हर हर महादेव !
त्रिवेणी संगम, प्रयाग, उत्तर प्रदेश
योग येणार असेल तर तो येतोच, मनात इच्छा देणारा हि तोच आणि ती निर्विघ्नपणे पार पडणाराही तोच. बारा ज्योतिर्लिंगाची रांगोळी काढली तेव्हा पासून दर्शनाची सुप्त इच्छा मनात उमलू लागली होती. कालांतराने शिव पुराण व सतीची शक्तिपीठं कथा वाचनात आल्या आणि इच्छा प्रबळ झाली. कारण काही असो श्री क्षेत्र वाराणसीच्या काशी विश्वेश्वराचे दर्शन घेण्याचा योग अचानक लाभतोय समाजलं तेव्हा मन आनंदानं भरून गेलं. मनापासूनची इच्छा तो परमेश्वर सफल पूर्ण करतो हा अनुभव आला.
पुण्याहून विमानानं प्रयागराजला जायचं ठरलं. परंतु तिकडे पाऊस पडत असल्यानं ते विमान रद्द झाली. पण योग होताच, पुणे -दिल्ली विमान नंतर दिल्ली - प्रयागराज ट्रेनचा प्रवास करून पहाटे चार वाजता पवित्र भूमी प्रयागराजला सुखरूप पोचलो. प्रचंड मोठं स्टेशन अबब ! परमेश्वराचे पदस्पर्श झालेली पावन भूमी पाहतेय यावर विश्वासच बसेना, शांत रस्ते, सहकार्य करणारी, मफलर स्वेटर मधली माणसं आणि बॅटरीच्या रिक्षाच प्रथम दिसल्या. आपुलकीन चौकशी करत रिक्षावाल्याने हॉटेलवर पोचवल. पोचेपर्यंत पाच वाजले होते. गारठा कमी पण धुकं जास्त होतं . काल फार पाऊस येऊन गेलेला साचलेल्या पाण्यामुळे समजात होते. आदल्या दिवशी निघालेले आम्ही गडी आज पाच वाजता विसावलो.
रूमवर आराम करून मग गरम गरम पुरी बटाट्याची रस्सा भाजी हा नाश्ता होता तो केला, आलू पराठा .... आणखी काय हवं !
कडक गरम पाण्यात आंघोळ करून परत दस दस रुपये सीट बॅटरीची रिक्षा करून त्रिवेणी संगम बघायला गेलो. छोटे तंबू ठोकणं काम सुरु होतं, ती कुंभ मेळ्याची तयारी होती. संक्रांती पासून पर्व असतं असा समजलं. त्या गर्दीच्या आधी विना पावसात भेट दिली गेली नशीबच आमचं. त्रिवेणी संगमावर आधी बडे हनुमान जी देवळात गेलो. या देवळात झोपलेले हनुमान आहेत. सहा सात फूट खोल आत हि मूर्ती आहे. डोकं उत्तर तर पाय दक्षिणेला आहेत. या शहराचं हे ग्राम दैवत आहे. गावठी गुलाब आणि तुळस इकडे वाहताना दिसले. प्रचंड मोठा तो हनुमान, फुलांचा, अत्तराचा घमघमाट, जय श्रीराम के नारे माहोलच अवर्णनीय होता. वीस फूट लांब हि मूर्ती लोभस आहे. ५००-६०० वर्ष जुनं हे देऊळ, दर्शन घेऊन मगच संगम पाहून पुर्ण होतं . आम्ही हे आधीच बघितले.
या भागात चहा विक्रेते खूप होते. किटली विशेषच वाटली, तिच्या खाली कोळसे असलेली शेकोटी होती. गरम गरम चहा मिळत होता. भारी वाटत होतं ते बघायला. पुढे अकबर किल्ला आहे पण आत जात आलं नाही बाहेरूनच समाधान मानलं.
