Monday, 10 June 2024

भेट भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची !

भेट भीमाशंकर ज्योतिर्लिंगची !

काही वेळा सहज मनात आलेली गोष्ट घडते आणि मन सुखावून जाते. अगदी तस्सच झालं, सुटीचा दिवस आहे तर भीमाशंकर ज्योतिर्लिंग दर्शन घेऊन येऊया का? विचार मुलानी भावाला बोलून दाखवला आणि झपकन १ जुन २०२४ शनिवार ठरला सुद्धा !

मामा भाचे तयार झाले. पहाटे ६ वाजता कोथरूड हुन आमचं विमान निघालं. हो विमानाचं कारण मध्ये न थांबता ११ च्या आत पोचायचं होत. तरच अभिषेकाचा योग येणार होता. गुरुजींनी सांगिलंच होतं कि मध्ये वेळ घालवत आलात तर अभिषेक बंद होतील. 

मग काय नास्ता जेवण सगळं पॅक करूनच निघालो पाचही जण. पुणे ते भीमाशंकर दोन तीन रस्ते गुगुल बाई दाखवत होत्या.  काहींनी सांगितले पण होते कि रास्ता कसा कुठला ते. जय श्री राम म्हणत आम्ही निघालो हवा ढगाळ होती सूर्यदर्शन झाले नाही. वाटलं कि तिकडे जोरात पाऊस असेल का ?

आम्ही पुणे चिंचवड राजगुरू नगर, तांबडेमळा, मोर्डेवाडी, लांडेवाडी, घोडेगाव, पिंपळगाव, डिंभे धारण, मापोली, पोखरी, नायफड, तळेघर, राजपुर आणि भीमाशंकर असे गेलो. अफलातून सुरेख रस्ता होता. पावसाळ्यात तर हा रास्ता बघण्यासारखाच असेल. भोरवाडी जवळ शिवनेरी मिसळ ला मस्त चहा घेतला आणि गाडीतच नास्ता करत करत भीमाशंकर च्या वाहनतळ जवळ पोचलो सुद्धा ते पण साडे नऊलाच! 

साधारण एक किलोमीटर वर देऊळ असेल. सशुल्क स्वताचंतागृह पण स्वच्छ  होती. गाडी लावून सोवळे, पाणी आणि थोडा खाऊ बरोबर घेऊन आम्ही चालू लागलो. १०-१५ मिनिटातच श्री क्षेत्र भीमाशंकर ची कमान दिसली.  पायरी उतरून जायचा तो रास्ता बांधकाम सुरु होता. डाव्या बाजूनी उतारावरून खाली जायची सोया केलेली होती.  २०० पायरी उतरून मग देवस्थान आहे असा समजलं. सर्वात आधी गुरुजींना आम्ही आलोय असा फोने केला. खाली आल्यावर कुठं या हे त्यांनी सांगितलं. टणाटण उड्या मारताच जवळ जवळ सगळे चालत होतो. थोडा उत्तर संपून मग पायरीचा रास्ता परत सुरु होता. दर्शन बारी रांग इथवर आली होती. 

आता ओढ होती ती प्रत्यक्ष महादेवास पाहायची. देवळाच्या जवळ पोचलो, गुरुजी पण आले. सोवळे नेसून लवकर तयार रहा, अर्धा ते पाऊण तासात नंबर असेल असा त्यांनी सांगितलं. तेव्हा दहा वाजले होते. फुलाची टोपली पूजेची तयारी घेऊन मामा भाचे लेक सोवळे नेसून गाभाऱ्या च्या डाव्या बाजूस उभे राहिले. आम्ही दोघी स्टोअर किपर झालेलो. मग काय वाहिनीबाईंनी मस्त सामानासाठी जागा शोधली म्हणून सुट्टे आत जाऊ शकतो. गुरुजींनी कोणता अभिषेक हवा ते विचारून घेतलं. रुद्राभिषेक करायचं ठरलं. 

१२ ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या या ज्योतिर्लिंग/ महादेवाच्या देवळात आम्ही निवांत बसलो होतो. आता कुठं जरा इतरत्र बघायचं सुचलं होत. मंदिराचं सुंदर कोरीव काम, त्या मानाने बरीच छान रांग व्यवस्था होती,  सुबक नंदी होता, त्याचे टपोरे डोळे, बाहेरच्या चौकोनात पालखी होती त्यात चांदीचा महादेवाचा मुखवटा होता, मुख्य  द्वाराच्या उजवीकडे भैरावनाथ होते. आता गुरुजींनी दुधाची पिशवी आणून हातात दिली. त्या दालनात वर लाईव्ह दर्शन दिसत होत. आता आठवला तो इतिहास भीमाशंकर देवालयाचा. 

