Thursday, 29 June 2023

९) भाद्रपद (ऑगस्ट - सप्टेंबर ) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका २०२३

 भाद्रपद महिना महत्वं :  

चातुर्मासातला दुसरा महिना भाद्रपद. श्रावण महिन्याच्या शेवटी भाद्रपद सुरू होतो. श्रावणानंतर भाद्रपदामध्येही पावसाळ्यामुळे पृथ्वी ओलसर होत राहते. यासोबतच भाद्र महिन्यात घर बांधणे, लग्न, लग्नकार्य व इतर कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे. त्यालाही काही कारणं आहेतच. भक्ती, स्नान आणि उपासनेसाठी भादौ / भादूर / भाद्रपद  महिना सर्वोत्तम मानला जातो. भद्रा हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ कल्याण असा होतो. या महिन्यात भाद्रा लवकर आल्याने म्हणजेच चांगले फळ देत असल्याने याला भाद्र महिना असे म्हणतात. हा महिना संयम, व्रत, उपवास, नियम आणि निष्ठा पाळण्यासाठी ओळखला जातो.

महिन्यातील सण :
हरितालिका पूजन : तृतीया

कोणी वाळुचा महादेव करःन पुजा करतं तर कोणी पार्वतीची मूर्ती आणुन करतं. हरितालिका पुजा करण्याची प्रांता प्रांतात वेगळी पद्धत आहे. भाव महत्वाचा तो असा की एकाग्र चित्तान महादेवाची आराधना करून योग्य जोडीदार लाभो हा आशिर्वाद मागणे. मनापासून केलेलं काम असेल तर फल पण योग्य लाभते. त्यात आपले मन असते. सगळा विचारांचा खेळ आहे. जसे विचार तशी भावना तशीच क्रिया. 

श्री गणेश चतुर्थी : 
श्रीगणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे, त्याचबरोबर बुद्धीची देवताही आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. हिंदू धर्मात श्रीगणेशाचे स्थान प्रथम पुजेचा मान असे आहे. अशी बुद्धीची देवता महर्षि व्यासांबरोबर महाभारत लिहीत होती. अनंत चतुर्दशीला हे लिखाण संपल्यावर व्यासांनी  गणपती कड़े पाहिले असता त्याच्या शरीराचे तापमान खुप वाढले होते. हे तापमान कमी व्हावे आणि गणपती च्या अंगावरची माती निघावी म्हणून व्यासांनी गणपतीला पाण्यात शिरवले / बुडवले. या दहा दिवसात व्यासांनी गणपती ला खाण्यास वेगवेगळे पदार्थ दिले. तेव्हा पासून गणपती बसवण्याची प्रथा पडली. असा ऊल्लेख सापडतो. अतिशय भक्तीभावान हिंदु धर्मिय बाप्पांना घरी आणतात. प्राणप्रतिष्ठा करून जीव सक्रिय होतो. आणि दहा नंतर ते तत्व निसर्गात विलीन होते ते शिरवून.  दहा दिवस भूतलावर बाप्पा सूक्ष्म स्पंदानी वावरतात. अनंत चतुर्दशीला ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जातो.
प्रत्येक कुळाच्या कुलगुरूंनी त्यांना योग्य असेल तितके  दिवस गणपती बसवावा असा नियम करून दिला असावा.

श्री गौरी / महालक्ष्म्या :
पहिला दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरीचे आगमन, दुसऱ्या दिवशी तिची पूजा आणि आदरातिथ्य ज्याला पाचर म्हणतात आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन. अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन, म्हणजे गौराई असते अवघ्या तीन दिवसांची पाहुणी आणि त्यामुळेच तिचं कौतुकही न्यारंच. वेगवेगऴ्या रीतिरिवाजांनुसार पूजन, गोडधोडाचा नैवेद्य करून माहेरवेशीणीचा कौतुक सोहळाच जणू पार पडतो.  ज्येष्ठा गौरींच्या घरी प्रवेश करण्यापूर्वी संपूर्ण घर स्वच्छ केल जातं. संपूर्ण घराला हार, तोरण, फुले, रांगोळ्या अशा सुंदर सजावट केल्या जातात. घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.  हे असण्याला या नक्षत्राची निसर्गाची बहुमोल साथ असते.
गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात. महालक्ष्मी /गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी मूळ हेतू धान्य लक्ष्मीच्या पूजेचा, भूमीच्या सुफलीकरणाचा आहे. माहेरवाशिणींचा क्काचा सण "गौरी " "महालक्ष्म्या". या जेष्ठा कनिष्ठा माहेरवाशीणींच प्रतिक म्हणुन पुजल्या जातात. मानवजातीने स्त्री तत्वास योग्य सन्मान देण महत्वाच आहे हे हा सण दाखवतो. लेकीचा सण म्हणजे सुना पण आल्याच की! नवनिर्मितीस आकार देणारं स्त्री तत्व ज्यात प्रचंड क्षमता आहे वाट्टेल ते पेलण्याची त्या स्त्री तत्वास कृतज्ञताच जणू .

 ॠषिपंचमी : 

ॠषीतुल्य असे पूर्वज यांना कृतज्ञता म्हणुन या दिवशी पुजा केली जाते. या दिवशी स्वकष्टार्जित अन्न खावे हा हेतु आहे. बैलाना एराम दिला जातो. ॠषिपंचमी व्रत पुजा ही, आपल्या जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी ॠषींनी सांगितलेल्या ज्ञान सिद्धांताचे वाचन, चिंतन, मनन पुढच्या पिढीने करावे याची आठवण देण्यासाठी आहे. याच दिवशी संत श्री गजानन महाराजांनी समाधी घेतली. संजीवन समाधी दिवस.