नंतर एका नावाडी आजोबांनी आम्हाला बरोबर हेरलं. पाचशे मीटर चालत गेल्यावर अकबर किल्ला लागतो. सध्या तो आर्मी च्या ताब्यात आहे. तिकडून पुढे किनारा येतो यमुनेचा. किनाऱ्यावर बोटी भरपूर होत्या. त्या नावानी / होड्यांनी आपण त्रिवेणी संगम पाहायला जातो. अर्धा तास लागेल पोचायला असा नावाडी सांगत होता. वैयक्तिक बोट करून आम्ही निघालो. यमुनेच पाणी तेव्हा हिरवं होत. भरपूर पांढरी कबुतर थवेच्या थवे होती. बऱ्याच बोटी ये जा करत होत्या. संथ वाहणारी यमुना मंद हसत स्वागत करत होती. नावाडी पण भलताच गप्पिष्ट होता. संगमावर आठ महिने गंगा प्रभावी तर चार महिने यमुना प्रभावी असते. तो माहिती देत होता. सरस्वती नदी गुप्त आहे. नावाड्याने उजवीकडे गंगा डावीकडे यमुना दिसेल अशी बोट उभी केली. मध्यावर एक बोट उभी होती. तिन्ही नद्यांची नारळांनी ओठी भरली. लहान टोपलीत गावठी गुलाब, शेवंती फुल व दिवा होता ते घेऊन नदीची आरती करून ती टोपली संगमात सोडली. हवेत मस्त गारवा होता. बोटी हालत डुलत होत्या. त्रिवेणी संगमाचे पाणी कॅन मध्ये भरून घेतलं. मोक्ष मार्ग मोकळा होण्यासाठी चे विधी केले. श्रद्धा असेल तर हे पटेल.
ब्राह्मण भोजन दक्षिण देऊन आम्ही परत निघालो. मधोमध बोट होती तिकडे गुरुजी असतात आधीच. आपण सांगू ते विधी करून देतात. काही लोक पिंड दान करून त्रिवेणी संगमात अंघोळ करून परत जातात दिसत होतेच. संगमाचे पाणी अत्यंत शांत होत. वाचलेल्या कथा आठवत मंद वाऱ्याची झुळूक अंगावर घेत फोटो काढत परतीचा प्रवास सुरु होता. किनाऱ्याचे झेंडे, माणसांची वर्दळ, डुलणाऱ्या नावा, संगम पाहून तृप्त चेहेरे पाहून छान वाटत होत. शांत चित्तानं किनारा गाठला. मागे वळून मनःपूर्वक नमस्कार करून परत निघालो.
निघालो तेव्हा दिड वाजला होता. पावसाचे थेंब पडू लागले होते. जणू आमच संगम दर्शन झाल्यावर पडण्याची वाट पाहत होते. लगेच रिक्षा करून रूमवर गेलो. दोन तास आराम केला. तो पण दुलईत गुडूप होऊन.
चार वाजता चहा घेऊन लोकनाथ चौक ठिकाणी जायला निघालो. लोकनाथ चौक म्हणजे तिकडची खाऊ गल्लीच. राजाराम लस्सीवाले खूप ऐकिवात होतो. तिकडे लस्सी व काळ्या गाजराचा हलवा मस्त ताव मारला. हो हो काळी गाजरच. हि फक्त इकडेच पिकतात. विशेष म्हणजे सगळे पदार्थ कुल्हड मधेच मिळतात इकडे. वापरून झालं कि ते फेकून द्यायचे. चाट गल्लीत टोमॅटो चाट, आलू चाट, पापडी चाट चे विविध प्रकार होते. नंतर भाजी मार्केट मध्ये चक्कर मारून पाच सहा चौक चालत राहिलो. काळ्या तिळाचे लाडू, गजक आणि लोकरीची टोपी खरेदी झाली. मी तर अर्धा किलो काळी गाजरं पण घेतली. भरपेट भरलेलं पोट आणि मन घेऊन रूमवर परत आलो. येताना परात रिक्षा केली. पत्ता सांगताना यावेळी फार मजा आली. कुठं जायचंच समजावून सांगताना ची मजा. सहा वाजताच रात्रीचे नऊ वाजल्या सारखा काळोख पसरला होता. रिक्षातून जाताना शहर भ्रमंती होतच होती. विविध माणसे मी न्याहाळत होते. चाल खूप झाली होती आता अराम गरजेचं होता.
खूप उशिरा रूमवरच गरम गरम दाल खिचडी मागवली. ज्यात भरपूर भाज्या होत्या. ती खाल्ली आणि कधी झोपलो कळलंच नाही.
__________________________________________________________
रुमजवळ गिरीजा घर नावाची पुरातन वास्तू होती. सकाळी आजू बाजूला चालत फेरफटका मारला. पुरी भाजीचा नाश्ता करून "खुसरू बाग " पाहायला गेलो. आज पावसाची भुरभुर होतीच. जुन्या काळच कोरीव कलाकुसरी बांधकाम असलेले चार मकबरा या जागी आहेत. पावसातच चारही मकबरा बघितले.
