Tuesday, 30 December 2025

शब्दकळी सोबत लेखन उपक्रम : रोज एका शब्दाची स्वतः च्या मनची ऊकल.

४ डिसेंबर २०२५
रोज एका शब्दाची स्वतः च्या मनची ऊकल.
सकारात्मक राहा आणि मगच वाचा!
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शब्दकळी सोबत लेखन उपक्रम  चला लिहूया....
आज पासून ३१ डिसेंबरपर्यंत सुरू करत आहे....
यावेळी यामध्ये मी रोज एक विषय किंवा शब्द देईन त्यावरून तुम्हाला चारोळी, कविता, कथा, अलक, लेख, ललितलेख मनाला वाटेल ते काहीही लिहायचं आहे....
ज्यांना ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी त्यांनी खालील लिंक वरून हाग्रुप join करा...
अट फक्त एकच ...रोज लिहून ग्रुपमध्ये पोस्ट नाही केलं तर ग्रुपमधून न सांगता remove केलं जाईल😅
सौ‌ शब्दकळी विजया / शब्दकळी
#######################################################################
१. पुन्हा नव्याने किंवा एक नवी सुरुवात ५ डिसेंबर
२. आयुष्य एक प्रवास ६ डिसेंबर
३. नातं आणि अपेक्षा ७ डिसेंबर
४. स्वप्न ८ डिसेंबर
५. आठवण ९ डिसेंबर
६. प्रेम ११ डिसेंबर
७. बदल ११ डिसेंबर
८. एकांत १२ डिसेंबर
९. केल्याने होत आहे रे १३ डिसेंबर
१०. स्वीकार आणि नकार १४ डिसेंबर
११. अडचणी, अडथळे, संकटे - आयुष्याचा एक भाग १५ डिसेंबर
१२. चुकलेल्या वाटेवर चालताना १६ डिसेंबर
१३. सुख म्हणजे नक्की काय असतं १७ डिसेंबर
१४. नावात काय असतं?? नाव आणि नातं/ नावापलीकडचं नातं १८ डिसेंबर
१५. आपल्यासाठी फक्त आपण १९ डिसेंबर
१६. कळतंय पण वळत नाही २० डिसेंबर
१७. वेळेचे महत्व २१ डिसेंबर
१८. पत्र लेखन २२ डिसेंबर
१९. अंत अस्ति प्रारंभ २३ डिसेंबर
२०. लोक काय म्हणतील? २४ डिसेंबर
२१. संकल्प आणि संकल्प पूर्ती २५ डिसेंबर
माझे लेखन न विचारता कुठेही पाठवु नये. © गौरी पाठक
###########################################################################

५ डिसेंबर २०२५
एक नवी सुरुवात
काय सुंदर विचार ना 'एक नवी सुरुवात' या बीजातुन येणाऱ्या अंकुरासारखी. मनातली ईतरांबद्दलची मळभ, मळकट विचारांची आवरणं फेकून ऊभारीन तेवढ्याच ताकदीने सकारात्मक विचार करत प्रकाशाकडे झेप घ्यायची. कोण काय म्हटल? कोण कस वागल? कोणी साथ दिली नाही दिली, हे सगळ सोडून या बीजातल्या अंकुरासारखीच रोज सकाळी एक नवी सुरुवात करतच जगायच हा विचार आठवडा झाला घोळत होता हा फोटो काढल्यापासून. आणि विजयाताईनी त्याला वाचा फोडली. जगण्याचा माझा दृष्टिकोन मला असाच ठेवायचाय मी मनाला बजावत असतानाच हे वाक्य मिळालं ही त्या परमेश्वराचीच ईच्छा. या अंकुरासारखच जग सुंदर आहे असच म्हणत मी पण प्रकाशाकडे झेप घेतेय. विजयाताईला धन्यवाद आणि सर्व सख्यांना सुप्रभात.
############################################################
६ डिसेंबर 
आयुष्य एक प्रवास 
खरच विश्वातली सगळी सजीव तत्व हा आयुष्य एक प्रवास जगतात. प्रत्येक व्यक्तीचा/ तत्वाचा आयुष्याचा प्रवास जरी वेगवेगळा असला तरी तो त्या एकाच तत्वातच विलीन होतो. तो सुखद होण्यासाठी योग्य कर्म करायचा नाद लागला की तो आनंदमय वाटतो.
यातल्या कल-आज-कल ची वळण खुप सुंदर - मनाची श्रीमंती असलेली माणसं भेटवतात, सोसाट्याच्या वाऱ्यासारखी  दु:ख पण यात येतात, यावेळी तरून नेण्यासाठी ऊभारीसाठी प्रकाशाकडे झेप घेण्यासाठी भगवंताच नामस्मरण कृतज्ञता कशी ऊपयोगी पडते हे शिकवतात. "आयुष्य एक प्रवास" हा झालेल्या चुकांपासुन पुढे सुधारणा करत जगत तसेच कोणत्याही परिस्थितीत लेट गो म्हणत सर्वांना सामावून घेत सरत त्या तत्वाकडे सुपूर्त करायचा.
आयुष्यातल हार्डवेअर (शरीर) बदलणारच आहे पण मी माझ साॅफ्टवेअर (आत्मा) मात्र योग्य कर्म करत अपडेट ठेवण केल तर मग हा प्रवास आणखी मजेदार असणार आहे हे मला समजलय. हा मार्ग न सोडता जगता याव हीच कान्हाजींना कळकळीची विनंती. आयुष्य एक प्रवास हा सुखद सोहळाच आहे अस मला वाटतं. मस्त वाटतय मला आज, मी आयुष्यात प्रथमच कल-आज-कल वर ईतका विचार केला असेल. आज सोनचाफ्याच झाड मला हेच शिकवून गेला.जय श्रीकृष्ण 
###########################################################################
७ डिसेंबर 
नातं आणि अपेक्षा 
झेंड्याचा बारीक दोरा आणि वेलीचा वाढता भाग जसा आहे तस नातं आणि अपेक्षा यात अंतर असाव हे मी शिकलेय. दोन ठिकाणचे दोन एकत्र येतात, नातं हे असच दोन धागे जुळतात तसच निर्माण होतं. आपल समजलं की आपसुकच हक्क आला पण तो जास्त प्रमाणात आहे का तपासत राहण जमल पाहिजे. समोरच्याला तितकच वाटतय का? तपासत राहण महत्वाच हे मला वारा आला की झेंड्याचा धागा आणि वेलीच टोक सुटत होत जुळत होत यावरून सुचलं. नात असल की अपेक्षा असतेच पण ती भंग न होऊ देण म्हणजेच निष्काम कर्म करणं. वारा शिकवतो मनाला आवर घाल, प्रेम कर, जीव लाव पण अति गुंतून अपेक्षा भंग होणं टाळ. नातं तोड नाही पण त्या व्यक्तीला व्यक्त होऊन प्रतिसाद देण्यास वेळ दे. नात अपेक्षांच्या हक्कात दबु न देता जगलीस तर सुखी राहशील. आपण जितक मनापासून करतो तितकच समोरच्याची करण्याची झेप असेलच अस नाही किंवा त्याला ते गरजेच पण वाटत नसेल. एक झुळूक आयुष्यभर लक्षात राहिल. तीन मनात नातं आणि अपेक्षेमधली बारीक रेघ शिकवली. निसर्ग कमाल आहे बघु तसा दिसतो. 
जय श्रीकृष्ण. 
###########################################################################
८ डिसेंबर 
"स्वप्नं"
मानवाला मिळालेली कल्पना करण्याची शक्ती ही या स्वप्न या गोष्टीचा स्त्रोत आहे अस मला वाटतं. आपण जो विचार करतो ती नोंद बाह्य मन करत पण स्मृतीची नोंद होऊन अंतर्मनात काम सुरू होतं. जसा विचार तशी स्मृती तशी स्वप्नं. माझ्यामते स्वप्न बघण ही कृती ध्यासाची सवय लावते कारण ती पुरी करायला आपण झगडतो. मग ध्यासाची सवय लागते. यातुन ईच्छा शक्तीच कार्य समजतं आणि मग सकारात्मकतेने स्वप्न पाहायचा नाद लागतो. आपण जे ठरवु ते होऊ शकतं हे समजल की स्वप्न ही स्वप्नं न राहता आपल्याला मिळालेल्या नैसर्गिक देणगीचा साक्षात्कार वाटतो. स्वप्नं जीवनात ध्यास आणतात, ध्यास ईच्छा शक्ती प्रबळ करतो आणि जो विचार केला ती कृती होते. मस्त गणित आहे हे. ही ऊकल समजुन घेत जगायचं. माझ्या मते स्वप्नं म्हणजे परमेश्वरानी मानवास दिला पुश ऊर्फ धक्का स्टार्ट आहे. भावनांच व्यवस्थापन स्वप्न करतात हे वाक्य ऐकलय आवडल पटलं. (हे वाक्य माझं नाही.)
हे कान्हाजी माझ्याकडून योग्य विचार केला जाऊन ती योग्य स्वप्न ध्यासान पुरी व्हावी यासाठी योग्य कर्म करण्याची बुद्धी मला द्या.
जय श्रीकृष्ण 

###################################################################################

९ डिसेंबर 
"आठवण
वर्तमानात जगताना सुख दुःखाला आपण सामोर जातो. त्या प्रवासात सुखद क्षणी किंवा दु:खाची झालर आली की जे आपण आपसूकच वापरतो ते टाॅनिक म्हणजे "आठवण" अस मी म्हणेन. या क्षणी झपकन माझ्या आयुष्यातील एक सुखद आठवण सांगा म्हटल तर ती माझा मातृत्वाचा अनुभव हीच ती म्हणेन आणि बाबांना जगाचा निरोप देताना स्वतः डोळ्यासमोर बघण ही दु:खद आठवण.
जुनी पत्र आणि फोटो आठवण या सदरात माझ्या आयुष्यात फार मोलाची आहेत. माझी पिढी आठवण शब्द ऊत्तम जगली, ती काढायला माणस लाभली, एकोपा लाभला. हल्लीची पिढी बघितली की वाटतं यांना हा अनुभव येईल का? यांच्या व्यवहारीक जीवनशैलीत आठवण नावाच टाॅनिक संपुष्टात येईल का? Memories नाव देत दिखावा सादर केला जातो त्यात आठवणींची किनार कमी वाटते. त्या भावनेचा गाभा नसतो. अर्थात अपवाद असतातच पण तरी.
भविष्यात आपली माणसं व आपण अनुभवलेल्या गमती यांना उजाळा देण यासाठीच हे टाॅनिक मी मात्र भरपुर वापरता याव यासाठी सुंदर क्षण जमवणार, साजरे करणार आणि करतही आलेय. यासाठी माझे "बाप माणूस" आणि "९ दिवस ९ स्रीया" लेख वाचा. विजया तू कायम आठवणीत राहशील व्यासपीठ दिल्याबद्दल.
जय श्रीकृष्ण.
##########################################################################
१० डिसेंबर 
प्रेम
मानवाला सुदृढ जीवन जगण्यासाठी शरीरात संप्रेरकं परमेश्वरानी दिली आहेत, त्यातली भावना निर्माण करणार एक हे प्रेम. जे विश्वास आणि आपुलकी दाखवतं. एखाद्याला पाहुन मनाला आल्हाददायक वाटल की आपण त्या व्यक्तीच्या सहवासात राहण पसंत करतो. पण या भावनेत त्या व्यक्तीला बांधुन ठेवणं नसतं, ती दुरावण्याची भिती नसते कारण विश्वास असतो. या भावनेत मालकी हक्क नसतो निसपेक्षता असते. आपल समजल की गुण अवगुण दोन्ही सकट ती आपलीशी होते. झाली पाहिजे तरच ते प्रेम बरका!
ती व्यक्ती चार वर्षांनी भेटली तरी एक घट्ट मिठी तीच्याबद्दलच मनातल प्रेम दर्शवते. कारण ती लांब असली तरी संवादातुन मनात घर करून असते. यात कोणतही नात असु शकतं मग नवरा, बायको, भाऊ बहिण मुलगा मुलगी किंवा शेजारची किंवा लहानपणची सखी सुद्धा. तसच ती व्यक्ती कधी दिसेल न दिसेल माहित नसत पण ती आहे ती माझ्या बरोबर आहे ही खात्री असते ही आद्ध्यात्मिक भक्ति पण प्रेमच मग तो कृष्ण असो वा दुर्गा. यात समर्पणाची तीव्र भावना असते. भेटीचा नव्हे अनुभूतीचा ध्यास असतो. एखाद्याच सगळ नीट होईतोवर ऊलघाल जगणारी, एकाग्रतेने त्याच्या योग्य जीवनासाठी नैसर्गिक मातृत्वाच्या देणगीचा सकारात्मक स्पंद त्यासाठी विश्वात सोडणारी, काडीचीही अपेक्षा न करता त्या व्यक्तिला भरून जगताना फक्त बघण्याची इच्छा ठेवणारी प्रेमच तर करत असते.
जगातली सर्वात ऊच्च भावना म्हणजे प्रेम. फक्त या ऊच्च भावनेचा कडेलोट होऊ न देणं, विश्वास वासनेत न बदलु देणं, बांधुन ठेवलं त्याच बंधन न वाटु देण ही गोष्ट मात्र परमेश्वरानी मानवावर सोपवली आहे. त्यामुळे परमेश्वराची कृपा अशी समजायला हवी की या प्रेम भावनेमुळे मानव जीवन तर सुंदर जगु शकतोच आहे पण ती भावनाच जगतातील प्रत्येकाच काम झाल की परमेश्वर प्राप्तीसाठी वापरू शकेल. तीच भावना मोक्ष मिळवुन देणार आहे. मानवाला जगताना आणि नंतर मोक्ष मार्गास जाताना दोन्ही वेळी वापरायची गुरूकिल्लीच परमेश्वरानी दिली आहे हे माझे ठाम मत आहे. भौतिक जीवनातलं प्रेमाच अफाट महत्व समजलं की मगच आपण आद्ध्यात्मिक जीवनातलं त्याचं अथांग महत्व समजु शकु. 
बघु जमतय का? मी पण प्रयत्न करतेय.
जय श्रीकृष्ण 
* माझे लेखन कुठेही वापरू नका आणि वापरले तर नाव नंबरसहीत वापरा ही प्रेमळ विनंती 
####################################################################
११ डिसेंबर 
शिस्त 

