Thursday, 14 October 2021

नवरंगांची गंमत

नवरंगांची गंमत

काही दिवसांपुर्वी एक मेसेज व्हाट्सअप वर फिरत होता. पुराणात रंग का आहेत त्याचं महत्वं काय असा उल्लेख नाही किंवा या दिवशी ह्या रंगाचे कपडे घाला असं म्हटलेलं नाही. मार्केटिंग चे फंडे आहेत वगैरे वगैरे. ते काही असलं तरी एकजुट दिसते रस्तावरून जाताना एका रंगाचे कपडे परीधान केलेल्या बायका पुरूष बघुन. एकत्र येऊन काहीतरी करण्याची संकल्पना मला आवडली म्हणुन मी पण रंग फाॅलो करतेच. कधीकधी तिथी दोन दिवस पडते मग जमेल फाॅलो करायचं.
 
पण रंगांची गंमत काय आहे, ते काय सांगतात याचा विचार या पोस्टमुळे केला गेला. मग विचार आला कि खरंच काय असतील गुपितं या रंगान मागची ? शोध सुरु केला. समजलेली माहित जमा करू लागले. आपण जे करतो त्यामागचा हेतु समजला की ते करायला अजुन ऊत्साह येतो. रंगांच महत्व जाणुन ते आचरणात आणुन वागुया अशी कल्पना तर करू शकतो.  शेवटी काय आनंदी राहणं महत्वाच!

नवरात्रीच्या निमित्ताने देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. नवरात्रीचा प्रत्येक दिवस मा दुर्गाच्या अवताराला समर्पित आहे. प्रत्येक तिथीला नवदुर्गेचे एक रूप प्रतिकात्मक रंगाच महत्व दर्शवते, त्यात असणाऱ्या शक्तीचा या रंगाशी गुढ संबंध आहे. 

१) प्रतिपदेला पिवळा रंग महत्वाचा मानला जातो.
काय सांगतो पिवळा रंग?
देवी शैलपुत्रीचा हा आवडता रंग. जो जगण्यातला  ऊजळपणा, आनंद, आशा, प्रोत्साहन दर्शवतो. शैलपुत्री ही पर्वतकन्या योगमार्गावरच्या चेतनेचे सर्वोच्च स्थान. त्या सर्वोच्च स्थानाची आठवण करून देतो हा रंग जो मानवातलं तेजोवलयही दर्शवतो.हा रंग मनामध्ये नवे विचार निर्माण करतो.


२) व्दितीयेला हिरवा रंग महत्वाचा मानला जातो.
काय सांगतो हिरवा रंग ?
सृजनशीलता, निसर्गाची आठवण, नुतनीकरण अंकुरण, वाढ, सुसंवाद, ताज्या दमाची शक्ती देवी ब्रह्मचारिणीच प्रतीक. म्हणुन तिचा आवडता रंग हिरवा.
३) तृतीयेला राखाडी रंग महत्वाचा मानला जातो.
काय सांगतो राखाडी रंग ?
देवी चंद्रघंटेचं हा प्रतीक, गडद रंग नकारात्मकता असूनही आवेशपूर्ण भाव  व त्यावर त्यातून निर्माण होणार निर्धार वाईटावर मात करण्याचा. वाईट वृतींचा नाश  सांगतो हा राखाडी रंग.
४) चतुर्थीला केशरी रंग महत्वाचा.
काय सांगतो केशरी रंग ?
ऊर्जेचे सूक्ष्मातून सूक्ष्म व विशालतेतून विशाल होण्याच तत्व, ती ऊर्जा, प्राणशक्ती, समाधानी सकारात्मक ऊर्जा जो प्रतिक आहे कुष्मांडा देवीचं, जी सुखी समाधानाचे संकेत देते.
५) पंचमीला पांढरा रंग महत्वाचा. 
काय सांगतो पांढरा रंग?
ज्ञानशक्ती, कर्मशक्तीच द्योतक. देवी स्कंदमाता या दोन्हीच मिश्र तत्व जे पवित्रता, शांतता व ध्यान सुचक आहे.
६) षष्ठीला लाल रंगाच महत्वं आहे.
काय सांगतो लाल रंग?
शुरता, योद्धा, दुष्ट शक्तींवर मात करण्याचा ध्यास, नेतृत्व, आकर्षण शक्ती, देवीचा सकारात्मक क्रोध जो अन्याय, अज्ञान व दुष्टांवरील राग निर्भयता दाखवतो. देवी कात्यायनीच प्रतिक हा रंग.
७) सप्तमीला निळा रंग महत्वाचा. 
काय सांगतो निळा रंग?
अफाट शक्ती शांततेची दाखवतो, निर्भयता, सुरक्षितता, निश्चलता, मनाची शांतता - स्थिरता, विश्वसनीयता, प्रसन्नतेच प्रतिक देवी कालरात्रिच आहे.
८) गुलाबी रंग अष्टमीचा.
महागौरीच प्रतिक गुलाबी रंग जी तत्पर आहे भक्तांच्या मनोकामना पुर्तीसाठी, दुःखातुन सुटका, नवी आशा, स्व शुद्धीकरण भावना, सामाजिक ऊन्नती दर्शवते.

९) नवमीला जांभळा रंग महत्वाचा.
काय सांगतो हा?
अलौकिक शक्ती देणारी सिद्धदात्री देवीच प्रतिक जांभळा, आकांक्षा पुर्तीचं ज्ञान देणारा, नैसर्गिकरीत्या अस्सल, महत्वाकांक्षेची शक्ती दाखवणारा प्रतिक.

रंग काय सांगतात, त्यांचे गुण काय ते समजुन ते अनुभवण्याचा प्रयत्न करू हीच या नवरात्रीतली शिकवण. काही ऊत्साही मैत्रिणींनी दिलेली साथ पण मोलाची आहे यात. सगळ्यांना धन्यवाद!

गौरी.