भुंगा
लगोरी नावाची मराठी मालिका होती ना तश्शीच आमची हि लगोरी टीम. आज लगोरी टीमचा ग्रुप कॉल आला. (चार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे .)
एक : हॅलो ! आलात का सगळ्या ? आज जरा संध्याकाळी भेटूयात का ?
दोन : हो पण काय झालं ग ? anything serious?
एक : नाही पण भुंगा लागलाय डोक्याला तो समजेना का लागलाय ? मग म्हटलं जरा बोलावं.
तीन : चालेल पण आज गुरुवार आहे ग शुक्रवारी भेटू रात्री म्हणजे जरा निवांत असू ना..
चार : खरंय पण ये थोडा वेळ, आवरून ये लागेल तर.
पाच : वेळ सांगा मी पोचते.
एक : ऑफिस नंतर पुलावर या.
तीन : ओके ओके येते.
एक : लव्ह यु गर्ल्स.
अशा बरेचदा भेटी होतात. मैत्री नातंच अस असतं ना कि बोलावलंय आणि जायला जमत नाही असं करूच शकत नाही. तर त्या दिवशी संध्याकाळी हा मुद्दा होता कि एकाच प्रकारचा प्रश्न असेल तरी समान का तोललं जात नाही
जगात?
एक : आपल्या आजूबाजूला आपले समजतो ते लोक असतात. आपण त्यांना जीवापाड जपतो. वेळ पडली तर त्यांच्या वतीनं इतरांशी भांडतो पण. मग तुम्हाला कधी असं झालाय का? कि अश्या लोकांबरोबर असताना तुम्हाला गरज आहे तेव्हा त्यांनी तुमची बाजू घेतली नाही.
दोन : होऊ शकत त्यांना तेव्हा ती गोष्ट झेपलीच नसेल. जर ती तुझी माणसं आहेत तर ती तुझ्या बरोबरच असणारेत.
तीन : तू एकटी पडलीस असा वाटलं का तुला तेव्हा ? हं... मला झालेलं अस एकदा कि सगळे माझे, मी सगळ्यांची,
पण एक वेळ अशी आली की माझी बाजू घेणार कोणीच नव्हतं. नंतर अस व्हायला हवं, तसं हव म्हणतात. काय उपयोग? तेव्हा माझी बाजू घेतली असती तर मला जास्त आधार वाटलं असता. असं झालेलं माझ्या बाबतीत पण. नंतर मला समजावलं गेलं कि जाऊ दे बोलून उपयोग नाही तू तुझं बीपी वाढवू नको.
तीच्या / त्याच्या बाबतील काही बोलत जाऊ नको.
चार : कदाचित त्या व्यक्तीशी त्यांना संबंध न बिघडवता दिवस छान पार पडला जावा वाटलं असेल.
पाच : हो ते सगळ्यांनाच असत. पण हीच गोष्ट ते तिकडे बोलून हि करू शकले असते कि -
उदाहरणार्थ: तुम्हाला जे वाटतंय तस नाही बर का, तिला वेगळं म्हणायचंय तुम्ही वेगळं समजताय.
हे मी माझ मत दिलं कारण मला असाच अनुभव आला मागच्याच महिन्यात.
मी अपसेट होते तरी आवरून कार्यक्रमात गेले घरच्याच बरका तिकडे मी नेहमी सारखी नव्हते. मला ठाऊक नव्हत की माझा चेहरा बोलतोय की मी मारून मुटकून आलेय किंवा त्रस्त आहे. माझे वाटणारे सगळे होते पण एकानही, "का ग गुमसुम आहेस? नेहमीसारखी वाटत नाहीस?" अस विचारल नाही. पण तिकडे आलेल्या तिराईत बाईन मला विचारल,"काय ताई आज का शांत शांत?" तेव्हा मला फार वाईट वाटलेल की माझे वाटणारे असुनही मला कोणी काय झालं पण विचारल नाही. त्यांना मला का विचाराव वाटल नाही? आपल माणूस अस्वस्थ चलबिचल दिसल तर आपण बाजुला घेऊन विचारतोच ना? मग माझी वाटणारी ही माणसं माझी नाही त का?
