Sunday, 8 October 2023

श्री केदारनाथ धाम आणि श्री बद्रीनाथ धाम यात्रा, ऑक्टोबर २०२३

ॐ  हर हर महादेव  卐 जय बद्री विशाल

साधारण मे महिन्यातच आम्ही केदारनाथ आणि बदरीनाथ धामच सगळ बुकिंग केलेल. महिनभर आधी पुजा बुक झाल्या आणि नववा महिना लागल्यावर आई अर्भक जन्माला येण्याचे जसे दिवस मोजते अगदी तस्सच यात्रेच्या जाण्याच्या तारखेला ऊरलेले दिवस आम्ही मोजत होतो. काय न्यायच कस जायच वारंवार एकमेकांना अपडेट करत होतो. आमचा आठ जणांचा गट भगवंतानच सिलेक्ट केलेला असावा.
 
१ ऑक्टोबर रविवार :
(पुणे, मुंबई,  डेहराडून, ॠषीकेश )
... आणि तो दिवस ऊजाडला .. पुण्याहून सकाळी सातला गाडी करून मुंबई विमानतळावर आम्ही अकराला पोचलो. वरूणदेवाच्या कृपेने पुण्यात पाऊस कोसळत होता पण मुंबई कोरडी होती. साडेबाराला आत जायचं होते. मनात ऊमेद होती ध्यास होता... दिडतास मुंबई हवाईअड्डा मनसोक्त फिरलो. विमान अडीच वाजताच होत. सर्व सोपस्कार पार पाडून सगळे डेहराडुनला पावणे पाच ला पोचलो.
हसतमुख असे श्री पवन कुकरेती जी जे गाईड कम ड्रायवर होते ते बाहेर उभेच होते. दोन इनोवामध्ये सामान भरून आम्ही ऋषिकेशकडे निघालो. यावाटेवरचा रस्ता राजाजी नॅशनल पार्कजवळुन होता. तासाभरात त्रिवेणी घाटावर गंगा आरतीला पवनजींनी पोचवलं, खूप झुंबड गर्दी होती. खूपच दुरून आरतीच दर्शन झालं.  तिकडच सुंदर सजवलेली फुलाची टोपलीतला दिवा घेऊन गंगा मातेच्या प्रवाहात सोडले. सर्वाना सुखी ठेव हेच मागणं मागितलं. भरपूर ओढ असलेलं गंगेचं पाणी बघून छान वाटलंच, पण तिच्या अफाट सामर्थ्याची कल्पना पण आली. नंतर गढवाल निगमचं रिसॉर्ट रिषीलोक मध्ये गेलो. 

रूमवर सेट झालो, जेवणाची ऑर्डर दिली आणि जवळच असलेलं इस्कॉन टेम्पल पाहायला निघालो. मग काय दुधात साखरच होती मला. जय श्रीकृष्ण!

रिसॉर्टपासून चालत पाच सात मिनीटावरच ते होतं. तो माहोलच मदहोश करून टाकणारा होता. काय वर्णू तिचे गुण जिथं होता नंद नंदन. नामाचा जप करत मंत्रमुग्ध मुमुक्षि पाहून आपला पण ताल धरला जातो. पाय निघावत नाही. मस्त गंध लावून घेतल संगळ्यानी , फिर तो एक फोटो बनातही था. झाली सुरुवात फोटोला. रूमवर आलो मस्त तृप्त जेवलो आणि उद्या कधी निघायचं काय काय करायचं पवन दादांबरोबर ठरवलं . शार्प सहाला निघू ठरलं. 


२ ऑक्टोबर सोमवार
(ॠषीकेश,  देवप्रयाग, रूद्रप्रयाग, धारीदेवी, गुप्तकाशी,  रामपूर)
पहाटे साडेपाचला सगळे तयार होतो. चहा घेऊन सहाला ऋषिकेशहून रामपूर उत्तराखंडला निघालो. 

वळणावळणाचा रस्ता सुरु झाला. पूर्ण सात तासाचा रस्ता खूप सुंदर होता, त्यात अध्यात्मिक गोष्टी सांगणारे पवन दादा मग काय पर्वणीच. इकडे उजाडतं लवकर आणि अंधारही लवकर पडतो. सुंदर मोकळी स्वच्छ हवा होती.


गाभुळलेलं काळपट आकाश त्यात सनबाबा दिसेल कि नाही असा वाटत होत. डोंगररांगा एकामागे एक अश्या पुस्तक उघडू तश्या उलगडत होत्या. कधी ढग उतरलेलं, तर कधी सोनेरी कडांचे पर्वत.... अहा! मधे एक मोठं नदीचं पात्र सोबतीला सुरु झालं नदीचं  नाव ____. हि नदी पावसाळ्यातच वाहत असा समजलं. आता हळूहळू सनबाबांची किरण दिसू लागली. अचानक एका वळणावर सनबाबा दिसले, ते दिसताच पवनदादांचा सूर्यजप सुरु झाला , ॐ सूर्यायनम: ...

आता हळू हळू विविध छटेचे हिरवं डोंगर दिसू लागले. भरपूर पाणी असलेलं नदीचं पात्रं पण सोबत करू लागलं. धुक्याची दुलई ओढून सनबाबा दिसले. बरोब्बर  साडेनऊला दादांनी नाश्त्याला अशी जागा निवडली कि वीस तरी फोटो निघणारच. समोर तेरा चौदा मजली उंचीचा हिरवा डोंगर पुढं खळखळाट नदी ( नाव           ) स्वछ निरभ्र आकाश आणि सोबतीला दोस्त अजून काय हवं फोटोला. एकामागे एक लपलेले फिकट होत जाणारे हिरवे डोंगर काय जादु ही निसर्गाची.... बिळातून मुंग्या जश्या मोकाट बाहेर येतात तसेच अगदी गाडीतून बाहेर पडलो आम्ही. समोरच हॉटेल होतं जिकडे नाश्ता करायचा होता. (जागेच नाव कौडियाल हाॅटेलच नाव मिड वे रेस्टॉरंट ) पुरुष मंडळी मात्र नाश्ता ऑर्डर करायला तत्काळ गेली. फोटो प्रेमी गुरं जणू काही हाकताच त्यांनी तिकडे वळवली. आलू पराठा आलू पुरी असा भरभक्कम नाष्ट चहा करून परत गुरं इनोवात बसवली.  


नाश्ता करून ताजतवानं झालेलो आम्ही डोळे भरून भरून खिडकीतून निसर्ग डोळ्यात आणि डोक्यात साठवत होतो. उजवीकडे नदीचा खळखलाट, समोर पदोपदी वळणा वळणाचा रास्ता आणि गप्पा असा सुरु होता प्रवास. वाटेत तोटा चट्टी ठिकाण लागलं. डावीकडून उतरलेले मातीचे ढिगारे, मातीचा रंग पांढरट भुरकट. तसेच त्याच रंगाचा धुराळा... गाडी मात्र छान सजवत होता...  

लँड सलाईड म्हणजे काय ते आज बघितलं. खरं तर हि झलक होती हे नंतर समजलं. सकानी, सौर, टोली, पाली टल्ली, तीन धारा, पोखरी अशी गावं लागत होती. आणि अचानक देवप्रयाग नाव आलं... अनेक वर्ष जे वाचलं ऐकलं होत ते ठिकाण आज समोर होतं "देवप्रयाग". अलकनंदा नदी आणि भागीरथी नदीचा संगम. पवित्र गंगा नदीची सुरुवात इकडे होते. इकडे गाड्या थांबल्या. दोघी जणी खाली उतरून गेलो. साधारण दीडशे पायरी असेल. उतरून खाली गेलं कि लोखंडी पुलावरून पलीकडं जायचं मग आणखी खाली पन्नास एक पायरी उतरून संगमला पोचलो.


डोळे भरून दोन रंगाच्या नद्या बघून पाय बुडवून मन शांत झालं. पाणी छान गार होत. एक गुहा होती मस्त! परत वर येतना तीसेक पायरी झाली कि उजवीकडे वर रघुनाथांच देऊळ आहे. राहुनाथांनी ब्रह्मन् हत्येचं पापक्षालन इकडे केलं अशी कथा तिकडे सांगण्यात आली. आम्ही वर गेलो नाही. सरस्वती नदी या देवळाखालून वाहते असा पुराणात उल्लेख आहे. भूकंपात या देवळाला  थोडं नुकसान झालेलं परंतु उत्तराखंड टुरिझमनी ते नीट केलं. तीन डोंगराच्या कुशीत दोन रंगाच्या नद्या खूप छान दृश्य. समोर गुलाबी रंगाची मोट्ठी इमारत आहे ती संस्कृत युनिव्हर्सिटी आहे अस समजलं. रघूनाथ नाव तीच. 

निळी पोपटी गुलाबी रंगाची काडेपेटीच्या आकाराची दिसणारी घरं बघून वेगळाच वाटत होतं . क्लिप पाहाल तर समजेल कोसळणाऱ्या पावसासारखा तो संगमाचा आवाज किती रोमांचित करतो. ज्या पुलावरून पलीकडं संगम दर्शनाला गेलो तो अनुभाव खूपच सुरेख होता. लोखंडी पुलावर सिमेंटचा थर, जो मध्ये मध्ये हलतो पण तरी त्यावर बसलेल्या गायी.. पुलाच्या मधोमध गेलं कि दिसणारी अलकनंदा नदी ... अस वाटतं कि ती आपल्यालाच नखशिखांत भिजवणाराच आहे... इतका जोरदार प्रवाह... अद्भुत...   


दिडशे पायरी चढ ऊतार करून जणु केदारनाथ च्या प्रवासासाठीची शारीरिक तपासणीच झाली . देवप्रयाग नंतर पुढे कुराली, कनडोळा, बीडा कोटी अशी ठिकाण लागली जी वळणा वळणाचाच  रस्ता अशीच होती. अलकनंदा नदी उजवीकडे कायम होतीच.. नंतर आलं श्रीनगर यावेळी नदी डावीकडे होते. मस्त रस्ता जात होता ... आमची मनं पाखरू पाखरू फिरत होती. मग आल धारी देवी देऊळ. अलकनंदा नदीमध्ये पुलावरून गेलं कि मध्यावर ते आहे. अगदी वैष्णो देवी यात्रेचीच आठवण होते या वाटेवर. पार्वतीचच रूप हे, काळभोर चेहरा मोट्ठी नथ नजर हटेना. सकाळी कुमारिका, दुपारी युवती, सायंकाळी वयस्क रूपात हि देवी असते. या देवीला नमस्कार करून मगच केदारनाथ यात्रा लाभते असं मानलं जातं. केदारनाथधाम ची सुंदर प्रतिकृती आम्ही इकडे १२० रु. मध्ये घेतली. 
  
