खरय कामं करण्याचा क्रम ठरवताना हे माझ्या बाबतीत होतं. कोणालातरी जाऊन भेटण यातच मोडतं माझ्याकडून. कारण "मी खुप बिझी आहे" हे वाक्य माझ्या शब्दकोशात मला आवडतच नाही. याकारणासाठीच ते फक्त आज नाही ऊद्या करते अस असतं. ते वेळ बघून विचार करून परिस्थिती अनुरूप मी करतेच अर्थात ती क्षमता परमेश्वराची कृपाच. आपण ठरवून आ
काही ई होत नसतं पण कर्म करण तर हातात आहे. तसच सकारात्मक बोलत जगण हे पण काम आहे. आपणच आपली वाट जमत नाही जमणार नाही म्हणून आणण्यापेक्षा आज नाही ऊद्या करेन या दुधावरची तहान ताकावर भागवली जाते माझ्याकडून. बाकी कान्हाजी घेतील बघून.
ज्या उद्यासाठी थांबलेय मी तो ऊद्या येतोच येतो. कसल भारी आहे ना? विजयाताईमुळे आपण कसे आहोत हे आपणच ठोकून बघतोय. कारण आपण काय करतो कसे आहोत हे लिहूनच घेत आहेत त्या! मग ते होणारच कारण दोन इंद्रुय ते नोंद करत आहेत.
अनेक धन्यवाद विजयाताई.
कळलं उद्या तर येतो रोज नवा आधी.
दिवस चौदावा
अधिकमास विशेष
शब्दकळी विजयाबरोऊलेखन उपक्रम २
*विषय : वाट पाहणं*
वाट पाहुनी जीव शिणला
दिसा मागूनी दिसं टळला
सुर्व्या आला, तळपून गेला
मावळतीचा खळीगाल आला
गडणी, सखे गडणी
काय सुरेख बोल आहेत ना! वाट पाहणे यात ओढ आणि आर्तता दोन्ही आलच.
लहानपणी वाड्यात एक कुटुंब राहत होतं पाच भावंडं आणि पालक. आप्पा साधं कुठतरी कामाला होते. कापडाची शिवलेली पिशवी ते वापरत. संध्याकाळी घरी पोचले की मुलं वाट पाहत असायची. ओढ हीच की पिशवीत खाऊ काय असेल? चणे फुटाणे खारीचा पुडा काहीही असायच ते त्यांना फार मोलाच असायचं. त्यांचा आनंदानं ऊजळलेला चेहरा आजही लक्षात आहे.
नंतर वाट बघण अनेकदा आल पण हे फार ह्रदयाजवळच.
आणि... बाबांना स्वर्गात जगा मिळताना इथून जाताना त्रास होत होता ते सुटकेची वाट बघत होते जणू ही आर्तता... फारच वाईट...
एकंदरच वाट पाहणे ही भावना आनंद चिंता कसलीही असू शकते. पण ह्रदयाचा कस लागतोच लागतो. मग तो परीक्षेचा निकाल असो, दिवसभरलेली माऊली असो, भिशीचा नंबर असो, परगावचा माणूस असो, नंबर लावलेला सिलेंडर असो अथवा येणारी पाळी असो मन विस्कटलेल असतच.
पण वाट पाहू्णं संपलं की होणारा आनंद पाहून ते सगळ सगळं निवळतं मग ती कशासाठी का असेना....
या या रे सकळ गडी !
'कृष्ण कृष्ण' गाऊ ॥ कुंजवनी यमुनेतिरि,
वाट पाहतो श्रीहरि ॥ जाउ धावु पाहु तया,
रंगि रंग लावू ॥१॥ संत तुकडोजी.
जय श्रीकृष्ण
गौरी पाठक
३१ मे २०२६
###
दिवस पंधरावा : अधिकमास विशेष शब्दकळी विजया बरोबर लेखन उपक्रम २ :
विषय : माझा वाढदिवस
जब्रा! मी माझ्या वाढदिवसाला काय करायचं? यासाठी महिनाभर आधीच विचार सुरू करते अजूनही. हो आज माझ वय ४७ तरी मी खुप वाट बघते माझ्या वाढदिवसाची. नवरा कायमच विचारतो बोला काय घ्यायच यंदा? काय डोक्यात आहे? कारण वाढदिवस साजरा करताना साधसुधं घर नसण हेच माझ मत ना! जे मनात आहे ते करायला सहकार्य मिळणं हे फार भाग्याचच की ग सख्यांनो..
