श्रावण महिना महत्वं :
संपूर्ण भारतासाठी, नैऋत्य मान्सूनच्या आगमनाशी जोडलेला श्रावण महिना खूप महत्त्वाचा आहे. बरेच हिंदू प्रत्येक सोमवारी भगवान शिव आणि/किंवा दर मंगळवारी देवी पार्वतीसाठी उपवास करतात.
समुद्र मंथनातुन निघालेल्या विषापासुन भगवान महादेवांनी विश्वाला वाचवलं. कृतज्ञता म्हणुन विश्व श्रावणात भगवान शंकराची पुजा प्रार्थना करतं. जो सर्वांचं धोक्यापासुन रक्षण करतो व योग्य वागण्यासाठी प्रवृत्त करतो. ऊपवास पुजा व्रत यासाठी या महिन्यात निसर्ग पण सोईचा असतो. या महिन्यात करण्यात येणाऱ्या व्रतांमुळे वातावरण पवित्र होते. तसंच श्रावणातील या सणांमुळे भेटीगाठी वाढतात, सहवास वाढतो, आपापसातील संबंध दृढ होतात. सर्वत्र आनंद, उत्साह आणि जल्लोषात साजरा केला जाणारा हा श्रावण महिना आहे आणि म्हणूनच याला अनन्यसाधारण असे महत्व आहे.
महिन्यातील सण :
जिंवती पुजन श्रावणी शुक्रवार :
जरा जिवंतिका देवीची पूजा या दिवशी केली जाते. जरा म्हणजे म्हातारपण आणि जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी. म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता. दीर्घायुष्य मिळावे यासाठी हिंदूधर्मियांमध्ये ही पूजा केली जाते. श्रावणामध्ये स्त्रिया जिवंतिका पूजन करतात. जरा आणि जिवतिका या दोन पुरातन देवता आहेत. पुराणात असलेल्या सप्त मातृकांपैकी या दोन आहेत. माय लेकरांसाठी ही पुजा करते.
नागपंचमी :
कालिया नागाला धडा शिकवुन भगवान श्रीकृष्ण यमुना नदीच्या पात्रातुन वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी. बिळातील उंदरांना नाग नष्ट करतो, त्यामुळे नागदेवतेची यादिवशी शेतकऱ्यांकडून मित्र म्हणून पूजा करण्यात येते. यादिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये म्हणून जमीन खणली वा नांगरली जात नाही. जरी आपले शेत नसले तरी आपण शेतातल पिकलेल खातोच यासाठी ही पुजा करावी.
मंगळागौरी :
श्रावणातील मंगळवारी संसारातील सौख्य आणि प्रेम कायम राहण्यासाठी मंगळागौरीचे खास व्रत आहे. पहिल्या मंगळागौरीला आपल्या जवळच्या सवाष्णींना बोलावून हे व्रत पूजण्यात येते. पाच वर्षांनी हे व्रत पूर्ण करायचे असते. मंगळागौरीची पूजा करून उखाणे घेऊन संध्याकाळी फुगडी झिम्मा खेळुन रात्रभर जागारचं. पारंपरिक खेळ खेळायचे. माहेरून आलेली अन्नपूर्णा महादेव एकत्र पुजायचे. सासर माहेर दोन्ही घरी ही पुजा करतात. आनंद वाटला की वाढतो हेच या पुजेचे तात्पर्य ऑफ द स्टोरी .
रक्षाबंधन / नारळी पौर्णिमा :
रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा एक शुभ सण आहे. हा दिवस भाऊ-बहिणीच्या शुद्ध नात्याला समर्पित आहे. रक्षाबंधन हा शब्द रक्षा (संरक्षण) आणि बंधन (संबंध) या दोन शब्दांपासून बनला आहे. बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. रक्षाबंधनाला पवित्रारोपण असेही म्हणतात. आपल्यापेक्षा बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे. भावावरचे प्रेम बहीण राखी च्या माध्यमातून व्यक्त करते. प्रत्येक नात्याच्या भावना व्यक्त होण्यासाठी आपल्या पूर्वजांनी प्रत्येक नात्याला अनुसरून छान नियम आखून दिलेले आहेत.
