Tuesday, 2 March 2021

पहिली दिलदार भेट

मला मिळालेली पहिली दिलदार भेट

कोणाचाही वाढदिवस असो वा आनंदाचा दिवस असो, मला फुलं (निशीगंध) किंवा गजरा द्यायला आवडतो.फुलांच्या सुगंधाप्रमाणे तो आनंद सर्वत्र पसरावा या हेतुनं. 

परवा माझाच लग्नाचा वाढदिवस होता, सहजीवनाचा वीस वर्षपूर्तीचा आनंद मी घेत होते. ऑफिसमधुन घरी जाताना आज आपणच आपल्याला गजरा घेऊ अस ठरवलं. नेहमीच्या फुलवाल्या दुकानापाशी गाडी थांबवली, वहिनींना म्हटलं की मस्त पैकी बघुन गजरा द्या, ऊद्या पर्यंत टिकेल असा. त्यांनी विचारलं किती देऊ? मी हसत एकच हवाय म्हटलं. त्यावर त्या म्हटल्या की, का हो आज एकच एरवी चारच्या खाली नेत नाही तुम्ही? ऐकुन मला जरा हसुच आलं.

अहो आज कोणासाठी नाही मलाच द्यायचाय. हो का! आज काय विशेष त्यांनी विचारलं. मंद हसत मी सांगुन टाकलं की आज लग्नाचा वाढदिवस आहे, म्हटल चला आज आपणच आपल्याला देऊ.

तर वहिनींनी पटकन फुललेला भरगच्च गजराच हातात ठेवला. हा माझ्याकडुन तुम्हाला.... कळीचा ठेवा ऊद्याला. (जो आधी कागदात बांधुन झाला होता). मी हात मागे करत नको म्हटलं, एक घेतलाय की.
त्यावरच वहिनींच ऊत्तर ऐकुन फार फार छान वाटलं.

अहो ताई, हा माझ्याकडुन तूमच्यासाठी खास, मला पण वाटलं तुमचं ऐकुन आपण सतत करत राहतो ईतरांसाठी. घर नोकरी घर. मी पण बघा फुलांची गाडी चालवते पण एक फुल माळणं होत नाही.

आपल्याजवळ काय आणि किती आहे? याला महत्व नाही, पण आहे त्यातुन योग्य कसंआपण ईतरांना/दुसर्यांना देऊ शकतो. तो आनंद घेऊ शकतो हे आज फुलवाल्या वहिनींनी शिकवलं. त्यांचा फुलांचा धंदा असा तो किती असणार.... हातावरचं पोट ते. पण त्यातुन मला झपकन भरगच्च गजरा द्यायची दानत वहिनींमधे दिसली. परमेश्वराची अनमोल देणगी वहिनींजवळ आहे म्हणुनच त्यांच्या फुलांसारख्या त्याही कायम टवटवीत आनंदी असाव्यात.

लग्नाच्या विसाव्या वाढदिवशी मिळेलेली ही दिलदार भेट पहिलीच! कायम लक्षात राहिल एशी आहे.

शुभः भवतु!

गौरी पाठक 

Wednesday, 24 February 2021

अधिकमास साधना.... जय श्रीकृष्ण

अधिकमास साधना.

गोवर्धनधरं वंदे गोपालं गोपरूपिणम् ।
गोकुलोत्सवमीशानं गोविंदं गोपिकाप्रियम् ॥
भक्तिर्भवति गोविंदे पुत्रपौत्रविवर्धिनी ।
अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्तिर्वधते चिरम् ॥

महिनाभर सतत नामस्मरण करावे – यात कुलदैवताचे नामस्मरण,श्रीकृष्णाचे स्मरण करावे.

अधिक महिना पुरूषोत्तम मास म्हणुन ओळखतात. व्रत अस कराव की भावना पोचली पाहिजे.

 म्हणुन त्याच पुरूषोत्तमानं देऊ केलेल्या कलेमार्फत त्याचीच रांगोळी दररोज एक काढुन श्रीकृष्णाने माझ्याकडुन व्रत पुरे करून घेतले.

मी त्या परमेश्वराची आभारी आहे.

