्यात आल्याच नाही.  त्या गेल्या तेव्हा मी पुण्यात नव्हते, मला ते फार उशिरा समजलं. आपल बागडतं लहानपण बघणार एक व्यक्तीमत्व हरपल्याच दु:ख होत ते... बालपणीच्या चौकटीतल कोण कोण दिसेनास होतं ना तेव्हा काहुर माजतं मनात....
कोणीही आलं, कोणाच कोण जरी असलं पण दारात असेल मग ते स्वतः च्या घरच्या असो वा वाड्याच्या यथायोग्य आदरसत्कार करणं ते करून होणारा आनंद अनुभवणं मी त्यांच्याकडे बघुन शिकले. आजच्या सहाव्या माळेला मी काकुबाईंच्यात्या स्त्री तत्वाचं कौतुक करून आभार मानुन करू इच्छिते.
(संग्रहित) (मुलीचा मुलगा असाच अंगाखांद्यावर वाढलेला)

७) पोस्टमन ऊर्फ पोस्टवुमन ताई. २८ सप्टेंबर २०२५
सलग चार वर्षे मी या नवतरूण पोस्ट वुमनला भर दुपारी ३-३.३० वाजता ऑफिसमधे टपाल आणुन देताना बघतेय. आधीचे जे काका होते ते निवृत्त झाले नंतर मी आली. तरी त्यांच्या ईतकच लक्ष देऊन ही पोस्टेज पोचवते. आवरून असते एकदम टवटवीत पावडर कुंकू टोपी पाणी बाटली आणि जड खाकी पिशवी. मी आवर्जून पाणी विचारतेच. तो एकच काय तो धागा. आधी बर वाटायच दोघी होता आता त्या दुसऱ्या ताई दिसत नाहीत. अस लक्ष असतं. आपुलकी असते. जी आधीच्या काळातल्या पोस्ट मनकडे असायचीच अगदी तीच. 
वय काय फार नसेल २५-२६  पण या वयाच्या ईतर मुलींपेक्षा वेगळी वाटते. कौतुक वाटत कारण सांगायला नकोच!  मी फोटो काढला नाही प्रतिकात्मक लावतेय कारण तीला कामात काही अडचणी नकोत.
आज सातव्या माळेला या पिढीतल्या नवयुवती पोस्ट वुमन मधल्या स्त्री तत्वाच मी कौतुक करते आणि आभार मानते.
(संग्रहित)
प्रतिक्रिया पाहून सुचवली गेलेली ही ईमेज

८) मंजुषा थत्ते. २९ सप्टेंबर २०२५
मंजुषा माझ्या शाळेतली पण मला ही ओळख खुप नंतर समजली. आपण आयुष्यात एखादी गोष्ट जेव्हा ध्यासान करतो ना तेव्हा विश्वपण आपल्याला मदत करत हे मी अनुभवलं. श्रीकृष्ण कृपेने अधिक महिन्यात ३० रांगोळ्या काढल्या त्या पाहून शाळेत्याच एकीन मंजुषा कृष्ण वृंदावन बद्दल रोज लिहते ते शोध वाच. तुझ्या आवडीच आहे. हा ईश्वरी संकेतच होता जणू. 
वृंदावन च्या लालजींना समजुन घण्यासाठी मला मार्ग सापडला. ती ही मंजुषा अवखळपणे खळखळत्या झर्यासारख लिहुन लालजींच्या लीला आम्हा सामान्यांपर्यंत पोचवते. ती गेलीय का तिकडे? ती कशी लिहते? जे लिहते ते खरय का? असले प्रश्न मला कधीच पडले नाहीत. 
ती आमच्यासारख्या कृष्ण भक्ती करतो अस थोडस वाटणार्यांना त्याच भक्तीमार्गावर सतत ठेवण्याच काम करते हे मात्र खरय २००%. कधी वृंदावन चे लालजी दर्शन लाभ देतील ठाऊक नाही पण आजच्या आठव्या माळेला मी  लालजींची अस्मादिक म्हणून ऊल्लेख करणार्या मंजुषाचे कौतुक करते आणि आभार मानते.
जय श्रीकृष्ण!


