Wednesday, 29 October 2025

हंपी - विजयनगरच्या वैभवाची सफर

हंपी -विजयनगरच्या वैभवाची सफर
कर्नाटकातलं हंपी शहर ही विजयनगर साम्राज्याची राजधानी. वैभवशाली इतिहास दाखवणारं लहानस गावच पण ते आत्ताच बरका! सहज रोड ट्रीप करू विषय झालेला मुलाची ईच्छा होती आणि लगेचच मला हंपी आठवलं ते इतिहास प्रेमापोटीच. मला राजा कृष्णदेवराय, विजयनगर साम्राज्य, पंडित तेनालीरामा यासंदर्भात हंपी आहे हे ठाऊक होतच, पण रामायणातली किश्कींधा नगरी हीच हे मात्र ठाऊक नव्हतं. मग काय दुधात साखरच, पर्वणीच होती मला.
हंपीची बरीच वास्तू विश्वधरोहर जागतिक नोंदीत आहे.
जस जस हंपीला जायच ठरल तस तस मी जास्त शोध घेऊ लागले. जो अंदाज मनात  बांधला होता त्याच्या कैकपटीन हंपीला भव्य दिसलं. भारताचा गौरवशाली इतिहास - परंपरा पौराणिक महत्त्व जपलेली ही वैभवशाली भूमी. १४-१६ शतकातलं हे साम्राज्य किती समृद्ध असेल याचा अंदाज प्रत्यक्ष येतो. कुशल राज्यशासन, कुशल कारागिरी, कुशल सैन्यदल असलेले चालुक्य वंश, होयसाल‌ वंश, यादव वंश, काम्पिनी वंश, तुलवा वंश यांच्या उत्कृष्ट सर्वगुणसंपन्नतेचा अंदाज ईकडे आल्यावर आपण जे काही पाहतो त्यानंतरच येतो. हरिहर पहिला आणि बुक्का पहिला या सेनापतींचा ऊल्लेख या साम्राज्याच्या सुरवातीचा म्हणून ऐकण्यात आला. एकंदरच विजयनगरची राजधानी असणारी ही भव्य वास्तू पाहुन अद्भुत, अहाहा! एक नंबर म्हणत आपण तोंडात बोट घालतच फिरतो. चेष्टा नाही खरोखरच, त्याकाळच्या राजांनी आपली संस्कृती पुढच्या पिढीला कळावी ती पोचावी यासाठी खुप दूरदृष्टीनं हे शहर अलंकृत केलेल आढळतं. कित्येक लाख सैन्याचं नेतृत्व करणारा, सुखसमृद्धीन शासन करणारा राजा, ज्याला परमुलखी राजे घाबरत असा उल्लेख ऐकून वाटतं आपले पूर्वज किती महान होते. आता आहे तो ठेवा परमेश्वराची कृपा राहो आणि जपला जाण्याची बुद्धी लाभो.
विजयनगरच्या राजधानीला सात घेरे/ सर्कल होते, ते परिपूर्ण आखणी करून होते. पहिला घेरा राजा राणी महाल, विदेशी व्यापारी अतिथी गृह, दसरा सणाला आजुबाजुच्या राजांना बोलवत ते, त्यांच्या राण्यांना न्हाण जागा ऊर्फ क्विनस बाथ, रानीयोंका समर पॅलेस नंतर पुढच्या सर्जकलमधे जवळचे सहाय्यक मंत्री सेनापती तेनाली रामांसारखे अष्टदिग्गज,  त्यांच्यासाठीचा बाजार अशी सात सर्कल. भर रस्त्यावर हिरे माणकं सोन बाजार भरत असे ईतकी सुबत्ता आणि सुरक्षितता.
याकालावधीत राजपर्यत यायला सात वेळा चेक पोस्ट होती कडक सुरक्षा. प्रत्येक वास्तूच्या ईमारतीचा प्रत्येक दगड कोरीव शिल्प आणि घडलेल्या कथा दर्शवतात. सगळच हंपी कस अलौकिक अद्वितीय आणि अद्भुत भारावून टाकणारं आहे. आपली संस्कृती आपण पाहुन येण फार फार महत्त्वाच आहे.
