Thursday, 13 January 2022

श्री क्षेत्र काशी आणि प्रयाग.

हर हर महादेव !  


त्रिवेणी संगम, प्रयाग, उत्तर प्रदेश 


योग येणार असेल तर तो येतोच, मनात इच्छा देणारा हि तोच आणि ती निर्विघ्नपणे पार पडणाराही तोच. बारा ज्योतिर्लिंगाची रांगोळी काढली तेव्हा पासून दर्शनाची सुप्त इच्छा मनात उमलू लागली होती. कालांतराने शिव पुराण व सतीची शक्तिपीठं कथा वाचनात आल्या आणि इच्छा प्रबळ झाली. कारण काही असो श्री क्षेत्र वाराणसीच्या काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्याचा योग अचानक लाभतोय समाजलं तेव्हा मन आनंदानं भरून गेलं. मनापासूनची इच्छा तो परमेश्वर सफल पूर्ण करतो हा अनुभव आला. 

पुण्याहून विमानानं प्रयागराजला जायचं ठरलं. परंतु तिकडे पाऊस पडत असल्यानं ते विमान रद्द झाली. पण योग होताच,  पुणे -दिल्ली विमान नंतर दिल्ली - प्रयागराज ट्रेनचा प्रवास करून पहाटे चार वाजता पवित्र भूमी  प्रयागराजला सुखरूप  पोचलो.  प्रचंड मोठं स्टेशन अबब ! परमेश्वराचे पदस्पर्श झालेली पावन भूमी पाहतेय यावर विश्वासच बसेना, शांत रस्ते, सहकार्य करणारी, मफलर स्वेटर मधली माणसं आणि बॅटरीच्या रिक्षाच  प्रथम दिसल्या. आपुलकीन चौकशी करत रिक्षावाल्याने  हॉटेलवर पोचवल. पोचेपर्यंत पाच वाजले होते. गारठा कमी पण धुकं जास्त होतं . काल  फार पाऊस येऊन गेलेला साचलेल्या पाण्यामुळे समजात होते. आदल्या दिवशी निघालेले आम्ही गडी आज पाच वाजता विसावलो. 

रूमवर आराम करून मग गरम गरम पुरी बटाट्याची रस्सा भाजी हा नाश्ता होता तो केला,  आलू पराठा .... आणखी काय हवं !

कडक गरम पाण्यात आंघोळ करून  परत दस दस रुपये सीट बॅटरीची रिक्षा करून त्रिवेणी संगम बघायला गेलो. छोटे तंबू ठोकणं काम सुरु होतं, ती कुंभ मेळ्याची तयारी होती. संक्रांती पासून पर्व असतं असा समजलं. त्या गर्दीच्या आधी विना पावसात भेट दिली गेली नशीबच आमचं. त्रिवेणी संगमावर आधी बडे हनुमान जी देवळात गेलो. या देवळात झोपलेले हनुमान आहेत. सहा सात फूट खोल आत हि मूर्ती आहे. डोकं उत्तर तर पाय दक्षिणेला आहेत. या शहराचं हे ग्राम दैवत आहे. गावठी गुलाब आणि तुळस इकडे वाहताना दिसले. प्रचंड मोठा तो हनुमान, फुलांचा, अत्तराचा घमघमाट, जय श्रीराम के नारे माहोलच अवर्णनीय होता. वीस फूट लांब हि मूर्ती लोभस आहे. ५००-६०० वर्ष जुनं हे देऊळ, दर्शन घेऊन मगच संगम पाहून पुर्ण होतं . आम्ही हे आधीच बघितले. 

या भागात चहा विक्रेते खूप होते. किटली विशेषच वाटली, तिच्या खाली कोळसे असलेली शेकोटी होती. गरम गरम चहा मिळत होता. भारी वाटत होतं ते बघायला. पुढे अकबर किल्ला आहे पण  आत जात आलं नाही बाहेरूनच समाधान मानलं.  


                                                


नंतर एका नावाडी आजोबांनी आम्हाला बरोबर हेरलं. पाचशे मीटर चालत गेल्यावर अकबर किल्ला लागतो. सध्या तो आर्मी च्या ताब्यात आहे. तिकडून पुढे किनारा येतो यमुनेचा. किनाऱ्यावर बोटी भरपूर होत्या. त्या नावानी / होड्यांनी  आपण त्रिवेणी संगम पाहायला जातो. अर्धा तास लागेल पोचायला असा नावाडी सांगत होता. वैयक्तिक बोट करून आम्ही निघालो. यमुनेच पाणी तेव्हा हिरवं होत. भरपूर पांढरी कबुतर थवेच्या थवे होती. बऱ्याच बोटी ये जा करत होत्या. संथ वाहणारी यमुना मंद हसत स्वागत करत होती. नावाडी पण भलताच गप्पिष्ट होता. संगमावर आठ महिने गंगा प्रभावी तर चार महिने यमुना प्रभावी असते. तो माहिती देत होता. सरस्वती नदी गुप्त आहे. नावाड्याने उजवीकडे गंगा डावीकडे यमुना दिसेल अशी बोट उभी केली. मध्यावर एक बोट उभी होती. तिन्ही नद्यांची नारळांनी ओठी भरली. लहान टोपलीत गावठी गुलाब, शेवंती फुल व  दिवा होता ते घेऊन नदीची आरती करून ती टोपली संगमात सोडली. हवेत मस्त गारवा होता. बोटी हालत डुलत होत्या. त्रिवेणी संगमाचे पाणी कॅन मध्ये भरून घेतलं. मोक्ष मार्ग मोकळा होण्यासाठी चे विधी केले. श्रद्धा असेल तर हे पटेल. 

ब्राह्मण भोजन दक्षिण देऊन आम्ही परत निघालो. मधोमध बोट होती तिकडे गुरुजी असतात आधीच. आपण सांगू ते विधी करून देतात. काही लोक पिंड दान करून त्रिवेणी संगमात अंघोळ करून परत जातात दिसत होतेच. संगमाचे पाणी अत्यंत शांत होत. वाचलेल्या कथा आठवत मंद वाऱ्याची झुळूक अंगावर घेत फोटो काढत परतीचा प्रवास सुरु होता. किनाऱ्याचे झेंडे, माणसांची वर्दळ, डुलणाऱ्या नावा, संगम पाहून तृप्त चेहेरे पाहून छान वाटत होत. शांत चित्तानं किनारा गाठला. मागे वळून मनःपूर्वक नमस्कार करून परत निघालो. 


निघालो तेव्हा दिड वाजला होता. पावसाचे थेंब पडू लागले होते. जणू आमच संगम दर्शन झाल्यावर पडण्याची वाट पाहत होते. लगेच रिक्षा करून रूमवर गेलो. दोन तास आराम केला. तो पण दुलईत गुडूप होऊन. 

चार वाजता चहा घेऊन लोकनाथ चौक ठिकाणी जायला निघालो. लोकनाथ चौक म्हणजे  तिकडची खाऊ गल्लीच. राजाराम लस्सीवाले खूप ऐकिवात होतो. तिकडे लस्सी व काळ्या गाजराचा हलवा मस्त ताव मारला. हो हो काळी गाजरच. हि फक्त इकडेच पिकतात. विशेष म्हणजे सगळे पदार्थ कुल्हड मधेच मिळतात इकडे. वापरून झालं कि ते फेकून द्यायचे. चाट गल्लीत टोमॅटो चाट, आलू चाट, पापडी चाट चे विविध प्रकार होते. नंतर भाजी मार्केट मध्ये चक्कर मारून पाच सहा चौक चालत राहिलो. काळ्या तिळाचे लाडू, गजक आणि लोकरीची टोपी खरेदी झाली. मी तर अर्धा किलो काळी गाजरं  पण घेतली. भरपेट भरलेलं पोट आणि मन घेऊन रूमवर परत आलो. येताना परात रिक्षा केली. पत्ता सांगताना यावेळी फार मजा आली. कुठं जायचंच समजावून सांगताना ची मजा. सहा वाजताच रात्रीचे नऊ वाजल्या सारखा काळोख पसरला होता. रिक्षातून जाताना शहर भ्रमंती होतच होती. विविध माणसे मी न्याहाळत होते. चाल खूप झाली होती आता अराम गरजेचं होता. 

