Tuesday, 14 July 2026

अमृतानुभव : सासवड जेजुरी वारी टप्पा

 अमृतानुभव : सासवड जेजुरी वारी टप्पा 

पंढरीनाथाच्या कृपेने हि वारी लाभली. पहिला टप्पा तीनदा झाला. मागच्या वर्षी पुणे ते दिवेघाट सासवड टप्पा केला आणि तेव्हाच आम्ही सहा आत जणांनी आता मात्र पुढच्याच टप्पे करतच पूर्ण वारी करू असा ठरवलं. मग काय यंदा सासवड ते जेजुरी चाल केली. पांडुरंगाच्या कृपेने सवंगडी पण छान लाभले. साथीदार कसे आहेत यावर चाल प्रभावी ठरते.

ए आय दिंडी नावं हा आय टी दिंडी ग्रुप पुढे काम करतो. काय अफलातून स्वयंवसेवक आहेत! आय टी क्षेत्रात असूनही समाजप्रतीचे एक प्रकारे कर्तव्यच हि संस्था पूर्ण करते आणि माझ्यासारख्या उत्सुकांना ती पर्वणीच ठरते. खरं सांगू का मागच्या वारीतले एक दादा म्हटले तसे आपण कच्चे वारकरी असतो. खरे वारकरी जेव्हा आपण वारीत पाहतो तेव्हाच हे समजत आणि वारकरी आणि धारकरी यातला फरक उघड होतो. परमेश्वरनी दिलेल्या धडधाकट शरीराला आपण फुकट मिळलेलं मशीन समजून ते वापरतो त्याची काळजी घेत नाही. वारी करताना शरीरातील अवयवांची किंमत कळते.  वारीचा काही भाग केला तरी शरीराची किंमत समजून  मग वर्षभर तिचे आभार मानले जातात.  परमेश्वरनी दिलेल्या त्या पवित्र घरातली म्हणजेच शरीरातील त्याचाच अंश असा आत्मा शोध घ्यावा अशी इच्छा होते. हे सगळं होण्यासाठी ए आय दिंडी / आयटी दिंडी मला माध्यम ठरते. मी माझ्यासारख्यांकडून ए आय दिंडीचे आभार मानते, तुमच्यामुळे सासवड ते जेजुरी टप्पा यतार्थपणे पार पडला.

पहाटे तीन ला उठून आवरून सव्वाचारला बस स्टाॅपवर पोचलो. बसमध्ये सगळे सवंगडी ताजेतवाने अमृत प्यायला आसुसलेले चेहेरा अहाहा ! काय वातावरण होत. सगळे बस चे टप्पे करून मगरपट्ट्यात पोचलो. काही जण फ्रेश झाले, इतर बस मधले सवंगडी गळा भेटी झाल्या. चाल एकत्र करायची बरं का! उतरलो कि एकत्र भेटू म्हणत ग्रुप फोटो झाले. बसमध्येच ए आय दिंडीने नाश्ता पाणी दिले. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा गजर झाला, भजन गजर करतच बस निघाल्या. दिवेघाट आला. मागच्या चालीच्या आठवणी, हास्य विनोद, गफले, फजित्या याच्या सगळ्या  खुणांना ऊजाळा मिळाला. दिवेघाटात स्वागतालाच जणू उभा असलेल्या पांडुरंगच दर्शन झालं. दिवेघाट ओलांडून बस काही वेळातच थांबावली. नियोजित जागे आधीच ७ किलोमीटर वाहन सोडणे बंद केले होते.  एक आवाज आला उतरायचे आहे आणि इथूनच सासवड ते जेजुरी चाल सुरु करायची आहे. मग काय ए आय च्या टोप्यांखालची अनुभवाची अत्युच्य अनुभूती घेण्यास आसुसलेली मन एकंदर ५०० होती. बस मागे सोडून सगळे ए आय दिंडीचे वारकरी चालायला सुरु झाले.