मौर्य भुवनेश्वरी रीसाॅर्ट हंपी.
भीम द्वार : पांडव वनवासात असताना ईकडे राहिले अशा खुणा आहेत पण ठोस ऊल्लेख फारसा पुस्तकात नाही. भीमाची प्रतिमा दगडात कोरलेली आहे. हातात सौंगंधीका नावाच पुष्प आहे. भीमाला द्रौपदीनं फुल आणुन मागितल ती कथा घडलेली जागा. भीमानी दु:शासनाचा वध केला ती गोष्ट ईकडे दगडात कोरली आहे. भीमगर्वहरण पण याच परिसरातल असाव अस म्हटल जातं. याचा लिखीत पुरावा नाही पण अवशेष आढळतात.
विजया विठ्ठल देऊळ, दगडी राज तुला आणि रथ
राजमार्गावर सगळी ठिकाणे आहेत जो रस्ता आता आपण वापरतो तोच राजमार्ग होता. मात्र जरा लांब तुंगभद्रा नदीकाठी हे विजया विठ्ठलाच देऊळ आहे. जायला इलेक्ट्रिक गाडी आहे एक दिड किलोमीटर अंतर आहे आपण चालत पण जाऊ शकतो.
स्वयंपाकघर, कल्याण मंडप - लग्न होत होती तो, कलासादरीकरण हाॅल, घोडे तळ अशा सहा सात वास्तू या विजया विठ्ठलाच्या देवळाभोवती आहेत.  दोन राण्यांनी दोन द्वार बांधली. तसेच मुख्य दाराची कथा अशी आहे. सोन्याचा कळस होता, तो तोफेन ऊडवला आता भगदाड आहे. काही भाग नंतर पुरातत्वभागान नीट केलाय, तर काही काम सुरू आहे. या सातही वास्तू कोरीव कामाने सजवलेल्या पाहुन शिल्पी लोकांच्या कलेचा आवाका समजतो.  तो सांगुन वाचुन झेपणारा अजिबात नाही बघावाच लागेल.
पुर्ण देवळाची लहान प्रतिकृती आधी करून ती ओके अस राजाकडून आल मगच ती कोरली जात होती. आधीची ब्यू प्रिंटची ही संकल्पना असावी.
या फोटो मधे तळाला डावीकडे ती कोरली आहे तशीच मोठी प्रतिकृती तयार केली.
प्रत्येक वंशाने यात भर घातलेली दिसते. मुघल आक्रमणांना झेलत ही वास्तू ऊभी आहे ती संस्कृती पुढे समजावी म्हणून. या सर्व वास्तूला नमस्कार...
गर्भगृहाबाहेरून काढलेला फोटो. वरचा लाकडी भाग जळला आहे.
(कोणत्या आवाजाचा कोणता खांब ओळखायला त्यावर वाद्य कोरलय.)
हंपीमधल विजया विठ्ठलाच्या देवळात आधी पंढरपूरचे भगवान विठ्ठल आरूढ होते अस समजलं.  मुघल हल्ल्यापासून बचावासाठी फक्त विठ्ठल मूर्ती रीतसर पत्र पाठवुन ईकडे आणली गेली. ज्यात सगळ सुरळीत झाल की परत नेऊ असा ऊल्लेख होता. ती जवळजवळ ७६ वर्ष कर्नाटक हंपीमधे होती. एवढे वर्ष तीची ईकडेच पुजा झाली. राजा कृष्णदेव राजाच्या अखत्यारीत साम्राज्य असताना तीची परत महाराष्ट्रात बोलवली गेली. तस परत हवी अस ताम्रपत्र घेऊन मंडळी आली. पूर्वजांनी दिलेल वचन पाळण क्रमप्राप्त असे जगणारी ही पिढी तयार झाली खरी पण जनमानस तयार नव्हतं. राजा कृष्णदेवराय बालाजींना मानत होते, त्यांनी सुबक नवीन मूर्ती बनवली जी पंढरपूर च्या विठोबा सारखीच होती फक्त कमरेवरचा एक हात ऊघडा खालच्या भागाच्या दिशेनं होता. ती मूर्ती विजया विठ्ठलाची. अशा प्रकारे पंढरपूर मधे विठ्ठल आले आणि विजया विठ्ठलाच्या नावान ही मूर्ती हंपीमधे राहिली. राजा कृष्णदेवरायांच्या माघारी परकीय आक्रमणे झाली त्यात हे खंडीत झाल अस समजलं. विजया विठ्ठलाच्या मूर्तीला वाचवण्यासाठी ४० ब्राह्मण मारले गेले. यामुळे विजया विठ्ठलाच्या देवळात दोन जागा / दोन देवपाट आहेत. सद्ध्या गर्भगृहात मूर्ती नाही. २०२४ साली पंढरपूर ला रीनोवेशनच्या वेळी काही मूर्त्या सापडल्या त्या इकडच्या आहेत अस म्हटल जात यावर शोध सुरू आहे.
