Monday, 24 August 2026

सळसळती तरुणाई

माझ्या कामाच्या प्रवासात अनेक प्रकारच्या प्रशिक्षणार्थींशी माझा संबंध आला. या काळात वेगवेगळ्या पिढ्यांमध्ये झालेले बदल मी जवळून पाहिले आहेत. या प्रशिक्षणार्थींचे वय जवळपास २३ किंवा २४ वर्षांचे असते. ऑफिसमध्ये कसे वागावे, कसे बोलावे, कसे बसावे, कामाच्या ठिकाणी कोणत्या गोष्टी करायला हव्यात, तसेच प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्यासाठी हे प्रशिक्षणार्थी येतात. ते येण्याआधीच त्यांचा अंदाज मला येऊ लागतो. अर्ज पाठवण्यापासून ते मुलाखतीला येण्यापर्यंतची त्यांची पद्धत, त्या वेळची देहबोली, प्रत्येक विभागाचे काम समजून घेण्याची त्यांची उत्सुकता या सगळ्या गोष्टी अनुभवातून समजायला लागतात. काळानुसार या मंडळींमध्ये झालेले आमूलाग्र बदल पाहून आज मला लिहावेसे वाटले. का? ते लवकरच समजेल.


कोरोनापूर्वीचा अनुभव
या काळातले प्रशिक्षणार्थी येतानाच “खूप काही शिकायचे आहे” या आनंदात असायचे. स्वतःचे भवितव्य कसे घडवायचे, याचा विचार करत ते वावरताना मी पाहिले आहे. मुलाखतीला येण्याआधी नम्रपणे फोन करून, “काय आणायचे? प्रक्रिया कशी असते?” असे विचारले जायचे. कॉलेजमध्ये शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्ष कामात कशा वापरल्या जातात, हे पाहण्याची त्यांच्यात खूप उत्सुकता असायची. आपल्या वरिष्ठांचा आदर कसा करायचा, याची त्यांची पद्धत अतिशय सुंदर होती. त्यांना शिकून काहीतरी करायचे होतेच; पण त्यासाठी कष्ट करण्याची तयारीही त्यांच्या वागण्यात स्पष्ट दिसायची. “मला एखादे मॉडेल बनवायला द्या.” “काही काम असेल तर मला शिकवा.” असे प्रश्न ते स्वतःहून विचारायचे. इंटर्नशिप म्हणजे शिकण्याचा काळ आहे, याची पूर्ण जाणीव त्यांच्या वागण्यात शंभर टक्के दिसायची. स्टायपेंड किती मिळणार, हा प्रश्न विचारण्याचीही त्यावेळी फारशी हिम्मत नसायची. वेळ कोणतीही असो, बॉस गेल्याशिवाय ऑफिसमधून निघायचे नाही, हा इंटर्नसाठी जणू एक अलिखित नियमच होता आणि तो सांगावा लागायचा नाही त्यांना तो आपोआप समजलेला असायचा.

कोरोनानंतरचा अनुभव
कोरोनानंतर आलेली इंटर्नची फळी पाहिली की कधी कधी वाटते—बाप रे, सुपर आहे! पण  त्यांना असे वाटते की आपण आधीपासूनच बरेच काही कमावले आहे. जणू आपण नोकरीच करत आहोत आणि कंपनीच्या मालकाला आपलीच गरज आहे. मुलाखतीनंतर “अपडेटसाठी ३ ते ५ दिवसांत फोन करा” असे सांगितले, तरी त्यांना वाटते की आता कंपनीनेच आपल्याला फोन करायला हवा. कंपनीला तुम्ही इंटर्न म्हणून यावे, अशी गरज नाही किंवा नसते. इंटर्नशिपची गरज तुम्हाला आहे, याचे गांभीर्य अनेकांना अजिबात जाणवत नाही. या ९० किंवा १२० दिवसांत “मला काय मिळणार?” याची यादी त्यांना आधीपासून हवी असते. कॉलेजमध्ये शिकलेल्या गोष्टी प्रत्यक्षात करताना फरफट उडणारे अनेक जण मी पाहिले आहेत. मात्र, आपल्या हाताखालच्या लोकांकडून काम कसे करून घ्यायचे, हे त्यांना लगेच समजते; पण वरिष्ठांशी कसे बोलावे, कसे वागावे, याचे साधे मॅनर्स मात्र अनेकांकडे दिसत नाहीत. “मी शिकणार, स्वतःच्या पायावर उभा राहणार आणि आयुष्य एन्जॉय-चिल करणार,” या तोऱ्यात ते वावरताना दिसतात.“मी इंटर्न म्हणून येणार तर मला किती मिळणार?” यावर त्यांचा भर आधी असतो. वेळ संपली की सरळ घरी निघायच. बॉसला सांगणे, परवानगी घेणे किंवा विचारून जाणे—यापैकी काहीही आवश्यक वाटत नाही.

शेवटी एक विचार...
एकंदर विचार करता, काळ बदलतो, हे मान्य आहे. प्रत्येक पिढीची विचार करण्याची पद्धत वेगळी असते, हेही मान्य. पण या पिढीतील काही मुलांची भिड चेपलेली जाणवते. शिकताना आपण नम्र असतो, कारण अजून आपल्याला अनुभव नाही, हे स्वीकारण्यात काहीही कमीपणा नाही. उलट, “मला अजून शिकायचे आहे” ही जाणीवच आपल्याला पुढे घेऊन जाते. पण आजच्या काही तरुणांच्या दृष्टीने लाँग टर्म जॉब म्हणजे सहा महिने, हे जेव्हा मी ऐकलं तेवहाच समजून गेले कि या तरुणाईची जगण्याची व्याख्याच बदललेली आहे. किमान दोन वर्षे एखाद्या ठिकाणी काम करून आपण स्वतःला घडवतो, अनुभव घेतो, चुका करतो, त्या सुधारतो आणि मग पुढच्या संधीसाठी तयार होतो—ही व्याख्या आता चलतीत नाही.

मला यांची तक्रार अजिबात करायची नाहीये; पण यांचं वागणं काही केल्या पचनीही पडत नाहीये. कॉर्पोरेट जगतात असेच मातीचे गोळे गेले तर इमारत कशी उभी राहील? आणि उभी राहिलीच, तरी ती किती काळ टिकेल? खरं तर हे वाक्य माझ्या एका सहकाऱ्याने यापूर्वीही मला सांगितलं होतं; पण आजच्या परिस्थितीकडे पाहिल्यावर त्याचा अर्थ खऱ्या अर्थाने पटतोय.

कोरोनाच्या काळात योग्य आणि सक्षम शिक्षक न लाभल्यामुळे अर्थात परिस्थतीमुळेच कदाचित यांच्यावर ही वेळ आली असावी. हरकत नाही. काळ बदलतो, पिढ्या बदलतात, काम करण्याच्या पद्धती बदलतात. पण यात नुकसान कोणाचे आहे?

शेवटी त्यांचेच.
आणि हे त्यांना समजायला वेळ लागेल—
कदाचित अनुभव आल्यावर.
सौ. गौरी अनिरुद्ध पाठक

No comments:

Post a Comment