देवप्रयाग ते रुद्रप्रयाग दोन तासाच अंतर आहे. मधे  धारी देवी देऊळ आहे. रुद्रप्रयाग ला मात्र उतरून खाली गेलो नाही. वरूनच नजारा बघुन समाधान मानलं. रुद्रप्रयाग ला अलकनंदा आणि मंदाकिनी नदीचा संगम आहे. रुद्रप्रयाग संगम पाहायला मस्त पॉईंट बनवला आहे त्यामुळं फोटो मात्र छान आले. काय निसर्ग आहे ... भारतातच इतकं सुंदर बघायला आहे. या संगमाचे विशेष आध्यत्मिक गोष्ट समजली नाही. पुढे तिलावारा गाव आलं. रुद्रप्रयाग सोडलं कि मंदाकिनी नदी सोबत करत होती.


तिलवारा ला आम्ही पोटपूजा केली.  परत आलू पराठा भरीत पोळी, थाळी छान जेवण होतं. पवनदादांनी नंतर नेलं ते  गुप्तकाशीला . तिलवारा ते गुप्तकाशी तासाभराच अंतर आहे. सुरेख महादेव आह. पुढे कुंड आहे. 

कथा अशी : पांडवांना न भेटण्यासाठी महादेव इकडे गुप्त झाले होते. नंतर बैलांचा कळप आला त्यात मिसळून गेले जेणेकरून पांडव ओळखणार नाहीत. परंतु \युधिष्टिर आणि भिमानी क्लुप्तिनी त्यांना ओळखलं. तेव्हा बैल रूपातील महादेव केदारनाथ हिमालयात गेले. तिकडे आता पांडवांना सामोरे गेलो तर पापमुक्ती द्यावी लागणार या विचारानं महादेवांनी भूमीत गुप्त होताना भिमानी पकडलं, तोवर शीर लुप्त झालं ते पशुपतिनाथला पोचलं धड राहिलं ती जागा केदारनाथ. नंतर पांडवांनी ईशान्य कोपरा पूजा करून देऊळ बांधलं. ते अजूनही आहे. म्हणून केदारनाथ धाम झालं कि पशुपतीनाथ दर्शन करावं असं म्हणतात. तर गुप्तकाशीला महादेव गुप्त झाले तिकडे शिवलिंग निर्माण झाले ते आहे. यावरून त्या जागेला गुप्तकाशी नाव पडले असा समजलं. पाषाणात कोरलेली गणपतीची तसेच आणखी दोन प्रतिमा या गुप्तकाशी देवळात आहेत. कुंडात दोन नद्यांचे पाणी संततधार पडत असते. इकडून केदारनाथ ५० किलोमीटर आहे. 

पुढे अग्स्तमुनी, चंद्रपूर तसेच कुंद गावं लागली. नंतर मात्र अडीच तास ट्राफिक जॅम लागलं. फाटाच्या जवळपास दरड कोसळली होती. मातीचा ढिगारा हलवला म्हणजे बाजूला सारलेला होता, त्यामधून दहा वाहन इकडची दहा तिकडची अशी सुटका होत होती. यात आमचं त्रियुगीनरायण देऊळ राहून गेलं, रामपूर ला पोचलोच मुळी साडेसहाला. पण रामपूरचे गढवाल टुरिझम चे रिसॉर्ट पाहून सगळा शीण गेला.

गेल्यावर मस्त चहा झाला अंघोळी झाल्या. मग झाली तयारी केदारनाथ ची बॅग भरायची सुरु. हे घेतलं का ते घेतला का ? हे घाला हे घालू नका. गढवाल टुरीझमच्या रिसॉर्टला जेवण मोजकेच पदार्थ असतील पण गरम मिळत होतं हे फार महत्वाचं. दुसरा दिवसाचा पहाटे तीनचा गजर लावून झोपायचं ठरलं. पवनदादा पहाटे साडेचारला गाडीत रेडी असाल तर पुढे सर्व नीट होईल म्हटले. सगळी मंडळी गुडूप. डोक्यात विचार फक्त आणि फक्त केदारनाथ.. 


३ ऑक्टोबर मंगळवार 
(रामपूर, सोनप्रयिग, गौरीकुंड, केदारनाथ)

 

पहाटे तीनला ऊठुन आवरून पावणेचारला आम्ही एक छोटी सॅक, स्लिंग बॅग आणि काठी अस घेऊन तयार होतो. बॅगा एका खोलीत जमा केल्या. एक खोली रामपूरला बुक ठेवली होती. आजची रात्र केदारनाथला स्वर्गरोहिणीत घालवायची होती.
चारला पवनदादानी  गाडीत बसलेले असले पाहिजेत अस सांगितल होतं. आपण आपल्या गाडीन रामपुर ते सोनप्रयाग जाऊ शकतो. सोनप्रयाग ते गौरीकुंड मात्र जीपनीच जावं लागतं. जीपसाठी भयंकर मोठी रांग असते ती टाळण्यासाठी हा अट्टाहास होता.
पण रामपूर ते सोनप्रयाग मधे मोजुन पाचच मिनीट गाडीत बसलो नंतर पवनदादांनीच सांगितल जॅम लागलाय, चालत जा अथवा ईकडेच पाच वाजतील. मग काय वीर योद्धे आम्ही... ऊतरून पाऊले चालती केदेरनाथची वाट... करत झपाझप सुरू झालो. सोनप्रयागला पहाटे सव्व्वा चारला पोचलो. बघतो तर काय आधीच वीसेक हजार लोक होते तिकडे. दोन तीन रांगा होत्या.  रजिस्ट्रेशन चे पंजीकरण करून मगच जीप साठीच्या रांगेत उभ राहायचं हे चार पाच जणांना विचारला तेव्हा समजलं. प्रणव अनिरुद्ध पंजिकरणं करून घ्यायला रांगेत गेले. बाकीचे जीपच्या रांगेत उभे राहिलो.  मधेच प्रणवचा फोन आला कि घोडा करायचे पैसे पण तिकडेच भरून घोडा बुक करायचाय. पुन्हा पैसे घेऊन तो तिकडे घुसलाच. भयंकर लट्ठा लठ्ठी होती. जीपसाठीच्या रांगेत लोक वाट्टेल तसे घुसत होते. ठराविक अंतरावर बॅरिकेड होतं त्या आधी तरी पंजीकरण करून हे दोघे येणे गरजेचे होते. तरी आम्ही ते ओलांडून पुढे गेलो. आत तर आलो. मग चहा घेत होतो तोच घोडेवाला आणि हे दोघे आले. अक्षरशः चहा फेकून त्याच्या चालीनी पुढं निघालो . एक धडा घेतला कि रामपूरला जरी रात्री आलो तरी आधी पंजीकरण करून ठेवायचे म्हणजे जीप साठी थांबावं लागत नाही. असो. पंजिकारन पासून जीप निघतात तिकडे पोचायला पण बराच चालावं लागलं. 

एक लोखंडी पूल आला जीप त्या पल्याड होत्या पण दोन पैकी एक निमुळता पूल फक्त ओपन होता. हि तुफान गर्दी. काहीलोक जीप सुटतात तिकडूनच चाल सुरु करणारे होते. हुश्श फायनली आम्ही पैलतीरी पोचलो. जीपवाला आणि घोडेवाला एकाच होता. त्यांनी एका जीप मध्ये किमान बारा जण कोंबले. मलातर पुण्यातले पोल्ट्री वाल्या गाड्याच आठवल्या, पाय उलटे टांगलेल्या  खचा खच भरलेल्या कोंबड्या... त्यात जीपवर मागे तो उभा राहून आला. देव रे देवा ! जीप पण गौरीकुंड पासून लांबच थांबाव्यात आल्या. का कोण कोण जाणे ? दोन तीन वळण चालत गेल्यावर गौरीकुंड आलं. जीपमध्ये बसल्या पासूनच उजवीकडे नदी वाहत होती. गौरीकुंड ला आल्यावर तो मंदाकिनी नदीचा  प्रवाह, तो आवाज, तो गारवा जाणवला. खोल दारी, समोर उंच डोंगर, डावीकडे आम्ही, अहा!  आता मात्र चहा हवाच होता. डबल चहा काॅफी बिस्कीट घेऊन ताजेतवाने झालो. मनात खूप खूप विचार घोळत होते. घोडा , रास्ता, केदारनाथ आणि आपण हे कसे करणार आहोत हाच विचार.... गौरीकुंड ते घोडा तळ अंतर पूर्ण मुंबईच्या चाळी सारख होत. मोजून दोन तीन जण एकावेळी जातील इतकीच गल्ली. दोन्ही बाजूला उघडी गटारं पण खळखळाट वाहणारी गलिच्छ नव्हे. घोडे तळ आला. बाप रे ! तीन चार हजार घोडे असावेत.

