Thursday, 15 October 2026

नवशक्ती कृतज्ञता २०२६

नवशक्ती कृतज्ञता २०२६

यंदाच्या नवरात्रीत मी माझ्या रोजच्या बघण्यातील स्वाभिमानी कष्टकरून पायावर उभ्या अशा महिलांचा विचार करून ठरवल की यांचीच ओटी भरायची. यातील प्रत्येक स्त्री शक्ती आपापल नियतीन समोर आणलेल काम किंवा कर्मानुसार समोर असलेल काम किंवा स्वतः च्या  क्षमतेवर जे शक्य आहे ते स्वतः आणि परिवारास अर्थाजन म्हणून करताना बघत आलेय. प्रत्येकीच्या कामाची कला क्षमता वेगवेगळी आहे. ती कामं करतानाचा प्रत्येकीचा दृष्टिकोन आणि समोर येतील त्यांच्या बरोबरची कामाबद्दलची देवाणघेवाण विचार पद्धत तितकीच वेगळी आहे.
कोणत्याही कामास कमी न लेखता त्यातली नजाकत कष्ट आणि आनंद समजून घेता आला पाहिजे. मगच समजेल त्यांची कष्ट करण्याची क्षमता. या सर्व जणींमधली स्वतः ला सिद्ध करण्यासाठी ची धडपड तळमळ आणि कष्ट सहन करण्याची क्षमता मात्र अफाट आणि सारखीच वाटली. आजच्या या वर्षीच्या नवरात्रीत मी मनापासून यांच्या या क्षमतेस नमस्कार करते. परमेश्वराची विश्वातील अशा प्रत्येक स्त्री तत्वावर प्रेमळ दृष्टी राहो!
जय श्रीकृष्ण 
----
ही कलाकृती भारतीय कलाकार सुभाषचंद्र गौडा यांचे फळ विक्रेता नावाचे जलरंग चित्र आहे. फळ विक्रेत्या महिलेचे जीवन आणि त्यांचे आपल्या समाजातील महत्त्व अत्यंत प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण आहे. रस्त्याच्या कडेला किंवा बाजारात टोपली घेऊन बसलेली एक विक्रेता महिला केवल एक व्यावसायिक नसून, ती कष्ट, स्वावलंबन आणि कौटुंबिक जबाबदारीचे एक जिवत प्रतीक आहे विक्रेत्या महिलेचे जीवन आपल्याला प्रामाणिकपणे कष्ट करणे आणि स्वाभिमानाने जगणे शिकवते. या समाजाचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहेत त्यांच्या या कष्टाला आणि प्रामाणिकपणाला समाजाने नेहमीच सादर आणि सन्मान दिला पाहिजे.
जय जगदंब.
पहिली माळ ११ ऑक्टोबर २०२६
----
ही कलाकृती २०२० मध्ये 'मुस्तफा आर्ट' या कलाकाराने तयार केलेले "हार्ड वर्किंग लाइफ"  नावाचे तेलचित्र आहे, ज्यामध्ये निळ्या रंगाचे वैद्यकीय कपडे सर्जिकल कॅप आणि मास्क घातलेल्या एका आरोग्य कर्मचाऱ्याचे चित्रण केले आहे. आरोग्य कर्मचारी महिला , परिचारिका, नर्स आणि महिला डॉक्टर्स या आपल्या समाज स्वास्थ्याच्या खऱ्या आधारस्तंभ आहेत. त्यांच्या अथांग परिश्रम, त्याग आणि सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस.
दुसरी माळ १२ ऑक्टोबर २०२६
---

ही कलाकृती "फ्लॉवर सेलर", भारतीय कलाकार महुआ पाल यांनी तयार केलेले कॅनव्हासवरील अॅक्रिलिक चित्र आहे. सुगंधी फुलांच्या मागे लपलेला अथांग कष्ट आणि कर्तव्याचा प्रवास म्हणजे रस्त्याच्या कडेला गजरे विकणारी ती माऊली. आज या स्त्री तत्वाच कौतुक आणि कृतज्ञता.
तिसरी माळ
१३ ऑक्टोबर २०२६
---

ही कलाकृती, कलाकार कन्नन चित्रालय यांनी साकारलेले बांगड्या विकणाऱ्याचे जलरंगातील चित्र आहे. कष्टकरी महिलांचे ते रापलेले, थकलेले हात केवळ कुटुंबाचा भार पेलत नाहीत, तर या देशाच्या अर्थव्यवस्थेला आणि संस्कृतीलाही टिकवून ठेवतात. अशा या कष्टाळू, प्रामाणिक आणि स्वाभिमानी माऊलींच्या हातांना आजच्या दिवशी नमस्कार.
चौथी माळ १४ ऑक्टोबर २०२६
---
धाग्या-धाग्यांनी कापड विणत, देशाच्या प्रगतीला गती देणाऱ्या आणि स्वतःच्या घामाने कापड उद्योगाचा कणा मजबूत करणाऱ्या सर्व महिला कामगारांना मानाचा मुजरा आणि मनःपूर्वक कृतज्ञता आजच्या दिवशी.
पाचवी माळ १५ ऑक्टोबर २०२६
---

