कार्तिक महिना महत्व : भगवान विष्णूचा प्रिय कार्तिक महिना. प्रमाणे वेदासारखे शास्त्र नाही, गंगासारखे तीर्थ नाही आणि सतयुगसारखे युग नाही. त्याचप्रमाणे कार्तिक महिन्यासारखा महिना नाही. शरद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून हा महिना सुरू होतो. कार्तिक महिन्यात भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि संपूर्ण सृष्टीवर सुख आणि कृपेचा वर्षाव करतात. हा चातुर्मासाचा शेवटचा महिना आहे. या महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नानाचे महत्व आहे. पवित्र नदीमध्ये दीप दान करतात.
महिन्यातील सण :
बलिप्रतिपदा / पाडवा :या दिवशी श्री विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले अस म्हणतात. उत्तर भारतात बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा, गौ क्रीडा आणि अन्नकूट हेही सण असतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात. दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.
विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात. (अन्नकोट )
भाऊबीज :हा दिवाळीचा सहावा दिवस. भाव बहिणीच्या आनंदाचा. भाऊ चिरंजीवी राहावा हि मनिषा ठेवून बहिण भावाला ओवाळते. भाऊ तिला ओवाळणी देतो इतकेच नाही तर हा ऐक्याचा दिवस म्हणू शकतो. विदर्भात सगळ्या स्त्रिया चंद्र उगवायची वाट पाहतात. तोच भाऊ मानून ओवाळतात, अंगावरच्या कपड्याचा धागा त्याला देऊन जुन घे नवं घे म्हणतात. मग भावाला ओवाळले जाते. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात.
पांडव पंचमी :अतिशय अटीतटीच्या काळ असूनही अथक परिश्रम करून भगवान श्री कृष्णाच्या सहकार्यांनी पांडव युद्ध जिंकून आले तो हा विजय दिवस. भावांच्या विरुद्ध विचार आणि मतांचा आदर करत आपल्यातील एकजूट कायम ठेवली. आईचा प्रत्येक आदेश शिरोधार्य मानला. आपल्यावरील अन्यायाचे निराकरण केले. अशी गुणी व विजयी मुले आपल्यालाही व्हावीत म्हणून प्रत्येक आई पांडवपंचमीच्या दिवशी पांडवांची पूजा करून गुणी, आज्ञाधारक व बलवान मुले व्हावी म्हणून हि पूजा करते.
देव ऊठणी / प्रबोधिनी एकादशी :
हरिशयनी/ आषाढी एकादशीला एकादशीला योगनीद्रेत गेलेले भगवंत कार्तिक एकादशीला योगनीद्रेतुन बाहेर येतात हीच देवऊठणी एकादशी. चातुर्मास समाप्ती दिवस.
तुळशीचं लग्न / कार्तिक पौर्णिमा / त्रिपुरारी पौर्णिमा :
हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. मात्र कार्तिक महिन्यात तुळशीपूजेचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. तुळशी भगवान विष्णूला खूप प्रिय आहे आणि माता तुळशीचा म्हणजेच वृंदाचा विवाह भगवान विष्णूचा अवतार असलेल्या शालिग्रामशी झाला होता. या दिवसापासून लग्नाचे मुहूर्त सुरु होतात.
(महादेवाच्या देवळात आवल्यावर लावलेली वात )
कार्तिक पौर्णिमेला महादेवाच्या देवळात त्रिपुर वात लावतात. आणल्यावर वात लावून दिवे लावतात. या दिवशी फक्त कार्तिक स्वामींचे दर्शन स्त्रिया घेऊ शकतात. भगवान महादेवाने त्रिपुरासुराचा वध केला ती त्रिपुर पौर्णिमा. त्रिपुरी पौर्णिमेचे औचित्य साधून देवळात दीपोत्सव साजरा करण्यात येतो हे या दिवसाचे वैशिष्ट्य आहे.
महिन्यातील यात्रा व जयंत्या :
काकडा / काकड आरती :
काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय. या वेळी देवाच्या मूर्तींला काकडयाने (एक प्रकारची ज्योत, वात) ओवाळले जाते, म्हणून याला काकडारती असे म्हणतात. भारतातील अनेक मंदिरांमध्ये पहाटे काकड आरती केली जाते. आश्विन-कार्तिक महिना सुरु झाला की, थंडीची चाहूल लागतेच. आश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमैपर्यंत काकड आरती होते.
शैव आणि वैष्णव संप्रदायामध्ये ब्राह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयाच्या आधी देवाची आरती करण्यात येत असे. कालांतराने ही परंपरा सर्व हिंदू संप्रदायांनी स्वीकारली. संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास यांनी काकड आरतीच्या रचना केलेल्या दिसतात. भक्तिभाव वाढवणे हे काकड आरतीचे प्रयोजन आहे. चातुर्मासात भगवान विष्णु म्हणजेच विठ्ठल निद्राधीन असतात. भगवंतास जागे करण्यासाठी जी केली जाते ती काकड आरती.
काकड्याला विविध भजने, अन्य आरती व स्तोत्रे म्हटली जातात. कृष्णाच्या लीला वर्णन करणारी गीतेही यामध्ये असतात.
पहाटे पाच ला भगवंतास उठवणे त्याचे आवरणे सर्व करताना भजन पदे म्हणतात. सुंदर रुपडे साजरे झाले कि त्याची दृष्ट काढतात. हि आरती करता करता आपण भगवंताजवळ सहज पोचू शकतो. भजन करताना च्या सुरांचा देवाशी संगम होऊन आपण एकरूप होतो. काकड आरतीत विविधता असते. संतांनी केलेले अभंग यात म्हणतात. पहाटे पाच ते सात वेळात देवळं मनमोहक असतात कार्तिक महिन्यात. काकड्याची सांगता पण सुरेख होते.