शेणासारखा वास, ओलसर हवा त्यात बोचरा गारवा.... डाव्या बाजूला तीन चार उंच चौथरे होते त्याला पायरी होती. तिकडे उभं राहून घोड्यावर बसायचं. आला कि नंबर ... एकेक करत आम्ही झाशीच्या राण्या आणि एक तात्या टोपे झालो कि विराजमान घोड्यावर. मी तत्काळ घोड्याचा मालकाला घोड्याचं नाव विचारला त्यानं त्याच पण सांगितलं पण मला काही ते समजलं नाही. माझा घोडा होता कालू . पाच जाणिंपैकी माझा घोडा तसा लहान वाटला. हिय्या करूनच बसलो होतो. मनात तीव्र इच्छा होती केदारनाथ बाबांच्या दर्शनाची... फक्त आणि फक्त म्हणूनच घोड्यावर बसून जाण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. साधारण आठ वाजता आमचा लवाजमा प्रस्थान झाला. आता नवीन अनुभवास सुरुवात झाली होती.
 घोड्यावर बसून सेट होणं यासाठी सगळे झटत होतो. पाय ठेवलेले धागे व लोखंडी पट्टीवर रेमाटून बसून संतुलन साधायचं म्हणजे घोडा पण आरामदायक राहून नीट चालतो अस समजलं होत. कळलेलं वळणं अवघड होत. बसायची जागा जास्त होती, त्यामुळे तो भराभरा चालू लागला कि मी पुढे मागे गडगड हालत होते. मग मी माझी स्लिंग बॅग पाठिशी ठेवली, त्यानंतर मी नीट सेट झाले. प्रत्येक घोड्याचा मालक सतत बरोबर होताच . तो आणि त्याचा घोडा काय भाषा होते रे बाबा! कालू हॅट कालू भाग मधेच पहाडी भाषेत ओरडत पण होता तो. घोड्या पेक्षा त्याचीच कमाल होती कारण तो घोड्याच्या बरोबरीनं धावत होता. काहींनी स्वतःची सॅक त्याला च धरायला दिली, काहींनी स्वतःची कॉटन ची ओढणी बसायला घेतली, आमच्या  पैकी काहींना काही लागलं पण नाही. पहिल्या तासात आम्ही घोड्यावर सेट झालो, हे होत असतानाच उजवीकडचा निसर्ग डोळे फाडून फाडून पाहत होतोच. या प्रवासाचा फोटो व्हिडीओ काढायला फोने हातात घेणं  फार अवघड होतं तरीही मी माझ्या जॅकेटच्या खिशात तो ठेवलाच होता. असा आमचा केदारनाथ चा घोड्यावरून प्रवास सुरु झाला. 
कसे काय इतके तास रोज मावळे घोड्यावरून ये जा करत असतील ? नाना विविध विचार मनात येत होते. मागे कोण पुढे कोण बघत दिड तास गेला. भीमबालीला  घोडेवाला म्हणाला कि थांबायचे आहे. त्यांनीच कसबीनं उतरवला घोड्यावरून. प्रत्येकी ३२०० रू. घोडा सवारी आहे. तरी भीमबलीला त्यांनी जेवायचे पैसे मागितले. त्यांचे कष्ट पाहून नाही म्हणायचं प्रश्नच नव्हता. आम्ही पण आलू पराठा मॅगी एकातच खाऊन घेतलं, खूप जेवायचं इच्छाच नव्हती. निसर्ग पाहूनच पोट भरत होतं आणि तसाही जीव मुठीत धरून घोड्यावर बसला कि पाणी पण आठवत नव्हतं. कधी तीव्र चढ, तर कधी तीव्र उतार, कधी गोल गोटे त्यात पाणी, तर कधी ओढा, कधी घोड्याचा पाय घसरून पाणी उडे, तर कधी चिखल, कधी समोरून येणारे टक्कर होतं, तर कधी घोडाच भराभर धावे ना ना विविध गमती सुरु होत्या. रामबारापासून चढण जास्त कठीण आहे. जस जस जवळ जाऊ तस तस बर्फाचे डोंगर दिसू लागतात, मधेच मी व्हिडीओ कॉल करून दाखवत होते तर कधी क्लिप करत होते. फोटो पण काढले. कालू धावला कि मात्र त्रेधातिरपीट होत होती. कधी कोणाचा पाय रेलिंग बारमध्ये अडके, तर कधी डोंगराचा पुढे आलेला भाग मधेच समोर येत असे. पण हा अनुभव खूप काही शिकवतो. कालूचे अनंत आभार!

आधी वाचनात आलेलं कि आठला निघालं कि चारला केदारनाथ च्या घोडे तळावर आपण चारला पोचतो पण आम्ही एकलाच पोचलो. तब्बल साडेचार तासात घोड्यांची पोचलो. साधारण दुपारी एकला केदारनाथच्या घोडे तळ ला आम्ही होतो. तेव्हा १३ डिग्री तापमान होत. 
आल्हाददायक वाटत होत. आता आम्ही झाशीच्या राण्या उतरलो. खेकडे चालतात तसेच पाच सात मिनिटं चाल होती. खूप हसलो. सर्वप्रथम सुलभ शौचालय शोधलं. या घोडेतळापासून दोन अडीच किलोमीटर वर केदारनाथ आहे. ती वाट चालत जावी लागते. अत्यंत मनमोहक नजारा दिसू लागतो. अनेक महिन्यांची मनातली सुप्त इच्छा पुरी होण्यास किरकोळ कालावधी राहिलाय या कल्पनेनंच मन भरून येत होतं. वर येताना जवळच्या नातलगांना फोन करून पोचलोय सांगायला सुरुवात झाली. तो अद्वितीय आनंद अवर्णनीय आहे. आता श्वास लागत आहे याची जाणीव झाली. सात आठ पावलात दम लागत होता. ऑक्सिमीटरनी तपासाला तर सगळेच ८३-८४ होतो. मग मात्र तासभर एकाजागी बसून मगच पुढे जाऊ असा ठरवलं. एकाठिकाणी बसून घरच्या चिवडा चहा वर ताव मारला. जरा सेट झालो मग हलकं वाटलं. आता स्वर्गरोहिणी रिसॉर्ट कुठेय ते शोधायचं ठरलं. 

आमचा एक मेंबर चढून येत होता तो तासा भरात पोचेल अस समजलं.

तासभर स्वर्गरोहिणीत घालवला. आठ जणांची एक डॉमेटरी होती. दोन खोल्यात एकावर एक पलंग. अक्षरशः स्वर्गरोहिणीच होती ती कुटीया आमची. खोलीबाहेरून भैरवनाथ देऊळ दिसत होतं आणि शेजारीच हेलिपॅड होतं. अडीच वाजता साधारण प्रणव आला. आता तापमान ५ डिग्री झालेलं. सगळे मिळून मस्त जेवलो. भात छोले आलू पराठा त्यात छोले अगदी सपकच होते. वर मसाले कमीच वापरतात अस लागेचच सांगण्यात आलं. परत गरमागरम चहा तर हवाच होता. मस्त फोटो काढून झाले. पूर्ण चालून आल्याने प्रणवने तासभर आराम करायचं ठरवलं बाकी सगळे इच्छित स्थळी म्हणजेच पवित्र केदारनाथ देवळाकडे वळलो. 

स्वर्गरोहिणी पासून पंधरा वीस मिनिटावर दोन तीन वळण घेतली कि समोरच पर्वती सारख्या पायऱ्या दिसू लागल्या.  आजूबाजूला दुकानं होतीच. उर भरून येत होतं, डोळे पाणावले होते... आणि आम्ही प्रत्यक्ष भोलेनाथांच्या केदारनाथ देवळासमोर उभे होतो. स्वतःला चिमटा काढून खात्री केली कि खरंच मी पोचलेय... हर हर महादेव! अंगावर शहरे आले, पाय लटपटत होते तरी  गोल फिरून मी एक छोटी  क्लिप केलीच. दोन जण तत्काळ पूजा बुकिंग खिडकी शोधायला गेले. रात्री बारा ते पहाटे चार मधली कोणती वेळ पूजा आहे ते आपल्या पूजा बुकिंग च्या कागदावर नोंद करून घ्याव लागत. आम्ही चौघी मात्र पूर्ण देऊळ पाहून मागचं ईशान्य कोपऱ्यातलं पूजा केलेलं देऊळ पाहून नमस्कार करून पूजा खिडकीजवळ जमिनीवर मस्त बसलो. बोचरं वारं सुरूच होत. इतक्यात मुख्य पुजारी भोग चढणे आ राहे है अशी आरोळी आली. सगळी जनता जागा देत होती. हातात धूपपात्रं घेऊन एक जण मुख्य देवळात गेले मागोमाग झाकलेली परत घेऊन एक जण लुंगी वाले बाबाजी गेले. ते ईशान्य कोपरा देवळात जाताना मला क्लिप बंद करता आलेत. अजूनही पूजा कितीला याचा उलगडा झालाच नव्हता. दोघे जण अजूनही तिकडेच होते. शेवटी - या मागे फिरून परत इकडेच या असा म्हटले, पडत्या फळाची आज्ञा धूम दिघालो कि चौघी. मागे असणारी भीमाशीला बघितली. बातम्यात बघितलेली ती प्रत्यक्षात अवाढव्य भासली. उगाच नाही इतक्या जोरात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह रोखला गेला. भीमशीले शेजारी एकावर एक असे लगोरी सारखे मनोरे लोकं रचत होते. धारीदेवीला पण असेच मनोरे रचत होते. घरबार सब खुशहाल राहे इसीलिये भगवान के सामने उंचे घर बनते है असा तिकडे समजलं. भीमशीले जवळ भस्मात डुबलेले बरेच साधू होते. टेन्ट मध्ये पण असे भस्मी साधू खूप होते. केदारनाथ देवळासमोर तर पाट घेऊन घमेल्यात शेकोटी लावून बसलेले दिसले. 

खूप मोठा परिसर आहे. यामागे एक वाट निघते ती शंकराचार्य यांच्या आदरणीय मोदीजींनी बांधलेल्या समाधी स्थळाकडे जाते. गोल गोल फिरून खाली जायला रास्ता आहे. आणि अचानक समोर अवाढव्य अशी काळ्या पाषाणातली स्मितहास्य तसेच प्रेमळ भावाचे डोळे अशी शंकराचार्यांची मूर्ती समोर येते. त्रिकोणी पाकळ्यांसारखे फुलात कमळात बसलेले जणु. बरोब्बर मागे हिम पर्वत. नयनरम्य नजारा. गप्पा मारत कथा सांगत आम्ही परात वर आलो. 
अजूनही पूजेची वेळ नोंद करून मिळालीच नव्हती. त्यांच्या बरोबर पण मग फोटो काढले. मुखदर्शनाची लाईन फार फार मोठी होती. आता आपला षोडशोपचार पुजेचा नंबर कधी असेल कोण जाणे असा विचार मनात येत होता. 

आधीपेक्षा गारठा वाढला होता. सगळे मग रूमवर जाऊन जेवलो कि परत येऊ असा ठरलं. स्वर्गरोहिणी ते केदारनाथ देऊळ मध्ये नदीवर एक लोखंडी पूल होता. पुलावरून दुधाळ फेसाळ पाणी बघत जाताना भारी वाटत होत. हुडहुडतच खोलीत गेलो. गेलो ते थेट पलंगावरच दिलेल्या दुलईत घुसलो. साधारण सडे सहा झालं असावेत. खोलीतल्या तापमानाशी जुळवा जुळव सुरु होती. खोलीत हिटर पण होता. 