श्राद्धपक्ष :
पितृ पंधरवड्यायात  हिंदू त्यांच्या पूर्वजांना प्रार्थना करतात, विशेषत: ज्ञात असलेल्या कुटुंबातील मृत आत्म्यांना प्रार्थना, अन्न आणि पाणी अर्पण ज्या  विधीद्वारे करतात ते श्राद्ध. शुभ कार्यासाठी पित्रृ पक्ष अशुभ मानतात. अशुभ म्हणजे हा कालावधी दूर गेलेल्या आप्तीयांनसाठीच आहे म्हणुन. या कालावधीत श्राद्ध करताना मृत सदस्याला जीवनात आवडलेल्या विविध प्रकारचे अन्न केले जाते. या १५ दिवसांमध्ये मृत पूर्वजांच्या आत्म्यांना सुखी करण्यासाठी एक शक्तिशाली वेळ आहे अस मानतात. दिवंगत पूर्वजांच्या आत्म्यांना पृथ्वीवरील लोकांशी संलग्न होण्यापासून मुक्त करते. या प्रथेमुळे स्वर्गाचा त्यांचा प्रवास सुरळीत होतो. परंपरेनुसार मागील जन्माचे कर्म या जीवनात केले जाते, आणि म्हणून आपण अपूर्ण कर्म पूर्ण केले पाहिजे. जे आपले कर्म स्वर्गीय  मार्गावर असणार्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे जाण्यासाठी मदत करतात. अग्नी पुराण, वायु पुराण, गरुड पुराण यांसारख्या पवित्र ग्रंथांमध्ये श्राद्धाचा सविस्तर ऊल्लेख आढळतो. हिंदू धर्मात आणि इतर अनेक धर्मांमध्ये केले जाणारे हे कार्य ही एक प्रदीर्घ परंपरा आहे. आत्मा अमर आहे तो शरीर बदलत असतो यासाठी ते त्यागताना संतुष्टी असण ऊत्तम.

महिन्यातील यात्रा, जयंत्या :
वराह जयंती :
वराह अवतार विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार आहे अस म्हणतात. या अवतारात श्रीविष्णूने वराहाचे म्हणजेच डुकराचे रूप धारण केले होते. भगवान विष्णूंनी अवतार घेऊन मानवानं परमेश्वरी तत्व जागृत आहे याची अनुभूती दिली आहे. 


गीते, कविता, गाणी :

हरितालिकेची आरती
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके ॥ आरती ओवाळीते । ज्ञानदीप कळिके ॥ धृ ॥
हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥
तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ जय. १ ॥
रिघसी हिमाद्रिच्या पोटी । कन्या होसी तूं गोमटी ॥
 उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ॥ जय.॥ २ ॥
तपपंचाग्निसाधने । धुम्रपाने अघोवदने । 
केली बहु उपोषणे ॥ शुंभ भ्रताराकारणें ॥जय. ॥ ३ ॥
लीला दाखविसी दृष्टी । हे व्रत करिसी लोकांसाठी ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावे संकटी ॥ जय. ॥ ४ ॥
काय वर्णू तव गुण । अल्पमती नारायण ॥
माते दाखवी चरण । चुकवावे जन्म मरण ॥ जय देवी ॥ ५ ॥

गौराई आली
आली आली लक्ष्मी, आली तशी जाऊ नको
बाळाला सांगते, धरला हात सोडू नको.
मला आहे हौस, चांदीच्या ताटाची
लक्ष्मीच्या नैवेद्याला मूद साखरभाताची
लक्ष्मीबाई आली सोन्याच्या पावलांनी
ज्येष्ठेच्या घरी कनिष्ठा आली
मालकाच्या घरी लक्ष्मी आली

लॉजिक नवीन पिढी साठी :
हरतालिका पुजा व ऊपवास का करायचा?
या दिवशी महादेव व पार्वतीचा मिलाप झाला. बायका ऊपवास करून सुखी संसारासाठी प्रार्थना करतात. शिवपिंडीची पुजा करताना प्रकट होणारे शिवतत्व त्या स्त्रीस लाभते. वायुमंडलातील लहरीतील बदल शरीरास ऊपयुक्त असतात. शक्तीच्या कणांचे प्रक्षेपण स्त्रीकडे आकर्षित होते. वाळुच्या महादेवातुन शिवपिंडीतुन चैतन्याचे वलय निर्माण होते. या पूजनामुळे निर्गुण तत्वात्मक वलय निर्माण होते.  ऊपवासाला आद्ध्यात्मिक महत्व आहे. पाचन अग्नी जागृत होऊन शरीर शुदेध व मन एकाग्र होते जे व्रत करताना ऊपयुक्त ठरते.

गौरी गणपती का बसवायचे?
जी गोष्ट केल्याने समाधान, एकोपा व सेन्ट्रलाईज एनर्जी तयार होते, ती गोष्ट मानवास हितकारक ठरते. एखादं तत्व एका ठिकाणी केंद्रीत होऊन कार्य करत असते तेव्हा निसर्ग पण सहाय्यक बनत असतो. अशावेळी एकत्र जमुन ते अनुभवले पाहिजेत.  सहवासानं प्रेम वाढतं आणि प्रेम वाढलं की आपुलकी. गौरी गणपती सारखे सण साजरे करून मानव नकळत ते सुंदर स्पंद आकर्षित करतो. वातावरण पण या काळात आनंदी असते. गौरी च्या निमित्ताने लांबची लेक भेटते. गणपती बसवल्यावर आरतीमुळे सामुहिक फायदे होतात. अस कोणी सापडणार नाही की या दिवसात ऊदास वाटतय. असा निसर्ग पण जर साथीला असेल तर नेमुन दिलेले पदार्थ पण पचन नीट होते. पूर्वजांनी आखलेले नियम समजुन घेतले पाहिजेत. 