तीन चार पदरी मोठा रस्ता काळा भोर, आजूबाजूला विविध हिरवाई चाल सुरु होण्यासाठी हा माहोल उत्तम होता. आता टाळ निघाले बाहेर. टोप्या सेटिंग होत होत्या. हवा पण छान होती. पावसाचा मागमूस नव्हता, दूरवर निळ्या आकाशात काळे ढग दिसत होते जणू काही पांडुरंगानीच तंबी दिलीय या वाटेवर फिरकायचं नाही बिलकुल... दिंडीचे चार झेंडे होते. आलटून पालटून सवंगडी ते घेत कोणी त्याबरोबर फोटो काढत नाचवत चाल सुरु झाली होती. मग गंध लावून घेत सगळ्या माउली निघाल्या. हो आता सवंगडी नाही त्या माउली होत्या. धक्का लागला, कोणी चालताना गडबडल लगेच कोणीही माउली पुढे सरसावत होत्या. आता आम्ही सगळ्या माऊली एकाच घरच्या झाल्या होतो. नियोजनापेक्षा ७ किलोमीटर कशी चाल झाली समजलंच नाही. या वाटेवर माऊलींच्या पालखीचे दोन विसावे आहेत. वाटेतच पहिला विसावा होता तिकडे पोचलो. रस्त्याच्या पलीकडे सद्गुरू ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि दिंड्या चालत होत्या आणि डाव्या बाजूनी इतर दिंड्या चालत होत्या. पहिल्या त्या विसाव्यापासून पालखी निघाली ती जेजुरी पर्यंत बरोबरच होती. त्या विसाव्यास सोडताना आम्हाला समजलं की पालखी बरोबरच आहोत.  सगळ्या माऊली भारावून गेल्या. दुभाजकावर ए आय दिंडीची सरळसोट रांगच झाली. पलीकडली अमृतानुभवाची गोडी चाखायला. माऊलींचा पालखीचा मानाचा नगारा असलेली बैलगाडी, घोडा आणि नंतर फुलांनी सजवलेला सुंदर तीन कळस असलेला रथ असा समोरून हलकेच पुढं जाताना पहिला. आमच्यातल्या काही माउली न राहवून माउलींच्या पादुका स्पर्शासाठी धावल्या. रथास हात लावता आला तरी भाग्यच असत. तो आनंद घेत घेतच आम्ही चाल करत होतो. तो लाभलेला आनंद ओसंडून वाहणारा चेहरा पाहून कोणासही आनंद होणारच.

इतर दिंडीच्या ढोल टाळ डफली वजा काहीस मोठं वाद्य घेत चालणारे बरेच होते. त्यांच्यातली भजन, त्याचे ठेके आपसूकच शिकल्यासारखे येत नाचत, रिंगण करत, फुगडी घालत, माऊलीचा अति उच्चं स्वरात गजर करत आमची दिंडी चालत होती. दोन चार चौक पुढे तर कधी मागे अशीच माऊलींचा पालखीचा रथ होता. अरे गर्दी कमी झाली चला अस म्हणत सगळे जेव्हा जस जमेल तसे दर्शन घेऊन येत होते. सगळ्यांची हैप्पी हार्मोनची लेव्हल जब्रा वाढली असणार. पालखीत चाल करताना नामाचा गजर करत पायी चालावं, गंध लावून झेंडा हातात घेता यावा, हि इच्छा होणं हे पण काही कमी नाही असं मी समजते. कोणताही उच्चं  भाव अचानक मनात येत नाही. ती भावना तो पांडुरंग निर्माण करतो. भक्ती वाचून मुक्तीची मज जडली रे व्याधी गटातून मनात भक्ती निर्माण होऊन त्या वारीच्या महासागरात एक तरी छोटी डुबकी मारावी वाटण हि पण प्रगतीच आहे कि. ए आय दिंडी मधून वारीचा टप्पा करताना याची मात्र मला गेल्या सहा वर्षात नक्कीच जाणीव झाली आहे कि आपण वारी कधी आहे वाट पहिली जाते. तो पांडुरंग कसा आहे ? त्याचाच जर मी अंश आहे तर तो माझ्याकडे कधीतरी तर पाहिलंच तेव्हा मी तिथे असायला हवं हे कर्म मलाच केले पाहिजे.  तो पांडुरंग भरभरून देतच आला आहे. तो देत आहे म्हणून माझे सर्व सुरळीत सुरु आहे हि जाणीव होण्यासाठी मला आय टी  दिंडी आणि ए आय दिंडी माध्यम ठरली.  माझ्या मागच्या तिन्ही लेखात मी या बद्दल सविस्तर लिहिलं आहेच. प्रचंड प्रमाणातले वारकरी पाहत त्यांची चालण्याची द्रूत गती पाहून अवाक होतोच आपण. यावेळी एका नांदेडच्या दिंडीतल्या माऊलींनी एकदम गालाला हात लावला. "अगं बाई पोरी बघा कश्या लाल लाल झाल्यात. कुठनं आलात गं ? अन कुठवर जाणार हायसा?" "पुण्याचे आम्ही सगळे माऊली. सासवड ते जेजुरी जाणार माऊली" अस म्हणत आपसूकच त्यांच्या पाय पडले मी.  त्या माऊलींचा जाडा भरडा खरखरीत हाताचा गालाला तो स्पर्श झाला तो पण खूप काही सांगून गेला. कोण असेल ती माऊली ? का वाटलं असेल तिला आमच्याकडे पाहून? काही प्रश्नांना उत्तरं नसतात. दोन हात उंचावत उंच हवेत हलवत त्या निघून गेल्या खऱ्या पण मनात कोरून गेल्या काय ते ठाऊक नाही. 

