Thursday, 26 November 2026

माझे कान्हाजी... एक अविस्मरणीय भेट, एक अनामिक अनुभूती!

 माझे कान्हाजी.. एक अविस्मरणीय भेट, एक अनामिक अनुभूती!

मी श्रीकृष्णाच्या भक्तीमार्गाकडे नेमकी कधी आणि कशी वळले, हे मलाही ठाऊक नाही.

कदाचित त्यांच्याशी माझे नाते कधीच जुळलेले असावे; फक्त त्याची जाणीव मला हळूहळू होत गेली असावी!

श्रीकृष्णांविषयी आजवर जे काही वाचले, ऐकले, पाहिले, साहित्यामधून वाचून अनुभवले किंवा मूर्तींच्या रूपात मनात साठवले, त्याच रूपात मी नेहमी माझ्या कान्हाजींची कल्पना करत आलो आहे. पण या सगळ्यापलीकडे माझ्या मनात एक विशेष स्थान आहे ते वृंदावनातील राधारमण लालजींचे! त्यांच्यावर माझे विलक्षण प्रेम आहे. त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाची मनापासून ओढ आहे. मात्र, मनाला एक गोष्ट नेहमी जाणवते... आपण कितीही इच्छा केली, कितीही आस लावून बसलो, तरी वृंदावनाची हाक येते ती केवळ त्यांच्या इच्छेनेच! जेव्हा ते बोलावतील, तेव्हाच त्यांच्या चरणी पोहोचता येईल.

तोपर्यंत मनाच्या डोळ्यांनी मी स्वतःला नेहमी त्यांच्या मंदिराच्या पायऱ्यांवर उभे असल्याचे पाहत असतो. मनात एकच भावना असते... कधी तरी नक्की बोलावणार  कान्हजी?

अशातच साधारण पाच महिन्यांपूर्वी पुण्यात 'मेरे कृष्ण' या नाटकाचा प्रयोग होणार असल्याची सूचना मला मिळाली. सूचना मिळताच क्षणाचाही विलंब न करता मी तिकिटे बुक करण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी मला कल्पनाही नव्हती की माझ्या आजूबाजूला असणाऱ्या कितीतरी मित्रांना आणि नातेवाईकांनाही या प्रयोगाची आणि सौरभ राज जैन यांच्या रूपातील श्रीकृष्णांना प्रत्यक्ष पाहण्याची एवढी आतुरता असेल! अनेकांना तिकिटे मिळाली नाहीत. पण माझ्या हातात तिकीट आले होते. हीदेखील माझ्या कान्हाजींचीच काहीतरी लीला असावी, असे मला  वाटते.

तिकीट बुक झाल्यापासूनच माझ्या मनात त्या दिवसाचे चित्र रंगू लागले होते.

सकाळपासूनच विचारांची एक वेगळीच लगबग सुरू होती. नाटकात काय काय पाहायला मिळणार? रंगमंचावर कान्हाजींचे आगमन कसे होणार? कोणते २२ प्रसंग असतील? प्रत्यक्ष श्रीकृष्णांच्या वेशभूषेत सौरभजींना पाहिल्यावर माझ्या मनाची अवस्था काय होईल? माझ्या मनातील भावनांना मी आवर घालू शकेन का? एकीकडे उत्सुकता, दुसरीकडे आनंद, तर कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात दडलेली एक अनामिक हुरहूर!

या सगळ्या भावनांमध्ये मी सौरभ राजजी, अर्पितजी आणि पूजाजी यांच्यासाठी एक पत्रही लिहिले होते. ते पत्र त्यांच्या हातात देता येईल की नाही, याची खात्री नव्हती; पण मनातल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची एक छोटीशी इच्छा होती.

नाटकाची वेळ होती रात्री आठ वाजताची. ऑफिसमधून संध्याकाळी सहा वाजता निघायचे होते. पण निघण्यापूर्वी अनेक अडचणी उभ्या राहिल्या. क्षणभर वाटले, आता कसे होणार? मात्र मनात एक विश्वास होता... ज्याला कान्हाजींची भेट घडवायची असते, त्याच्यासाठी ते मार्गही स्वतःच तयार करतात! आणि अखेर मी  वेळेत नाटकगृहात पोहोचले.

आम्ही आमच्या जागेवर स्थानापन्न झालो. सभागृहातील वातावरण हळूहळू भारावून जात होते. नाटक सुरू होण्याची घोषणा झाली. सूत्रसंचालकांकडून नाटकाची पार्श्वभूमी आणि इतर माहिती दिली जात होती. रंगमंचावर भव्य राजदरबाराचा देखावा उभा होता.