ती मूर्ती ही...
चिकार मोठा परिसर आहे.
दगडी रथ हा आपल्या ५० रूपयाच्या नोटेवरील आहे. उत्सुकता ही होती की रथारूढ कोण आहे तर गरूड आहे. समोर विष्णूच देऊळ आहे. दगडी रथ आणि गर्भगृह यांच्या मधे महा मंडप आहे ज्यात म्युझिकल पिलर आहेत. आतत जाण्यास हात लावण्यास मनाई केली आहे. देवळाच्या प्रदक्षिणेचा भूमिगत मार्ग आहे. तो पाहायला मिळतो.
देवळाच्या प्रवेशद्वारावर विजयनगरच्या साम्राज्याची छबी कोरली आहे. ती सविस्तर पाहुच..
या स्तंभाला याली स्तंभ म्हणतात. एका लेखकानी विजयनगरच वर्णन  केल ते या शिल्पात आहे. सात प्राणी एकात करून सात गुण राजाचे त्याच्या सैन्याचे यात अधोरेखित केले आहेत. शरीर सुंदर घोड्यासारखे आहे विजयनगरचं सैन्य चपळ आहे.
त्याचे डोके सिंहाचे आहे तो शाही दिमाखदार आहे. त्याचे दात हत्तीच्या दातांचे आहेत. पुढचे पाय ऊधळत आहेत विजयनगर च सैन्य कधीही तत्पर आहे. कान सश्यासारखे सावध आहेत विजयनगरच गुप्तहेर खातं असच आहे. यातला स्वार यावाहनाचे डोळे प्रत्येक वैशिष्ट्य पूर्ण आहे. तेव्हाच गाइडकडून सविस्तर नोंद करायला हवी. या याली खांबात नकारात्मकता देवळापासुन दूर ठेवण्याची क्षमता आहे अस म्हटलं जातं. ईकडे दगडी शिल्पात केळफुल कोरलेल जास्त दिसतं ते या भागाच चिन्ह आहे. या चिन्हावरून तो भाग कोणाचा ते ओळखल जातं.
दगडी राज तुला किंगस बॅलन्स नावान आहे.  ईकडे राजा कृष्णदेवराय व दोन राण्यांची विविध गोष्टींनी तुला होत असे. यावर कोरलेले संदेश पण सापडतात.
क्विन्स बाथ राण्यांचं न्हाणीघर सौंदर्य प्रसादन वापरून आवरून जाण्याची जागा. तलाव त्यावर छतासाठी खड्डे ऊन्हापासुन सौरक्षणासाठी, चारही बाजुला गायक वादकांची बसायची जागा नियोजनबद्ध पद्धतीने आहे. २०-२२ लहान डोम आहेत ज्यावर एकेक दागिना कोरला आहे. आतून वर जायला जीना आहे सूर्यदर्शनासाठी. तो बंद आहे.
आता खाली आहे तो परदेशी अतिथींचा तलाव
ईतकी सुंदर रचना आहे की परदेशींच्या वापरातल्या सोईंची पण दखल घेतलेली दिसते.
राॅयल पॅलेस. तळमजला फक्त शिल्लक आहे. चौकोन पाहुन भव्यतेचा अंदाज येतो. राजपरिवारासाठी बाग, राजाला भेटण्याचा चौथरा, राजाची येण्याची जागा, राजाची दर्शन घेऊन झाल्यावर बसायची जागा सगळ सगळ पाहता येतं.