गजाननाच्या रूपाचे निरूपण समजुन घेतले तर समजतं की अशी देवता का घरी आणली पाहिजे. 
गजमुख : हत्ती बुद्धिमान प्राणी मानला जातो. हत्ती विशाल असतो आणि स्मृती अतिशय तल्लख असते. हत्तीचे तोंड, कान, डोळे सर्व एकत्र होऊन तोंड तयार होते. विशाल तोंड निर्भयता आणि आत्मिक शक्तीचे प्रतीक मानले जाते.
मोठे कान : मोठे कान हे एकाग्रतेचे प्रतीक मानले जातात. 
एकदंत : गणपतीचा एक सुळा दुष्ट लोकांना भीती दाखविण्यासाठी आहे. सरळमार्गी चालणार्‍यांना त्रास देणे सोपे आहे, असे समजणे नुकसान करेल, असा संदेश यातून मिळतो.
लंबोदर : ज्ञानी व्यक्ती निंदा, स्तुती, जय, पराजय, उच्च - नीच अशा अनेक प्रकारच्या परिस्थिती आपल्यात सामावून घेत असतात. मोठे पोट हे ज्ञानवानाच्या या गुणाचे प्रतीक असल्याचे मानले जाते.
मोदक :  मोदक परिपूर्ण स्थितीचे द्योतक आहे. मोदक हा ज्ञाननिष्ठा, ज्ञानरस आणि ज्ञानाद्वारे प्राप्त मुदित अवस्थेचा परिचय देणारे आहे. मोदक बुद्धी, परिश्रम आणि तपस्याच्या बळावर यश मिळवण्याचे सूचक आहे.
वाहन ऊंदीर : गणपतीसारख्या विशाल काया आणि ज्ञानी असलेल्या देवतेचे वाहन छोटा मूषक असण्यामागे विशेष कारण आहे. तो  प्रत्येक गोष्ट कामाची आहे की नाही ते तपासून पाहतो (कुरतडणे ). समाजात प्रत्येक गोष्टीवर टीका करणाऱ्या अनेक वृत्ती आपणास दिसतात. अशा प्रवृत्तीवर नियंत्रणासाठी मूषक. म्हणजेच विवेकाचा अविवेकावर विजयाचे प्रतिक आहे. 
खूप जणांना प्रश्न असतो कि गणपतीची गौरी कोण ? बहीण कि आई ? तर गौरी हे देवी पार्वतीचे रूप आहे. पुरुष आणि प्रकृती मधील प्रकृतीचे प्रतिक गौरी. स्त्री तत्वाचे ती प्रतिनिधित्व करते अस म्हणू शकतो आपण. मग ती बहीण आई कोणीही असो. त्या तत्वाचे महत्त्व अपार आहे.  ज्या कालावधीत त्या तत्वाचे महत्त्व सांगायचे असेल त्यावेळे नुसार पूर्वजांनी आखणी केलेली असावी. (आणखी माहित सापडली कि नोंद करेनच. )

श्राद्ध का करायचं?
आपल्या पासुन दूरावलेल्यांना स्मरण करणे. त्यांच्यामुळे आपण या भूतलावर आहोत यासाठी कृतज्ञ राहायला हवे. कोणतेही ॠण फेडल्या शिवाय मुक्तीचा मार्ग मोकळा होत नाही. पितृॠणातून मुक्त होण्यासाठी श्राद्ध विधी करतात.

Wednesday, 28 June 2023

८) श्रावण (जुलै - ऑगस्ट ) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका २०२३



श्रावण महिना महत्वं : 
संपूर्ण भारतासाठी, नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे. बरेच हिंदू प्रत्येक सोमवारी भगवान शिव आणि/किंवा दर मंगळवारी देवी पार्वतीसाठी उपवास करतात.
समुद्र मंथनातुन निघालेल्या विषापासुन भगवान महादेवांनी विश्वाला वाचवलं. कृतज्ञता म्हणुन विश्व श्रावणात भगवान शंकराची पुजा प्रार्थना करतं. जो सर्वांचं धोक्यापासुन रक्षण करतो व योग्य वागण्यासाठी प्रवृत्त करतो. ऊपवास पुजा व्रत यासाठी या महिन्यात निसर्ग पण सोईचा असतो. या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतांमुळे वातावरण पवित्र होते. तसंच श्रावणातील या सणांमुळे भेटीगाठी वाढतात, सहवास वाढतो, आपापसातील संबंध दृढ होतात. सर्वत्र आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जाणारा हा श्रावण महिना आहे आणि म्हणूनच याला अनन्यसाधारण असे महत्व आहे.


महिन्यातील सण :
जिंवती पुजन श्रावणी शुक्रवार :

 जरा जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते. जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी. म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता. दीर्घायुष्य मिळावे यासाठी हिंदूधर्मियांमध्ये ही पूजा केली जाते. श्रावणामध्ये स्त्रिया जिवंतिका पूजन करतात. जरा आणि जिवतिका या दोन पुरातन देवता आहेत. पुराणात असलेल्या सप्त मातृकांपैकी या दोन आहेत. माय लेकरांसाठी ही पुजा करते.


नागपंचमी : 
कालिया नागाला धडा शिकवुन भगवान श्रीकृष्ण यमुना नदीच्या पात्रातुन वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी. बिळातील उंदरांना नाग नष्ट करतो, त्यामुळे नागदेवतेची यादिवशी शेतकऱ्यांकडून मित्र म्हणून पूजा करण्यात येते. यादिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये म्हणून जमीन खणली वा नांगरली जात नाही.  जरी आपले शेत नसले तरी आपण शेतातल पिकलेल खातोच यासाठी ही पुजा करावी.
मंगळागौरी :
श्रावणातील मंगळवारी संसारातील सौख्य आणि प्रेम कायम राहण्यासाठी मंगळागौरीचे खास व्रत आहे. पहिल्या मंगळागौरीला आपल्या जवळच्या सवाष्णींना बोलावून हे व्रत पूजण्यात येते. पाच वर्षांनी हे व्रत पूर्ण करायचे असते. मंगळागौरीची पूजा करून उखाणे घेऊन संध्याकाळी  फुगडी झिम्मा खेळुन रात्रभर जागारचं. पारंपरिक खेळ खेळायचे. माहेरून आलेली अन्नपूर्णा महादेव एकत्र पुजायचे. सासर माहेर दोन्ही घरी ही पुजा करतात. आनंद वाटला की वाढतो हेच या पुजेचे तात्पर्य ऑफ द स्टोरी .



रक्षाबंधन / नारळी पौर्णिमा  :
रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा एक शुभ सण आहे. हा दिवस भाऊ-बहिणीच्या शुद्ध नात्याला समर्पित आहे. रक्षाबंधन हा शब्द रक्षा (संरक्षण) आणि बंधन (संबंध) या दोन शब्दांपासून बनला आहे. बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे.  रक्षाबंधनाला पवित्रारोपण असेही म्हणतात.  आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे.  भावावरचे प्रेम बहीण राखी च्या माध्यमातून व्यक्त करते. प्रत्येक नात्याच्या भावना व्यक्त होण्यासाठी आपल्या पूर्वजांनी प्रत्येक नात्याला अनुसरून छान नियम आखून दिलेले आहेत. 
श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्‍तीचेही प्रतीक मानलेले आहे. समुद्राचे आभार मानायचे असा हा दिवस. निसर्ग  सतत देत असतो. मानवाने त्या निसर्गाचे आभार मानायचे हे महत्वाचे आहे. 