आणि अचानक रंगमंचाच्या एका बाजूने दुर्योधन, शकुनी आणि कर्ण यांचे आगमन झाले.

खरे सांगायचे तर कलाकार प्रेक्षकांमधूनही प्रवेश करणार आहेत, याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. त्यामुळे हा एक अनपेक्षित आणि विलक्षण सुंदर धक्का होता! रुबाबदार दुर्योधन जवळून जाताना बाधितला.

तो युधिष्ठिराचा दरबार होता. प्रसंग रंगत होता. आणि त्याच वेळी युधिष्ठिराच्या मुखातून घोषणा झाली...

"द्वारकाधीशांचे आगमन होत आहे!"

आणि... तो क्षण आला!

ज्या क्षणाची मी तिकीट बुक केल्यापासून मनोमन वाट पाहत होतो, ज्या क्षणाचे चित्र मी कित्येक दिवस माझ्या कल्पनेत रंगवत होतो, तो क्षण आता प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांसमोर होता.

माझे कान्हाजी नाटकगृहाच्या प्रवेशद्वारातून आत येत होते!

काय ते रूप! काय ते तेज! काय ती चाल! चेहऱ्यावरचे ते लोभस हास्य! आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती जाणवणारे ते विलक्षण आभामंडळ! सौरभ राज यांनि साकारलेला तो श्री कृष्ण अतिशय सुरेख होता. 

क्षणभर काय बोलावे, काय अनुभवावे, हेच समजेनासे झाले.

माझे कान्हाजी मंद गतीने, चेहऱ्यावर तेच मोहक हास्य घेऊन प्रेक्षकांमधून रंगमंचाच्या दिशेने चालत होते. सभागृहातील प्रत्येक क्षण जणू थांबून राहिला होता आणि माझे डोळे फक्त त्यांच्यावर खिळले होते.

'अरे! हे तर माझे कान्हाजी आहेत!' ते सौरभ जैन यांच्या माध्यमाने का होईना माझ्या समोर होते.

मनात दाटून आलेली ही भावना शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे.

संपूर्ण नाटक अप्रतिम होते. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक संवाद, प्रत्येक भावमुद्रा मनाला स्पर्श करून जात होती. नाटक पाहता पाहता माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण ते अश्रू नेमके कशाचे होते, याचे उत्तर आजही माझ्याकडे नाही. आनंदाचे? भक्तीचे? प्रेमाचे? की इतकी वर्षे मनात जपलेल्या कृष्णरूपाला समोर पाहिल्याच्या आनंदाचे?

कदाचित या सगळ्याच भावनांचा तो एकत्रित आविष्कार होता.

मी आजवर पुस्तकांतून जे वाचले होते, मालिकांमधून जे पाहिले होते, भगवद्गीतेचे वाचन करताना जे अनुभवले होते आणि मनातल्या मनात ज्या प्रसंगांची अनेकदा उजळणी केली होती, ते सारे जणू त्या एका संध्याकाळी सजीव झाले होते.

मी कधीही कान्हाजींना केवळ एका रूपात पाहिले नाही. माझ्या मनात त्यांचे अनेक रूपे, अनेक लीला आणि अनेक भावविश्वे आहेत.

कधी आपण उद्धव आणि कान्हाजी यांच्यातील गूढ आध्यात्मिक संवाद पाहतो, तर कधी राधाराणी आणि श्रीकृष्ण यांच्या पवित्र प्रेममय नात्यात हरवून जातो. कधी सुदाम्याच्या मैत्रीतून प्रकटणारा कान्हाजींचा प्रेमळपणा प्रत्यक्ष आपल्याला जाणवतो, तर कधी कौरवांच्या सभेत शांतिदूत म्हणून आलेल्या द्वारकाधीशांचे गांभीर्य मनाला स्पर्शून जाते.

कधी बलराम आणि कृष्ण या दोन भावांमधील नितळ बंध अनुभवतो, तर कधी आपल्या मिश्किल, खोडकर आणि अवखळ कान्हाजींच्या संवादांवर मनापासून हसतो. रुक्मिणी विवाहातील प्रेमभाव, गांधारीच्या शापामागील वेदना, आणि या सर्वांपलीकडे अर्जुनाला दिलेला श्रीमद्भगवद्गीतेचा अमूल्य उपदेश खूप काही..... हे सारे माझ्या मनात नेहमीच जिवंत आहे. विशेषतः अर्जुनाला झालेले विराटरूप दर्शन आणि त्यानंतर भगवंतांचे निजधाम गमन हे प्रसंग मनाला एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात घेऊन जातात.

