सर्वानुमते मुलांनी परदेशातच मुलांनी लग्न करून घ्याव अस ठरलं. जीवाचा दगड करून हेठरवलं खरंतर. इकडुनच मुहूर्त काढुन दिला. दोन्ही आई वडिलांची विधीवत लग्न व्हावं अशी इच्छा होती. परदेशातल्या हिंदु देवळात मुलांनी चौकशी केली. ते पण सगळं ठरलं. आता लगीनघाई परदेशात सुरू होती. भारतात दोन घरं मनात हुरहुर घेऊन वावरत होती. पण तरी यु ट्युबवर लग्न बघता येणार हा आशेचा किरण सुखावून जात होता.
मुलाची शेरवानी, मुलीची साडी, शेला, उपरणं, मुंडावळ, टोपी आणि चितळेची आंबा बर्फी मात्र कुरीअरनी परदेशात पोचली. ई-खरेदीचा आनंद मनमुराद घेतला. लाॅकडाऊनमुळे दुकानं जशी ऊघडतील तसं हे घेण्यात आलं. अगदी तुळशीबागेतले बाळकृष्ण अन्नपुर्णा पण घेण्यात आम्हाला यश आलं. ते पण थाटात परदेशात पोचले, देवघरात स्थानापन्न झाले.
मंडप सजवणं, जेवणाचा हाॅल बुक करणं, वधुची तयारी, आमंत्रणं सगळं सगळं मुलच करत होती. देवळात विधी करून रेस्टाॅरंटमधे लंच ठरवलं होतं. सोबतीला होते ते तिकडचे दहा बारा मित्रमैत्रिणी आणि भारतातुन पालकांचे आशिर्वाद!
आम्ही पालक पण काही कमी नाही, लग्न ऑनलाईन असलं म्हणुन काय झालं? मस्त आवरून बसलो. व्याही व जवळचे नातेवाईक यांना मिठाई पोच झाली. मेहेंदी काढली. व्हाॅटस अपवर विधीवत आमंत्रणं पोचली. जवळच्या बंद देवळात का होईना पत्रिका ठेऊन आलो. कुलदेवीला कुळाचाराची पुजा आणि ब्राम्हण भोजन करण्यासाठी गुगल पे धाऊन आला.
परदेशातील दुपारी असणारा लग्नाचा मुहुर्त भारतात रात्री सव्वा बाराला होता. घरातले सगळे आवरून अक्षता हातात घेऊन बसलो. दाराला तोरण लागलं, झेंडुच्या माळा सजल्या सुनेच स्वागत म्हणुन पायघड्यांची तयारी झाली.सगळ्या सासवांनी वेलकम सुनबाई व्हाॅटस अप चॅलेंज सारखी तयारी केली. फक्कड मेनु ठरवुन झोमॅटो केलं.
रात्री जागुन लग्न अनुभवण्यात मजा आली. तिकडचे गुरूजी पण छान होते. सगळे विधी इंग्रजीत समजावुन सांगताना ऐकुन हसुन हसुन पुरेवाट झाली. दोन मजली ट्राॅलीत त्यांनी सगळं सामान आणलं होतं. अगदी लाजा होमची पण तयारी होती. गणपती पुजा, सात फेरे, सप्तपदी, कानपिळी, सूर्यदर्शन पासुन लॅपटाॅपवर आई वडिलांना नमस्कार करा इतपत सगळं सगळं छान झालं. एका मैत्रिणीन लगीनगाठ बांधली, एका मित्रानं कानपिळी केली. मधेमधे फोटोग्राफर लॅपटाॅपच्या मधे येत होती. मंगलाष्टका कानावर पडल्या आणि टेक्निकल युगाचे आभारच मानले.
वरिष्ठांच्या आगाऊ सुचनांशिवाय मुलांनी सुरेख कार्य पार पाडले. मायेची धडधड भारतात थांबली. वधुचे पालक तृप्त झाले आणि वराकडचे आनंदले. झुमकाॅलवर वेलकम वहिनी करून मुलांनी वहिनीच स्वागत केलं.
ईतरवेळी सर्व विधी वर-वधुचे माता पिता पाहु शकत नाहीत. या ऑनलाईन लग्नात ते नीट पाहता आले. अजिबात न दिसण्यापेक्षा, स्पर्शाची अनुभुती मिळाली नसली तरी मानसिक समाधान
लग्न पाहण्याचं ऊपभोगता आलं.
खरच सुरेखच होता हा पहिला वहिला ऑनलाईन लगीन सोहळा!
शुभं भवतु!
सौ. गौरी पाठक
गौरी,खूपच मस्त लिहिलस. अगदी मनातलं वाचतोय असं वाटलं ग्रेट खूप मस्त.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद ! आपल नाव सांगाल का ?
ReplyDelete