कृष्ण देवराय पॅलेस. यात राजवाडा आहेच पण टप्प्यात आहे चढत्या क्रमानं. राजाला भेटायला डायरेक्ट मनाई किंवा सुरक्षेसाठीची सोय. राजाच्या वेळची लेखनीक जागा, सर्वर रूम, भूमिगत खलबतखाना अबब! काय अवाक् करणारं बांधकाम आहे. यात कोण कोण असण अपेक्षित आहे त्यांचे त्यांचे शिल्प कोरलेले आहेत.
हजार रामा देऊळ हे रामाच देऊळ मुख्यत्वे शाही घरण्यातील लोकांसाठी बनवल होतं. यात हजार दगडांवर पूर्ण रामायण कथा स्वरुपात कोरलेल आहे. विशेष म्हणजे विशिष्ट प्रकारच्या गरबाच्या प्रतिकृती आढळल्या.
ईकडे पोचलो आणि जोरात पाउस आला. जरा भिजलो घुटमळलो. वाली चांगला होता की वाईट यावरची शाळा घेतली गाईड राघवेंद्र जींनी. वाली खुप चांगला होता पण अहंकारामुळे आणि शापामुळे अपयशी ठरला. मानवी रूपात असल्याने श्रीरामाच्या हातुन विनाकारण एक पाप घडलं‌ तस पाहता वालीस मुक्ती मिळाली पण पुण्य जास्त असल्याने पुढच्या जन्मी भगवंतास निजधामास कारण होण नशीबी आलं.आणखी गोष्ट समजली ती शांता जी श्रीरामांची बहिण होती तीच्या लग्नाची. जी सगळी गोष्ट शिल्पांत दगडात कोरलेली आहे.
देवळात मूर्ती नाही. काही मूर्त्या स़ग्रहालयात ठेवल्यात हंपीमधल्या अस समजलं. भंग झालेली देवालये पुजत नाही त म्हणून ती फक्त बघायला आहेत. पण सगळीकडे स्वच्छता आहे.
पुष्करणी मस्त नऊ पायरींची विहीर ही रोजची काम करण्यासाठी असावी.
किंगस बाथ ६५ फुट तलाव आहे. राजाच न्हाणीघर ऊर्फ तलाव. याच्या जवळ एक शिवालय भग्न अवशेष स्थितीत आहे. राजा आंघोळ करून देवाला जाण्यासाठी.
लोटस महल : उन्हाळ्यात ऊकाडा टाळण्यासाठी यात पाण्याच छान नियोजन आहे. राजे लढायला गेले की सगळ्या बायका एकत्र महालात राहात. तो तळमजलाच फक्त शिल्लक आहे.जनाना पॅलेस च्या समोर लोटस महल आणि राणी तलाव आहे. आता कठडा नाही. जवळच टेहळणी बुरूज आहे. जो तृतीयपंथी लोक चालवत. राणीवसा त्यांच्याकडे सुरक्षित राहतो अस तेव्हा मानत.
हत्ती घर एकंदर ११ शाही हत्ती राहण्याची ऊत्तम कलाकृती निर्माण केलीय. जैन हिंदु बौद्ध असे सगळे कळस दोन्ही बाजुला आहेत. मधे अंबारी आहे. जवळच माहुतांची राहण्याची सोय आहे.
तेनालीरामा घर माहुतांच्या घरामागे मोठाल्या दगडाचा ढिग आहे. टोकावर महिरपी भाग करून तेनाली रामांचे घर ईथे होते / असावे अशासाठी जागा अधोरेखित करून ठेवली आहे. वास्तूच्या पायथ्याशी चार खांब मधे चौथरा आहे. आजही काही ठिकाणी ऊत्खलन सुरू आहे. बघु पुरातत्व भागाला काही सापडतय का?
