पांडुरंग.. पांडुरंग...पांडुरंग....
पालखी म्हटलं कि पुण्यात उत्साहाचं वातावरण कायम असतंच. न कळत्या वयापासूनच पालखीच्या दर्शनाला जाण्याचा योग्य येत आला. लक्ष्मी रोडवर कितीही गर्दी असली तरीही बाबा ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन करवून आणणारच. तेव्हा एवढच कळायचं कि हे केलं कि बाबा खूप आनंदात असतात. रात्री जेवणं झाली कि आमचा पूर्ण वाडा अनवाणी निवडुंग्या विठोबा देवळात पालखीचे दर्शन घ्यायला जायचा. जीवनाचा एक भागच होता तो तेव्हा.
एखादी गोष्ट आपण करतो , ती करावीशी वाटते यामागे खूप आधी पासून तयारी आत सुरु असावी असं मला वाटत. लहानपणीच्या बाबांच्या आनंदच रहस्य पालखीत आहे हे कुठंतरी अंतर्मनात नोंद होत. कदाचित त्यामुळे पण थोडा भाग तरी पायी वारी करावी अशी मनातली सुप्त इच्छा तीव्र होत होत, यंदा पांडुरंगांनीच ती पूर्ण केली. मनाचा हिय्या केल्या खेरीज काही गोष्टी होत नाहीत हे मात्र पटलं. गेले काही वर्षं दरवर्षी विठ्ठल रखुमाई ज्ञानेश्वर महाराज यांच्या रांगोळ्या काढण्याची इच्छा झाली. प्रत्यक्ष हा देव कसा असेल याचा विचार सतत मनात आला कि मन तयार होऊन त्या काढल्या जायच्या. अशा अनेक गोष्टी एकत्र येऊन आळंदी ते पुणे पायी वारी करण्याचा मानस तयार झाला. इच्छा असली कि परमेश्वरच मार्ग दाखवतो. निसर्ग पण सहकार्य करतो. मुमुक्षी ग्रुपवर आयटी वारी दिंडी नोंदणी अशी लिंक आली आणि आनंदाला पारावर राहिला नाही. नवऱ्याला इच्छा बोलून दाखवली आणि तो तत्काळ जा म्हटलं. घरातल्या पांडुरंगाच्या साथी शिवाय हे शक्यच नव्हते.
घरच्या या माउलीला नमस्कार करून पहाटे साडेतीनला आयटी दिंडीच्या बसमध्ये बसले. आळंदी फाटा पर्यंत बसनी जाऊन पुढे पायी वारी असणार होती. आयटी दिंडीचे बसमधले नवखे सहकारी अर्ध्या तासात आपलेसे झाले. उत्तम अभंग म्हणणारे एक काका आमच्या दिंडीत होते. त्यांच्यामुळे तो भक्तीचा भाव सतत बहरत होता.
काय असतं पंढरपूरला ? एवढे सगळे घरदार सोडून का जातात तिकडे ? इतके भराभर का चालतात ? असे अनंत प्रश्न जे मनात होते त्यांची समर्पक उत्तरं या पूर्ण पायी वारीत मला समजली.
वारीच्या शेवटच्या टप्प्यात झी मराठी चे मुलाखतकार भेटले त्यांनी वारीत काय शिकलात? हा प्रश्न विचारला होता.
सर्वधर्मसमभाव शिकवते वारी. एकच छत वारी, त्यातला एकच देव पालखी आणि सर्वजण एकच ती माउली. विश्व हे परमेश्वराच्याच अंशांनी जोडून बनलेले आहे. आपण ते पाहण्याची दृष्टी कमावतो आणि असे अनेक अंश मिळुन जेव्हा नामाचा गजर होतो तेव्हा समजते महती ती त्या पांडुरंगाच्या पंढरीची. विश्वातल्या त्या आनंदाचा स्रोत दाखवते वारी. आपल्या कमीत कमी गरजा दाखवते वारी. आपल्यातल्या परमेश्वराच्या अंशाचे मंदिर "देह" त्याची किंमत पटवते वारी. समर्पण शिकवते वारी. मोह त्यागून जगायला मार्ग दाखवते वारी.
आयटी दिंडीतली एक गोष्ट मला फार आवडली ती म्हणजे जे नियमाने वारी करतात ते वारकरी आणि आपण मात्र त्या वारकऱ्यांचे सेवेकरी. आपली त्या अनेक वर्षे पायी वारी करणाऱ्यांशी तुलना होऊच शकत नाही. हे प्रत्यक्ष वारी केली कि मगच समजत. आज आय टी वारी दिंडी च्या सर्व कार्यकर्त्यांचे आभारच मानेन कारण हा मोठा अनुभव समजण्या अनुभवण्यासाठी ते माध्यम ठरले. पंढरीच्या वाटेसाठी ते मार्गदर्शक ठरले. या पायी वारीत दोन छान मैत्रिणी मिळाल्या. वाटलंच नाही कि आम्ही भेटून काही तसाच झाले होते.
टाळ वाजवण्याची पद्धत, गवळण ऐकून अपसुख दिला जाणारा ठेका, रिंगण करताना येणारी सर्वांग सळसळ, मनातल्या मनात म्हटलेल भजन खणखणीत आवाजात म्हणायला मिळाल्यावरच अतीव आनंद ... काय काय शिकले, समजले म्हणून सांगू ?
तूच माझी माय तूच माउली
तुझ्या भेटीची हि आस मन लागली
थोर तुझे रूप अन तुझी पंढरी
उभा तू दिसशी असा त्या विटेवरी !