एक : तेच तर ! मला असच / हेच म्हणायचंय कि माझं म्हणणं जर बरोबर होत हे पटत होत तर तेव्हा मम तरी म्हणावं ना, नंतर काय उपयोग? ती व्यक्ती सुनावून गेली सगळ्यांमध्ये आणि माझी माझी म्हणत असलेली माझी वाटणारी ती माणसं चकार शब्द बोलली नाहीत तिकडे? लहान नाही मोठी नाही कोणीच ? का ?
म्हणजे ती माझी नाहीत का ? चुटपुट भुंगा लागलाय याचाच कि मला वाटतंय कि माझी खूप जोडलेली माणसं माझ्या मागे आहेत मग ती मला हवं तेव्हा का नव्हती ? मग ती माझी नाहीत का ?
दोन : सुचलं नसेल त्यावेळी कोणाला काय व्यक्त व्हावं? लगेच टोकाचा विचार करू नको.
तीन : प्रत्येकाची सपोर्ट करायची पद्धत वेग वेगळी असते. तू विचार करू नकोस.
चार : कदाचित नक्की काय झालय हे समजायला पण वेळ लागतो गं, खूप जण असाल ना तिकडे?
पाच : आपल्या समजणाऱ्या व्यक्तीला कोणी काही म्हटलंय तर त्यात विषय खोल समजून मग बाजू का घ्यावी लागावी ? ठाम विश्वास हवा ना कि हि अशी नाही काहीतरी गैरसमज झालेला आहे.
तिला अस म्हणायचं नसणारे.
तिला अस म्हणायचं नसणारे.
एक : बघ कि ग !
दोन : त्या व्यक्तीकडून आधी पोळलेले असतील कदाचित म्हणून मध्ये पडत नसतील.
तीन : मग त्यांनी "एक" कडून पण त्यांच्या वेळी हि मध्ये पडेल अशी अपेक्षा ठेवु नये..
तेव्हा मात्र हि असली कि चिंता नाही, ते निर्धास्त.
चार : तुम्ही दोघी खूप नकारात्मक वळण घेत आहात. उलट अशा लोकांपासून दूर राहा हे शिका.
ज्यांच्या जवळीकीनी किंवा ज्यांच्या बद्दल बोलुन आपले वाटणारे पण चिडीचूप होतात अशा मुद्द्यांपासून. आता चार हात दूर राहा. तुमच्या वेळी कोण खमक उभं होत पाठीशी हे न बघता यातून धडा शिका. कोणाच्या किती जवळ जायचं? कोण किती बरोबर चुक हे सांगायला जायच की नाही?
परंतु यामुळे तुम्ही जशा आहेत त्यात बदल करू नका. तुम्हाला वाटलं कि एखाद्या साठी खमकं उभं राहावं - राहा, पूर्वग्रह ठेवून जगू नका. "मला नाही आलात ना पाठीशी आता बसा मी पण नाही येत लक्षात ठेवेन " असा नका करू.
पाच : हो म्हणजे तुझं नेहेमीच पालुपद, सोडून द्या आणि जगा.
एक : नाही मी तशी वागुच शकत नाही कारण मी आपल समजल की आपली फळी तुटू द्यायची नाही. कारण जग वाटच बघत असत फुट पडते कधी आणि मजा येते कधी. मला माझी आपल वाटतात त्या
माणसांची फळी कायमच तटबंदीचीच ठेवायला आवडतं. म्हणून तर तुम्हाला मनातल बोलले.
(चारचा हात धरून) सगळं समजतंय ग पण भुंगा हा लागला कि सोयीसोयीनी का वागतात? हिच व्यक्ती त्यांना सोयीचं वागली बोलली तरी ती तुमची,
पण तिला गरज असेल तेव्हा त्यांना :- कधी सुचत नाही, तर कधी आता कस बोलावं बाई मधेच? अस वाटत, तर कधी घरात मोठे आहेत ते बघतील असं वाटत, नाहीतर अस परत होऊ नये याचाच विचार करत बसतात. (जी नंतरची गोष्ट आहे.) हे का पण ?