निसार बेगम (खुसरो कि बहन) ,खुसरो (जहाँगीर और शाह बेगम का बडा बेटा )
शाह बेगम (जहांगीर कि बेगम ), बीबी तामोलन
असे हे चार मकबरे उर्फ थोम्ब आहेत. चारीतली विविधता पाहून कलाकाराचं कौतुक वाटलं. उत्तर प्रदेशातल हे प्राचीन शहर प्रयाग नावानी प्रसिद्ध होत. अकबराने नाव बदलून इल्हाबाद ठेवला. नंतर अलाहाबाद प्रचलित झालं.
हिंदू देवालयाच्या मानानी याची अवस्था जास्त ठीक ठाक वाटली. आजूबाजूला झाडं, पाऊलवाट, कारंजी होती. आम्रपाली जातीची बरीच आंब्याची झाड होती. दुतर्फा नारळाची झाड तसेच बसायला बाकडे होते. पावसामुळे बसू शकलो नाही तो भाग वेगळा. तिकीट नसूनही जागा स्वच्छ आणि वस्तू नीटनेटकी आढळली. दोन वाजत आले होते. भूक लागली होती. कसा वेळ गेले समाजालाच नव्हत. नंतर ओम साई रसोई मध्ये जेवलो. रूमवर जाऊन आराम केला. वाराणसी ला जाण्या साठी ओला बुक केली. बसनी जाऊ म्हणून चौकशी केली पण वैयक्तिक वाहन सेफ वाटल. पुण्यात कोविड चा बहर ऐकत होतोच. इकडे सेफ होतो. पण तरी कॅबन जायचा ठरवून साडे चार पाचला वाराणसी कडे प्रस्थान केलं. आभाळ भरून आलेलं., पावसाचा जोर वाढलेला कॅबच्या खिडकीतून पाहत पाहत गोपीगंजला चहा भाजी खायला उतरलो. इतक्या तर्हेचे कुल्हड पाहून मस्त वाटत होत. वापरून फेकताना मात्र वाईट वाटत होत.
संध्याकाळी साडे आठ नऊ च्या आसपास गिरीजा घर चौक बनारस उर्फ कशी उर्फ वाराणसी ला पोचलो. गंगा आरती करून येणारे लोक दिसत होते. या चौका पुढे चार चाकीला बंदी होती. सामान हातात घेऊन हॉटेल गंगा दर्शनम गाठायचं ठरवलं. लालसर रंगाचे दगड पूर्ण रास्ता भर होते. दुकानं बंद होण्याच्या मार्गावर होती. हॉटेलवरून एकजण न्यायला आला म्हणून ते सापडलं. दशाश्वमेध घाटापासून फक्त पाचच मिनिटावर ते होत.
कॅबच्या ड्राइवरनं सांगितलं कि पहाटे दर्शन छान होतं. सामान रूमवर टाकून तत्काळ दशाश्वमेध घाटावर गेलो. आरती नुकतीच झालेली, पाण्यावर टोपलीत तरंगणारे दिवे, गार वारा, वाऱ्यावर हलणाऱ्या होड्या, ढगातुन लपत लपत पाहणारा चंद्र, आमच्या सारखे पर्यटक, घाटाच्या उंचच उंच पायऱ्या, रंगीत फुलांच्या छत्र्या, तोरण, धुपाचा मंद वास, प्रसन्न वातावरण मन शांत झालं. दुसऱ्या दिवशी पहाटे तीनला उठून अंघोळ करून काशी विश्वेश्वराच्या दर्शनाला जायचं ठरलं.
_________________________________________________________________________
पहाटे साडे तीनला रुमवरुन निघालो. फोन पण घरीच ठेवले. चहा आणि अभिषेकासाठी चे जेमतेम पैसे जवळ ठेवले. पायीच द्वार नंबर एकला गेलो. काशी विश्वनाथ देवळाच्या मुख्य द्वाराजवळ पोचलो, चौका चौकात पोलीस आहेत, विचारत विचारत गोल गोल वळण घेत देवळाजवळ पोचलो. बाहेर गारठा, पाय गार फरशीवर गारठलेले, मनात देव कसा असेल चा ध्यास! आत पोचताच तुरळक गर्दी दिसली. देवळा भोवती मोठ्ठा परिसर, मंद ओंकार ध्वनी ऐकू येत होता, मधोमध सोनेरी कळसाचे चकाकते देऊळ.