खूप उशिरा रूमवरच गरम गरम  दाल  खिचडी मागवली. ज्यात भरपूर भाज्या होत्या. ती खाल्ली आणि कधी झोपलो कळलंच नाही. 
__________________________________________________________

रुमजवळ गिरीजा घर नावाची पुरातन वास्तू  होती. सकाळी आजू बाजूला चालत फेरफटका मारला. पुरी भाजीचा नाश्ता करून "खुसरू बाग " पाहायला गेलो. आज पावसाची भुरभुर होतीच. जुन्या काळच कोरीव कलाकुसरी बांधकाम असलेले चार मकबरा या जागी आहेत. पावसातच चारही मकबरा बघितले. 

निसार बेगम (खुसरो कि बहन) ,खुसरो (जहाँगीर और शाह बेगम का बडा बेटा )
शाह बेगम (जहांगीर कि बेगम ), बीबी तामोलन 

असे हे चार मकबरे उर्फ थोम्ब  आहेत. चारीतली  विविधता पाहून कलाकाराचं कौतुक वाटलं. उत्तर प्रदेशातल हे प्राचीन शहर प्रयाग नावानी प्रसिद्ध होत. अकबराने नाव बदलून इल्हाबाद ठेवला. नंतर अलाहाबाद प्रचलित झालं. 

हिंदू देवालयाच्या मानानी याची अवस्था जास्त ठीक ठाक वाटली. आजूबाजूला झाडं, पाऊलवाट, कारंजी होती. आम्रपाली जातीची बरीच आंब्याची झाड होती. दुतर्फा नारळाची झाड तसेच बसायला बाकडे होते. पावसामुळे बसू शकलो नाही तो भाग वेगळा. तिकीट नसूनही जागा स्वच्छ आणि वस्तू नीटनेटकी आढळली. दोन वाजत आले होते. भूक लागली होती. कसा वेळ गेले समाजालाच नव्हत. नंतर ओम साई रसोई मध्ये जेवलो. रूमवर जाऊन आराम केला. वाराणसी ला जाण्या साठी ओला बुक केली.  बसनी जाऊ म्हणून चौकशी केली पण वैयक्तिक वाहन सेफ वाटल. पुण्यात कोविड चा बहर ऐकत होतोच. इकडे सेफ होतो. पण तरी कॅबन जायचा ठरवून साडे चार पाचला वाराणसी कडे प्रस्थान केलं. आभाळ भरून आलेलं., पावसाचा जोर वाढलेला कॅबच्या खिडकीतून पाहत पाहत गोपीगंजला चहा भाजी खायला उतरलो.  इतक्या तर्हेचे कुल्हड पाहून मस्त वाटत होत. वापरून फेकताना मात्र वाईट वाटत होत. 




संध्याकाळी साडे आठ नऊ च्या आसपास गिरीजा घर चौक बनारस  उर्फ कशी उर्फ वाराणसी ला पोचलो. गंगा आरती करून येणारे लोक दिसत होते. या चौका पुढे चार चाकीला बंदी होती. सामान हातात घेऊन हॉटेल गंगा दर्शनम गाठायचं ठरवलं. लालसर रंगाचे दगड पूर्ण रास्ता भर होते. दुकानं  बंद होण्याच्या मार्गावर होती. हॉटेलवरून एकजण न्यायला आला म्हणून ते सापडलं. दशाश्वमेध घाटापासून फक्त पाचच मिनिटावर ते होत. 

कॅबच्या ड्राइवरनं  सांगितलं कि पहाटे दर्शन छान होतं. सामान रूमवर टाकून तत्काळ दशाश्वमेध घाटावर गेलो. आरती नुकतीच झालेली, पाण्यावर टोपलीत तरंगणारे दिवे, गार वारा, वाऱ्यावर हलणाऱ्या होड्या, ढगातुन  लपत लपत पाहणारा चंद्र, आमच्या सारखे पर्यटक, घाटाच्या उंचच उंच पायऱ्या, रंगीत फुलांच्या छत्र्या, तोरण, धुपाचा मंद वास,  प्रसन्न वातावरण मन शांत झालं. दुसऱ्या दिवशी पहाटे तीनला उठून अंघोळ करून काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जायचं ठरलं. 
_________________________________________________________________________

पहाटे साडे तीनला रुमवरुन निघालो. फोन पण घरीच ठेवले. चहा आणि अभिषेकासाठी चे जेमतेम पैसे  जवळ ठेवले.  पायीच द्वार नंबर एकला गेलो. काशी विश्वनाथ देवळाच्या मुख्य द्वाराजवळ पोचलो, चौका चौकात पोलीस आहेत, विचारत विचारत गोल गोल वळण घेत देवळाजवळ पोचलो. बाहेर गारठा, पाय गार फरशीवर गारठलेले, मनात देव कसा असेल चा ध्यास! आत पोचताच तुरळक गर्दी दिसली. देवळा भोवती मोठ्ठा परिसर, मंद ओंकार ध्वनी ऐकू येत होता, मधोमध सोनेरी कळसाचे चकाकते  देऊळ. 


छोटी लाईन संपून आतल्या प्रसन्न गाभाऱ्यात प्रवेश मिळाला. चकाकत्या सोनेरी चौकोनात अर्धा फूट आत शिवलिंग काळभोरं ! सभोवताली सोन्याचा मुलामा... तो थंडगार स्पर्श शिवलिंगाचा..... अभिषेकाचा पाणी... देवाला हात लावण्याच भाग्य लाभलं. 

दूध, पाणी, धोत्रा  फुल, बेल विविध वस्तू लोक वाहत होते. मी देव डोळे भरून पाहत होते. न ढकला ढकली होता शिस्तीत दर्शन होत होत. पहाटे चारला  आरती झाली कि दाराबाहेरून दर्शन मिळते असं नंतर समजलं. म्हणून शिवलिंगास हात लावता आला. नमस्कार करता करता हातावर देवाची बेलपत्रं आली. पाठोपाठ पुढे चलाची आरोळी पण... बाहेर पडून प्रदक्षिणा घालून परत दर्शन झालं. डोळे भरून देव डोळ्यात साठवला. परत रांगेत उभं राहून परत दर्शन घेतलं. मिळालेला प्रसादाचा हार मस्तकी लावला. अभिषेकाचं दुग्ध तीर्थ लाभलं. गंधाची बोटं कपाळावर उमटली.  अंग शहारून गेलं ! पाठ केलेलं रुद्राष्टक तो भोलेनाथ पाहताना म्हणायचं पण भान राहिलं नाही. नंतर प्रदक्षिणा पूर्ण करताना चार पाच देवालयांचं दर्शन घेतलं. अन्नपूर्णा गंगाजी अशी ती होती. नंदी दर्शन घेतलं. कानात गुपित पण सांगितलं. नंतर शांतपणे  बसलो. नवीन झालेला परिसर छान बांधून झालेला प्रत्यक्ष बघत होतो.. उजवीकडे बार लावलेले होते त्या पलीकडे उभं राहून आरती होत असताना लोकं आरती म्हणत होती . नंतर तिकडे मनात होत ते रुद्रष्टकं पण म्हटलं गेल. ती पण इच्छा पुरी झाली. खुप खूप छान अनुभूती घेऊन अभिषेकाचं तीर्थ आणि गंध घेऊन दुसऱ्या गेटनी बाहेर पडलो. 
हर हर महादेव !




बाहेर पडलो ते थेट मनकर्णिका घाटाचं आला. पहाटे पाचची वेळ, शांत गल्ल्या, थोडा बोचरा वारा, लाकडाच्या ओंडक्याच्या चवडी (भिंतीच जणू. ) , जळणाऱ्या चिता , काही विझत धुमसणाऱ्या, राख धूर, पावसाचा  वाळत चाललेला  रास्ता असा हा घाट दाह संस्कारासाठी महत्वाचा आहे. भगवान विष्णू ची कर्णिका इकडे  पडली अशी कथा आहे म्हणून हा मनकर्णिका घाट. 

जिकडे स्मशान तिकडे शिवस्पंद हे असणारच. यालाच महास्मशान पण म्हणतात. मनकर्णिका घाटावर समजतं जीवनाचे अंतिम  सत्य काय आहे? जे नश्वर शरीर सोडून आत्मा मुक्त होतो. पाच दहा मिनिटे थांबून विष्णू पदमन पाहून आम्ही परत निघालो. पावणे सहा झाले होते, आता मात्र चहा हवाच होता. परत जाताना मुख्य रस्त्यानी गेलो वाटेत चहा घेऊन रूमवर गेलो. थोडे आवरून आराम करून तासाभराने नास्ता केला. 

