Wednesday, 14 June 2023

७) आषाढ (जुन - जुलै) महिन्याची माहिती, मराठी दिनदर्शिका २०२३


 

आषाढमहिना महत्वं : भगवान विष्णूच्या पुजेचं महत्व आषाढ महिन्यात भगवान विष्णूच्या पुजेला विशेष महत्व आहे. याशिवाय याच महिन्यात दान पुण्याला खास महत्वं दिलं गेलंय. आषाढाच्या महिन्यातच गर्मी आणि उष्णताही असते, त्यामुळे छत्री, पाण्यानं भरलेली घागर, खरबुज, टरबूज, मीठ आणि आवळ्याचं दान चांगलं मानलं जातं. आषाढ महिन्यात पौर्णिमा तिथीच्या आसपास पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्र असते म्हणून या महिन्याला "आषाढ" असे नाव पडले आहे. आषाढालाच मराठीत आखाड असा दुसरा शब्द आहे.
 
आषाढमहिन्यातील सण :
गुरुपौर्णिमा : व्यास पौर्णिमा : व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.
 

दिव्याची आवस : आषाढ अमावस्या : भारतात दिव्यांचे  महत्व अति प्राचीन आहे. आषाढातल्या गर्द सावळा काळोख असताना हा दीप श्रावणातील ऊन पावसाची चाहूल देतो. वातावरणातील मरगळ, कोंदटपणा झटकून हा दिवस उत्साहानं कामाला सज्ज राहा असे सुचवतो. दीप पूजन या दिवसांनी मनास हुरूप येतो. जीवनातील अंधकार जाऊन ते उजळून जाऊ दे असेच जणू तो सांगत असतो.  दिव्याच्या आवसेला फार महत्व आहे कारण या दिवशी दिव्यामधल्या सूर्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रकाशाचे आणि ज्वलनातून प्रत्यक्ष अग्नी तत्वाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिव्याची साग्र संगीत पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. दीपावलीत दिवे सजावटीचे माध्यम असतात तर दिव्याच्या आवसेला दिव्यत्वाच्या  प्रतीकात्मकतेच ते माध्यम असतात. तेजाची पूजा हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. कृतज्ञता हा भाव महत्वाचा. जेव्हा तेजाची पूजा केली जाते तेव्हा मानवाचे जीवन उजळून निघतेच. 


आषाढमहिन्यातील यात्रा, जयंत्या :
 जगन्नाथ रथयात्रा : आषाढ शुक्ल द्वितीयापासून जगन्नाथ रथयात्रा प्रारंभ होते. रथयात्रेमध्ये बलराम यांच्या रथाला 'ताळध्वज' म्हणतात. देवी सुभद्रा यांचा रथाला 'दर्पदलन' तर भगवान जगन्नाथ यांचा रथाला 'नंदीघोष' किंवा 'गरुडध्वज' म्हणतात. हा रथ सर्वात मागे राहतो. ४५ फूट उंच आणि १६ चाकांचा असतो भगवान जगन्नाथ यांचा रथ, तिन्ही रथांचे आहे खास वैशिष्ट्य. हिंदू धर्मातील चार धाममध्ये जगन्नाथ पुरीचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार भगवान विष्णू रामेश्वरममध्ये स्नान, द्वारकेत शयन, बद्रीनाथमध्ये ध्यान आणि पुरीमध्ये भोजन करतात. भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतल्याशिवाय चारधाम यात्रा पूर्ण मानली जात नाही.
 
आषाढी एकादशी : महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात.हिलाच आषाढी वारी म्हणतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहू हुन तुकारामांची, त्रंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. याच एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात
 
आषाढी एकादशीलाच देवशयनी एकादशी म्हणतात. भगवान विषाणु योगनिद्रेत जातात तो हा दिवस. हरिशयनी/ आषाढी एकादशीला  एकादशीला योगनीद्रेत गेलेले भगवंत कार्तिक एकादशीला योगनीद्रेतुन बाहेर येतात हीच देवऊठणी एकादशी.
 
गीते, कविता, गाणी :
ध्यानमूलं गुरोर्मूर्तिः पूजामूलं गुरोः पदम्।   मंत्रमूलं गुरोर्वाक्यं मोक्षमूलं गुरोःकृपा॥
गुरूरादिरनादिश्च गुरूः परम दैवतम्।  गुरोः परतंर नास्ति तस्मै श्री गुरवे नमः॥
सप्तसागरपर्यन्तं तीर्थस्नानादिकं फलम्।  गुरोरडिध्रपयोबिन्दुसहस्त्रांशेन दुर्लभम्।।
हरौ रूष्टे गुरस्त्राता गुरौ रूष्टे न कश्चन।  तस्मात् सर्व प्रयन्तेन श्रीगुरूं शरणं व्रजेत्॥
गुरूरेव जगत्सर्वं ब्रह्म विष्णुशिवात्मकम्।  गुरोः परतरं नास्ति तस्मात्संपूजयेद्गुरूम्॥ 
गुरुपौर्णिमा 

