हर हर महादेव! बम बम भोले !
संधी आली की देवदर्शन करून घायायचं ठरवलय मी. संधी येते म्हणजेच बोलावणं येतं असच मी समजते.
२०२२ डिसेंबर महिन्यात इंदोरला जाण्याचा योग आला आणि मध्य प्रदेशातली ऊरलेली ज्योतिर्लिंग करण्याचा मानस पुरा होणार या कल्पनेनं आनंद झाला.
योगायोगान ट्रेनच बुकिंग पण पुणे-खंडवा असच मिळालं. रात्रभराचा प्रवास करून खंडवाला सकाळी ८ वाजता आम्ही पोचलो.
पोचल्यावर मुलाला फोन केला तर ऊत्तर आलं "जय किशोर दा!" हो मला पण समजल नव्हतं, मग म्हटला "सुप्रसिद्ध गायक किशोरकुमार यांच्या जन्मभुमीवर पोचलीयस ना तू आई" किशोरदांच घर म्युझिअम म्हणुन सर्वांना बघायला आहे. खंडवा स्टेशनपासुन कॅबनी मोजुन आठ मिनीटांवर आहे. भक्तांनी जरूर पहाव असच आहे.
खंडवा ते ओंकारेश्वर कॅब केली होती. कधी एकदा रूम मिळतेय , सामान ठेवतेय आणि नर्मदा मय्या दर्शन घेतेय अस झालं होतं.
हा रस्ता सिंगल रोड होता, वाहनांची गर्दी भरपूर तसेच मोठाले डोंगर फोडुन हमरस्ता करण्याच काम ही जोरात सुरू होतं, त्यामुळे प्रचंड धुळ आणि सतत डायव्हरशन होतं. डोंगर ईतका खोलवर खणलेला दिसत होता की चार रंगाचे मातीचे स्तर दिसत होते. दगडांचा सद्ध्याच्या चांदणीचौका सारखा पसाराच डिकटो. पावसाळ्यात मात्र हा रस्ता सुरेख दिसत असणार, गव्हाच, लाल मिरचीच पिक बरच दिसत होतं. लहान काय मोठी काय सगळ्या दुकानांत कचोरी, समोसे आणि पोह्यांचे ढिग होते.
सनावद गावाशी आम्ही पोहे खाऊच म्हणुन थांबलो. मस्त ताव मारला, मी तर डबल चहा घेतला. ईतक्यात समोर हरभरे म्हणजे घाटे काढलेली भाजुन देणारी गाडी दिसली. लहानपणच आठवलं मला, हात काळे झालेली बकरी सारखे हरभरे खाणारी मी मला आठवली.
मजा आ गया|
हो आता मी इंदोरला होते ना!
बघता बघता ओंकारेश्वर आल पण, आम्ही गुगलवर शोधत होतो तेव्हा श्रीक्षेत्र शेगाव संस्थानचा भक्तनिवास ईकडे आहे अस सापडल होतं, दिवसभरासाठी खोली मिळेल का बघु म्हणुन आम्ही खंडवाहुन तिकडेच ऊतरलो. खोली मिळेल का दिवसभराची ठाऊक नव्हतं म्हणुन मुख्य दाराबाहेरच थांबुन जवळच खोलीची चौकशी केली. कृष्णा नामक प्रसन्न व्यक्तिशी बोलण झालं. खोली नाही मिळाली तर याला सांगु अस ठरलं. मग आत गेलो पण अकरा वाजता गजानन महाराजांच्या कृपेने चार वाजेपर्यंत खोली मिळाली. देताना एक दिवस असच देतात पण नोंदणीत चार लिहायच म्हणजे आपल्या सारख्या ईतर भक्तांना ती वापरता येते.
अतिशय स्वच्छ आणि शिस्तीत काम सुरू होतं, काही क्षण वाटल मी शेगावमधेच आहे. सेवेकरी लोकांचे मनापासुन धन्यवाद.
ईकडे आल्यावर मला समजल की हे भक्त निवास ओंकारेश्वर ला कसा?
महाराजांच्या कृपेने नर्मदा मय्यानं वाचवलेली गोष्ट ईकडे घडली ते ठिकाण म्हणुन हे आहे. या आवारात आदरणीय अहिल्याबाई होळकर यांचं देऊळ पण आहे. धप्प पांढरी, कर्तृत्ववान प्रसन्न हावभाव अशी मूर्ती पाहुन कोणाच्या ही अंगात ऊत्साह सळसळेल.