मी वर झोपले डोकं जड होत जातंय जाणवत होतं. सगळ्यांचं डोकं दुखतंय असचं म्हणणं होत. तासभर झोपून मग मात्र एक उलटी झाली कडू कडू वाटू लागलं. परंतु इलेक्ट्राल च पाणी पिऊन तासाभरात मला बर वाटलं. सात ते आठला साधारण प्रणव आणि एक जण देऊळ पाहायला निघाले. आता तो ताजातवाना होता. मगाशी तो आला नव्हता. बुकिंग च्या पूजेची पण परत वेगळी लाईन त्यांना दिसली. बारा ऐवजी दहाला पूजा सुरु होतील असा समजलं म्हणून सगळेच धावतच देवळा जवळ गेलो. पण मग उगाचच सगळे का थांबायचं ? म्हणून  आमच्या पैकी तिघे नंबरला थांबलो. मी आणि अजून दोघी खोलीत परत आलो. कोणी झोपलं, कोणी जेवायला गेलं, तर कोणी नंबरला थांबलं. मी परत झोपून घेतलं आता तापमान ३ डिग्री झालेलं. नाकं लाल, बोटं ताठ, कानपट्टी कानावर असे आम्ही होतो.  साधारण पावणे अकराला फोन आला कि लवकर या. नंबर जवळ आला आहे. एका लोकरीच्या शालेत लेक आणि मी कुडकुडतच निघालो. आता गर्दी खूप कमी होती. दहा वाजता मुख्य दार बंद झालेलं होत. 

प्रांगणात बसलेले सोडता पूजेच्या रांगेतलीच लोकं होते. प्रसादाची बास्केट, घरून आणलेलं तुप, गंगोत्रीची गंगा घेऊन आम्ही आतुरतेनं सज्ज होतो. दोन तास रांगेत ऊभ राहणारी कविता, अनिरूद्ध, दुसरी कविता यांचे मनापासुन आभार.. माझ्यातल्या परमेश्वराचे आभार त्यान हिय्या केला म्हणुनच मी खोलीपासून ईथवर पोचु शकले.

दोन नंबर राहिले तेव्हा एका पुजारी बाबानी आमच्या अंगावर पाणी शिंपडलं , शुद्धीकरण होतं ते आमचं. तीन डिग्रीत अंघोळ करून जाणारे आमच्यात दोघेच होते. मुख्य देवळाच्या उजव्या बाजूनी आता आम्ही आत जाणार होतो. उजवीकडे स्टीलचे बार लावून चौकोन केलेला आहे त्यावर बरेच जणांनी चुनरी बांधली आहे. पूजेचा कागद पाहून मगच गटागटानं आत सोडत होते. आधी पेक्षा बरीच सुसूत्रता आलेली जाणवली. दारातून आत जातानाच सुंदर भडक लाल निळा पिवळा रंगाचे रंगकाम अगदी जवळून बघता आले. जितकं गार बाहेर होतं तितकाच आल्हददायक  ऊबदारपणा पायरीवर जाणवला. भरभक्कम असे चांदीचे कडी कोयंडे हात लावून न्याहाळता आले. त्यावरच नाजूक नक्षीकाम सुरेख होत. पायरीला नमन करून मोठ्ठा उंबरा ओलांडून आत गेलो. समोरच एक गुरुजी पावती साठी बसलेले होते.  आम्ही डावीकडे वळा या सूचनेनुसार गेलो. कोनाड्यात भीम अर्जुन यांची मूर्ती तुपाने जवळ जवळ झाकलेलीच दिसली. आम्ही पण तूप लावत होतो. आता कोणी कोणाशी बोलत नव्हत. स्वतःच्या श्वासाचाच आवाज प्रकर्षानं जाणवत होता. नंतर मुख्य बंद दारामागे आलो, पुढे भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीची मूर्ती होती. नंतर पितळीची लक्ष्मीनारायण मूर्ती सुंदर लाल सोनेरी पोशाखात दागिने घालून नटलेली होती.  लाह्या साखरफुटाणे डाळ समोर होते,  एक ऊंदीरमामा मस्त लाह्यांचा आस्वाद घेताना मी कविताला दाखवला. तिकडचे गुरुजी सर्वांना मन लावुन  गंध लावत होते. अहाहा! काय सुरेख सुगंध होता तो. कपाळभर ते गंध आम्हाला लावण्यात आलं. पुढे कुंती माता मूर्ती होती. मी आणि कवितानी चुनरी कुंती मातेला नेसवली. या सगळ्याचा मध्यभागी चकचकतीत अशी मध्यम आकाराची नंदीची मूर्ती होती. चौकोनी साखळी नि तो भाग बंद होता. नंदीखाली दोन उतरते काळ्या पाषाणातले चौथरे होते. नंदी समोर वीरभद्र भगवान महादेवाचे रूप मूर्ती रूपात होते. जवळच मोठ्ठा त्रिशूल होता. आता आत जायला परत मोठ्ठा उंबरा आला. ऊंबरापण कोरीव कामानं सज्ज होता. दोन्ही बाजुस छोट्या देवळ्या होत्या. ऊंबर्याचा तो काळ्या पाषाणाचा खरखरीत पण मनभावनन स्पर्श आजही आठवतो. छोटाच पॅसेज होता तो. उजवीकडे पार्वतीची मूर्ती होती. तिकडे बरेच गुरुजी होते. इतके लोकं आत होते पण गडबड गोंधळ नव्हता सुसूत्रता होती. या ठिकाणी पुन्हा पूजा नोंदणी कागद दाखवावा लागला. तो पाहूनच पूजेचे साहित्य असलेली थाळी आम्हाला मिळाली. पूजेच्या ताटात गंध, अक्षदा, साखरफुटाणे, तुप, ब्राह्मी फुले, बेल असा सामान होत. चौघात एक अशा दोन पूजा 'षोडशोपचार पूजा' नावाचं बुकिंग आम्ही केलेलं होत. 

सुंदर सोनेरी लखलखाटात विराजमान भगवान महादेव असलेले ज्योतिर्लिंग पैकी एक आता प्रत्यक्ष आमच्या समोर होत. दिव्याच्या ज्योतींचा, सोन्याच्या भिंतींचा, शिवलिंगा भोवतीच्या चौकटीचा आणि त्या प्रत्यक्ष तत्वाचा असा मिळून सोनेरी झगमगाट नेत्रदीपकच होता. नशीब बलवत्तर असलेल्यानाच दर्शन होते हे ऐकलेले अनुभवले. स्वतःच्या नशिबाची त्या परमेश्वराचे अनंत कोटी आभार मानले. प्रयेक सोनेरी चौकटी जवळ एकेक गुरुजी बसलेले होते. आत प्रवेश करताच डावीकडे दान पेटी जवळ आम्हाला सोनेरी चौकटीवर बसायला सांगण्यात आले.  गुडघे टेकवून आम्ही चौघे बसलो. एकानी हातात थाल धरलेली तर मी तुपाची डबी. चौघांना हातात अक्षता देण्यात आल्या. त्यावर पाणी टाकत गुरुजींनी मंत्र म्हटले. नाव गोत्रं प्रत्येकाचे म्हणायला लावून संकल्प सोडायला लावला. त्यांनी सर्वांच्या डोक्यावर हात ठेवून पुन्हा मंत्र म्हणून गंध घ्या आणि महादेवाला लावा असे सांगितले. अद्भुत असा सर्रकन मेंदूत जाणारा थंड गार स्पर्श होता तो. लावा दोन्ही हातानी लावा चालेल असे म्हणताच तोच अनुभव डाव्या हातास पण मिळाला. चार पाच गुरुजींचा मंत्रध्वनी तिथल्या जागेत सुंदर घुमत होता. आता सर्वानी तूप लावावे असे म्हणत असताना थाळीतले व सोबतचे तूप लेपन आम्ही चौंघांनी केले. गुरुजींनी पुढे व्हा डोके टेका सांगितले आणि हायसे वाटले. सोनेरी चौकटीला एक उभा उंचवटा होता त्याला गुडघे टेकून सगळ्यांनी डोकं टेकलं. 
हर हर महादेव ! जयघोष केला. अहोभाग्य लाभले.... डोळे घळाघळा वाहू लागले. नंतर बेल पान ब्राह्मी फुले वाहून गुरुनींनी पुन्हा मंत्र म्हणून सुख सौख्य समृद्धी घराच्यांना, तसेच आप्तेष्टाना लाभो असे काहीसे श्योक म्हणून चांदीचा गडू हातात दिला. गुडघ्यावर उभं राहून प्रयेकाला अभिषेकाची संधी लाभली. दोन क्षण शिवलिंग न्याहाळता आले. बाकीचे दोघे अभिषेकास पुढं आले तोवर आजूबाजूचे पाहून घेतले. सोन्याचा मुलामा असलेले खांब भिंती होत्या.  यावर हर हार महादेव, ॐ नमः  शिवाय, डमरू चे चित्र कोरलेले एम्बॉस केलेले होते. शिवलिंगावर मोठी गोलाकार छत्री गरगरीत लोलकासहित होती. चांदीचे पाट चांदीचे गडू चांदीचे सामान स्वच्छ लखलखीत होते. पूजा थाल साधी होती. शिवलिंगा भोवती चार खांब दगडी आहेत. खांब व भिंत चिंचोळी जागा आहे. सापटीतून जाऊन बरोब्बर शिवलिंग मागे जाऊन पण दर्शन घेता आले. मागे कोनाड्यात स्मितहास्य करणारी भगवान महादेवाची लोभस मूर्ती आहे.  तिकडे आमचा दुसरा गट अभिषेकास बसला होता. तिकडून सोबत आणलेल्या गंगोत्रीच्या गंगेचा अभिषेक करता आला. त्या गंगेसाठी अंकित भाऊंचे मनापासून आभार. त्यांनीच ती आम्हास दिली. तसेच तूप घरून आणलेले होते ते वैशालीचे, तिचे पण आभार. चहु बाजूनी महादेवास सुंदर चंदन आणि तूप लेपन झालेले बघताना नमस्कार करताना हृदय गती वाढलेली जाणवत होती. अजिबात न घाई करता नीट षोडशोपचार पूजा करता आली. गुरुजींचे तसेच संस्थांचे मनःपूर्वक आभार. पूजा बुकिंग नसते तर हे सुख लाभलेच नसते. पूजा बुक करून देणाऱ्या अनिरुद्ध संजीवचे मनःपूर्वक धन्यवाद. नंतर पुजारींनी घंटा वाजवली. दक्षिणा दिली आणि तिसऱ्या बाजूस गेलो. तिकडे थोडी गर्दी होती जागा फारच निमुळती आहे. भिंतीस स्पर्श करत करत परत एकदम पवित्र ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ यांच्या समोर आलो. अद्वितीय अनुभूती युक्त आनंद भावना होती ती. ते सुंदर स्पंद सोनेरी किरणांसारखे पूर्ण शरीरावर रोमांच उठवत होते. प्रफुल्लित टवटवीत अनुभूती होत होती. मागचे काही तास भोगलेले सगळे कष्ट त्रास क्षणात विसरून जाऊन त्या सुंदर सोनेरी लहरीत न्हाहून निघाल्याचे जाणवत होते. 