वर निरभ्र निळं आकाश रांगोळी काढल्यासारखे दूरवर बाजूनी हलकेसे काळे ढग समोर वारकऱ्यांचा प्रचंड सागर. सोबतीला काळजी घेणाऱ्या सगळ्या हौशी माऊली आणखीन काय हव! माऊलींच्या रथापुढे एक १०-१५ जणींचा डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेला ताफा होता. चकचकीत पितळी वृन्दावनं होती. मला हलकीशी राधा रमणची आठवण झाली.... वृंदावच्या राधा रमण ची...

जेवणासाठीचा विसावा येईपर्यंत जवळपास १२-१३ किलोमीटर चाल होती. शेवटी शेवटी शिव पार्वती ढाबा दिसतोय का पाहून चाललो. जुलै महिना असूनही सूर्य आग ओकत होता. आमचा माऊलींचा ताफा दुभाजकावर स्थिरावला. पाणी, राजगिरा वाडी तत्सम गोष्टी झाल्या. पायाला जरा आराम दिला कसलं काय लगेच समोरच्या बाजूला परत माऊलींचा रथ आलाच... ज्यांचं आधी थोडक्यात सुटलेले दर्शन ते काय आणि परत एकदा जाऊ असे सगळेच परत धावले. हीच ती ओढ बेबंद ओढ!

ए आय दिंडी कडून सर्व माऊलींना जेवणाची उत्तम सोय केलेली. सकाळी चाल सुरु केली तेव्हा साधारण ८ वाजले असावेत. जेवणाच्या ठिकाणी पोचलो ते १२.३०ला. जेवण झालं थोडा आराम झाला. नंतर माऊलींमध्ये जोश भरला तो रिंगण, गवळण, फुगडी, गजर यांनीच. अगदी "टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग...." हेच ते.... कसे आणि किती आभार मानावेत त्या जगतगुरु तुकाराम महाराजांचे....

साधारण ३.३० ला दुपारी पुढची चाल सुरु केली. ती डबल चहा घेऊनच. पुढे जेजुरी जवळचा विसावा आला. यावेळी प्रथमच माऊलींची पालखी विसावा ठिकाणापासून रथात बसवताना पाहायला मिळालं. बरोबर चाल करणाऱ्या दोस्तानी केलेल्या आग्रहामुळेच मी रथावर डोकं ठेऊन परत बाहेर येऊ शकले. खुप गर्दी होती. माऊलींची पालखी हलकी फुलकी अलगतपणे रथावर स्थिरावली.... ती मी पाहत होते.... तिकडचे स्पंद खुप खुप खूप  प्रभावी होते. डोळे भरून तर कंठ दाटून आला. आज आत्तापर्यंत तीन वेळा रथ, माऊलींच्या पादुका पालखीत पहिल्या पण हा जो नजार होता तो सोनेरी अक्षरात माझ्या मनात कोरला गेला. अतिशय सुंदर अनुभूती होती ती. डबडबलेल्या डोळ्यांना फक्त फुलांनी सजवलेला रथ पालखीचं दिसत होती बाकीचं पुसट दिसत होत सगळं.

दुपारचं तीव्र ऊन होत. आता ते पाठीमागून होत. पाणी भराभर संपलं. हा टप्पा आता ५-६ किलोमीटरचा होता. जेजुरीतली सगळी मंडळी रस्त्यावर रांगोळी काढून, नटून थटून दुभाजकावर बसून होती. माऊलींच्या पालखी रथाची वाट पाहतायत हे नजरेतच दिसत होत. इकडे चहा वाटप करत होते. पण आम्ही नामाचा गजर करत चालत राहिलो. आता भंडारा उधळण कस असेल? यावर मन गुंतलेलं. जेजुरीत पालखी आली कि भंडारा उधळण होते हे ठाऊकच नव्हतं. ए आय दिंडीची थांबायची जागा आली ती ५.३० वाजता. अजून माऊलींचा रथ यायचाच होता. भंडारा उधळण पाहायची एकदम अचूक जागा ए आय दिंडी नी निवडली होती. 