मला माझ्या भाग्याच खुपच कौतुक वाटत होतं.... पवित्र स्थल श्रीक्षेत्र ओंकारेश्वर, नर्मदा मय्याच्या पाण्यानी स्नान आणि ते पण आपल्या सारख्या भौतिकात राहणार्याना जपण्यासाठी महाराजांच्या कृपेने गरम मिळालं.
हर गंगे भागिरथी ऊमा पार्वती पार्वती पते हर हर महादेव!! अतिशय प्रसन्न आणि हलक वाटत होतं, हवामान पण सुखद अस बेताच्या गारठ्याचच होतं. खरतर या दिवसात ईकडे कडक गारठा असतो. पटकन आवरून ओंकारेश्वर मधलं काय काय बघायचं ठरवलं आणि छोटी सॅक घेऊन निघालो.
श्री मामलेश्वर ज्योतिर्लिंग चालत पाच मिनीटावर होतं. पांडवांनी बांधलेलं हे देऊळ असा ऊल्लेख बरेच ठिकाणी मिळतो. लालसर पिवळा दगड असलेल देऊळ ऊठावदार दिसतं. देवळाच्या आतील भिंतीवर स्तोत्रं कोरलेली दिसतात. आतील शिवलिंग कडेनी पितळी आहे . गर्दी होती पण तरी दर्शन छान झालं. शिवलिंगास हात लाऊ देत होते. तो ओलसर पण थंडगार स्पर्श अदभुत अनुभुती देऊन जातो. मागे देवी शक्तीची मूर्ती आहे. बाहेर पाषाणातला दणकट नंदी आहे. देवालयात आत जायचा दरवाजा फारच छोटा आहे.देवळातील खांब भिंती कोरीव काम केलेल्या आहेत.नर्मदा नदी किनारी दक्षिणेस हे देऊळ आहे. मुख्य देवळाबरोबरच शेजारी छोटी तीन देवळं आहेत. दर्शनाच्या ओळीत थांबल्यान ती आतुन बघु शकले नाही. जय भोलेनाथ, बम बम भोले अशा आवाजात ओळ कधी सरकते समजतच नाही. अर्थात ढकला ढकली, मधे घुसणे हे होतच होतं. असो...
पुढे गोमुख घाटाकडे आम्ही निघालो. मोठाल्या ऊंच ऊतरत्या पायरीवरून पाच मिनीटात गोमुख घाट येतो. घाट मोठा व स्वच्छ आहे. बोटीची फेरी करा म्हणुन ईतके लोक विचारतात की लक्षपूर्वक घाट बघावा लागतो.
गोमुख घाटा जवळच विष्णु नारायण देऊळ आहे. छान वाटतं बघुन. ईकडे प्रत्येक देवळात पोचताच वेगळ वेगळं वाटतं. भावनिक अनुभुतीचे बदल चढऊतार सूक्ष्म का होईना पण जाणवतातच... त्यात हवा मोकळी व ऊल्हासीत असतेच त्यामुळे आधीच आपण ताजेतवाने असतो हा नैसर्गिक बदल पूरक ठरतो.
गोमुख घाटावरूनच बोट करून पुढ जायच ठरवलं. मोठ्ठ नर्मदा मय्याच पात्र ओलांडुन पलिकडे जायचं ५०.०० रू. नर्मदा कावेरी संगम फेरी १५०.०० रू नुसतं ओंकारेश्वर घाट दर्शन १५०.०० असा विविध आकार घेतात. बोटीचा अनुभव घ्यावाच घ्यावा.
अहाहा! काय सुखद अनुभव होता तो.... दुपारी दीडचं ऊन होतं ते पण वाटतच नव्हतं.
दोनतीन घाट मधे मधे लोक बोटीतुन ऊतरत होती. आम्ही कोटीतीर्थ घाटावर आम्ही ऊतरलो... वेध ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाचे लागले होते.
परत घाट चढुन वर गेलो ती गल्ली पुण्याच्या तुळशीबागेचीच ठवण करून देत होती. चपला स्टँड पासुन सुमारे अडीच तासाच्या अथक प्रतिक्षेनंतर दर्शन होतं. दर्शनाच्या प्रतिक्षेत असताना अनंत प्रकारचे भक्त दिसतात. प्रत्येकाचे भाव वेगवेगळ्या प्रकारे पण अनोळखी असुनही त्या कालावधीत दर्शनास आसुसलेले भक्त या लेबल खाली एकच होऊन जातो आपण.
एक भडजी भरलेले माठ घेऊन चक्क पाणी देण्याच काम निरपेक्ष भावनेन करत होते. देताना म्हणत होते, "पैसे नही चाहिये मय्या ही तो है ऊसने भक्तों की तृष्णा बुझाने को बोला है|" प्रत्येकाची भक्ती एकच पण मार्ग वेगवेगळे.