शिस्त खरंच खूप मस्त विषय आहे. मला या शब्दापेक्षा अनुशासन हा शब्द जास्त आवडतो. मला स्वतःला अनुशासन पूर्ण जीवनक्रम फार आवडतो. जेव्हा मला त्याच महत्व समजलं तेव्हा पासून माझं मी मला अनुशासित जीवनक्रमात ठेवलाय. लोकांना ती कटकट वाटते पण तीच लोक मला परफेक्ट म्हणत मदत घेताना मी बघते. माझ्यामते शिस्त बुद्धी तल्लख ठेवते आणि वेळेचे नियोजन नीट होते. यादोन्हीचा मला जगताना फायदा जाणवला आणि मी अनुशासित जगायला प्रवृत्त झाले आहे.
माझ्या मते शिस्त म्हणजे घरात जाताच दार नीट लावणे, पर्स हेल्मेट ठरलेल्या जागी ठेवणे, बाथरूमच दार खिडकी काम झालं कि बंद करणे, वापरलेला पावडरचा डबा तेलाची बाटली पर्फुमची बाटली सगळी झाकण काम झालं कि लगेच लावणे, दर १५-२० दिवसांनी स्वतःचा कंगवा धुणे, जादाच्या गाद्या उश्या तत्सम वस्तू प्रथमदर्शनी छान झाकून असण्याकडे माझा कल असतो मग ते घर कोणाचं का असेना, केस विचारले कि तत्काळ आपला कचरा उचलणे, खोलीबाहेर पडताना नाइट लॅम्प बंद करणे, (लोकं साध ऊठल की खुर्चीपण नीट न ठेवता जातात) सकाळी उठलं कि स्वतःची उशी पांघरून नीट घडी करणे, बेडशीट सरळ करणे, ती घालताना अजिबात सुरुकुत्या न ठेवता घालणे, बाहेरून आलेले कोणतेही सामान एकदम झोपायच्या पलंगावर न ठेवणे, बाहेर जायच असेल तर आदल्या दिवशी कपडे दागिने वस्तू जमा करणं, स्वयंपाघरातल्या बरण्या डबे जे ठरलेत त्यातातच वस्तू भरणे, मसाले काम झाले कि घट्ट बंद आहेत ना पाहूनच परत ठेवणे, माझं कपड्यांचं कपाट विभागणी करून नीट आहे का हे दर १०-१२ दिवसात तपासणे, कोणतेच कपडे जिकडे वळत घालणे अपेक्षित आहे तिकडेच घालणे, स्वतःची पर्स पण जी गोष्ट ज्या कप्प्यात तिकडेच असायला हवी. अशी आणि अशी अनेक काम मला जिकडं हवी तिकडंच आवडतात. वस्तू जिथल्या तिथं असल्या कि वेळेवर कोणीपण कुठाय विचारलं कि सांगू शकता आला पाहिजे. यामुळे वस्तू सापडते आणि आपली बुद्धी पण तल्लख राहते. सुचत नाही आठवत नाही असली कारण द्यायची वेळ येऊ देणंच मुळी मला आवडत नाही.
मला बरेचदा घरात चक् केल जातं सारखा नीटनेटकेपणा वर फोकस जरा शांत बसत नाही. हे बंद केल नाही, ते आवरल नाही चालु असतं. पण यांना त्याचे फायदे अजुन समजलेच नाहीयेत.
मला कुठही जायच असल तर वेळेआधी १० मिनीट पोचायला आवडतं. दिलेली वेळ पाळु शकले नाही की ऊलघाल होते समोरचा ढिम्मच असतो. अनुशासित, नियोजनबद्ध जगण हे शिकवुन होत नाही ते आतुनच याव लागतं.
आता हळूहळू मी माझी शिस्त माझ्या पुरतीच ठेवण सुरू केलय. सल्ले देण बंद केलय. झाकण-दरवाजे-डबे ऊघडे ठेवा. भरपूर इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरा आणि जमेल तेव्हा जागेवर ठेवा. कसय ना आपण स्वत अनुशासित जगण आपल्या हातात आहे जगाला शिस्त लावण अशक्य आहे. काही दिवस झाले मी "माझंच "शिस्तीत जगते. स्वतः चा रक्तदाब संतुलित ठेवणं यासाठी मी करते.  माझ्या शिस्तीच्या रडारमधेच राहायच कारण कदाचित ईतरांना त्याच महत्व नसेल यासाठी त्यांचीही दुसरी बाजु असेल असा विचार मी हल्ली करते.
मी आहे तशी स्वयंशिस्त पाळणार जे माझ व्यक्तिमत्त्व आहे. मला कोणताही लहान कार्यक्रम असो आखणी करूनच आवडतो मी त्यातच आनंदी असते. वेळेवर ठरवु अस खुपदा कमी केल जातं.  शिस्तीचा अतिरेक नसावा मला मान्य आहे पण ती असूच नये किंवा कोण येणार असलं की धाड पडल्यासारख धावुन नसावी. जीवनात प्रत्येक गोष्टीत अनुशासन हवं! शेवटी शिस्त मनाला वळण लावते आणि मला आनंदी ठेवते.
जय श्रीकृष्ण 
#################################################################################

१२ डिसेंबर
एकांत

एकांत म्हणजे एक असतो दुसरा कोणीही नसतो. अत्यंत गूढ अर्थ या शब्दाचा आहे. ब्रह्म विद्येच्या अभ्यासात सतत सांगतात शांततेच ध्यान करा, एकांत अनुभवा मगच ध्यान छान होतं. व. पु. काळे म्हणतात परिसराच मौन म्हणजे एकांत आणि परिवारात असूनही पोरकं वाटणं हा झाला एकाकीपणा.
एकांत म्हणजे खरतर आगमनाची चाहुल... जी अनुभूती मी अजुन घेऊ शकलेली नाही.  एकांतात राहण्याची सवय करून मग श्वासावर लक्ष केंद्रीत होत ती पायरी मी अजून गाठली नाही पण त्याविषयी कुतूहल आहे. अस बरेचदा वाटत लिहायची वही आणि काही पुस्तकं ऊचलावी आणि भिलारगावची बस पकडून आठवडाभर भूमिगत व्हावं. माझी गाडी ईच्छेपर्यंतच पोचलीय. ज्या गोष्टीमुळे आद्ध्यात्मिक जीवनपथ सुरू होतो, सिंहावलोकन करण्याची सवय जडते त्या कठिण पण आवडू लागलेल्या मार्गावर मी आहे.
एकांताच वैभव मी अजुन अनुभवण झाल नाहीये, जो अनुभवच आलेला नाही तो मी लिहू शकत नाही. फक्त तारे तोडू शकतेय.
मला यावर ईतकच आणि खरंखरं हेच वाटतय.... एकांताच्या अनुभवाच्या प्रतिक्षेतली मी...
जय श्रीकृष्ण 
############################################################################
१३ डिसेंबर 
स्विकार आणि नकार
हो किंवा नाही ठामपणे म्हणता येणं हे जबरदस्त जोखमीच काम आहे. याआधी स्वतःला स्वतः बद्दलमाहिती असण्याच काम केल पाहिजे. थोडक्यात अस म्हणायचय की आपल स्वतः च जगण्याच ध्येय ठाऊक हवं. कुठ जायचय हे ठाम हवं. कोण जवळच? कोण दुसर्या वर्तुळातल? कोणासाठी काय जबाबदारी आपण समजतो? ती त्याला अपेक्षित आहे का? हा सगळा स्वचा अभ्यास हवा मग आपण कोणतीही गोष्ट स्वीकारू अथवा नकारू शकू. बरेचदा आपल अस होतं की - जाऊ दे हो म्हटलं मी..‌ पर्याय नसतो कारण प्रत्येक गोष्ट समोरच्याला पण तशीच वाटेल अस नसतं. ही आजवरची परिस्थिती होती. पण हल्ली...
एखाद्याला वाटत असेल लग्न झालं मुल झाली मस्त मार्गी लागलो तर एखादा म्हणेल बरय दोघच सेट होऊ आधी मुलांच काय घेऊ दत्तक. ही वस्तुस्थिती स्विकारण पटत नसल तरी स्विकारणारी बरेच आहेत‌. मग आता आजकालच हे करंट अफेअर विचार करता मी म्हणेन स्वतः च जग कस हव ते आपण स्विकार - नकार मधे बसवायच. ईतरांच्या निर्णयाला कुरतडत बसायच नाही.
हे स्विकारायच की आपण ईतरांचा चांगला विचार करतो. त्यांना पटो अथवा न पटो तसेच ईतरांनी आपल्यासाठी पाठवलेली नकारात्मक विचारांची शिदोरी नाकारायची.(भगवान बुद्धांची गोष्ट आठवा.)
हे स्विकारायच की आपण आपल समजलय समोरच्यासाठी काय पण करू पण मग आपल समजतोय तर पटल नाही तर "नाही" नकार द्यायलाही माग पुढ पाहायचं नाही.
जय श्रीकृष्ण 
##############################################################################
१४ डिसेंबर 
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.
काय सुरेख संकल्पना आहे ना ही, का आणि सुचली असेल ना ती रामदास स्वामींना? जगात अवतरणारे संत महात्मे स्वतः कसं जगतात कसं वागतात त्यावरून सर्व सामान्य माणुस जगण्याची व्याख्या तयार करत आला आहे. समाज सुजाण कस जगायच शिकत आला आहे.
नुकतच एक रील बघण्यात आलं की आई कपडे घड्या घाततेय आणि मुलगी ते विस्कडतेय. पण परत ती आई घड्या घालतेय मग ती मुलगी तेच चार कपडे खोलीभर विस्कळीत करतेय. खेळ सुरू आहे आणि आई हसतेय. ईतक सुंदर ऊदाहरण आहे हे केल्याने होत आहे रे... आज या वयात ती मुलगी न समजता अर्धज्ञात मनात  नक्कीच नोंद करतेय की आई घडी घालतेय आणि मी ती चवड विस्कडतेय. सुप्त मनातील ही नोंद कालांतराने आठवते आणि ती पटते की घर आवरण आपण केल तर होतं ते झालं की आपल्याला केल्याच समाधान आणि आनंद दोन्ही मिळतं. मग तो अनुभव आपण घेतलेला असतो आपण प्रगल्भता जाणवतो ती आपल्या कृतीतून दिसते.
संत आपली आईचीच भूमिका बजावतात. प्रत्येकाच्या आयुष्यात हे वळण ज्याच्या त्याच्या कर्मफलाच्या लेख्याजोख्याने होते अस मी मानते. कारण बरेचदा पटत पण केल जात नाही. साध पुरणपोळीच ऊदाहरण मी माझ आठवते. खाताना ती कशी हवी सांगण आणि ती करून बघितली की गुज ऊकलतं. कष्टाची किंमत कळते.
टेकडी चढुन मिळणारा आनंद या समर्पक चित्रात मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. आपण तो आनंद ती ऊचल खाल्ली की ती शेजारच्याला दाखवली पाहिजे. चल जमेल चढु टेकडी म्हणत ही पंक्ती आपण आपसात क्रियान्वित केली पाहिजे तरच असच आपल्याला पण म्हणणारा जीवनात येईल.
आजकाल हे पुढच्या पिढीला बघता विश्वास ठेवा मग तुमच्या वर विश्वास बसेल यासाठी मी नक्की सुचवेन. यासाठी मात्र यांना झेपतील भावतील असे संत जन्माला लवकर यावेत रे बाबा...
जय श्रीकृष्ण 
##############################################################################
१५ डिसेंबर 
अडचणी, अडथळे, संकटे - आयुष्याचा एक भाग 

