१) नाव नसलेली भाषा आणि आपले नसलेले आपले.
आज काल समोर चुका सांगितल्या तर त्या समजत तरी नाहीत किंवा त्या चुका वाटत पण नाहीत किंवा त्यांना त्यात पडायचं पण नसतं - हो आपण बरं आणि आपलं घर बरं असा दृष्टिकोन असतो बरेच जणांचा.
पण धकाधकीच्या या जीवनात काल असे दोन किस्से घडले कि मनावर हळुवार फुंकर घातली गेली. जणू काही कान्हाजीनी सुचवलं कि दूरवर पाहायला शिक न समजणारी लोकं, तस वागताना निबर जगणारी माणसे विसरून जायला शिक.
काल मी माझा आवडता गर्द हिरवा पंजाबी ड्रेस घातला होता. दिवस खूप छान सुरु झाला होता. कामावर पण नेहमीप्रमाणेच वेळेत निघाले होते. माझी रुपेरी ज्युपिटर आणि मी सिग्नल ला उभे होतो. उजवीकडे एक सोज्वळ पंचविशीतली मुलगी पण मागून आली. डावीकडे फटफटीवर कानात हेडफोन घालून त्रासात चिंतेत असलेले तरुण मुलगा होता. जगाचं भानच त्याला नव्हतं. त्याच्या अगदी जवळ बस आली आणि क्षणात सिग्नल तोंडाला बसनी. ती बस त्याच्या इतक्या जवळून गेली कि उजवीकडचे आम्ही सगळे आता काय होतंय याच ?? असच बघत डोळे मोट्ठे करून आं वासून होतो. मोठा सुस्कारा सोडत सगळे काय बसवाला आहे ? कशी नेली गाडी देवा रे! असे बोलत होतो. यात तो मात्र अनभिज्ञ होता. शेजारची आणि मी बोललो काय मुलगा आहे हा.... काय बेतलं होतं आज याच्यावर याची काहीच कल्पना नाही याला. तरी याचे वादाचे हो हो तसे नाही असेच सुरु होते. इतक्यात उजवीकडची मुलगी मला म्हटली कि तुमचा ड्रेस खूपच मस्त आहे ताई. आश्चर्याने मी झपकन खाली बघितलं कि कोणता ड्रेस आज घातलाय ते. ती म्हणाली कि पॅटर्न पण मस्त शिवलाय तुम्ही. मी धन्यवाद म्हटलं. दोघी पण खूप छान हसलो. या पाच सात मिनिटात इतका काही शिकवलं कान्हाजीनी काय सांगू. टाटा करत सिग्नल सुटल्यावर आम्ही पुढे गेलो.
दोन चौक झाल्यावर एक अनारकली घेराचा ड्रेस घातलेली मुलगी माझ्या पुढे मला दिसली. मी माझ्याच विचारात होते. वीस बावीस वर्ष कामावर जातानाचा रास्ता पाठ होऊन जातो. आपोआपच आपण पोचतो. इतकयात माझ्या लक्षात आलं कि तिचा ड्रेसचा घेर चाकात जाणार आहे. ती खूप घाईत दिसली. मी मागून खूप हॉर्न वाजवला. काही क्षणात तिला ते समजलं. मी हेल्मेटमधून डोळे गाडीच्या खाली बघ असे निदर्शनास आणून दिले. तिनीपण मन हलवून समजल्याची खूण पटवली. तत्क्षणी तो फलकार सावरत परत गाडीच्या आरशातून मला डोळ्यांनी भुवयांच्या ओके आहे ना? असा विचारलं. मी पण पटकन मान डोलावली. त्याच आरश्यातून तिनं डोळे मिटून मान खाली करत धन्यवाद पोचवलेलं पण मला समजलं. माझ्याकडून पण प्रतिक्षिप्त क्रिया झाली मान डोकावण्याची.
काय म्हणावं याला सांगा बरं ? विना शब्द डोळ्यातून हे सगळं झाला. दोघीनी हेल्मेट घातलेलं होत. दोघीनाही कामावर पोचायचं होत. दोघीही भर रहदारीच्या कर्वे रोडवर मागे पुढे होतो. तरी संवाद झाला. धन्यवाद पण झाले. न बोलता इतकं सगळं झालं.
मग विचार आला कि ज्यांना समजून घ्यायचाय ते कसेही घेतातच, तस करायचं तर समोरचा काय सांगतोय त्यावर ऐकून घेणं हवं. काल परवा पर्यंत जो विचार आला होता त्यावर हळुवार फुंकर घालून दिली यांच्या मार्फत कान्हाजीनी.
का? आणि कशी ? करा विचार तुम्हीच.
मी मात्र जगण्याचाही कला अवगत केली. जगताना वापरता येतेय का बघु...
जय श्रीकृष्ण!
सौ. गौरी पाठक
२२.०८.२०२४
#####
२) वर्किंग वुमन आणि हाऊस वाईफ
काल एकीच्या घरी भिशी होती. योगायोगानं आणखी दोघी तिघी पण भेटल्या. मस्त सात आठ जणी खूप दिवसांनी भेटू शकलो.
नुकताच कोरोना गेलेला त्यामुळे भेटी गाठी परत सुरु झाल्या. त्यामुळे खूप खूप बोलायचं होतं सगळ्यांनाच.
*एक म्हणाली :* हा घरून काम करतोय अजूनही त्यामुळे मुलाला सोडणे आणणे बाहेरची काम पण करायला मदत होतेय पण माझं बाहेर जाणंच होत नाहीये त्यामुळे. (दु:खी चेहरा) त्याला कामात ब्रेक असेल तेव्हा हाच म्हणतो हे मी करून येतो, ते मी करतो. माझ रूटीनच बदलुन गेलय.
*दुसरी म्हणते :* बरय कि तेवढंच तुला निवांतपणा. (पण तिला तो निवांतपणा नको होता असा बोलण्यातून जाणवलं.)