फोटो काढू का देत नाही ? असे एकाने विचारले. गुरुजी म्हणाले कि भगवान को मन में कैद करो फोटो में करोगे तो भूल जाऊगे. मन में करोगे तो जिंदगी भर नाही भुलोंगे! क्या बात है! हे सांगताना ते निर्मम भक्तीनं सांगत होते. आता पुन्हा आम्ही पार्वती मूर्ती असलेल्या दालनात होतो. तिकडे प्रसाद दिला गेला. पार्वतीच्या मूर्तीस हात लावून नमस्कार करायला मिळाला. परत नंदी असलेल्या मंडपात आलो. महादेव असलेली जागा गर्भगृह तर बाहेरच मंडप असं नाव आहे. 

आता अभिषेक नोंदणी करणार्या गुरूजीपाशी आलो. त्या भागच्या दोन मूर्त्या नीट पाहु शकले नाही...  पर्वणीचा आनंद मनात होता आजुबाजुच काहीही दिसलच नाही... चारपाच जणांचे अभिषेक नोंदवले. त्याच पावतीवर गरम साखरभात प्रसाद जो मगाचचाच भोग होता तो मिळाला. काय चवीष्ट होता तो....  दुपार नंतर न जेवलेली मी तो खाऊन तरतरीत झाले. थोडा प्रसाद ईतरांसाठी बांधून परत डोकवुन दर्शन घेऊन जड मनानच बाहेर पडलो...
जवळ जवळ पंधरा मिनीटं आम्ही आत होतो.
हर हर महादेव! केदारभगवान की जय! 

नमामी शमीशान... मनात म्हणत बाहेर आले. कविताला घट्ट मिठी मारली... मनात ईच्छा निर्माण करणारा तोच आणि ती  पुरी करून घेणाराही तोच...


कापसासारखी हलकी आणि सोन्यासारखी ताजी निखरलेली मनं घेऊन सगळे जीव प्रांगणात आलो. चार पाच फोटो झाले. काय काय कस झाल .. कोणी कस गेल विविध गप्पा झाल्या. मगाशी या दोघांच राहिलेल भीमशीला, ईशान्य देवता आणि शंकराचर्य  समाधी दर्शन राहिलेलं ते करायला गेले तोवर ईशान्य देवता देवळाजवळ मी आणि कविता बसलो. अमृत तीर्थ भरून घेतलं.


रात्रीचे साडेबारा पाऊण झाले असावेत... खोलीवर जाऊन पहुडलो. पटकन झोप लागली नाही.  सगळ्यांनी सगळे गजर बंद करून झोपायचं ठरलं. 

४ ऑक्टोबर :
 (केदारनाथ आणि सोनप्रयाग रामपूर )
पहाटे कोणी पाच तर कोणी पाचला ऊठले मी तर साडे पाचला  उठले. खिडकीतून सनबाबा झळकत होते हिमपर्वतावर.  सगळे बाहेर पाहायला गेलो. अजूनही तितकीच थंडी होती. नंतर ब्रश व ईतर आटपून, कपडे बदलून आम्ही तयार होतो. अंकित आणि अनिरुद्ध एक चान्स घेऊन पाहू हेलिकॉप्टर च काही होतंय का पाहायला गेले होते सहालाच. पावणे सातला आले तेव्हा समजलं कि काही चान्स नाही. तत्काळ नीकॅप घालून सगळे तयार झालो. आता उतरताना मात्र सर्वच जण पायीच उतरायचं ठरलं. खोलीत मस्त घरच्या सारखा चहा आला. सॅक काठी घेऊन सगळे निघालो. एकेक लाडू खाऊन निघू असा ठरलं. एक टप्पा पार करून नाश्ता करावा कारण सातला कोणालाच भूक नव्हती.  सगळं होईतोवर आठ वाजलेच. 

आठ ला उतरून जायला सुरुवात केली. घोडेतळाशी आलो तेव्हा सर्वानुमते सर्व सॅक बास्केटवल्या माणसाबरोबर खाली पाठवायचं ठरलं. त्यांनी ३०००.०० मध्ये करतो काबुल केलं. सुट्ट चालणं सोपं जाईल याचा दोन किलोमीटरमध्ये अंदाज आला. आता फक्त स्लिंग बँक आणि काठी असाच बरोबर होत. बास्केटवल्या बरोबर प्रणव पुढे गेला कारण त्याच्याकडे ओळखपत्रच नव्हतं. 

आता खरी मज्जा येणार होती. घोड्यावरून येताना उतरणाऱ्यांची मज्जा बघितली होतीच. पण जी अनुभूती घेऊन निघालो होतो ना ती सहकार्य करत होती. पाचही जण आपापल्या स्पीड प्रमाणे चालू  लागलो.  छोटी लींचोली , बडी लींचोली , रामबारा, भीमबली, जंगल चट्टी, भैरव नाथ आणि मग गौरी कुंड असा हा उतरतानाच प्रवास होता. 
छोटी लींचोली ला पोचलो तेव्हा मस्त तिखट घातलेले पोहे खाल्ले. काहींना औषध आहे नास्ता गरजेचा असतो. 
दोघी पुढे, एक मध्ये, दोघे मागे असे चालणारे गट पडले. काठीशी ताळमेळ जमू लागला. घोडे समोरून आले तरी हुकवणं पण जमू लागलं. आजूबाजूची मजा बघत निसर्ग जो घोड्यावरून नीट पाहू शकलो नाही तो पाहत उतरत होतो. दोन तीन वळणं झाली कि थांबून तपासात होतो मागचे आलेत का ते. दिसले कि पुढे चाल सुरु. मध्ये असणाऱ्या नितळ झर्याचं पाणी पीत जात होतो. घसरत होतो, पडणारे पाहत होतो. रामबर ला चढाई जास्त कठीण आहे. कातळ दगड बरेच आहेत. जमिनीतले झरे, घोड्याची लीद, चिखल याची सरमिसळ होऊन मधे मधे  घसरडे पण झालेले होते. दोनदा लिंबू सरबत पण घेतलं. जरा समाधान. हळू हळू एकेक जर्किन उतरवलं जात होत.  बरा झालं सामान बरोबर नव्हतं ते. 

रामबर संपून पुलावरून डोंगर  बदलायचे कि मग येतो भीमबली भाग. पुला अडलीकडे होतो तेव्हा साडेबारा झाले होते. प्रणव बास्केटवाल्या बरोबर गौरीकुंड ला पोचलेला पण होता. आम्हाला अजून पाऊणेक तास तरी लागणार होता भीमबलीला पोचायला. बास्केटवल्यासाठीचे पैसे प्रणव ला पाठवले आणि पूल सोडला. पुलावरून खोलवर पाण्याचा जोराचा वेग भयानक वाटला. 
आता आम्ही सराईत झालो होतो, तीव्र चढ उतारासाठी. भीमबलीला आम्ही तिघींची मस्त पोटभर आलूपराठा खाल्ला. नंतर दोघे जण पोचले.  खूप  वेळ थांबलो कि चालायला वेग कमी होतो हे समजले होतेच. मग तिघी पुन्हा पुढे निघालो. प्रणव आधीच खूप वेळ खाली पोचला असल्यानं जरा अर्धा तास झाला कि कुठं पोचले विचारात होता. सगळ्या सॅक कडे लक्ष देऊन बसून राहणं या वयात जरा अवघडच... पण ना कुरकुरता तो आमची वाट पाहत होता.  बाकीचे दोघे मागून येत होते. 

पुढे कोणालाही विचारलं कि किती किलोमीटर राहिलेत तर ते चार म्हणत होते. कमी काही होईना. जंगल चट्टी भाग आला. हा भाग पूर्ण झाडीमय आहे. वाटेत ठराविक अंतरावर सफाई कर्मचारी घोड्याची वाळलेली लीड झाडेच काम करत होते. एकच होत कि ते कण उडून ठसका लागत होता. 

रबडा चिखल त्यात ओली लीद उंच पायरी संपत आलेला प्रवास सगळंच वेगळं होत..  ठराविक वळणं झाली कि मुख्य म्हणजे सुलभ शौचालयं सुस्थितीत होती. आता जंगल चट्टी ला फोन लागत नव्हते. पुढे चार पाच वळण गेली कि परत रेंज होती. भैरव नाथ देवाला जवळ आम्हाला अंकित भाई घोड्यावर भेटले. ते वरून अकराला निघाले अस ते म्हणाले.  झालं आता एकाच किलोमीटर उरले होते. दगडी बांधकामाची कामं आली. तिच्या उजवीकडे काकडी कलिंगड विकायला बसलेले होते. थोड्याच वेळात घोडे तळ आला. जीव हायसा  झाला. गौरीकुंड आलं. डावीकडे गरम पाण्याची कुंड आली. ती पाहायला परत खाली उतरायचं होतं पण बाकीचे येईतोवर थांबु वाटलं. आधी प्रणव पर्यंत पोचणं महत्वाचं होत. घोडे तळ पासून परत गल्ली गल्ली रस्त्यानी जात जात जात प्रणव थांबलेले हॉटेल आलं. काठी फेकून मी लंगडत त्याला मिठीच मारली. उतरताना साधारण साडे आठ ते नऊ तास लागले. 

दोन मिनिटाच्या अंतराने अंजली कविता पण पोचल्याच. तासाभरात अनिरुद्ध वैशाली पण पोचलेच. प्रणव सामानासकट बसला होता तिथं चहा नव्हताच, सगळा  बाड बिस्तारा घेऊन काल सकाळी चहा घेतला त्याच दुकानात आलो.  