श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी कोळी बांधव व समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवते प्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे. समुद्राचे आभार मानायचे असा हा दिवस. निसर्ग सतत देत असतो. मानवाने त्या निसर्गाचे आभार मानायचे हे महत्वाचे आहे.
शिवामुठ श्रावणी सोमवार :
दर श्रावणी सोमवारी तीळ, तांदूळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर अथवा शिवलिंगावर धान्य वाहण्यात येते. नवविवाहित महिला श्रावणी सोमवाराचे हे व्रत पहिले पाच वर्ष करतात आणि काही महिला तर आयुष्यभर हे व्रत करतात. देण्याचा नियम मुठी मुठीन शिकतो आपण. शिवा शिवा महादेवा... माझी शिवामेठ ईश्वरादेवा...
गोपाळकाला :
गोपाल म्हणजे गायीचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, लिंबाचे कैरीचे लोणचे, दही, ताक, हरभऱ्याची भिजलेली, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो, हा कृष्णास फार प्रिय होता. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्वजण वाटून खात असत. सर्व लोकांना एकत्र घेऊन जे जे पदार्थ असतील ते एकत्र करून काळ बनला जातो. एकात्मता दर्शवतो काला, दहिहंडी फोडली की एकत्रितपणे काला खातात.
कृष्ण जन्मानंतर दुसऱ्या दिवशी काला करायची पद्धत आहे. काही ठिकाणी गवळण काला दशावतारी खेळानंतर किंवा देवस्थानाचा रथोत्सव झाल्यानंतर होतो.
दहीहंडी :
जन्माष्टमीच्या दुसर्या दिवशी दहिहंडी असते.
दहीहंडीचे महत्त्व हेच की सर्व टीमवर्क, समन्वय, लक्ष केंद्रित आणि सामर्थ्य साधणे याबद्दल आहे. दहीहंडीसाठी गटा चा मानवी पिरॅमिड बनवला जातो आणि प्रत्येक पिरॅमिडमध्ये तब्बल नऊ थर असतात. खालच्या स्तरावर बळकट लोक असतात जे त्यांच्या खांद्यावर भार सहन करू शकतात आणि वरच्या स्तरावर एक उत्साही मूल असते जे हंडी पकडू शकतात आणि तोडू शकतात. जे लोक पिरॅमिड बनवतात त्यांना 'गोविंदा पथक' किंवा 'गोविंदा' म्हणतात. भगवान श्रीकृष्णाची या विधीमागील संकल्पना हीच की तरुण मनांमध्ये बंधुता, सामर्थ्य आणि समन्वय विकसित करणे आहे, जेणेकरून ते एकमेकांच्या पाठीशी उभे राहतील.
पिठोरी अमावस्या :
श्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. वंशवृद्धी, मुलांच्या सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी महिला व्रत ठेवतात. पिठोरी अमावस्या किती घरात साजरी केली जाते, ठाऊक नाही. पूर्वी घराघरात ‘पिठोरी’ची पूजा होत असे. पिठोरी अमावस्येचंच दुसरं नाव मातृ दिन. वंशवृद्धीसाठी ही पूजा केली जाते. या दिवशी बैलांना विश्रांती द्यायची. त्यांना ऊन पाण्याने आंघोळ घालायची , पुरणावरणाचा स्वयंपाक करून आधी त्याचे तोंड गोड करायचं. खूप ठिकाणी ‘ शिंगे रंगविली , बाशिंगे बांधिली , चढविल्या झुली ऐनेदार ‘ असाही बैलपोळ्याचा थाट उडवून देतात. बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक गावात शेतकरी बैलपोळा साजरा करतात.