*तिसरी म्हणाली :* मग तू पण काहीतरी आवडीचं काम सुरु कर कि तसही तू पण आधी काम करताच होतीस कि. (पण हे बोललेलं पण तिला आवडला नाही. )
*पहिली :* करायची तेव्हा केली कि कामं, (रागवून) नोकरी केली म्हणजेच सगळं असत असा नाही. घरी असणारी स्त्री पण कमी काम करत नाही.
*तिसरी :* अग तूच तर म्हटलंस ना कि नवरा घरून काम करतो त्यातून ब्रेक असेल तेव्हा तोच बाहेरची बरीच काम करतो तुला तुझं बाहेर जाणं भेटणं इतर होत नाही. म्हणून मी म्हटलं.
घर सांभाळताना पण तर तू खुश नाही असाच अर्थ झाला ना म्हणजे. घर सांभाळणारी आणि नोकरी करून घर सांभाळणारी दोन्हीही तितक्याच महत्वाचं आहेत हे मला पण ठाऊक आहे. पण आपण ज्यात आहोत म्हणजे नोकरीच्या किंवा घर सांभाळणाऱ्या यात समाधानी असं महत्वाचं आहे.
*पहिली :* नोकरीच्या बायकांना नेहेमीच त्या ग्रेट वाटतात. (कुत्सित)
*चौथी :* असा समज चुकीचा आहे. आपणच आपलं ठरवतो. नाही एखादीला अधिपत्या खाली काम करायला आवडत ती नाही करू शकत नोकरी. याचा अर्थ नोकरीच्या स्त्रियां बद्दल असा विचार नसावा. तू तर दोन्ही स्त्रीचे आयुष्य जगली आहेस ना !
*पाचवी :* बरोबर.
*तिसरी :* तेच म्हणायचं होतं मला कि असा कोणत्याच स्त्रीने मग - ती नोकरीची असो व घर सांभाळणारी, दुसरी बद्दल विचार करायला नको.
तसही अपवाद असतीलच कि म्हणजे घरी राहणारी स्त्री पण अधिपत्याखालीच असत नाही अस नाही आणि नोकरीवालीला विचारणारं कोण नसेल असही नाही.
समाजात आपलं अस्तित्व टिकवून परंपरेने असलेले सगळे करून नवीन पिढी घडवणं हे सर्व स्त्रियांचं काम आहे ते करताना जिला जो मार्ग सोपा वाटतो तो ती निवडते. (हे काम करण्याची क्षमता स्त्रीयांमधेच असते. यावर दुमत नसावं.)
*दुसरी :* खूप शिकलेल्या स्त्रिया पण घर सांभाळतात तसेच कमी शिकूनही नोकरी करून घर सांभाळणारी पण असतेच की.
*पहिली :* पण समाजात घर सांभाळणारी कमी लेखतात.
*तिसरी :* असं कोण म्हणतं ? ज्याची त्याची क्षमता असते ती. त्यात महत्वाचं म्हणजे कमी लेखतात हा विचार का करायचा. हा विचार करूनच मन दूषित करतो आपण.
*पाचवी :* दोन्ही प्रकारच्या स्त्रियांनी एकमेकींना तितकीच किंमत दिली पाहिजे.
*तिसरी :* सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःला कमी लेखण आधी बंद करा.
*पहिली :* म्हणायला सोप्पंय ग, पण अनुभव येतात ना तसे.
*तिसरी :* दुर्लक्ष करायचं मग. ते आपोआपच बंद होतं. मी पण इकडून बाहेर पडताना या वाक्यावर दुर्लक्ष करणार आहे ते हे : "नोकरीच्या बायका स्वतःला फार शहाण्या समजतात."
इकडे बोलले कारण मी तुम्हाला आपलं समजते. आपणच आपल्या सख्यांचं मन स्वच्छ ठेवायला मदत करायची मग मैत्रिणी का म्हणून घ्यायचं एकमेकींना?
*चौथी :* एकदम बरोब्बर !
*पहिली :* हं... प्रयत्न करेन ... दुर्लक्ष करण्याचा..
*सहावी :* बरोब्बर ! मी तेच करते. असले टोचणारे विषय आले कि शांत बसते. मी पण या दोन्ही स्त्रिया जगले आहे. जे जमत नाही त्या बद्दलची रुखरुख कमी होते अशानी. उभारी येते ती वेगळीच.
*तिसरी :* ज्या प्रकारचे जगायचे आहे ती काळाची गरज पण असू शकते. सगळंच मनाप्रमाणे करता येतेच असे नाही. आत्ता सर्वात महत्वाचे हे कि जे करू ते आनंदात राहून करूया. आपल्या शरीराला त्याची गरज आहे. मग ती नोकरीची स्त्री असो व घर सांभाळणारी. एकमेकींवर डागण्या डागण्यापेक्षा मिळून उपाय शोधू ,समजून घेऊ, उभारी देऊ.
*सगळ्या :* १००% खरय ग !
*सातवी :* हं ! (कशातच मत न देणार व्यक्तिमत्व )
००----------००
गौरी पाठक
२१.०८.२०२४
अभिप्राय
+-+-++-+-++-+-++-+-+
३) कंगोरे
नेहमी पाऊणतासात घरी पोचते मी. कधी कधी मधे काम करून तासाभरात जास्तीत जास्त. नोकरी करत असल तरी घरची ओढ मला नेहमीच वाटते.
आज घराजवळ एक मैत्रीण भेटली, खर तर रोज दिसते ती. घड्याळं असतात आयुष्यात काही लोकं. ऑफिसला जाताना - येताना दिसली नाही ही मंडळी की समजायच आज ऊशिर झाला आहे.
पण आज मनापासून वाटल थांबुन बोलुच. ती पण थांबली. दोनच वर्ष झाली दोस्तीला, पण छान वाटत तीला भेटुन. डोक्यात मधुरिमाला लेख पाठवलेला विषय होताच.
मी : कशी आहे लेक?
ती : मस्त! हल्लीच्या मुली पटकन सेट होतात.
मी : करमत का ग?