पार्वती  व शंकर लग्नानंतर कैलास पर्वतावर जाण्या आधी  काशीला  आले होते, तेव्हा माता पार्वतीने दुसरी कर्णिक जवळच असणाऱ्या शक्तीपीठ जवळ ठेवली . सतीचे एक शक्तीपीठ मनकर्णिका घाटा जवळच आहे. सती मातेची कर्णिक कान इकडे पिंड स्वरूपात होते. देवी विशालाक्षी माता शक्तीपीठ नावानं हे देऊळ आहे. माता विशालाक्षी तसेच कालरात्री देवीचे सुंदर देऊळ पाहून समाधान पावले. नवरात्रीत फक्त ऐकलं होत मी हे नाव. सातवा दिवस या देवीचा असतो. विशालाक्षी माता लाल साडीत होती, तेजस्वी डोळे, लोभस रुपडे मन भावन होते. आज कोल्हापूर नंतर योग आलेलं हे दुसरं शक्तीपीठ !

कालरात्रि दुर्गा माता वाराणसी

नंतर काल भैरव नाथ देवळात गेलो. महादेवाचा अंश हा कालभैरव, हा प्रत्येक शक्तीपीठ बाहेर विविध नावानी आहे, देऊळ तस छोटसच पण प्रचंड तेज असलेली हि मूर्ती, लाल पांढऱ्या फुलाच्या हारांनी सुंदर सजवलेली होती. भरपूर बेलानी सजावट केली होती. ती पाहून वाटत कि आत्त्ता उभा राहील देव. फोटो काढायला अलाऊड नव्हते. 


काशीतले रस्ते....


तिकडून नंतर रिक्षानी सारनाथ ला गेलो. भगवान बुध्दांनी पहिली दीक्षा दिली ते हे ठिकाण. ज्या झाडाखाली ती पाच शिष्याना दीक्षा  दिली ते झाड तिसरी पिढी (मूळ वृक्षाचे रोप बनवून इकडे लावले आहे ) भगवान बुद्ध यांच्या विविध मुद्रा असलेले पुतळे इकडे आहेत. प्रत्येक मुद्रेचा विशिष्ट असा अर्थ आहे. अशोक चक्र पिलर आणि खूप मोट्ठी भगवान बुध्दांची मूर्ती इकडे आहे. जपानी शिष्याची मूर्ती पण आहे तो शुभ मानतात चिनी लोक. साधनेची साक्षीदार हि धरणी म्हणून जमिनीला हात लावलेली काळी  पाषाणाची सुंदर मूर्ती इकडे आहे.  भगवान बुद्धांच्या आईची मूर्ती पण इकडे आहे. जन्मा नंतर त्या लगेचच स्वर्गवासी झाल्या. सिद्धार्थचा गौतमी नावाच्या स्त्रीने सांभाळ केला म्हणून नंतर सिद्ध झाल्यावर त्यांनी गौतम बुद्ध म्हणून घेतलं. 

जवळच  गावात सुत करणारे हातमाग व मशीन असलेली गावं आहेत. बनारसी कापड इकडे  विणले जाते. त्या चे दुकान पण होते परंतु गंगा आरती गाठायची असल्यानी आम्ही गेलो नाही. 

______________________


दशाश्वमेध घाटावर तिन्हीसांजेला हि गंगा आरती असते. हिलाच सप्तर्षी आरती पण म्हणतात. घाटावर स्वच्छता सुरु होत होती . आम्ही आरतीची तयारी सुरु असतानाच पोचलो. आरतीची मोठं मोठाली साधनं चकाचक घासून स्वच्छ करून झाली होती. वात कापूर बसवणं कामं सुरु होती. सात आरत्या तयार होऊन सज्ज होत्या. माहोल बनत चालला होता. तितक्यात वरून आदेश आला कि सात आरती ऐवजी एकच करा तसेच घाटावर गर्दी होऊ नये म्हणून साडे चार ते रात्री दहा बोट व घाट बंद केला. बाकी कडे कोवीड ची गडबड सुरु आहे म्हणून काळजी साठी हे आदेश आले. दोन तीन चकरा घाटावर मारून रूमवर गेलो. पावणेसातला आरतीला सुरुवात होते हि पाऊण तास असते.  (गंगा नदी मध्ये स्नान करून पापं नष्ट होतात. गंगा नदीला वरदान आहे कि लोकांची पापं नष्ट होतील तरी गंगा पवित्र राहील. )

बरोबर वेळेत पोचून दुरून गंगा आरतीचे नयनरम्य दृश्य पाहत होतो. आज सात ऐवजी एकच आरती केली. त्यामुळे आमचा योग्य चुकला नाही. गंगा मय्याला भक्तिपूर्वक नमस्कार करून परत फिरलो. काशीची गंगा आरती फार महत्वाची आहे तसेच ऋषिकेश हरिद्वार ला पण गंगा आरती असते. 


गंगा आरती करणारे गुरुजी ठरलेले असतात विविध रंगी सिल्क चे सोवळे त्यांनी घातलेलं असतात. सूर्यास्तानंतर लगेच हि आरती असते. सात पैकी मधल्या  आरती च्या जागी  गंगेची मूर्ती असते. घंटा नाद, धुप आरती, मंत्र घोष, असा सुंदर कार्यक्रम असतो पाऊण तास. 






बंगाली मिठाई ची तसेच  विविध नव नवीन पदार्थ चव चाखत जेवण कसे होत होते समजत नव्हते. गंगा आरती बोटीत बसून पहायची मजा हुकली तरी सकाळची बोट चक्कर घाट पाहत मारू असा विचार करून काशीच्या राहणीमानाची ,माणसांची , दुकानाची मजा लुटत फिरलो. खीर कदम माझा आवडता पदार्थ झाला. बनारसच पान चुकावं शक्यच नव्हतं.  

____________________

दुसरा दिवस तुलसी मानस मंदिर पाहायला गेलो. रामाचं लोभस रूप, राम लक्ष्मण सीता, सत्यनारायण लक्ष्मी माता, अन्नपूर्णा माता महादेव अशी तीन देवळं आहेत. तुलसीदासांची  मूर्ती वरच्या मजल्यावर आहे. तुलसीदासांच समर्पण समजावणारी, रामायण आणि त्यांच्या जीवनविषयक कलाकृती प्रदर्शन तिकीट लावून तिकडे आहे. संपूर्ण भिंतीवर रामचरित मानस गान कोरले आहे. रामाची आरती आम्हाला मिळाली. आरतीचा ढोल व घंटा मशीन होते ते फार भारी होतं. त्या आवाजांनी भारावून जाणार नाही माणूस तर शपथ !


आरती घेऊन जवळच असलेल्या संकट मोचन हनुमान देवळात गेलो. पाहताना वाटत कि संकटाला सामोरे जातानाची रौद्र मुद्रा आहे हनुमानाची .... पूर्ण शेंदूरमय हि मूर्ती मातीची आहे. तिच्या हृदयात राम आहे. तो हारामुळे आणि पुढे चला च्या घाईत  दिसला नाही. एक प्राचीन विहीर तिकडे आहे. महाकवी तुलसीदासांना पहिल्यांदा हनुमान या जागी स्वप्नात आले तिकडे त्यांनी या मूर्तीची स्थापना केली. हनुमान बाहूकची रचना या जागी त्यांनी केली. आजूबाजूला तुळशीची खूप झाडे लागली गेली, हनुमानाच्या बरोब्बर समोर रामाचे देऊळ आहे. हनुमान प्रभू रामचंद्रां कडे पाहत आहे अशी तिकडे भावना आहे. इकडचा पेढा प्रसाद खूप मस्त होता. आज नास्ता न करता निघालो त्यामुळे तो तिकडेच फस्त  केला. घरी न्यायला परत घेतला. 

