माझं ऑफिस माझं माहेरच !
अनेक वर्ष दिवसातले ठराविक तास एकत्र राहून आपण नकळत एका छान नात्यात बांधले जातो. रक्ताचा माणूस पण वेळ पडली तर त्रयस्थ म्हणून सल्ला देण्यास चुकेल पण हे नातं तस नसतं. आपल म्हणणं समजून तो त्यावर व्यक्त होतो, वेळप्रसंगी चूक पण दाखवतो. यांनी दाखवलेली चूक समजते, राग येत नाही. जगात कस वागावं? काय चूक काय बरोबर हे यातूनच समाजत.
मी पदवीधर झाल्या नंतर नोकरी केलीच पण मोठ्या कंपनीत लागले ती मराठे इन्फोटेकलाच. आमचं ऑफिस गोकुळ होत.
बावीस पुरुष आणि मी एकटीच महिला होते. मी ग्राफिक डिझाईनर होते. माझ्या वयाचे चार जण होतो, बाकी वयानी अनुभवांनी मोठे होते. मार्केटींगचे पण सगळे सहकारी मस्त होते.
फिल्डवरचे अनुभव ऐकत लंच होत असे. माझे लग्न झाले तेव्हा रुखवत सामान नेताना पासून सगळी मदत केलेली. लग्नानंतर ऑफिसला आल्यावर उखाणा घेऊनच आत घेतले. इतपत सगळे या सहकार्यांनी केले. पुणे शाखेतली पहिली महिला असल्याचा आजही मला खूप अभिमान आहे. सध्याच्या जीवनात जगताना मुख्य असणारा "ई-मेल" हा कसा करायचा? हे मी इकडे शिकले. अकाउंट पण नव्हतं तेव्हा माझं. शिस्त, काटकसर, तसेच कामावरच प्रेम कसे असावे हे मी इकडेच शिकले. आमची दरमहा १ तारखेला ठाणे ऑफिस ला मीटिंग असायची. सगळ्यांबरोबर मी त्यांच्याच डब्यात चढून आपोआप जायची यायची. लोकलची अजिबात नसलेली सवय हळू हळू झाली. खूप छान सांभाळून घेत असत. रोज रोज नवीन शिकायला मिळायचे. टेलिमाकेर्टिंगच कोणी नव्हतं ते पण काम कमी तिथं आम्ही मध्ये शिकले. हा गुण इकडेच रुजला. एक रजेवर असेल तर दुसर्यांनी न सांगता त्याचे टेबल बघायच आपलं काम समजून. हे आज काल पाहायला मिळत नाही. जरा कुठं वजन जास्त झाले रे झाले कि ताशेरे उमटत जणू काही माझे पालकच होते सहकारी दोस्त लोक. काही जण काळाआड झाले पण बाकीचे अजूनही बोलतो.
खूप महत्वाची आणि वाखाणण्याजोगी गोष्ट म्हणजे सगळे मॅनेजर, मालक आणि आम्ही एकत्र गोल करून लंच करत असू. आयुष्यात हे पुढे कधीच बघितले नाही. पाच सहा वर्ष आठ आठ तास एकत्र काम करून आम्ही सगळे दुसरे घरचं झालो होतो. सहकाऱ्यांच्या लग्नाला एकत्र जाणे, केळवण, डोहाळजेवण, मुलांचे वाढदिवस साजरे करतानाचे अनंत गमतीचे किस्से. काय मजा असायची. अडीअडचणीत तर आधारच होत असत एकमेकांचे.
पुण्याबाहेरचे मार्केटिंगचे सहकारी येत असत. तेव्हा जेवणाचे बेत होत असत. ठाणे पुणे ऑफिस ची एकत्र सहल पण जबरदस्त होती. आमचे कंपनीचे मुख्य हेड कडक पण फणस होते. त्यांचे वडील कधी कधी येत असत, ते माणसे बरोबर पारखत. त्यांना बघून मी हे टिपले होते. मराठे इन्फोटेक मध्ये मला जिगरी दोस्त पण मिळाले. जे अजूनही त वरून ताकभात आहेत. ईथं असतानाच मला मुलगा झाला. तेव्हा पण सहकार्यांनी खूप मदत केली. डिरेक्टरी येणार असली कि दिवस रात्र काम होत असायचं. पॅन्ट्रीतल्या गॅस वर कायम चहा होत राहायचा. हे एक सुख होत.
ऑफिसची पुणे शाखेतली माझ्या पाच सहा वर्ष खूप मोलाची होती. लहान वयात लाभेलेलं मार्गदर्शन, प्रेम आपुलकी मी विसरू शकत नाही. मराठे इन्फोटेक (MID) माझ ऑफिस तर होतच पण माझं माहेर म्हणून जास्त होत. आयुष्यात असलेलं हे दुसरं माहेरचं, माझ्या सारखी भाग्यवान मीच असाच म्हणते मी.
गौरी पाठक पुणे
अभिप्राय
मस्तच!
तुमचा ऑफिस चा पहिला दिवस मला पण चांगला आठवतो
राखाडी रंगाची काठपदराची साडी आणि गुलाबाचे फुल देऊन सगळ्यांचे स्वागत करतानाची तुमची छबी आजही आठवते
ट्रिप ला काढलेले तुमचे फोटो, शिरीन ची डोकं फिरवलेली वेबसाईट आजही नाशिकला जाताना द्वारका सर्कल वरचं त्यांचं ऑफिस पाहिलं की हमखास तुमची आठवण होते
अस म्हणतात की आयुष्याच्या शेवटच्या क्षणी तुमच्या जीवनाचा संपूर्ण पट डोळ्यासमोरून जातो
मला खात्री आहे त्या वेळेचा माझ्या प्रवासाचा पट हा 70% MID च्या आठवणींचा असेल
आपण सगळे शेवटच्या क्षणापर्यंत MID चेच असणार हे मात्र नक्की
👍👍
++++
khup chan vatl junya athvani jaglya zalya