९) नर्स : ३० सप्टेंबर २०२५
गोष्ट आहे २२ वर्ष पुर्वीची. पहाटे साडेपाचला त्या फडके हाॅस्पिटलमधे दिसल्या, मला पाहताच हसल्या. तिथच मला मनान हलक वाटल होतं. मी आई होताना  डॉ. पै रायतूरकर यांच्या सहकर्मचारी / नर्स होत्या. जवळजवळ दोनतासात त्या मला परमेश्वराची छबीच वाटलेल्या. थोड्या जाड, कडक साडी नाईट शिफ्ट संपत आलेली वाटणार नाही ईतकी व्यवस्थित, प्रेमळ, हसतमुख त्यांनी मला ताब्यात घेतलं. माझी वेळ काही येईना नाॅर्मल साठी जेवढ मी कष्ट करत होते त्या पूर्ण पणे त्यात सहकार्य करत होत्या. त्या खोलीत नंतर ती आणि मीच आधी बाहेर आई तरी होती.
बोलत होतो मधेमधे आम्ही. सातला ड्युटी संपते माझी मी नसेन काळजी करू नको होईल नीट. मी डबडबल्या डोळ्यानी नका ना जाऊ तुम्ही च थांबा म्हटलेलं त्यांना. अग सगळ्या सारखच बघतात मला जायला हव माझी लेक पुरणपोळी करणार म्हणुन वाट बघेल. मी काही बोलले नव्हते लेकरासाठी जायच म्हटल त्यांनी त्यात मी तोच जीव तुटणारा अनुभव घेतच होते.
मी खुप कन्ट्रोल केलेला क्षण आजही काटा आणतो.  दोन तासातल्या सगळ्या घडामोडींची ती साक्षिदार होती. तेव्हा ती नर्स मला आपली जवळची वाटु लागली होती.  ती मला समजुन घेत होती आता कोण असेल देव जाणे मलाच माझ दीव्य पार पाडायचय मी मनाला ठणकवलेल आजही लख्ख आठवतय. 
सात सत्तचाळिसला त्यांनीच मला माझा प्रणव दाखवला. तो क्षण आयुष्यात कधी विसरायची नाही मी. नंतर त्याला आंघोळीला नेल तेव्हा माझ्या जवळ आलेल्या आणि म्हटलेल्या ताई छान नाॅर्मल झालीस मी होते इथच. माझा पण पाय निघवेना म्हटल लेकरू पाहाव अन मगच जावं. आज माझ्या पण लेकीचा वाढदिवस असतो बरका! आज सात पूर्ण झाली.
अवाक् होते मी क्षणभर...  आज नवरात्रीच्या या नवव्या माळेला मी त्या नर्सच कौतुक करते आणि अनंत आभार मानते.
(संग्रहित)

१०) जया शिवहरे १ ऑक्टोबर २०२५
यंदा नवरात्रीत एक दिवस जास्त आला. योग असेल ते होतच. आजच्या दहाव्या दिवशी मी अश्या स्त्री तत्वाचे कौतुक आणि आभार व्यक्त करणार आहे जी मला फार आवडते. तीचा धीरान घेणे तसेच कोणत्याही परिस्थितीत सहनशीलतेनं सामना करणे हा बहुमूल्य गुण आहे.

माझ्या लग्नानंतरची भेटलेली ही आणि आजची ही यात तीच्या आयुष्यातील प्रगतीचा क्रम चढताच आहे, पण ती अजुनही जमिनीवर आहे. तीच्या आयुष्यातला सगळा प्रवास एका खमक्या स्त्री तत्वाशिवाय शक्यच नाही. वार्षिक एक भेट ईतकाच सहवास आमचा, पण माझ बोलण 'त' वरून ताकभात ओळखणारी, सतत आदरातिथ्य करायला सज्ज अशी सुंदर जया (भाभी) खुप वेगळी आहे.

या प्रेमळ स्त्री तत्वाचे आभार आणि कौतुक आजच्या दहाव्या दिवशी करते.

आणि यंदाच्या नवरात्रातल्या तीनच सुचवलेल्या आणि पुरा करून घेतलेल्या संकल्पाची सांगता करते. हे जगदंबे असेच काही ना काही सतत करत राहुन सेवेत राहण्याच कर्म करण्याची बुद्धी दे. जय जगदंबे
जय श्रीकृष्ण 
सौ. गौरी पाठक 
९९७०१६८०१४