हॉली बासिल पासूनच हा आमचा आनंदी प्रवास भजनं, टाळांचा गजर याच्या तालात सुरु होता. समोर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येणार होती. तिचे दर्शन घेऊन आयटी दिंडी त्या महासागरात मिसळणार होती. जसजशी पालखी दर्शनाची वेळ जवळ येत होती तसं मन आतुर होत होत. पालखी पुढच्या दिंड्या दिसू लागल्या होत्या, टाचा उंचावून उंचावून पाहण्याची धडपड सगळ्यांचीच सुरु होती. ....... आणि तो क्षण आला. ... फुलांनी नखशिखांत सजवलेला रथ, माऊलींची पालखी दुरून दिसू लागली. नामाचा जयघोष वाढला. काही फुटाच्या अंतरावर अगदी समोर तो रथ आला आणि मन भरून आलं. भावना डोळ्यांमार्फत झरझर वाहू लागल्या. आसमंतात उच्च प्रतीचे सुरेख स्पंद उधळण करत माउलींचा रथ पुढे सरकत होता. थोडं दुरून पादुकांचे दर्शन होतं ना होत तोच पुढे सरकला. काय सांगू लोक हो नुसत्या दर्शनं मनात काय झालं ! अशाच अखंड हरिनामाच्या प्रवाहात वाहत पंढरपुरात काय होत असेल याची झलक समजली आणि काय असतं पंढरपुरात या प्रश्नाच सहज सोप्पं उत्तर मिळालं. पंढरीचा आनंद काय असेल याची थोडी कल्पना आली. लवकरच अनुभूती पण येईल. पांडुरंगानं आध्यात्मिक मार्गाचा फलक दाखवलाय आता त्याला हेच मागणं -
हेचि दान देगा देवा
तुझा विसर व व्हावा ...
पुढे दिघी नाक्याजवळ आय टी दिंडीच रिंगण झालं. उत्तम अनुभव होता. पायी चालताना आपण वाहत्या प्रवाहाचे प्रवासी आणि काठावरचे लोक पाहतायत अस वाटत होत. वाटेत पाणी वाटप होत होतं त्यामुळे ओझं वाचत होत. फुलेनगर जवळ आमची गंधम सोसायटीत जेवणाची, बसण्याची, घरच्या शौचालयाची (हे महत्वाचं होत.) उत्तम सोय केलेली होती. सोसायटीत सुंदर दत्तमंदिर होतं. जेवण झाल्यावर देवळात आरती झाली. दुपारचे दोन वाजले होते. ऊन वाढलं होतं. पावसाची मध्ये मध्ये चिन्ह दिसत होती. पावलं झपाझप चालत होती. संगमवाडी आली. हरी नामाचा गजर आयुष्यातली पायवाट चालताना ती किती सुखद करतो, खरंच ! संचेतींच्या पुलावर आलो तेव्हा वाटलं किती पटकन आलो खरंतर चाल खूप झालेली पण मनातला हर्ष त्यावर मात करत होता. यावेळी माऊली मुक्ताबाईंची पालखी दिसली. अतिशय छान दर्शन झालं. पाताळेश्वराला पोचलो जवळच असलेल्या अमृततुल्यचा चहा घेतला. पिताना मागचे २४ तास झर्रकन डोळ्यासमोरून गेले. आनंदाच्या लहरी मनात उमटत होत्या.
बरेच चालून गेल्यावर पुढे दर्शन हाॅटेल जवळ एक रिक्षा मिळाली. नळ स्टॉप पर्यंत जस जमेल तसं सोडेन म्हटला तो. तूच आमचा विठ्ठल पोचवं बाबा घरी असच बोललो शेवटी आम्ही दोघी. तो तयार झाला. फिरून फिरून कसाबसा नळ स्टॉपला आलो मैत्रीण उतरली. पुढचा रास्ता सुरु होता मला घरापर्यंत पांडुरंगांनीच सुखरूप पोचवलं.
खरी गंमत पुढे झाली. रिक्षातून उतरून पैसे दिले. तेवढ्यात तो रिक्षावाला थांबा म्हणाला. मला वाटलं पैसे पडले कि काय म्हणून तो खाली वाकला. पण त्यांनी चपला काढल्या गुढघ्यावर बसला आणि चक्क माझ्या पायावर डोकं ठेवलं. मला समजेना. तर म्हणाला नाही म्हणू नका वारी करून आलात ना, पुण्यवान झाला तुमचा आत्मा! तुम्हीच माझा विठठल मला नमस्कार करू द्या. माझी आई म्हनती वारी करून आलेल्याच्या पायावर डोकं ठेऊन नमस्कार करायचा तो पांडुरंग होऊनच येतो. हे शब्द ऐकून हुंदकाच आला. अश्रू अनावर झाले. मगाशी झी मराठी च्या मुलाखतकारानी विचारलेलं कि विठ्ठलाला काय मागाल ? त्यावर मी दिलेलं उत्तर होत कि पांडुरंगानी भरभरून दिलय, तो देत पण राहील. मला ते सांभाळायची योग्य कर्म करायची बुद्धी तेवढी लाभु दे. योग्य विकल्प चयन करण्यासाठी कायम मार्ग दाखवू दे. आणि दोन तासात अनुभव आला या रिक्षावाल्यामार्फत कि माणसांत पण देव पाहू शकतो. तो दिसला कि आपल्यातला पण दिसेल. रिक्षावाल्याने वारीचा गाभाच घरी पोचता पोचता समोर ठेवला. धन्य धन्य तो पांडुरंग आणि धन्य धन्य ते वारकरी !
पुंडलिक वरदे हरी विठठ्ल ,
श्री नामदेव तुकाराम !
गौरी माउली