दोन दोन कप चहा आणि  पार्ले जी चा फडशा पाडला. पुढे जीप साठी पण भली मोठ्ठी रांग  होती. बरा झालं प्रणव आधीच नंबर धरून उभा होता. आनंदात होतोच पण पोटरीचे  बर्फाचे खांब झालेले होते. पायाचे अंगठे हुळहुळलेले जाणवत होते. हातातील काठी एका दुकानात देऊन टाकली. परत कोंबड्या जीपमध्ये कोंबल्या. दोन हजार तरी लोकं जीपसाठी उभी होती. सोनप्रयागला पार्किंगमधे पवनदादा येऊन थांबले होतेच. जीपवाला म्हणाला कि रात्री बारा एक पर्यंत जीप सुरु असतात. पार्किंगमधून बाहेर येण्यासाठीच पवनदादांना अर्धा तास लागला. आता मात्र कधी खोलीत पोचून अंघोळ करू असे झाले होते. 

रामपूर च्या रिसॉर्ट वर गेल्यावर चहा घेताना दोन दिवसाच्या गमजा सांगून सांगून हसत होतो. गिझर सुरु झाले. तासाभरात सगळ्या अंघोळी आटोपल्या. फुल कोरम डिनरला बसलो. सगळे काळवंडलेले, नाकं लाल झालेले, लंगडे कोणी कर कोणी खेकड्यासारखे  दिसत होतो. परमकोटीची आनंदाची सकारात्मक स्पंदांची भावना त्या सगळ्याचा विसर पडत होती. सर्व तृप्त आत्मे पांघरुणात विक्स झंडूबाम च्या संगतीत  गुडूप झाले. 
हर हर महादेव ! आयुष्यातले हा दोन दिवस रत्नजडित होते. 

५ ऑक्टोबर २०२३
(रामपूर, उखीमठ : ओंकारेश्वस्वर,  तुंगनाथ ट्रेक पॉईंट  )

रामपूरचं  रिसॉर्ट सकाळी सहाला सोडलं. खूप आठवणी जमल्या.  सामान खचाखच भरलेल्या बॅगा गाडीत चढल्या. आता बद्रीनाथ धामाचे वेध लागलेले. रामपूर ते उखीमठ ओंकारेश्वर देऊळ दिड तासाच अंतर आहे. वाटेत सरसी, उखीमठ धबधबा, जलेश्वर महादेव आणि फाटा लागलं. फाटाला कायम ट्राफिक जॅम असत बहुतेक. नारायणकोटी नाला अशी गावं  होती. पुन्हा गुप्तकाशी  कालीमठ आलं. काय जबरदस्त दरीखोरे बापरे! इथून पुढे  अतिशय तीव्र वळणाचे रस्ते होते.  पदोपदी नवीन अनुभव. मोदीजींनी रस्ते चमोली भागात खुप छान केलेत. दोन्ही बाजुंनी घनदाट जंगल मधे काळा रस्ता. याभागात माकडं नव्हे पांढरी काळतोंडी वानरंच होती. संध्याकाळी श्वापद रस्यावर येतात.
आमची सवारी आता उखीमठ ओंकारेश्वर ला पोचणारच होती. उखीमठ गाव तसं छोटूसच पण महत्व मात्र उच्च कोटींचं. साक्षात केदार बाबा  सहा महिने  या जागेवर विराजमान असतात. याजवळच तुंगनाथ, मध्यमहेश्वर दुसरा केदार तसेच देवरिया लेक आहे.  बाणासुरची मुलगी उषा आणि भगवान श्रीकृष्णाचे नातू अनिरुद्ध यांचा विवाह इकडे झाला. तो लग्नमंडप अजूनही तिकडे जपला आहे. देवोके देव महादेवाचे निवास स्थान एका  खोलीत  आहे. पालखी ठेवलेली जागा पाहायला मिळते. सर्व धर्म ग्रंथ त्यावर व्याघ्रवस्त्र होते. मागे चांदीची पाठ पालखीला आहे. दरवाजाची उंची खूप कमी. आत आत गेलं कि चांदीचा मुखवटा रूप  देवी आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून तिला शृंगार चढवा केला. या  देवळात   पंचशीर  चांदीची मूर्ती आहे. महादेवाचं वास्तव्य इकडं असत म्हणून केदारनाथ इतकीच या जागेला मान्यता आहे. 

केदारनाथांची सहा महिने निवास स्थान जागा 

उषा अनिरुद्ध लग्न मंडप : वरून खाली पाहायला गॅलरी आहे. खाली जाण्यास मनाई होती. 

आम्ही तिकडे पोचलो तेव्हा देवास भोग सुरु होता. देवळाची दाराची उंची खूप मोठी आहे. हे देऊळ पण भडक लाल  पिवळे निळे रंगाचे रंगकाम असलेले आहे. खूप छान दर्शन झालं. प्रसादाचा दही भात लाभ झाला. पंचकेदार शिवलिंग दर्शन  झाले. नंतर केदारबाबांची पालखी जागा, उषा अनिरुद्ध लागनमंडप पाहून बाहेर एक फोटो झाला. उषाच्या नावावरून उखीमठ नाव पडलं असं समजलं. 
आता सगळ्यांना भूक लागल्या होत्या. दादांनी मस्त जागी नाष्ट्यास थांबवल. वाटेत सारी गाव दाखवलं जे कोण्या एका परदेशी माणसाने विकत घेऊन योग सेंटर केलय. चोपता येण्या आधीच थांबलो. दोन दिवसापासून मॅगी खाणं टाळलं होते आज खाल्लीच. काय पटापट पदार्थ आणून दिले. पोहे पण ढोबळी घातलेले. जशी जागा तसे पदार्थ. त्या मालकाची लेक फार चपळ होती. अंगणात बागडल्या सारखी रस्ताभर फिरत होती.

टमाटम पेट पूजा करून पुढे चोपताकडे वळलो. मधे तुंगनाथ ट्रेक पॉइंटला उतरवून दादा पुढे गेले. अप्रतिम निसर्ग पाहत हिमपर्वतरांगा पुढे हिरवे डोंगर पुढे फिकट हिरवे... अश्या पर्वतरांगा होत्या. 
निसर्गाबरोबर खचाखच फोटो आले.
फार इच्छा होत होती तुंगनाथ ला जाण्याची. या भागात तुळस  वेगळी होती पांढरी मंजिरी असलेली. धतुरा फळं लागलेली झाड तसेच उंच डोंगराच्या खडकावर उगवलेली नेचे वनस्पती विविध छटा निसर्गाच्या. 


एकदा फक्त चोपताला यायचं जवळपासचे छोटे छोटे ट्रेक करायचे. ठरवलंच. आता निमुळते रस्ते सुरु झाले. कुमोली, दुर्गंधार, सुपरी,अशी गाव चोपता पोखरी मार्गावर दिसू लागतात. बेला गावाजवळ कार्तिक स्वामी देऊळ आहे जे पूर्ण दिवस लागणार पण बघण्यालायक आहे. पुढच्या खेपेला करायचंच. अलकनंदा नदीला धरून धरून अफाट निसर्ग सौन्दर्य पाहत तासाचं भानच राहत नाही. 

गौचर, कर्णप्रयाग,  नंदप्रयाग आणि नंतर चामोली आलं. पिपलकोटी ठिकाणी आम्ही जेवायला थांबलो. इडली वडा  डोसा तसेच इतर सर्व इंद्रलोक हॉटेल मधे मिळालं.  जेवून निघालो तेव्हा दुपारचं चार वाजले होते. पीपलकोटी ते बद्रीनाथ तीन तास अंतर होत. बदरीनाथला पोचायला सात वाजणार होते. आमची शयन आरती पूजा बुकिंग झालेले होत. किमान साडे आठला तरी पोचाव लागणार होत. 

नियतीला ते मान्य नव्हत, पिपळकोटी नंतर पागल नाली मध्ये चार तास अडकलो. दरड कोसळली होती पागल  नालीच्या घाटात. नारायण म्हणाले थांबा आणि अलकनंदा बरोबर वेळ घालावा. जे होतं ती परामश्वरी योजनाच असते. मानवाचे नियोजन चुकीचे असू शकते पण परामश्वराचे नाही. 

सगळा रास्ता पांढरट मातीचा, चित्र विचित्र आकाराच्या दगडांच्या  डोंगरांचा. वाटेत गरुड गंगा लागली. गरुड इकडे थकले आणि थांबले. भगवान विष्णू तपश्चर्येसाठी पुढे बद्रीनाथला गेले. पुढं पाताळगंगा लागली. दोन्ही देवळं मस्तच. आता मात्र वळण वळणाचे रस्ते नेहेमीचेच झालेले. सात वाजता आम्ही वृद्ध बद्री देवळा जवळून गेलो, बिरादबरी देऊळ पण अंधारातच गेलं.  

आता आम्ही जोशीमठाकडे पोचत होतो. कोणता तरी प्लांट आहे त्याचे डोंगरभर दिवे मोहक दिसत होते. अंधारात सगळं भकास वाटत होतं. आता आला गोविंदघाट, नंतर पंडुकेश्वर देऊळ जे परतीच्या प्रवासात पाहू असाच ठरलं. अंधार पडत होता, आरती मिळेल का यावर विचार विनिमय दोन्ही गाड्यात सुरु होता. साडे आठ तर इकडेच झाले. आता आली हनुमान चट्टी.  हा दहा किलोमीटर चा  भयंकर वळणाचा रस्ता पवनदादा गाडी  चालवताना मी शेजारीच होते. अशक्य वाहनचालक कला होती  ती. रात्री सगळीकडे अंधारात आकाशात तारे चांदण्या मस्त दिसत होत्या.

साडेनऊ च्या सुमारास बद्रीनाथच्या जवळ पोचलो. केदारनाथ च्या मानानी इकडे चेकिंग जास्त होतं. टोल भरावा लागला. गाडीत कोण आहेत किती आहेत पाहत होते. उत्तराखंड रेजिस्ट्रेशन प्रत्येकाचे तपासण्यात आले. टोचरा बोचरा गारवा सर्र्कन जाणवला. आणि अखेर रात्री दहा वाजता आम्ही बद्रीनाथ यात्री निवास मध्ये पोचलो. चेक इन करतानाच एक जणांकडून समजलं कि आरती आमच्या नावानी झाली. नावं पुकारा झाला होता. तरी पूजा बुकिंगचा कागद घेऊन पहाटे साडे तीन चारला चौकशी करून दर्शनासाठी विनंती करा. 

तर सांगायचं मुद्दा हा कि रूमवर गेल्यावर तीनचा  गजर लावून झोपावे लागणार होते. बघू नारायणाच्या मनात कसा योग देणे आहे पाहू. कृष्णार्पणमस्तु म्हणून पाठ वरच्या मजल्यावर टाकली. हो इकडे वीसेक पलंग होते एकावर एक असे. चार खाली चार वर असे मिळाले होते. 

