आजवरच्या पिढीला आई होण हे स्त्री जन्माचा गाभा वाटायच. लग्न काय फक्त मुल जन्माला घालायला असतात असे विचार काही प्रमाणात असले तरी तो अमृतानुभव घ्यायची लालसा नक्कीच असायची. योगायोगाने आजवरच्या पिढीतील स्त्रीला नैसर्गिक मातृत्वाच्या योग्य वयापर्यंत शिक्षण आटोपून पायावर ऊभ राहण्यासाठी शैक्षणिक संधी होती. तीला पण संघर्ष हा होताच पण ती नशिबवान होती. तीच्या त्या योग्य वयाच्या वळणावर ती खमकी ऊभी होती, तीला भविष्याची भिती होती पण धास्ती नव्हती. ती तो अमृतानुभव घेण्यासाठी आतुर होती. तीला आपण आता तो घेऊ यासाठी तयार होताना पुढ कस होईल अशी शंका नव्हती. यासाठी कदाचित तीची पायाखालची जमीन विश्वास, भावना, परिस्थिती, आपुलकी यासर्व तत्वांनी भक्कम होती.
आजवरच्या पिढीतील स्त्री निसर्गाच्या नियमानुसार योग्य वयात या गोड भावना अनुभवण्यास सज्ज होती शारिरिक आणि मानसिक सुद्धा! ती वयाच्या २५ -२८ मधे हा सुखद अनुभव घेऊन सक्षम मातृत्व अनुभवायला सामोरी जात होती. वयाच्या या कालावधीत शरीरात मातृत्वाचा अनुभव घेण्यासाठी पाझरणाऱ्या संप्रेरकांचा फायदा ही तीला मिळत असावा. म्हणून तर ते नैसर्गिक मातृत्वाचं योग्य वय म्हटल जात असावं.
आजकाल हा वयोगट २८-३२ झाला आहे, जो खरतर निसर्गाच्या नियमानुसार ऊशिराचा असावा. या वयोगटातील स्त्री - शिक्षण कालावधी जास्त असल्याने किंवा कामाच्या बैठ्या शैलीचा नकळत झालेल्या परिणामाने किंवा आजुबाजुच्या सामाजिक आवरणात जगताना भविष्याची चिंता वाढल्याने नकळतच निसर्गाच्या मातृत्वाच्या योग्य वयोगटाच्या पुढे गेली आहे अस म्हणाव लागेल.
त्यामुळे या पिढीला तो मातृत्वाचा सुखद अनुभव धस्का वाटु लागलेला जाणवतो. त्यामागचा आनंद न दिसता यांना त्रास काय होतो हेच पाहण्याची वृत्ती जास्त दिसते. कदाचित ते वाटण त्या वयाचा किंवा त्या वयात पाझरणाऱ्या संप्रेरकांचा प्रतिसाद असेल असही म्हणू शकतो. यामुळेच का कोण जाणे या पिढीला असंतुलन असलेली पाळी ऊर्फ पिसीओडी सारखे प्रश्न ऊद्भवत असावेत. यात वयाच्या तीशीतच पाळी जाणं, वयाच्या बत्तीशीत गर्भधारणा न होणं अशा आणि आणखी काही शारीरिक अव्यवस्था निर्माण होताना अथवा सद्ध्या घडताना दिसत आहे. अर्थात यात सगळ्याला अपवाद असतीलच.
लग्नाच निसर्गाच्या नियमानुसार वय पुढे जाणं, ज्या भावना ज्या वयात अनुभवायला हव्यात त्या वयाच्या आधीच सहज दूरदर्शन द्वारा बघण्यात येणं, त्या मांगल्याच्या दैवी देणगीचा जस्ट कॅज्युअल विचार सरणीत सर्रास वापर होणं, भावी आयुष्य सुखी असेल ना? यावर जगताना मनात येणारी शंका, जीवनसाथी निवडतानाची हाच तो कसा ओळखायचा यासाठीच मानसिक द्वंव अशामुळे काही वेळा काही स्त्रीया काय फरक पडतो स्वतः च मुल नाही तर कोण त्रास सहन करेल दत्तक घ्यायच आणि मोकळ व्हायचं या विचाराच्या आढळतात (यात असे अनंत मार्ग अवलंबणारा गटही नुकताच समजलाय) तर काही मातृत्वाचा अनुभव घ्यायला मिळावा म्हणून धडपडणारी जोडपी दिसतात. निसर्गाच्या नियमानुसार जगायच तर आजुबाजुला असणारी सर्व प्रकारची परिस्थिती पण तशी हवी.
पण अस सद्ध्या आढळत नाही त्यामुळे फार मोलाची मातृत्वाची अनुभूती घेण्यासाठी जन्म मिळालेली स्त्री त्या आनंदापासून दुरावताना दिसतेय.
ज्यांना अनुभव हवाय पण योग येत नाही आणि ज्यांना योग्य वय आहे तो अनुभव घेण्यासाठी त्यांना ती वेळ योग्य वाटत नाही अस काहीस दिसतं.
चुटपुट लागते जेव्हा ऐकायला मिळतं एका २६ वयाच्या मुलीकडून की पिसीओडीमुळे पाळी ३० वयात गेली तर गेली दत्तक घ्यायच त्यात काय ऊलट लेबर पेनचा त्रासातुन सुटका. प्रेमान काय दत्तक मुलाच पण करू शकतो स्वतः चच कशाला हवय. (अहं अस समजु नका की मी तीच मन समजुन घेत नाहीये. अशी वेळ आल्यावर असा विचार येण समजु शकतो. पण अशी वेळ आलेली नसतानाच तीच हे वक्तव्य आहे.) कित्ती मौल्यवान अनुभूतीचा अनुभव असतो याची पुसटशी कल्पनाही तीला नव्हती अस म्हणाव पण नाही त्या अनुभूतीचा आनंद घेतलेली स्त्री आजुबाजुला पण तीन बघितलेली नाही. दत्तक घेऊन समाजाच भान राखण वेगळच ती गोष्ट करणारे ग्रेटच म्हणावे पण मातृत्वाचा अनुभव हा त्रास वाटणं किंवा त्यामागची अमृतानुभूती घ्यायची लालसाच न दिसणं हे पचनी पडण अशक्य आहे.
थोडक्यात जावे त्यांच्या वंशा म्हणायच आणि सोडून द्यायच. शेवटी प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक विचार आणि निर्णय. एकमेकांच्या विचारांना निर्णयाला मान दिला पाहिजेच पण खंत किंवा चुटपुट वाटली तर ती व्यक्त पण केली पाहिजेच.
हे परमेश्वरा येऊ घातलेल्या पिढीतील प्रत्येक स्त्रीला निसर्गाच्या नियमानुसार योग्य वयात मातृत्वाचा अमृतानुभव लाभावा यासाठी त्यांच्यात विचारमंथन होऊन तस वागण्याची बुद्धी त्यांना लाभावी अशासाठी सूत्रं हलव रे बाबा भगवंता, भावी मातृत्वाचा ऱ्हास होऊ देऊ नकोस...
जय श्रीकृष्ण
गौरी पाठक
०३.१२.२५