जीवन जगताना आपण अनेक गोष्टींचा सामना करत जातो त्यात अडचणी संकट ही आलीच. यात मी म्हणते की तो परमेश्वर आपल्यातली सकारात्मक जगण्याची वृत्ती आपण कशी जागृत ठेवतोय ते तपासत राहतो. त्याच कारण मी अस समजते की पूर्वीच्या पुण्याईवरच आनंदी संतुष्ट मानव न राहून तो सतत तेच योग्य कर्म करत राहावी यासाठीची परमेशृवराची ही योजना असते.
लहान होते तेव्हा मी पण अडचणींकडे बघुन पोटात गोळा आला म्हणतानाची मला आठवतेय. पण जस जस मोठ होत गेले तस तर त्यावर तोडगा काढुन जगायची सवय लागली. 
साध पुण्याहून मुंबईला जाताना गाडीत वाक्य कानावर आल की -"बरच ट्रॅफिक दिसतय आज" तर तत्काळ ऊत्तर निघत "सुटेल हळूहळू" क्षणभर सुध्दा विचार येत नाही की आता आपल्याला लेट होणार का? 
जगताना संकट आणि अडथळे येतच असतात कधी ते समजतात तर कधी येऊन गेलेले समजत पण नाहीत बरका!  हो अस पण होतं कधीकधी कोणीतरी दुत म्हणून येतोही आणि आपल्या मार्गातली अडचण दुर सारून जातोही... 
गंमत सांगते ही क्षुल्लक गोष्ट पण फार मोलाची आहे रोज जगताना... भयंकर गर्दीतून गाडी काढताना एखादाच किंचीत मधे असतो त्यान गाडी फक्त दहा डिग्री तिरकी केली की आपण सहज निसटून जातो. आठवा सगळ्यांना असे लहान अनुभव आलेले असतील.
आज निघताना नाश्ता न करता निघून कामावर पोचतो भुक जाणवते पण बघु अस विचार करत पोचलो की मैत्रिणी मस्त थालीपीठ आणलय तुला पण घे पटकन म्हणते. आली होती की नाही अडचण पण झाली की नाही ऊकल. आपण पटकन म्हणतो देवासारखी आलीस.
त्यामुळे माझ्या आयुष्यात आलेल्या अडचणी संकट अशाबद्दल जर मी विचार केला तर मी त्यावर मात केलीच आहे, कधी कधी डगमगले पण आहे - पण सहज कोणीतरी माध्यम बनुन सुटूनही गेले आहे.
आज या सत्राच्या निमित्ताने मी अशा सर्वांचे आभार मानते ज्यांच्यामुळे मी माझ्यावर आलेल्या अडचणी संकटं अडथळे  सहज पार करू शकले आणि ईतक सहज ते माझ्या आयुष्यात आले की मी आभारच मानले नाहीत.
आज मी अशा सर्व सहकार्य केलेल्या व्यक्तींना मनापासून धन्यवाद देते.
कान्हाजी अशी सहज मदत करून एखाद्याला सुटण्यासाठी मी कर्म करण्याची मला बुद्धी देवोत!
शुभं भवतु!
जय श्रीकृष्ण 
#############################################
१६ डिसेंबर 
चुकलेल्या वाटेवर चालताना.
जय श्रीकृष्ण!
मानवाला परमेश्वरान बुद्धी दिली स्वतः चे सगळे गुण दिले परंतु या सगळ्यात प्रत्येकाची जुळी बहिणही बरोबर आलीच... जसं प्रेम दिल तसं लोभ आहेच, लक्ष्मी आहे तर अलक्ष्मी असणारच मानवान सीमा पाळली नाही तर ती घातकच.. पण परमेश्वर आपल बोट कधीच सोडत नाही. मानवाला वाटतं की आपली वाट चुकली पण खरतर परमेश्वराची कृपा असल्याने तो आपल्याला ती जाणीव देत असतो, तो सतत खुणवत असतो की अरे बा मानवा सावधान! 
आपल्याला वाटत आपण चुकलो पण तस नसतं परमेश्वर आपल्यासाठी वाट निवडतो. आपल्या स्वप्नांपेक्षा परमेश्वराच आपल्यासाठीच प्लॅनिंग जबरदस्त असतं, तो सतत सूचकतेचे निर्देश पाठवत असतो. आपण ते ओळखण्यास समर्थ असण फक्त आपल काम आहे आणि ते योग्य कर्म करत राहिल तरच समजेल. 
चुकलेल्या वाटेवर चालताना मी फक्त हाच विचार करते की कान्हाजी बरोबर आहेत म्हणून अत्यंत बिकट परिस्थिती येण्यापूर्वीच मनात आल माझ्या की मी वाट चुकले आहे.
बस कृष्णार्पणमस्तू म्हणत मी योग्य वेळी योग्य मार्गावर येतेच येते. काहीही अघटित न घडता. तो तस काहीही घडूच देत नाही ऊलट मी शिकते त्यातून. चुकलेल्या वाटेवर चालताना पण मोलाची माणस पेरलेली सापडतात बर का! तो भारीच आहे.
राधेंराधें
##
१७ डिसेंबर 
सुख म्हणजे नक्की काय असतं?
सुख म्हणजे आवडलेल्या / भावलेल्या अनुभूतीच्या भोवतीच सोनेरी कोंदण. तो क्षण क्षणिक असतो पण ते कोंदण आयुष्यभर जवळ असतं.
सुख म्हणजेभर पावसात ऊभ राहिलेलं पायाखालचं पाणी असतं.
सुख महणजे अचानक समोर आलेल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीच आपल्याला बघुनच स्माईल असतं.
सुख म्हणजे मनातल पेनामार्फत ऊतरलेलं वहिच पान असतं.
सुख म्हणजे गरम वरण भात तुप मीठ लिंबाची फोड असतं.
सुख म्हणजे मनात भेटीची आतुरता असलेल्या व्यक्तीला मारलेलं घट्ट आलिंगन असतं.
सुख म्हणजे कल्पनेतल्या श्रीकृष्णाच प्रत्यक्ष देवळात दिसणारं गोजिर रूप असतं.
सुख म्हणजे वाफाळता चहा पित कोवळं ऊन खात बसलेल मन असतं.
सुख म्हणजे भोवती मनाच्या श्रीमंती असलेल्या माणसांचा गराडा असतं.
सुख म्हणजे डोक्यात घालायला मिळालेल्या चाफ्याच्या फुलाचा वास असतं.
सुख म्हणजे स्वकष्टातून वाढलेलं झाड असतं.
सुख म्हणजे स्वतः जन्म दिलेल्या बाळाची पहिली तान असतं.
सुख म्हणजे आपण कोणाचे तरी आवडते/ घट्ट जवळचे आहोत हा भाव असणं.
सुख म्हणजे आपणहून मी तुझ्याकडे येतेय अस म्हणण ऐकणारा कान असणं.
सुख म्हणजे माझी वाट बघणार एक मन या जगात आहे हे स्थान असणं.
सुख म्हणजे दिलेल सरप्राइज बघुन समोरच्याची आनंदान डोलणारी मान असतं.
सुख भौतिक आणि आद्ध्यात्मिक दोन्ही असतं अस म्हणतात. पण भौतिक सूखाची अनुभूती घेऊन झाली की ते सुख तो आनंद वाटावा वाटण हे आद्ध्यात्मिक सुख ऊत्तम सुखानुभूती देतं. त्यात सातत्यानं टिकुन राहाव वाटणं घडल पाहिजे. सुखाची क्षणिक किनार आंतरिक नोंदीत असते. सगळ्यांना घेऊन जगतानाच्या आनंदाच सुख जास्त प्रभावशाली असतं. मग आपण वसुदैव कुटुंबम विचार करू लागतो.
सुख म्हणजे सुख असतं, अहो तुमच आमच सेमच असत फक्त ते आपापल्या मनाचा भाव असतं.
शेवटी सुख हे मानण्यावरच असतं. सोडून देण्याच्या क्षमतेवर त्याच दान असतं.
जय श्रीकृष्ण 
* माझे लेखन कुठेही वापरू नका आणि वापरले तर नाव नंबरसहीत वापरा ही प्रेमळ विनंती 
#####
१८ डिसेंबर 
नावापलिकडच नातं
आयष्यात अनेकदा अशी माणसं येतात जी प्रामाणिक संवाद साधत, विश्वासाची भावना निर्माण करतात. त्यांना का सहानुभूती वाटावी माझ्याबद्दल? कधीच न भेटता पण एक विलक्षण बंध आधीचेच आहेत असे का जाणवत असावे? मला पण बरेचदा असा जाणवत कि एखाद्या अनोळखी बद्दलची आत्मा नोंद घेतो, ती जाणीव होतेच होते. या नात्याला एक अद्वितीय जोड असते ती सहानुभूतीची ,आपलेपणाची.  हि नाती जी नावापलीकडची असतात ना ती लाभणं मोलाचंच! खरंतर आपण भेटलेलो पण नसतो पण "इमिजिएट सेन्स ऑफ फॅमिलिआरिटी "ची जाणीव होते. (खरतर मला मराठीच शब्द कायम वापरायला आवडतात पण प्रथमच ही भावना इंग्रजी शब्दातच परखड व्यक्त झाली किंवा होतेय अस वाटलं.) अश्या अनेक नात्यापलीकडच नातं असलेल्या व्यक्ती  माझ्या आयुष्यात आलेल्या आहेत. त्यातल्या  काही कालावधीपुरत्याच आयुष्यात असणाऱ्या पण आहेत आणि  कायम सोबत आहेत अश्याही आहेत. मी स्वतः पण अशा काहींना अजूनही आठवणींच्या कप्यात ठेवल्यात बर का! (आयुष्यात आलेल्या व्यक्ती आणि वल्ली सदरात नोंद करून ठेवली आहे) लेखनाच्या अश्याच एका गटात एक गोड व्यक्तिमत्व आहे जे मला मोलाची देणगी असून नात्यापलीकडचं नातं या सदरात मुद्दाम सांगावं वाटावं असा आहे. असं नात असणारी "ती"आहे हि जाणीव मला परवाच झाली आणि कान्हाजींना मनापासून कृतज्ञता व्यक्त केली मी. तर झालं असं - मी १२-१३-१४ घरच्या कार्यामुळे इकडे लिहू शकणार नव्हते हे मी विजयाताई ला आधीच सांगितलं होत. मी निवांत होते. या गटातील एकींन  मला माझा लेखन आज का आलं नाही दिवसभरात ?  असा मेसेज केला. गेले ६-८ महिने आम्ही एकमेकींच लिहिलेलं वाचतोय प्रतिक्रिया देतोय पण अचानक गायब झाले असा कधी झाला नाही. तिनी मला वैयक्तिवर मेसेज केला कि ताई तू दिवसभरात ग्रुपवर दिसली नाहीस ? लिखाण पण आलेलं नाही? काही निरोप नाही? मला काळजी वाटली ग. तू बरी आहेस ना? मला काळजी वाटली ग म्हणून विचाराव वाटलं.

काय अद्वितीय शक्तिशाली बंध म्हणावेत हे - नात्यापलीकडचं नातं अजून कसं असेल ? अवाक् होते मी त्या क्षणाला.... कधीही समोरासमोर न भेटलेली ती आणि मी फक्त शब्दांच्या बांधावर आपलेपणाचे हिंदोळे घेत होतो. तीला माझी काळजी वाटावी... जगात रक्ताची मैत्रीची शेजारची म्हणून नाती असतात त्यांना वाटल असत तर मी सहज समजु शकले असते हे. पण हे नात्यापलिकडचं नातं मला अमूल्य ठेवा आहे.

त्या दिवशी मी जगात भारी  हीच ती अनुभूती अशाच भावात होते.

काय योगायोग मी ही नोंद माझ्या वहित लवकर करावी म्हणून च का कोण जाणे कान्हाजींनी विजयाताईला हा विषय द्यायला लावला की काय कोण जाणे?

भगवंताची लीला अगाध आहे तो माझा माझ्यासाठी पदोपदी आहे हे परत पटलं.

धन्यवाद विजया, धन्यवाद महिमा धन्यवाद सख्यांनो!

जय श्रीकृष्ण

####

१९ डिसेंबर

आपल्यासाठी फक्त आपणच..

आपलं बिपलं कोणी नसतं आपणच आपल्याला असतो. अहो खरच! या वाक्याला जेवढी प्रथमदर्शनी तीव्र नकारात्मक झालर आहे ना तेवढीच लपलेली आद्ध्यात्मिक सकारात्मक झालरही आहे. अनुभवानच ही माणसाच्या निदर्शनास येते. 
आपण आनंदी जगताना सगळे आपले आणि आपण सगळ्यांचे असे जगायच हा नियम आपल्या आधीच्या पिढीकडून शिकत आलोय. तसच जगायचं पण आहेच. तरी सुद्धा एखाद वेळी अस होतच कि एवढे सगळे आजूबाजूला आहेत पण मी माझी एकटीच आहे असा क्षण येतो आणि ओक्सा बोक्शी रडावं वाटतं. असा झालं कि जागा पाहून तात्काळ मोकळं व्हायचं. अति टोकाचं आहे हे पण एखाद वेळी अस होत. कस आहे तो क्षण विश्वातील एकमेकांना जोडणारी संवेदना पोहोचू शकत नाही अशातला असतो.
 
माझ्या मते परमेश्वरी योजनाच असते ती, स्वतःला अति झोकून तर देत नाहीयेस ना? अति अपेक्षा तर करत नाहीयेस ना? किंवा तू खूपच अवलंबून राहू लागलीस का? तपासण्यास भाग पडतो. आपलं आपणच असतो हे कधी कोणाला समजावं? कस समजावं? हा ज्याचा त्याचा योग  असतो.