ती : आता हळूहळू सवय होतेय. पण फोन मुळे हव तेव्हा बोलण होतं. तीला हव ते ती विचारते. सुरूय..
मी : मस्त. हे मी माझ्या मैत्रिणीला सांगणार आहे. तीचा लेक परप्रांतीय सुन आणतोय. ती खुप हौशी आणि कायम आनंदी पण पुढच सगळ कस जमेल विचारात आहे.
ती : परप्रांतीयांना पण आपली संस्कृती खुप आवडते. तीला सांग की योगायोगानं श्रावण आहेच, सगळे सण व्रत समजवत करत रहा.
मी : मग काय तर. मी म्हटलच कर तिकडेच केळवण, जिवतीची पुजा घरच्या घरी जमतय तसं.
ती : आपल्याला वाटत पण आपण करत राहिलेल मुलांच्या मनात नोंद होत असतं. ही बघ की ईकड बघायची पण एकटी परदेशात आहे तर सगळं पाळते. अगदी रामनवमी अयोध्या देवळाच्या दिवशीच पण भारतासारख तिकडे चार पाच का होईना जमुन केलं.
मी : ( मनात... आजच लेख पुरा केला तो आशय वास्तविक दिसतोय समोर... मनभावन सावन वाचा लेख माझा. त्या दिवशीच तो फायनल करून पाठवला होता.) मला हेच वाटत आपण करत राहायच. शिकवत राहायच. आपण सांगितल नाही अस व्हायला नको.
ती : अगं अनुभव हा आहे की परप्रांतीय मुली पण आजकाल आपणहून सगळ हौशीन करू लागल्या आहेत. आनंद आपल्यातल्याच मुलींचा आहे. पण वेळ आली की करतात हा पण अनुभव आहे.
मी : हेच म्हणते मी की, या पिढीतल्यांची शिक्षणाची वर्ष वाढली, अपेक्षा वाढल्या, प्रलोभनं वाढली, कर्तव्याची व्याख्या बदलली. त्यांना अनुभव येण्याच्या वयात अंतर वाढलं. तरी संस्कृती संस्कार कानावर पडतच ठेवले की ते कधी ना कधी ऊमजतीलच.
ती : खरय! आपल्या पिढीनं करत राहायच आणि आनंदी राहायच.
मी : महत्वाच म्हणजे या पिढीला जेव्हा खरी गरज असेल जे त्यांच्या आत्ता लक्षात येत नाहीये, तेव्हा काहीही झालं तरी मदत करायची. ती कोणतीही असू शकेल. सांस्कृतिक, भावनिक, सामाजिक आणि आर्थिक सुद्धा.
ती : प्रश्नच नाही ग. आपलीच लेकरं ती. तसही पिढीत बदल होऊन होऊन असा काय होईल? परत जुन्या फुग्याच्या बाह्यांची फॅशन आलीच ना! तसच होईल.
मी : खळखळाट हसत.... हो तेव्हा आपण आजी गटात मोडू मग नातवंडं येतील, आईला काही माहितीच नसतं ...आजीलाच विचारू.
ती : भन्नाट
मी : पळा घरी, अंधार पडला की..
ती : नंतर काय झाल सांग ग. मी पण पळते.
अशा प्रकारे गप्पा दिड तास झाल्या. घरी पोचायला साडे आठ. पण न ठरवता झालेल्या गप्पांमध्ये मजा आली. खुप कंगोरे बोलायचे राहुन गेले खरे पण मन हलकं झालं. गपचुप आईंनी केलेलं जेवले.
सौ. गौरी पाठक
२३.०८.२०२४
+++++
४) कंपन
काल ट्रेनमधुन येताना अचानक चार मैत्रिणी झाल्या. छान वाटत अस अचानक भेटी झाल्या की. त्यातली एकच आधीची शाळेतली मैत्रिण निघाली. बाकी सहप्रवासी च होतो. पण मनमोकळ्या असल्यान ओळखी केल्या गेल्या. पण फारशी एकमेकींची मत ठाऊक नव्हती. तीन परिवारच होतो.
सगळ्या जणी वयाच्या पाच वेगळ्या वयोगटातल्या होतो. मस्त पुण नागपुर गप्पांचा बेत रंगत होता. मंदा, संध्या, कुंदा, नंदा आणि मी. मंदाच्या लेकीच नाव वधुवर सुचक मधे नोंदवल अस तीनं सांगितलं. तिकडून विषयाला सुरुवात झाली.
मंदा : आणखी कोणती संस्था आहे का गं नावनोंदणीची?
संध्या : मला तरी कल्पना नाही. अजुन तरी मला वेळ यायचीय, आम्ही आत्ता दहावीची पायरी चढतोय.
कुंदा : आम्ही ऊतरलो यंदा या पायरीवरून. हुश्श!
नंदा : आहेत संस्था पण "माहेर" संस्थाच जास्त खात्रीची आहे.
मी : माझ्या मैत्रिणीला विचारेन, तीनं नुकतच मुलीच नाव नोंदवल आहे. ती सांगत होती की आधीपेक्षा चार पाच मुद्दे जास्तीचे नोंदणीत लागतात. जे असतील अस आजवर वाटलं नव्हतं.
मंदा : हो आणि विषेश म्हणजे वय वर्ष २५ असल तरच नोंदवा म्हणतात. हल्ली २९-३० शिवाय लग्न करतच नाही कोणी.
कुंदा : सत्य परिस्थिती आहे मी अनुभवलेल सांगते. माझ्या नात्यातल एक लग्न (लवकर ठरवलेल बरका?) म्हणजे २४-२५ वय साधारण, स्थळ ओळखीतला मुलगा म्हणुन चौकशीला आले. समोर दिसतो रोज, वागणं बोलणं छान आहे म्हणुन म्हटलं आम्ही छान आहे मुलगा. जवळ जवळ मध्यस्थच झालो. सहा महिन्यात भांडणं घेऊन आले पालक बघा जरा समजवुन म्हणतं.
काय समजवायचं या पिढीला? थोड तुझं थोड माझं ची तयारीच नाही. कस बसं निभलय आत्ता. पण आधीसारखं जगात नाही राहिलं.
