Thursday, 16 April 2026

"शाब्बास! काकू कडून पार्टी लागू."

"शाब्बास! काकू कडून पार्टी लागू."

"काकू, मी पास झाले. ९५ टक्के पडले." 
"अरे व्वा! मस्तच. खूपच मस्त. शाब्बास! काकूंकडून पार्टी लागू."
"काय करायच ठरवल पुढे?"
"काकू मला सीए करायचय."
"अच्छा. मस्तच की. होईल सगळ नीट. ये आता घरी."
"हो हो, मी येणारच आहे पुढच्या महिन्यात काकू."
हि  कालची माझ्या आयुष्यातली वाक्यं. काय सुंदर भावना आहे ना! आपलं कौतुक सांगायला आपल्याला आपली माणसं आहेत आणि कौतुक सांगणारे पण आहेत. तो आनंद साजरा करायला, व्यक्त व्हायला कोणीतरी आहे. आपला तो आनंद बघून आनंदी होणार याची खात्री या वाक्यात दिसते. त्या वयात आपलं कौतुक करून पाठ थोपटणारी माणसं असणं,  त्यांचं यावर  "बोल काय हवाय तुला ?" विचारणं. काय मोलाचा क्षण असतो ना हा. हाच तो क्षण मी काल माझ्या पुतणीबरोबर अनुभवाला. दिराशी बोलताना back of the mind मी आठवत होते कि हि वाक्य मी पूर्वी कधीतरी ऐकली आहेत. त्याचा फोन होताच मला माझी आई आणि तिची पुतणी यांचं हेच संभाषण आठवलं. पेढे द्यायला आलेल्या आणि कौतुकाला सरसावलेल्या आईला मी स्वतः बघितलं आहे. आपल्या घरच लेकरू ऊंच ऊडायच्या तयारीत असताना, जमिनीवर कोणीतरी आहे वाट बघायला, कौतुकाला, सहारा द्यायला यामुळे ऊभारी येते आई नेहमीच म्हणायची, आजही म्हणते. आई नेहमीच पास झालेल कोणाचही कळल की भरभरून कौतुक करताना, मस्त मस्त फ्राॅक घेताना, हवं त्या हाॅटेलात खाऊ घालताना बघत आलेय मी. त्यांनाही आज हे वाचताना आठवेलच याची खात्री आहे आणि... अचानक जाणीव झाली बापरे! आपण किती मोठे झालो आणि आपण अगदी आईसारखच बोललो की. आता हे काय शिकवलय का कोणी? तर नाही ते पिढीला बघून आपसुकच अनुसरण केलं गेलय ना. आज फार भाग्यवान असल्यासारखं वाटतयं.  "का?"  ते नाही सांगता येणार....क्रमश:
सौ. गौरी पाठक 
१६ एप्रिल २०२६

No comments:

Post a Comment