भीमा नदीच्या उगमाजवळचे हे ज्योतिर्लिंग कुंभकर्णाच्या मुलाच्या नावावरून भीमा नावावरून आले आहे. कर्कटी कुंभकर्णाची बायको तिचा मुलगा भीमा. कर्कटी महादेवाची भक्त होती.  भीमाला वडिलांच्या मृत्यूचे कारण समजल्याने तो देवतांवर रुष्ट होता. भगवान शिव आणि भीमा मध्ये युद्ध  झाले, भीमाला मोक्ष प्राप्ती मिळाली. सर्व देवांनी महादेवान या जागी कायम वास्तव्य करायची विनंती केली म्हणून महादेव इकडे आहेत ही एक कथा आहे.

तसेच श्री गुरु दत्त पण भीमाला भेटलेले ती हीच जागा आहे. त्यांनी सुतोवाचा केलेलं कि कर्कटी मातेनी पुजलेली महादेवाची पिंड उचलली कि खाली भीमा नदी आहे- जी पुढे गाणगापूर पर्यंत जाऊन जगतात आनंद देणार आहे, जी पुढे जाऊन इंद्रायणी होऊन पंढरीला सुखद अनुभूती देणार आहे. या पवित्र भूमीवर गुरुदत्तांचे चरण लागलेले आहेत तो भीमा नदीचा उगम.

तिसरी गोस्ट अशी कि त्रिपुरासुराचा वध या ठिकाणी झाला महादेवाकडून. त्यांच्या पत्नी डाकिनी शाकिनी यांना अमरत्वाचे वरदान इकडे लाभले. काही भाग हा डाकिनी म्हणून पण ओळखला जातो. 

गोष्ट कोणतीही असो भावना महत्वाची ती अशी कि प्रत्यक्ष देवो के देव महादेव यांचे पवित्र स्पंद इकडे आपण अनुभवू शकतो. ती पवित्र जागा आपण शांतपणे बसून ते अनुभवू शकतो.  चिमाजी अप्पानी दिलेली मोठी घंटा इकडे आहे, दीपमाळ आहे, वर पायरी चढुन कळस दर्शन करू शकतो. सध्या काम सुरु असल्याने आजूबाजूस मोठाले दगड होते, पडदे लावून देवालय सुरक्षा केलेली जाणवली. संपूर्ण मंडप हर हर महादेव गर्जनेनी परिपूर्ण - आध्यात्मिक भावनेनं परिपूर्ण होता. 


आमचा नंबर आला, पाचही जणांना आत गाभाऱ्यात बोलावले. पाटावर बसून पंचामृत पूजा भस्म पूजा दुधाचा अभिषेक नंतर आरती करू दिली. आम्ही महादेवाचं ते रूप मनात साठवत होतो. मनात आलेली गोष्ट त्या परमेश्वराने इतकी सुंदर पार पडून घेतली कि शब्दच नव्हते. पाटावर पाटाखाली पाण्याचा ओलावा, वरून अभिषेकाच्या सामुग्रीची देवाण घेवाण, दर्शनाच्या रांगेतल्यांची गडबड, गुरुजींचे मंत्र, सुरक्षा रक्षकांच्या सूचना सगळं सगळं स्मृतीत कोरलं गेलंय. प्रत्यक्ष १२ ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या भीमशंकर महादेवास आपण दुधाचा अभिषेक करत आहोत हि कृतीच इतकी भावते कि तो अनुभव काय असेल पहा ! 

महादेवास सर्वाना चांगली बुद्धी दे सर्वांचे रक्षण कर हीच कामना बाकी काही मागायचे नव्हतेच तो योग्य ते देतो यावर ठाम विश्वास आहेसच. हर हर महादेव ! इतका सुंदर रुद्राभिषेक करून बाहेर आलो समाज मनाप्रमाणे नंदी देवतेच्या कानात सगळे जण निरोप सांगत होते. किती भावना प्रधान असतो ना आपण! बाहेर आलो तर चेहेरे प्रफुल्लित मन टवटवीत ! गुरुजींना दक्षिण नमस्कार प्रसाद सगळं झालं. सोवळे आवरून बाहेर आलो, देवळाला गोल फिरून दर्शन घेऊन बाहेर आलो. फक्त सव्वा अकरा झाले होते. 