पुढे लक्ष्मी रेस्टॉरंट मध्ये मस्त जेवलो. नंतर दुर्गा कुंड , दुर्गा माता देवळात गेलो. हे देऊळ पूर्ण लाल पाषाणात आहे, जवळच कुंड आहे, कारंजे आहे, माँ दुर्गा यंत्र स्वरूपात इकडे विद्यमान आहे. कुष्मांडा देवी नाव आहे. इतके सुंदर सजवतात देवीला काय सांगू, एकंदरच लाल गावठी गुलाब इकडे जास्त आहे त्यात देव खुलून दिसतात. दुर्गा कुंड पाहून मणी मंदिर देवालयात गेलो. ते बंद झाले होते नंदी पाहून परत फिरलो. इकडे १०८ शंकराच्या पिंडी आहेत. 


तिकडून लागेचच अस्सी घाटाकडे डायरेक्ट रिक्षा केली. लेमन टी घेतला आणि घाट वॊक करून सर्व घाट पाहू असे ठरले. हा घाट वॊक न करता गंगा नदीतून नावेने पण घाट पाहत जात येते. काशीत एकंदर ८४ घाट आहेत. सुरुवात अस्सी घाटापासून केली सा धारत तास भर तरी लागला दशाश्वमेध घाट ला पोचायला. 

जाताना लागलेले घाट : अस्सी घाट, गंगा महाल घाट, रिवा घाट, तुलसी घाट, भदैनी घाट, जानकी घाट, माता आनंदमयी घाट, वाचाराज घाट, जैन घाट, निषाद घाट, प्रभू घाट, पंचकोट घाट, चेतसिंह घाट, निरंजनी घाट, महानिर्वाण घाट, शिवाला घाट, गुलरिया घाट, दंडी घाट, हनुमान घाट, कर्नाटक घाट, हरिश्चंद्र घाट, लाली घाट, विजयनगर घाट, केदार घाट, चौकी  घाट,  सोमेश्वर घाट, मान सरोवर घाट, नारद घाट, राज घाट पेशवा, कोरी घाट, पांण्डे घाट, सर्वेश्वर थाट, दिगपतिया घाट, चौसट्टी घाट, राणा महाल घाट, दरभंगा घाट, मुन्शी घाट, अहिल्याबाई घाट, शितला घाट, दशाश्वमेध घाट. 

प्रत्येक घाटाचे वेगळे महत्व आहे. 


पुढचे चार घाट आधीच पाहून झाले होते.  प्रयाग घाट, राजेंद्र प्रसाद घाट, मन मंदिर घाट,  मीरा घाट, मनकर्णिका घाट . 






असा घाट वॉक करून अहिल्याबाई घाटावर निवांत बसलो. गेल्या दोन दिवसात इतका निवांतपणा आज मिळाला. साडे तीन चार ची वेळ असेल तासभर तरी नुसते बसलो. तेव्हा मनात विचार आला कि किती शांत शहर आहे हे ! कोणी लहान नाही कोणी मोठे नाही, कोणी कोणाचा मत्सर करताना दिसणार नाही, आलेले पर्यटक आपले मायबाप,  सगळे जण मदतीला तत्पर, एक ठराविक वर्ग सोडला तर सगळेच  काही ना काही कष्ट करणारे, चप्पल सांभाळून एक रुपया मिळवणारा पण समाधानी, पोलीस कर्मचारी पण सतर्क, सफाई कर्मचारी नीटस, पहिल्या दिवशी  रस्त्यात शेण दिसलं तर इ इ इ झालं पण नंतर ते ओलांडून  पुढे जायचं जमलं. आपोआप झाला ते. रस्त्यात कधीही कुठेही गाय कुत्रा येणार पण ओरडणार नाही त्रास  देणार नाही कडेनी जाणार, एक कुत्राही आपल्यावर भुंकणार नाही तसाच अनुभव घाटावर भरपूर माकड होती पण विध्वसंक नव्हती. राहणीमानावरून गरीब वाटणारे पण आहे त्या परिथितीत सगळे खूप समाधानी दिसत होते. ते संतोषाचे स्पंद खूप छान  होते. कोणीच कुरकुरे नव्हते, हॉटेलचा मालक शिपायाशी पण तितक्याच अदबीनं बोलेल जितक्या अदबीनं तो  गिर्हाईकाशी बोलेल. धक्का लागलाच तर माफ करो हा दीदी म्हणत नमस्कार करणार लगेच, इतकया होड्या नावा होत्या नावाडी होते पण त्यांच्यात पण एकवाक्यता होती. एकंदरच ज्यांचं जसा आयुष्य आहे ते सगळे त्यात खुश होते हे मलाच काय मुलाला पण जाणवलं. साधे रिक्षावाले पण इतरांना जपत गल्ली बोळातून रिक्षा काढतात. एकंदरच बनारस शहर जे भोलेनाथानी निर्माण केलेलं असा उल्लेख आहे ते समाधानी जाणवलं.  काशी विश्वनाथ देवळा जवळचे कर्मचारी पण इमानदार जाणवले. मोदींनी खूप सुधारणा केली म्हणून दुवा देणारे बरेच दिसले. महादेवाच्या ज्योतिर्लिंगाचे मुख्य द्वार ते ललिता घाट बांधकाम लवकरच संपेल. सगळी कामं रात्री होताना दिसत होती. दिवसा अडचण नाही.  

मनातली ज्योतिर्लिंग दर्शन इच्छा पूर्ण झाली. फार फार छान वाटल. आज रात्री परत निघायचं जीवावर आलेलं. संध्याकाळी आरती झाल्यावर परत घाट फिरून आलो. प्रसाद घेतला. ट्रेन मधलं जेवण बांधून घेतलं आणि पुण्यभूमीचा हर हर महादेव गजर करत निरोप घेतला. 

मी अनुभलेली श्री क्षेत्र काशी आणि प्रयाग आयुष्यभर स्मरणात राहील.  

पार्वती पते हर हर महादेव !

गौरी पाठक

०७ ते १२ जानेवारी २०२२

Thursday, 14 October 2021

नवरंगांची गंमत

नवरंगांची गंमत

काही दिवसांपुर्वी एक मेसेज व्हाट्सअप वर फिरत होता. पुराणात रंग का आहेत त्याचं महत्वं काय असा उल्लेख नाही किंवा या दिवशी ह्या रंगाचे कपडे घाला असं म्हटलेलं नाही. मार्केटिंग चे फंडे आहेत वगैरे वगैरे. ते काही असलं तरी एकजुट दिसते रस्तावरून जाताना एका रंगाचे कपडे परीधान केलेल्या बायका पुरूष बघुन. एकत्र येऊन काहीतरी करण्याची संकल्पना मला आवडली म्हणुन मी पण रंग फाॅलो करतेच. कधीकधी तिथी दोन दिवस पडते मग जमेल फाॅलो करायचं.
 
पण रंगांची गंमत काय आहे, ते काय सांगतात याचा विचार या पोस्टमुळे केला गेला. मग विचार आला कि खरंच काय असतील गुपितं या रंगान मागची ? शोध सुरु केला. समजलेली माहित जमा करू लागले. आपण जे करतो त्यामागचा हेतु समजला की ते करायला अजुन ऊत्साह येतो. रंगांच महत्व जाणुन ते आचरणात आणुन वागुया अशी कल्पना तर करू शकतो.  शेवटी काय आनंदी राहणं महत्वाच!

नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचा प्रत्येक दिवस मा दुर्गाच्या अवताराला समर्पित आहे. प्रत्येक तिथीला नवदुर्गेचे एक रूप प्रतिकात्मक रंगाच महत्व दर्शवते, त्यात असणाऱ्या शक्तीचा या रंगाशी गुढ संबंध आहे. 

१) प्रतिपदेला पिवळा रंग महत्वाचा मानला जातो.
काय सांगतो पिवळा रंग?
देवी शैलपुत्रीचा हा आवडता रंग. जो जगण्यातला  ऊजळपणा, आनंद, आशा, प्रोत्साहन दर्शवतो. शैलपुत्री ही पर्वतकन्या योगमार्गावरच्या चेतनेचे सर्वोच्च स्थान. त्या सर्वोच्च स्थानाची आठवण करून देतो हा रंग जो मानवातलं तेजोवलयही दर्शवतो.हा रंग मनामध्ये नवे विचार निर्माण करतो.


