||ॐ नम: शिवाय||
एका सुंदर पहाटे चा योग आज जुळून आला होता. चार जणींची महादेवाच्या देवळात जायची एकत्रित ईच्छा आज पूर्ण झाली. योगच यावा लागतो काही वेळा हे पटतं. आषाढी एकादशीच्या दिवशी महादेवाचं दर्शन घ्यावं का वाटल मला कोण जाणे? सहज विचारल आणि सगळ्यांना जमत पण होतं.आमच्यातल्या एकीची खुप दिवसापासूनची ही मनापासून ची ईच्छा पूर्ण झाली.
पहाटे साडे पाचला ऊठलो असू. कॅबनी दोघी माझ्याकडे साडेसहाच्या आसपास पोचल्या. मैत्रिणीच्या मेसेजनुसार गाभार्यात सोवळे, साडी असेल तर प्रवेश मिळतो समजल्यामुळे मस्त पांढरी साडी नेसले. माझ्या आवडीप्रमाणे आणि महादेवाला पांढर घालून जातात म्हणून पांढरे कपडे घालू ठरल होतं. मी आदल्या दिवशी सगळ्यांना मंद मंद वासाचे मोगर्याचे गजरे आणलेले कॅबमधे ऊघडले, नुसती दरवळ होती. त्या सुवासाने आद्ध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी मन आणखी अधिर झालं. पाषाणच्या (बाणेर) सोमेश्वर महादेव देवालयात
स्वयंभू, ऐतिहासिक आणि प्राचीन असलेल हे देऊळ ७०० वर्ष जुन आहे अस समजलं. प्रत्यक्ष जिजाऊ राजमातांनी जिर्णोद्धार केलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या लहानपणची ही वास्तू ज्या ठिकाणी आज आम्ही ऊभे होतो. पावन ती भूमी स्वयंभू महादेवामुळे तर होतीच होती पण त्यात शिवाजी महाराज, रामदास स्वामी, तुकाराम महाराज न जाणो आणखी कितीतरींचा सहवास या वास्तूंत नोंद असेल. आज ती वास्तू अनुभवण्याचा योग आला.
काळ्या पाषाणातली भिंत कडी कोयंडे असलेल दार ओलांडून आत गेलो आणि वातावरणातला काही प्रमाणात गारवा जास्त जाणवला. तत्काळ एक आल्हाददायक शांतता जाणवली. भुरभुर पावसामुळे पाषाणाचा काळेपणा आणखी निखरून आलेला दिसत होता. आत जाताच चौफेर नजर फिरताच ते समजलं. किरकोळ भक्तांची वर्दळ, बारीकसा घंटांचा आवाज, गुरूजींची लगबग, पावसाची रिमझिम, समोरच्या गणपतीसमोर तेवणारी मंद डोलणारी वात आणि डोक्यावरून पदर आणि पुजेच ताट सावसर सहज वावरणार्या महिला अत्यंत सुंदर आणि मनास गारवा देणारा क्षण!
शंभो! घुमणारा स्वर ऐकताच रोमांचणारा क्षण आणि मग तो आठवणीसाठी फोटो बंद होणार नाही अशक्यच.. आम्ही मस्त फोटो काढले चार पाच. आत जाताच पाच सहा पायरी ऊतरून दिपस्तंभ मोठा जवळपास ३०-४० फुट ऊंच आहे. त्याखाली मस्त छोटस गणपतीच देऊळ आहे. भुरभुर पावसाच्या ढगाळ पण मोकळ्या हवेत काळ्या पाषाणातल्या कोनड्यातली शेंदूर रंगाची मूर्ती लक्षवेधी वाटली. मुळ मूर्तीची कल्पना येते. याच्या बरोबर मागे आपल्या ऊंचीचा मारूती आहे. जवळ शनी पण आहे. मारूतीच्या उजव्या बाजूला अतिशय मनमोहक संगमरवरी गणेश आहे. ही मूर्ती ऊभट आहे आणि केसाची वळणाची पद्धत खुपच निराळी आहे. या बाप्पाच्या बाहेर मारूतीच्या खाली जाणारा एक लहान चौकोनी दरवाजा आहे तो गुप्त दरवाजा पूर्वी चा लालमहालापर्यंतच आहे ही माहिती तिकडेच मिळाली. मारूतीच्या डाव्या भागास कालभैरव आणि भैरवी काळी तेजस्वी मूर्ती आहे ती फुलांच्या सजावटीमुळे पुजा झाल्यावर जब्रा दिसत होती.
एकंदरच पाच सात पायरी ऊतरत जात आत आत मुख्य महादेवाच देऊळ आहे. ठोक्याच्या परातीवर जसे ठोके असतात तसे दगडांवर असल्यामुळे पायाला तो स्पर्श वेगळीच जाणीव मेंदूपर्यंत पोचवत होता. मारूतीच्या समोर घुमटाकार आकारात आत चौरस मोकळा भाग सभा मंडप, फर्शी मात्र नक्षिदार सुबक. याच्या टोकावर काळा तुळतुळीत नंदी. आतून वर घुमटावर पांढरा रंग बेस त्यावर वारली सारखं रंगकाम कथांच. हे फार निरखून बघू शकले नाही. आम्ही बोलत थांबलो परिसर इंद्रीयं टिपत होती, मी हापापल्यासारखी शोधत काय दिसतय ते टिपत होते. परिसर इतका शांत, मंद सुगंधी त्यात सकारात्मक ऊर्जायुक्त सहकारी आणि स्वतः ची ऊपलब्ध असलेली महादेवाची ऊर्जा ऊबदार स्पंद एक वेगळीच आठवण करून देत होती.