फुलवाल्या बाईकडून समजलं कि दोन तासात गुप्त भीमाशंकर करू शकतो. तिकडे पाणी नाही ते न्या, रस्ता पायवाट आहे पण जंगल आहे. मग काय दोन तासात होतंय तर जाऊया असा विचार करून आम्ही ठरवलं. हा समोरचा पूल आहे तिकडे खालून रास्ता आहे म्हटली ती बाई. मग काय निघालो जाऊन पाहतो तर तो दरीत उतरणारा जंगलातला रास्ता होता पायवाट कसली... सुरवातीला तर मोठे दगड, काही कातळ तर काही गोटे. एकही माणूस वर येत - खाली जात असा दिसेना. थोडा वेळानी दोन तीन जण वर येताना दिसले. मला तरी हुश्श झालं. तासभर खाली उतरून गेलं कि महादेव आहे, पाला पाचोळ्याची पाय वाट आहे पण काळजी नसावी दिशा दर्शक आहेत. मग मात्र मी पण आनंदानी उतरू लागले. भीमानदीचा मूळ उगम ज्योतिर्लिंग आहे असा समजलं तिकडे. परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात पूर्वेला पुन्हा प्रकटते  हे ठिकाण गुप्त भीमाशंकर, जे आम्ही दरीत उतरून बघायला जात होतो. 

विविध औषधींचा वास येत होता, पाऊलवाट वाळलेल्या पानांनी भरली होती, जांभूळ आणि छोटे आंबे लगडलेली झाले होती.  माकडे, सरडे, नाग, फुलपाखरं सगळे दिसले. उतरतानाची पायवाट भगव्या रंगानी बाणनिर्देशित होती, काही ठिकाणी तर भगवी झिरमिलीत वस्त्र लावून दिशा दाखवली आहे. मोठाली झाडे त्यांची मुळे रस्ता एकदम कडक. डावीकडे पावसातल्या मोठ्या प्रवाहाची वाट होती, थोडा पाऊस आला कि इकडे आणखी खतरनाक जंगलाचा फील येईल. मधे दोनदा उजवीकडून वाहत येणारे ओहोळ ओढा असावा अशी गोडे दगडाची ओळ लागते नंतर साक्षी गणपती च देऊळ आहे. सर्व रास्ता दरीत उतरल्या सारखाच पण वळण वळणाचा आहे. शेवटी मोट्ठे कातळ दगड आहेत त्या दगडाखाली शिवलिंग आहे. कातळ दगडातून वाट काढत काढत शिवलिंग आहे तिकडे पोचलो. पावसात केवढा मोठा धबधबा असेल या कल्पनेनेच धस्स झाले. पावसात सततधारेखाली हे शिवलिंग येते. वरून खाली यायला तासभर तरी लागला. येताना उतार होता आता जाताना तासभर चढाव होता मज्जा आली. परतीच्या वाटेवर नागदेवतेचे दर्शन घडले. मस्त गप्पा टप्पा करत वानरसेना वर चढली. 

येथील देवता "साक्षी" या नावाने ओळखली जाते कारण ती ज्योतिर्लिंगाच्या यात्रेकरूंच्या भेटीची साक्षी आहे असे मानले जाते. म्हणुन साक्षी गणपती .


सगळे खूप खूप खुश होतो. वर आलो तेव्हा एक वाजला होता. भूक लागल्या होत्या. २०० पायरी वर चढून एक किलोमीटर चालून मग गाडी जवळ पोचणार होतो. पण आता त्याच काही वाटेना. वर जाताना रांग पाहून विचार करत होतो यांना दर्शनाला तीन तास तरी लागतील. आपण छान काम केलं कि सकाळी दहालाच पोचलो. 

वाहनतगळावर गेलो जाताना २-३ पिशव्या जांभळं घेतलेली तोंडाची बरणी सुरु झाली. राजपुरी जवळ सावलीत गाडी थांबून आम्ही घरून आणलेल्या पदार्थावर ताव मारला. इकडे साधारण अडीच वाजले होते. परतीच्या वाटेवरून खूप खूप मोटारी भरधाव येत होत्या. आलो तो रास्ता गुगल बाई  गर्दीचा दाखवत होती. 

मग काय भरवसा ठेवून डिंभे धरणाच्या ऐवजी तळेघरला उजवीकडे मंदोशी गावाची वाट धरली. ती खूप सुरेख होती. पावसात तर काय दिसेल इकडचा निसर्ग काय सांगू!

पण पुढे जी काही वळणं आली, धम्माल आली. धामणगाव, घोटवाडी, खाणावळी मार्गे निघालो. हा रास्ता सकाळ सारखा नव्हता पण रिकामा होता. वाटेत पवनचक्क्या भरपूर होत्या अगदी जवळून दिसतील इतक्या जवळून रास्ता होता. चिटपाखरू नाही रस्त्याला. मुंगूस मात्र दिसला. तोच म्हणत असेल हे कुठं इकडं आलेत मधेच. 