शिवामुठ श्रावणी सोमवार : 
दर श्रावणी सोमवारी तीळ, तांदूळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर अथवा शिवलिंगावर धान्य वाहण्यात येते. नवविवाहित महिला श्रावणी सोमवाराचे हे व्रत पहिले पाच वर्ष करतात आणि काही महिला तर आयुष्यभर हे व्रत करतात. देण्याचा नियम मुठी मुठीन शिकतो आपण. शिवा शिवा महादेवा... माझी शिवामेठ ईश्वरादेवा... 



गोपाळकाला : 
गोपाल म्हणजे गायीचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, लिंबाचे कैरीचे लोणचे, दही, ताक, हरभऱ्याची भिजलेली, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो, हा कृष्णास फार प्रिय होता. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्वजण वाटून खात असत. सर्व लोकांना एकत्र घेऊन जे जे पदार्थ असतील ते एकत्र करून काळ बनला जातो. एकात्मता दर्शवतो काला, दहिहंडी फोडली की एकत्रितपणे काला खातात.
कृष्ण जन्मानंतर दुसऱ्या दिवशी काला करायची पद्धत आहे. काही ठिकाणी गवळण काला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतर होतो.

दहीहंडी : 
जन्माष्टमीच्या दुसर्या दिवशी दहिहंडी असते.


दहीहंडीचे महत्त्व हेच की सर्व टीमवर्क, समन्वय, लक्ष केंद्रित आणि सामर्थ्य साधणे याबद्दल आहे. दहीहंडीसाठी गटा चा मानवी पिरॅमिड बनवला जातो आणि प्रत्येक पिरॅमिडमध्ये तब्बल नऊ थर असतात. खालच्या स्तरावर बळकट लोक असतात जे त्यांच्या खांद्यावर भार सहन करू शकतात आणि वरच्या स्तरावर एक उत्साही मूल असते जे हंडी पकडू शकतात आणि तोडू शकतात. जे लोक पिरॅमिड बनवतात त्यांना 'गोविंदा पथक' किंवा 'गोविंदा' म्हणतात. भगवान श्रीकृष्णाची  या विधीमागील संकल्पना हीच की तरुण मनांमध्ये बंधुता, सामर्थ्य आणि समन्वय विकसित करणे आहे, जेणेकरून ते एकमेकांच्या पाठीशी उभे राहतील.

पिठोरी अमावस्या : 
श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. वंशवृद्धी, मुलांच्या सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी महिला व्रत ठेवतात. पिठोरी अमावस्या किती घरात साजरी केली जाते, ठाऊक नाही. पूर्वी घराघरात ‘पिठोरी’ची पूजा होत असे. पिठोरी अमावस्येचंच दुसरं नाव मातृ दिन. वंशवृद्धीसाठी ही पूजा केली जाते. या दिवशी बैलांना विश्रांती द्यायची. त्यांना ऊन पाण्याने आंघोळ घालायची , पुरणावरणाचा स्वयंपाक करून आधी त्याचे तोंड गोड करायचं. खूप ठिकाणी ‘ शिंगे रंगविली , बाशिंगे बांधिली , चढविल्या झुली ऐनेदार ‘ असाही बैलपोळ्याचा थाट उडवून देतात. बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक गावात शेतकरी बैलपोळा साजरा करतात.

अधिकमास :
अधिक महिन्याला विविध नावांनी संबोधले जाते. त्याला मलमास, पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो.  पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी म्हणजेच ३६५ दिवस  पूर्ण होते. व्यवहाराच्या सोयीकरिता आपण ३६५ दिवसांनी नवे वर्ष सुरू करतो. दर चार वर्षांनी येणारे वर्ष एक वाढीव दिवस घेऊन ३६६ दिवसांचे 'लीप वर्ष' म्हणून स्वीकारतो. पृथ्वीभोवतीची चंद्राची एक फेरी म्हणजे 'चांद्रमास'. एक वर्षाच्या कालावधीत १२ चांद्रमास पूर्ण होतात, यालाच चांद्रवर्ष म्हणतात. चांद्रमास प्रतिपदा ते अमावास्या असा २९.५ दिवसांचा असतो. त्यामुळे चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे होते. याचा अर्थ चांद्रवर्ष है सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. हा फरक दरवर्षी वाढत राहू नये, याकरिता चांद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर एक महिना वाढीव म्हणजेच 'अधिक' घेतला जातो. अधिक महिन्यात संक्रांत नसल्यामुळे चंद्रसूर्यांच्या गतीत फरक पडतो. यामुळे वातावरणातही बदल होत असतो. याचा आपल्यावर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून काही नियम व व्रते पाळावीत. यामुळे मनुष्याला सुख, शांती, समाधान मिळते, त्यांचे इच्छित मनोरथ पूर्ण होतात, त्यांची प्रगती होते. बाराही महिन्यांनी काढून टाकलेल्या त्या पापभागांपासून तेरावा महिना म्हणजेच अधिकमास उत्पन्न झाला. तो पापमय असल्याने त्याला मलिनमास किंवा मलमास असे नाव पडले. श्रीविष्णूच्या आणि पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या आशिर्वादाने तो मलमास पवित्र पुरुषोत्तममास बनला. चार वेदांनुसार भगवान विष्णु सर्व सृष्टीचे पालक आहेत. म्हणुन अधिकात श्री विष्णुची ऊपासना महत्वपूर्ण आहे.