छोटी लाईन संपून आतल्या प्रसन्न गाभाऱ्यात प्रवेश मिळाला. चकाकत्या सोनेरी चौकोनात अर्धा फूट आत शिवलिंग काळभोरं ! सभोवताली सोन्याचा मुलामा... तो थंडगार स्पर्श शिवलिंगाचा..... अभिषेकाचा पाणी... देवाला हात लावण्याच भाग्य लाभलं.
दूध, पाणी, धोत्रा फुल, बेल विविध वस्तू लोक वाहत होते. मी देव डोळे भरून पाहत होते. न ढकला ढकली होता शिस्तीत दर्शन होत होत. पहाटे चारला आरती झाली कि दाराबाहेरून दर्शन मिळते असं नंतर समजलं. म्हणून शिवलिंगास हात लावता आला. नमस्कार करता करता हातावर देवाची बेलपत्रं आली. पाठोपाठ पुढे चलाची आरोळी पण... बाहेर पडून प्रदक्षिणा घालून परत दर्शन झालं. डोळे भरून देव डोळ्यात साठवला. परत रांगेत उभं राहून परत दर्शन घेतलं. मिळालेला प्रसादाचा हार मस्तकी लावला. अभिषेकाचं दुग्ध तीर्थ लाभलं. गंधाची बोटं कपाळावर उमटली. अंग शहारून गेलं ! पाठ केलेलं रुद्राष्टक तो भोलेनाथ पाहताना म्हणायचं पण भान राहिलं नाही. नंतर प्रदक्षिणा पूर्ण करताना चार पाच देवालयांचं दर्शन घेतलं. अन्नपूर्णा गंगाजी अशी ती होती. नंदी दर्शन घेतलं. कानात गुपित पण सांगितलं. नंतर शांतपणे बसलो. नवीन झालेला परिसर छान बांधून झालेला प्रत्यक्ष बघत होतो.. उजवीकडे बार लावलेले होते त्या पलीकडे उभं राहून आरती होत असताना लोकं आरती म्हणत होती . नंतर तिकडे मनात होत ते रुद्रष्टकं पण म्हटलं गेल. ती पण इच्छा पुरी झाली. खुप खूप छान अनुभूती घेऊन अभिषेकाचं तीर्थ आणि गंध घेऊन दुसऱ्या गेटनी बाहेर पडलो.
हर हर महादेव !
बाहेर पडलो ते थेट मनकर्णिका घाटाचं आला. पहाटे पाचची वेळ, शांत गल्ल्या, थोडा बोचरा वारा, लाकडाच्या ओंडक्याच्या चवडी (भिंतीच जणू. ) , जळणाऱ्या चिता , काही विझत धुमसणाऱ्या, राख धूर, पावसाचा वाळत चाललेला रास्ता असा हा घाट दाह संस्कारासाठी महत्वाचा आहे. भगवान विष्णू ची कर्णिका इकडे पडली अशी कथा आहे म्हणून हा मनकर्णिका घाट.
जिकडे स्मशान तिकडे शिवस्पंद हे असणारच. यालाच महास्मशान पण म्हणतात. मनकर्णिका घाटावर समजतं जीवनाचे अंतिम सत्य काय आहे? जे नश्वर शरीर सोडून आत्मा मुक्त होतो. पाच दहा मिनिटे थांबून विष्णू पदमन पाहून आम्ही परत निघालो. पावणे सहा झाले होते, आता मात्र चहा हवाच होता. परत जाताना मुख्य रस्त्यानी गेलो वाटेत चहा घेऊन रूमवर गेलो. थोडे आवरून आराम करून तासाभराने नास्ता केला.
पार्वती व शंकर लग्नानंतर कैलास पर्वतावर जाण्या आधी काशीला आले होते, तेव्हा माता पार्वतीने दुसरी कर्णिक जवळच असणाऱ्या शक्तीपीठ जवळ ठेवली . सतीचे एक शक्तीपीठ मनकर्णिका घाटा जवळच आहे. सती मातेची कर्णिक कान इकडे पिंड स्वरूपात होते. देवी विशालाक्षी माता शक्तीपीठ नावानं हे देऊळ आहे. माता विशालाक्षी तसेच कालरात्री देवीचे सुंदर देऊळ पाहून समाधान पावले. नवरात्रीत फक्त ऐकलं होत मी हे नाव. सातवा दिवस या देवीचा असतो. विशालाक्षी माता लाल साडीत होती, तेजस्वी डोळे, लोभस रुपडे मन भावन होते. आज कोल्हापूर नंतर योग आलेलं हे दुसरं शक्तीपीठ !