बरोब्बर ६ वाजता त्या चौकात माऊलींचा रथ आला. आकाशात ७-८ ड्रोन फिरू लागले होते. रस्त्याच्या कडेला किलोकिलोंची पोती भंडारा घेऊन लोक फिरत होती. ओंजळ भरून ती भंडारा सगळ्यांना देत होती. आलेल्या माऊलींच्या कपाळाला भंडारा लावत जेजुरीतले काही जण फिरत होते. काय वर्णावा तो क्षण! माऊलींचा घोडा आला जेजुरीच्या लोकांनी येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत उंच उंच भंडारा उधळला. मागे मुंगीच्या पावलांनी ज्ञानेश्वर माऊलींचा रथ येत होता. मोठ्या आवाजात त्यांचं स्वागत होत होतं. "माऊली आल्या जेजुरीची भेट घ्याया"  विविध घोषणा सुरु होत्या, त्या ऐकून रोमांच उभे राहत होते. जेजुरी च्या नगरपालिके  कडून खूप मोठ्या प्रमाणात भंडारा उधळण झाली. आत्तापर्यंत निळं निरभ्र असलेलं आकाश पिवळं धमक्क झालं. सगळी कडे भंडारच भंडारा. काय सुंदर पालखी दिसते त्या भंडाऱ्यात.... आमच्यातल्या काही माऊली घुसून दर्शन घेऊन आल्या. मला तर त्या पिवळ्या धमक आकाशात पांडुरंगच डोलताना दिसत होता. सगळ्या पांढऱ्या टोप्या पिवळ्या झालेल्या जणू त्या भक्तिरसात डुबकीच मारून आल्यात. रस्त्याकडेला उंच जागी उभं राहून मी तो भंडारा उधळण सोहळा  अत्यंत अविस्मरणीय क्षण अनुभवला. त्या संपूर्ण आसमंतात  हलकासा भंडाऱ्याचा वास भरून राहिला होता. पांडुरंगाच्या प्रभेची शेवटची किरणच जणू!

असा डोलणाऱ्या झाडावरच्या फुलासारखा  तो माऊलींचा रथ हलक्याश्या डोलणाऱ्या पांडुरंगा  सारखा पुढ पुढं जात होता.... आता परत जायचं... पाय निघणार का? जी मिळाली ती अनुभूती मनात भरून आम्ही सगळे बस जिकडे होत्या तिकडे निघालो. जेजुरी पासून १ किलोमीटर उलट चालत जावं लागणार होत. मनात खूप शब्द गर्दी करून होते. आपण थकलोय हि पुसटशीही जाणीव आत्ता पर्यंत नव्हती.. जसा जेजुरीकडे पाठ करून या सांसारिक सागराकडे वळलो... तस दिवसभराचं सर्व चित्र माझ्या मनात फिरत होत. घरी फोन करू हे पण वाटत नव्हतं. घरी ठाऊक आहे योग्य वेळी मी कळवेनच आणि तसाही सकाळी १० पासून फोन बंदच होता. पांडुरंगाची कृपाच! कधी एकदा मनातले शब्द उतारावतें असे झालेलं. पंचवटी ढाबा आला. सगळ्या माऊली खिचडी खाऊन परत गाडीत बसलो. श्री. विठ्ठल गवळी माऊली आमच्या गाडीचे कोऑर्डिनेटर होते. त्यांनी खूप मोलाची मदत केली. सर्व ए आय दिंडी चे स्वयंसेवक, स्वयंपाक करणाऱ्या माऊली, पडद्यामागचे ए आय चे स्वयंसेवक माझ्या बरोबर सोबत चालणाऱ्या सर्व माऊलींची मी खूप आभारी आहे. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे आज मला या मोलाचा क्षण मनात नोंद करता आला.

परत भेटूच... पुढच्या वर्षी पुढच्या टप्प्यात.. जेजुरी- वाल्हे! विठू माऊली आपल्या सर्वांचे मनोगत पूर्ण करण्याचे बळ देतीलच.

आपलीच,

सौ. गौरी माऊली