मी माझ्यासाठी मस्त नवीन ड्रेस घेते किंवा वेळेत शिऊन मिळेल याची खबरदारी घेते. दिवसभरात काय काय करायच चक्र डोक्यात असतं.
मी कोणाचाही वाढदिवस असो घरच्यांचा ते दोनतास त्या व्यक्तीला ऊच्च स्पंद आपण खुप खास आहोत ही पूरेपूर जाणीव देण यासाठी काम करतेच. सासर माहेरचे साठ सत्तर सारखे वाढदिवस तर यात मोलाचे. त्यांनी बोलावल नसलं किंवा त्यांच्या घरच्यांनी काही ठरवल असो नसो मी माझ्या घरच्यांना विश्वासात घेऊन त्या व्यक्तीला तो दिवस खास अनुभव यावा यासाठी काहीतरी करतेच. आवड आहे मला ती. माझा वाढदिवस आहे या बरका! असं म्हटल की कोणीही आणतोच भेटवस्तू फुलं. मला तस नात नको असतं. नगाला नग नसावं मी कोणासाठी. एखाद्या बद्दल जर मनापासून वाटत असेल तर त्याच्या आयुष्यातला तो क्षण आणखी ऊजागर व्हावा हे मनातून आतून येण होणं, ही भावना मला येते. या कर्म करण्याच्या बुद्धीसाठी कान्हाजींचे विशेष आभार.
तर माझा वाढदिवस हा अस कोणी येऊन खास करेल अशी वाटच मी कधी बघत नाही कारण मला खुप आधीच समजलय की वाटण आणि करण यातली दरी सगळेच भरून काढण्यासाठी सक्षम नसतात.
घरातला कोणाचाही वाढदिवस असो ओवाळताना सगळे उपस्थित हवेत, मस्त आवडीचा केक हवा, सगळ्यांनी छान आवरूनच असायला हवं, घरीच तर आहोत म्हणून घरातल्या मळक्या रोजच्या कपड्यात असणं चालणार नाही. अहो खरय हा धाकच आहे माझा घरी. लागेल तर मस्त थीम ठरवायची, घरी कार्ड बनवायची, मुलांना हाती घेऊन अशा अनंत गोष्टी गेल्या २५ वर्षात केल्या आहेत. हे बघून घरचे पण मला हाच आनंद देतातच मुलं पण प्रेमानं करतात.या सगळ्यांत साथ असतेच. सांगतो ते करताना ऐकणारे हात आहेत म्हणून माझी किंमत!
माझ्यासाठी वाढदिवशी भरपूर फुलं जमतात, फोन येतात. मला रूपाली घाणेकर कडून एक पुस्तक येतं. (हे माझं माहेरच नाव, ती मला माझ्या मनात जे असेल ते घेऊन देते.)
माझा जन्म जानेवारीतला कायम शाळेत तिळगुळच वाटला जायचा आणि घरी गाजर हलवा! कालांतराने तोच आवडता पदार्थ झाला. अक्कल कुठ होती? स्वतः ला काय आवडतं विचार करायची.
आईकडे वाढदिवसाच्या दिवशी किलोनी मैत्रिणी असायच्या. दोनदा चुल पेटवावी लागायची पण आई आनंदाने करायची. खळखळाट हास्यात गजबजलेल्या घरात वाढदिवस साजरे झालेत बावीस... घर तसं दहा बाय दहा पण माणसांचा राबता दे दणादण...
मला माझा वाढदिवस फार आवडतो, त्या दिवशी पाठीवरून अपसुकच बाबांचा हात फिरल्याचा भास अजूनही होतो... कोण कस करेल याची वाट न बघता आपला दिवस आपणच मस्त जगायचा, मोठ्ठा श्वास भरायचा आणि ऊंच भरारी घ्यायची, जीवनाखेरपर्यंत अशीच ठणठणीत ठेवा ओ कान्हाजी म्हणायचं आणि भरपूर फोटो काढायचे. हो शास्त्रं असतं ते.