या वर चढत्या क्रमान असणार्या पायर्याच्या ऊजवीकडुन नदीकिनारीचा मार्ग आहे. तिकडे जवळच शंकराचार्य गुफा आहे. फार वेळ ईकडे देता आला नाही पण शांत जागा. चालता चालता ईतक झपकन जाते ही जागा की लक्षच ठेवावं लागतं.
आदी शंकराचार्यांना त्यांचे गुरू श्री गोविंद भगवतपद यांची प्रथम भेटलेली ही गुफा आहे. आणखी बघण्यासारखं खुप आहे १२~५ वेळ कमी पडला.
जाताना जुन्या मोठया पुलावरून गेलो. डोळे भरून नर्मदा मय्याच साजरं रूप डोळ्यात साठवत साठवत फोटो काढत आम्ही अन्नपूर्णा देवी देवळाच्या रस्त्यावर आलो. विराटरूप दर्शन विष्णुचं देऊळ पण बघण्या सारख आहे.
तिकडची थाळी घेऊनच जेवलो तेव्हा साडेचार वाजले होते. आलो तोच घाट चढताना समजलं एकेक पायरी किती ऊंच आहे ते.
नागरघाट, अमर घाट, चक्रतीर्थ घाट, समीक्षा घाट, ओंकार घाट, गोमुख घाट, ब्रहामपुरी घाट, भरपुर आश्रम, घाट आणि देवळं जस २४ अवतार असलेल देऊळ, गौरी सोमनाथ देऊळ, ओंकार मांधाता देऊळ, बेट बघण्या सारख आहे.
अशी अनेक पाहण्या सारखी ठिकाणं आहेत. एक दिवस एक रात्रच हवी सगळं बघायला. ईकडे आकारानं मोठ्ठी माकडं बरीच आढळली. कधी समोर येतील भरवसा नाही. खाण्याच्ये वस्तु जपुनच वर धरणे ऊत्तम.
मनात महादेवाची बारा ज्योतिर्लिंगातली ओंकारेश्वरची छबी घेऊनच भक्त निवासमधे आलो. श्री गजानन महाराजांचं दर्शन घेतलं. गर्भगृहात दोघच जण होते, बाहेर भजन सुरू होतं. देवाला आळवणारे शब्द मधुर होते. मन मानत नव्हतं निघायला. श्री गजानन विजय ग्रंथाची एक पोथी घेतली आणि मुख्य दारापाशी आलो.
ओंकारेश्वर ते इंदोर कॅब बघत असताना सकाळचा कृष्णा धावत आला "साहेब अजुन खोली नाही मिळाली? " "आम्ही आता कॅब शोधतोय, जवळच दिसतेय पण तो सवारी घेत नाहीये" अस म्हणताच तो म्हटला एक नंबर लिहुन घ्या, त्याला फोन करा- त्याच नाव आहे 'संतोष'. तो मदत करेल, त्याला सांगा कृष्णानी नंबर दिलाय. नंबर टिपुन घेतला आणि मी स्तब्ध ऊभी राहिले..... परमेश्वर कसा कधी कोणत्या वेशात मदत करेल सांगता येत नाही. त्या पावनभूमीत तो मला भगवान श्रीकृष्णासारखा पाठीराखाच वाटला.
मनोहर अनुभुतीचे स्पंद घेऊनच निघतो आपण ...
ओंकारेश्वर ते इंदोर प्रवास छान झाला.
इंदोरला होळकरांचा वाडा पाहण्याची प्रचंड ईच्छा होती ती आज पुरी झाली. जे जे वाचलेल ते ते पाहत होते. मालवा प्रांत तसेच होळकर वंशाचा इतिहास सतत वाचनात आला होताच त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मालिका बघत ते ठिकाण पाहायचा मानस प्रबळ झाला होता.
अहिल्याबाई होळकर यांचा वाडा खुप छान जतन केलाय, देवघर तर काय सुरेख होतं. ताजी पुजा झालेली समजत होती. वरचा मजला म्युझिअम केलय ते बघायलाच तासभर हवा.
शांत चित्ताची आहिल्याबाईंची बैठी मूर्ती आणि तीनेक फुट दगडातल शिवलिंग लक्ष वेधक वाटलं. राजवाडा बघुन छप्पन दुकानला गेलो. अनेक प्रकारचे गजक घेतले. गराडु नामक पदार्थाची नवी ओळख झाली. हा साधारण सुरणाचा चुलत भाऊ. जीरावन पावडर बरोबर मिटक्या मारत संपतो.