बैलपोळा : आपण सर्वतः निसर्गावर अवलंबून आहोत. त्याला साथ कष्टकरी बैलांची असते. त्यांना धन्यवाद म्हणत आराम करायला लावून पूजा करून ती व्यक्त करायचा दिवस तो बैलपोळा. 
विदर्भात यालाच तान्हा पोळा म्हणतात. या दिवशी काकडीफोड करतात. बहीणीन भावेला ओवाळुन पाठीवर काकडी फोडायची. नंतर नवीन आलेले काकडीचे पीक - काकडी खाणं सुरू करत पूर्वी. पोळा फुटला असही म्हटले जात असे. लहान मुल लाकडी बैलजोडी घेऊन देवळात व जवळच्या घरी पोळा मागायला जातात त्यांना कौतुकाने खाऊ दिला जातो.
लहान मुलांना शेतीचे व त्यात कष्ट करणारे बैल यांचे महत्व कळावे. आपल्या कृषीप्रधान संस्कृती विषयी त्यांनी कृतज्ञ रहावे ही शिकवण देण्यासाठीच कदाचित विदर्भात तान्हा पोळा पद्धत पूर्वजांनी पाडली असावी.

महिन्यातील यात्रा, जयंत्या :

भगवान श्रीकृष्ण जयंती :

भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरेत श्रावण वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असताना मध्यरात्री  झाला. भगवान विष्णू भूतलावर अवतरलेल्या क्षणाला निसर्गात ते दिव्य तत्व १००० पट जास्त असते. ती अनुभूती त्यावेळी जागरण केलेल्यांना जाणवते. जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेच्या भावपूर्ण अंतःकरणयुक्त पूजनाने सूक्ष्मातीत लाभ होतात.


कृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर, त्याचे बाल स्वरूप "बाळकृष्ण " म्हणून आंघोळ घालतात, सजवतात. नंतर पाळण्यामध्ये ठेवतात. त्यानंतर भक्त नैवेद्य दाखवुन अन्न ग्रहण करून व वाटून उपवास सोडतात. मानवजातीसाठी जन्माष्टमी हा शुभ दिवस आहे कारण भगवान श्रीकृष्णाचा जन्म या  भूतलावर  झाला. जो भगवान विष्णुचा पूर्णावतार मानला जातो.  भगवान कृष्णाचा जन्मदिवस भारतात मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने   साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण ८ व्या दिवशी म्हणजे अष्टमीला साजरा केला जातो ज्याला कृष्ण पक्षाची अष्टमी म्हणतात. जन्माष्टमीचा आचार भगवान श्री कृष्ण हाच सांगतात की  "जे काही भूतकाळात घडले ते चांगल्यासाठीच घडले, जे काही घडत आहे, ते चांगल्यासाठीच घडत आहे, भविष्यात जे घडेल ते चांगल्यासाठीच घडेल. जन्माष्टमीचे वैष्णव परंपरेत खूप महत्त्व आहे कारण ती त्यांच्या प्राथमिक पूज्य देवता विष्णूचा जन्मोत्सव मानतात.

संत ज्ञानेश्वर जयंती : 
संत ज्ञानेश्वर यांचा आपेगाव औरंगाबाद येथे जन्म झाला. सर्वसामान्य जनतेसाठी भगवद्गीता मराठी भाषेत ओवीबद्ध करून ज्ञानेश्वरी स्वरूपात मांडणारे भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी आणि तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जाणारे संत ज्ञानेश्वरांच !


गीते, कविता, गाणी :
आला श्रावण श्रावण, होई मनही स्वच्छंद, सर्वाच्या मनी दरवळे, भक्तीचा सुगंध.
इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी,  संध्येच्या गगनी श्रावण आला
कुरवाळित येतिल मजला, श्रावणातिल जलधारा, सळसळून भिजली पाने, मज करतिल सजल इशारा ...
(कविता, कवी -मंगेश पाडगावकर)

चल गं सये वारुळाला वारुळाला, नागोबाला पुजायाला पूजायाला (समूहगीत, गीतकार - ग.दि. माडगूळकर; संगीत दिग्दर्शक - सुधीर फडके; चित्रपट - जिवाचा सखा)
चार दिसावर उभा ओला श्रावण झुलवा, न्याया पाठवा भावाला हिला माहेरी बोलवा (कवयित्री : शांता शेळके)

लॉजिक नवीन पिढी साठी :

शिवामुठ का करायची ? आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो. देण्याची वृत्ती मात्र हवी. धान्य देताना अनेक गोष्टी पूर्वज गुप्तपणे सांगतात की देण्याची सवय लावा, दिलेल प्रेमान द्या, त्यानिमित्तानं ती परमेश्वरी शक्ती माना अनुभवा. दिलेल धान्य एक घर पोसत होतं तेव्हा पुजारी लोकांचे घर यावर चालत होते. समाज असा गोवला होता की कोणही ऊपाशी राहु नये व सवय ही चांगली लागेल. देण्याच्या नियमाचा आनंद काय असतो हे अशा व्रतांमधुन समजतं.  दिल्याने कमी होत निही तर वाढच होते. मग ते अन्न असल काय आणि ज्ञान असल काय. आपली हीच संस्कृती आहे. जी आपण पाळली तरच टिकेल. दानाचं महत्वं सांगते शिवामुठ.

जिवंतीका पुजा करायची पद्धत का आहे ?
त्यामागे खुप सुरेख ऊर्थ पूर्वजांनी बांधला आहे असे नीट बघितले तरच समजते. आईच लेकरांसाठी एकचित्त होऊन सकारात्मक स्पंद केंद्रित केले जातात. कोणत्याही योग्य गोष्टीसाठी मन एकाग्र करून भावना जमल्या की ती गोष्ट प्रत्यक्षात येण्यास मदत होते. या संदर्भातील समाईक प्रसंगचित्रच जीवतीच्या कागदात दिसतील. पूर्वजांनो खुप विचार करून केलेली आखणी समजण्यास आपणच कधीकधी कमी पडतो.