"आपल्या सावली पासून आपणच शिकावे,
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे..
शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत,
म्हणून प्रत्येक नात्याला ह्रदयातून जपावे..."
गौरी पाठक
१ जुन २०२६
##
दिवस सोळावा
विषय - पुन्हा पुन्हा सुरूवात करताना....
तर पुन्हा पुन्हा सुरू करताना काय असतं नेमकं मनात....उत्साह?? भीती?? दडपण? आतुरता...? आपण करूच हा विश्वास?? अजून काय काय .???
आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर अशा दोनतीन गोष्टी असतातच की सुरू करून मागे पडतात मग आपण त्या निगुतीने पकडून परत सुरू करतो. जस पावसाळा आला की चालण बंद पडतं, गणपती आले की दहा दिवसात सकाळचा व्यायाम वंद पडतो नंतर ते सुरू करताना नाकेनऊ येतात.
मला हे दोन अनुभव आहेत. शरीर नीट राहण आपली पहिली जबाबदारी आहे हे मनात ठोकत पीटत पावसाळ्यानंतर ते चालायला जायचं रूटीन आणताना मनाला अनेक प्रलोभन किंवा भिती दाखवावी लागते. तसच गणपतीचे दहा दिवस ब्रह्म विद्येची सरावाची दा़डी ऊडालेली असते. नंतर पित्रवड्यातले पंधरा दिवस सकाळच हे श्लसनप्रकार करायची वेळेची घडी बसवणं महा जोखमीच काम. मग मनाला दाखले देत ताळ्यावर आणायच की आपण हे करत होतो म्हणून कोरोना शिवला नाही आठव आणि गौरी ऊठ शारीरिक मानसिक दोन्ही श्लसनप्रकार कर.
अनेकदा एखाद वेगळ काम हाती घेतल की ही सकाळची शरीराला लक्ष देण्याची काम माझ्याकडून मागे पडतातच. पण कोणी ना कोणी कान टोचणारा येतोच आयुष्यात येतो म्हणजे काय कान्हाजीं पाठवतात. "हलव बाई हीला जरा" म्हणत. पण त्याच महत्व अनुभवल असल्या कारणानं आणि ते मनापासून आवडत असल्यान मी ते उचलून धरण होतं.
आजच सहसाधिकेचा फोन होता की गौरी ताई मला जरा धक्का स्टार्ट दे सराव होत नाही ये. म्हटलं घ्या ऊघड्याला भेटलं नागडं. (हसू नका गावाकडची स्पष्ट म्हण आहे ही.) मी जर करत नाही तर तू कर कस म्हणू सुंदरी. पण दोघींनी आजच दुपारी ठरवल काय तोडगा काढायचा. या अभ्यासाची एक खासीयत आहे कोणी ओळखीण असो नसो कोणीच कोणाला ऊपेक्षित सोडत नाही. सराव जरी मागे पडला तरी ऊभारी आणि सकारात्मक विचार करण आता चिकटलय जय लिंग डे मी (तिबेटीयन गुरूंच नाव आहे हे आमच्या).
तर अशाप्रकारे परत पदर खोचून ते सुरू करतेच....
जय श्रीकृष्ण
गौरी पाठक ©️®️
२ जुन २०२६
###
दिवस सतरावा : मी सद्ध्या काय करते?
कित्ती छान गं! मला तु काय करतेस(प्रश्नार्थक)? तु केल नाहीस? असलेच प्रश्न ईतक्यात माझ्या ऐकण्यातले. एखादवेळेसच बाहेरच कोण आल तर हा प्रश्न विचारला जातो. मी नोकरी करते यावरच तो थबकतो.
आज खुप प्रेमाने विजयाताईन विचारल ती हे विचारतानाच डोळ्यासमोर आली. कोण विचारत आजकाल काय चालुय सद्ध्या? काय चालुय मनात? डोक्यात? काळजालाच हात घातला या प्रश्नानी.....