माझ्या मनात साठलेल्या या प्रत्येक प्रसंगाची अनुभूती मला या नाटकात कुठे ना कुठे मिळत होती. कान्हाजींच्या प्रत्येक रूपातील त्यांचे तेज, त्यांची करुणा, त्यांचे प्रेम, त्यांचे गांभीर्य, त्यांचे मिश्किलपण आणि त्यांचे दिव्यत्व... जणू सगळे काही त्या एका प्रयोगात अनुभवायला मिळाले. खरंच कसे काय ते अगदी डीकटो सौरभ राज जैन याच्यात दिसत होते नाही का! नशिब्वानाच आहेत ते.

मला त्या दिवशी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली... आपण एखाद्या प्रसंगाची केवळ कल्पना केली, तर तो प्रसंग आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो; पण त्या प्रसंगाशी जेव्हा आपण भावनिकरीत्या जोडले जातो, तेव्हा तो केवळ कल्पनेपुरता मर्यादित राहत नाही, तर आपल्या अंतर्मनात जिवंत होतो! कदाचित म्हणूनच या नाटकातील प्रत्येक प्रसंग माझ्यासाठी केवळ अभिनय नव्हता. तो माझ्या मनात वर्षानुवर्षे रुजलेल्या श्रद्धेचा, भावनेचा आणि श्रीकृष्णांवरील प्रेमाचा अनुभव होता. या नाटकाने मला केवळ श्रीकृष्णांचे दर्शन घडवले नाही, तर त्यांच्या शिकवणीशी पुन्हा एकदा जोडले. त्यांच्या विचारांनुसार जगण्याची, भगवद्गीतेतील तत्त्वे आचरणात आणण्याची आणि त्यांच्या मार्गावर चालत राहण्याची प्रेरणा दिली.

मला श्रीकृष्णांच्या शिकवणीचा अनुयायी म्हणून जगायचे आहे. त्यांच्या विचारांचे चिंतन करताना, भगवद्गीतेतील तत्त्वे समजून घेताना आणि ती आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करताना मला एक विलक्षण शांतता आणि समाधान लाभते. या नाटकाने मला तीच शांतता, तोच आनंद आणि तीच भक्तिभावाची अनुभूती पुन्हा दिली. मनात असंख्य भावना आहेत. अनेक अनुभव आहेत. कितीतरी गोष्टी सांगाव्याशा वाटतात. पण काही अनुभूती अशा असतात, ज्या शब्दांत मांडण्यापेक्षा मनात जपण्यातच अधिक आनंद असतो. हा अनुभवही त्यापैकीच एक!

आज मागे वळून पाहताना वाटते की, त्या दिवशी मी केवळ 'मेरे कृष्ण' हे नाटक पाहायला गेलो नव्हतो. तर माझ्या मनात अनेक वर्षांपासून जपलेल्या कान्हाजींच्या भावविश्वाचा एक सुंदर अनुभव घेऊन परतलो होतो.

आता मनात एकच प्रार्थना आहे... माझ्या कान्हाजींचे विचार, त्यांची शिकवण, त्यांचे प्रेम आणि त्यांचे आशीर्वाद सदैव माझ्या जीवनाभोवती असेच राहोत. कितीही कोणतीही परिस्थिती आली, कितीही चढ-उतार आले, तरी त्यांच्या विचारांपासून माझे मन कधीही दूर जाऊ नये.

आणि हो... मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही एक आस तशीच जिवंत आहे! वृंदावनाची! राधारमण लालजींच्या दर्शनाची!

मला माहीत आहे, त्या पवित्र भूमीत जाणेही त्यांच्या इच्छेनेच शक्य होईल. म्हणून घाई नाही, तक्रार नाही, अपेक्षांचे ओझेही नाही. फक्त मनात एक निःशब्द प्रतीक्षा आहे. ज्या दिवशी माझ्या लालजींची हाक येईल, त्या दिवशी त्यांच्या चरणी पोहोचण्याचे भाग्य मला लाभो! तोपर्यंत मनाच्या मंदिरात माझे कान्हाजी असेच विराजमान राहोत.

कारण काही नाती शब्दांनी जोडली जात नाहीत, काही भेटी प्रत्यक्ष घडण्यापूर्वीच मनात अनुभवलेल्या असतात आणि काही प्रेमाला कोणत्याही स्पष्टीकरणाची गरज नसते... माझे आणि माझ्या कान्हाजींचे नातेही असेच काहीसे आहे!

राधे राधे! जय श्रीकृष्ण!


No comments:

Post a Comment