बाप माणूस

बाप माणूस 



नवरात्रीचे नऊ दिवस आयुष्यातली स्त्रीरूपातली नऊ तत्व आठवली ती कागदावर उतरवली. तेव्हाच मनात विचार आला होता की पुरुष पण बरेच मोलाचे काम करतात त्यांच कर्तृत्व उजागर होत नाही.
मी मनापासून नमन करते, आठवते, मानते असे निदान नऊ तरी बाबा लोक / पुरूष तत्वं नोंद करू शकते का ? विचार सुरू झालेला. लगेच रात्रीच नोट्स मध्ये नोंदी सुरु केल्या. यादी तयार होत होती पण सविस्तर लिखाण काही झालं नव्हतं. नुसतं मनात होत. आज अष्टमी माझ्या आप्पा काकाचा आणि या दिवसाचा माझा खूप घनिष्ठ संबंध. मग काय खाल्ली उचल काढलं लिहून. काही काही विचार केला नाही फक्त रीती झाले. 
---

१) बोरकर काका 
बाबांचे अगदी जवळचे दोस्त बोरकर काका. तसं बाबांचे खूप खास दोस्त खूप खूप कमी होते. बाबांचा फॅन क्लब मात्र खूप होता. दोनच व्यक्ती दोस्त म्हणून मला आठवतात एकांच नाव आठवत नाही चेहरा मात्र लक्षात आहे आणि हे दुसरे बोरकर काका.  आज बाबा गेल्यानंतरही ते त्याच हक्कानं बरोब्बर ठराविक वेळेला फोन करतात. अजूनही बाबांच्या गेल्याच्या तारखेला भरभरून आठवण आली ग दिलीपची म्हणून मन मोकळं करतात त्यांचंही आणि माझही होतं.. माणूस जिवंत असताना वाढदिवस लक्षात ठेवतो आपण पण तो नसतानाचा तो हृदयदारक दिवस लक्षात ठेवून त्या दिवशी आठवण काढणारा हा त्यांचा मित्र माझ्यासाठी बहुमूल्य आहे. भारत पाकिस्तान क्रिकेटची मॅच जिंकली कि ते फोन करतात. आज दिलीप असता तर जल्लोष साजरा केला असता. निवडणूक झाल्या कि भाजप तसेच आर एस एस च काही असल कि हमखास त्यांना बाबांची आठवण येते. दिलीप आज असता ना गौरी मोदींचा फोटो डोक्यावर घेऊन नाचला असता, आज मोदींच ७५ वर्ष आपला दिलीप पण आज इतकाच असता. दिलीप अस म्हटला असता दिलीप तस म्हटला असता. काय नातं ना मैत्रीचं गाढ. दोस्त हयात नसताना पण आठवणीनं व्याकुळ होणार जिगरी माणूस बाबानी कमावला.  असा हे सदाबहार व्यक्तिमत्व! दहा बाय दहाच्या खोलीत ४-५ मुलांचं कुटुंब, त्यात आई, आला गेला सगळं पाहत नोकरी करून उरलेला वेळ रिक्षा चालवत घरात सुबत्ता नांदवणारा, अत्यंत मेहनती खरंच कुठून आली असेल या पिढीला इतकी शक्ती.  आज १३ वर्ष बाबा दिवस आला कि मी मुद्दाम काकांना फोन करते. जुन्या आठवणी उजाळा मिळतो. काका न चुकता सणाला शुभेच्छांचा फोन करतात जो मला काही अजूनही जमत नाही. त्यांच्या मनातला दिलीप दोस्तीच्या टॅग मधला खूप मस्त आहे. कान्हजी काकांना आरोग्य संपन्न आयुष्य प्रादन करो.

२) आप्पा काका 
आज अष्टमी आप्पा काकाला मी बघिलेलं बोललेलं मायेचा ओलावा अनुभवलेला शेवटचा दिवस. नंतर तो नसेल असं वाटलंच नव्हतं. तसा  हा कडक आणि तापट  दिसणारा पण प्रत्यक्षात अत्यंत प्रेमळ. कोणी काहीही केलं कसाही वागलं तरी तो इतका सकारात्मक होता कि जाऊ दे गौरी दे सोडून कुठं विचार करून त्रास करायचा हेच आणि फक्त हेच सांगायचं. तुला अध्यात्माची आवड आहे ती सोडू नको तीच कायम कामी येते. आयुष्यात तीच कृती बळ देत असते. देवाचं रोज म्हणायला जमल नाही तरी जमेल तसे करत राहा. पोथी वाचायचा मार्ग सोडू नको. तू आहेस ती खूप छान आहेस तुझा आवडता मार्ग, वागण्याची पद्धत जगाच्या लेखी कशी ते पाहू नको आहे तशीच राहा. मी याचा चांगला अनुभव घेतला आहे. सगळ्यांना धरून राहायची सवय खूप चांगली. तू आलीस कि खूप बर वाटत. तो पोथी खूप मोठं मोठ्यानं वाचायचा, सगळं घर तेव्हा शांत हव असायचं. इतरांना तो हातवारे करून कुजबुज केली कि रोखायचा. काय हा असा वाच कि तुझं तुझं असा आम्हाला वाटायचं. हल्ली हल्ली मलाही जाणवत कि मी पोथी वाचताना जर कोणी आवाज केला, कुजबुजला कि माझा पण पोथीचा आवाज वाढतो. हे जेव्हा होता ना तेव्हा मी मनात खूप हसते. आप्पाला एकदम कडक इस्त्रीचे कपडे आवडायचे. चपचपीत तेल आणि भांग पाडणे म्हणजे आवरणे हा त्याचा फंडा होता.  भारी होता तो. माझे बाबा भाऊ आणि तो आप्पा! नवरात्रीतल्या अष्टमीला त्याचा विचार आजही माझ्या मनात काहूर माजवतो. त्याला माझा मनापासून नमस्कार. 