तिचे हात मातीने भरलेले असतात, पण तिच्या याच हातांमध्ये एक संसार घडवण्याचे आणि संस्कृती टिकवण्यासाठी लागणारी वस्तू बनते तीच्यात ते सामर्थ्य असते. कलेची कोणतीही मोठी पद‌वी नसताना, केवळ अनुभवाच्या आणि कष्टाच्या जोरावर मातीला जिवंत आकार देणाऱ्या या माऊलींच्या  घामाच्या थेंबांनी आणि मातीच्या सुगंधाने सजलेली ही कला. अशा महिलांचे कष्ट खूप मोठे आहेत. कडक ऊन, धूळ आणि शारीरिक त्रासाची पर्वा न करता त्या या पारंपरिक कलेचा वारसा जिवंत ठेवून आहेत भले ती ऊपजीवीकेसाठी का असेना. त्यांच्या या अथांग मेहनतीबद्दल आणि कलेबद्दल कृतज्ञता आजच्या दिवशी.
सहावी माळ १६ ऑक्टोबर २०२६
---

बांबूपासून टोपल्या, सुप, चटया आणि विविध वस्तू बनवणे ही एक अत्यंत प्राचीन आणि पारंपरिक कला आहे. बांबूची निवड करणे, त्याचे बारीक पातळ काप (पट्ट्या) करणे, त्यांना योग्य आकार देणे आणि हाताने नक्षीदार वीण तयार करणे ही अत्यंत कष्टाची आणि संयमाची प्रक्रिया असते. महिला या माध्यमातून केवळ कुटुंबाला आर्थिक हातभार लावत नाहीत, तर आपली समृद्ध लोककला जिवंत ठेवतात.  दैनंदिन जीवनात काम करताना आपल्या संस्कृतीत मोलाची भर घालणाऱ्या या महिलांच्या कलागुणांचा आणि कष्टाचा आजच्या दिवशी गौरव!
सातवी माळ १७ ऑक्टोबर २०२६
---
आपल्या घरच्या मावशी, रोजच्या रोज न कंटाळता, कोणतीही तक्रार न करता आपल्यासाठी राबणाऱ्या स्वयंपाक आणि घरकाम करणाऱ्या मावशींच्या कष्टांची जाणीव आपणास आहेच. त्या सर्व आपापल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे आणि कुटुंबाला आधार मिळावा यासाठी त्या प्रत्येक कष्टाला हसतमुखानी सामोरे जातात. आजचा धन्यवाद मानायचा दिवस यांचा.
आठवी माळ १८ ऑक्टोबर २०२६
---
पहाटेच्या अंधारापासून ते  तिन्हीसांजेच्या काळोखा पर्यंत शेतात राबून, पेरणीपासून ते  सुगीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तिचे हात हिरीरीने पुढे सरसावतात. घराची चूल आणि शेताची धुरा या दोन्ही आघाड्या ती सारख्याच सक्षमतेने सांभाळते. ती केवळ अन्नाची निर्माती नाही, तर कुटुंबाचा मुख्य आधारस्तंभ आहे. तिचे हे कष्ट, तिचा हा संघर्ष आणि तिची ही जिद्द आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या या असीम योगदानाबद्दल कृतज्ञता आजच्या दिवशी.
नववी माळ १९ ऑक्टोबर २०२६
---
शहरातील सोयी-सुविधांपासून दूर असलेल्या गावातील मुलांनाही उत्तम शिक्षण मिळावे, त्यांच्या स्वप्नांना दिशा मिळावी आणि त्यांच्यातील क्षमता विकसित व्हावी, यासाठी झटणाऱ्या शिक्षिकेचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे.  ती केवळ शिक्षिका नाही, तर अनेक बालकांच्या उज्ज्वल भविष्याची शिल्पकार आहे. तिच्या हातातील खडू केवळ अक्षरे गिरवत नाही, तर उद्याच्या सक्षम पिढीचा पाया रचतो. तिचे प्रयत्न मुलांना केवळ शिक्षित करत नाहीत, तर त्यांच्यात आत्मविश्वास, स्वावलंबन आणि मोठी स्वप्ने पाहण्याचे धैर्यही निर्माण करतात.
आजचा दिवस हीच्या साठीच्या कृतज्ञतेचा!
दशमी २० ऑक्टोबर २०२६.

जय जय जगदंबे 
गौरी पाठक 
९९७०१६८०१४


No comments:

Post a Comment