खरंच कधी कधी आपण आपली एखादी व्यक्ती जी न सांगता समजते ती गमावलेली असते, तिची उणीव त्या क्षणी भासते. समजून घेणारा जोडीदारही असतो पण तो त्या वेळी नेमका उपलब्ध नसतो. तेव्हा वाटत सगळे माझेच आहेत पण आपलं बिपलं कोणी नसत.
जगात माझी माणसं म्हणून बाजू घेत मी भांडले आहे पण तीच माझ्यावेळी नुसती मागे सुद्धा उभी नाहीत त्यावेळी पण हीच भावना मनात येते.
तीव्र दुःखाची झालर मगाशी म्हटलं ते अशासाठी कि आपण खूप मनापासून केलेलं असत पण समोरच्या पर्यंत ते पोचलेच नसत. तीव्र सुखाची झालर म्हटलं ते अशासाठी कि हि भावना आयुष्यात एकदा तरी यायलाच हवी तरच आपल्याला पटत कि मी जगात एकटाच आलोय आणि एकटाच परत जायचंय.
कशात किती गुंतावे याचा माणसागणिक लेखाजोखा हा वेगळा असणारच.
जेव्हा सकारात्मकतेने मी हे वाक्य लिहिते कि "आपली बिपलं कोणी नसत आपणच आपल्याला असतो " तेव्हा माझं मन पक्क झालेलं असतं कि जगात मला काय आणि कस जगायचं / वागायचं आहे. या वाक्यात मोह संपत चाललेला दिसू लागतो. 
एकदा दोनदा नकारात्मकतेने हे वाक्य आयुष्यात येताच, पण ते सर्वांच्या आयुष्यात लवकरच सकारात्मकतेने यावं रे बाबा.
त्यामुळे "आपणच आपल्याला" अस म्हणताना खूप भावनिक किंवा स्वतःला पपू म्हणून घेणं अशा अर्थाच नसावं. असा म्हणणारा माणूस "खूप भोगलंय ग बिचारीन" असा पण नसावा,  हे विचार येण चूक आहे.  विचारच बदलाचेत मलाही .. हे वाक्य सुखात पण म्हणू शकतो असाच दृष्टिकोन असावा कि काय हरखत आहे.

आपण जगताना हे ओळखूनच जगायला हवं कि शेवटी सगळेच जीव कर्माच्या लेख्याजोख्यात अडकलेलेच असणारेत ना? मग हे होऊ शकतं की.
म्हणुनच सर्वाना सोबत घेऊन आनंदानीच जगायचं, आनंदी राहायचे बहाणे शोधायचे, तो आनंद वाटायचं तरच तो वाढतो. मग स्वतःमध्येच आपल्याला फरक जाणवतो, आपण अधिक आनंदी होतो. इतरांनाच प्रश्न पडतो अरे हि इतकी आनंदी कशी ? कसं काय जमत हिला सगळंच करणं? हीच तर आपण आनंदाचा प्रसार करतो याची पावती असते. ही झाली लपलेली सकारात्मक झालर...
एवढं करूनही एखादवेळी टचकन पाणी येणारी घटना घडतेच कि आपल बिपलं कोणीच नसतं अस्सच वाटतं. मग आपणच आपल्याला असतो तेव्हा पण मी स्वतःला गोंजारायच ठरवलंय. या भावनेनी मला अशा वेळी मी कोणाशी बोलायचं ते शिकवलंय. मी भाग्यवान समजते. पण परत पटरीवर येते आणि मजेत राहते आणि आजूबाजूला पण तसाच जगवते. हे मी आज म्हणू शकते कारण मी ते करून झाले आहे, करत राहणारे. न करता बोलत नाहीये. या गोष्टीचा मला किंचितही गर्व न होऊ देणे मी पाळतेच आहे. 
कान्हजी माझे पाय कायमच जमिनीवर ठेवण्यासाठी कर्म करण्याची बुद्धी मला द्या. 
जे जे वाटलं, जे जे शब्द आले समोर ते सुमडीत मांडले.... पटापट बघा झेपतायत का?
जय श्रीकृष्ण
###

२० डिसेंबर 

कळतय पण वळत नाही


"कळतय पण वळत नाही" हे कबुल करायला जिगर लागतं.  माणसाच जीवन ईतक सोप्प नाही. जगताना आपण कसे आहोत हे ऊघड सांगितल की त्याची खरी आवृत्ती समजुन घेणारे झेपेचे कमी असतात. म्हणून हे होत असावं. 

कळत पण वळत नाही हे कधी कधी झेपेबल गटात तरी मनमोकळं सांगता यायला हवं. माझ्या नेहमीच्या मैत्रिणींमधे आम्ही हे बोलतो बरका!

अनेकवेळा मी सांगते/ आठवण करते म्हणून मला गृहित धरणारे असण्याला पण या "न वळणं" न जमल्यामुळे मीच जबाबदार असते.

'समोरच्याला आता मी हे सांगितलं पाहिजे त्याला हे गरजेच आहे' अस मला बरेचदा वाटतं. समोरचा माझ्या प्रेमातलाच ऊर्फ फॅन असतो त्यामुळे नको म्हणत नाही. मला सल्ला देण आत्ता गरजेच नाही हे कळत पण ते वळत नाही.

समोरच्याला गरज नाही, त्यानं विचारल की मगच मदतीचा हात द्यायला हवा किंवा त्यांच्या काही डोक्यात असेल, ज्याची त्याला काळजी असते हे बरेचदा मला कळत पण वळत नाही.

साध्या साध्या गोष्टी असतात त्या, दिसतात समोर, भयंकर गडबड होणार आहे पण हल्ली मी नुसती हसते "वळणं" सुरू केलय थोड थोडं. पण चुटपुट तर लागतेच.

आपण आपल समजतो तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात अव्यवस्था निर्माण होणार आहे हे दिसतय... बघून तळमळ वाटते पण ती गरजेची नसते. हे वळत नाही. अस होतच माझही. पण काही प्रमाणात काही व्यक्तींबद्दल ते मला जमु लागलय अनुभवानी. कृष्णार्पणमस्तू म्हणत.

आता मी वळणं सुरू केलय हे हळूहळू समोरच्यालाच कृतीतून समजु लागलय. हे समजत ना तेव्हा बारीकसं हसु येतं. मी माझ मला बदलु शकते ईतरांना बदलणं अवघडच असतं पण ते करायलाच हव.

आपण आपल कळणं आणि वळणं करायच हे मी पण ठरवलय आपल्या रक्तदाब नियंत्रित करण्याची स्वतः ची जबाबदारी संपूर्णपणे आहे हे लक्षात ठेवायचं. बाकी कान्हाजी बघून घेतील.

जय श्रीकृष्ण 

###########################################################################

२१ डिसेंबर
वेळेच महत्व 

वेळेच महत्वं निसर्गाच्या सान्निध्यात समजतं. हे डोकावणार ज्वारीच कणीस आणि नुकतीच मोकळी झालेली गर्भारशी या दोघाना ते जास्त समजतं अस मला वाटतं. वेळ पाळण किंवा वेळेच महत्वं याबद्दलची जगात प्रत्येकाची व्याख्या निरनिराळी असणारच. जगतानाच्या परिस्थीचा पगडा त्यावर असतो. माझ्या पिढीला काॅलेजला गेल्यावर जुनी सायकल मिळाली तर आताच्या पिढीला लाळ गळलेली पुसायची अक्कल नुकतीच आलेली असलेल्या वयात नवी कोरी मिळाली. त्यामुळे वेळ, कष्ट, पैसा सगळ्याचच महत्व मला किंवा माझ्या पिढीला श्वासाईतकच आहे. या पिढीच मला ठाऊक नाही.
कोणाला दिलेली वेळ पाळणं, स्वयंपाकघरातली पण कामांची वेळ पण तितक्याच शिताफीने पाळण जेवढ सिनेमा बघायला पण दहा मिनिटे आधी पोचतो तितकीच महत्वाचं अस जगण मला आवडतं. दिलेल्या वेळी पोचायला उशीर होतोय समजल की मी अस्वस्थ होते. समोरच्यावर त्याची काही परिणाम नसतो, पाच दहा मिनिटे पुढ माग चालत अस हे जग. अगदी दिवसाच वाक्य दिवसालाच लिहून पाठवेन म्हणत ते मला पाठवायला जमल नाही तरी हळहळतं. तस होणार असेल तर आगाऊ सूचना आपोआपच दिली जाते कारण वेळेची पुरेपूर किंमत मी जाणली आहे.
वेळेच महत्व जगल्यामुळे मी व्यवस्थित नियोजनात जगते तशी छबी आपसूकच तयार झाली आहे. बाबांच्या हाताखाली वस्तू जागच्या जागी ठेवणं तसेच नीटनेटकेपणा जीवनात असणं हे ठासून भरलय मनावर. काय पगडा असेल ना जीवन जगताना कस जगाव याचा त्या पिढीचा. असा विचार आला की वाटत आपली पिढी हे पुढच्या पिढीच्या मनावर ठसवायला कमी पडली का? मी आणखी एक शिकलेय ज्यावेळी जिकडे असू तिकडंच होऊन ती वेळ भरभरून जगायची. आयुष्यात वेळ ऊर्फ क्षण एकदा आले की ते परत नसतील त्यामुळे ते छान जगायचे. जस श्वास घेतला की तो सोडावाच लागतो तोच परत येत नाही तस वेळ एकदा गेली की परत येत नसते.
जगुन घ्यायच बाबा आई बरोबर भरभरून ही वेळ परत येत नाही. बाबांबरोबरचे क्षण आता आठवण नावाखाली उघडावे लागतात. खुप काही ऊपभोगायच हक्क होता त्यांचा पण वेळ निघून गेली की हो.. कष्टातच जीवन गेलं, ईतरांसाठीच जगले ते फक्त . आयुष्यात आनंद ऊफभोगायची  स्वतःची वेळ आलीच नाही..वर जायचीच वेळ आली आधी... असो.
मुद्दा हा की जी वेळ आहे ती वेळ काढुन जगायची. ज्याच्या साठी जे जे करायचय ते ते वेळ काढुन करायचं. वेळ पाळायची स्वतः ची आणि दुसऱ्याचीही! वेळेच्या व्यवस्थापनेत जगायचं. स्वतः बरोबर, जोडीदाराबरोबर निवांत वेळ घालवायचा. जगात कमावण्यासाठीची चढाओढ कायमच असणार आहे पण एकमेकांना वेळ देऊन जगायचं. दोन पैसे कमी चालतील पण जोडीदार, मुलं, पालक आणि मित्र मैत्रिणींना वेळ द्यायचा. वेळेच महत्व वेळीच जाणायचं. बोलणारे बोलणारच "गावभर फिरते," "दर शनिवारी रविवारी बाहेरच असणार कि ही" काही टोमणे काही कौतुक असे अनंत अनुभव येणारच. जगरहाटीच ती.
वेळेच महत्व आत्ताच जाणुन जगु या... वेळ गेल्यावर जगण्या पेक्षा!
आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन हे वाचलत. मनापासून धन्यवाद.
जय श्रीकृष्ण 
© गौरी पाठक
########################################################################

२२ डिसेंबर
कोणालाही एक पत्र लिहा.

प्रिय रूपालीस,
खुप खुप आशिर्वाद! हो आशिर्वाद कारण मी मोठी आहे ना. तुझी मधेमधे आठवण येतच असते. मला हव ते पुस्तक ड्रेस तु बरोब्बर वेळेवर देतेस. मला जेव्हा जेव्हा ऊदास वाटत तेव्हा तुझ्या आयुष्यातली २३ वर्ष मी ऊजळणी करते. त्या दिवसांत तुझ्या भोवतीची ती मायेची माणसं त्यांनी तुझ्यावर केलेल निरपेक्ष निरागस प्रेम खुप मस्त आणि मौल्यवान आहे माझ्या दृष्टीनं.
"रूपाली" तुला तुझ्या नावानं हाक मारताना आज भरून येतय ग.. 
मला माझ्या आयुष्यात पण खुप छान माणसं, सुखं मिळाली, मिळत आहेतच पण तुझा आनंद तुझ सुख पाहताना अवतीभवती होती ती काही माणस आज माझ्या बरोबर नाहीत ग..
काय विचार आला असेल ना तुझा जन्म झाला तेव्हा तुझ्या वडलांच्या मनात आणि कस शोधल असेल ना नाव? "रुपाली".  तुला मी नेहमी बघते पण आज प्रथमचपत्र लिहतेय. खुप हलक वाटतय. तुझ्या नावान मिळणाऱ्या भेटवस्तूंच्या रूपात तू सतत आठवणीत राहशील याची खबरदारी मी घेणार आहेच.
बाकी तु कशी आहेस? पत्र लिहण्या इतक समाधान नाही, माझ आवडतं काम हे तुला तर ठाऊकच आहे.
आज तुला पत्र लिहण्याचा  विजयामुळे योग आला.
तु कशी होतीस? काय दंगे करायचीस मला माझ्या लेकाला सांगताना फार मजा येते. त्याच्यात मी तुझ्या सारखा हरहुन्नरीपणा, माया नेहमी बघते. तु फार गोड आहेस. भेटत रहा ग. वाढदिवस जवळ आलाच आहे. मला कोणत पुस्तक हवय ते शोधुन ठेवलय. दोन दिवस आधी कळवेनच. अश्शीच आहेस तश्शीच भेटत रहा.
आज माझं पत्र वाचून सगळी लहानपणची मजा आठवुन ओघळ धरणारेत गालावर... चल मोकळया होऊ. मस्त आनंदात राहायचं, खायच प्यायच, बाकी कान्हाजींच काम ते त्यांनी बघावं.
चल पळते. आय लव यू रूपाली.
तुझीच
सौ. गौरी पाठक (ऊर्फ कु. रूपाली घाणेकर)
########################################################################

२३ डिसेंबर
अंतः अस्ति प्रारंभ  (शेवट हीच सुरुवात असते.)