३) आप्पा बामगुडे 
बामगुडे आप्पा हे एक बहारदार व्यक्तिमत्व होतं. काय शाही जगायचे ते, मुंबईत राहायला छोट्याश्या चाळीतल्या छोट्याश्या दोन खोल्यातच. पण राहणीमान एकदम शाही, म्हणजे मनाने दिलदार, कधीही आले ना घरी कि दमदार आवाजात मुंबईच्या भाषेत बोलायचे. एक शब्द आहे तो फार आवडायचा मला : बाबु. अशी आम्हाला हाक मारणार कोणी नव्हतंच. खूप खूप आपुलकी असायची त्या शब्दात. ओतप्रोत माया असायची त्या शब्दात. आमच्या बाबांवर खूप जीव होता. दोघे साडू मनानं खूप मोठे होते. अशी दिलदार जोडी मी फोटोत टिपलेली आहे. घरात पाच मुलांचं करून गावाचं मोठं खाटलं पण आपलं समजून सांभाळायचे. गावाला जायचं असल कि पुण्यात येत आणि न चुकता दिलीपरावांना भेटून जात. बामगुडे आप्पा जगाला सामावून घेण्याच्या वृत्तीचे होते. आमच्या घरी जे वाढू दे जेवायचे कधीही कुरकुर नसायची. कर्तृत्वान माणसाच्या नेहेमी पाठीशी असायचे. नीट राहायचं बारका  ग बायांनो! असा आम्हा दोघीना नेहेमी म्हणायचे. मी खेड्यातला तुम्ही सरकारी कामातलं पण पोरांना खूप शिकवायचं दिलीप राव. त्यांना काही कमी पडलं नाही पाहिजे. यावर दोघे एकमत असल्यानं खूप गप्पा होत असत. माहिमचा हलवा त्यांच्यामुळे मला ठाऊक झाला. अश्या दिलदार कष्टकरी सतत कोणासाठी काहीतरी करायची धडपड असणाऱ्या बामगुडे आप्पाना माझा मनापासून नमस्कार. 

४) आप्पा भांडवलकर 
भांडवलकर आप्पा हे माझ्या माहेरचे शेजारी. कायम तंबाखू तोंडांत. त्यांना बोललेलं ऐकलं ते खूप खुप कमी. कमालीचे शांत होते. घरात पाच मुलं, दुसरी बायको आक्रमक वृत्तीची, (परिस्थिती माणसाला तसे बनवते हे अक्कल आली तेव्हा समजलं ) आधीच्या बायकोचा एक मुलगा तो पण सांगू ते तसच करणारा सद्गुणी. ते सगळं सांभाळून घेत जगायचे. एवढ्या मोठ्या कुटुंबात कधीही आप्पांचा आवाज आलेलं आम्हाला कोणालाही आठवत नाही. आप्पा कामावरून आले कि मुलं पिशवीत काय आणलाय बघायला धावत असायची. आप्पांचा पेहराव म्हणजे जुनी मळकी बंडी, तिला पोटावर दोन खिशे, उभा चेहरा कायम, तंबाखूचा तोबरा आणि पांढरा पायजमा. त्यांच्याकडे बघून नेहेमी वाटायचं कस भागवत असतील हे एवढं कुटुंब ते पण विविधतेतलं. जमवून घेणं खूप खूप कठीण असत. आप्पाना ती कला खूप छान जमे. काहीही असल तरी सण मात्र दणक्यात साजरे होत त्यांचे. अनेक वर्ष झाली त्यांच्या परिवाराशी संबंध नाही. पण कायम आहे त्या परिस्थितीत आनंदी असणारे भांडवलकर आप्पा कायम लक्षात आहेत.  