काही ना काही विनोद करून करून हशा पिकतच होता. खालचे हसले कि वरपर्यंत पलंग हलायचा. मला तर काही मिनिटातच झोप लागली. 

६ ऑकटोबर :
(बद्रीनाथ, विष्णू प्रयाग, ..... )
पहाटेचा गजर झाला तेव्हा बरीच मंडळी जागीच होती. कोणी झोपलच नाही तर कोणास उलटी होत होती. गारठा बेकार होताच.  काल सात तर आज पाच तापमान होतं. बद्री विशाल दर्शन कसे होतेय याचीच चिंता होती. झपाझप ब्रश इतर विधी आटोपून सामान गाडीत चढवलं. साधारण पावणेचारला निघालो बद्रीनाथ धाम मुख्य देवालयाकडे. यात्री निवास पासून बारा मिनिटावर होत ते. मधे आधी चहा घेतला. गरम पाणी पण पिता आलं. चार वाजता दुरून देऊळ दिसू लागलं.
 
जस जस जवळ जाऊ तसं तसं आतुरता वाढत होती. प्रणव पूजा घर शोधायला गेला. बाकी सगळे दर्शनाच्या रांगेतच  उभे होतो. साडे चारला अभिषेक सुरु होतात. ती  रांग  हि रांग एकच. इकडे सावळा गोंधळ होता. छोट्याश्या आळंदीत सुद्धा अशी गडबड नसते. कदाचित अचानक यात्री वाढ झाल्याने गडबड झाली असावी. मुख दाराजवळ पोचण्या पूर्वीच प्रणव परत आला. आज थांबा आजची शयन आरती करा अथवा आठ वाजता आठही लोकांना गाभाऱ्यात दर्शन मिळेल असा निरोप होता. त्या पेक्षा दारापाशी आलोच आहोत तर असाच दर्शन घेऊ. तसाही आठला काय होईल काय खात्री. 

होतो त्याच  रांगेत सगळे थांबलो होतो, बेकार गार होती फरशी. एक जण सपाता विकणारा आला, सगळ्यांनी त्याच घेतल्या. दगडी फरशीचा गारवा बाधतो नंतर. रांग होती तिच्या समोरच नारद कुंड होतं. तिकडून निघणारे वाफेचे थवेच्या थवे आमच्या साठी बिरबलाची खिचडी झाले होते. जेव्हा मुख्य दाराच्या पायऱ्या आल्या तेव्हा मध्ये घुसणारे बरेच दिसले. सगळ्यांनी हिय्या करून आरडा ओरड करून हाकलवून लावलं. का कोण जाणे इतक्या जवळ आल्यावर घुसणारे पाहून राग आला होता हे मात्र खरे. 

पायरीवरून लोंढा आत गेला कि रांग कमी होते तरी ढकाला ढकली सुरूच. आत जाताना मध्ये उंच मोठी घंटा आहे. खूप जण वाजवायचा प्रयत्न करत होते. उजवीकडे हनुमंत होता. हे भला मोठा उंबरा. आत गेल्यावर मोकळे पटांगण (वरच्या फोटोत अंदाज येईल.)मध्यावर बद्री विशालजी स्थानापन्न. थोडा वेळ रेटा रेटी झाली पण देवासमोरून भस्किनी हाकललं नाही. नीट पाहू दिलं. अहाहा ! श्री बद्री विशाल विग्रह मूर्ती पाहण्याचा असा योग्य होता. अभिषेक साठी विग्रह रूप असावे. 

देव जिकडे आहते तिकडे पुढे दोन सोनेरी खांब मागे दूरवर दोन खांब आहेत. खांबाला जोडणारी जागा चांदीची त्यावर एम्बॉस केलेल होतं पण दुरून फारसं दिसलं नाही. आत गाभाऱ्यात डावीकडे वीस उजवीकडे वीस लोक बसले होते. देवाच्या आणि आमच्या मधे गुरुजीच मधेमधे येत होते.  कुबेराचा चेहरा जो फोटोत होता तो दिसला नाही. बाकी सर्व दिसले. शाळीग्राम स्वरूपातील भगवान विष्णू ध्यानस्थ  मूर्ती आहे. पद्मासनातली हि मूर्ती साडे तीन फूट असून कपाळावर हिरा तर एका  हातात शंख व दुसऱ्या हातात चक्र आहे. गर्भ गृह, सभा मंडप, दर्शन मंडप असे देवळाचे भाग आहेत. कुबेरास या भागाचा यक्ष म्हणतात. लक्ष्मी बरोबर कुबेराची पण पूजा केली जाते. गणपती, उद्धव, नर, नारायण, नारद मुनी, माता लक्ष्मी तसेच भूदेवी श्रीदेवी मूर्ती इकडे आहेत. भगवान बद्रीनाथ चंद्रावर विराजमान आहेत अस वाचलं होतं पण तिकडे बघायचं कस दिसतं ते काही जमलं नाही. गर्भगृहात कुबेर आणि चंद्र आसन दर्शन सोडून बाकी सर्व उत्तम पाहता आले. आपसुखच नारा लगावला गेला. "जय बद्री विशाल " प्रसाद घेऊन तीन पायरी खाली उतरलो. गर्दीत मी आणि वैशालीचे एकत्र होतो. मागे संजिव प्राची त्या मागे कविता अंजली नंतर अनिरुद्ध आणि शेवटी प्रणव बाहेर आला. बद्री विशाल देवळा जवळ माता लक्ष्मीच देऊळ आहे. तिकडे अन्नदानाचे पावती फाडली.  देवळामागे आदी शंकराचार्य यांची प्रसन्न मूर्ती आहे. शेजारी प्रसाद घर आहे. शेजारी नर नारायण देऊळ आहे. बाहेर पडतो तिकडे ग्रामदेवता घंटाकर्ण अशा मुर्त्या शाळीग्रामातच आहेत. 
बद्रीनाथला हरभरा डाळ मुरमुरे साखर फुटणं असा प्रसाद मिळाला. आवारात फोटो काढू देतात पण आतला फोटो काढू देत नाहीत. 
काय वर्णू  इथले गुण जिथे नांदतो नंद नंदन!
गुणदोष माझे ते माफ करून, येऊ दे चरण हृदयात , हेचि कृपादान देई प्रभुराया.... 
 

पवन मंद सुगंध शीतल, हेम मंदिर शोभितम 
निकट गंगा बहत निर्मल, श्री बद्रीनाथ विश्वम्भरं 
शेष सुमिरन करत निशदिन, धरत ध्यान महेश्वरम 
वेड ब्रह्मा करत स्तुति, श्री बद्रीनाथ विश्वमभरं.....

 
अभिषेकास जाण्याचा दरवाजा

बद्रीनाथ देवळा मागे गाय वासरू देऊळ आहे. सगळे मिळून प्रसाद खाल्ला आणि विविध ठिकाणी विखुरले गेलो, कोणी अभिषेक तर कोणी अन्नदान तर कुणी कॉल करत होते तर कुणी फोटो. एकत्र फोटो तेवढा राहून गेला. सकाळचे साडेसहा झाले होते. परतायची इच्छा होत नव्हती. जवळ जवळ वर्षभर घोकलेलं केदारनाथ बद्रीनाथ दर्शन आज सफल निर्विघन पार पडलं 

कालच्या दोनतासाच्या गडबडीमुळे आजच माण गाव दर्शन सोडून द्याव लागणार होतं. बद्रीनाथ ते ॠषीकेश दहा तासाचा प्रवास होता. त्यामुळे लगेचच निघु असा सल्ला पवनदादांनी दिला. देवळाजवळ मस्त गरमागरम मसाला दुध सगळ्यांनी गट्टम केलं आणि साडेसातला श्रीक्षेत्र बद्रीनाथधाम सोडलं.

काल रात्रीचा अंधारात न बघता आलेला रास्ता आता बघता आला. जसे खीर व्हॅली पॉईंट, विष्णुप्रयाग, पंडुकेश्वर देऊळ, श्री योगध्यान बदारी देऊळ, जोशीमठ, वृद्ध बद्री देऊळ हे सगळं वरून पाहू शकलो आत गेलो नाही. परत इंद्रलोकला मस्त जेवलो, इकडे आम्हाला सरप्राईझ सामोसा मिळाला. 
विष्णू प्रयाग 

काय गाडी चालवलीय या काळात. जब्रा! ड्राइव्हर शेजरचा जागा बाकी झोपत होतो. गेले काही दिवस रोज तीनला उठत होतो. 

रात्री ऋषिकेशला हॉटेल रिषीलोकमध्ये साडेसातला पोचलो. बसून बसून पाय दमले होते. आज जेवताना पहाडी खीर करायला दुपारीच फोन करून कळवलं होतं. पहिल्या दिवशीच जेवण आवडलच होतं त्यात आता खीर होती. प्रणव गेला इस्कॉन जवळ आलू टिक्की खायला. आम्ही मात्र आरामच केला. दुसरा दिवस हरिद्वारच्या होता. सकाळी ६ ला उठून इस्कॉनजवळचा घाट फिरून यायचं ठरलं. 


७ ऑक्टोबर :
(ऋषिकेश, हरिद्वार)
सकाळी सहल उठून चहा घेऊन आवरून काही मंडळी घाटावर निघालो. इस्कॉनजवळच्या घाटाचं नाव पूर्णानंद घाट होत.  चालत दहा मिनिटात पोचलो. सुंदर मोजकाच गारवा, नुकताच उगवलेला सनबाबा त्याची सोनेरी किरणं गंगेच्या पात्रात लखलखत  होती. थोडे पाय बुडतील इतपत पाण्यात गेलो. योगायोगानं फुलांनी सजवलेल्या टोपल्या पण विकायला होत्या. पहिल्या दिवशी घाईत झालेली गंगेची पूजा आज नीट शांतपणे एकेकीला करता आली.  
काही दुकानं उघडलेली होती मस्त कुल्हड मध्ये चहा बन मस्का मिळाला. खूप दिवसांनी इतके निवांत होतो. आता यावर फोटो नको आठ वाजत आलेत चला. नऊला नाश्ता करून साडेनऊला ऋषिकेश सोडायचं हे एकमेकींना बजावत होतो. परत जाताना पुन्हा इस्कॉन बघितलं. हॉटेल ऋषीलोकमध्ये हवा तो नाश्ता केला सर्वानी. 