परिवर्तन हाच जीवनाचा नियम असाच अर्थ 'अंतः अस्ति प्रारंभ'चा असावा. प्रत्येक सजीव जगताना परिवर्तनाच्या पायऱ्या चढत जगात असतो. समजायला काय किंवा समजून घ्यायला काय हे जरा अवघड आहे. पण मजा येईल मला काय वाटतंय ते विचार करून नोंद तर केली जाईल.

परिवर्तन हे आपल्या आयुष्यात होतच राहतं आपण मूल असतो, मग शारीरिक बदल होत जात आपण वयात येतो नंतर होणारं परिवर्तन नवीन जन्माला घालायची क्षमता पुरवत. परिवर्तन होत म्हणून तर आपण आपल्या जीवनातले सगळे आनंद सुख उपभोगू शकतो. 

तसंच विचारातही परिवर्तन होतच, आधी एखादं म्हणणं जे आपलं असतं ते काही कालावधीनंतर वेगळं होऊ शकत. आलेल्या अनुभवांनीच ते कोणालाही ते समजेल. यात 'शेवटातून सुरुवात' कसं लागू पडतं तर आधीचे विचार मागे सारून नवीन सुरुवात करणं -  दुसरी बाजू अनुभवली नसेल तर आपण मत देणं योग्य नाही. मला आता अस वाटतय हे कबुल करू शकतो ही झाली नवीन सुरुवात.
एक बाई सहज बोल बोलता मला म्हटली परवाच "समजेल वेळ आली की ती प्रत्येकाची येते" आवडल तीच वाक्यं . अर्थात ते तेव्हा मला तिचा टोमणा होतं. पण हरकत नाही धडधडीत बोलायला हिम्मत लागते, नाही जमत एखाद्याला. 
तर मुद्दा हा कि मी जस भोगलं तस सांगून समजणार नाही पण वेळ आली कि समजेल अशा अर्थाचं तीच हे‌ वाक्य ऐकून मी माझ्या विचारातील परिवर्तन तात्काळ अनुभवलं, जेव्हा मी मनात विचार केला कि अशी वेळ आल्यावर समजावं म्हणून मी कधीच कोणाला नकारात्मक म्हणणार नाही. समोरच्या कोणालाही अशी वेळ येऊ नये पण वेळीच हे समजावं हीच प्रांजळ इच्छा मी करेन. अंतः अस्ति प्रारंभ हे यात मी कसं लागू करू शकते तर कोणीही नकारात्मक विचार करून भोग तू लवकरच असा जरी म्हंटल तरी हसून सोडून द्यायचं. मी इथून पुढं जगताना हा नकारात्मक विचारांंचा शेवट आणि मी कसं वागायचं या सकारात्मक विचाराची सुरुवात होती. हि उदाहरण झाली विचारांच्या परिवर्तनाची जी अंतः अस्ति प्रारंभ हेच दर्शवतात.

जेव्हा वयाचा एक टप्पा पूर्ण करून मी पुढे जाणार आहे तेव्हा नवीन पिढीच्या जीवन जगण्याच्या सवयी, क्षमता, निर्णय यांच्याशी मला मिळत जुळत जगाव लागणार आहे. अंतः अस्ति प्रारंभ उर्फ परिवर्तन जे माझ्यात होऊ घालेल, त्यात मी आणि माझी सासू जसं आणि जे वागले तेच पुढच्या सुनेकसडुन अपेक्षा करत न जगणं. हि असेल सुरुवात. हे असेल जीवनातल परिवर्तन.

मी माझी तत्व पाळत जगताना त्यांच्या निर्णयांना धक्का ना लागू देणं मगच होईल ना नवी जगण्याची सुरुवात. या पिढीशी सुरवाती पासून योग्य संवाद ठेवत जगलं कि तो आरंभ पण मस्त होईल कि. हे उदाहरण झालं वयात होणाऱ्या परिवर्तनाचं.  वयाच्या ठराविक वळणावर ठराविक गोष्टीत अडकुन न राहता जगायच.
उदाहरणार्थ आजकाल दोन तीन वर्षे लग्न झालेल्या जोडप्यांना आवडत नाही विचारलेलं मुलांचा विचार काय केला आहे का?  मग नाहीच विचारायच. घालतील जन्माला तेव्हा सांगतीलच की / समजेलच.  त्यामागचे फायदे तोटे समजण्याच वय आहे त्यांच.
अंत: अस्ति प्रारंभ यात लागु करायच ते अस की तुमच मुलं तुमचा निर्णय. आमच्या क्षमतेत असताना मदत लागली तर करुच अथवा यावर तुम्ही विचार केला असेलच.
ईथुन पुढ आजी आजोबा वयात जगणार्या आई वडिलांच्या सुखी जीवनाची ही असेल सुरूवात " अंतः अस्ति प्रारंभ!
अशाप्रकारे नकारात्मक विचारांचा शेवट झाल्यावर सकारात्मकतेने जगण्याची सुरूवात होते. अंतः अस्ति प्रारंभ. पुढच्या पिढीत परिवर्तित होताना आपण आपली पुढची पिढी छान आहे आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे वागुन जगणं म्हणजे झाली की नवीन सुरुवात.अंतः अस्ति प्रारंभ! काम क्रोध मोह मद मत्सर या  षडरीपूंना मागे सारत परमेश्वरीय भक्तीत लीन होण जमवायच ही झाली मानव न राहता मानवातील परमेश्वर बनण्याची सुरूवात. अंतः अस्ति प्रारंभ!
विजया ताईच हे वाक्य मला फार आवडलं - कोणत्याही गोष्टीचा शेवट स्वीकारून पहा नव्या वाटेवर विश्वास भेटेल नवा ..
जय श्रीकृष्ण
###############################################################################
२४ डिसेंबर 
लोक काय म्हणतील ?
हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो, त्यामुळे बरेचदा आपण मनाविरुद्ध निर्णय घेतो. समाजात आपली प्रतिमा योग्य असावी हा विचार सर्वानाच असतो. आपल्या संस्कारातच ते लिखित आहे, शिकवणच तशी शिकलोय आपण, चूक काही नाही. 
कारण माझी समाजातली प्रतिमा "योग्य व्यक्ती" अशी जी मी खरोखर आहे म्हणून आहे म्हणून मला ती महत्वाची आहे. हेच ऊजळ माथ्यान जगणं हीच खरी संपत्ती हे पण मला मान्य आहे.
काही वेळा लोक काय म्हणतील असा विचार न करता जगावं, मन मोकळं होतं. माझं झालय. त्यामुळे उलट मी जशी आहे तशी जगते, १००% नाही पण २०%  मी हे जगतेच आहे.
या पडणार्या प्रश्ना बद्दल खूप खूप उदाहरण आहेत त्यावर तरुन जाणारे पण मी बघितलेत. उदाहरणार्थ : घरातील / आपले वरिष्ठ अशा कोणाचंही आजारपण काढायची जबादारी कर्माच फळ म्हणायचं पण त्यात कसं वागायचं यावर जगाचे ताशेरे असणार. त्या व्यक्तीसाठी काय योग्य तो निर्णय तिचं करणारे घेताना हा विचार केलाच जातो "लोक काय म्हणतील?" पण ते कर्म मिळून भोगू म्हणणारे अजिबात जगात नसणार. त्यांनी 
त्या व्यक्तीच काय केल ऊर्फ कसे वागले यावर जग ताशेरे ओढणार. अर्थात काही अपवाद असणारच. तरी या वर लागेल तर तिच्या/ त्याच्या संपत्तावर उर्फ तिच्या चांगल्या फळावर हक्क मात्र असणार. यावर अशा व्यक्तीच करणारीं तिला दोन दिवस डे केअर ला ठेवून माहेरी जाऊन येऊ असा विचार ती करू शकत नाही. का? तर लोक काय म्हणतील?
यावर जग गेलं चुलीत मी माझे घरचे त्या व्यक्तीचं काय करायचं ते बघू. ही आमची जबाबदारी आहे ती कशी पार पाडायची आम्ही ठरवु. असा विचार करून बिनधास्त दोन दिवस डे केअर ला त्या व्यक्तीला  पाठवून माहेरपण अनुभवून परत त्यांना घरी घेऊन सुखानं जगणारी पण आहेत. हे नक्कीच जमायला हवं.
त्यांनी केलय आधी सगळ्यांचं असा विचार करत मोठी असूनही काही जण त्या केलेल्यांच्या सध्याच्या चुकांवर बोलत नाहीत. का? तर लोक काय म्हणतील? माझी प्रतिमा जगासमोर नीट हवी ना. म्हटल तर चुक म्हटल तर बरोबर!
अश्या अनेक  लोकांना प्रतिमा जपायच्या नादात पिचलेल्या मनाचं धुसफुस अनुभवताना मी पाहिलंय, काही वेळा तर मीही अशीच जगले आहे. हल्ली मी फार विचार करत नाही कारण काही लोक सगळ्यात चूकच काढणारे असतात तर काहींना सुरळीत चालू असलेलं बघवत नाही. माझ्यामते चूक त्यांची नाही त्यांच्या परिथितीची आहे. यात पण अपवाद असतातच, चांगला विचार करून साथ देणारेही खुप असतात.
हळूहळू जग बदलतंय, पिढी बदलतेय यात "लोक काय म्हणतील?" चा विचार करणारे खूप खूप कमी असतील. असच चित्र दिसतंय, खर सांगू का ? कधी कधी ते खूप टोकाचं पण असेल अस पण चित्र असू शकेल.
थोडक्यात काय तर लोक काय म्हणतील ? हा विचार करणारी कदाचित माझी शेवटची पिढीचं असेल. त्यामुळे जोडीदाराशिवाय कोणाला काय वाटेल याचा विचार न करता योग्य प्रतिमेत राहून हव तस जगायचं. कर्तव्यात कसूरही नाही ठेवायची आणि आनंदाच्या व्याख्येत लोक काय म्हणतील ? अश्या विचारला टांग मारायची. हेच ऊत्तम.
योग्य व्यक्ती म्हणून जगातानाच्या व्याख्येत ठोकुन माणसान बसाव यासाठी पूर्वजांनी  लोकांना काय वाटेल विचार करायची आदरयुक्त भिती घातलेली असावी. ती कशी वापरायची हे ज्याच तो जाणे.
गंमत बघा.आई मुलाला म्हणते, "अरे खोली आवर की, ती नीट ठेवावी. कोणी आल अचानक तर ?लोक काय म्हणतील?" आहेत की नाही एकाच वाक्याला ऊर्फ प्रश्नाला कंगोरे.
यामुळे मी अशा मतावर पोचली आहे की परिस्थितीवरच ठरवायचं. माझ तर हेच ठाम मत आहे पण यावर लोक काय म्हणतील? कोण जाणे....
हा! हा! हा!
जय श्रीकृष्ण 
#################################################################################
२५ डिसेंबर 
संकल्प आणि संकल्प पूर्ती
संकल्प से सिद्धी हे बी व्ही शिवानी या सुंदर मनाच्या साध्वीचं वाक्यच मला पटकन डोळ्यासमोर आलं. संकल्प कोणता करावा हे आधी समजाव लागत. तस मनापासून वाटाव लागतं, इच्छा असणं आणि ती करण्यासाठी कर्म केल जाण यात मोठी दरी आहे.
मला सतत संकल्पना आखण त्या सत्त्यात आणण आवडत आलय. त्यामुळे मी माझी बुद्धी सक्रिय सुरू ठेऊ शकले आहे. केलेल्या संकल्पनेच्या आधारे समोरच्याला दिलेल सरप्राइज पाहून झालेला आनंद टिपला आहे. तीसेक संकल्पना सत्यात आणलेली शेवटी रोजनिशी वर्क शॉप मधे वहीत नोंदच मी केलीय.
संकल्प करत राहून ध्यासानं पूर्ती करणं म्हणजे जीवनात, विचारात, वागण्यात सुसूत्रता आणल्यासारख आहे अस मला वाटतं.
नवीन सुरूवात केलेल्या आयुष्यातला प्रवास त्यातलं प्रेम, त्यात अनुभवलेल्या आठवणी, स्वप्न, बदल एकांतात आपण कसे आहोत ते स्वीकारण किंवा नकारणं कसे बरोबर ते चुकलेल्या वाटा आठवुन समजतं. तसच संकल्पांमुळे अडचणींवर मात करून कळतय पण वळत नाही अशा गोष्टींचा लेखाजोखा मनाला पत्र पाठवुन वेळेच महत्व पण समजतं. संकल्प पूर्तीमुळे लोक काय म्हणतील याचा विचार न करता अंत अस्ति प्रारंभ यावर विश्वास बसून आपणच आपल्याला कसे आहोत यावर ठाम राहून संकल्प पूर्तीचा आनंद घेता येतो आणि सतत संकल्प घेत त्याच्या पूर्ततेसाठीच कार्यान्वित राहण्यात सुख असत हे समजतं.
हीच माझ्या या २१ दिवसांच्या लेखन संकल्पाची पूर्तता म्हणेन...
लवकरच नवीन संकल्पाच्या विचारातली तुमच्यातलीच मी...
गौरी पाठक 
जय श्रीकृष्ण 
#####
प्रिय विजया,
मनापासून धन्यवाद! मी मला सुचत तस शब्द नोंद करते ही सवय अनेक वर्षे आहे. मनातल माझ्या मी सुटीच बघुन एकदम वहित ऊतरवते अशी सवय होती. रोजच रोज मनातल लिहाव ही ईच्छा असतानाच तुझ रोजनिशी च वर्क शॉप कानावर आलं. मला सवय करायचीच होती. ती रोजच्या रोज न दोन तीन महिने झाले.
नंतर ते आठवड्यात एकदा वर आलं. ४ तारखेला दररोज एक शब्द वाक्य टास्क असेल वाचल आणि तुझा मेसेज पण आला.  सीधी ऊंगलीसे घी नही निकला तो ऊंगली टेढी करो ते तु काम माझ्यासाठी केलस अस मी म्हणैन. रोज जेव्हा फोन बघते शब्द समजतो तेव्हा पुढच्या तासात डोक घुसळतं आणि तारे जमिनपर मधे जशी अक्षरं फळ्यावर गडबड करतात तशी डोक्यात गडबड ऊडते आणि अनुभवलेल पानावर येतं. तू खरच हाडाची शिक्षिका आहेस विजया.
माझ्या जवळपास ७०-७५ ललित लेखात तुझ्या मुळे १५ ची भर पडली. मधेअधे एखाद दुसरा दिवस नसले तरी लिहीती राहीनच... आणखी काही कमिटमेंट पण आहेत तरी मी असेनच. नुसती ईच्छा असण पुरेस नसत कर्म महत्वाच हे मला जबरदस्त पटलय.  या तुझ्या माझ्या भेटीत कान्हाजींचीच काहीतरी ईच्छा लपलेली असेल.. बघु..

