Tuesday, 22 September 2020

"निनामी नातं"


 

आपण माणसं घरात नवीन पाहुणा येणार कळलं की किती खुष असतो. घरातील बाई बाळंतपणाच्या पूर्व तयारीत मग्न होते. आफण तीचे डोहाळे पुरवतो. नऊ महिने तीची काळजी घेतो. माणसाला देवानं दिलेली एक विशेष शक्ति विचारशक्ती जीच्यामुळे आपण हसतो, रडतो, आनंद व्यक्त करतो. कल्पना बुद्धी जोडुन विविध कामं करतो. तसच बाईमाणसाच्या बाळंतपणात तीचे विविध बदल अनुभवतो.

यावेळी माझ्या शेजारच्या आगळ्या वेगळ्या पाहिलेल्या बाळंतपणामुळे मला या गोष्टींची प्रकर्षाने जाणीव झाली.आवाज नाही, चर्चा नाही, माणुसबळ नाही, कौतुक नाही तरी सगळं स्वतःच्या जीवावर तीनं आणि त्यानं ते पार पाडताना बघुन वाटलं, आपल्यापेक्षा कमी क्षमता आणि सोई असुनही हे त्यांना किती छान जमतय. मी कोणत्या माणसांबद्दल नाही तर माझ्या खिडकीतुन सहज समोर दिसणार्या कावळीणीबद्दल हे बोलतेय. आजवर पक्ष्यांच बाळंतपण कधीच बघितलं नव्हतं. गेल्या दोन तीन महिन्यात ते जवळुन समजलं. पक्षी सुद्धा रीतसर तयारी करतात. दोन महिन्यांपूर्वी लक्षात आलं. आजवर कबुतरं गडबड करत, आता कावळे पण भिरभिरायला लागले की काय? मग लक्षात आलं की ते दोन कावळे घरटं करत आहेत. चिमणीच घरट ऐकलेलं परंतु कावळ्याच नवीनच होतं मला. याच दिवसात जोरदार पाऊसही येत होता. पण लहान काड्यांना इतकं सुंदर गुंफुन तीन लहान फांद्या गुंतवल्या होत्या की त्या जोराच्या पावसात फांदी हलली तरी पडणार नाही. 
हळुहळु त्यात दोन अंडी पण आली होती. घरच्या सर्वांनाच घरटं पाहायचा नाद लागला. थोडा थोडा वेळानं कावळा येत असे. एकदा अचानक बारीकसा कलकलाट ऐकु आला. भुरकट रंगाची दोन पिल्लं टिवटिवु लागली.आतालतर जास्तच लक्ष जाऊ लागलं.विविध प्रकारची लहान पानांची फांदी आणत चोचीन पान पाडुन ती साफ करायची मधेच दुसरा कावळा ती घेत असे मोडत असे मग घरट्याला लावत अस चालु असायचं. माणसांसारखी आधीची तयारीच सुरू होती जणु. आधी आम्ही सारखं खिडकीत आलो की ते ओरडत. नंतर कमी झालं. आता ते आम्हाला घाबरत नाहीत.
लहानपणीच्या गोष्टीत चिमणीची पिल्लं होती.  लहानपणापासुन कावळ्याला दुय्यमच समजायची पकड मनावर. कावळा घाणेरडा, चिमणी साधी सरळ स्वच्छ हीच गोष्ट मनात कोरलेली. त्यामुळे कावळ्याच घरटं, त्याची पिल्लं हे सगळं जरा वेगळच वाटत होतं. ठराविक वेळी ती पिल्लं भयंकर कलकलाट करतात, मोठे कावळे चोचीत भात पोळी भरून आणतात आणि ही पिल्ल हाs मोठ्ठा जबडा करून ते घ्यायला भांडतात. जाम मजेदार प्रसंग. आधी ती पिल्लं घरट्याच्या खड्ड्यातुन कमी दिसायची, नुसत्या लाल कोवळ्या दोन चोचीच दिसत. आतता ते पक्षी गटात मोडणारे कावळे झालेत पण छोटेसेच. त्यांना घरट्यातुनच डोकावणे, अंग साफ करण जमतय. रोज रात्री एक कावळा त्या घरट्यावर पंख पसरून असतो. जास्त करून पाऊस पडुन गेल्यावर.

 
सकाळ झाली रे झाली की आवाज सुरू. त्या कावळीणीची मजा मी रोज बघतेय. ती दोन पिल्लं ईतकुशा जागेतच लठ्ठा लठ्ठी करतात. तीच नऊच्या सुमारास गाठ झोपलेली असतात, अगदी एकमेकांना गुरफटुन.
काही  दिवसातच आमच्यात नातच निर्माण झालं होतं. "निनामी नातं" आता आठवडाभरच जास्तीत जास्त ती घरट्यात राहतील. पण आमच्या आठवणींच्या घरट्यात मात्र कायमचच घर करून जातील.
प्रत्येक प्रसंगात कस वागायची ही समज देवानं प्रत्येकाला ईतकी छान आणि जेवढी हवी तशी दिलीय. निसर्गाची किमया अगाधच, आणि आमच्या निनामी नात्याचे बंध सुद्धा!
सौ. गौरी पाठक
९९७०१६८०१४

3 comments:

  1. सहज,गूगल वर गिरनार यत्रे बद्दल माहिती शोधत असताना तुमचे ब्लॉग लिंक वर लिहिलेले गिरनार यात्रा वर्णन वाचलं, अप्रतिम लिहिले आहे, खूप माहिती मिळाली नंतर कावळ्या ची गोष्ट वाचली यातील मधील निरीक्षण खूप सुंदर आहे...वृक्षवल्ली आम्हा सोयरी हे अगदी खरे आहे...

    ReplyDelete