मंगळागौर का पुजायची?
मंगळागौर हे हिंदू धर्मातील नवविवाहित स्त्री ने करण्याचे एक व्रत आहे. माता, बुद्धी, विद्या आणि शक्तीरूपात असणाऱ्या देवीची उपासना करून तिच्यासारखेच गुण आपल्यामध्ये यावेत अशी प्रार्थना या पूजेच्या रूपाने करण्यात येते. श्री शिव आणि पार्वती हे आदर्श पती पत्नी म्हणून गृहस्थाश्रमाचे प्रतीक मानण्यात येते. त्यामुळे प्रत्येकाचा संसार त्यांच्यासारखाच व्हावा हा यामागे हेतू असतो. या पूजेच्यावेळी शक्तीतत्वाची आराधना करण्यात येते. लग्नानंतर ही पहिली पूजा असल्याने ही सामूहिकरित्या करण्यात येते. जेणेकरून सर्व बहिणी आणि मैत्रिणींना एकत्र भेटण्याचा आनंद यामध्ये मिळतो. मात्र पूजा केल्यानंतर मौन राहून भोजन करायचे असते. कारण यामध्ये मनाचा संयम महत्त्वाचा ही शिकवण देण्यात येते. तसेच या पूजेमध्ये माहेरच्या ज्येष्ठांचा मान करणे आणि आदर करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.  नवरे का वगळतात सगळ्यातुन ? बायकांनीच का करायच?असं  अनेकांना वाटतं. पण स्त्री जे तत्व आकृष्ठ करू शकते ती क्षमता तीच्यातच असते. मंगळागौरी  पूजेच्या रात्री जागरण करून सकाळी पारणे करायचे. याला पण नक्कीच महत्व आहे. 

कालांतराने मंगळागौर जागरण खेळ संपुष्टात येतील यावर एक छान ऊपाय आहे. आपल्यातल्याच ऊत्साही महिलांना जागरणाला बोलवुन ते पारंपारिक खेळ खेळायचे. इंद्राणी ग्रुप, पुणे या गटातील महिला ऊत्तम मदत करू शकतील. मंगळागौरीसारखा कौटुंबिक सोहळा अविस्मरणीय होण्यासाठी मोबाईल नंबर ९८८१२००३९५ वर बोलु शकता.

नागपंचमी ला नागाची पुजा का करायची?
नागपंचमी सणाचा केवळ पुजा हेतु नाही. त्याचे सखोल महत्त्व आहे. नागाचे, सापाचे समजवून घेतले पाहिजे. आपल्या भौतिक शरीर आपण कोण आहोत याच्या आंतरीक पैलूशी आणि पेशींची हालचाल आणि आपल्या शरीरातील रक्तप्रवाहाशी संबंधित आहे, ते सापाशी नागाशी संबंधित आहे. कुत्रा (श्वान ) आणि कोंबडा(पक्षी) श्रवण, वास, पाहणे आणि जाणवण्याच्या संवेदनांना तीक्ष्ण करण्याच्या प्रक्रियेचे प्रतिनिधित्व करतात तर नाग साप कोब्रा इंद्रियांना न समजलेल्या परिमाणाचे प्रतिनिधित्व करतात. यामुळेच योग संस्कृतीत सापाकडे सर्वाधिक लक्ष दिले गेले आहे. जिथे पंचेंद्रिये काम करत नाहीत, तिथून सापाचे /नागाचे काम सुरू होते. जीवनाच ध्येय समजण्यासाठी नाग समजुन घेणे मगच त्याची पुजा का करणे गुढ  ऊलगडेल. शोधत जाल तस तस ऊलगडत जाईल. कुंडलीनी शक्तीच प्रतिक आहे कोब्रा. नागदेवतेची पुजेला आद्ध्यात्मिक महत्व आहे.

राखी पौर्णिमा का  पाळायची ?
राखी बांधताना आध्यात्मिक भावना असण्याचे महत्त्व आहे. या दिवशी भाऊ बसलेल्या आसनाखाली रांगोळी काढली जाते. ही अध्यात्मिक रांगोळी शुद्ध फ्रिक्वेन्सी सोडते ज्यामुळे आजूबाजूचे वातावरण सात्विक बनते. या रांगोळ्यांना परमेश्वरा कडून दहा टक्के ऊर्जा मिळते जी आसनावर बसलेल्या भावाला मिळू शकते. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. राखी बांधल्यानंतर ताटात ठेवलेला तुपाचा दिवा भावासमोर ओवाळला जातो. तुपाचा दिवा लावल्याने तेज या नावाने ओळखले जाणारे अग्नी तत्व उत्सर्जित होते जे भावामध्ये निरपेक्ष अग्नि तत्व वाढवण्यास मदत करते. तुपाच्या दिव्यामध्ये देवाकडून येणारी दैवी ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता असते. ज्योतीमध्ये देवाची दैवी चेतना लक्षणीय प्रमाणात सक्रिय आहे. तुपाच्या दिव्याची ही ज्योत नकारात्मकतेला जाळून टाकते.  स्त्री तत्वात असलेले सत्व भावासाठी उपयुक्त ठरते म्हणून बहीण भावास राखी बांधते ओवाळते.  भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे. ही यामागची मंगल मनोकामना असते. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला बांधून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे. नाती बांधून ठेवण्यासाठी पूर्वजांनी खूप सुरेख  नियम आखून दिलेले आहेत.  भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण  राजपूत लोकांत रूढ झाला.  या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि शिवाय त्या बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीस राखी बंधू शकते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, सय्यम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं. पूर्वजांनी भारतीय संस्कृती मध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. हिंदू संस्कृती विविध सण साजरे करत करत निसर्गाचे आभार मानायचा शिकवते. धर्म पाळायलाच हवा. कृतज्ञता व्यक्त व्हायलाच हवी.  पूर्वजांचे अनंत आभार मानायला हवेत. आयते आखून दिले आहे. आपण समजून ते फक्त पाळायचे आहे. 

श्रावण का पाळायचा ?
हिंदूंसाठी श्रावण महिना हा उपवासाचा महिना आहे. या महिन्यात पावसाळा असतो. पावसाळ्यात सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे आपली पचन शक्ती कमकुवत होते आणि म्हणूनच मांसाहार टाळणे चांगले. उपवासादरम्यान लोक जे खातात ते हलके आणि पचायला सहज असते. तसेच  या दिवसात अनेक जलजन्य रोग देखील होतात. काही प्राण्यांचे प्रजनन दिवस पण हेच असतात आणि प्राण्यांच्या मांसापासून संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात मांसाहार खाणं वर्ज असा नियम पूर्वजांची केला असावा. 