आयुष्यात आपण अशा ठिकाणी कधी जाऊ अस स्वप्नात सुद्धा नसताना त्या जागी जाण्याचा योग आला की होणारा आनंद मी अनुभवला. अत्यंत स्वामिनीष्ठ हुषार असे अष्टदिग्गजांपैकी एक पंडित तेनालीरामा यांच्या सहवासातली भूमी मी पाहातेय विश्वासच बसत नव्हता. मन भरून आलं सगळ्या कथा झरझर डोळ्यासमोर येत होत्या. कुशाग्र बुध्दीच्या त्या पुण्य आत्म्यास नम्रपणे मनापासून नमस्कार करून मी निघाले. गाईड म्हणाला आपण जेव्हा अशा वास्तूला अत्यंतिक प्रेमान पाहतो, शोधतो, भारावतो तेव्हा ती वास्तू पण सुखावते. आनंदते. आपका कुछ था आपको वो यहा पे लाए...
अस म्हणत मधे ऊभ करून हा फोटो काढला. राजमाता दिख रहे हो म्हणत वातावरण स्थावर केलं. धन्यवाद राघवेंद्र जी.
विरूपाक्षी टेम्पल ईकडे विरूपाक्ष रूपात महादेव आहे. ११ मजली गोपुर वर कळस आहे. कळसाला हात लावण नमस्कार करण पद्धत आहे ईकडे महादेवावर हात ठेवत नाही यासाठी संध्याकाळी या गोपुराची ऊलटी प्रतिकृती आत एका झरोक्यातून भिंतीवर पडते.  भारीच अनुभव होता हा. तीन कळस आहेत, भूमिगत महादेव, पार्वती, देवी भूवनेश्वरी, दुर्गा देवी अशी सुंदर देवळ याच परिसरात आहेत. देवी भुवनेश्वरी चे नेत्र खुपच प्रभावी आणि ऊर्जायुक्त जाणवतात. ते आपल्याला भावतात.
दिवे फार सुंदर दिसतात. पार्वती पंपा शंकर पंपेश्वर पंचा हंपा हंपी अस बदलत नाव झाल असाव अस समजलं. गाइड उवाच बरका!
आतमधे फोटो काढण मनाई आहे.
गर्भगृहाच्या बाहेर दगडी मंडपात छतावर पेंटिंग्स आहेत. कथा ऐकून आणि ती समजुन मन पुराणातच जातं. पण गाइड असेल तरच हे समजेल अथवा आपण वर बघणारही नाही.
ऊग्र नरसिंह म्हणजेच श्री लक्ष्मी नरसिंह देऊळ. राजा कृष्णदेवराय यांच्या अखत्यारीतल हे शेवटच शिल्प. ही कलाकृती डायरेक्ट बनवली कारण राजा आजारी होता. ती बनवुन राजास दाखवली कृष्णदेवराय खुप खुष झाले असे समजले.
शिल्पी लोकांची परिक्षा घेउनच त्यांना पहिल्या दहात घेत असत मगच कामाला रूजु होता येत होतं. तसच घोडे तपासणी पथकही कडक होतं. जीभ स्वच्छ घोडा सुदृढ दात सुव्यवस्थीत त्यावरून वय ओळखत. काय ऊच्च कोटीची व्यवस्था असावी.
बडविलिंग गुडी म्हणजेच महादेवाच भव्य शिवलिंग असलेल देऊळ. हे पूर्ण पाण्यात आहे. दिवसा सूर्य किरणांत असते. एका गरीब शेतकरी महिलेने हे बनवुन घेतले अस म्हणतात. यालर कोरलेले शिवाचे तीन डोळे आहेत. बडवा आणि लिंग अस नाव जोडलेल आहे कारण बडवा म्हणजे गरीब आणि म्हणून बडवा लिंग.
हंपी बाजार मधे बनाना सिल्क साडी तसेच काही क्राफ्टच्या वस्तू घेऊन आम्ही निघालो. सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसात आम्ही ईथवर पोचलो. दिवसभरात भारावलेल्या पाच जीवांना आता पाय समजु लागले होते. दिवसभरात खुप काही ग्रहण केल होतं, खुप काही आवडलं भावलं होतं. राॅक सीटीत राॅक्स फिरलो. सकाळी राजु स्टाॅलवर दोसा ईडली पुरी भाजी नाश्ता झालेला आणि रात्री मॅंगो ट्री रेस्टॉरंट ला बैठकीत थाळी जेवलो. ईकडे नाश्ता साडे आठ नऊलाच संपतो. संध्याकाळी ते बंदच असतात. आणिजेवणाची ठिकाण तर न ऊ साडेन ऊलाच संपल म्हणतात. संध्याकाळी फार किर्र अंधार असतो रस्ते रलांब वाटतात. मुळ हंपी गाव छोटसच आहे. नवीन वस्ती जरा लांब आहे. नारळपाणी सोनकेळी मात्र मस्त खाल्ली.