अधिकमास :
अधिक महिन्याला विविध नावांनी संबोधले जाते. त्याला मलमास, पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरला जातो. पृथ्वीची सूर्याभोवती एक फेरी म्हणजेच ३६५ दिवस पूर्ण होते. व्यवहाराच्या सोयीकरिता आपण ३६५ दिवसांनी नवे वर्ष सुरू करतो. दर चार वर्षांनी येणारे वर्ष एक वाढीव दिवस घेऊन ३६६ दिवसांचे 'लीप वर्ष' म्हणून स्वीकारतो. पृथ्वीभोवतीची चंद्राची एक फेरी म्हणजे 'चांद्रमास'. एक वर्षाच्या कालावधीत १२ चांद्रमास पूर्ण होतात, यालाच चांद्रवर्ष म्हणतात. चांद्रमास प्रतिपदा ते अमावास्या असा २९.५ दिवसांचा असतो. त्यामुळे चांद्रवर्ष ३५४ दिवसांचे होते. याचा अर्थ चांद्रवर्ष है सौरवर्षापेक्षा ११ दिवसांनी लहान असते. हा फरक दरवर्षी वाढत राहू नये, याकरिता चांद्रवर्षामध्ये ठराविक कालावधीनंतर एक महिना वाढीव म्हणजेच 'अधिक' घेतला जातो. अधिक महिन्यात संक्रांत नसल्यामुळे चंद्रसूर्यांच्या गतीत फरक पडतो. यामुळे वातावरणातही बदल होत असतो. याचा आपल्यावर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून काही नियम व व्रते पाळावीत. यामुळे मनुष्याला सुख, शांती, समाधान मिळते, त्यांचे इच्छित मनोरथ पूर्ण होतात, त्यांची प्रगती होते. बाराही महिन्यांनी काढून टाकलेल्या त्या पापभागांपासून तेरावा महिना म्हणजेच अधिकमास उत्पन्न झाला. तो पापमय असल्याने त्याला मलिनमास किंवा मलमास असे नाव पडले. श्रीविष्णूच्या आणि पुरुषोत्तम श्रीकृष्णाच्या आशिर्वादाने तो मलमास पवित्र पुरुषोत्तममास बनला. चार वेदांनुसार भगवान विष्णु सर्व सृष्टीचे पालक आहेत. म्हणुन अधिकात श्री विष्णुची ऊपासना महत्वपूर्ण आहे.
बैलपोळा : आपण सर्वतः निसर्गावर अवलंबून आहोत. त्याला साथ कष्टकरी बैलांची असते. त्यांना धन्यवाद म्हणत आराम करायला लावून पूजा करून ती व्यक्त करायचा दिवस तो बैलपोळा.
विदर्भात यालाच तान्हा पोळा म्हणतात. या दिवशी काकडीफोड करतात. बहीणीन भावेला ओवाळुन पाठीवर काकडी फोडायची. नंतर नवीन आलेले काकडीचे पीक - काकडी खाणं सुरू करत पूर्वी. पोळा फुटला असही म्हटले जात असे. लहान मुल लाकडी बैलजोडी घेऊन देवळात व जवळच्या घरी पोळा मागायला जातात त्यांना कौतुकाने खाऊ दिला जातो.
लहान मुलांना शेतीचे व त्यात कष्ट करणारे बैल यांचे महत्व कळावे. आपल्या कृषीप्रधान संस्कृती विषयी त्यांनी कृतज्ञ रहावे ही शिकवण देण्यासाठीच कदाचित विदर्भात तान्हा पोळा पद्धत पूर्वजांनी पाडली असावी.