मी सद्ध्या सिंहावलोकन करतेय. आपल समजलो आपण इतरांना तरी ती का दुखावतात आपल्याला यावर त्यांना माफ करायला मनाला शिकवतेय. मस्त मनमुराद हसायला लिहायला जगायला रोजचा अविभाज्य घटक कसा बनेल यावर काम करतेय, आपण सगळ्यांना बांधून ठेवत आनंदी पण ठेवायच ही जबाबदारी फक्त माझी नाही हे अंगवळणी आणतेय, मला लोकांनी छानच म्हणाव असा माझा अट्टाहास तर होत नाही ये ना हे तपासतेय, माणस वाचवायचीच पण त्यांनी जरातरी वाचव म्हणू दे मग मदत कर हे मनाला समजवतेय, मी सद्ध्या स्वत:ला जपायला शिकतेय, ऊभारीन जगात ऊंच भरारीसाठी पाया मजबूत करतेय, माझ्या टाॅनिकसारख्या मैत्रिणींबरोबर चार्ज होतेय, वयाचा हा निवांत टप्पा हवाहतसा जगायची शिस्त लावतेय, "मस्त हसा आणि मी ठणठणीत आहे", अस सतत म्हणा अस सर सांगायचे ते ते पदोपदी पाळतेय. सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतः वर प्रेम करतेय. ४५-४६ वर्ष सतत ईतरांसाठी जगले. स्वतः कशी नीटनेटकी आहे यावर भर दिला प्रत्येक नात्यात योग्य तशी मी कशी फिट बसेन यावर माझा भर होता. जगासाठी कितीही केलं तरी ते जग आपण आहोत तस बघेलच अस काही नसतं आणि त्यावर आपण वाइट वाटून घ्यायच नाही. सगळे आपलेचेत पण आपलबिपलं कोणी नसतं. पण तरी जग हे आपलच असतं. काय धरायच काय सोडून द्यायच हे जमवायचं आणि जगायचं. आता स्वतः साठी आणि आपल्यांतल्या आपल्यांसाठी जगायचं, मस्त सु़ंदर.... जग खुप सुंदर आहे ते भगळ सगळं अनुभवायचय ना मग तीच तयारी करतेय. यासाठी आधी मी सिंहावलोकन करतेय... शांत चालतेय... आणि स्वतः ला आवरून ठेवतेय..
खुप खुप धन्यवाद ताई... या प्रश्नासाठी... आणि घट्ट मिठी!!!
तुझीच गौरी
३ जुन २०२
###
दिवस अठरावा : विषय शब्दाविण संवादू
"मनकवडी निघालीस अगदी! " अस वाक्य ऐकतो आपण कधीकधी छान वाटत ना! आपण आपल समजून विचार केला की तो पोचतोच पोचतो. (मी काल रांगोळी पाठवली आणि ताई म्हटली मी आत्ताच तुझा विचार करत होते. आहे की नाही शब्दाविण संवादू)
त्यासाठी आधी ती व्यक्ती आणि आपण बंध जुळलेले असावेत. एखाद धागा पण हे घडवू शकतो.
मी जशी आहे ती पाहून लांबुनच दुवा देणारे अनंत आहेत, ठराविक हालचाल दिसली नाही की, "चुकल्यासारख वाटलं कुठेस? बरीयेस ना? " लगेचच मेसेज येतात. भेटी महिनों महिन्यात होत नाही त पण माझी चाहुल घेणारे बरेच आहेत. मी आभारी आहे कान्हाजींची. दोन व्यक्ती आहेत ज्या मला शब्दाविण संवादू आहेत. त्यांच्या असण्यामुळे मला आधार आहे.
मागे एकदा एका मैत्रिणीच्या आयुष्यातल्या प्रसंगात विचार आलेला की आत्ता या क्षणी मी आलेय तुझ्या कडे बॅग घेऊन तर मला कारण न विचारता घरात घेणारी काळजी घेणारी एखादी तरी व्यक्ती आहे का? असतात किलोनी आपले आपल्या पण अशा केसमधल आपल काणं? कोणावरही ही वेळ न येवो पण तीच्यावर आली आणि मी तीचा तो प्रवास पाहिला, तीला त्यात दोन व्यक्ती सापडल्या. तेव्हा मी विचार केला की शब्दिविण संवादू माझं कोण आहे? आहे का? आणि मला ऊत्तर सापडल की हो आहेत माझ्या आयुष्यात शब्दाविण संवादू दोन आहेत. ईतक हायस वाटलेल काय सांगू....