कालरात्रि दुर्गा माता वाराणसी
नंतर काल भैरव नाथ देवळात गेलो. महादेवाचा अंश हा कालभैरव, हा प्रत्येक शक्तीपीठ बाहेर विविध नावानी आहे, देऊळ तस छोटसच पण प्रचंड तेज असलेली हि मूर्ती, लाल पांढऱ्या फुलाच्या हारांनी सुंदर सजवलेली होती. भरपूर बेलानी सजावट केली होती. ती पाहून वाटत कि आत्त्ता उभा राहील देव. फोटो काढायला अलाऊड नव्हते.
काशीतले रस्ते....
तिकडून नंतर रिक्षानी सारनाथ ला गेलो. भगवान बुध्दांनी पहिली दीक्षा दिली ते हे ठिकाण. ज्या झाडाखाली ती पाच शिष्याना दीक्षा दिली ते झाड तिसरी पिढी (मूळ वृक्षाचे रोप बनवून इकडे लावले आहे ) भगवान बुद्ध यांच्या विविध मुद्रा असलेले पुतळे इकडे आहेत. प्रत्येक मुद्रेचा विशिष्ट असा अर्थ आहे. अशोक चक्र पिलर आणि खूप मोट्ठी भगवान बुध्दांची मूर्ती इकडे आहे. जपानी शिष्याची मूर्ती पण आहे तो शुभ मानतात चिनी लोक. साधनेची साक्षीदार हि धरणी म्हणून जमिनीला हात लावलेली काळी पाषाणाची सुंदर मूर्ती इकडे आहे. भगवान बुद्धांच्या आईची मूर्ती पण इकडे आहे. जन्मा नंतर त्या लगेचच स्वर्गवासी झाल्या. सिद्धार्थचा गौतमी नावाच्या स्त्रीने सांभाळ केला म्हणून नंतर सिद्ध झाल्यावर त्यांनी गौतम बुद्ध म्हणून घेतलं.
जवळच गावात सुत करणारे हातमाग व मशीन असलेली गावं आहेत. बनारसी कापड इकडे विणले जाते. त्या चे दुकान पण होते परंतु गंगा आरती गाठायची असल्यानी आम्ही गेलो नाही.
______________________
दशाश्वमेध घाटावर तिन्हीसांजेला हि गंगा आरती असते. हिलाच सप्तर्षी आरती पण म्हणतात. घाटावर स्वच्छता सुरु होत होती . आम्ही आरतीची तयारी सुरु असतानाच पोचलो. आरतीची मोठं मोठाली साधनं चकाचक घासून स्वच्छ करून झाली होती. वात कापूर बसवणं कामं सुरु होती. सात आरत्या तयार होऊन सज्ज होत्या. माहोल बनत चालला होता. तितक्यात वरून आदेश आला कि सात आरती ऐवजी एकच करा तसेच घाटावर गर्दी होऊ नये म्हणून साडे चार ते रात्री दहा बोट व घाट बंद केला. बाकी कडे कोवीड ची गडबड सुरु आहे म्हणून काळजी साठी हे आदेश आले. दोन तीन चकरा घाटावर मारून रूमवर गेलो. पावणेसातला आरतीला सुरुवात होते हि पाऊण तास असते. (गंगा नदी मध्ये स्नान करून पापं नष्ट होतात. गंगा नदीला वरदान आहे कि लोकांची पापं नष्ट होतील तरी गंगा पवित्र राहील. )
बरोबर वेळेत पोचून दुरून गंगा आरतीचे नयनरम्य दृश्य पाहत होतो. आज सात ऐवजी एकच आरती केली. त्यामुळे आमचा योग्य चुकला नाही. गंगा मय्याला भक्तिपूर्वक नमस्कार करून परत फिरलो. काशीची गंगा आरती फार महत्वाची आहे तसेच ऋषिकेश हरिद्वार ला पण गंगा आरती असते.