५) बाबा : दिलीप भालचंद्र घाणेकर.
लहानपणापासून आईच्या हातच सुग्रास जेवत आलेले, आईच्या माहेरच्या गोतावळ्यात रमणारे, आईच आजारपण असल्यामुळे घरासाठी कष्ट करणारे, परिवारासाठी नातेवाईकांनसाठी जीव टाकणारे आई वडिल पाहात मोठे झालेले बाबा. कमालीचे हळवे होते. लहान वयात कष्ट करून मोठेपणा अंगावर आलेला, भावांच भरभरून प्रेम लाभलेला मातृभक्त माणूस! 
अत्यंत प्रामाणिक आणि आध्यात्मिक असा यांचा समाजातला वावर, कोणाचही मन आपलेपणान वेधून घेत असे. ते फार वेगळे होते कायम आणि कायमच काहीही केल तरी एकच विचार आधी यायचा त्यांना की जे करतोय त्याचा ईतरांना त्रास तर नाही ना होणार. अशी माणस खुप कमी असतात. त्यांची सुखाची व्याख्या खुप वेगळी होती. कोणी कसही वागो आपण आपल्या परीन सगळ्यांचच जास्तीत जास्त चांगल करायच गौरी. ही खुप मोलाची गुरूकिल्ली त्यांनी आम्हाला दिली आहे. त्यांच्या पुण्याईन आयुष्यात लाख मोलाची माणस लाभली. या बाप माणसाला माझा सलाम! आणि घट्ट मिठी.....

६) साठे सर 
आपल्याला ज्या गोष्टी केल्यान समाधान वाटत त्या सातत्यान करत राहायची इच्छा असते. तेव्हा त्या सुसूत्रतेन कशा करायच्या याला कोणीतरी मनाला पटून समजवेल अशी व्यक्ती लाभावी लागते. यासाठी मला लाभलेले हे साठे सर.
वागताना शिस्तीच पण मिश्किल अस गुरूच व्यक्तिमत्त्व. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर विद्यार्थी कस शोधून ते जगतील यावर भर त्यांचा.  हे माझे कोणत्या विषयाचे गुरूजी हे महत्वाच नाही तर विद्यार्थी सराव आणि सातत्या वापरून ठोकुन पुढ गेला पाहिजे असा हा हाडाचा शिक्षक‌.
एक शिक्षक म्हटल की आदरयुक्त भिती ही असतेच पण मला ते मनापासून आठवणीत राहतील आणि राहतात. कारण जो अभ्यास मला करायचा होता तो शिकताना मी ईतकी पद्धतशीर आणि तपशीलवार शिकु, वागु आणि जगु शकले आणि शकतेय हे फक्त आणि फक्त यांच्या च मुळे. सुरवातीपासुनच अध्ययनातच्या पद्धतीच्या नियमांचा काटेकोरपणा ईतका मस्त मनावर कोरला ना यांनी मी यासाठी यांची शतश: आभारी आहे. असे बाप माणूस शिक्षक लाभण भाग्यच!

७) अक्षय शहापूरकर सर 
आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर योग्य वेळी योग्य गुरु लाभण नशिबच लागतं. रांगोळी काढण्याची मनातली सुप्त ईच्छा मी जशी जमेल तशी काढुन मनान सुखावत असतानाच अक्षय सरांच गुरूंबद्दलच्या रांगोळी च प्रदर्शन बघण्यात आलं. झाल की ठरवलच या बहुमूल्य कलाकाराकडून ही कला शिकण्याची मनातून तीव्र इच्छा पुरी करायचीच.
पहिल्याच दिवशी वर्गात सरांनी मन बुद्धी दोन्ही भारावून टाकलं. इंजिनिअर असूनही ऊत्तम आध्यात्मिक बैठक आणि वैश्णवपंथी भक्तीची सुंदर झालर त्यात सामाजिक जबाबदारी च भान अस सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व कलेचा गुरू म्हणून लाभलं. हाताच्या बोटानी रांगोळी कशी धरायची त्याबरोबर आद्ध्यात्माचही बोट कसं धरायच गरजेच हे शिकले सरांकडून. चालत बोलत माणुस रांगोळीतून ऊभ करणारे हे सर अतिशय प्रगल्भ आहेत. काय काय शिकायच यांच्याकडून, अबब!
रांगोळी ची पहिली लेवल  केली त्यानंतर पुढच अजुन झाल नाही पण रांगोळीतून जग बघायला शिकले.  अक्षय सरांच्या विविध कलाना पाहुन वाटत की ठरवल तर मानव काहीही शिकू शकतो. माझ्या कलेच्या गुरूना आदराचा नमस्कार.