संध्या : मला तर हल्ली वाटतं की लिव्ह ईन मधे राहुन पटल तरच करावं लग्न.
नुसत स्थळ बघुन समजणं अशक्य आहे, कोणाची खात्रीच ऊरलेली नाही.
मंदा : अस काही गरजेच नाही कारण शिक्षण ते नोकरी पाच वर्षांत जवळजवळ सहवासातच असतात ही मुलं. बघ की विचार कर भटकंतीच जास्त असते. नाईट आऊट, लेट नाइट पार्टी बघता किरकोळ तासच घरी असतात की. त्याला लिव्ह ईन कशाला हवय?
आणि काही खात्री नाही लिव्ह ईन नंतर पण घटस्फोट होणार नाही काय खात्री?
मी : खरय तुझं. पूर्वजांनी विवाह संस्था नियोजनबद्ध जीवनासाठीच आखली असणार ते चुकीच कस होईल. काही तरी विचार करूनच सोळा संस्कारात आहे ना लग्न घटक.
नंदा : दोघांच्या समजुन घेण्याच्या क्षमतेवरच टिकत लग्न. नाहीतर पाच वर्षानंतर पण चांगला संसार करून लग्न मोडलेली ऊदाहरणं आहेत.
कुंदा : कोणीच परिपूर्ण नसत हे समजुन जगणं आपल्या पिढीपर्यंत समजलय. पुढच अवघड आहे.
मंदा : पण अशातही घरच्यांनी स्थळ पहा असच होतय. आपापल बघुन आणलय हे हळूहळू कमी होतय म्हणजे आत्ता एक टक्का म्हणु.
संध्या : पण कायद्यान पण हो म्हटलय लिव्ह ईन ला.
मी : लग्न करून नंतर समजुन घ्या वर्षभरात. आधीची पिढी अशीच जगली आणि ती आनंदी आहे. कायदा आला म्हणुन पाळाच अस नसावं गं.
नंदा : खरय आत्ताच वेळ आहे संस्कृती जपण्याची या पिढीला शेवटचा चान्सच जणू.
मी : हो ग अगदी खरं. आत्ता सकारात्मक विचार करण्याची गोष्ट मंदानी म्हटल ती ही आहे की ते एक प्रमाणाचा टक्का वाढेल हळूहळू असच म्हणुया.
पण जोडीदार स्वसंमतीन असला की तो आपल्या घरात, आपल्या मनात हक्कान ठाम ऊभा राहतो. काळ कोणताही असो मानसिक भक्कम आधार वाटतो. हीच तर शिकवण दिलीय पूर्वजांनी विवाहसंस्थे विषयी.
संध्या : हं... नि:शब्द ..
मंदा कुंदा नंदा मी : विचारात....
अचानक ब्रेक लागला, गपकन गाडी कुईईई आवाज करत थांबली. दौंड आलं होतं. आमच्या चर्चेला पण ब्रेक लागला कारण वाफाळता चहा घेऊन दादा आले.
मजा आली पण गप्पा मारताना.
एक छान झाल नवख्या होतो सगळ्या मनातल बोलल तरी गेलं. मनातली कंपन लहरी बाहेर पडल्या, जगातली परिस्थिती समजली. मग पाचही जणींनी सेल्फी काढला. शास्त्रं असतं ते.
झाल की मग कुठ पोचली गाडी फोन सुरू... बॅक टु करंट पोझिशन...
मग काय तर... आयुष्यात येणारं सगळ सकारात्मकपणे झेलायला तयार झालो आणि ते पण कंपनरहित!
सौ. गौरी पाठक
२६.०८.२०२४
********
५) चेपलेली मधली फळी
अगदी अचानक वन डे पिकनीक ठरली. दोन समविचारी जोडया पण तयार झाल्या. वयाच अंतर (पाच- दहा वर्ष) असलं तरी मनाच नसल्याने फार छान दिवस गेला. पिकनीक स्पाॅटवर एक कुटुंब सहपरिवार (कुत्रं पण बरं का!) दिसलं आणि कुत्रं घरात असावं का असा विषय निघाला.
एक : कुत्रं असण आजकाल फॅमिली चा चौथा मेंबरच झालय.
दोन : हो ना! घरात वयस्क नसतील पण कुत्री मांजरी असतीलच. असच चित्र सगळीकडे आहे.
तीन : सगळेच वयस्क सारखे नसतात. माझा अनुभव आहे की काही वरिष्ठांना त्यांच्या चाकोरीबद्ध जीवनात ढवळाढवळ नको असते म्हणून ते नसतात. अश्यात घरातल्या एकाच मुलाला / मुलीला आपलं म्हणुन जीव लावला जातो ते मुक्या प्राण्यामुळेच की.
चार : सगळ्या बाबतीत अपवाद आहेतच.... असे बरेच वयस्क बघितलेत की राहतात पण हक्क वसुली असते तुम्ही मुलं आहात आमच केलच पाहिजे. खुप कमी जणं सुनेला मुलगी समजुन राहतात.
एक : आपली पिढी खरच चेपलेली मधली फळीच आहे. आधीच्या पिढीला धरून ठेवावं मन सांगतं कारण ते संस्कार मनावर लहानपणी झालेत तसच पुढच्या पिढीला सोडून पण द्यावं लागतं कारण त्यांनाच बघत पुढच आयुष्य आनंदात घालवायचय!
दोन : आपल्या पिढीलाच ही चेपी का पण? विचार करण्याची गोष्ट आहे.
तीन : अस ठरवुन नाही ते. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आपण तो कसा घेतो यावर ते आहे.
चार : हो खरय पण सुनेचे वडिल ८० वयात काम करतात पण सासरे चालते फिरते असुनही मुलाला पायदुखी सांगुन त्रस्त करतात. एकाच कौतुक आणि ठणठणीत आहेत म्हणून एकाला गृहित का धरायच? असं नसावं ना पण मग.