गंगा आरती करणारे गुरुजी ठरलेले असतात विविध रंगी सिल्क चे सोवळे त्यांनी घातलेलं असतात. सूर्यास्तानंतर लगेच हि आरती असते. सात पैकी मधल्या आरती च्या जागी गंगेची मूर्ती असते. घंटा नाद, धुप आरती, मंत्र घोष, असा सुंदर कार्यक्रम असतो पाऊण तास.
बंगाली मिठाई ची तसेच विविध नव नवीन पदार्थ चव चाखत जेवण कसे होत होते समजत नव्हते. गंगा आरती बोटीत बसून पहायची मजा हुकली तरी सकाळची बोट चक्कर घाट पाहत मारू असा विचार करून काशीच्या राहणीमानाची ,माणसांची , दुकानाची मजा लुटत फिरलो. खीर कदम माझा आवडता पदार्थ झाला. बनारसच पान चुकावं शक्यच नव्हतं.
दुसरा दिवस तुलसी मानस मंदिर पाहायला गेलो. रामाचं लोभस रूप, राम लक्ष्मण सीता, सत्यनारायण लक्ष्मी माता, अन्नपूर्णा माता महादेव अशी तीन देवळं आहेत. तुलसीदासांची मूर्ती वरच्या मजल्यावर आहे. तुलसीदासांच समर्पण समजावणारी, रामायण आणि त्यांच्या जीवनविषयक कलाकृती प्रदर्शन तिकीट लावून तिकडे आहे. संपूर्ण भिंतीवर रामचरित मानस गान कोरले आहे. रामाची आरती आम्हाला मिळाली. आरतीचा ढोल व घंटा मशीन होते ते फार भारी होतं. त्या आवाजांनी भारावून जाणार नाही माणूस तर शपथ !
आरती घेऊन जवळच असलेल्या संकट मोचन हनुमान देवळात गेलो. पाहताना वाटत कि संकटाला सामोरे जातानाची रौद्र मुद्रा आहे हनुमानाची .... पूर्ण शेंदूरमय हि मूर्ती मातीची आहे. तिच्या हृदयात राम आहे. तो हारामुळे आणि पुढे चला च्या घाईत दिसला नाही. एक प्राचीन विहीर तिकडे आहे. महाकवी तुलसीदासांना पहिल्यांदा हनुमान या जागी स्वप्नात आले तिकडे त्यांनी या मूर्तीची स्थापना केली. हनुमान बाहूकची रचना या जागी त्यांनी केली. आजूबाजूला तुळशीची खूप झाडे लागली गेली, हनुमानाच्या बरोब्बर समोर रामाचे देऊळ आहे. हनुमान प्रभू रामचंद्रां कडे पाहत आहे अशी तिकडे भावना आहे. इकडचा पेढा प्रसाद खूप मस्त होता. आज नास्ता न करता निघालो त्यामुळे तो तिकडेच फस्त केला. घरी न्यायला परत घेतला.
पुढे लक्ष्मी रेस्टॉरंट मध्ये मस्त जेवलो. नंतर दुर्गा कुंड , दुर्गा माता देवळात गेलो. हे देऊळ पूर्ण लाल पाषाणात आहे, जवळच कुंड आहे, कारंजे आहे, माँ दुर्गा यंत्र स्वरूपात इकडे विद्यमान आहे. कुष्मांडा देवी नाव आहे. इतके सुंदर सजवतात देवीला काय सांगू, एकंदरच लाल गावठी गुलाब इकडे जास्त आहे त्यात देव खुलून दिसतात. दुर्गा कुंड पाहून मणी मंदिर देवालयात गेलो. ते बंद झाले होते नंदी पाहून परत फिरलो. इकडे १०८ शंकराच्या पिंडी आहेत.
तिकडून लागेचच अस्सी घाटाकडे डायरेक्ट रिक्षा केली. लेमन टी घेतला आणि घाट वॊक करून सर्व घाट पाहू असे ठरले. हा घाट वॊक न करता गंगा नदीतून नावेने पण घाट पाहत जात येते. काशीत एकंदर ८४ घाट आहेत. सुरुवात अस्सी घाटापासून केली सा धारत तास भर तरी लागला दशाश्वमेध घाट ला पोचायला.