आपल्याबरोबर सतत असणारे किलोनी असतात पण साध बोललेल पण समजत नाही तर शब्दाविणू कधी झेपायच ? कमी लेखत नाही मी त्यांना, असतील त्यांच्या लेखी व्याख्या वेगळ्या. आपण आणि ते एकाच चष्म्यातून पाहतोय अस नसत ना! त्यामुळे बरोबर आहेत हे महत्त्वाचे समाधान मानायचे. साथ देण पण सोपं नाही. अशा परिस्थितीत दोन मनकवड्या व्यक्ती असण ही भावना आंतरीक सुख देते. यात माहेर आई वडिल तर असतातच पण या व्यतिरिक्त असलं की भारी वाटतं. योग असतो तो ठरवुन होत नाही चालायचच.
नुसतं स्माइलीचा बाॅल बघून ऊभारी येणं, सहज फोन केला की पहिल्या श्वासातच न सांगता सगळं समजणं, आपल्या लकबी, वस्तू किंवा वाक्य आठवून ठिकाण बघून आठवण येण, फोन येणं एक ना अनेक अनुभव येतात मनकवड्यांचे.
मी कोणाची शब्दाविण संवादू आहे का? तर हो अशा काही जणी आहेत. ते त्यांनी मला सांगितले पण आहे.
तू माझी शब्दाविण संवादू आहेस हे सांगायला धाडस लागतं. तसच ते ऐकायच भाग्य पण लाभावं लागतं कारण ते समजल पण पाहिजे ना! आलं का लक्षात.
खुप वेगळा विषय हा आजचा. खर सिंहावलोकन झालं.
आभारी आहे.
४ जुन २०२६
####
दिवस एकोणिसावा
विषय : जेव्हा काहीतरी बिघडतं...
बिघडलं म्हटल की वाइट वाटणारच... पदार्थ, नातं, वस्तू काही असो मनापासून करत असतो आपण. मग कस काय बिघडलं? हे एकतर समजत नाही. चुकल कोण? गैरसमज झाला का? की झेपच नव्हती? ते काही असो त्रास होतो, बिघडण्याच्या वेगवेगळ्या क्षमतेप्रमाणे तो दाह असतो. अनेक दिवस सल राहते. चांगुलपणाचा / निगुतीचा / नीटनेटकेपणाचा ऊलटा तोटाच झाला वाटू लागतं. पण ते तस नसतच मुळी आपल्यासाठी आपली स्वप्नंच ती पण कान्हाजींचं आपल्यासाठीच नियोजन त्यापेक्षा भारी असतं. आपली झेपच नाही ते समजायची.
समोर काय आहे त्यातून चांगल बघायची सवय लावली तरच त्यातून सकारात्मक सुचतं, सूचक वाटू लागतं. आपण वेगवेगळ्या दिशेन विचार प्रवाहित करू लागतो. त्यातून मस्त मार्ग मिळतो.
एक गंमत सांगते... आज आत्ता आठवली...
मी सातवी आठवीत असेन आणि माझी बहिण तीन वर्षे लहान. माझ्या लहानपणीची पदार्थ करतानाची ही गोष्ट. त्या वयात दुसरा करू शकतो सोपच असेल बघु करून असा विचार येणं साहजिकच होतं. आम्हाला दोघींना बटाट्याचा किस फार आवडायचा. तसही ऊपवासाचे पदार्थ जरा हवेहवेसे असतातच लहानपणी. मग काय एकदा दुपारी किसले बटाटे जरा वेगळी रेसेपी करू म्हणून त्याला तुपावर भाजुन शिजवल काजु बदाम काप घातले आणि नंतर घातली साखर. खल्लास ! खरा बट्ट्याबोळ तिकडच झाला. त्याचा झाला गोळा आणि पातल्यावर आली खरपुकडी. काही अक्कल नव्हती तेव्हा पण तो पदार्थ प्लेट मधे घेऊन खाल्ला तेव्हा तोंडं दोघींची बघण्यासारखीच झाली होती. बटाट्याचा किस तिखटच जास्त चांगला असे मनात असलेले चेहरे. आता काय खायच गपचुप आणि भरीस भर आईची बोलणी.