महिन्यातील यात्रा, जयंत्या :
भगवान श्रीकृष्ण जयंती :
भगवान श्रीकृष्णांचा जन्म मथुरेत श्रावण वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असताना मध्यरात्री झाला. भगवान विष्णू भूतलावर अवतरलेल्या क्षणाला निसर्गात ते दिव्य तत्व १००० पट जास्त असते. ती अनुभूती त्यावेळी जागरण केलेल्यांना जाणवते. जन्माष्टमीला भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेच्या भावपूर्ण अंतःकरणयुक्त पूजनाने सूक्ष्मातीत लाभ होतात.
कृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर, त्याचे बाल स्वरूप "बाळकृष्ण " म्हणून आंघोळ घालतात, सजवतात. नंतर पाळण्यामध्ये ठेवतात. त्यानंतर भक्त नैवेद्य दाखवुन अन्न ग्रहण करून व वाटून उपवास सोडतात. मानवजातीसाठी जन्माष्टमी हा शुभ दिवस आहे कारण भगवान श्रीकृष्णाचा जन्म या भूतलावर झाला. जो भगवान विष्णुचा पूर्णावतार मानला जातो. भगवान कृष्णाचा जन्मदिवस भारतात मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण ८ व्या दिवशी म्हणजे अष्टमीला साजरा केला जातो ज्याला कृष्ण पक्षाची अष्टमी म्हणतात. जन्माष्टमीचा आचार भगवान श्री कृष्ण हाच सांगतात की "जे काही भूतकाळात घडले ते चांगल्यासाठीच घडले, जे काही घडत आहे, ते चांगल्यासाठीच घडत आहे, भविष्यात जे घडेल ते चांगल्यासाठीच घडेल. जन्माष्टमीचे वैष्णव परंपरेत खूप महत्त्व आहे कारण ती त्यांच्या प्राथमिक पूज्य देवता विष्णूचा जन्मोत्सव मानतात.
संत ज्ञानेश्वर जयंती :
संत ज्ञानेश्वर यांचा आपेगाव औरंगाबाद येथे जन्म झाला. सर्वसामान्य जनतेसाठी भगवद्गीता मराठी भाषेत ओवीबद्ध करून ज्ञानेश्वरी स्वरूपात मांडणारे भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, योगी आणि तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जाणारे संत ज्ञानेश्वरांच !
गीते, कविता, गाणी :
आला श्रावण श्रावण, होई मनही स्वच्छंद, सर्वाच्या मनी दरवळे, भक्तीचा सुगंध.
इंद्रधनुष्याच्या बांधित कमानी, संध्येच्या गगनी श्रावण आला
कुरवाळित येतिल मजला, श्रावणातिल जलधारा, सळसळून भिजली पाने, मज करतिल सजल इशारा ...
(कविता, कवी -मंगेश पाडगावकर)
चल गं सये वारुळाला वारुळाला, नागोबाला पुजायाला पूजायाला (समूहगीत, गीतकार - ग.दि. माडगूळकर; संगीत दिग्दर्शक - सुधीर फडके; चित्रपट - जिवाचा सखा)
चार दिसावर उभा ओला श्रावण झुलवा, न्याया पाठवा भावाला हिला माहेरी बोलवा (कवयित्री : शांता शेळके)
लॉजिक नवीन पिढी साठी :
शिवामुठ का करायची ? आपल्याकडे जे असेल ते भक्तिपूर्वक प्रेमाने देवाला दिले तर देव ते आनंदाने स्वीकारतो. देण्याची वृत्ती मात्र हवी. धान्य देताना अनेक गोष्टी पूर्वज गुप्तपणे सांगतात की देण्याची सवय लावा, दिलेल प्रेमान द्या, त्यानिमित्तानं ती परमेश्वरी शक्ती माना अनुभवा. दिलेल धान्य एक घर पोसत होतं तेव्हा पुजारी लोकांचे घर यावर चालत होते. समाज असा गोवला होता की कोणही ऊपाशी राहु नये व सवय ही चांगली लागेल. देण्याच्या नियमाचा आनंद काय असतो हे अशा व्रतांमधुन समजतं. दिल्याने कमी होत निही तर वाढच होते. मग ते अन्न असल काय आणि ज्ञान असल काय. आपली हीच संस्कृती आहे. जी आपण पाळली तरच टिकेल. दानाचं महत्वं सांगते शिवामुठ.