सराफा बाजार ची मजा रात्रीच... जोशींचा दहीवडा न खाता जातच नाही कोण पण म्हणे. तसच माहेश्वरी सिल्क साडी घ्यायचीच. आपल्याला सगळीकडे हल्ली सगळे सिल्कचे कपडे मिळतात पण ज्यात पिकतं त्यातच घेऊन त्या कारागिरांची कदर केली जाते अस मला वाटतं. हे काम मी माहेश्वरला केलं.
फार वेळ इंदोरमधे न घालवता आम्ही श्री क्षेत्र ऊज्जैनला दुपारीच निघालो.
***************
संध्याकाळी पावणेपाचला पोचलो असु. कॅबनी जास्तीत जास्त जवळ म्हणजे भारतमाता देवळाजवळ सोडलं. महाकाल लोक मधे काॅरीडोर बघत महाकालेश्वर ज्योतिर्लिंग देवळाजवळ पोचलो.
महाकालेश्वर मंदिर पाच मजली असून त्यातील खालील पहिला मजला हा जमिनीत आहे. या शेजारी रुद्र्सागर सरोवर आहे. मुख्य गर्भगृहा समोर सभामंडप बराच मोठा आहे त्यामुळे लांब ऊभ राहुन पण छान दर्शन होतं. शांतपणे पाच सात मिनीटं न गडबड करता दर्शन झालं.
कुठ बघु ...काय बघु अन काय नको ...अस होतं ओळीत ऊभ असताना. कोणत्या वळणावर भोलेनाथ दिसणार? नजरेतली शोधकता वाढते... मन शांत करत नमामि शमीशान म्हणत असतानाच डावीकडे काळभोर स्वयंभु शिवलिंग दिसतं, समोरच्या चौकात मस्त नंदी विराजमान आणि बरोब्बर मागे आपण येतो.
कच्चे दाणे ढब्बु साखरफुटाणे प्रसाद अतिशय प्रेमान हातावर येतो. भरपुर गुरूजींचा वावर होता पण कामात सुसुत्रता जाणवली. पाच सहा पायर्या ऊतरून येई पर्यंत मनभर दर्शन होतं.आम्ही गेट नंबर चारनी दर्शन घेतलं. मोबाईल चपला ठेवण्याची ऊत्तम व खात्रीशीर सोय होती.
भारावलेले चार जीव लगेचच कालभैरव देवळाकडे प्रस्थान झालो. कोण कुठल्या मावशी आणि मी जगाच्या दोन टोकावरच्या, पण योग होता एकत्र महाकालेश्वर ज्योतिर्लिंग दर्शनाचा. कोणी असच भेटत नसं परमेश्वराचं प्लॅनींग त्यालाच ठाऊक. हर हर महादेव!
येता जाताची रीक्षा ठेवल्यामुळे चपला रीक्षातच काढुन क्षिप्रा काठच्या कालभैरव दर्शनासाठी बारीत ऊभे राहिलो.
ही भली मोठी रांग पण झपाट्याने सरकत होती. अंधार होत चालला होता.
गडाच्या दारासारखं प्रवेशद्वार दिमाखात ऊभं होतं. आत जाताच कालभैरव व माँ कालीच गाण ऐकु आलं. शब्द नवीन होते पण चाल ठेक्याची होती.
फोटो काढण्यास मनाई होती.
जेजुरीच्या खंडेरायाची आठवण झाली. अघोरी पंथाचे आणि काही जण कुलदैवत आहे म्हणुन तर काही आमच्या सारखे म्हणजे महाकालेश्वर दर्शन कालभैरव दर्शना नंतर पुर होत मानणारे लोक तिकडे येतात. अंधार पडायला लागलेला मग जवळची क्षिप्रा नदी पाहण्याच रद्द केलं. परत महाकाल लोक पाशी रीक्षान आलो.
बाहेर आलो तर लायटींग सुरू झालेल होतं.
महाकाल लोक मधेच हरीसिद्धी शक्तीपीठ, सिंहासन बत्तीशीचे ठिकाण, जवळच सांदिपनी आश्रम , भारतमाता देऊळ न चुकता बघण्यासारख आहे.
महाकालेश्वरची भस्म आरती बघण्यासारखी असते तो श्रृंगार सकाळी बघु शकतो. आम्ही संध्याकाळी गेलो. कालभैरव दर्शन करून आलो तर बाहेर टीव्हीवर श्रृंगारा नंतरची आरती मिळाली.