साडेपाचला बाबा यायचे कामावरून. काय चालुय विचारलच लगेच कारण गोड वास भरला होता घरात. काही नाही हो बाबा काहीतरी नवीन केल पण फसलय ते. आमचे चेहरे बघण्यालायक... बाबांनी चव बघु म्हटलं आणि मी दिल डिशमधे. क्षणभर शांत होते आणि म्हटले काय आहे हे? मी क्षणाचा अवधी न देता म्हटलं "होनोलुलू" . हे कसल नाव? असू दे मी जरा रागानच म्हटल. आणि आश्चर्य ते म्हटले थोडं दुध घाल यात मला मग जरा बरं लागेल. हे ऐकताच हसु का रडू झालेलं.
या किस्स्या नंतर मी कधीही केलेल्या पदार्थाच नाव नसेल किंवा तो कसा होईल ठाऊक नसेल तर मी काय केलय ? यावर होनोलुलूच म्हणते. आज २५ वर्ष होतील लग्नाला माझ्या सासरी माझा हा कोडवर्ड सगळ्यांना पाठ झालाय आणि हे सांगितल तेव्हा असा हशा पिकला घरी म्हणून सांगू... देवा रे...
तेव्हाच बहुतेक मी शिकले - बिघडलेलं सकारात्मक विचार केला तर सुधरू शकतं किंवा अस म्हणूयात बिघडलेलच नसतं आपल्याला तस दिसत असतं.
तर माझ्यामते जेव्हा काहीतरी बिघडतं तेव्हा नक्की च काहीतरी चांगलं घडतं. प्रगल्भ होणं म्हणजे तरी वेगळ काय हो, हेच की!
गौरी पाठक
५ जुन २०२६
###
दिवस विसावा
माझ्या कमतरतेसोबत माझ्या स्त्रीत्वाचा स्विकार.
मलाच का तत्वाने वागलं नाही कि त्रागा होतो? इतर कसे थंड बसू शकतात ? सहनशील असावं पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच कि. जगात जन्माला आलो म्हणजे आपल्यातल्या गुणांचा जगास पण थोडा फायदा होणं हे काम आहे आपलं. माझी कमतरता आहे कि मी सगळ्यांनाच माझं समजून वेळे आधीच सूचित करते. यामुळे मला बरेचदा गृहीत धरलेले किंवा 'समजतात आम्हालाही गोष्टी' असे कटाक्ष मी अनुभवले आहे. त्यांना माझ्या सूचना वाटत असतात पण त्याला काहीही पर्याय नाही, असतील त्यांच्या पण बाजू म्हणायचं सोडून द्यायचं. माझ्या या कमतरते बरोबर माझ्यातल्या काळजीवजा प्रेमळ स्त्रीत्वाचा मी स्वीकार करते.