जिवंतीका पुजा करायची पद्धत का आहे ?
त्यामागे खुप सुरेख ऊर्थ पूर्वजांनी बांधला आहे असे नीट बघितले तरच समजते. आईच लेकरांसाठी एकचित्त होऊन सकारात्मक स्पंद केंद्रित केले जातात. कोणत्याही योग्य गोष्टीसाठी मन एकाग्र करून भावना जमल्या की ती गोष्ट प्रत्यक्षात येण्यास मदत होते. या संदर्भातील समाईक प्रसंगचित्रच जीवतीच्या कागदात दिसतील. पूर्वजांनो खुप विचार करून केलेली आखणी समजण्यास आपणच कधीकधी कमी पडतो.
मंगळागौर का पुजायची?
मंगळागौर हे हिंदू धर्मातील नवविवाहित स्त्री ने करण्याचे एक व्रत आहे. माता, बुद्धी, विद्या आणि शक्तीरूपात असणाऱ्या देवीची उपासना करून तिच्यासारखेच गुण आपल्यामध्ये यावेत अशी प्रार्थना या पूजेच्या रूपाने करण्यात येते. श्री शिव आणि पार्वती हे आदर्श पती पत्नी म्हणून गृहस्थाश्रमाचे प्रतीक मानण्यात येते. त्यामुळे प्रत्येकाचा संसार त्यांच्यासारखाच व्हावा हा यामागे हेतू असतो. या पूजेच्यावेळी शक्तीतत्वाची आराधना करण्यात येते. लग्नानंतर ही पहिली पूजा असल्याने ही सामूहिकरित्या करण्यात येते. जेणेकरून सर्व बहिणी आणि मैत्रिणींना एकत्र भेटण्याचा आनंद यामध्ये मिळतो. मात्र पूजा केल्यानंतर मौन राहून भोजन करायचे असते. कारण यामध्ये मनाचा संयम महत्त्वाचा ही शिकवण देण्यात येते. तसेच या पूजेमध्ये माहेरच्या ज्येष्ठांचा मान करणे आणि आदर करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. नवरे का वगळतात सगळ्यातुन ? बायकांनीच का करायच?असं अनेकांना वाटतं. पण स्त्री जे तत्व आकृष्ठ करू शकते ती क्षमता तीच्यातच असते. मंगळागौरी पूजेच्या रात्री जागरण करून सकाळी पारणे करायचे. याला पण नक्कीच महत्व आहे.
कालांतराने मंगळागौर जागरण खेळ संपुष्टात येतील यावर एक छान ऊपाय आहे. आपल्यातल्याच ऊत्साही महिलांना जागरणाला बोलवुन ते पारंपारिक खेळ खेळायचे. इंद्राणी ग्रुप, पुणे या गटातील महिला ऊत्तम मदत करू शकतील. मंगळागौरीसारखा कौटुंबिक सोहळा अविस्मरणीय होण्यासाठी मोबाईल नंबर ९८८१२००३९५ वर बोलु शकता.
नागपंचमी ला नागाची पुजा का करायची?