गाभार्यात जाण्याआधी आम्ही उजवीकडे थांबलो होतो. पिंपळाचा पार, कमी जास्त होणारा पाऊस, पानांवर अंगावर पडणारे तुषार त्यात पारावर दिसणारं पत्रपेटी वजा दिव्याच घर आणि शेजारी संगमरवरी पादुका (कोणाच्या ते समजल नाही) सकाळी साडेसातच्या वेळची ही निसर्गाची चौकट अप्रतिम होती. पारामागे बकुळ फुलांचा वृक्ष.. केर काढणारे पण थांबले फुल वेचायला गेले तर... तेवढ्याच चौथी मैत्रिण आली. मग देवळात गाभाऱ्यात निघाली मंडळी. नंदीच्या पुढे परत तीन चार पायरी ऊतरून परत सभा मंडप, आत खाली जायला सहा पायरी ऊतरून मग प्रत्यक्ष स्वयंभू भोलेनाथ विराजमान ठिकाण! सुंदर काळभोर शिवलिंग त्यावर पाणी बेल धतुरा आणि तो थंडगार स्पर्श डोळे भरून आणि मन भरून अनुभवला. ब्रह्मभाग, विष्णूभाग आणि शाळुंका सगळ्यास मनोभावे हात लावून मानसपूजा करू शकले. शिवभाग/ रूद्रभाग स्पर्श क्वचितच लाभतो. हा क्षण लाभला यासाठी माध्यम ठरलेल्या सर्वांना अनेक धन्यवाद.
कोणी जाणार असेल तर सोवळ्यात साडी नेसून नक्की जा आणि हा क्षण अनुभवाच.
संपूर्ण परिसरातली सगळी काम जो तो चोख पार पाडत होता. आरडा ओरड नाही की चेहर्यावर अभिमान नाही. सगळे आम्ही पहिल्यांदा आलोय ओळखून सहकार्य करतानाच सापडले. कोणताही स्वयंसेवक नसूनही कोणतीही गडबड अव्यवस्था नव्हती. गाभार्याबाहेर आल की उजवीकडे शिवलिंग आहे आपण जलाभिषेक करू शकतो. नवख्यांना प्राधान्य देणार्या त्या सात्विक महिला पाहून कौतुक वाटलं.
प्रदक्षिणा झाली. मागचा पाखलीतला मुखवटा पाहून ऊतरती पायरी पाहून फोटो पण काढून झाले पण पाय काही निघेना. उजवीकडे चित्राव यांची समाधी दिसली. पार्वतीनंदन गणपतीच्या देवळात यांचा ऊल्लेख वाचलेला आठवला.
वरच्या भागात १२ ज्योर्तिलिंग प्रतिकृती होत्या. पालखीच्या शेजारी खिडकी वजा दार होती, मोठ्ठी देवळीच जणू. मागे रामनदीचा घाट होता. गजातून धबाधब फेसाळणारं रामनदीच पाणी घाटाच्या पायरीवर पडत होतं, घाट एकदम स्वच्छ, नदीपललिकडे एक जुनं देऊळ, पायवाट सोडता सगळ हिरवगारं रान अहाहा! निसर्गाची हो चौकट अफलातून होती. हीच मी बाहेरून पुलावरून पण बघितली जाताना परंतु या आतल्या चौकटीची आभाच काही और होती... वास्तूच तेज शेवटी झळकलेल असणारच... देवळीतून बाहेर पाहतानाचा हाच निसर्ग पुलावरून बघतानाच्या आंतरीक शांतीपेक्षा कैक पटीने मोठा होता.
मस्त वाटत होतं. कट्ट्यावर बसून एकमेकांना आलेले अनुभव ऊजळणी केली. मग मनात आल आज तर आषाढी एकादशी मला का ईच्छा झाली महादेवाच्या देवळात जायची? सोमेश्वराला जातोय सांगताच घरचे पण सगळ्यांचेच आश्चर्य करत होते. गौरी चला म्हटली म्हणजे काहीतरी असणार हा मैत्रिणीला माझ्याबद्दल असलेला विश्वास बरच काही बोलून गेला. पण खरच होत दिवसाच महत्व शंकराचं पण मी आषाढी विचारातच न घेत महादेवच बघायचा विचार करत हा प्रस्ताव मांडला होता. पांडुरंगाची कृपा अशी की तिकडे एका काकुंनी जवळच विठ्ठल रखुमाई माऊलीच देऊळ पण दर्शन घ्या सांगितल आणि वाटल सगळच सुंदर नियोजन त्या परमेश्वरानी करूनच ठेवल होतं. मानवाच्या प्लॅनपेक्षा परमेश्वरानी आपल्यासाठी आखलेलेच बेतच ऊत्तम असतात ही खुण पटली. मग लगेचच विठुमाऊलीच दर्श घेतलं. छोटस पण अतिशय सुंदर विठ्ठल रखुमाई देऊळ सोसायटीच्या खाली होतं. अनंतावर विराजमान सावळा सुंदर मनोहर रुखमीणीबरोबर ऊभा होता. खाली पणत्या लावलेल्या होत्या एक निमिष पंढरपूरातच होते. अतिशय समाधानी चार मनं वातावरणात रूळली होती.
जवळच मैत्रीणीकडे मस्त खिचडी, मिल्कशेक, चहा आणि दाण्याचा लाडू फराळ करून मी भौतिकातून हाक आलेल्या एका मनाच्या कप्प्यात जपलेल्या सखीकडे धाव घेतली...
आमच्या आयुष्यातील आजची सकाळी सहा ते दहाची ही सुंदर स्मृती आयुष्य भर लक्षात राहिल.
जय श्रीकृष्ण
गौरी पाठक
९९७०१६८०१४
No comments:
Post a Comment