कोणतीही गोष्ट करताना माझ्याकडून समोरचा आधी करतोय का पाहत बसणं होत नाही. समोरचा करतोय काय करतोय अंदाज घेऊन मग मी माझं काय ते करायचं हे मी करू शकत नाही. समोर दिसलं कि ते झपकन करून घेऊ असच होत., मग ते काम असो, कोणासाठी काही भेट घेत असू, मग ते उतरलेल्या रिक्षाचे पैसे असो किंवा ठरवत असलेल्या कार्यक्रमाचं नियोजन असो. माझ्यातली कमतरता हि कि इतर काय करतात पाहायला मी वेळ देत नाही. मग अस होत बरेचदा कि मी करते म्हणून मी कधी करू का म्हणत नाही. अस लोकांना वाटतं (तू करतेसच ना ? म्हणून मी केल नाही अस ऐकवतात.) मी अशी जगू शकत नाही कोणी मी करते म्हणायची वाट पाहेतोवर. जर माझी क्षमता आहे तर मी आपण हुन मी हे करते म्हणणे माझे काम आहे असे का लोकांना वाटत नाही. समोरचा करतोय मग आपण का गडबड करा असे बावळट प्रश्न माझ्या मनात येत नाही. पण हि माझ्यातली कमतरता असू शकते पण तिच्याबरोबर मी माझ्यातल्या आनंदी स्त्री व्यक्तिमत्वाचा दुसर्यांना आनंद देणाऱ्या मनापासूनची तत्वाचा स्वीकार अगदी मनापासून करते आणि तो करताच राहीन. कौतुक करून घ्यायला हवच असत पण एखादेवेळेस त्याच व्यक्ती आपल्याला तितक्याच समजून घेणे जेव्हा गरजेचे असते तेव्हा मात्र त्यांना आपली शब्दशः वाक्यच दिसतात. हि त्यांच्यातली कमतरता अस म्हणून नकारात्मकतेचं त्यांच्याबद्दलचा गाठोडं जे मनाला टोचलेल असतं ते मी मूठ बांधते आणि मुठा नदीत सोडून येते.
माझ्यातल्या अनेक कमतरता मला जेव्हा समजतात तेव्हा मी लगेच मनात नोंद करत असते. असे आपण वागायचे नाही. मनातली चेकलिस्ट लगेच उपडते होते. Do and don't do. thats it
कोणीच परिपूर्ण नसतंच. पण माझ्यातल्या प्रेमळ, माणसं हवी असलेल्या स्त्रीत्वाचा मी स्वीकार करते. आज या ग्रुपमध्ये तुमच्या सारख्या सख्या श्रोते लाभल्या. अश्या गोष्टी मी मला मुठा नदीत सोडून दिल्याचे फळ समजते. कमतरता शोधत असताना माझ्यातल्या संपन्नता पण शोधात आल्या पाहिजेत. विजयाताईंचा हा विषय हेच ठोकून करून देतो. हेच तर आहे सिंहावलोकन!
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।।
मन एवढं एवढं, जसा खाकसचा दाना ।मन केवढं केवढं? आभायात बी मायेना ॥
देवा, कसं देलं मन आसं नही दुनियात । आसा कसा रे तू योगी काय तुझी करामत ॥
देवा, आसं कसं मन? आसं कसं रे घडलं । कुठे जागेपनी तूले असं सपनं पडलं ॥
कवयित्री – बहिणाबाई चौधरी
जय श्री कृष्ण
गौरी पाठक
६ जून २०२६
####
दिवस एकवीसावा
पाऊस
निसर्गासारखा नाही रे सोयरा
गुरू सखा बंधू मायबाप
त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप
मिटती क्षणांत आपोआप
सुधीर मोघे
पाऊस म्हणजे खरा तर वर्षाव! निसर्गातल्या सोन्याचा जो मानवावर होतो. तो मानवी मनावर पण होतो. निसर्गाची कमल पहा नुसतं विचार केलं तरी कानी रिमझिम भास होतो. काल विषय आल्यापासून दोन गाणी मनात रुंजी घालत आहेत.
चिंब पावसानं रान झालं आबादानी.... सगळी मरगळ झटकून टाकून नवीन निरभ्र मोकळं आकाश पहा असा सूचित करणारा हा निसर्गाचा अविष्कार! सगळी अवनी मोहरून जाते, ती मनाच्या अवनीला पण झाकोळलेल्या निराशावादी मरगळीस न्हाऊ घालते.
अचानक येऊन तारांबळ होतेच पण ती मजाच वेगळी. मला आठवलं २०२७ मधे कामावरून जाताना दोघी मैत्रिणी बरोबर निघायचो. एकदा कर्वे रोड वर पोचलो आणि जो कोसळायला लागला म्हणून सांगू. कायनॅटिक, एक्टिव्हा आणि आम्ही दोघी जे मनसोक्त भिजत कर्वे रोड वरन घरी गेलो. क्षणभर एकमेकींकडे बघितलं काय करायच? चल म्हटल सगळे रस्त्याच्या कडेनी आहेत. ठोकायची भिती नाही. रीमझीम गघरेहसावन म्हणत बोंबलत काॅलेजकुमार वळणं घेत गाड्या दामटतात तस्सच घरी गेलो. आरपार चिंब. आज ती गुजरात ला आहे पण असा कोसळला की आजही एकमेकिंना फोन होतो. काय भारी आहे हे सगळ फक्त पावसामुळे.