नागपंचमी सणाचा केवळ पुजा हेतु नाही. त्याचे सखोल महत्त्व आहे. नागाचे, सापाचे समजवून घेतले पाहिजे. आपल्या भौतिक शरीर आपण कोण आहोत याच्या आंतरीक पैलूशी आणि पेशींची हालचाल आणि आपल्या शरीरातील रक्तप्रवाहाशी संबंधित आहे, ते सापाशी नागाशी संबंधित आहे. कुत्रा (श्वान ) आणि कोंबडा(पक्षी) श्रवण, वास, पाहणे आणि जाणवण्याच्या संवेदनांना तीक्ष्ण करण्याच्या प्रक्रियेचे प्रतिनिधित्व करतात तर नाग साप कोब्रा इंद्रियांना न समजलेल्या परिमाणाचे प्रतिनिधित्व करतात. यामुळेच योग संस्कृतीत सापाकडे सर्वाधिक लक्ष दिले गेले आहे. जिथे पंचेंद्रिये काम करत नाहीत, तिथून सापाचे /नागाचे काम सुरू होते. जीवनाच ध्येय समजण्यासाठी नाग समजुन घेणे मगच त्याची पुजा का करणे गुढ ऊलगडेल. शोधत जाल तस तस ऊलगडत जाईल. कुंडलीनी शक्तीच प्रतिक आहे कोब्रा. नागदेवतेची पुजेला आद्ध्यात्मिक महत्व आहे.
राखी पौर्णिमा का पाळायची ?
राखी बांधताना आध्यात्मिक भावना असण्याचे महत्त्व आहे. या दिवशी भाऊ बसलेल्या आसनाखाली रांगोळी काढली जाते. ही अध्यात्मिक रांगोळी शुद्ध फ्रिक्वेन्सी सोडते ज्यामुळे आजूबाजूचे वातावरण सात्विक बनते. या रांगोळ्यांना परमेश्वरा कडून दहा टक्के ऊर्जा मिळते जी आसनावर बसलेल्या भावाला मिळू शकते. यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास मदत होते. राखी बांधल्यानंतर ताटात ठेवलेला तुपाचा दिवा भावासमोर ओवाळला जातो. तुपाचा दिवा लावल्याने तेज या नावाने ओळखले जाणारे अग्नी तत्व उत्सर्जित होते जे भावामध्ये निरपेक्ष अग्नि तत्व वाढवण्यास मदत करते. तुपाच्या दिव्यामध्ये देवाकडून येणारी दैवी ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता असते. ज्योतीमध्ये देवाची दैवी चेतना लक्षणीय प्रमाणात सक्रिय आहे. तुपाच्या दिव्याची ही ज्योत नकारात्मकतेला जाळून टाकते. स्त्री तत्वात असलेले सत्व भावासाठी उपयुक्त ठरते म्हणून बहीण भावास राखी बांधते ओवाळते. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे. ही यामागची मंगल मनोकामना असते. राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला बांधून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे. नाती बांधून ठेवण्यासाठी पूर्वजांनी खूप सुरेख नियम आखून दिलेले आहेत. भारतीय समाजात ऐक्य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकांत रूढ झाला. या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि शिवाय त्या बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीस राखी बंधू शकते. या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम, पराक्रम, सय्यम आणि साहस. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं. पूर्वजांनी भारतीय संस्कृती मध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे. आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे. हिंदू संस्कृती विविध सण साजरे करत करत निसर्गाचे आभार मानायचा शिकवते. धर्म पाळायलाच हवा. कृतज्ञता व्यक्त व्हायलाच हवी. पूर्वजांचे अनंत आभार मानायला हवेत. आयते आखून दिले आहे. आपण समजून ते फक्त पाळायचे आहे.
श्रावण का पाळायचा ?
हिंदूंसाठी श्रावण महिना हा उपवासाचा महिना आहे. या महिन्यात पावसाळा असतो. पावसाळ्यात सूर्यप्रकाशाच्या अभावामुळे आपली पचन शक्ती कमकुवत होते आणि म्हणूनच मांसाहार टाळणे चांगले. उपवासादरम्यान लोक जे खातात ते हलके आणि पचायला सहज असते. तसेच या दिवसात अनेक जलजन्य रोग देखील होतात. काही प्राण्यांचे प्रजनन दिवस पण हेच असतात आणि प्राण्यांच्या मांसापासून संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात मांसाहार खाणं वर्ज असा नियम पूर्वजांची केला असावा.
No comments:
Post a Comment