आला आषाढ-श्रावण आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने प्यावा वर्षा‌ऋतू तरी!
काळ्या ढेकळांच्या गेला गंध भरून कळ्यांत;
काळ्या डांबरी रस्त्याचा झाला निर्मळ निवांत.
चाळीचाळीतून चिंब ओंली चिरगुटें झाली;
ओल्या कौलारकौलारीं मेघ हुंगतात लाली.
ओल्या पानांतल्या रेषा वाचतात ओले पक्षी;
आणि पोपटी रंगाची रान दाखवितें नक्षी.
ओशाळला येथे यम, वीज ओशाळली थोडी,
धावणाऱ्या क्षणालाही आली ओलसर गोडी.
मनी तापलेल्या तारा जरा निवतात संथ;
येतां आषाढ-श्रावण निवतात दिशा-पंथ.
आला आषाढ-श्रावण आल्या पावसाच्या सरी;
किती चातकचोचीने प्यावा वर्षा‌ऋतू तरी! 

लॉजिक नवीन पिढी साठी :

चातुर्मास : परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय. आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत होणाऱ्या चार मासांच्या काळास ‘चातुर्मास’, असे म्हणतात.  ‘नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असतांना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. शेतीतील पेरण्या ज्येष्ठात होतात आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात, अश्विनात पिकांची तोडणी होते, कार्तिकात मळणी होऊन देवोत्थानची वेळ येते. 

पृथ्वीवरचे रज तम् वाढल्याने या काळात सात्विकता वाढवणे गरजेचे असते. या कालावधीत पावसाचे दिवस असल्यानी धरतीचे रुपडे पालटलेले असते. फारसे स्थलांतर होत नाही. तसेच मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्य पण निराळ्या ढंगात सुरु होते. म्हणून कंद वांगी असे पदार्थ खाऊ नये असे म्हणतात. सात्विकता वाढवण्यासाठी उत्साह वाढवण्यासाठी या कालावधीत बरेच सण उत्सव साजरे होतात. निसर्गाची किमया पहा किती छान आखणी केलीय. 

चातुर्मास पाळणे म्हणजे निसर्गाला सहकार्य करून स्वतःचे जीवन सुखद  बनवणे हेच आहे.

दिव्याच्या आवसेला दीप पूजन करायची पद्धत आहे : त्यामागे दिव्याला तेज तत्व युक्त सात्विकता आणि चैतन्य मिळुन नकारात्मक शक्तींच्या आक्रमणांपासुन रक्षण होते हा आहे.

 पृथ्वीवरील सर्व सजीव-निर्जीव पदार्थ हे पृथ्वी, जल, अग्नी, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांमुळे निर्माण झाले आहेत. पंचतत्त्वांपैकी अग्नितत्त्वाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अग्नीचा गुण रूप असून अग्नीमुळे आपण समोरची वस्तू (रूप) पाहू शकतो. 'नेत्र हे ज्ञानेंद्रिय अग्नितत्त्वाशी संबंधित आहे. अग्नि आपल्या प्रकाशाने अंधःकाराचा नाश करून सत्याचे ज्ञान करून देतो. प्राणीमात्राच्या उदरात अग्नि 'वैश्वानर' या रूपाने वास करून अन्नपचन करतो. ग्रहमालेचा अधिपती सूर्य हा अग्नीचे रूप असून तो अखिल विश्वाचे भरण-पोषण करतो. वैदिक काळात अग्निदेवतेचे स्थान सर्वोच्च होते. ऋग्वेदात अग्नीला 'होता' असे विशेषण आहे. 'होता' म्हणजे देव किंवा शक्ती यांचे आवाहन करणारे माध्यम ! यज्ञात संबंधित देवतांना आवाहन केल्यावर अग्नि यज्ञातील हविर्भाग त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. त्यामुळे अग्नीला देव आणि मानव यांना जोडणारा दुवा मानले गेले आहे. दिव्याभोवतीच्या वायूमंडलात कार्यरत असणाऱ्या रज-तम लहरींचे आणि त्रासदायक शक्तीचे दिव्याभोवती आलेले सूक्ष्म आवरण दीपपूजनाने नष्ट होते. त्यामुळे दिवा प्रज्वलित केल्यावर त्याच्या ज्योतीचा प्रकाश स्वच्छ, स्पष्ट आणि प्रखर दिसू लागतो. तसेच ज्योतही स्थिर रहाते आणि ती स्पष्ट दिसते. दिव्याच्या ज्योतीला काजळी लागण्याचे प्रमाणही न्यून होते. दिव्यातील देवतत्त्वाचे पूजन झाल्याने त्यातील देवत्व जागृत होऊन ते वर्षभर कार्यरत रहाते. दिव्याला पाहून नमस्कारासाठी हात आपोआप जोडले जाणे, दिव्याला पाहून भाव जागृत होणे, दिव्याचा प्रकाश ''अधिक तेजस्वी आणि चैतन्यमय झाल्याचे जाणवणे, ही सर्व दिव्यातील देवत्व जागृत झाल्याची लक्षणे अन् अनुभूती आहेत.


 

No comments:

Post a Comment