बरोब्बर साडेनऊला हरिद्वारला निघालो. 

ऋषिकेश हरिद्वार दीड तास अंतर आहे. तरी अकराला आम्ही पवित्र क्षेत्र श्री हरिद्वारला पोचलो. पितृपक्ष योगायोगानं असल्यानं सर्वानीच आपापल्या गोत्रांची तिलांजली विधी गणेश घाट वर श्री अंकुर जोशी गुरुजी यांच्याकडून केला. तासाभरात ऊन तापलं होत. नारायण घाट पिंड दानासाठी वेगळा आहे. 

गणेश घाट

त्यानंतर दक्षेश्वर महादेव देवळात गेलो. या आवारात विषाद अवस्थतील महादेव मृत सतीला घेतलेला पुतळा मधोमध आहे. दक्ष प्रजापतीने यज्ञ केला यात शिव सतीस आमंत्रण नव्हते. ती हि जागा. सती न बोलावता यज्ञात सहभागी झाली त्यावर तिचे पिता दक्ष यांनी तिचा तसेच महादेवाचा अपमान केला तो सहन न झाल्यानं सती मातेनी योग तापानी स्वतःस जाळून घेतले. भयंकर संतापलेल्या महादेवांनी तांडव सुरु केले, वीरभद्राला दक्षास संपवण्यास धाडले. वीरभद्रानी दक्षाचे मस्तक छाटून त्याच यज्ञकुंडात टाकले. भयंकर संतापलेल्या मानसिक अवस्थेत भगवान महादेव यज्ञ स्थळी पोचले तेव्हा प्रसूतींनी जी दक्षाची बायको तसेच मनुची मुलगी होती तिने विनवणी केली. भोलेनाथ तर भोळे होतेच त्यांनी दक्षास बकरीचा डोके दिले व जगात कल्याणासाठी जगावे अशी समज दिली. याठिकाणी जे शिवलिंग आहे ते दक्षेश्वर. सती कुंड, महादेव शिवलिंग, हनुमांनाच, वीरभद्राचे  देऊळ याठिकाणी आहे. यज्ञाजवळ अष्टभुजा देवी आहे. सती मातेनी योग तापाने देह त्यागला  तेव्हा ती प्रकट झालेली. प्रत्यक्ष या सर्वांचे चरणकमल या भूमीवर पडले अशी पावन भूमी दक्षेश्वर महादेव कनखल क्षेत्र.  



यानंतर मनसा  देवी पाहून अलकनंद रिसॉर्ट ला चेक इन करू अस ठरवलं. पवनजींनी जास्तीत जास्त जवळ सोडलं तरी पुढे ऑटोनी जाव लागतं मग काय बॅटरीच्या रिक्षात गेलो. तिकडं उतरून हे लांब लचक गल्लीतून पोचलो एकदाचे मानस देवी तिकीटघरी.  तर मोट्ठी तिकीटाची रांग पाहून अंदाज आला कि दोन तास तरी तिकीट मिळायला लागणार आहेत. मग खालूनच नमस्कार केला. पार्कींगला आलो भूक लागली होतीच, हॉटेल साई मध्ये फ्राईड राईस छोले भटुरे लस्सी खीर रोटी मश्रुम मसाला दम आलू  हव ते मागवला. नंतर डायरेकट गाड्या अलकनंदा रिसॉर्ट वर नेल्या. 

काय सुरेख जागा आहे. अस वाटलं कि इकडेच दोन दिवस ठेवायला हवे होते. रिसॉर्ट च्या मागे घाट जिकडे डुबकी मारू शकतो. मग काय.... तासाभरात तिघे गडी घाटावर... टॉवेल घेऊन. 

आम्ही पाचजणी मस्त पाय बुडवुन बसलो. संध्याकाळी गंगेच्या पाण्याची ओढ फारच नजरभेदी दिसत होती. घरी सगळ्यांशी फोनवर निवांत बोलण झालं. साडेपाच वाजत आले होते.  पटापट आटपून अलकनंदा रीसाॅर्ट गेटजवळ बॅटरीची टमटम केली. टमटमनी हरी की पौडीजवळ पुलापाशी सोडलं. पूल ओलांडला ची ऊजवीकडे बेभान चालत सुटलो. ईकडे गंगा आरती साडेसहाला असते. जवळ जाऊन बघण्यासाठी दोघ दोघ घट्ट हात पकडून सुसाट धावलो. आरतीच्या जागेवर एक चप्पल स्टँड होता तिकडे चपला ठेवुन आरती करण्यासाठी पैसे भरून नोंदवलं. तस केल म्हणुन पुढुन आरतीच दर्शन होणार होतं. साधारण तीन चार हजारात गर्दी होती. आमटीत डाव जसा ढवळायला हलवतो तस त्या माणसाच्या मागे गेलो ते थेट आरतीच सजवलेल होत तिकडच. अगदी गंगा मय्येच्या चांदीच्या मूर्तीजवळ. अहा! जोडी जोडीन आरती करता आली. 

ईतकं मंत्रमुग्ध वातावरण होतं. तिकडच्या पंडीतनी आमच्या चौघांकडून आरती करून घेतली. नीट समजवुन सांगत होते. समोरच लक्ष्मीनारायण देवळाच दार आणि थेट समोर दर्शन होत होत.

मुख्य आरती सुरू झाली तेव्हा सजवलेली पंचारतीच घेऊन ते पंडीत काठावर गेले. कापूर आरतीला परत जागेवर आले. आयताकृती चौथरा होता तिकडे आरती होते. तीर्थ प्रसाद लाभला.  तिन्हीसांज साजरी दिसत होती. प्रत्यक्षात प्रभु भगवान विष्णुंचे पदस्पर्श झालेली पवित्र भूमी हरी की पौडी... आज आम्ही आठही जणं त्या पवित्र स्थलाची पवित्र स्पंदं अनुभवत होतो.

एकदम ऊठुन न जाता थोड घाटावरच थांबलो.  कारण आधीची शिस्तीत बसलेली मंडळी गंगेत पुजेचे दिवे टोपल्या सोडण्यास मनोवांचीत फलप्राप्ती सुख सौख्य लाभण्यासाठी तसेच गंगा मातेचे आभार मानण्यास सरसावली.

आम्ही मात्र आमच्या रीसाॅर्ट मागच्या घाटावर पूजा करू म्हणुन पाच टोपल्या घेतल्या. गंगेची पालखी जी काठावर नेतात ती मुख्य देवळात परत येताना दर्शन व पालखीस हात लावता आला.

गंगा मातेच, कालीमाता, केदारनाथ, बदरीनाथ, लक्ष्मीनारायण अशी सगळी देवळ दर्शन घेत घेत चपलांपाशी पोचलो. 

टोपी शर्ट अशी किरकोळ खरेदी करून खाऊ गल्लीत गेलो. आलु चाट, दही वडा, रबडी, काला जामुन मस्त होतं. मोतीबाग चाट गल्लीत...

परत पुल ओलांडून दुसरा किनारा गाठला. दाल चाट पार्सल घेतली आणि टमटमनी परत रूमवर आलो. लगोलगच भिमसेनी कापूरचा वातीवर चुरा पसरवला,  फुलांच्या टोपल्या सजवल्या आणि शांत न गडबड करता माता गंगेची पूजा केली. मस्त गार वारा आमच्या टोपल्या एकामागे एक पाठवत होता. अतिशय मनमोहक दृष्य ते. कितीही फोटो काढा ते नयनसुख जसच्या तस टिपलच जाणार नव्हतं.  आयुष्य सरल सुखद होण्येसाठी योग्य कर्म करण्याची बुद्धी दे अशी याचना करून जे जे दिल आहेस त्यासाठी अनंत आभार मानत नमस्कार करून बघत बसलो तो घाट.....

बरच चालण झालेल त्यामानेनं. आवरून लगेच डायनिंग गाठलं आम्ही शेवटच गिर्हाईक असू बहुतेक. किरकोळ हव ते जेवलो. खोलीत जाऊन गुडूप.

८ ऑक्टोबर २०२३
हरीद्वार हून साडेसातला गाडीत सामान चढवलं. सॅडवीच पार्सल घेतले. ऊपीट पराठा मॅगीचा नाश्ता केला आणि आठला डेहराडूनला निघालो.

साडेनऊला विमानतळावर पोचलो. पवनदादा तसेच वीरूदादांना निरोप दिला. या दोघांमुळे प्रवास सुरक्षित झाला. परत भेटुच अस म्हणत. विमानतळावर आत पोचलो. तासभर बसलो होतो तोवर हिशोब आणि फोटो देवाण घेवाण झाली. आणि भिरभिरती आठ मनं पुण्याकडे ऊडाली. पावणेदोनला पूण्यात. साडेतीनला घरी.

मनात ध्यास असेल तर कर्म आपोआप होतं कर्म करत राहिलो की योग्य फलप्राप्ती होते... कर्माच महत्व समजलं. मानवी शरीराच, जनावरांचं, विश्वाच्या रचनेचं, निसर्गाचं, जीवलग दोस्तांच, आद्ध्यात्मिक स्पंदांच सोन्याच मोल असणार महत्व समजलं आणि महत्वाचं म्हणजे ते अनुभवल म्हणुन समजलं. आपल्या आखणीपेक्षा परमेश्वरानी आपल्यासाठी आखलेलं जे जस असेल ते पदरात घ्यायला शिकलो. कारण आपल्याला काय योग्य ते त्यालाच जास्त ठाऊक असतं. हे समजण्या इतकी तत्काळ बुद्धी मानवास नाही. कालांतरानच ते आपापल्या बौद्धिक बैठकीप्रमाणे समजतं.

या संपूर्ण प्रवासात माध्यम ठरणार्या सगळ्यांचे आम्ही मनापासुन अत्यंत आभारी आहोत.  घरून निघताना सहकार्य करणार्या सर्व कुटुंबियांचे तसेच सर्व हितचिंतकांच्या सकारात्मक स्पंदांचे ज्यांच्यामुळे यात्रेस प्रोत्साहन लाभले अशांचे पण धन्यवाद.

हे परमेश्वरा अशीच अनुभुती वेळोवेळी आम्हास लाभो हीच प्रार्थना. 

हर हर महादेव! जय बद्रि विशाल !

शुभं भवतु!
गौरी पाठक
१४.१०.२०२३

1 comment:

  1. खूपच छान लिहिलेस...अगदी आमचा पण प्रवास झाला...व दर्शन पण झाले...

    ReplyDelete