८) आपटे काका 
नागावच्या वाडीचे हे मालक. नागावच्या समुद्र किनार्यालगतची यांची छोटीशीच वाडी, दोन दोन खोल्या अशी चार घरं लागुन लागुन, मोठ्ठं स्वयंपाकघर आणि समोर व्हरांडा. बाह्याचा पांढरा बनीयन आणि हिरवे निळे पट्टे असलेली हाफ पॅन्ट ऊर्फ विजार.
दिवसभर वाडीच काम करणारे हे दमलेले मी कधीच बघितले नाहीत.  घरातल्या सहा कुंड्या आवरून ठेवताना माझी ओढाताण होते, आवडीनच करते मी प्रश्नच नाही पण मी दमते आणि हे एवढी वाडी आवरणारे काय मेहनत ती! आमची सुट्टी वाडीत मस्त जात असे. ते आजही लक्षात आहेत ते त्यांच्या वाडीतल्या अफाट कष्टामुळेच. त्यांच्या सारखा स्टॅमिना हवा. 

९) गायधनी आजोबा 
पूर्वी पोस्टाच सेव्हिंग करायचा कल जास्त होता.  तेव्हा हे गायधनी वय वर्षे ७९ - ८० आमच्या ऑफिस मधे यायचे. दरमहा पोस्टाच रीकरींग नेणे नवी योजना सांगणे. नंतर ते म्युच्युअल फंड च पण सजेस्ट करायचे. २००६-७ साली मला पण पकडलेल बचत का आणि कशी करण गरजेच आहे.  मला वाटायच पगार तो किती बचत काय होणार त्यात. पण ते म्हणत पगाराचे ५% गुंतवणूक करायची सवय लाव तर ती हळूहळू १०-१५% पर्यंत करण्याची सवय लागते. मी फक्त हसुन हो म्हणायची. 
एकदा करच १०००.०० च तरी गौरी तू पण, या म्युच्युअल फंडमधे आग्रह धरला. माझा अनुभव आहे की याचे दोन वर्षांत चांगले रीटर्न येणार. सगळ्यांनी केल कुणी १००००.००, २००००.००, ५००००.००. मला १०००.०० गुंतव म्हटले मी ठिक म्हटलं आणि गुतवले. दोन वर्षानंतर गायधनी आले आणि चक्क १०००.०० चे २२००.०० झालेत अस सांगितल. अचानक समोर आलेलं हे फार मस्त वाटलं. बचतीच महत्व पटलं.  आपुलकीन सगळ्यांना ते बचतीच सांगायचे. त्यांच वय पाहता कौतुक वाटायचं. कोरोनाच्या आसपास वय वर्षे ९५ असतानाच ते जगात नसल्याच समजलेलं.
बचतीची सवय लाऊन महत्व पटून देणारे गायधनी कायम स्मरणात राहतील.