शुभं भवतु!
तुझीच
सौ. गौरी पाठक
१९.१२.२५
जय श्रीकृष्ण
########################################################
सर्व लेखन न विचारता कुठेही पाठवु नये. © गौरी पाठक

Tuesday, 2 December 2025

भावी मातृत्वाचा ऱ्हास

"मातृत्व" किती अनमोल शब्द आणि त्याचा अनुभव तर अवर्णनीयच! आणि तो लाभण नशिबात असण मोलाची गोष्ट.

आजवरच्या पिढीला आई होण हे स्त्री जन्माचा गाभा वाटायच. लग्न काय फक्त मुल जन्माला घालायला असतात असे विचार काही प्रमाणात असले तरी तो अमृतानुभव घ्यायची लालसा नक्कीच असायची. योगायोगाने आजवरच्या पिढीतील स्त्रीला नैसर्गिक मातृत्वाच्या योग्य वयापर्यंत शिक्षण आटोपून पायावर ऊभ राहण्यासाठी शैक्षणिक संधी होती. तीला पण संघर्ष हा होताच पण ती नशिबवान होती. तीच्या त्या योग्य वयाच्या वळणावर ती खमकी ऊभी होती, तीला भविष्याची भिती होती पण धास्ती नव्हती. ती तो अमृतानुभव घेण्यासाठी आतुर होती. तीला आपण आता तो घेऊ यासाठी तयार होताना पुढ कस होईल अशी शंका नव्हती. यासाठी कदाचित तीची पायाखालची जमीन विश्वास, भावना, परिस्थिती, आपुलकी यासर्व तत्वांनी भक्कम होती.

आजवरच्या पिढीतील स्त्री निसर्गाच्या नियमानुसार योग्य वयात या गोड भावना अनुभवण्यास सज्ज होती शारिरिक आणि मानसिक सुद्धा!  ती वयाच्या २५ -२८ मधे हा सुखद अनुभव घेऊन सक्षम मातृत्व अनुभवायला सामोरी जात होती. वयाच्या या कालावधीत शरीरात मातृत्वाचा अनुभव घेण्यासाठी पाझरणाऱ्या संप्रेरकांचा फायदा ही तीला मिळत असावा. म्हणून तर ते नैसर्गिक मातृत्वाचं योग्य वय म्हटल जात असावं.

आजकाल हा वयोगट २८-३२ झाला आहे, जो खरतर निसर्गाच्या नियमानुसार ऊशिराचा असावा. या वयोगटातील स्त्री - शिक्षण कालावधी जास्त असल्याने किंवा कामाच्या बैठ्या शैलीचा नकळत झालेल्या परिणामाने किंवा आजुबाजुच्या सामाजिक आवरणात जगताना भविष्याची चिंता वाढल्याने नकळतच निसर्गाच्या मातृत्वाच्या योग्य वयोगटाच्या पुढे गेली आहे अस म्हणाव लागेल.

त्यामुळे या पिढीला तो मातृत्वाचा सुखद अनुभव धस्का वाटु लागलेला जाणवतो. त्यामागचा आनंद न दिसता यांना त्रास काय होतो हेच पाहण्याची वृत्ती जास्त दिसते. कदाचित ते वाटण त्या वयाचा किंवा त्या वयात पाझरणाऱ्या संप्रेरकांचा प्रतिसाद असेल असही म्हणू शकतो. यामुळेच का कोण जाणे या पिढीला असंतुलन असलेली पाळी ऊर्फ पिसीओडी सारखे प्रश्न ऊद्भवत असावेत. यात वयाच्या तीशीतच पाळी जाणं, वयाच्या बत्तीशीत गर्भधारणा न होणं अशा आणि आणखी काही शारीरिक अव्यवस्था निर्माण होताना अथवा सद्ध्या घडताना दिसत आहे. अर्थात यात सगळ्याला अपवाद असतीलच.

लग्नाच निसर्गाच्या नियमानुसार वय पुढे जाणं, ज्या भावना ज्या वयात अनुभवायला हव्यात त्या वयाच्या आधीच सहज दूरदर्शन द्वारा बघण्यात येणं, त्या मांगल्याच्या दैवी देणगीचा जस्ट कॅज्युअल विचार सरणीत सर्रास वापर होणं, भावी आयुष्य सुखी असेल ना? यावर जगताना मनात येणारी शंका, जीवनसाथी निवडतानाची हाच तो कसा ओळखायचा यासाठीच मानसिक द्वंव अशामुळे काही वेळा काही स्त्रीया काय फरक पडतो स्वतः च मुल नाही तर कोण त्रास सहन करेल दत्तक घ्यायच आणि मोकळ व्हायचं या विचाराच्या आढळतात (यात असे अनंत मार्ग अवलंबणारा गटही नुकताच समजलाय) तर काही मातृत्वाचा अनुभव घ्यायला मिळावा म्हणून धडपडणारी जोडपी दिसतात. निसर्गाच्या नियमानुसार जगायच तर आजुबाजुला असणारी सर्व प्रकारची  परिस्थिती पण तशी हवी.

पण अस सद्ध्या आढळत नाही त्यामुळे फार मोलाची मातृत्वाची अनुभूती घेण्यासाठी जन्म मिळालेली स्त्री त्या आनंदापासून दुरावताना दिसतेय.

ज्यांना अनुभव हवाय पण योग येत नाही आणि ज्यांना योग्य वय आहे तो अनुभव घेण्यासाठी त्यांना ती वेळ योग्य वाटत नाही अस काहीस दिसतं.

चुटपुट लागते जेव्हा ऐकायला मिळतं एका २६ वयाच्या मुलीकडून की पिसीओडीमुळे पाळी ३० वयात गेली तर गेली दत्तक घ्यायच त्यात काय ऊलट लेबर पेनचा त्रासातुन सुटका. प्रेमान काय दत्तक मुलाच पण करू शकतो स्वतः चच कशाला हवय. (अहं अस समजु नका की मी तीच मन समजुन घेत नाहीये. अशी वेळ आल्यावर असा विचार येण समजु शकतो. पण अशी वेळ आलेली नसतानाच तीच हे वक्तव्य आहे.) कित्ती मौल्यवान अनुभूतीचा अनुभव असतो याची पुसटशी कल्पनाही तीला नव्हती अस म्हणाव पण नाही त्या अनुभूतीचा आनंद घेतलेली स्त्री आजुबाजुला पण तीन बघितलेली नाही. दत्तक घेऊन समाजाच भान राखण वेगळच ती गोष्ट करणारे ग्रेटच म्हणावे पण मातृत्वाचा अनुभव हा त्रास वाटणं किंवा त्यामागची अमृतानुभूती घ्यायची लालसाच न दिसणं हे पचनी पडण अशक्य आहे.
थोडक्यात जावे त्यांच्या वंशा म्हणायच आणि सोडून द्यायच. शेवटी प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक विचार आणि निर्णय. एकमेकांच्या विचारांना निर्णयाला मान दिला पाहिजेच पण खंत किंवा चुटपुट वाटली तर ती व्यक्त पण केली पाहिजेच.

हे परमेश्वरा येऊ घातलेल्या पिढीतील प्रत्येक स्त्रीला निसर्गाच्या नियमानुसार योग्य वयात मातृत्वाचा अमृतानुभव लाभावा यासाठी त्यांच्यात विचारमंथन होऊन तस वागण्याची बुद्धी त्यांना लाभावी अशासाठी सूत्रं हलव रे बाबा भगवंता, भावी मातृत्वाचा ऱ्हास होऊ देऊ नकोस...
जय श्रीकृष्ण 
गौरी पाठक 
०३.१२.२५
आपल्याकडे जे आहे त्याची कदर नसणं हाच तो ऱ्हास म्हणावा लागेल.

Sunday, 9 November 2025

आम्ही ज्या पिढीतील आहोत तीचा आम्हाला अभिमान आहे

कोणत्याही पिढीला दोष देण आणि ते सविस्तर सांगण, त्यापेक्षा आपण काय आहोत हे सांगण त्याचा अभिमान बाळगण जास्त योग्य वाटल कारण प्रत्येक पिढीची दुसरी बाजु असेलही काही तर? आपण ती पिढी अनुभवली नाही तर तीच्या वर बोट का दाखवु म्हणून हे लिहलं.

तसच 
सोडुन देण आपल्या पिढीला लवकर जमत नाही पुढची पिढी पटकन सोडून देते.

आपल्या पिढीला नातेवाईकांना घेऊन चालायला आवडत कारण भावंड ढिगभर असायचो तर या पिढीला दोस्त जास्त जवळचे वाटतात कारण एकटेच किंवा जास्तीत जास्त दोन असेच परिवार यांना ठाऊक.

आपली पिढी सायकल मिळाली तेव्हा काॅलेजात होती ती घेतानाची घरच्यांची ओढाताण बघण्याची समजण्याची वय आपली होती. या पिढीला सायकल न कळत्या वयात मिळाली कष्ट कसले समजतील.

आपल्या पिढीला संघर्ष मुसंडी मारण्याचा होता तर या पिढीला स्थैर्यासाठी संघर्ष आहे.

आपल्या पिढीला माययेची आजी इन हाऊस लाभली मायेची ऊब आपण अनुभवली तर ही पिढी पाळणाघरात जास्त वाढली ऊब कशी समजणार त्यांना.

आपली पिढी सुबत्ता असलेलं लहानपण अनुभवली त्यात एकोप्यावर फौकस होता तर ही पिढी सुबत्तेत जगलीच पण स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणुनच जगली .

आपली पिढी काकुच्या माहेरी पण पोटभर खाऊन लोळून सुख ऊपभोगलेली तर ही पिढी ठरवुन केलेल्या एकत्रीत सहवासातच जगली.

आपली पिढी संस्कृतीच्या झालरीतच वाढली तीच महत्व अनुभवत जगणारी आधीची पिढी तीला लाभली तर या पिढीला स्वतंत्र जगण्यातच ऊभ असल्याने पटल तर करणं या तत्वावर जगतेय.

म्हणून खुप गोष्टी अनुभवायला न मिळाल्याने ती कमनशिबी म्हणण्यापेक्षा आमची पिढी नशिबवान म्हणण जास्त योग्य ठरेल अस वाटलं.

तस बघितलं तर कोणतीच पिढी कमनशिबी नाही पण तरी आम्ही/ आपण या पिढीतले आहोत याबद्दल परमेश्वराचे आभार आणि मगच अभिमान आहे अस म्हणेन.