दोन : अस नसतं माझ्या मते वय सेम असल तरी शारीरिक फरक असू शकतोच. हे थोड वेगळ वाटलं.
एक : अस असत बरेचदा आधीच्या पिढीला आजही कोणाच्या ही माहेरचे तुच्छच अशी भावना असतेच हे पण असच फरक समजुनच म्हणायचं का? मग हाच फळी चेपीचा मुद्दा आहे. अस म्हणायला हरकत नाही.
पाच : हो मला असच वाटतं. यात आणखी एक आहे की एकत्र राहणारे आणि विभक्त राहणारे..
एक : दोन्ही मधे प्रत्येकाची बाजु असेलच पण खापर फोडणारे मला आवडत नाहीत. उदाहरणार्थ घरी सासु आहे म्हणून जमल सगळं तुम्हाला... परंतु ती नसणारे पण जमवतात की सगळं. आताच्या साठीतल्यांना हा ईशु जास्त आहे कारण ते हम दो हमारे दो मधले आहेत जास्त करून.
सहा : खरय आताचे पन्नाशीतले साधारण एकच बास मधले आहेत. तर पालक गावीच राहण पसंत करणारे असतात. एकंदर काय परिस्थिती कोणतीही असो प्रश्न असणारच आहेत.
पाच : आपली पिढी चेपलीय खरय पण आपण चेपलोय अशी भावना न ठेवता जगायचा प्रयत्न करायचा.
मी ठरवलय घरातील वरिष्ठांना त्यांच्याच चौकटीत ठेऊन आपण आपलं जेवढं जमेल तेवढं जग अनुभवुन घ्यायचं ते पण कनिष्ठ पिढीला चौकटीत हलकीशी मुभा देऊन.
सहा : यात एक करायच सतत "जग गेल चुलीत" म्हणजे कोण काय म्हणेल का? ईकडं लक्ष न देता दुर्लक्षायनम: म्हणायच!
एक : आयडिया भारीय. गरजेच्या ऊपस्थितीत चौकटी फिट.
दोन : खरय यामुळे आता परत गरजेची वाटणाऱ्या (किंवा वाढीस लागणाऱ्या ) अशा हम दो हमारे दो पद्धतीला सहकार्य दिलं जाईल आणि धर्मही टिकेल. समाज संस्था भक्कम राहिली की विश्व स्थिरावेल आनंदेल.
चार : आनंदी राहायचं आता आपल्याला महत्वाचं आहे. घराचे लोन, शिक्षणाचे लोन, इतर जबाबदारीतून जरा फील घेऊया निवृत्तीचा. हो फील म्हटलंय मी कारण आपली पिढी कधीही निवृत्त होणे नाही.
एक : असाच भेटत राहून मन हलकं करायचं आणि कर्तव्याला उभं राहायचं ! हेच या सर्व प्रश्नांना उत्तर....
चार : हा हा हा!!! चला आवरा निघु या आणि हो त्या कुत्र्याचे आभार माना!
(हशा पिकला खरा पण सहा मनं हलकी होऊन ऊडतच निघाली म्हणायला हरकत नाही.)
सौ. गौरी पाठक
१२. ११. २०२४
*****"
६) नक्की चुकतंय कुठं?
चला तुळशीच लग्न झालं काल मस्त. आता लग्न सराई सुरू असा विचार करतच होते, तर जुन्या एका मैत्रिणीने मुलीच्या लग्नाचा मुहूर्त करायचाय म्हणून बोलवलं. मस्तच ना! मी गेले मुहूर्त फक्कड झाला. विविध ग्रुपच्या मैत्रिणी तीनं बोलवल्या होत्या. अनेक ओळखी झाल्या आणि फराळ करताना या पिढीला दिलेली मुभा यावर विविध अंगी चर्चा झाली ती अशी-
चिंगी : आजकाल लग्नाला हो म्हणायला खुप ऊशिरा करतात मुलं.
पिंगी : अग हो पण नोकरी शिवाय कस हो म्हणतील आणि शिक्षणच किती लांबलचक झालय.
मिंगी : सगळ नीट होईपर्यंत काळजीच वाटते हल्ली बिभत्स झालय सगळं.
टिंगी : रेप काय आणि लग्नानंतर आणि आधीची अफेअर्स काय! विवाहसंस्थेचा पायाच यात डगमगलाय.
फिंगी : खरय ग... यात आपलं लेकरू नीट असेल पण संगतीच कस कंन्ट्लोल करणार आपण. सगळ्या माता भगिनी समान तराजुत आहेत.
पिंगी : २००% बरोबर हे टेन्शन मी अनुभवलय.
चिंगी : ठराविक वयात पालक होण्यात निसर्ग साथ देतो तेव्हा ही पिढी म्हणजे मुलं मुली दोन्ही बरका पदवीधारकीच्याच उंबरठ्यावर असतात. मग चुकतय कुठं? असा प्रश्न पडतो.
मिंगी : एकनिष्ठ राहणं हा विवाहसंस्थेचा गाभाच यांना पटत नाही हल्ली. ऐच्छिक आहे ते म्हणे. काय तर तो माझा / आमचा वैयक्तिक अधिकार आहे. डोंबल...
टिंगी : अशाच ऐच्छिक अधिकाराच्या गोष्टींमुळे बिभत्सता वाढते त्यात सहज उपलब्ध असणारी दुरदर्शन तत्सम ऊपकरणं घरबसल्या बघायला आहेतच.
पिंगी : हे मात्र पटल बघ... काय काय सिनेमे असतात अररर .. "शील" नावाची गोष्ट विसरतेय ही पिढी आधुनिकतेच्या नादात.
मिंगी : आकर्षण आणि प्रेम भावनांचा गदारोळ झालाय. चिंगी चा प्रश्न खरोखरच तगडा आहे. पण हा प्रश्न आहे असं याना वाटतच नाही.
चिंगी : मला मान्य आहे की विवाहसंस्था होती तरी बिभत्सवृत्ती होती, नव्हती अस नाही पण तीला धाक होता.