आयुष्यात येणाऱ्या सर्व बाप लोकांना आज नमस्कार 
जय श्रीकृष्ण 

गौरी पाठक 
९९७०१६८०१४

Sunday, 14 September 2025

मला काही समजतच नाही? कनचं

मला काही समजतच नाही? कनचं
सद्ध्याच्या काही सुशिक्षित हुशार सुजाण बायका मुलींच्या तोंडच हे वाक्य. कनचं? हे मी लावलेल बिरूद. त्याचा अर्थ कोणतं? 
कोणत्याही बाबतील स्वतःला कस हवं याची परिभाषा यांची पक्की असते. फक्त करायच कस ते समजत नाही ऊर्फ सुचत नाही किंवा ते मी का करू?  ते माझ काम आहे हे सुचत नाही. स्त्रीसुलभ क्षमतेत असणारा समजुन ऊमगुन करणं हा गुण हल्ली कमीच दिसतो.
------
अग गाडी मेन स्टॅड ला लाव.
नाही येत मला.
अग पण काल तर लावलेलीस ना? दोन गाड्या जास्त मावतात.
हो पण काल श्युज घातले होते. श्युज असतील तरच मला मेन स्टॅड गाडी लावता येते.
(खच्याक्) 
आम्ही पांढरी निळे पट्टे असलेली स्लीपर घालुन पर्वती चढलो यांच्या वयात.
------
पोहे काय असतात कोपऱ्यावरचे!
मला फार वेगळे वाटले नाहीत. Any special?
खाताना पदार्थ कसा हवा यावर ताशेरे.  करता कुठ येतय?
कसे पोहे हवेत हे केल्याशिवाय कळणार नाही. यांचे नखरेच खुप.
गोड पदार्थ हवा पण वेलची नको. ती नसलेलच खाणार.
(खच्याक्)
यांना करायच जमल पाहिजे हे सुचत नाही पण खाण्यात काय हवं कस हवं ते स्व:च मत तत्काळ नोंदवणार.
-----
ईकडे ही सोय हवी ती सोय हवी अश्या ठसक्यात प्रतिक्रिया देणार. 
पार्टीत बिर्याणी आणा.. हौस भारी पण वाढायची कशी समजत नाही, खाऊन झाल्यावर आपली प्लेट dustbin bag मधे टाकायची सोय सांगितली नाही म्हणून टेबलवर जमा करून निघून जाणार.
होती का dustbin bag तिकडे?
(खच्याक्)
आपला आपणच वापरलेला परिसर आवरायच समजत नाही.
------
आज काय सण का? अच्छा मी काय करायचय.
अग तुमच्या भागातला सण ना? 
हो, पण मला काही ठाऊक नाही.
(खच्याक्)
आमच्याकडे अस असत चा डंका मारताना तो नियम म्हणून समजुन पाळावा हे सुचत नाही.
-----
आपणहुन खर्च करण स्वभाव नाही पण ईतरांनी सहभागी करून घेतल तर आवडतं.
पण एकत्र रीक्षान गेल की उतरल्यावर पैसे आपणहून देण्याच मला सुचतच नाही.
(खच्याक्)
दुसरा पैसे देईल तोवर थांबायच म्हणजे बीपी हाय अशी आमची स्थिती .
----
आज मी मस्त भाजी करा सांगितल घरी.
अग आज हरतालिका ना? ऊपवास तुझा नसेलच आईचा असेल ना पण.
हो वहिनीचा पण आहे. मी आणि दादा मस्त मेनु कर संध्याकाळी आज शुक्रवार आहे सांगुन टाक लं.
(खच्याक्)
आणि यांना बरोबरीचा नवरा हवा. स्वतः च पोट तरी हव ते करून भरता येत का? नाही तेवढ मात्र सुचत नाही.
-----
आपण एकत्र जेवण करू या का?
हो चालेल काय काय करायच? मी मदत करेन अंदाज मात्र मला समजत नाही.
मी काय करू?
(खच्याक्)
आम्हाला समोर दिसायच काय करायच ते. यांच अजबच गणित, यांना समजतच नाही.
---
नवरा हा गहन मुद्दा.
काय ग कसा हवा नवरा?
माझी तर चेक लीस्ट च रेडी आहे.
(खच्याक्)
चेकलीस्ट करून नवरा बायको होत नसतात. एकमेकांच्या सहकार्याने एकत्रीत चेक लीस्ट पूर्ण करायची क्षमता असेल तरच लग्न होतील. हे यांना कधीतरी समजेल का?
-----
ऊद्या traditional dress घाला सगळे. खंडेनवमी आहे.
दोन जणी चकाचक साडीत आणि या सगळ्या किती हेवी वाटतय या धोशात दिवस घालवणार.
घातल काय आहे ? तर मैत्रिणीच घर बघायला जाताना घालु ईतका साधा पजाबी ड्रेस.
या लीफच काय करायच?? चक्करच यायच बाकी राहत हे ऐकुन.
(खच्याक्)
खंडेनवमीला काय बहारदार आवरून पुजा होत होती सांगाव नव्हत लागत मोठ्यांना सोनं दिल की नमस्कार करतात.
----
Oh! No! (हाताला क्रीम लावत)
काय झाल ग?
हा आपला डिश वाॅशिंग बार चांगल नाहीये माझे हात आग होतात.
विम बार आहे तो आणखी काह पाहिजे?
ठिके धुते मी डबा रोज तोच वापरून पण नंतर क्रीम लावावच लागतं.
(खच्याक्)
आणि आम्ही राख, नारळाच्या शेंड्याची घासणी, औषधाच कव्हर, निरमा कशाकान भांडी घासत आलो. ओरखडा पण त्रासदायक नव्हता तेव्हा.
यांना गालाला हाताला ओठाला पायाला सगळ्याला वेगळ क्रीमच लागतं.
आणि आम्ही अगदीच गरज वाटली तर खोबरेल तेलाचा ऊपाय करून आजही ठणठणीत आहोत.
---
छान पाच दिवस बाप्पा झाले पण विसर्जनाचा योग नाही.
अच्छा. पण मोदक पार्टी मस्त झाली. दिवस मस्त गेले.
काय काय करायचय? आज विसर्जनाचं?
बघा कस जमतय. ( मनात दु:खाची किनार)
घरी पोचताच... कुठेत सगळे?
विसर्जनाला गेलेत.
एक व्हिडिओ काॅल करून दाखवावा नाही वाटला?  निदान घरचे बाप्पा निघाले असा मेसेज तरी?
सुचलं नसेल?
(खच्याक्)
आपण नसतो तेव्हा जी व्यक्ती आपण लांब असुनही आपली आपली आठवण काढते, शक्य तस तिकडुन गोष्टी दाखवते, निदान अपडेट देते आणि जर तीच नसेल तर तीला साधं बाप्पा निघाले मेसेज करणही सुचलं नसेल?
हे तरी अगदी खच्याक् खच्याक्......
आणि यात आई नावाच पात्र दारातच म्हणणार जा पळ खालीच असतील बाप्पा च दर्शन मिळेल. (तळमळ)
कोणी लेकरू म्हणेल वाटल होत मला फोन करू का ? पण वाटल तु गाडीवर असणार. (प्रेम)
----
अग आपल्या दोस्ताचा वाढदिवस आला काही ठरवायच तर ग्रुप करू का?
ग्रुप परत कशाला? आहे की.
हो का मला दिसला नाही ग?
अग बाई तु नाही का त्यात?  तुझा तो तुझी ती पण आहेत की तिकडे.
मला अस प्लॅनिंग करताना सहभाग आवडतो हे तीला त्याला ठाऊक असुनही मी तिकडे नाही यावर चकार शब्द काढला नाही कोणीही.
सुचलं नसेल गं?
(खच्याक्)
आणि आम्ही आपली समजतो ती जनता सगळी चढलीय ना गाडीत नीट बघुन हुश्श होतो.
अजब तुझे सरकार...
---
अडचणी फक्त ठराविक घरीच जातात त्यांना त्यांच्यावर मात करणारी घरं बहुतेक पाठ असावीत. तसच ही पिढी कर्म करण्याच न समजुन, अस न सुचणं वाली जनता स्वतः चच नुकसान करते. खरतर तीच खरी हुशार सुजाण आहे अस म्हणाव लागेल.
सुचत नाही जमत नाही म्हणतात त्यांच मग ती व्यक्ती कोणत्याही पिढीची असो अप्रुपच वाटत मला. स्वतः चा स्वार्थ बरा चपखल कळतो. आपल समजुन करणं जमल तरच ते सुचतं. काहींना आपला विचार करूनच बुद्धी संपते बहुतेक. 
हा न सुचणं, न जमणं रोग आताचया पिढीसारखाच आधीच्या पण दिसतो काही प्रमाणात पण फक्त आई वडिलांच्या पुण्याईमुळे तो ऊघडा पडला नसावा.