सौ. गौरी पाठक 
१०.११.२५

Wednesday, 29 October 2025

हंपी - विजयनगरच्या वैभवाची सफर

हंपी -विजयनगरच्या वैभवाची सफर
कर्नाटकातलं हंपी शहर ही विजयनगर साम्राज्याची राजधानी. वैभवशाली इतिहास दाखवणारं लहानस गावच पण ते आत्ताच बरका! सहज रोड ट्रीप करू विषय झालेला मुलाची ईच्छा होती आणि लगेचच मला हंपी आठवलं ते इतिहास प्रेमापोटीच. मला राजा कृष्णदेवराय, विजयनगर साम्राज्य, पंडित तेनालीरामा यासंदर्भात हंपी आहे हे ठाऊक होतच, पण रामायणातली किश्कींधा नगरी हीच हे मात्र ठाऊक नव्हतं. मग काय दुधात साखरच, पर्वणीच होती मला.
हंपीची बरीच वास्तू विश्वधरोहर जागतिक नोंदीत आहे.
जस जस हंपीला जायच ठरल तस तस मी जास्त शोध घेऊ लागले. जो अंदाज मनात  बांधला होता त्याच्या कैकपटीन हंपीला भव्य दिसलं. भारताचा गौरवशाली इतिहास - परंपरा पौराणिक महत्त्व जपलेली ही वैभवशाली भूमी. १४-१६ शतकातलं हे साम्राज्य किती समृद्ध असेल याचा अंदाज प्रत्यक्ष येतो. कुशल राज्यशासन, कुशल कारागिरी, कुशल सैन्यदल असलेले चालुक्य वंश, होयसाल‌ वंश, यादव वंश, काम्पिनी वंश, तुलवा वंश यांच्या उत्कृष्ट सर्वगुणसंपन्नतेचा अंदाज ईकडे आल्यावर आपण जे काही पाहतो त्यानंतरच येतो. हरिहर पहिला आणि बुक्का पहिला या सेनापतींचा ऊल्लेख या साम्राज्याच्या सुरवातीचा म्हणून ऐकण्यात आला. एकंदरच विजयनगरची राजधानी असणारी ही भव्य वास्तू पाहुन अद्भुत, अहाहा! एक नंबर म्हणत आपण तोंडात बोट घालतच फिरतो. चेष्टा नाही खरोखरच, त्याकाळच्या राजांनी आपली संस्कृती पुढच्या पिढीला कळावी ती पोचावी यासाठी खुप दूरदृष्टीनं हे शहर अलंकृत केलेल आढळतं. कित्येक लाख सैन्याचं नेतृत्व करणारा, सुखसमृद्धीन शासन करणारा राजा, ज्याला परमुलखी राजे घाबरत असा उल्लेख ऐकून वाटतं आपले पूर्वज किती महान होते. आता आहे तो ठेवा परमेश्वराची कृपा राहो आणि जपला जाण्याची बुद्धी लाभो.
विजयनगरच्या राजधानीला सात घेरे/ सर्कल होते, ते परिपूर्ण आखणी करून होते. पहिला घेरा राजा राणी महाल, विदेशी व्यापारी अतिथी गृह, दसरा सणाला आजुबाजुच्या राजांना बोलवत ते, त्यांच्या राण्यांना न्हाण जागा ऊर्फ क्विनस बाथ, रानीयोंका समर पॅलेस नंतर पुढच्या सर्जकलमधे जवळचे सहाय्यक मंत्री सेनापती तेनाली रामांसारखे अष्टदिग्गज,  त्यांच्यासाठीचा बाजार अशी सात सर्कल. भर रस्त्यावर हिरे माणकं सोन बाजार भरत असे ईतकी सुबत्ता आणि सुरक्षितता.
याकालावधीत राजपर्यत यायला सात वेळा चेक पोस्ट होती कडक सुरक्षा. प्रत्येक वास्तूच्या ईमारतीचा प्रत्येक दगड कोरीव शिल्प आणि घडलेल्या कथा दर्शवतात. सगळच हंपी कस अलौकिक अद्वितीय आणि अद्भुत भारावून टाकणारं आहे. आपली संस्कृती आपण पाहुन येण फार फार महत्त्वाच आहे.
मौर्य भुवनेश्वरी रीसाॅर्ट हंपी.
भीम द्वार : पांडव वनवासात असताना ईकडे राहिले अशा खुणा आहेत पण ठोस ऊल्लेख फारसा पुस्तकात नाही. भीमाची प्रतिमा दगडात कोरलेली आहे. हातात सौंगंधीका नावाच पुष्प आहे. भीमाला द्रौपदीनं फुल आणुन मागितल ती कथा घडलेली जागा. भीमानी दु:शासनाचा वध केला ती गोष्ट ईकडे दगडात कोरली आहे. भीमगर्वहरण पण याच परिसरातल असाव अस म्हटल जातं. याचा लिखीत पुरावा नाही पण अवशेष आढळतात.
विजया विठ्ठल देऊळ, दगडी राज तुला आणि रथ
राजमार्गावर सगळी ठिकाणे आहेत जो रस्ता आता आपण वापरतो तोच राजमार्ग होता. मात्र जरा लांब तुंगभद्रा नदीकाठी हे विजया विठ्ठलाच देऊळ आहे. जायला इलेक्ट्रिक गाडी आहे एक दिड किलोमीटर अंतर आहे आपण चालत पण जाऊ शकतो.
स्वयंपाकघर, कल्याण मंडप - लग्न होत होती तो, कलासादरीकरण हाॅल, घोडे तळ अशा सहा सात वास्तू या विजया विठ्ठलाच्या देवळाभोवती आहेत.  दोन राण्यांनी दोन द्वार बांधली. तसेच मुख्य दाराची कथा अशी आहे. सोन्याचा कळस होता, तो तोफेन ऊडवला आता भगदाड आहे. काही भाग नंतर पुरातत्वभागान नीट केलाय, तर काही काम सुरू आहे. या सातही वास्तू कोरीव कामाने सजवलेल्या पाहुन शिल्पी लोकांच्या कलेचा आवाका समजतो.  तो सांगुन वाचुन झेपणारा अजिबात नाही बघावाच लागेल.
पुर्ण देवळाची लहान प्रतिकृती आधी करून ती ओके अस राजाकडून आल मगच ती कोरली जात होती. आधीची ब्यू प्रिंटची ही संकल्पना असावी.
या फोटो मधे तळाला डावीकडे ती कोरली आहे तशीच मोठी प्रतिकृती तयार केली.
प्रत्येक वंशाने यात भर घातलेली दिसते. मुघल आक्रमणांना झेलत ही वास्तू ऊभी आहे ती संस्कृती पुढे समजावी म्हणून. या सर्व वास्तूला नमस्कार...
गर्भगृहाबाहेरून काढलेला फोटो. वरचा लाकडी भाग जळला आहे.
(कोणत्या आवाजाचा कोणता खांब ओळखायला त्यावर वाद्य कोरलय.)
हंपीमधल विजया विठ्ठलाच्या देवळात आधी पंढरपूरचे भगवान विठ्ठल आरूढ होते अस समजलं.  मुघल हल्ल्यापासून बचावासाठी फक्त विठ्ठल मूर्ती रीतसर पत्र पाठवुन ईकडे आणली गेली. ज्यात सगळ सुरळीत झाल की परत नेऊ असा ऊल्लेख होता. ती जवळजवळ ७६ वर्ष कर्नाटक हंपीमधे होती. एवढे वर्ष तीची ईकडेच पुजा झाली. राजा कृष्णदेव राजाच्या अखत्यारीत साम्राज्य असताना तीची परत महाराष्ट्रात बोलवली गेली. तस परत हवी अस ताम्रपत्र घेऊन मंडळी आली. पूर्वजांनी दिलेल वचन पाळण क्रमप्राप्त असे जगणारी ही पिढी तयार झाली खरी पण जनमानस तयार नव्हतं. राजा कृष्णदेवराय बालाजींना मानत होते, त्यांनी सुबक नवीन मूर्ती बनवली जी पंढरपूर च्या विठोबा सारखीच होती फक्त कमरेवरचा एक हात ऊघडा खालच्या भागाच्या दिशेनं होता. ती मूर्ती विजया विठ्ठलाची. अशा प्रकारे पंढरपूर मधे विठ्ठल आले आणि विजया विठ्ठलाच्या नावान ही मूर्ती हंपीमधे राहिली. राजा कृष्णदेवरायांच्या माघारी परकीय आक्रमणे झाली त्यात हे खंडीत झाल अस समजलं. विजया विठ्ठलाच्या मूर्तीला वाचवण्यासाठी ४० ब्राह्मण मारले गेले. यामुळे विजया विठ्ठलाच्या देवळात दोन जागा / दोन देवपाट आहेत. सद्ध्या गर्भगृहात मूर्ती नाही. २०२४ साली पंढरपूर ला रीनोवेशनच्या वेळी काही मूर्त्या सापडल्या त्या इकडच्या आहेत अस म्हटल जात यावर शोध सुरू आहे.
ती मूर्ती ही...
चिकार मोठा परिसर आहे.
दगडी रथ हा आपल्या ५० रूपयाच्या नोटेवरील आहे. उत्सुकता ही होती की रथारूढ कोण आहे तर गरूड आहे. समोर विष्णूच देऊळ आहे. दगडी रथ आणि गर्भगृह यांच्या मधे महा मंडप आहे ज्यात म्युझिकल पिलर आहेत. आतत जाण्यास हात लावण्यास मनाई केली आहे. देवळाच्या प्रदक्षिणेचा भूमिगत मार्ग आहे. तो पाहायला मिळतो.
देवळाच्या प्रवेशद्वारावर विजयनगरच्या साम्राज्याची छबी कोरली आहे. ती सविस्तर पाहुच..
या स्तंभाला याली स्तंभ म्हणतात. एका लेखकानी विजयनगरच वर्णन  केल ते या शिल्पात आहे. सात प्राणी एकात करून सात गुण राजाचे त्याच्या सैन्याचे यात अधोरेखित केले आहेत. शरीर सुंदर घोड्यासारखे आहे विजयनगरचं सैन्य चपळ आहे.
त्याचे डोके सिंहाचे आहे तो शाही दिमाखदार आहे. त्याचे दात हत्तीच्या दातांचे आहेत. पुढचे पाय ऊधळत आहेत विजयनगर च सैन्य कधीही तत्पर आहे. कान सश्यासारखे सावध आहेत विजयनगरच गुप्तहेर खातं असच आहे. यातला स्वार यावाहनाचे डोळे प्रत्येक वैशिष्ट्य पूर्ण आहे. तेव्हाच गाइडकडून सविस्तर नोंद करायला हवी. या याली खांबात नकारात्मकता देवळापासुन दूर ठेवण्याची क्षमता आहे अस म्हटलं जातं. ईकडे दगडी शिल्पात केळफुल कोरलेल जास्त दिसतं ते या भागाच चिन्ह आहे. या चिन्हावरून तो भाग कोणाचा ते ओळखल जातं.
दगडी राज तुला किंगस बॅलन्स नावान आहे.  ईकडे राजा कृष्णदेवराय व दोन राण्यांची विविध गोष्टींनी तुला होत असे. यावर कोरलेले संदेश पण सापडतात.
क्विन्स बाथ राण्यांचं न्हाणीघर सौंदर्य प्रसादन वापरून आवरून जाण्याची जागा. तलाव त्यावर छतासाठी खड्डे ऊन्हापासुन सौरक्षणासाठी, चारही बाजुला गायक वादकांची बसायची जागा नियोजनबद्ध पद्धतीने आहे. २०-२२ लहान डोम आहेत ज्यावर एकेक दागिना कोरला आहे. आतून वर जायला जीना आहे सूर्यदर्शनासाठी. तो बंद आहे.
आता खाली आहे तो परदेशी अतिथींचा तलाव
ईतकी सुंदर रचना आहे की परदेशींच्या वापरातल्या सोईंची पण दखल घेतलेली दिसते.
राॅयल पॅलेस. तळमजला फक्त शिल्लक आहे. चौकोन पाहुन भव्यतेचा अंदाज येतो. राजपरिवारासाठी बाग, राजाला भेटण्याचा चौथरा, राजाची येण्याची जागा, राजाची दर्शन घेऊन झाल्यावर बसायची जागा सगळ सगळ पाहता येतं.
कृष्ण देवराय पॅलेस. यात राजवाडा आहेच पण टप्प्यात आहे चढत्या क्रमानं. राजाला भेटायला डायरेक्ट मनाई किंवा सुरक्षेसाठीची सोय. राजाच्या वेळची लेखनीक जागा, सर्वर रूम, भूमिगत खलबतखाना अबब! काय अवाक् करणारं बांधकाम आहे. यात कोण कोण असण अपेक्षित आहे त्यांचे त्यांचे शिल्प कोरलेले आहेत.
हजार रामा देऊळ हे रामाच देऊळ मुख्यत्वे शाही घरण्यातील लोकांसाठी बनवल होतं. यात हजार दगडांवर पूर्ण रामायण कथा स्वरुपात कोरलेल आहे. विशेष म्हणजे विशिष्ट प्रकारच्या गरबाच्या प्रतिकृती आढळल्या.
ईकडे पोचलो आणि जोरात पाउस आला. जरा भिजलो घुटमळलो. वाली चांगला होता की वाईट यावरची शाळा घेतली गाईड राघवेंद्र जींनी. वाली खुप चांगला होता पण अहंकारामुळे आणि शापामुळे अपयशी ठरला. मानवी रूपात असल्याने श्रीरामाच्या हातुन विनाकारण एक पाप घडलं‌ तस पाहता वालीस मुक्ती मिळाली पण पुण्य जास्त असल्याने पुढच्या जन्मी भगवंतास निजधामास कारण होण नशीबी आलं.आणखी गोष्ट समजली ती शांता जी श्रीरामांची बहिण होती तीच्या लग्नाची. जी सगळी गोष्ट शिल्पांत दगडात कोरलेली आहे.