चार : एक मिनिट तू शांत हो.
दोन : तू जस इतरांशी वागतेस ते तसेच तुझ्याशी वागवेत हा हट्ट नको करू.
तीन : म्हणजे आला का तुझा कृष्ण परत कर्म कर फल कि अपेक्षा उस पे छोड । हे पण मान्य आहे पण आत्ता ती दुखावलीय त्याच काय? अचानक आपल कोणी नाही अस मनाला लागलय तीच्या... साधू संत नाही आपण पटकन सोडून द्यायला.
पाच : ऐका ना आता एक मुद्दा मला पण पटलंय कि आपण जगाला बदलायला जायचं नाही तर, आपण आपलं सांभाळून जगायचं, वाटलं मदत करावी करायची, नाही वाटलं नाही करायची. Any time available राहण अति नको, विचारू दे समोरच्याला, मदत हवीय म्हणू दे, ready reckoner आपणहून न बनणे म्हणजे त्रास होणार नाही.
दोन : करेक्ट
तीन : पूर्णपणे तसं नाही पण तसेच काहीसं. पण पूर्वग्रहदूषित नक्कीच जगायचं नाही हे मात्र १००% पटलंय.
चार : गुणाच्या माझ्या त्या ! इतरांकडे कस असायला हवं? किंवा त्यांनी कसं असावं किंवा करावं हे त्यांना ठरवू द्यायचं आणि लागेल ती सांगतील ती मदत करायची.
आपल्याबाजूने कोणी बोलो न बोलो स्वतः समर्थ राहायचं जगायला. आपल्यात क्षमता आहे म्हणून तो परमेश्वर आपल्याकडून इतरांसाठी करून घेतो. जे योग्य वागलो त्याचं योग्य वेळी योग्य फळ मिळेल. ते त्याच प्रकारे परत मिळेल अस नाही. सिम्पल.
एक : समजायला सोपंय पण झेपायला वेळ लागेल. पण याच व्यक्तींना त्या आहेत तसं म्हटलेलं पण आवडत नाही. लगेच स्पष्टीकरण देतात. कबुल करावं आहेत तश्या स्वतः ला.
दोन : हेच म्हणतेय मी असच त्यांना पण झेपायला वेळ लागला असेल असं कशावरून नाही. त्यांना तेव्हा तुझ्या बाजूनी बोलू शकतो नाही याची खंत असेल असं पण असू शकत. चुकलच, खंत वाटतेय असा सहज कोणी सांगत किंवा कबुल होत नाही. तू झालीस तू होतेस आभार मान. त्यांचं मन त्यांना खात असेलच नक्कीच.
पाच : Oh! Yes इसमें दम है ।
तीन : सोड आता खंत बिंत. उडून गेला बघ तो भुंगा... लांबवर... आपलं ठरलय ना, आनंदी जगायचं, मुक्तं जगायचं, मनात काही जड होईतोवर ठेवायचं नाही. म्हण "जग गेलं उडत, मी आनंदी आहे."
चार : खरंय ग ..
तीन : किती वाजले ? बाई ग दिड तास झाला ? मी पळते तुम्ही बसा.
चार : जा जा. शब्दाला मान देऊन आलात धन्यवाद !
दोन : मारा ग हिला ...
एक : मिठी मारत हसत हसत मी पण मारणारे थांबा.
पाच : चल मी सोडते तुला जाताना.
आणि नंतरच्या अडीच मिनिटात पाचही जणी गायब. स्वतःच्या विश्वात परत भिरभिरायला याच खात्रीनं कि
अडकलाच पाय तर चौघी आहेत बाहेर काढायला.
भुंगा काय कधीच उडून गेलेला दिसला का तुम्हाला ? हा ! हा! हा!
लगोरी उगाच नाव नाही ग्रुपचं!
गौरी पाठक
१६ मे २०२५
९९७०१६८०१४