मिंगी : हो, धाक होता, मर्यादा आणि शब्दाला किंमत होती. पण येईल लवकरच ही वेळ यांना समजण्याची असच म्हणुया.
पिंगी : चुकतय कुठं मग? असा प्रश्न सुटेल हळूहळू. अस म्हणुया. एकंदर आपण जे बोललो ते ऐकून वाटतय की चुक कोणा एका व्यक्तीची किंवा पिढीची नाही. तर ती परिवर्तनाची म्हणायला हरकत नाही. ऊंच शिखर गाठुन आपटुन लाट जशी ऊभी राहते तसच येईलच नक्की परिवर्तन विचारात. बघु.
चिंगी : let's keep our fingers crossed.
पिंगी : आपण फक्त आपल्यापरीने या पिढीला जपायचं. शिकवत राहायचं. त्यांच्या गरजेला ऊभं राहायचं.
तेवढ्यात लेक (होणारी नवरी) आली "आई झाल ना सगळं सोडु का साडी?"
फिंगी : खळखळाट हसत.. "घ्या! तासभरात कंटाळली साडीला"
अशाप्रकारे आम्ही भानावर आलो आणि नक्की चुकतय कुठं? विचारा ऐवजी आत्तातरी आपली जबाबदारी काय हे मनाशी घोकत आणि रिटर्न गीफ्ट आवडल्याच्या आनंदात बाहेर पडलो.
सौ. गौरी
१५.११.२०२४
*****
७) गुजगोष्टी.
(२३.०२.२०१४)
नुकताच प्रेम दिवस म्हणजेच व्हेलेंटाइन के होऊन गेला. बरेच छान छान लेख वर्तमान पत्रात आले. तो साजरा करावा का नाही यावर नेहमी प्रमाणे चर्चा वाचली. तेव्हा मनात विचार आला प्रेम हे इतर दिवशी पण असत त्यासाठी एक दिवस कशाला हवा? पण माझ्या मते जगात विविध रुपात विविध नात्यात प्रेम असते. ते व्यकत करण्यासाठी एक दिवस पाश्चात्य देशात साजरा करतात तो आपणही का करू नये. हरकत नाही. पण जसे बर्गरला आपलसं कराल तसं आपल्या वडापावला इतरांना करायला सांगा.
कोणतेही राष्ट्र कोणतीही संस्था, धर्म यामध्ये जर घेण्यासारखं असेल तर का घेवू नये. परंतु त्याचा अतिरेक मात्र होता कामा नये. त्यामागची भावना स्वच्छ, निर्मळ सुंदर असली पाहिजे, तसेच आपल्या संस्कृतीचे पण सण उत्सव जे पूर्वापार चालत आले आहेत ते चालु ठेवले पाहिजेत. ते पण ईतरांना महत्वासकट समजवुन सांगता आलं पाहिजे. त्याचं भान आजकाल राहिलेले नाही. परदेशी साजरे होणारे दिवस साजरे करावेतच पण मंगळागौरी, वटसावित्ती, घरात चालत आहेत ते कुळकुळाचार याचा पण विसर पड्डू देवू नये. आजकाल पॅंट सर्वत्र सहज घालून मुली वावरतात पण साडी घालता येत नाही आणि सांभाळता त्याहून नाही. माझ्यामते बर्गरला जवळ करावं पण वडापावला विसरू नये. आपली संस्कृती पण पाळा. हेच आजकाल जर परदेशी युवती पाहाल तर साधी काय नऊवार पण नेसून चक्क गणपतीच्या मिरवणुकीत दिसतात आणि आपण गणपती पाहायला पॅंटमध्ये.
माझा मुद्दा सतत साडी नेसावी असा नाही. अथवा सतत देवासमोर बसा असाही नाही. पण जे समाधान घरातली पुजा, घरातल्या लोकांच समाधान सांभाळून हे आपले सांस्कृतीक दिवस साजरे करण्यात आहे ते कशातच नाही. स्वतःचा धर्म संस्कृती उत्तम सांभाळून इत्तरांची आत्मसात करण्याचे पाहावे असे एकच म्हणणे आहे. सगळं करावं, गुडीपाडवा सणाचा आनंद घ्यावाच , हौस तसेच जरा विरंगुळा म्हणून ३१ डिसेम्बर पण साजरा करावा.
"काय गं झालं का तुझं संक्रांतीच हळदीकुंक?" "छे! छे। मी कधीच नाही करत." हे म्हणणारी युवती फ्रेंडशीप डे व्हॅलेंटाईन डे ला मात्र सगळ्यात आधी हातात गुलाब घेवून फिरताना दिसेल. मैत्री दिवस प्रेम दिवस साजरा करावा. काही वेळा जवळच्या प्रेमाच्या व्यक्तिलाच बरेचदा भावना सांगायच्या राहून जाऊ शकतात. या दिवसानिमित्त नुसता मित्र असणारा उत्तम मित्र होवू शकतो.
परंतु त्याच बरोबर हळदीकुंकु करणे ही आपली संस्कृती आहे. (हे एक फक्त ऊदाहरण आहे.) पूर्वजांनी काहीतरी विचार करून पद्धती सुरु केल्या असतील. त्याला पण मान दिला पाहिजे. अस जर झालं तर सर्वत्र उत्तमच होईल असा माझा विश्वास आहे.
दुसयांची संस्कृती नक्कीच आत्मसाद करा पण स्वतःची न विसरता !
सौ. गौरी पाठक
१४.०२.२०२५
ता.क.
माझ्या मताशी सर्वजण सहमत असतील असे नाही. पण विचार नक्की करा. एखाद्या विधानामुळे नकळत कोणाच्या भावना दुखावत्या असतील
तर क्षमस्व ।
*****
८) 'नजर' ३०.२०.२०२०
परमेश्वरानी दिलेले एक सर्वोत्तम ज्ञानेंद्रीय डोळा, त्याची जरब कळते ती या नजरेतुन! मनातल्या भावना तंतोतंत भिडतात त्या या नजरेतुनच. आज का वाटलं मला कोण जाणे की नजर या शब्दाला अनेक कंगोरे आहेत. मग आठवलं योगेश सोमण सरांचा एक लेखनाचा वर्क शॉप केला होता. त्यात नजरेच महत्व त्यांनी सहज एका अनुभवाचा दाखला देताना सांगितला होता. वैशिष्ट्यपूर्ण सांगण्याच्या त्यांच्या शैलीमुळे ती गोष्ट अंर्तमनात ठसली.