देवळात मूर्ती नाही. काही मूर्त्या स़ग्रहालयात ठेवल्यात हंपीमधल्या अस समजलं. भंग झालेली देवालये पुजत नाही त म्हणून ती फक्त बघायला आहेत. पण सगळीकडे स्वच्छता आहे.
पुष्करणी मस्त नऊ पायरींची विहीर ही रोजची काम करण्यासाठी असावी.
किंगस बाथ ६५ फुट तलाव आहे. राजाच न्हाणीघर ऊर्फ तलाव. याच्या जवळ एक शिवालय भग्न अवशेष स्थितीत आहे. राजा आंघोळ करून देवाला जाण्यासाठी.
लोटस महल : उन्हाळ्यात ऊकाडा टाळण्यासाठी यात पाण्याच छान नियोजन आहे. राजे लढायला गेले की सगळ्या बायका एकत्र महालात राहात. तो तळमजलाच फक्त शिल्लक आहे.जनाना पॅलेस च्या समोर लोटस महल आणि राणी तलाव आहे. आता कठडा नाही. जवळच टेहळणी बुरूज आहे. जो तृतीयपंथी लोक चालवत. राणीवसा त्यांच्याकडे सुरक्षित राहतो अस तेव्हा मानत.
हत्ती घर एकंदर ११ शाही हत्ती राहण्याची ऊत्तम कलाकृती निर्माण केलीय. जैन हिंदु बौद्ध असे सगळे कळस दोन्ही बाजुला आहेत. मधे अंबारी आहे. जवळच माहुतांची राहण्याची सोय आहे.
तेनालीरामा घर माहुतांच्या घरामागे मोठाल्या दगडाचा ढिग आहे. टोकावर महिरपी भाग करून तेनाली रामांचे घर ईथे होते / असावे अशासाठी जागा अधोरेखित करून ठेवली आहे. वास्तूच्या पायथ्याशी चार खांब मधे चौथरा आहे. आजही काही ठिकाणी ऊत्खलन सुरू आहे. बघु पुरातत्व भागाला काही सापडतय का?
आयुष्यात आपण अशा ठिकाणी कधी जाऊ अस स्वप्नात सुद्धा नसताना त्या जागी जाण्याचा योग आला की होणारा आनंद मी अनुभवला. अत्यंत स्वामिनीष्ठ हुषार असे अष्टदिग्गजांपैकी एक पंडित तेनालीरामा यांच्या सहवासातली भूमी मी पाहातेय विश्वासच बसत नव्हता. मन भरून आलं सगळ्या कथा झरझर डोळ्यासमोर येत होत्या. कुशाग्र बुध्दीच्या त्या पुण्य आत्म्यास नम्रपणे मनापासून नमस्कार करून मी निघाले. गाईड म्हणाला आपण जेव्हा अशा वास्तूला अत्यंतिक प्रेमान पाहतो, शोधतो, भारावतो तेव्हा ती वास्तू पण सुखावते. आनंदते. आपका कुछ था आपको वो यहा पे लाए...
अस म्हणत मधे ऊभ करून हा फोटो काढला. राजमाता दिख रहे हो म्हणत वातावरण स्थावर केलं. धन्यवाद राघवेंद्र जी.
विरूपाक्षी टेम्पल ईकडे विरूपाक्ष रूपात महादेव आहे. ११ मजली गोपुर वर कळस आहे. कळसाला हात लावण नमस्कार करण पद्धत आहे ईकडे महादेवावर हात ठेवत नाही यासाठी संध्याकाळी या गोपुराची ऊलटी प्रतिकृती आत एका झरोक्यातून भिंतीवर पडते.  भारीच अनुभव होता हा. तीन कळस आहेत, भूमिगत महादेव, पार्वती, देवी भूवनेश्वरी, दुर्गा देवी अशी सुंदर देवळ याच परिसरात आहेत. देवी भुवनेश्वरी चे नेत्र खुपच प्रभावी आणि ऊर्जायुक्त जाणवतात. ते आपल्याला भावतात.
दिवे फार सुंदर दिसतात. पार्वती पंपा शंकर पंपेश्वर पंचा हंपा हंपी अस बदलत नाव झाल असाव अस समजलं. गाइड उवाच बरका!
आतमधे फोटो काढण मनाई आहे.
गर्भगृहाच्या बाहेर दगडी मंडपात छतावर पेंटिंग्स आहेत. कथा ऐकून आणि ती समजुन मन पुराणातच जातं. पण गाइड असेल तरच हे समजेल अथवा आपण वर बघणारही नाही.
ऊग्र नरसिंह म्हणजेच श्री लक्ष्मी नरसिंह देऊळ. राजा कृष्णदेवराय यांच्या अखत्यारीतल हे शेवटच शिल्प. ही कलाकृती डायरेक्ट बनवली कारण राजा आजारी होता. ती बनवुन राजास दाखवली कृष्णदेवराय खुप खुष झाले असे समजले.
शिल्पी लोकांची परिक्षा घेउनच त्यांना पहिल्या दहात घेत असत मगच कामाला रूजु होता येत होतं. तसच घोडे तपासणी पथकही कडक होतं. जीभ स्वच्छ घोडा सुदृढ दात सुव्यवस्थीत त्यावरून वय ओळखत. काय ऊच्च कोटीची व्यवस्था असावी.
बडविलिंग गुडी म्हणजेच महादेवाच भव्य शिवलिंग असलेल देऊळ. हे पूर्ण पाण्यात आहे. दिवसा सूर्य किरणांत असते. एका गरीब शेतकरी महिलेने हे बनवुन घेतले अस म्हणतात. यालर कोरलेले शिवाचे तीन डोळे आहेत. बडवा आणि लिंग अस नाव जोडलेल आहे कारण बडवा म्हणजे गरीब आणि म्हणून बडवा लिंग.
हंपी बाजार मधे बनाना सिल्क साडी तसेच काही क्राफ्टच्या वस्तू घेऊन आम्ही निघालो. सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेसात आम्ही ईथवर पोचलो. दिवसभरात भारावलेल्या पाच जीवांना आता पाय समजु लागले होते. दिवसभरात खुप काही ग्रहण केल होतं, खुप काही आवडलं भावलं होतं. राॅक सीटीत राॅक्स फिरलो. सकाळी राजु स्टाॅलवर दोसा ईडली पुरी भाजी नाश्ता झालेला आणि रात्री मॅंगो ट्री रेस्टॉरंट ला बैठकीत थाळी जेवलो. ईकडे नाश्ता साडे आठ नऊलाच संपतो. संध्याकाळी ते बंदच असतात. आणिजेवणाची ठिकाण तर न ऊ साडेन ऊलाच संपल म्हणतात. संध्याकाळी फार किर्र अंधार असतो रस्ते रलांब वाटतात. मुळ हंपी गाव छोटसच आहे. नवीन वस्ती जरा लांब आहे. नारळपाणी सोनकेळी मात्र मस्त खाल्ली.
जेवणात केशरी शिरा रस्सम वगळता फार काही वेगळ नव्हतं. पण केळ्याची स्वीट डिश होती.
जेवायला बनाना ट्री आणि मॅंगोलीफ/ ट्री बरेच बरे आहेत. जेवण नाश्ता ठराविक वेळेतच संपतं हंपीमधे.
सोलापुर नंतर विजापूर च्या पुढे लंच केल तो हा ढाबा अप्रतिम जेवण.
सकाळी श्रीकृष्ण ला चहा घेतला.
***********
सकाळी नाश्ता करून पुढे गेलो. हाॅटेल ते सानापुरा रस्ता मस्त.
सानापुरा लेक मस्त ४० फुट खोल आहे. बोटींग आणि निसर्ग यासाठी प्रसिद्ध आहे. जवळच अस्वल असलेल जंगल आहे. साधारण २० मिनीटांची ही बुट्टी ऊर्फ डोंगा फेरी. सुंदर अनुभवायलाच हवी अशी जागा.
अंजनाद्री हिल हनुमान जन्म स्थल ५९८ पायरी चढुन वर देऊळ आहे. जेवढी माणस तेवढीच माकडं पण आहेत. चपला पायथ्याशी सोडूनच चढतात. ऊतरायचा रस्ता वेगळा पण मस्त आहे. नारळाचा प्रचंड मोठा ढिग आहे वर. भिंतीत कोरलेली केशरी रंग चढवलेली मूर्ती आहे.
पंपा सरोवर  हे पंच सरोवरापैकी एक आहे. शबरी व रामाची ईकडे भेट झाली. पंपा पार्वतीच नाव आहे काठावर सुंदर पार्वती पंपा रूप देऊळ आहे.
शबरी गुफा पंपा सरोवराजवळ शबरी राहत असे ती जागा शबरी गुफा नावाने नीट राखली आहे. यावेळी जोरात पाऊस कोसळला. सरोवरात मगर आहे. देवीचा चित्राध्ना प्रसाद घेतला आणि निघालो.
राम पद गुडी : सुग्रीव राम प्रथम भेट स्थल चिंतामणी मठ अनेगुडी गावात आहे. रामान वालीस मारलेला बाण जागा दगडात कोरलेली आहे. प्रचंड मोठ्या तुंगभद्रेच्या  काठी हे ठिकाण आहे. मोठ मोठ्या दगडाच्या गुहेत ही जागा आहे. मोठ चाफ्याच झाड आहे. बघण्यासारख आहे फण पोचेपर्यंत अंदाजच लागत नाही.  याच वाटेवर गगन महल आहे आम्ही गेलो नाही गल्ल्यांचा रस्ता फारच निमुळता होत जातो आणि गाइड नसताना नको वाटतं. थोडा वेळ काढुन जायला जाघा मस्त आहे.
ईकडचे व्हिडिओ फार मस्त आलेत.
भगवान श्रीकृष्ण देऊळ. बाळकृष्ण ते मोठा कृष्ण अशी अनंत शिल्प ईकडे आहेत. मूर्ती नाही याच वाईट वाटतं. काय वैभवात नांदत असतील ही देवळं कल्पना केली तरी मोहरत मन.
ससिवेकालु गणेश म्हणजे (ससिवेकालु म्हणजे  सरसोंका बीज) हा गणपती माता पार्वतीच्या मांडीवर बसलेला ८ फुट ऊंच आहे पण ती प्रदक्षिणा घालताना दिसते. 
हेमकुटा हिल सनसेट पॉईंट 
हेमकुटा म्हणजे सोन्याची. पंपा म्हणजे पार्वती नी शंकरासाठी तप केल नंतर ते विवाहास तयार झाले ते हे ठिकाण हेम कुटा. तसच कामदेव भस्म झाले शंकराच्या तृतीय नेत्राग्नीमुळे ती हीच जागा. हंपी गाव तसेच विरूपाक्षी देऊळ या टेकडीवरून मस्त दिसतं. महादेवाचा वास अशी ही भूमी समजली जाते. याभागात अनेक देवळं आहेत. सूर्योदय सूर्यास्त छान दिसतो.
कडालेकलु गणेश पंधरा फुट ऊंच अशी ही मूर्ती एकाच मोठ्या शीलाखंडातुन निर्माण केलेली आहे.
सूर्यास्त पाहुन आम्ही भरपुर आठवणी सुपानी साठवुन रूमवर गेलो. लवकर झोपायच होतं कारण ऊद्या बदामीला जायच होतं.
******
बदामी / बादामी गुहा आणि भूतनाथ देऊळ अगत्स्य लेक. बदामी/ बादामी/ वातापी अशी नावे आहेत.  असुर वातपीचा वध ऋषी अगस्ती यांनी केला. तो तलाव आर्युवेद औषधींयुक्त पूर्वी होता आता तस नाही. चालुक्य वंशजांचा वावर या लेण्यांमधे दिसतो. महादेव गुसा, विष्णु गुहा, महाविष्णु गुहा जैन गुहा अशा चार दगडात कोरलेल्या शिल्पांच्या गुहा आहेत.
मूर्ती देवालयात नाहीत पुजा होत नाही कोरीव काम अद्भुत आहे. प्रत्येक गुहेचे वैयक्तिक वैशिष्ट्य आहे. भरपुर वटवाघूळ असल्याने आतला थोडा  भाग बघता आला नाही. प्रचंड माकडं आहेत. आपल्याबरोबर पायरी चढतात. आम्ही गजरे घातलेले काढायला लावले माकड हिसकवतील म्हणून. बदामी लालसर दगडातली शिल्प बघुन वाटत या शिल्पी लोकांची पुढची पिढी असेल कि अस्तित्वात?
महादेव गुफा
विष्णु गुफा
महाविष्णु गुफा
जैन गुफा
पट्टदकल म्हणजे राजाचा सिंहासन आरूढ होण्याची जागा.
परत निघताना फार डोक्यात भरून निघालो होतो काय काय बघितलं बापरे! पट्टदकल ते बिजापुर रस्ता फारच मस्त होता त्यात  पाऊस सुरू झाला होता.
मधे सूर्यास्त बघत चहा वडा घेतला.
बिजापुरला सहा पोचलो  गोल घुमट आतुन बघु शकलो नाही पण जवळच एक महादेवाचे देऊळ बघितलं.
नंतर पंढरपुरी गाठली रात्री ईस्काॅनमधे राहिलो.
 पहाटे विठुराया रखुमाईच दर्शन घेतल आणि पुण गाठलं.
संपूर्ण प्रवास सुरेख झाला. (२३-२७ ऑक्टोबर २५) जे जे बघितलं त्यापेक्षा खुपच कमी लिहु शकले आहे कारण काही गोष्टी डोळ्यात तरळतात आणि ह्रदयातच ऊतरतात शब्द फिके पडतात मंडळी! जमेल तस या डोळ्यात तरळुन हंपी बदामी....

संस्कृती जपली तरच टिकेल हे एकच म्हणेन.

जय श्रीकृष्ण 
सौ. गौरी पाठक 
++++++++++++++++++++
*गाईड श्री. राघवेंद्र यांचे विशेष आभार
*वेळे अभावी बघायची राहिलेली ठिकाणे :
(आपण नक्की बघाल.) मातंग टेकडी, गगन महाल,  माल्यवंत रघुनाथ राम मंदिर, भूमिगत शिव मंदिर, कोटीलिंग मंदिरश, सुग्रीव गुहा आणि अच्युत मंदिर
*व्हिडिओची लिंक लवकरच येईल ईकडे.... क्रमशः 
++++±+++