Thursday, 24 June 2021

लहानपणची आठवण आमचा वाडा!

वाडा म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यापुढे वेगवेगळी  कल्पना येते. आमचा वाडा म्हणजे मांगल्य होता. मुलांच्या खळखळाट  हास्यानी भरलेला, शेजारणीच्या घरात सहज ये-जा असणार्या बायकांनी गजबजलेला, एकमेकांच्या मायेनी जोडलेला दुवाच होता. हमरस्ता शिवाजी रस्त्यावर शुक्रवार पेठेतला आमचा हा वाडा, बाहेरून चिरेबंदी कडी कोयंडा दार असलेला. नवख्याला बाहेरून आतली कडी कधी ऊघडता न येणारा, आम्ही  मात्र यात तरबेज होतो.
दारातुन आत आल की एक मोठी काळ्या पाषाणाची एकसंध दगडाची पायरी होती. ऊजवीकडे मिटर होते डावीकडे अंधारी जीना. सांगितल तरच समजणारा. बोळ संपुन पुढं आली की मस्त बंदिस्त अंगण, आजकालच्या भाषेतलं फोर्च सारखं. वर चारी बाजुंनी घराच्या खिडक्या, पदार्थांची देवाण घेवाणही बायकांची होत असे. तिकडे एक मोरी होती. डावीकडे किराणामालाच्या दुकानाची आतली बाजु होती; सरळ पुढं आलं की डावी ऊजवीकडे घरं होती, आहेत अजुनही. या अंगणात लहानपणचे खेळ रंगायचे, मेंदी लावणे, रात्री जेवल की गप्पा मारणे ईकडेच असायचं. ऊजवीकडे जीना वर आमच घर वन रून किचनमधे बावीस वर्ष छान गेली. तशी आठेक बिर्हाडंच होतो पण मजा यायची. मधे परत दोन खोल्या नंतर आमच मागचं अंगण. डावीकडे मोठ्ठी मोरी आहे. सकाळी सगळ्यांचा कामाचा कलकलाट असे ईकडे. नळावरची भांडणं रंगायची. जवळच मोठी विहीर होती, बुजवली नंतर ती. संध्याकाळी  भकास वाटणारं अंगण पण दिवसभर चेहेल पेहेलच. अंगणात कापसाचं, ऊंबराचं, आंब्याच झाड होतं. याच अंगणात होळी पेटवायचो. 
ऊन्हाळ्याच्या सुटीत हे अंगण अड्डाच असायचा. कोण पत्ते खेळायचे, कोणी भांडीकुंडी तर कोणी प्लॅस्टीकचा कॅरम. तेव्हा विश्व मय्यादीत होतं, पण एकोपा खुप होता. दिवाळीचे फराळ, पापड, नागपंचमीची मेहेंदी, रंगपंचमी सगळं एकत्र असायचं. सगळ्या बायका दुपारी कामं करायच्या. वर्कशाॅप भरल्या सारखं चित्र असायचं. कोणी ब्लाऊज शिवत, कोणी फाॅल पिको, तर कोणी ब्लाऊजला हातशिलाई. सुटीत आम्ही खरी कमाई करायचो. महिना संपला की पैसे मिळायचे मग सिनेमाला जायचो.
आमच्या वाड्यात आजुबाजुच्या वाड्यातली मुलं पण खेळायला येत, लेकुरवाळाच होता. लपाछपी, गोट्या, पत्ते, नवावव्यापार असे डाव रंगत. भिंतीवरच्या सावल्यांचे सिनेमे पण बहारदार वाटायचे. ते वाड्यातले माहेरपणाचे दिवस सोनेरीच होते. वाड्याच्या साक्षीन बरीच कार्य पार पडली. कार्य कोणाच असेना वाडाभर आनंद असायचा.
असा आमचा हा आठवणींचा खजिना वाडा मला कायम कायम आठवतो. आठवणीच्या या वास्तुला माझा मनापासुन नमस्कार आणि वाड्याच्या आठवणी सांगता आल्या म्हणुन या ग्रुपचे आभार!
सौ. गौरी पाठक (घाणेकर)

Friday, 11 June 2021

ऑनलाइन लग्न एक आगळावेगळा अनुभव

आमच्या नंतरच्या पिढीतलं हे पहिलच लग्न! त्यामुळे सगळेच जाम खुष होतो. मोठ्यांपासुन ते अगदी लहानांपर्यंत भरपुर ऊंच मनोरे आखणं सुरू झालं होतं. दोन्ही घरी आनंदाच ऊधाणच आलं होतं. परदेशातुन मुलं येण्याच्या तारखेवरून लग्नाची तारीख काढली, हाॅल पण बुक झाला. ... आणि अचानक कोरोना नावाचा राक्षस ऊद्भवला. कसलं काय! वधु वराला भारतात येण अशक्य झालं. वर्षभर थांबलो तरी हा राक्षस काही हालेना. यंदाच्या वर्षी तर आम्हालाही परदेशात जाता येईना.