Wednesday, 14 June 2023

७) आषाढ (जुन - जुलै) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका २०२३


 

आषाढमहिना महत्वं : भगवान विष्णूच्या पुजेचं महत्व आषाढ महिन्यात भगवान विष्णूच्या पुजेला विशेष महत्व आहे. याशिवाय याच महिन्यात दान पुण्याला खास महत्वं दिलं गेलंय. आषाढाच्या महिन्यातच गर्मी आणि उष्णताही असते, त्यामुळे छत्री, पाण्यानं भरलेली घागर, खरबुज, टरबूज, मीठ आणि आवळ्याचं दान चांगलं मानलं जातं. आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला "आषाढ" असे नाव पडले आहे. आषाढालाच मराठीत आखाड असा दुसरा शब्द आहे.
 
आषाढमहिन्यातील सण :
गुरुपौर्णिमा : व्यास पौर्णिमा : व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.
 

दिव्याची आवस : आषाढ अमावस्या : भारतात दिव्यांचे  महत्व अति प्राचीन आहे. आषाढातल्या गर्द सावळा काळोख असताना हा दीप श्रावणातील ऊन पावसाची चाहूल देतो. वातावरणातील मरगळ, कोंदटपणा झटकून हा दिवस उत्साहानं कामाला सज्ज राहा असे सुचवतो. दीप पूजन या दिवसांनी मनास हुरूप येतो. जीवनातील अंधकार जाऊन ते उजळून जाऊ दे असेच जणू तो सांगत असतो.  दिव्याच्या आवसेला फार महत्व आहे कारण या दिवशी दिव्यामधल्या सूर्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रकाशाचे आणि ज्वलनातून प्रत्यक्ष अग्नी तत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिव्याची साग्र संगीत पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. दीपावलीत दिवे सजावटीचे माध्यम असतात तर दिव्याच्या आवसेला दिव्यत्वाच्या  प्रतीकात्मकतेच ते माध्यम असतात. तेजाची पूजा हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. कृतज्ञता हा भाव महत्वाचा. जेव्हा तेजाची पूजा केली जाते तेव्हा मानवाचे जीवन उजळून निघतेच. 


आषाढमहिन्यातील यात्रा, जयंत्या :
 जगन्नाथ रथयात्रा : आषाढ शुक्ल द्वितीयापासून जगन्नाथ रथयात्रा प्रारंभ होते. रथयात्रेमध्ये बलराम यांच्या रथाला 'ताळध्वज' म्हणतात. देवी सुभद्रा यांचा रथाला 'दर्पदलन' तर भगवान जगन्नाथ यांचा रथाला 'नंदीघोष' किंवा 'गरुडध्वज' म्हणतात. हा रथ सर्वात मागे राहतो. ४५ फूट उंच आणि १६ चाकांचा असतो भगवान जगन्नाथ यांचा रथ, तिन्ही रथांचे आहे खास वैशिष्ट्य. हिंदू धर्मातील चार धाममध्ये जगन्नाथ पुरीचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार भगवान विष्णू रामेश्वरममध्ये स्नान, द्वारकेत शयन, बद्रीनाथमध्ये ध्यान आणि पुरीमध्ये भोजन करतात. भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्याशिवाय चारधाम यात्रा पूर्ण मानली जात नाही.
 
आषाढी एकादशी : महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहू हुन तुकारामांची, त्रंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. याच एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात
 
आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात. भगवान विषाणु योगनिद्रेत जातात तो हा दिवस. हरिशयनी/ आषाढी एकादशीला  एकादशीला योगनीद्रेत गेलेले भगवंत कार्तिक एकादशीला योगनीद्रेतुन बाहेर येतात हीच देवऊठणी एकादशी.
 
गीते, कविता, गाणी :
ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम्।   मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोःकृपा॥
गुरूरादिरनादिश्च गुरूः परम दैवतम्।  गुरोः परतंर नास्ति तस्मै श्री गुरवे नमः॥
सप्तसागरपर्यन्तं तीर्थस्नानादिकं फलम्।  गुरोरडिध्रपयोबिन्दुसहस्त्रांशेन दुर्लभम्।।
हरौ रूष्टे गुरस्त्राता गुरौ रूष्टे न कश्चन।  तस्मात् सर्व प्रयन्तेन श्रीगुरूं शरणं व्रजेत्॥
गुरूरेव जगत्सर्वं ब्रह्म विष्णुशिवात्मकम्।  गुरोः परतरं नास्ति तस्मात्संपूजयेद्गुरूम्॥ 
गुरुपौर्णिमा 

आला आषाढ-श्रावण आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने प्यावा वर्षा‌ऋतू तरी!
काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत.
चाळीचाळीतून चिंब ओंली चिरगुटें झाली;
ओल्या कौलारकौलारीं मेघ हुंगतात लाली.
ओल्या पानांतल्या रेषा वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची रान दाखवितें नक्षी.
ओशाळला येथे यम, वीज ओशाळली थोडी,
धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोडी.
मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण निवतात दिशा-पंथ.
आला आषाढ-श्रावण आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने प्यावा वर्षा‌ऋतू तरी! 

लॉजिक नवीन पिढी साठी :

चातुर्मास : परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या चार मासांच्या काळास ‘चातुर्मास’, असे म्हणतात.  ‘नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असतांना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. शेतीतील पेरण्या ज्येष्ठात होतात आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात, अश्विनात पिकांची तोडणी होते, कार्तिकात मळणी होऊन देवोत्थानची वेळ येते. 

पृथ्वीवरचे रज तम् वाढल्याने या काळात सात्विकता वाढवणे गरजेचे असते. या कालावधीत पावसाचे दिवस असल्यानी धरतीचे रुपडे पालटलेले असते. फारसे स्थलांतर होत नाही. तसेच मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्य पण निराळ्या ढंगात सुरु होते. म्हणून कंद वांगी असे पदार्थ खाऊ नये असे म्हणतात. सात्विकता वाढवण्यासाठी उत्साह वाढवण्यासाठी या कालावधीत बरेच सण उत्सव साजरे होतात. निसर्गाची किमया पहा किती छान आखणी केलीय. 

चातुर्मास पाळणे म्हणजे निसर्गाला सहकार्य करून स्वतःचे जीवन सुखद  बनवणे हेच आहे.

दिव्याच्या आवसेला दीप पूजन करायची पद्धत आहे : त्यामागे दिव्याला तेज तत्व युक्त सात्विकता आणि चैतन्य मिळुन नकारात्मक शक्तींच्या आक्रमणांपासुन रक्षण होते हा आहे.