२) व्दितीयेला हिरवा रंग महत्वाचा मानला जातो.
काय सांगतो हिरवा रंग ?
सृजनशीलता, निसर्गाची आठवण, नुतनीकरण अंकुरण, वाढ, सुसंवाद, ताज्या दमाची शक्ती देवी ब्रह्मचारिणीच प्रतीक. म्हणुन तिचा आवडता रंग हिरवा.
३) तृतीयेला राखाडी रंग महत्वाचा मानला जातो.
काय सांगतो राखाडी रंग ?
देवी चंद्रघंटेचं हा प्रतीक, गडद रंग नकारात्मकता असूनही आवेशपूर्ण भाव  व त्यावर त्यातून निर्माण होणार निर्धार वाईटावर मात करण्याचा. वाईट वृतींचा नाश  सांगतो हा राखाडी रंग.
४) चतुर्थीला केशरी रंग महत्वाचा.
काय सांगतो केशरी रंग ?
ऊर्जेचे सूक्ष्मातून सूक्ष्म व विशालतेतून विशाल होण्याच तत्व, ती ऊर्जा, प्राणशक्ती, समाधानी सकारात्मक ऊर्जा जो प्रतिक आहे कुष्मांडा देवीचं, जी सुखी समाधानाचे संकेत देते.
५) पंचमीला पांढरा रंग महत्वाचा. 
काय सांगतो पांढरा रंग?
ज्ञानशक्ती, कर्मशक्तीच द्योतक. देवी स्कंदमाता या दोन्हीच मिश्र तत्व जे पवित्रता, शांतता व ध्यान सुचक आहे.
६) षष्ठीला लाल रंगाच महत्वं आहे.
काय सांगतो लाल रंग?
शुरता, योद्धा, दुष्ट शक्तींवर मात करण्याचा ध्यास, नेतृत्व, आकर्षण शक्ती, देवीचा सकारात्मक क्रोध जो अन्याय, अज्ञान व दुष्टांवरील राग निर्भयता दाखवतो. देवी कात्यायनीच प्रतिक हा रंग.
७) सप्तमीला निळा रंग महत्वाचा. 
काय सांगतो निळा रंग?
अफाट शक्ती शांततेची दाखवतो, निर्भयता, सुरक्षितता, निश्चलता, मनाची शांतता - स्थिरता, विश्वसनीयता, प्रसन्नतेच प्रतिक देवी कालरात्रिच आहे.
८) गुलाबी रंग अष्टमीचा.
महागौरीच प्रतिक गुलाबी रंग जी तत्पर आहे भक्तांच्या मनोकामना पुर्तीसाठी, दुःखातुन सुटका, नवी आशा, स्व शुद्धीकरण भावना, सामाजिक ऊन्नती दर्शवते.

९) नवमीला जांभळा रंग महत्वाचा.
काय सांगतो हा?
अलौकिक शक्ती देणारी सिद्धदात्री देवीच प्रतिक जांभळा, आकांक्षा पुर्तीचं ज्ञान देणारा, नैसर्गिकरीत्या अस्सल, महत्वाकांक्षेची शक्ती दाखवणारा प्रतिक.

रंग काय सांगतात, त्यांचे गुण काय ते समजुन ते अनुभवण्याचा प्रयत्न करू हीच या नवरात्रीतली शिकवण. काही ऊत्साही मैत्रिणींनी दिलेली साथ पण मोलाची आहे यात. सगळ्यांना धन्यवाद!

गौरी.

Monday, 23 August 2021

माणसाच्या जंगलाला भेट Sipna - A man made Jungle

Sipna - A man made Jungle  सिपना वनराई
जंगल म्हटलं कि डोळ्यासमोर हिरवागार परिसर येतो. माणसाचं जंगल म्हणजे काय ? तर मानव निर्मित वनराई. सिपना मॅन मेड फॉरेस्ट पाहण्याचा योग्य आला. वनसंवर्धन हि काळाची गरज होणार हे ओळखून श्री व सौ नारगोळकर यांनी पुण्यात सिंहगड जवळ माळरानावर फुलवलेलं - माणसाचं जंगल. हे जेव्हा ऐकलं तेव्हा वाटलेलं कि असा आपणहुन कसं वसवलं असेल जंगल? परंतु अनेक वर्षांच्या मेहनती नंतर दिसणारं ते हिरवंगार माळरान पाहून खरंच आश्चर्य वाटलं.
इतक्यात कोरोनामुळे वनराई, निसर्ग याकडे आपण जरा जास्त आपुलकीनं पाहु लागलोय खरं . निसर्ग पाहायची अनुभवायची आवड तशी मला आहेच, सिपनाला भेट देऊन अजुन छान वाटलं. आपल्या जवळच इतका छान प्रकल्प आहे हे ठाऊकच नव्हतं.
श्री. नारगोळकरांनी २५ वर्ष पुर्वी हि जमीन घेऊन हा प्रकल्प हि वनराई वसवली आहे. एकंदर २२ एकर जमीन होती. सिपनाला भेट द्यायची तर आगाऊ कल्पना द्यावी लागते. नयना ताई योग्य मार्गदर्शन करतात. आम्ही चौघे जण सकाळी साडे आठ ला येतो असा पक्कं झालं . पोचायला फार शोध शोध करावी लागली नाही. मुख्य रस्त्याला लागून आत गेलं कि लाल रंगाचा बैठा बंगला आपला स्वागत करतो. दारातच मस्त मनमोहक फुलं असलेलं डाळींबाच झाड आहे. आत बसायला छान सोय आहे. मनापासून स्वागत करणारा एक दादा आहे. आम्ही पोचलो तोवर नयना ताई आल्या नव्हत्या मग जागेभोवती चक्कर मारून चिंच, मोगरा, कांचन वृक्ष बघितले. कोरांटी बांबू ची झाडे दिसली. इतक्यातच ताई आल्या. मस्त गप्पा मारत नाश्ता झाला.
दादा बरोबर जंगल पाहायला निघालो. घरामागे मोठ्ठी तुडुंब भरलेली विहीर होती. दोन बाकडे होते. मुक्त बसून घेतलं. निवांत शांत जागेच  सुख वेगळच. पक्ष्यांचा आवाज येतच होता. रानटी झाडांचा, सालांचा वेगळाच वास प्रकर्षानं जाणवत होता.  हिरव्या रंगाच्या अनंत छटा डोळे भरून बघत होतो आम्ही. दादाच्या मागे मागे जात होतो. सूर्यप्रकाश पानांमधून आत येत होता, त्यामुळे बदलणारा पानाचा रंग अवर्णनियच  होता. वाटेत लहान अंडी फुटलेली दिसली, नुकतेच कोणी तरी जन्मले होते. आता मात्र पावले जपून टाकू लागलो आम्ही.
 बाजूला गर्द झाडी मध्ये पाऊलवाट मातीची.. अहाहा ! मुंग्यांसारखी दादाच्या मागे आमची ओळ होती. कोवळ्या पानावर पडलेलं दवबिंदूच दिसणं फार मनमोहक होतं. कांचन वृक्षाला असणारी गोड गुलाबी फुलं प्रथमच बघितली मी. मोठं मोठी सीताफळाची झाडं डवरली होती. एक विशेष आहे इकडचं कि फुलं फळं तोंडात नाहीत ते. ती फक पक्ष्यांच्याच मालकीची. डवरलेली फळ झाडं , ओली झालेली झाडांची खोडं , त्यावरचे कीटक, मुंग्या, कोळ्यांची जाळी , फुलपाखरं गुण्या गोविंदानी नांदत होती.
हिरवा चाफा, सोन चाफा झाडं दादानी दाखवली. आता पक्ष्यांचे आवाज वाढलेले होते. आत्तापर्यंत जमीन पाऊलवाट थोडी कोरडी होती. पण इथून पुढे तिचा ओलावा वाढत होता. चंदनाचे झाड त्याची माहिती घेतली. त्याला फळं येतात ती पक्षी खाऊन विष्ठा पडते तिचा पण यात सहभाग आहे याचा उलगडा झाला. दादा छान माहिती देत होता. निसर्गाची कमालच बघत होतो! 
पुढे ऐक बनवलेलं तळ आहे. प्राणी पक्षी त्याचा छान वापर करतात. उन्हाळ्यात जास्त वापर होत अस्वा. बेहडा, हिरडा झाडं त्यांचं औषधी महत्व समजलं. पुढे होता पांढरा पळस. हा क्वचितच सापडतो. काही झाडं नारगोळकरांची दुरून रोपं आणुन लावली आहेत. केशरी पळस वेगळा असतो, तो सहज सापडतो. रिठा, बेल झाडं दिसली. या वनस्पतीच्या खोडांचा एक विशिष्ठ वास येत होता. भुरकट पांढरट खोडाचे वृक्ष, ताटभर मोठ्या पानांचा भरगच्चं वृक्ष लक्ष वेधत होते.
आता पाऊलवाट निम्मी होत गेली. एकमेकांत गुंतलेल्या वेली जास्त दिसू लागल्या. पाऊलवाटेजवळ पोपटी पण बारीक विविध आकाराची झुडूप होती. फुलपाखरं स्वछंद फिरत होती. आता मात्र फोटो काढण्याचा मोह आवरेना. एक झाड तर वाकवलेल्या काळ्या हँगर सारखी शेंगा असलेलं होत. चालताना सावध चालावं लागत होतं कारण अचानक कोळ्याची जाळी समोर येऊन तुटतील अस होत होतं . आपण सिमेंटच्या जंगलातले कोळी ते माणसाच्या जंगलातले कोळी भिडत होतो. मोहक झाडाची जांभळी फुलं असतात असं दादा म्हटला. सिझन नाही म्हणून फुल दिसली नाही. या फुलांच्या पिठावर आदिवासी लोक उदरनिर्वाह करतात म्हणे. भक्कम मोठी खुरदरी खोडं त्याचा स्पर्श अजूनही आठवतो. नंतर थोडा दगडी उंच सखल भाग लागतो. कुठून कोणतं झाड सुरु होतं आणि संपतं समजतच नाही. दगडी भाग उतरून दादांनी नेलं. त्याजागी बिडी करतात ती झाड होती. त्या पानाची  झाडणी पण करून वापरतात आदिवासी लोक.
नंतर दिसला तो गुळवेल. हा फार ऐकलेला. उंची कमी पण झुपकेदार झाड होती ती होती अर्ध सुपारी ची झाडं. आधी फुलं येतात मग सुपारी. मायग्रेनवर गुणकारी. गिलिया झाडाची माहिती हुकली माझी. पुढे दिसले ते पुत्रंजीवा झाड. तुळशीची माळ करतात ते . नंतर येतात सागवान , आजवर फक्त सागवानी फर्निचर बघितलं होतं, मोठ्या खोडाची झाडं पाहण्याचा योग आज आला. पूर्वी सागवानाचीच पान वापरून पोलिश कसं करायचे ते पण चुरून दादांनी दाखवलं. हल्ली हे वापरात नाही. अगदी ओरिजिनल पोलिश सारखाच रंग.
ऊंदिर पाला खाऊन मरतात ते झाड बघितलं. शेतकरी ही झाडं बांधावर लावतात. ही झाडं दिडशे फुटावरून पाणी खेचुन घेतात. नाव _____