यावर माझ्या मैत्रिणीच्या तोंडचा अप्रतिम डायलॉग आठवला तो असा -
"आपण सुखानं‌ नांदतो ही आपलीच चुक ग गौरी. आपल्यात समयसूचकता ठासुन आहे ही आपलचीच चुक ईतरांना तर सुचतच नाही" मला कोणात्याही पिढीतल्या कोणाही व्यक्तीवर बोट ठेवायच नाही पण अनुभव असे आलेत आजुबाजुला की विचार येतो की आपल समजुन आपलस करण्याची कला आपल्यात आहे म्हणून आनंद वाटुन घ्यायचा की दु:ख!
विनोदाचा भाग वगळता मी स्वतःला नशिबवान समजते कारण मी अशी नाही.  या पिढीच कस होईल ही चिंता न करणे आणि याचा परिणाम हा असेल कि या लेखात भर पडत राहणार...
(खच्याक्)
----
आता हे खच्याक् काय आहे ते सांगते आधी.
सर्वसामान्य माफक अस वागण समोर न येता जर काही अस न सुचणारं किंवा बाळबोध किंवा अबोध वागणं समोर आलं तर अवाक् होऊन मर्मी घाव बसतो तेव्हा असा आवाज येतो खच्याक् ही माझी साधी सरळ भावना.
So i am enjoying the company of all types of people's and improving my consciousness definitely growing now with free mind!!
Yours lovely 
गौरी