अचानक काही दिवस कामाला जाताना एका ठराविक सिग्ननलला सत्तरीतले एक भिकारी गृहस्थ थांबलेल्या वाहनांपुढे हात पसरवताना दिसु लागले.
रोजचे ते आजोबा जसे मला पाठ झाले होते, तसे मी त्यांना पाठ होणे शक्य नव्हतं - ते मास्क, स्कार्फ आणि हेल्मेटमुळे. पेहरावामुळे खरतर तर ते भिकारी अजिबात वाटत नव्हते. त्यांच्या कृतीमुळे ते भिकारी आहे याची खूण पटवून देत होते. पांढरा स्वच्छ झब्बा, धोतर, पंचा डोक्यावर गुंडाळलेला हातात स्वच्छ काठी, दणकट चपला सुस्थितीतला चष्मा म्हणजे मुळातला टापटीपीचा माणुस असावा असाच तो होता.
जवळ जवळ पंधरा दिवस रोज सिग्नला ते आजोबा दिसू लागले. मनात विचार आला की - वाटत तर भिकारी नाहीत, हे मग काय असे घडले असेल यांच्या आयुष्यात की यांना हिनदिनपणे हात पसरावे लागत असावेत. सिग्नल सुटला विचार खुंटला.
एक दिवस सिग्नलजवळ मी व अजुन एक टूव्हीलर दोनच गाड्या होत्या. आजोबा त्यामानाने बरेच जवळ आले, हात पसरले, हिनदीन पणे हात हलवु लागले. भुकेची तमा अशी खुण समजावी. पण आज काठी नव्हती आणि एकदम अचानक नजर चमकली माझी. अंतर्मनातून सोमण सरांनी नजरेच उदाहरण दिलेला किस्सा आठवला. तडक तो सल्ला अमलात आणला गेला. चेहऱ्याचे हावभाव न बदतता का अस वागताय आजोबा ? या भावनापूर्ण डोळ्यांनी मी न डगमगता थेट आजोबांचे डोळे गाठले. भुरकट पिवळसर झाक असलेले डोळे त्यांचे- भिरभिरू लागले. मला त्यांना जाब अजिबात विचारायचा नव्हता परंतु माझे डोळे त्यांच्या कृतीच काय कारण असेल? याचा शोध घेऊ लागले होते.
त्यांना ते काही क्षणात जाणवलं. भिरभिरती नजर खाली जाऊ लागली. अजुनही काही हालचाल न करता मी थेट त्यांचे डोळेच तपासत होते. काही क्षणात् त्यांचे पसरणारे हात शांतम पापम् सारखे गालाला लावले गेले. त्यांनी नजर चुकवत ईतरत्र पाहण्यास सुरुवात केली. त्यांचं नजरेला नजर भिडवू शकणं कमी पडु लागलं होतं. त्यांनी परत माझ्याकडे बघितलं आणि शेजारच्या गाडीसमोर बघुन झपकन माझ्याकडे पाहिलं. खरतर मी काहीच केलं नव्हतं पण बरच काही डोळे करून गेले होते. ठणठणीत प्रकृती स्वच्छ कपडे घालणारा माणूस भिक का मागत असेल? एवढाच प्रश्न मला होता. कोणीच कोणाला बांधिल नव्हतं - ते उत्तर द्यायला आणि मी त्यांना जाब विचारायला. माझ्या डोळ्यातून आजोबांना तो प्रश्न कळवा असावा कारण त्यांची देहबोली अचानक गोंधळुन गेलेली मला जाणवत होती.
शेजारच्या टु व्हीलर जवळ हात न पसरता आजोबा मान नकारात्मक हलवत फुटपाथवर चालत जाताना मी बघितले. सिग्नल सुटला. न बोलता माझा त्यांना प्रश्न विचारला गेला होता. त्यांनी न बोलता तेवढ्यापुरत का असेना निघुन जाताना तो समजल्याची पावती दिलीच. ती पण नजरेतून!
पुढे दोन आठवडे तो सिग्नलवर दिसलेच नाहीत. परत येणार नाहीत वगैरे ठाऊक नाही पण मला हे समजले की आपण पडणारे प्रश्न फक्त त्या भावनेने पाहुन विचारू शकतो. जो चुकत असेल पण (काही कारणाने का होईना त्याला बोलूनच व्यकत होऊन जाब विचारण) अथवा अन्यायाला सहन करणे हे फक्त नजरेतूनही होऊ शकते. काही वेळा शब्द गरजेचे नसतात. प्रत्येक वेळी तीव्र भावनेची कृती गरजेची असते 'नजर' माणसांना डायरेक्ट हृदयाची भाषा पोचवते. सरांनी सांगितलेल उदाहरण आज अनुभवले. भिकारी आजोबांची दुसरी बाजु कशी का असेना? त्यात मला फार पडायच नाही पण त्यांची कृती, तो मार्ग योग्य वाटला नाही हे त्यांना नजरेतून पोचलं.
सोमण सरांनी आज मला एक नजर दिली. शब्दानी घायाळ न करता नजरेची भाषा आपण कधी वापरायची हे समजलं.
सोमण सरांचा अनुभव ऐकला होता आज तो बरच सांगुन गेला शिकवुन गेला.
धन्यवाद!
सौ. गौरी पाठक
*********
८) सल
काल अचानक काॅलेजच्या तिघी घनिष्ठ मैत्रिणी भेटलो. "त"वरून ताकभात अशा आम्ही तिघी. खूप दिवसांनी भेटलो कि मनातली मळभं दूर होतात. मैत्री थेरपीचा फार फायदा असतो. प्रत्येकजण आपले अनुभव सांगत आणि योग्य ते घेऊन नको ते बाजूला सरायचं शिकतो.
