Tuesday, 5 August 2025

वास्तव

वास्तव 
आज एका छोट्या मैत्रिणीला गाडीवर घरी जाताना लिफ्ट द्यायचा योग आला. कधी कधी छोटुशी मैत्रीण पण काहीतरी सांगून, दाखवून, शिकवून जाते तशीच हि छोटुशी मैत्रीण. सुटीत घरून आलेली खुश होती. तिघी बहिणी भेटल्या. ताजीतवानी होती. घर आणि घरची माणसं, त्यांचा सहवास हा मोलाचाच हे या पिढीला पण समजतंय पाहून  छान वाटलं. 

ती : मोठ्या बहिणीचं लग्नाचं बघत आहेत, तिला अजून हवी तशी नोकरी नाही, ती इतक्यात नको म्हणतेय. (ती सांगत होती.)
मी म्हटलं : आई वडील योग्य वयात मुलांची लग्न व्हावी हाच विचार करतात. ती उपवर असेल झाली म्हणूनच तुमचे पालक लग्नाचं बघत असतील मला खात्री आहे. 
ती : या टॉपिकवरच आमचं तिघींचं खूप डिस्कशन झालं मॅडम. 
मी : अच्छा!
ती : आमचे आई बाबा आमचं हे विचार पटून घेत नाहीयेत. तुम्ही समजून घ्याल मी सांगते थांबा. 
मी : (बापरे आता काय ऐकायचय रे देवा!) आधी सांग तर मग मी माझं मत सांगेन. 
तर तिघींचे म्हणणे असे :

मोठी : आई का घाई करतेय लग्नाची? २७ वर्षात मी पायावर उभी कशी राहणारे? जरा दोन वर्ष तरी माझा बँक बॅलन्स जमू दे. तर नाही. नोकरी लागलीय आता बास झालं. नोकरी लागली म्हणजे झालं असं नाही . 
मधली : ताई तू आत्ता जे करशील ते तसच मला करायला लावतील. मी अजिबात करणार नाही. 
छोटी : मी काय करू तुमच्यासाठी सांगा. माझं तर दुसराच वर्ष आहे. ताई पण जे करशील ते मलापण सांग ग. 
मोठी : असा नाही ग छोटी. मला पण लग्न करायचंय, मुलं पण झालेली आवडेल. पण जगात जे बघतेय ना त्यावरून आधी पायावर उभी राहणे मस्ट आहे. दोन मैत्रिणीचे डिव्होर्स झालेत लग्नाच्या दुसऱ्याच वर्षात. 
मधली : ओह नो ! म्हणजे लग्न करा करियर गमावा पोरं वाढवा सगळं एकटीनेच. यासाठीच पायावर उभं असलेलं हवं. 
मोठी : पण आई होण्यासाठीचा फिझिकल पिरियड यात मिस होतो हे मला पटलेली गोष्ट आहे. पण ते जन्माला घातलेलं एकटीला सांभाळायची वेळ आली तर मी फायनॅन्शिअली रेडी हवी ना. 
मधली : यासाठीच ताई एग्ज फ्रीझिंग चा पर्याय बेस्ट आहे. योग्य वयातली एग्ज पुढे करियर चा जम बसला कि फर्टीलाइझ करू शकतो. सायन्स किती पुढे गेलाय. 
छोटी : हा ऑपशन भारीय 
मोठी : मी ऐकाय हे पण विशेष माहित नाही. 
मधली : घ्यायची माहिती मग. तुला हवं तेव्हाच लग्न कर एग्ज फ्रीझिंग करून हवा तेव्हा मॉम हो. 
छोटी : तसाही पिरिऑड्स इर्रेग्युलर असतात हल्ली बरेच जणींचे. हा  त्यांना पण होपफुली गुड ऑपशन आहे. 
मोठी : खरंय. कन्सल्ट करून बघेन. 
छोटी : हा ऑपशन विचार करण्यासारखा आहे. कॉस्टली आहेच पण आय थिंक माय जनरेशन विल प्रेफर धीस  मोस्टली. 
मधली : हो कारण आजकाल वूमनला आधीच्या पेक्षा जास्त टेन्शन्स आहेत. सेफ राहून टेंशन सांभाळून हेल्दी जगायचं तर काहीतरी करावाच लागेल. यात ओन बेबीचं सॅटीस्फाकशन आहेच आणि मेंटल  सॅटीस्फाकशन सुद्धा. 
छोटी : ट्रू 
____________
मी गाडीवर बधिर झालेल्या कानांनी सुन्न! या जमान्यातल्या या तीन मुलींचा विचाराचा खेळ काळीज हेलावून गेला. आईपणाची योग्य भावना अनुभवायला कशी मिळेल यांना त्या गोठवलेल्या अंड्याना उपजतांना. ज्या वयात आईपण अनुभवू ते वय परत हवं तेव्हा अनुभवानं इतकं सोपंय का?  खरंच मला हे योग्य कि अयोग्य माहित नाही, पण आता पुढची पिढी इतकी व्यस्त व्यग्र विवंचनांना तोंड देतेय त्यात त्या सुंदर कोमल आणि शब्दात व्यक्त होऊ न शकणाऱ्या आई होतानाच्या भावनांचा अनुभव हुकला जाऊ नये हीच मनापासून इच्छा!
------------------------
ती : सांगा का मॅडम व्हाय नीड टु  वरी ?
मी : तुम्ही वरी नाही ग पण यात शारीरिक अडचणी आहेत त्यांना समोर जावं लागेल कि. (तीच हॉस्टेल आलं तरी आम्ही बोलताच होतो )
ती : वूमेन्स स्ट्रगल इझ गोइंग टु मोर डिफिकल्ट नाऊ, सो वुई नीड टु फाईंड अ बेस्ट सोलुशन, दॅट्स इट !
मी : असेल हि ग तू म्हणतेस तसं पण मन पटकन मानात नाहीये हा पर्याय. मला तो आज समजलंय जो वापरून बऱ्याच जणी जगात जगतही असतील. 
ती : नॉट एव्हरी गर्ल नीड टु डु धिस बट, पीसीओडी ऑर करीयर फोकस मधे डिस्टर्ब नको सारखे प्राॅब्लेम्स असतील तर ऑपशन म्हणून गुड ना?
मी : हसून मान  फिरवत होते मी. (हो म्हणून वर खाली आणि नाही म्हणून डावी उजवीकडे) 
अशा प्रकारे बाय करून मी घरी निघाले खरी पण अनंत प्रश्नाचा गुंता घेऊनच. 
ज्या मुलींना शक्य नाही पण ती मातृत्व अनुभवण्याची आस धुगधुगी शिल्लक राहिल्यावरचा हा ऊपाय असावा. पण हे वास्तव आहे. की अजुनतरी आई व्हायची इच्छा तरी मनापासून आहे या पिढीत.
कदाचित मधलीच म्हणणं बरोबर असेलही. त्याला बरेच किनार (तीर पैलतीर) असणारच पण परमेश्वर करो आणि हि वेळ पुढच्या पिढीत कोणावर न येवो. काहीतरी व्हावं आणि आधिसारखं या पिढीच्या मुला मुलींना त्या त्या वेळच सुख मिळण्यासाठीचा मार्ग सुलभ व्हावा. भावनांना उच्चं स्थान लाभावं. 
तुम्हाला काय वाटतं ? नक्की सांगा. 
सौ. गौरी पाठक 
०६. ०८. २०२५

(दोन तीन ऐकण्यात आलेले अनुभव एकात करून एकत्रित स्वरूपात मांडले आहेत.  )

No comments:

Post a Comment