गीते, कविता व गाणी :
भाऊबीज आली सण भाऊ बहिणीचा
ऋणानुबंध नाती संस्कृती ,परंपरेचा
आतुरलेली बहिण येते वर्षाकाठी
जीव लागला भावाच्या भेटीसाठी
भाऊबीजेच्या दिवशी ओवाळीते भाऊराया
इडापिडा जाऊ दे ,ही मागणी भाऊराया
गरीब बहीण नका समजू प्रेम गरीब
सुपाएव्हढे काळीज मन तिचे अजब
तिच्या प्रेमाची सर नाही कुणाला येणार
निःस्वार्थ प्रेम, जीव भावासाठी तुटणार
खाईल मिरची भाकर मोठ्या आनंदाने
गुण गाईल गरीब भावाचे लई अभिमानाने
सुख समृद्धी नांदू दे आशीर्वाद बहिणीचा
तिचे समाधान, काळ येईल भरभराटीचा
दोन शब्द प्रेमाचे हा आधार बहिणीला द्यावा
लोभ नाही तिच्या रक्तात, मायेने जीव लावा
संगे काही नाही आधार एक दुसऱ्यास असावा
मायेचा झरा आयुष्यभर वाहताना दिसावा
निर्मळ पाण्याचा रे गुणधर्म प्रत्येकाने पाळावा
भेटीगाठीचा आनंद धना पेक्षाही निराळा
आठवण रक्ताची प्रत्येकानेे कायम सांभाळा
भाऊबीज दिवाळी
फट फटाका फुटला
धम धमाका झाला
लावा दिवा पणती
उजळू दे भिंती…
सण आला घरा
फराळाचं करा
गुळसाखर हसली
करंजीत बसली…
कुरकुरीत चकली
पोटभर खाल्ली
चंदनाचा पाट
सोनीयाचे ताट…
आली आली दिवाळी
बहीण भावा ओवाळी…
लाॅजिक नवीन पिढीसाठी :
दिवाळीच्या पाडव्याला नवऱ्याला का ओवाळतात?
पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गादेवीचे प्रतीक आहे. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. त्यामुळे पत्नीमध्ये दुर्गातत्त्व कार्यान्वित होते आणि पतीचे औक्षण केल्यानंतर त्याची कुंडलिनीशक्ती जागृत होऊन त्याच्यातील सुप्तावस्थेत असणारे शिवतत्त्व प्रगट होते.
भाऊबीज का साजरी केली जाते ?
पौराणिक मान्यतेनुसार सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांना यमराज आणि यमुना ही दोन मुले होती. दोघांमध्ये खूप प्रेम होते. एकदा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला दुपारी यमराज यमुनेच्या घरी पोहोचले. यमुना आपल्या भावाला दारात पाहून आनंदित झाली. यानंतर यमुनेने बंधू यमराजाला ओवाळले आणि भोजन दिले. बहिणीची ममता पाहून यमदेवांनी तिला वरदान मागायला सांगितले. यानंतर यमुनेला यमराजांना दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला भोजनासाठी यावे असे वचन मागितले. तसेच या दिवशी आपल्या भावाशी आदराने व आदरातिथ्य करणाऱ्या बहिणीला यमराजांनी भयमुक्त करावे असे वरदान मागितले. तेव्हापासून दरवर्षी या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते.
दरवर्षी तुळशीचे लग्न का करतात ?
या दिवशी श्रीहरी विष्णू चातुर्मासाच्या निद्रेतून जागे होतात. दिवशी भगवान विष्णूचे रूप असलेल्या शालिग्रामशी तुळशीच लग्न करण्याची प्रथा आहे. जे भक्त तुळशीविवाहाचा विधी करतात त्यांना कन्यादानाचे पुण्य मिळते, अस म्हणतात. हिंदू धर्मात तुळशी विवाहनांतर लग्न आणि इतर शुभ कार्याला सुरुवात केली जाते.
कार्तिक पौर्णिमेला आवळी भोजन का करायचे ?
आवळ्याच्या सावलीत बसले असता त्यातून निघणाऱ्या तरंगांमुळे मोठा फायदा होऊ शकतो. आवळे सेवन केल्यावर किंवा आवळ्यापासून योग्य विधीने बनविलेली रसायने सेवन केल्यावर होणारा फायदा द्विगुणित होण्यासाठी आवळ्याच्या झाडाच्या सावलीत बसावे, खेळावे, अन्न खावे अशी योजना भारतीय संस्कृतीत सांगितलेली आहे. यातून आवळीभोजनाची योजना केलेली आहे. ज्या झाडावर आवळे लागले आहेत, आवळे परिपक्व झाले आहेत त्या झाडाची शक्ती वेगळी असणारच. या दृष्टीने कार्तिक महिन्यात आवळ्याच्या झाडाचे पूजन, आवळी भोजन केले जाते. आवळ्याच्या झाडातून निघणारे तरंग आपल्या चेतासंस्थेला प्रभावित करून ताकद देणारे असतात, त्या ठिकाणी श्री विष्णूंचा वास असतो असे मानले जाते. श्री विष्णू ही चलनवलनाची, तरंगांची, चेतनेची व वर्तमानकाळाची देवता आहे. श्री विष्णूंचे पूजन करण्याच्या निमित्ताने सकारात्मक होऊन आवळ्याच्या झाडाखाली बसावे, आवळे खावेत.