जेवणात केशरी शिरा रस्सम वगळता फार काही वेगळ नव्हतं. पण केळ्याची स्वीट डिश होती.
जेवायला बनाना ट्री आणि मॅंगोलीफ/ ट्री बरेच बरे आहेत. जेवण नाश्ता ठराविक वेळेतच संपतं हंपीमधे.
सोलापुर नंतर विजापूर च्या पुढे लंच केल तो हा ढाबा अप्रतिम जेवण.
सकाळी श्रीकृष्ण ला चहा घेतला.
***********
सकाळी नाश्ता करून पुढे गेलो. हाॅटेल ते सानापुरा रस्ता मस्त.
सानापुरा लेक मस्त ४० फुट खोल आहे. बोटींग आणि निसर्ग यासाठी प्रसिद्ध आहे. जवळच अस्वल असलेल जंगल आहे. साधारण २० मिनीटांची ही बुट्टी ऊर्फ डोंगा फेरी. सुंदर अनुभवायलाच हवी अशी जागा.
अंजनाद्री हिल हनुमान जन्म स्थल ५९८ पायरी चढुन वर देऊळ आहे. जेवढी माणस तेवढीच माकडं पण आहेत. चपला पायथ्याशी सोडूनच चढतात. ऊतरायचा रस्ता वेगळा पण मस्त आहे. नारळाचा प्रचंड मोठा ढिग आहे वर. भिंतीत कोरलेली केशरी रंग चढवलेली मूर्ती आहे.
पंपा सरोवर  हे पंच सरोवरापैकी एक आहे. शबरी व रामाची ईकडे भेट झाली. पंपा पार्वतीच नाव आहे काठावर सुंदर पार्वती पंपा रूप देऊळ आहे.
शबरी गुफा पंपा सरोवराजवळ शबरी राहत असे ती जागा शबरी गुफा नावाने नीट राखली आहे. यावेळी जोरात पाऊस कोसळला. सरोवरात मगर आहे. देवीचा चित्राध्ना प्रसाद घेतला आणि निघालो.
राम पद गुडी : सुग्रीव राम प्रथम भेट स्थल चिंतामणी मठ अनेगुडी गावात आहे. रामान वालीस मारलेला बाण जागा दगडात कोरलेली आहे. प्रचंड मोठ्या तुंगभद्रेच्या  काठी हे ठिकाण आहे. मोठ मोठ्या दगडाच्या गुहेत ही जागा आहे. मोठ चाफ्याच झाड आहे. बघण्यासारख आहे फण पोचेपर्यंत अंदाजच लागत नाही.  याच वाटेवर गगन महल आहे आम्ही गेलो नाही गल्ल्यांचा रस्ता फारच निमुळता होत जातो आणि गाइड नसताना नको वाटतं. थोडा वेळ काढुन जायला जाघा मस्त आहे.
ईकडचे व्हिडिओ फार मस्त आलेत.
भगवान श्रीकृष्ण देऊळ. बाळकृष्ण ते मोठा कृष्ण अशी अनंत शिल्प ईकडे आहेत. मूर्ती नाही याच वाईट वाटतं. काय वैभवात नांदत असतील ही देवळं कल्पना केली तरी मोहरत मन.
ससिवेकालु गणेश म्हणजे (ससिवेकालु म्हणजे  सरसोंका बीज) हा गणपती माता पार्वतीच्या मांडीवर बसलेला ८ फुट ऊंच आहे पण ती प्रदक्षिणा घालताना दिसते. 