आता पुढे चिखल सुरू आणि चपलांचा आकार बदलु लागतो. साधी चप्पल तर ओळखण्या पलीकडचीच होते. त्यामुळे सावधपणे चालण गरजेच. 
माणसाच्या गुडघ्याइतपत झाडं, लहान लहान पण तीन चार रंगाची फुलझाडं कास पठार सारखी मधेमधे होत. चिमणी वजा बरेच पक्षी दिसु लागले की आपण रमुन जातो. रोजचं आयुष्यच विसरून जातो.  कोणाला गारवा जाणवतो तर कोणाला डास चावतो, कोणाला पक्षी साद घालतात तर कोणाला हिरवळ कॅमेराबंद करायची असते. मजा सुरू होती. रस्ता म्हणजे अगदी -
भिजलेल्या वाटा... 
चिंब पावसाची ओली.....
 या गाण्यासारखाच वाटु लागतो.
चिखलात पांढरे ठिपके असलेले मोठ्ठे पैसे, गांडुळ आणि अनेक नाव ठाऊक नसलेले त्यामुळे न समजलेले असेही प्राणी दिसतात.
पुढे मोहरीच्या शेतेत सारखं शेत त्याच्या पलिकडे गिर गाईंचा गोठा होता.
जवळच वाहणारे चिखलाचे ओहोळ, गोठ्याचा तो टिपीकल वास आसमंतात भरून जाणवतो. भारद्वाज ,कोकिळा अनेक पक्षी लक्ष दिल तर दिसतात.
दादाला सिपनासाठी काम करून ३५ वर्ष झाली आहेत. २००४ साली नारगोळकर सर अंदमान जवळच्या बेटावर गेले होते तिकडे त्सुनामी मधे बेपत्ता झाले असे समजले. पण हार न मानता नयना ताईंनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट पुढे चालु ठेवलाय.  सरांचा पाच सहा वर्ष सहवास लाभला त्यातुन ईतकं शिकलो अस कौतुकान दादा सांगत होता. आता काही भाग जाळला लोकांनी, झाडं तोडली म्हणुन कमी झालय जंगल. परंतु ताई हे ठेवणार आहेत ते फक्त आपल्याला ऑक्सिजन मिळेवा म्हणुन! सलामच त्यांना.
पुढे काटेसावर झाड होतं, खोडाला अक्षरशः काटे. या काट्यांपासुन सौदर्यपिटीकांवरचे औषध बनते. यंदाच्या पावसात याच्या फांद्या तुटल्या. पण निसर्ग पहा थांबत नाही सृजनशील तत्व वापरून शिल्लक असलेल्या फांदीला पण पालवी फुटण सुरू झालेलं दिसलं.
नंतर होतं समुद्रफळाच झाडं कावीळीवर रामबाण ऊपाय. त्याच फळ ऊभ लंबगोलाकार दाखवलं दादानी. कर्मळ नावाचा वृक्ष दिसतो पुढे. गणपतीच्या केवड्याची झाडं, रसरशीत काटेरी पोपटी पिवळी पानं.
सीता लंकेत अशोकवनात होती ती अशोकाची झाडं सेम आंब्यासारखी पानं त्याची. जाणकारालाच ओळखता येईल फरक. नंतर एरंडा, मुगली एरंडा, गुलमोहराची जवळजवळ झाडं. बहावा -अमलताश व्वा!  चालताना वाकुन चालाव लागत होतं मधेमधे वेली फांद्या येत होत्या. नंतर होती मोहोगणी, महागणीची झाडं. गर्द झाडीत मस्त फोटो काढले. निसर्गाच्या विविधतेची कल्पना आली. 
दादा पण न कंटाळता सर्व प्रश्नांची उत्तर देत होता. एकाचवेळी पाच पान असलेल झाड वर पाहता चांदण्यांनी भरून गेलेलं छतच दिसत होतं. आणि मोकळा श्वास घेणारे आम्ही खाली.

जास्वंदासारखीच पण बारीक फुलाची झाडं मस्त होती. तेंदुरपत्ताची डार्क पानाची झाडं जास्त लक्षवेधक होती. औषधी शिवण झाड बघितलं. पक्ष्यांच्यां किलबिलाटात शिसम शिसवीची ऊंच झाडं होती. झाडीच्या बोगद्यातुन चालल्या सारखी पायवाट होती. जंगलात थोडा अंधार जाणवला.
साधुंचा दंड कमंडलु बनवतात ती झाडं पाहिली. मोठ्ठी अवाढव्य. भिक्षापात्र बनवत ते झाड दाखवलं, त्याच फळ अर्ध फोडुन ते बनवतात समजलं. सगळच अनोख होतं.
एका पानाच्या टोकातुन तीन पानं फुटलेलं कमालीच झाड दिसलं. काय निसर्ग म्हणावा तरी. नंतर होता कृष्ण वड. पानं त्याची मोठी होताना द्रोणासारखी होतात. भगवान कृष्ण म्हणे यातच माखन खायचे. नंतर होतं अर्जुनारिष्ट्य झाड. त्याच्या सालाचे औषधी वापर समजले. याच साल खोड वेगळच.. जवळच अशोक वेलाची गुंतागुंत त्यात फिकट जांभळ्या फुलांचा सडा झकासच.
अष्टगंध शेंदुर वृक्ष पाहण्याचा योग आला. शेंदुर फळ केशरी आत छोट्या बिया तो शेंदुर, दाखवला दादानी. अष्टगंधाची गोल गोल फळं. 
अत्तराच झाड त्याच साल पान रगडुन सुवासाची अनुभुती आली. नंतर कित्येक वर्षाची लाजाळु पाहायची ईच्छा पुरी झाली. मनातला बालक बाहेर आला आणि मी पान मिटवत गेले. आता ऊजेड वाढलेला जाणवला तो मिचमीच्या डोळ्यांमुळे.
पुढे रीकामे प्लाॅट दाखवले दादानी. 
रबडा चिखल जोड्यांवर मिरवत दीड दोन तासाची सफारी संपली. साडे अकरा झालेले, पाय चपला धुवुन आम्ही परत निघालो.
नयना ताईंना धन्यवाद देऊन एक फोटो काढला. आता डोळ्यासमोर फक्त हिरवच दिसत होतं. गाडीत प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या झाडाबद्दलच बोलत होतो.
एकदा निवांत बसुन पक्षी ऐकायला जायच ठरलं. मनातल्या निसर्गाचा ओलावा वाढवुन काॅक्रीटच्या जंगलात दिसेनासे झालो. मात्र मनात माणसान बनवलेलं जंगल घेऊनच!
 