सर्वानुमते मुलांनी परदेशातच मुलांनी लग्न करून घ्याव अस ठरलं. जीवाचा दगड करून हेठरवलं खरंतर.  इकडुनच मुहूर्त काढुन दिला. दोन्ही आई वडिलांची विधीवत लग्न व्हावं अशी इच्छा होती. परदेशातल्या हिंदु देवळात मुलांनी चौकशी केली. ते पण सगळं ठरलं. आता लगीनघाई परदेशात सुरू होती. भारतात दोन घरं मनात हुरहुर घेऊन वावरत होती. पण तरी यु ट्युबवर लग्न बघता येणार हा आशेचा किरण सुखावून जात होता.

मुलाची शेरवानी, मुलीची साडी, शेला, उपरणं, मुंडावळ, टोपी आणि चितळेची आंबा बर्फी मात्र कुरीअरनी परदेशात पोचली. ई-खरेदीचा आनंद मनमुराद घेतला. लाॅकडाऊनमुळे दुकानं जशी ऊघडतील तसं हे घेण्यात आलं. अगदी तुळशीबागेतले बाळकृष्ण अन्नपुर्णा पण घेण्यात आम्हाला यश आलं. ते पण थाटात परदेशात पोचले, देवघरात स्थानापन्न झाले.

मंडप सजवणं, जेवणाचा हाॅल बुक करणं, वधुची तयारी, आमंत्रणं सगळं सगळं मुलच करत होती. देवळात विधी करून रेस्टाॅरंटमधे लंच ठरवलं होतं. सोबतीला होते ते तिकडचे दहा बारा मित्रमैत्रिणी आणि भारतातुन पालकांचे आशिर्वाद! 

आम्ही पालक पण काही कमी नाही, लग्न ऑनलाईन असलं म्हणुन काय झालं?  मस्त आवरून बसलो. व्याही व जवळचे नातेवाईक यांना मिठाई पोच झाली. मेहेंदी काढली. व्हाॅटस अपवर विधीवत आमंत्रणं पोचली. जवळच्या बंद देवळात का होईना पत्रिका ठेऊन आलो. कुलदेवीला कुळाचाराची पुजा आणि ब्राम्हण भोजन करण्यासाठी गुगल पे धाऊन आला.

परदेशातील दुपारी असणारा लग्नाचा मुहुर्त भारतात रात्री सव्वा बाराला होता. घरातले सगळे आवरून अक्षता हातात घेऊन बसलो. दाराला तोरण लागलं, झेंडुच्या माळा सजल्या सुनेच स्वागत म्हणुन पायघड्यांची तयारी झाली.सगळ्या सासवांनी वेलकम सुनबाई व्हाॅटस अप चॅलेंज सारखी तयारी केली. फक्कड मेनु ठरवुन झोमॅटो केलं.

रात्री जागुन लग्न अनुभवण्यात मजा आली. तिकडचे गुरूजी पण छान होते. सगळे विधी इंग्रजीत समजावुन सांगताना ऐकुन हसुन हसुन पुरेवाट झाली. दोन मजली ट्राॅलीत त्यांनी सगळं सामान आणलं होतं. अगदी लाजा होमची पण तयारी होती. गणपती पुजा, सात फेरे, सप्तपदी, कानपिळी, सूर्यदर्शन पासुन लॅपटाॅपवर आई वडिलांना नमस्कार करा इतपत सगळं सगळं छान झालं. एका मैत्रिणीन लगीनगाठ बांधली, एका मित्रानं कानपिळी केली. मधेमधे फोटोग्राफर लॅपटाॅपच्या मधे येत होती. मंगलाष्टका कानावर पडल्या आणि टेक्निकल युगाचे आभारच मानले. 

वरिष्ठांच्या आगाऊ सुचनांशिवाय मुलांनी सुरेख कार्य पार पाडले. मायेची धडधड भारतात थांबली. वधुचे पालक तृप्त झाले आणि वराकडचे आनंदले. झुमकाॅलवर वेलकम वहिनी करून मुलांनी वहिनीच स्वागत केलं.

ईतरवेळी सर्व विधी वर-वधुचे माता पिता पाहु शकत नाहीत. या ऑनलाईन  लग्नात ते नीट पाहता आले. अजिबात न दिसण्यापेक्षा, स्पर्शाची अनुभुती मिळाली नसली तरी मानसिक समाधान
लग्न पाहण्याचं ऊपभोगता आलं.

खरच सुरेखच होता हा पहिला वहिला ऑनलाईन लगीन सोहळा!

शुभं भवतु!

सौ. गौरी पाठक