एका डाॅ. मैत्रिणीनी सात आठ वर्षापूर्वी मला एक गाण आठवलय गौरी ताई आत्ता पाऊस आला आहे चाल ओळी म्हणायच्यात ऐकवू? असा फोन केला. अहो काय भाग्य हे. ते बोल होते "पाऊस पहिला जणु कान्हूला बरसून गेला बरसून गेला." अहाहा! काय सुंदर वर्ण आणि चपखल अशी ऊपमा. आज सलग पुढची सगळी वर्षे मी पहिला पाऊस आला की हे म्हणतेच म्हणजे गुणगुणतेच. तुम्ही सगळ्या नक्की ऐका. मगच समजेल.
माझ्या आयुष्यात पाऊस आणखी एका कारणासाठी मोठा आहे कारण पाऊस कोसळला आणि कान्हाजी आले.... संबंध लावायचा तसा आपापला लावा...
जय श्रीकृष्ण
गौरी पाठक
७ जुन २०२६
###
दिवस बावीसावा
२१ दिवस संकल्प पूर्ती
खरच हा अधिक महिना लक्षात राहिल. मन हलक झालं. का वाटल असाव मला हा उपक्रम करूया का? विचारावा. का विजयाताईकडून होकार येऊन आमच्या मनाच समुद्रमंथन होऊन मनं ऊजागर व्हावी. अनेक परिस्थितीच्या अनेक जणी समोर आल्या. अनेक काम अनेक गुण समजले. काहीतरी योजना होती ही जी घडून येण्यास सगळ्यांची कर्म कामी आली. कोणाच्या ही आयुष्यात कोणतीच गोष्ट ऊगाचच घडत नाही. हे साधुन घेण्यामागे काय हेतू असेल ना कान्हाजींचा!
रोज स्वयंपाक करताना विषय आला की लंचपर्यंत डोक्यात विचार येत होते. लंच झाला की मन रीतं होत होतं. अगदी कसलीही तमा न बाळगता मी मन छापत होते. हे २१ दिवस लंच नंतर चा वेळ कारणी लागला. हापापल्यासारखं डोकं काम करत होतं. खुप कविता गाणी प्रसंग ऊजळणी झाली. मराठी साहित्याचा खजिना बघा की माझ्याकडे अस खुणावतोय आता... बहिणाबाई़च्या कविता वाचन कार्यक्रम आठवला, शांता शेळकेंच्या हस्ते माझ्या लहानपणच्या हातात मिळालेलं बक्षिस आठवलं, किलबिल रंगभूमी मधली केलेली नाटकं त्यांच्याहतालमी आठवल्या, परवा नाट्यसंगित कलाकार सौ. अस्मिता चिंचाळकर भेटल्या तेव्हा गप्पांत मला जाणवलं की हे योग नाही काहीतरी गर्भात आहे.
एक मात्र खर की मन मोकळ होतं हा रोजनिशी चा फायदा. माझे विचार आणि लेखन जरी कोणी कुठ वापरल तरी माझ्या नावासकट असेल याची खात्री असल्यानं मनातले शब्द मी इथं तुमच्या समोर ओतलेत. पण खर सांगू मला त्याची खरच कधी भिती वाटलेली नाही कारण जे माझ आहे ते कोणी काहीही केल तर माझ्याकडे राहणार आहे आणि जे णाझ नाही ते नाही हे मला पक्क ठाऊक आहे. विजयाताईचा वर्कशॉप केला तेव्हा माझ्या या विचाराव मोहोर ऊमटली की एखाद्याची वस्तू चोरू कतो पण कला चोरताच येत नाही. कमाले की नाही.
No comments:
Post a Comment