Tuesday, 22 September 2020

"निनामी नातं"


 

आपण माणसं घरात नवीन पाहुणा येणार कळलं की किती खुष असतो. घरातील बाई बाळंतपणाच्या पूर्व तयारीत मग्न होते. आफण तीचे डोहाळे पुरवतो. नऊ महिने तीची काळजी घेतो. माणसाला देवानं दिलेली एक विशेष शक्ति विचारशक्ती जीच्यामुळे आपण हसतो, रडतो, आनंद व्यक्त करतो. कल्पना बुद्धी जोडुन विविध कामं करतो. तसच बाईमाणसाच्या बाळंतपणात तीचे विविध बदल अनुभवतो.

यावेळी माझ्या शेजारच्या आगळ्या वेगळ्या पाहिलेल्या बाळंतपणामुळे मला या गोष्टींची प्रकर्षाने जाणीव झाली.आवाज नाही, चर्चा नाही, माणुसबळ नाही, कौतुक नाही तरी सगळं स्वतःच्या जीवावर तीनं आणि त्यानं ते पार पाडताना बघुन वाटलं, आपल्यापेक्षा कमी क्षमता आणि सोई असुनही हे त्यांना किती छान जमतय. मी कोणत्या माणसांबद्दल नाही तर माझ्या खिडकीतुन सहज समोर दिसणार्या कावळीणीबद्दल हे बोलतेय. आजवर पक्ष्यांच बाळंतपण कधीच बघितलं नव्हतं. गेल्या दोन तीन महिन्यात ते जवळुन समजलं. पक्षी सुद्धा रीतसर तयारी करतात. दोन महिन्यांपूर्वी लक्षात आलं. आजवर कबुतरं गडबड करत, आता कावळे पण भिरभिरायला लागले की काय? मग लक्षात आलं की ते दोन कावळे घरटं करत आहेत. चिमणीच घरट ऐकलेलं परंतु कावळ्याच नवीनच होतं मला. याच दिवसात जोरदार पाऊसही येत होता. पण लहान काड्यांना इतकं सुंदर गुंफुन तीन लहान फांद्या गुंतवल्या होत्या की त्या जोराच्या पावसात फांदी हलली तरी पडणार नाही. 
हळुहळु त्यात दोन अंडी पण आली होती. घरच्या सर्वांनाच घरटं पाहायचा नाद लागला. थोडा थोडा वेळानं कावळा येत असे. एकदा अचानक बारीकसा कलकलाट ऐकु आला. भुरकट रंगाची दोन पिल्लं टिवटिवु लागली.आतालतर जास्तच लक्ष जाऊ लागलं.विविध प्रकारची लहान पानांची फांदी आणत चोचीन पान पाडुन ती साफ करायची मधेच दुसरा कावळा ती घेत असे मोडत असे मग घरट्याला लावत अस चालु असायचं. माणसांसारखी आधीची तयारीच सुरू होती जणु. आधी आम्ही सारखं खिडकीत आलो की ते ओरडत. नंतर कमी झालं. आता ते आम्हाला घाबरत नाहीत.
लहानपणीच्या गोष्टीत चिमणीची पिल्लं होती.  लहानपणापासुन कावळ्याला दुय्यमच समजायची पकड मनावर. कावळा घाणेरडा, चिमणी साधी सरळ स्वच्छ हीच गोष्ट मनात कोरलेली. त्यामुळे कावळ्याच घरटं, त्याची पिल्लं हे सगळं जरा वेगळच वाटत होतं. ठराविक वेळी ती पिल्लं भयंकर कलकलाट करतात, मोठे कावळे चोचीत भात पोळी भरून आणतात आणि ही पिल्ल हाs मोठ्ठा जबडा करून ते घ्यायला भांडतात. जाम मजेदार प्रसंग. आधी ती पिल्लं घरट्याच्या खड्ड्यातुन कमी दिसायची, नुसत्या लाल कोवळ्या दोन चोचीच दिसत. आतता ते पक्षी गटात मोडणारे कावळे झालेत पण छोटेसेच. त्यांना घरट्यातुनच डोकावणे, अंग साफ करण जमतय. रोज रात्री एक कावळा त्या घरट्यावर पंख पसरून असतो. जास्त करून पाऊस पडुन गेल्यावर.