 पृथ्वीवरील सर्व सजीव-निर्जीव पदार्थ हे पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांमुळे निर्माण झाले आहेत. पंचतत्त्वांपैकी अग्नितत्त्वाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अग्नीचा गुण रूप असून अग्नीमुळे आपण समोरची वस्तू (रूप) पाहू शकतो. 'नेत्र हे ज्ञानेंद्रिय अग्नितत्त्वाशी संबंधित आहे. अग्नि आपल्या प्रकाशाने अंधःकाराचा नाश करून सत्याचे ज्ञान करून देतो. प्राणीमात्राच्या उदरात अग्नि 'वैश्वानर' या रूपाने वास करून अन्नपचन करतो. ग्रहमालेचा अधिपती सूर्य हा अग्नीचे रूप असून तो अखिल विश्वाचे भरण-पोषण करतो. वैदिक काळात अग्निदेवतेचे स्थान सर्वोच्च होते. ऋग्वेदात अग्नीला 'होता' असे विशेषण आहे. 'होता' म्हणजे देव किंवा शक्ती यांचे आवाहन करणारे माध्यम ! यज्ञात संबंधित देवतांना आवाहन केल्यावर अग्नि यज्ञातील हविर्भाग त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे अग्नीला देव आणि मानव यांना जोडणारा दुवा मानले गेले आहे. दिव्याभोवतीच्या वायूमंडलात कार्यरत असणाऱ्या रज-तम लहरींचे आणि त्रासदायक शक्तीचे दिव्याभोवती आलेले सूक्ष्म आवरण दीपपूजनाने नष्ट होते. त्यामुळे दिवा प्रज्वलित केल्यावर त्याच्या ज्योतीचा प्रकाश स्वच्छ, स्पष्ट आणि प्रखर दिसू लागतो. तसेच ज्योतही स्थिर रहाते आणि ती स्पष्ट दिसते. दिव्याच्या ज्योतीला काजळी लागण्याचे प्रमाणही न्यून होते. दिव्यातील देवतत्त्वाचे पूजन झाल्याने त्यातील देवत्व जागृत होऊन ते वर्षभर कार्यरत रहाते. दिव्याला पाहून नमस्कारासाठी हात आपोआप जोडले जाणे, दिव्याला पाहून भाव जागृत होणे, दिव्याचा प्रकाश ''अधिक तेजस्वी आणि चैतन्यमय झाल्याचे जाणवणे, ही सर्व दिव्यातील देवत्व जागृत झाल्याची लक्षणे अन् अनुभूती आहेत.


 

Tuesday, 13 June 2023

पत्रास कारण की...

१३.०६.२०२३

सलग दोन वर्ष तुझ्याच इच्छेने व कृपेने आळंदी ते पुणे पायी वारी आय टी दिंडी मार्फत पार पडली. पंढापूर पर्यतच्या वारीचा विचार करता २१ कि मी पायी वारी म्हणजे नखाच्या टोकावरचा अनुभव असा इतकाच म्हणावा लागेल. परंतु माझ्या सारख्या सर्वसामान्यास तो अनुभव पण भरपुर शिकवुन गेला. यावरूनच संपूर्ण पायी वारी करून घरी परतणारे पुण्यात्मे काय तेजाने झळकत घरी पोचत असतील याची स्पष्ट कल्पना आली.
आज मी माझ्या पालक, मालक, सखा, आणि विश्वचालक अशा अनाथांच्या नाथाला भक्तांच्या, परमप्रिय, आदरणीय, पूजनीय अशा तुला पत्र लिहून माझी वारी पूर्ण होण्यासाठी माध्यम ठरणाऱ्या सर्वाप्रती धन्यवाद कृतज्ञता पोचवत आहे. 
नखाच्या टोकाइतका पण प्रगल्भ अनुभव ज्या वारीत लाभला त्या वारीत जाण्यासाठी योगदान, मध्यम अथवा सहकार्य करणाऱ्या  अपरिचित परिचितांना धन्यवाद पोचवावा. 
 
वारी मधील आम्हाला जंगली महाराज देवळा पाशी पोचल्या नंतर सापडेल त्या रस्त्यान घरी पोचवलं,  त्या रिक्षा चालकांना  -  हे पांडुरंगा आमचे धन्यवाद व अनंत आभार पोचवावे. जंगलीमहाराज रोडवर त्या दिवशी रिक्षा मिळाल्याचा आनंद काही औरच असतो. मागच्यावर्षी रिक्षाचालकानं चक्क ऊतरून नमस्कार केला.  का? तर वारी करून आलो. यंदाच्या रिक्षाचालकान  वारीत सेवा म्हणुन घरी सोडल पण पैसे घेत नाही म्हणाला. मनापासून धन्यवाद. 

आय टी वारीत जेवणाची, शौचालयाची व्यवस्था करण्यास माध्यम ठरणारे सर्व माऊली मंडळी व सहकारी यांना तसेच वाटेत मुबलक पाणी देणाऱ्या सर्व हातांना हे पांडुरंगा धन्यवाद पोचवावे. 

तसेच वारीसाठी सुटी देणाऱ्या बाँसला,  घरी आल्यावर गरम उत्तप्पा देणाऱ्या सासुला,  सकाळी निघताना तयार सरबत देणाऱ्या नवऱ्याला, जवळ पोचल्यावर घरी नेण्यास येणाऱ्या मुलाला , घरपोच टाळ पोचवणाऱ्या मैत्रिणीला, पायी चालताना खांदयाला खांदा लावून एकत्रित पणे चालणाऱ्या  र्सव माउलींना मनापासून धन्यवाद पोचवावे. हे पांडुरंग तूच आमची नाळ आहेस. 

हे पांडुरंगा या सर्व माध्यम ठरणाऱ्या माझ्या माणसांना सुख समृद्धी आरोग्य व योग्य कर्म करण्याची बुद्धी प्रदान करा. या सर्वांच्यात अपरिचित असे दोन्ही वर्षी भेटणारे रिक्षाचालक जे परत भेटणार नाहीत त्यांना आमचा विशेष धन्यवाद पोचवावा.
पाठीराख्या पांडुरंगा आम्हावर अशीच मायेची पाखर राहु दया. "हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा...."

तुझीच
 गौरी माऊली.