पहिली : आपण सगळ्याच तारेवरची कसरत करत जगतोय सद्धया. हो कि नाही?
दुसरी : खरंय !
पहिली : तरीपण आपल्या सारख्या काही जणी त्यांना जे जमत नाही त्याबद्दल स्वतः काही करायच्या ऐवजी इतरांवर कुरघोडी करतात असा माझ्या लक्षात आलंय काही दिवसात.
तिसरी : अगं यात नवल ते काय ? अश्या ढिगांनी असतात आजूबाजूला. त्यांना ढिगातच राहू द्यायचं सुंदरींनो.
पहिली : म्हणजे?
दुसरी : हो आणि त्यांना आपण गावभर उधळतो असा पण वाटतं. (हा हा हा हसत ) आणि त्यांना समजत नाही पण त्यांचा चेहरा सगळं सांगतो कि हिला कसं सगळं जमत? वेळ मिळतो कसा?
पहिली : आवड असली कि मगच सवड मिळते. यावर त्यांना अस ठामपणे म्हणायचं असत कि आम्हाला किती कामं असतं त्यात घरी असतील तर मग काय विचारता!
त्यांना त्या खूप बिझी आहेत हेच सांगायचं असतं.
तिसरी : असतीलही, सांगावं का लागावं पण?
दुसरी : आपल्यासारखीला जर तो आनंद मिळतो तर खुश व्हावं ना ते नाही. सल दिसते डोळ्यात त्यांच्या कि मला हे मिळालं नाही मी हे करू शकले नाही.
तिसरी : तेच तर आपण अशा ढीगभर बायकांचा विचार असाच करायचा कि त्यांना आपण सगळं सांभाळून आपला आनंद पण मनमुराद लुटतो तसे जमत नाही म्हणून त्या असा म्हणतात. जाऊ दे.
पहिली : तेच तर करतो आपण. सोडून देणं...
दुसरी : आपला आनंद बघून आनंदी होतात ती मनं आणि कुत्सित मनं ओळखण्या इतके आपण प्रगल्भ नक्कीच आहोत.
तिसरी : काही म्हणा बाकी समोर बोलायची हिम्मत नसते त्यांच्यात!
पहिली : आपण आपलं आनंदी जगायचं आणि आनंद वाटायचा. घेणाऱ्याच्या नजरेच आपण ठरवू शकत नाही.
दुसरी : खूप जणींना सांगता येत नाही कि आपलं जगण नक्की त्यांना आवडत कि कोड वाटत.? काही निर्मळ मनाच्या असतात विचारतात सध्या कुठे दौरा गं ? काही नुसतं म्हणातात काय ग? इतक्यात कुठं गेली नाहीस वाटतं ? काही म्हणतात तुमचे फुलपाखरू जगतानाचे फोटो पाहून मन आनंदित होते अश्याच भिरभिरत राहा !
तिसरी : मला एक तर असा अनुभव आहे- "आनंदाच जगणं संसर्गजन्य आहे तो तुम्ही मस्त पसरवता ! मी कधी बोलत नाही पण बघून खूप छान वाटतं.
पहिली : स्वतःच्या जीवनाचा गाभा समजला कि मग फालतू प्रश्न पडत नाहीत. समोर जे दिसतं त्यातलं चांगलं शोधायची वृत्ती वाढते. मत्सर वाटत नाही आणि मग आपण जे छान पेरतो ना तेच उगवत.
दुसरी : काही अश्या पण आहेत कि आनंदी जगतात पण जगासमोर दाखवायला घाबरतात. एक तर नजर लागेल हि एक भयानक अंधश्रद्धा मनात असते नाहीतर कशाला गावभर सांगत फिरायचं? असा संकुचित हेतू असतो.
तिसरी : परिस्थितीने अशी मनं बनतात त्यात चूक मानणं अगदी बरोबर नाही पण तरी ती तुमची बाजू झाली. नका डंका पिटू. इतरांना तर छान म्हणा!
पहिली : मग का चार चौघीत स्वतःला सिद्ध करत फिरावं त्यांनी? मला पण येतं, मी पण करते, मी पण केलं असत पण जमलं नाही, तुला काय घरून सपोर्ट असतो बाई ... हि असली आगाऊ कारण देतात आणि हेवा करत बसतात.
दुसरी : मग काय तर. आपण आपलं जीव सांभाळून, नैतिक जबाबदारी सांभाळून आनंदी आयुष्य जगायचं जमावतोय. झालेला आनंद स्वतःपुरता न ठेवता तो पसरवतोय, जेणे करून तो इतरांनी पण घ्यावा. पण नाही...
तिसरी : आता एकच करायचं कि कुत्सित बोलणाऱ्या सर्वाना मागे सोडून स्मितहास्यानं पुढं जात राहायचं. वाद घालत बसून वेळ वाया घालवायचा नाही.
पहिली : हा हा हा !!!! आणि आनंद साजरा केल्याचे फोटो पाठवत राहायचं.
दुसरी : कुढायचं कि फुलायचं ते ज्याचं त्यांनीच ठरवायचं !
तिसरी : बरोब्बर! तुम्ही आमचा आनंद बघा नका बघू , आमचे फोटो पहा नका पाहू, आम्हाला छान म्हणा नका म्हणू तो तुमचा प्रॉब्लेम आहे.
दुसरी : एकंदरच आनंदी जगण या सगळ्या पेक्षा नक्कीच सोप्पय.
पहिली : ऐका ना, मस्त सेल्फी घेऊ चला ना, lets capture the moment now, chill babies... update it soon...
आला दिवस आपल्याला आनंद वाटेल तसा जगायचा, अर्थातच नैतिक जबाबदाऱ्या पार पाडत बर का! असं एकमेकींना सांगत मस्त वडापाव वर ताव मारत तीन फुलपारखं मार्गस्थ झाली, ती पण हलकी होऊनच!
गौरी पाठक
+++++++