एकदा भेट द्यावी अशीच हि सिपना वनराई आहे.


--
--
सौ. गौरी अनिरुद्ध पाठक 
 
A) https://www.languagetheque.com/diwaliank2021/
 
 B) Maharashtra times Pune & nashik

 
 
17th oct 2021 nashik maharashtra times

Sunday, 4 July 2021

चाँद रांगोळी सप्ताह २०२१

चंद्र, चंदा, चांद, चंद्रमा, चंदामामा, चांदोबा, Moon एकाच चंद्राच्या विविध कला तशा भावनांचा छटा.

चांद सप्ताहातुन साकार करण्याचा छोटासा प्रयत्न.. चंद्राची विविध रूपं.
 
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

१) सौंदर्य


चाँद की खुबसुरती का जितना बखान किया जाए ऊतना कम ही है|  चाँद हमारी पृथ्वी पर सबसे खुबसुरत चीजों मे से एक है| 

चुपके से चाँद निकलता है।

तरु-माला होती स्वच्छ प्रथम,
फिर आभा बढ़ती है थम-थम,
फिर सोने का चंदा नीचे से उठ ऊपर को चलता है।
चुपके से चाँद निकलता है।

सोना चाँदी हो जाता है,
जस्ता बनकर खो जाता है,
पल-पहले नभ के राजा का अब पता कहाँ पर चलता है।
चुपके से चंदा ढ़लता है।

अरुणाभा, किरणों की माला,
रवि-रथ बारह घोड़ोंवाला,
बादल-बिजली औ’ इन्द्रधनुष,
तारक-दल, सुन्दर शशिबाला,
कुछ काल सभी से मन बहला, आकाश सभी को छलता है।
वश नहीं किसी का चलता है।

हरीवंशराय बच्चनजी कवी
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

२) मिलन


निळ्या तांबड्या छटा नभाच्या,
पांघरूनी आभाळ हसते,
त्याच क्षणी या धरतीवरती,
दिवस रात्रीचे मिलन होते ||

अल्प क्षणांकरिता दिन स्थिरतो,
नव्या निशेच्या सवे पहुडतो,
आनंदाच्या छटा गुलाबी,
परतीच्या वाटेवर भरतो ||

थकलेला तो दिनकर नंतर,
हळुहळु निद्राधीन होतो,
आभाळाच्या पटलावरती,
सुरू निशेचा प्रवास होतो ||
÷÷÷÷÷÷÷÷÷

३) विरह


रात्र आहे पौर्णिमेची, तू जरा येऊन जा ।
जाणिवा थकल्या जिवांच्या एकदा ऐकून जा ।।

निथळला तो भाव सारा वितळल्या चंद्रातुनी ।
मिसळल्या मृदु भावनाही झोपल्या पानांतुनी ।
जागती नेत्रांतली ही पाखरे पाहून जा ।।१।।

पाखरे पाहून जा, जी वाढली पंखाविना ।
सूर कंठातील त्यांच्या जाहला आता जुना ।
त्या पुराण्या गीतिकेचा अर्थ तू ऐकून जा ।।२।।

अर्थ तू ऐकून जा, फुलवील जो वैराणही ।
रंग तो पाहून जा, जो तोषवी अंधासही ।
ओंजळीच्या पाकळ्यांचा स्पर्श तू घेऊन जा ।।३।।

गीतकार शांताराम नांदगावकर

÷÷÷÷÷

४) बालगोपालांचा चांदोमामा 

चांदोबा चांदोबा भागलास कां, 
लिंबोणीच्या झाडामागे लपलास कां।
लिंबोणीचं झाड करवंदी, 
मामाचा वाडा चिरेबंदी।
मामा मामा येऊन जा, 
तूप रोटी खाऊन जा।
तुपात पडली माशी, 
चांदोमामा राहिला उपाशी।।

÷÷÷÷÷

५) अंगाई

आपल्या बाळाला झोपवताना थोपटता थोपटता त्याची आई गुणगुणते.

लिंबोणीच्या झाडामागे चन्द्र झोपला ग बाई ।
आज माझ्या पाडसाला झोप कां ग येत नाही।।
गाय झोपली गोठ्यात, घरट्यात चिऊताई ।
परसात वेलीवर झोपल्या ग जाईजुई ।
मीट पाकळ्या डोळ्यांच्या गाते तुला मी अंगाई ।।
देवकी नसे मी बाळा, भाग्य यशोदेचे भाळी ।
तुझे दुःख घेण्यासाठी केली पदराची झोळी ।
जगावेगळी ही ममता, जगावेगळी अंगाई ।।
रित्या पाळण्याची दोरी उरे आज माझ्या हाती ।
स्वप्‍न एक उधळून गेले माय लेकराची नाती ।
हुंदका गळ्याशी येता गाऊ कशी मी अंगाई ।।
आज माझ्या पाडसाला झोप कां ग येत नाही।।

÷÷÷÷÷÷÷÷÷

६) प्रेम

श्रीकृष्ण यमुनेच्या पलीकडे रहाणाऱ्या कुब्जेला पहाटेच्या वेळी भेटायला गेला त्या प्रसंगाचे वर्णन 

अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ ।
अशा अवेळी पैलतीरावर, आज घुमे का पांवा मंजुळ ।।
मावळतीवर चंद्र केशरी, पहाटवारा भंवती भणभण ।
अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकुन अपुले तनमन ।।
विश्वचि अवघे ओठा लावुन, कुब्जा प्याली तो मुरलीरव ।
डोळ्यामधले थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव ।।
अशा अवेळी पैलतीरावर आज घुमे कां पांवा मंजुळ ।
अजून नाही जागी राधा अजून नाही जागे गोकुळ ।।

कवयित्री इंदिरा संत

÷÷÷÷÷÷÷

७) भक्ती

विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले संत गोरा कुंभार आळवणी करतात,

कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर । चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर ।।
बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले । वृध्दपणी देवा आता, दिसे पैलतीर ।।
जन्म मरण नको आता, नको येरझार । नको ऐहिकाचा नाथा व्यर्थ बडिवार ।।
चराचरापार न्याहो लागला उशीर । पांडुरंग पांडुरंग मन करा थोर ।।

Thursday, 24 June 2021

लहानपणची आठवण आमचा वाडा!