संधीकाली परत दर्शन झालं. महाकाल लोक फिरत फिरत मुख्य दाराशी आलो. मन मानत नव्हतं पण कॅबवाला ऊभा होता निघावच लागलं. परत इंदोरला जाताने कॅबमधे बसल्यावर जाणवलं की पाय बोलतायत.
इंदोरची काम करून दुसर्या दिवशी साडेतीनच्या कॅबनी माहेश्वरला निघालो. ईतके दमलेलो हलकीशी डुलकी घेतो तोच धामनोद जवळ आलो. हिरवा निसर्ग, हवेत गारवा, थोडासा खेडेगावचा माहोल मस्त वाटत होतं. अगदी अहिल्याबाई किल्ल्याच्या पायथ्याशी पार्किंग मधे पोचलो. सामान कॅबमधेच ठेऊन किल्ल्याकडे कूच केलं.
या प्रवासातले हा शेवटचा टप्पा होता. तीव्र चढ होता नंतर ऊंच पायर्या. पन्हाळगडा सारखं वर गाव वसलेलं दिसलं. माहेश्वरी साडीची गल्लो गल्ली घरगुती दुकानं होती. मधेच दोन चार सुधारीत दुकान पण दिसली.
माळवाची होळकर गादी वाड्यात आहे, एकदम शांत परिसर. पुर्वजांचे फोटो वस्तु या जुन्या वास्तुत जतन केलेल्या आहेत. वाड्याच दार सहाला बंद होतं. म्युझिअम स्वरूपात आपल्याला पाहता येतं. आम्ही नशिबवान ठरलो अर्धा तास आधी पोचलेलो. वाड्या बाहेर मोठ्ठीच्या मोठी अहिल्याबाईंची मूर्ती आहे. तीची नजर पाहताच मन ऊचंबळुन येतं. क्षणभर थांबल्या शिवाय मी पुढं जाऊच शकले नाही. शेजारी मारूतीच देऊळ दिसल मी गेले नाही. घाटावरचा सूर्यास्त हुकवायचा नव्हता.
कधीतरी कल्पना केलेला क्षण की माहेश्वर घाटावर आम्ही दोघं नर्मदा मय्यासमोर आहोत... आज तो क्षण मी प्रत्यक्ष जगत होते.
काढु का फोटो? म्हणत सहकार्य केलेला पण हौशी होता, ऊगाच फोटो छान नाही आला. सगळ कस जुळुन आलेलं.
मनाप्रमाणे मय्याची पुजा झाली. थंडगार पावन पाण्यानं मन व शरीर ताजतवानं झालं. काठावर सूर्यास्त पहात वेळ पुढे सरकत होता.
नर्मदे हर! नर्मदे हर! नर्मदे हर!
घाटावरची देवळ बघत घाट फिरून परत वर आलो. आता चहाची निकड जबरदस्त होती.
परत ऊतरताना कुल्हडमधे चहा घेतला, मस्त माहेश्वरी साडी, ड्रेस खरेदी करून मोठ्ठे पेरू घेतले आणि पेरू खात खात गड ऊतार झालो.
सामानासकट कॅबमधे ड्रायव्हर वाटच बघत होता. तीन दिवस कसे गेले समजलच नाही. धामनोद ते पुणे बसनी परत येताना मन मात्र नर्मदा मय्याच्या घाटांवरच रेंगाळत होतं......
या प्रवासात सहकार्य केलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वांना मनापासुन धन्यवाद!
परमेश्वराची ईच्छा होईल तेव्हा पुढची ज्योतिर्लिंग होतीलच मला खात्री आहे.
हर हर महादेव ! नर्मदे हर!
सौ. गौरी अनिरूद्ध पाठक
सुरेख
ReplyDeleteधन्यवाद
Deleteछान अनुभव.....
ReplyDeleteधन्यवाद
Deleteजय गजानन. खरोखरच छान आणि विस्तृत वर्णन. कौतुकास्पद
ReplyDeleteमनापासून धन्यवाद
DeleteKhup chhan
ReplyDeletethank you so much
Deleteगौरी, खूप छान आणि सविस्तर लिहीले आहे. सोबत फोटो असल्यामुळे मजा आली वाचताना. तुझ्याबरोबर असल्याचा अनुभव घेतला तसेच तिथे गेल्यावर काय आणि कसे बघायचे ते पण कळले. खूप खूप धन्यवाद.
ReplyDeleteमनापासून धन्यवाद
Deleteज्योतिर्लिंग चे प्रत्यक्ष दर्शन घडले असे वाटले. संपूर्ण प्रवासाचे अनुभव सुंदर रित्या मांडले आहे जणू आम्हीच वाचता वाचता सगळे अनुभवले
ReplyDelete