रुक्ष एकदम रुक्ष रस्ता होता. पण हे मात्र नक्की या मार्गे पावसात यायला हवे कारण हा पठारी भाग शेती लावली होती. गुगल बाई मध्ये मध्ये गायब होत होत्या. घाटात मोटारी चालवायला आवडत असेल तर हा रास्ता एक नंबर. बराच कालावधी गेल्यावर समजलं कि भामा धरण जवळ आलाय, तोवर आपण नक्की कुठं आहोत ठाऊक नव्हतं. सरळ सरळ सकाळचा रास्ता असेल अस वाटलेलं. पण जे होतं ते चांगल्यासाठीच.  इतके सुंदर पहाडासारखे डोंगर उजवीकडे आणि डावीकडे पाण्याचं पात्रं. प्रेमात पाडाव अशीच जागा पण पावसात किंवा पावसाच्या आधी. जवळजवळ सव्वा चारला नेटवर्क आलं. धरणात पाणी खूप कमी होत त्यामुळे समजेना कि आपण कुठे आहोत. 

स्वतःला नशीबवान समजत कसे छान - दर्शन अभिषेक झाला भरून पावलो म्हणत आम्ही तळेगाव च्या जवळ पोचत होतो. आता खरी मजा आली ती गुगलबाईंनी जवळचा रास्ता सांगितलं तिकडे. कांजूर विहीर गावापासून तळेगाव टोल ऐवजी जाधववाडी धरणाच्या मागच्या रस्त्यानी आम्ही निघालो. साडे चार झाले होते. गुगलबाई तासाभरात घरी पोचाल सांगत होती. जाधववाडी धरण रस्ता धरला खरा पण पुढे रस्ताच नव्हता. रस्ता बनायचं काम सुरु होतं. कसलं काय धरणाच्या पात्रात पोचलो. मेढेवाडी दाखवत होती गुगलबाई पण गाव नाही घरं नाही रस्ता पण गायब. पावणेपाच ला शेवटी एक दुचाकी स्वर दिसला लाल मातीचा धुराला उडवत - देवाचं होता तो. त्यानं सांगितलं कि धरणाच्या भिंतीवरून न जात खालून जा पुढे डांबरी रास्ता आहे. जीवात जीव आला होता खरा पण धरणाचा खालचा रास्ता कोणता?? सगळे हसत होते मी मात्र परत चला मुख्य रस्ता गाठू रे बाबानु म्हणून गडबड केली. इतक्यात एक ट्रक आला तो धरणा मागच्या मार्गे गेला लगेच तिकडून गाडी नेली. मोजून २ मिनिटात आम्ही डांबरी रस्त्यावर होतो. पण पावणेपाच ते पाच पात्रातच होतो. डांबरी रस्त्याची मी आयुष्यात इतकी वाट पहिली नसेल. गुगल बाईंनी रस्ता दाखवला पण तिकडे काम सुरु होतं असा एकही फलक नव्हता. खूप खूप हशा पिकला. पाचही जण पुढचा तासभर तरी हेच बोलत होतो. पुढे आली एन एस एस ची निगडी छावणी. काय हुश्श झाले म्हणून सांगू. आजच्या दिवसातली हि पंधरा मिनिटे अतिशय बिकट गेली.  

आता कुठय आपण असा विचारायची पण सोय नव्हती. पुढे इंदोरी गाव आलं. हे कधीही ऐकलेलं नव्हतं. तिकडे एक शनिवार वाड्यासारखा किल्ला होता.  कोणत्यातरी देवीचं देऊळ असा फलक होता. घरी आल्यावर शोधल तेव्हा समजल की इंदोरी किल्ला सरदार दाभाडे यांनी अठराव्या शतकाच्या सुरुवातीस बांधला, आतमध्ये कडजाई देवीचे मंदीर आहे

पुढे नदी आली तीच नाव इंद्रायणी. बेगडेवाडी मार्गे घोरावडेश्वर ला महामार्गावर आलो एकदम. गुगल बाईंना शिव्या पण दिल्या आणि आभारही मानले. एकंदर बरोब्बर सहल आम्ही कोथरूडला घरी होतो. 

विविध अनुभवांनी परिपूर्ण असा भेट भीमाशंकर ज्योतिर्लिंगाची असा दिवस गेला. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा धम्माल केली.  एकच सांगेन जाधववाडी  धरणाचा धरणाखालचा रास्ता मात्र पुढे तीन चार महिने वापरू नका. आम्हाला दुचाकीस्वार देवदूत भेटला म्हणून पंधरा मिनिटात सुटलो. सगळ्यांनाच भेटेल असे नाही. 

पण महादेवाची कृपा आम्हास त्यांनी योग्य मार्ग दाखवला.


 हर हर महादेव !

गौरी पाठक 

९९७०१६८०१४

2 comments:

  1. सगळे वर्णन वाचून, भीमाशंकरला जाऊन आल्या सर्के वाटले. खुप छान 🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद !

      Delete