 
सकाळ झाली रे झाली की आवाज सुरू. त्या कावळीणीची मजा मी रोज बघतेय. ती दोन पिल्लं ईतकुशा जागेतच लठ्ठा लठ्ठी करतात. तीच नऊच्या सुमारास गाठ झोपलेली असतात, अगदी एकमेकांना गुरफटुन.
काही  दिवसातच आमच्यात नातच निर्माण झालं होतं. "निनामी नातं" आता आठवडाभरच जास्तीत जास्त ती घरट्यात राहतील. पण आमच्या आठवणींच्या घरट्यात मात्र कायमचच घर करून जातील.
प्रत्येक प्रसंगात कस वागायची ही समज देवानं प्रत्येकाला ईतकी छान आणि जेवढी हवी तशी दिलीय. निसर्गाची किमया अगाधच, आणि आमच्या निनामी नात्याचे बंध सुद्धा!
सौ. गौरी पाठक
९९७०१६८०१४

Thursday, 11 June 2020

पहिलं वहिलं रोप

पहिलं वहिलं रोप

एक लहानशी गोष्ट आयुष्यात खुप काही शिकवुन जाते. या लाॅकडाऊनच्या काळात मलाही एक गोष्ट शिकता आली, एक  सुप्त आवड जोपासता आली.निसर्ग जवळुन पाहता आला. माझ्या आयुष्तले मी पेरलेलं पहिलं  बी पेरून ऊगवलेलं रोप मोहरीच आणि मेथीचं मी या काळात लावलं.
आफण पेरलेलं बी - रोप होताना, वाढताना दिवसाला काय तासा तासाला पाहिलं. रोपाची वाढ होतानाचे बदल, त्यातले बारकावे पाहताना मजा आली. एरवी ऑफिसच्या काळात रोप आणणे, पाणी घालणे आणि सुट्टीच्या दिवशी प्रगती बघणे, असच होत होतं. मोहरी आणि मेथी मी स्वतः पेरली, मेथीची कोवळी गोंडस पानं अंकुर फुटताना ते डौलात ऊभी राहितोवर पाहिली, अनुभवली सुद्धा. तो आनंद वेगळाच होता. या दोन महिन्यात निसर्ग जवळुन अनुभवता आला, शिकता आला. ऊगण्यासाठी 
मोकळा श्वास घेण्यासाठी टणक कवच मोडुन बाहेर येणं, अंकुर फुटणं, पानं वाढणं, देठ मोठं होणं, नंतर ती मजबुत होणं, बारीक बारीक पोपटी पानं फुटणं, त्याला छोटसं नाजुक पिवळं फुल येणं, इवलासा तो जीव पण डौलात वार्यावर डोलणं, फुल गळुन पडणं, लांब लांब अतिशय कोवळ्या शेंगा लागणं, पोटपी शेंगांच वजन पेलत ते देठं दिमाखात ऊभी पाहणं फारच मनोहारी होतं.
आता शेंगा वाळुन फुटु लागल्यात आणि माझ्या शेतातल मोहरीच पिक दाण्याच्या स्वरूपात माझ्या हातात आहे.
मधे जोरात वादळ आलं, तीन चार वेळा जोरात पाऊस झाला पण मुळाशी घट्ट पकडुन माझी ही ईवलीशी रोपं तग धरून होती. निसर्ग शिकवत होता, वादळं येणारच, तेव्हा घाबरू नको. डोळे मिटुन मुळाचा विचार करत शांत बसुन रहा. नंतर जोमानं ऊभं राहायचय, परत फुलायचय.
पावसात माझी ही मोहरी मेथीची रोपं कोलमडणार अस वाटुन मनातुन ऊदास वाटत होतं. पण दुसर्या दिवशी खमकेपणानं ती ऊभी होती.
मोहरीच पहिलं फुल

माझ्या आयुष्यात आलेला पहिला रोप लावण्याचा अनुभव भरपुर काही देऊन गेला. नंतर मी डबल बी, बडिशेप, चिक्कु, मिरची बरीच रोपं/ बी पेरलं. आणि आता छोटस टेरेस मस्त बहरलय. पण या सगळ्यात माझं पहिलं वहिलं मोहरीच आणि मेथीच रोप मात्र मोलाचच होत आणि राहिल.
कुंडीतलं मोहरीच पहिलं रोप
मोहरी तयार
मोहरीच्या हिरव्या शेंगा
नुकतच डोक वर काढलेली डबल बी
डबल बीची फुलं
डौलात ऊभी राहिलेली मेथी
मिरचीच फुल
येऊ घातलेली डबल बी शेंग
हा माझा चिक्कु
झेंडु - वाळलेलं फुल नुसत कुंडीत टाकलं आणि दोन आठवड्यात रोप आलं.
डबल बीच्या फुलांचा रंग पहा मनोहारी आहे
सुगंधी अनंत

सदाफुली
हजारी मोगरा
माझं फुललेल टेरेस गार्डन


गौरी पाठक
९९७०१६८०१४