वहिनी मी पोचले बर का घरी.
काय सुखद कल्पना आहे ही आपण सुखरूप घरी पोचलो याची पोच देणारी व्यक्ती आज आयुष्यात आहे. माझ्या आधीच्या पिढीनी केलेल्या गोष्टींच हे अनुकरण आहे. आपण कोणाही कडे गेलो तर उपस्थित वशिष्ठांना नमस्कार करणं, तसच ओळखीचे असोत नसोत घरात कोणी मोठ आलं तर पटकन उठून नमस्कार करणं, आपण गावाहून निघताना जिकडे जाणार आहोत तिकडे कोण आणखी असेल तर काही पोचवायच का? विचारणं. पोचल्यावर "पोचले हं वहिनी मी घरी” ही पोच देणं.
या सगळ्या सोपस्कारांमुळे नात्यांमधे ओलावा राहतो. मला आठवतय माझ्या चुलत मावस बहिणी सुट्टीत आल्या की त्यांची सरबराई करणं, खाऊ घालणं, परत जाताना फ्रॉक घेऊन देणे हे आमची आई करायची. दहावी बारावी पास झाली की आपणहून कौतुकान कपडे घेऊन देणं. कोणाकडे जाताना साधारण आवडीचा अंदाज घेऊन घरचा पदार्थ "हा घे मी तुझ्यासाठी आणलाय." म्हणत हातात देणं. काय सुरेखा संकल्पना होती आदर दाखवण्याची, धन्यवाद मानण्याची. म्हणूनच तर कोणीही न सांगता कोणाच्याही माहेरी हक्कानं भाच्या - पुतण्या नेत असायच्या. मी पण काकूच्या माहेरी, मावशीच्या जावेकडे भरपूर हक्काने गेलेलं आजही मला आठवतय. वाड्यातल्या शेजारणीच्या गावाकडच्या नणंदा - जावांच पण असच. आपलेपणानं घरात वावर असणं. त्यांच्या गावचा टोपल भरभरून वानवळा येणं. अत्यंत सुखद अशी आपलेपणाच्या भावनेची नाळ घट्ट होती.
या सगळ्या गोष्टींचं सुख आणि महत्व का? आणि कस? कोण जाणे लोप पावत चाललय. ते पूर्ण संपुष्टात येणार नाही याची खात्री आहेच पण तरी हे पुढची पिढी समजू शकेतच अस ठाम म्हणता येत नाहीये. कोणी कोणाकडे दोन दिवस जात नाही की कोण आपल्याकडे येण्यासाठी पण कारण शोधणं कमीच दिसतं. एका खोलीत सहा सात लेकर झोपायचो. आता माझी खोली कुठली विचारणारे ५०% सापडतील. आपण स्वतःहून मी तुमच्या गावात येतोय कामासाठी तर तुमच्याकडे उतरेन म्हणणारी मनं खुप कमी झाली आहेत. यात कोणाच्याही वागण्यावर बोट/ अंकुश ठेवण हा उद्देश नसून एक सुंदर भावना आपुलकीच्या झालरीची कमी होतीय अस वाटतं.
आपण आपल्या पिढीत म्हणताना पाहिलय की
"या बरं आमच्याकडे, ताईला सांग मी बोलवलय." यावर ताईला सांगण्या आधीच उत्तर येत असे, "हो हो नककी निरोप देईन. येईल ती." आपल्याला कोणीतरी प्रेमाने आग्रहाने हक्काने ये म्हणणारं आहे. याबद्दल नशिबवान समजायचो आपण. आताची पिढी इतकी व्यवहारी झालीय की हा निरोप देणार्याच्या प्रेमाचा, ओलाव्याचा आपुलकीचा शब्द व्यावहारिकद्वष्टीनं ती घेते आणि सरळ सांगते. "ती खुप Busy असते तीला जमणार नाही." याप्रसंगी तत्काळ त्या बोलण्या मागचा प्रेमळ, हक्काचा, आपलेपणाचा हेतू विचारात द्यावा ही बाब सकारात्मकपणे निदर्शनास आणून देणे केले पाहिले. या पिढीनं आपुलकीचं, मायेचं, प्रेमाचं नात्याचं वैभवच बघितलेलं नाही तर त्यांना ही वैचारिक चौकर समजणार तरी कशी?
असे अनेक कंगोरे या "पोचले मी वहिनी बरं का." या वाक्यामुळे मला प्रकर्षानं लिहावेसे वाटले. आमच्या पर्यंत आम्ही मायेची, प्रेमाची, आपुलकीची गडगंज श्रीमंती अनुभवती आहे त्यामुळे ती या पुढच्या पिढीला मिळणं कमी होताना पाहून जीव तीळ तीळ तुटतो. असो मी नशिबवान आहे कारण मी न विचिरता डायरेक्ट राहायला येतेय म्हणायला मला माणसं आणि घरं आहेत आणि माझ्या कडे हक्कानं येतोय म्हणणारी व प्रेमानं पोचलो घरी कळवणारी सोन्यासारखी माणसं मला आहेत. आज मी हेच म्हणेन की मी हेच कमावलं.
सौ. गौरी पाठक
No comments:
Post a Comment