हेमकुटा हिल सनसेट पॉईंट 
हेमकुटा म्हणजे सोन्याची. पंपा म्हणजे पार्वती नी शंकरासाठी तप केल नंतर ते विवाहास तयार झाले ते हे ठिकाण हेम कुटा. तसच कामदेव भस्म झाले शंकराच्या तृतीय नेत्राग्नीमुळे ती हीच जागा. हंपी गाव तसेच विरूपाक्षी देऊळ या टेकडीवरून मस्त दिसतं. महादेवाचा वास अशी ही भूमी समजली जाते. याभागात अनेक देवळं आहेत. सूर्योदय सूर्यास्त छान दिसतो.
कडालेकलु गणेश पंधरा फुट ऊंच अशी ही मूर्ती एकाच मोठ्या शीलाखंडातुन निर्माण केलेली आहे.
सूर्यास्त पाहुन आम्ही भरपुर आठवणी सुपानी साठवुन रूमवर गेलो. लवकर झोपायच होतं कारण ऊद्या बदामीला जायच होतं.
******
बदामी / बादामी गुहा आणि भूतनाथ देऊळ अगत्स्य लेक. बदामी/ बादामी/ वातापी अशी नावे आहेत.  असुर वातपीचा वध ऋषी अगस्ती यांनी केला. तो तलाव आर्युवेद औषधींयुक्त पूर्वी होता आता तस नाही. चालुक्य वंशजांचा वावर या लेण्यांमधे दिसतो. महादेव गुसा, विष्णु गुहा, महाविष्णु गुहा जैन गुहा अशा चार दगडात कोरलेल्या शिल्पांच्या गुहा आहेत.
मूर्ती देवालयात नाहीत पुजा होत नाही कोरीव काम अद्भुत आहे. प्रत्येक गुहेचे वैयक्तिक वैशिष्ट्य आहे. भरपुर वटवाघूळ असल्याने आतला थोडा  भाग बघता आला नाही. प्रचंड माकडं आहेत. आपल्याबरोबर पायरी चढतात. आम्ही गजरे घातलेले काढायला लावले माकड हिसकवतील म्हणून. बदामी लालसर दगडातली शिल्प बघुन वाटत या शिल्पी लोकांची पुढची पिढी असेल कि अस्तित्वात?
महादेव गुफा
विष्णु गुफा
महाविष्णु गुफा
जैन गुफा
पट्टदकल म्हणजे राजाचा सिंहासन आरूढ होण्याची जागा.
परत निघताना फार डोक्यात भरून निघालो होतो काय काय बघितलं बापरे! पट्टदकल ते बिजापुर रस्ता फारच मस्त होता त्यात  पाऊस सुरू झाला होता.
मधे सूर्यास्त बघत चहा वडा घेतला.
बिजापुरला सहा पोचलो  गोल घुमट आतुन बघु शकलो नाही पण जवळच एक महादेवाचे देऊळ बघितलं.
नंतर पंढरपुरी गाठली रात्री ईस्काॅनमधे राहिलो.
 पहाटे विठुराया रखुमाईच दर्शन घेतल आणि पुण गाठलं.
संपूर्ण प्रवास सुरेख झाला. (२३-२७ ऑक्टोबर २५) जे जे बघितलं त्यापेक्षा खुपच कमी लिहु शकले आहे कारण काही गोष्टी डोळ्यात तरळतात आणि ह्रदयातच ऊतरतात शब्द फिके पडतात मंडळी! जमेल तस या डोळ्यात तरळुन हंपी बदामी....

संस्कृती जपली तरच टिकेल हे एकच म्हणेन.

जय श्रीकृष्ण 
सौ. गौरी पाठक 
++++++++++++++++++++
*गाईड श्री. राघवेंद्र यांचे विशेष आभार
*वेळे अभावी बघायची राहिलेली ठिकाणे :
(आपण नक्की बघाल.) मातंग टेकडी, गगन महाल,  माल्यवंत रघुनाथ राम मंदिर, भूमिगत शिव मंदिर, कोटीलिंग मंदिरश, सुग्रीव गुहा आणि अच्युत मंदिर
*व्हिडिओची लिंक लवकरच येईल ईकडे.... क्रमशः 
++++±+++

No comments:

Post a Comment