जाताना लागलेले घाट : अस्सी घाट, गंगा महाल घाट, रिवा घाट, तुलसी घाट, भदैनी घाट, जानकी घाट, माता आनंदमयी घाट, वाचाराज घाट, जैन घाट, निषाद घाट, प्रभू घाट, पंचकोट घाट, चेतसिंह घाट, निरंजनी घाट, महानिर्वाण घाट, शिवाला घाट, गुलरिया घाट, दंडी घाट, हनुमान घाट, कर्नाटक घाट, हरिश्चंद्र घाट, लाली घाट, विजयनगर घाट, केदार घाट, चौकी घाट, सोमेश्वर घाट, मान सरोवर घाट, नारद घाट, राज घाट पेशवा, कोरी घाट, पांण्डे घाट, सर्वेश्वर थाट, दिगपतिया घाट, चौसट्टी घाट, राणा महाल घाट, दरभंगा घाट, मुन्शी घाट, अहिल्याबाई घाट, शितला घाट, दशाश्वमेध घाट.
प्रत्येक घाटाचे वेगळे महत्व आहे.
पुढचे चार घाट आधीच पाहून झाले होते. प्रयाग घाट, राजेंद्र प्रसाद घाट, मन मंदिर घाट, मीरा घाट, मनकर्णिका घाट .
असा घाट वॉक करून अहिल्याबाई घाटावर निवांत बसलो. गेल्या दोन दिवसात इतका निवांतपणा आज मिळाला. साडे तीन चार ची वेळ असेल तासभर तरी नुसते बसलो. तेव्हा मनात विचार आला कि किती शांत शहर आहे हे ! कोणी लहान नाही कोणी मोठे नाही, कोणी कोणाचा मत्सर करताना दिसणार नाही, आलेले पर्यटक आपले मायबाप, सगळे जण मदतीला तत्पर, एक ठराविक वर्ग सोडला तर सगळेच काही ना काही कष्ट करणारे, चप्पल सांभाळून एक रुपया मिळवणारा पण समाधानी, पोलीस कर्मचारी पण सतर्क, सफाई कर्मचारी नीटस, पहिल्या दिवशी रस्त्यात शेण दिसलं तर इ इ इ झालं पण नंतर ते ओलांडून पुढे जायचं जमलं. आपोआप झाला ते. रस्त्यात कधीही कुठेही गाय कुत्रा येणार पण ओरडणार नाही त्रास देणार नाही कडेनी जाणार, एक कुत्राही आपल्यावर भुंकणार नाही तसाच अनुभव घाटावर भरपूर माकड होती पण विध्वसंक नव्हती. राहणीमानावरून गरीब वाटणारे पण आहे त्या परिथितीत सगळे खूप समाधानी दिसत होते. ते संतोषाचे स्पंद खूप छान होते. कोणीच कुरकुरे नव्हते, हॉटेलचा मालक शिपायाशी पण तितक्याच अदबीनं बोलेल जितक्या अदबीनं तो गिर्हाईकाशी बोलेल. धक्का लागलाच तर माफ करो हा दीदी म्हणत नमस्कार करणार लगेच, इतकया होड्या नावा होत्या नावाडी होते पण त्यांच्यात पण एकवाक्यता होती. एकंदरच ज्यांचं जसा आयुष्य आहे ते सगळे त्यात खुश होते हे मलाच काय मुलाला पण जाणवलं. साधे रिक्षावाले पण इतरांना जपत गल्ली बोळातून रिक्षा काढतात. एकंदरच बनारस शहर जे भोलेनाथानी निर्माण केलेलं असा उल्लेख आहे ते समाधानी जाणवलं. काशी विश्वनाथ देवळा जवळचे कर्मचारी पण इमानदार जाणवले. मोदींनी खूप सुधारणा केली म्हणून दुवा देणारे बरेच दिसले. महादेवाच्या ज्योतिर्लिंगाचे मुख्य द्वार ते ललिता घाट बांधकाम लवकरच संपेल. सगळी कामं रात्री होताना दिसत होती. दिवसा अडचण नाही.
मनातली ज्योतिर्लिंग दर्शन इच्छा पूर्ण झाली. फार फार छान वाटल. आज रात्री परत निघायचं जीवावर आलेलं. संध्याकाळी आरती झाल्यावर परत घाट फिरून आलो. प्रसाद घेतला. ट्रेन मधलं जेवण बांधून घेतलं आणि पुण्यभूमीचा हर हर महादेव गजर करत निरोप घेतला.
मी अनुभलेली श्री क्षेत्र काशी आणि प्रयाग आयुष्यभर स्मरणात राहील.
पार्वती पते हर हर महादेव !
गौरी पाठक