वाडा म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे वेगवेगळी  कल्पना येते. आमचा वाडा म्हणजे मांगल्य होता. मुलांच्या खळखळाट  हास्यानी भरलेला, शेजारणीच्या घरात सहज ये-जा असणार्या बायकांनी गजबजलेला, एकमेकांच्या मायेनी जोडलेला दुवाच होता. हमरस्ता शिवाजी रस्त्यावर शुक्रवार पेठेतला आमचा हा वाडा, बाहेरून चिरेबंदी कडी कोयंडा दार असलेला. नवख्याला बाहेरून आतली कडी कधी ऊघडता न येणारा, आम्ही  मात्र यात तरबेज होतो.
दारातुन आत आल की एक मोठी काळ्या पाषाणाची एकसंध दगडाची पायरी होती. ऊजवीकडे मिटर होते डावीकडे अंधारी जीना. सांगितल तरच समजणारा. बोळ संपुन पुढं आली की मस्त बंदिस्त अंगण, आजकालच्या भाषेतलं फोर्च सारखं. वर चारी बाजुंनी घराच्या खिडक्या, पदार्थांची देवाण घेवाणही बायकांची होत असे. तिकडे एक मोरी होती. डावीकडे किराणामालाच्या दुकानाची आतली बाजु होती; सरळ पुढं आलं की डावी ऊजवीकडे घरं होती, आहेत अजुनही. या अंगणात लहानपणचे खेळ रंगायचे, मेंदी लावणे, रात्री जेवल की गप्पा मारणे ईकडेच असायचं. ऊजवीकडे जीना वर आमच घर वन रून किचनमधे बावीस वर्ष छान गेली. तशी आठेक बिर्हाडंच होतो पण मजा यायची. मधे परत दोन खोल्या नंतर आमच मागचं अंगण. डावीकडे मोठ्ठी मोरी आहे. सकाळी सगळ्यांचा कामाचा कलकलाट असे ईकडे. नळावरची भांडणं रंगायची. जवळच मोठी विहीर होती, बुजवली नंतर ती. संध्याकाळी  भकास वाटणारं अंगण पण दिवसभर चेहेल पेहेलच. अंगणात कापसाचं, ऊंबराचं, आंब्याच झाड होतं. याच अंगणात होळी पेटवायचो. 
ऊन्हाळ्याच्या सुटीत हे अंगण अड्डाच असायचा. कोण पत्ते खेळायचे, कोणी भांडीकुंडी तर कोणी प्लॅस्टीकचा कॅरम. तेव्हा विश्व मय्यादीत होतं, पण एकोपा खुप होता. दिवाळीचे फराळ, पापड, नागपंचमीची मेहेंदी, रंगपंचमी सगळं एकत्र असायचं. सगळ्या बायका दुपारी कामं करायच्या. वर्कशाॅप भरल्या सारखं चित्र असायचं. कोणी ब्लाऊज शिवत, कोणी फाॅल पिको, तर कोणी ब्लाऊजला हातशिलाई. सुटीत आम्ही खरी कमाई करायचो. महिना संपला की पैसे मिळायचे मग सिनेमाला जायचो.
आमच्या वाड्यात आजुबाजुच्या वाड्यातली मुलं पण खेळायला येत, लेकुरवाळाच होता. लपाछपी, गोट्या, पत्ते, नवावव्यापार असे डाव रंगत. भिंतीवरच्या सावल्यांचे सिनेमे पण बहारदार वाटायचे. ते वाड्यातले माहेरपणाचे दिवस सोनेरीच होते. वाड्याच्या साक्षीन बरीच कार्य पार पडली. कार्य कोणाच असेना वाडाभर आनंद असायचा.
असा आमचा हा आठवणींचा खजिना वाडा मला कायम कायम आठवतो. आठवणीच्या या वास्तुला माझा मनापासुन नमस्कार आणि वाड्याच्या आठवणी सांगता आल्या म्हणुन या ग्रुपचे आभार!
सौ. गौरी पाठक (घाणेकर)

Friday, 11 June 2021

ऑनलाइन लग्न एक आगळावेगळा अनुभव

आमच्या नंतरच्या पिढीतलं हे पहिलच लग्न! त्यामुळे सगळेच जाम खुष होतो. मोठ्यांपासुन ते अगदी लहानांपर्यंत भरपुर ऊंच मनोरे आखणं सुरू झालं होतं. दोन्ही घरी आनंदाच ऊधाणच आलं होतं. परदेशातुन मुलं येण्याच्या तारखेवरून लग्नाची तारीख काढली, हाॅल पण बुक झाला. ... आणि अचानक कोरोना नावाचा राक्षस ऊद्भवला. कसलं काय! वधु वराला भारतात येण अशक्य झालं. वर्षभर थांबलो तरी हा राक्षस काही हालेना. यंदाच्या वर्षी तर आम्हालाही परदेशात जाता येईना.

सर्वानुमते मुलांनी परदेशातच मुलांनी लग्न करून घ्याव अस ठरलं. जीवाचा दगड करून हेठरवलं खरंतर.  इकडुनच मुहूर्त काढुन दिला. दोन्ही आई वडिलांची विधीवत लग्न व्हावं अशी इच्छा होती. परदेशातल्या हिंदु देवळात मुलांनी चौकशी केली. ते पण सगळं ठरलं. आता लगीनघाई परदेशात सुरू होती. भारतात दोन घरं मनात हुरहुर घेऊन वावरत होती. पण तरी यु ट्युबवर लग्न बघता येणार हा आशेचा किरण सुखावून जात होता.

मुलाची शेरवानी, मुलीची साडी, शेला, उपरणं, मुंडावळ, टोपी आणि चितळेची आंबा बर्फी मात्र कुरीअरनी परदेशात पोचली. ई-खरेदीचा आनंद मनमुराद घेतला. लाॅकडाऊनमुळे दुकानं जशी ऊघडतील तसं हे घेण्यात आलं. अगदी तुळशीबागेतले बाळकृष्ण अन्नपुर्णा पण घेण्यात आम्हाला यश आलं. ते पण थाटात परदेशात पोचले, देवघरात स्थानापन्न झाले.

मंडप सजवणं, जेवणाचा हाॅल बुक करणं, वधुची तयारी, आमंत्रणं सगळं सगळं मुलच करत होती. देवळात विधी करून रेस्टाॅरंटमधे लंच ठरवलं होतं. सोबतीला होते ते तिकडचे दहा बारा मित्रमैत्रिणी आणि भारतातुन पालकांचे आशिर्वाद! 

आम्ही पालक पण काही कमी नाही, लग्न ऑनलाईन असलं म्हणुन काय झालं?  मस्त आवरून बसलो. व्याही व जवळचे नातेवाईक यांना मिठाई पोच झाली. मेहेंदी काढली. व्हाॅटस अपवर विधीवत आमंत्रणं पोचली. जवळच्या बंद देवळात का होईना पत्रिका ठेऊन आलो. कुलदेवीला कुळाचाराची पुजा आणि ब्राम्हण भोजन करण्यासाठी गुगल पे धाऊन आला.

परदेशातील दुपारी असणारा लग्नाचा मुहुर्त भारतात रात्री सव्वा बाराला होता. घरातले सगळे आवरून अक्षता हातात घेऊन बसलो. दाराला तोरण लागलं, झेंडुच्या माळा सजल्या सुनेच स्वागत म्हणुन पायघड्यांची तयारी झाली.सगळ्या सासवांनी वेलकम सुनबाई व्हाॅटस अप चॅलेंज सारखी तयारी केली. फक्कड मेनु ठरवुन झोमॅटो केलं.

रात्री जागुन लग्न अनुभवण्यात मजा आली. तिकडचे गुरूजी पण छान होते. सगळे विधी इंग्रजीत समजावुन सांगताना ऐकुन हसुन हसुन पुरेवाट झाली. दोन मजली ट्राॅलीत त्यांनी सगळं सामान आणलं होतं. अगदी लाजा होमची पण तयारी होती. गणपती पुजा, सात फेरे, सप्तपदी, कानपिळी, सूर्यदर्शन पासुन लॅपटाॅपवर आई वडिलांना नमस्कार करा इतपत सगळं सगळं छान झालं. एका मैत्रिणीन लगीनगाठ बांधली, एका मित्रानं कानपिळी केली. मधेमधे फोटोग्राफर लॅपटाॅपच्या मधे येत होती. मंगलाष्टका कानावर पडल्या आणि टेक्निकल युगाचे आभारच मानले. 

वरिष्ठांच्या आगाऊ सुचनांशिवाय मुलांनी सुरेख कार्य पार पाडले. मायेची धडधड भारतात थांबली. वधुचे पालक तृप्त झाले आणि वराकडचे आनंदले. झुमकाॅलवर वेलकम वहिनी करून मुलांनी वहिनीच स्वागत केलं.

ईतरवेळी सर्व विधी वर-वधुचे माता पिता पाहु शकत नाहीत. या ऑनलाईन  लग्नात ते नीट पाहता आले. अजिबात न दिसण्यापेक्षा, स्पर्शाची अनुभुती मिळाली नसली तरी मानसिक समाधान
लग्न पाहण्याचं ऊपभोगता आलं.

खरच सुरेखच होता हा पहिला वहिला ऑनलाईन लगीन सोहळा!

शुभं भवतु!

सौ. गौरी पाठक