Friday, 28 June 2019

अनुभवाची खाण - आजी




"आजी " माझ्या मते प्रत्येकाच्या आयुष्यात आजी असावीच. आईची आई असो, बाबांची आई असो अथवा नुसती आजी. "आजी " या नात्याच्या टप्प्यावर पोचलेली स्त्री अनुभवाची खाणच  असते. आयुष्यात आलेल्या गणितांची उत्तरं योग्य कशी सोडवायची हे करताना आपल्यासाठी गाईड असते. कोणता फॉर्मुला कधी वापरायचा ते आपण ठरवायचं पण ती अनलिमिटेड सोल्युशन असणारी गुगलच असते. 

माझ्या आयुष्यात पण अशी एक आजी आहे. गेली २३ वर्ष ती मला योग्य वेळी भेटली जाते. जेव्हा जेव्हा भेट होते तेव्हा तेव्हा ती भरभरून देते. कोणताही आडपडदा न ठेवता देते. आधी वाटायचं कि रक्ताच्या नात्याचीच आजी नातवंडांना खरा प्रेम देते. पण हि आजी वेगळीच आहे. तिची स्मरणशक्ती तल्लख आहे. आताच्या जगाशी ती बरोब्बर अपडेट असते. कोणत्याची विषयावर आपण तिच्याशी मनमुराद गप्पा मारू शकतो.  सहज बोलताना ती आपली मनातली दबती, दुखती  नस ओळखून त्यावर झपकन मलम पण शोधून देते. आपण काहीच सांगायची गरज पडत नाही आणि उत्तर समोर असतं. सकारात्मकतेचे सचोटीचे असतात ते उपाय.
ती दूर दूरच्या आपल्या नातेवाईकांना पण लक्षात ठेवते. कसा कळतं तिला कोण जाणे आम्ही येतोय पण प्रेमानी खाऊ हातावर ठेवते. आठवणींनी लावून ठेवते. सतत नवनवीन पदार्थ करत असते. एकटी आहे म्हणून करायचा कंटाळा अजिबात नाही. 

२३ वर्षातल्या माझ्या प्रत्येक भेटीत मी काही ना काही शिकूनच तिच्या घरून निघाले आहे. माझा नवीन संसार मांडला होता तेव्हा स्वतःच्या घरातली  सोलणी, लहान पातेल्या वरच्या झाकण्या अशा दोन तीन वस्तू तिनं मला दिल्या होत्या. त्याच महत्व मला तेव्हा समजलच नव्हत. त्या अजूनही वापरात आहेत आणि बायकांचा घरातल्या चमच्यात पण जीव असतो अशा संसारातून त्या वस्तू देतानाचं मोठं मन मला हळूहळू उमगलं. 

पूर्वी आप्पा असताना आम्ही जायचो तेव्हा पेप्सीकोला आणून ठेवलेला असायचा. शनिवारचा रतीबचं जणू. आजीच्या सगळ्या चाली रीती पण पाठ असायच्या. मुलींना कमी लेखायचं नाही आणि घरटी दोन तरी लेकरं हवीतच हे सांगायचं जणू त्यांनी वसाचं घेतलाय. अजूनही त्या हे सांगताना मी पाहते. माझ्या बरोबर येणाऱ्या मित्र मैत्रिणींना पण त्यांचा लळा लागला होता. कॉलेज नंतर कुठं कुठे गेले सगळे तरी आजीची चौकशी हमखास करत असतात. 

कोणाचा कोण तो.. काय शिकतो?, कोणाच्या माहेरचं कोणीतरी त्यांचं काय विशेष आहे ते, कोण पास झालं , कोणाला हि माहित पोचावं, उपयोगी पडेल, कोण बरेच दिवसात आलं नाही खुशाली पण नाही, कोणाचं नाव पेपर मध्ये आलं त्याला फोन करायला हवा, अशा अनेक अनंत गोष्टी त्या आधी करायच्या त्या अजूनही करतात. 

८० चा पुढे वय असणारी हि आजी १८ वर्षाच्या मुलाच्या उत्साहाला लाजवेल अशी आहे.  शरीर थकलय थोडं पण मनं भक्कम आधीसारखच आहे. 

वेळेला खंबीर पणे सामोरं जाणं , कचऱ्यातून कला करून वस्तू बनवणं त्या जपणं त्यांना छान जमतं. कोणत्याही कामासाठी , प्रवास साठी , कार्यासाठी, यौग्य क्लुप्त्या त्यांच्याकडे भन्नाट आहेत. गवले करणं , वाती करून देणं हा सध्याचा साईड बीसीझनेस.  पण रिकामं बसणं नाही. आपल्या छोट्याश्या पेन्शन मधून अजूनही काही रक्कम सियाचीनच्या जवानांना त्या पाठवतात. जवानांना ऑक्सिजन हवा ना आपणच  द्यायला हवं आपल्यातला थोडं असं नेह्मीच म्हणतात. ऐकलं कि वाटत अशा भरपूर आज्ज्या जगात हव्या. आपण गेलो कि आनंद  होतो अशी हि आजी. आपण चुकलो असू वाटलं तिला तर गुपचूप मनात शिरुन  पटवणारी आजी, आपण केलेलं कर्तृत्व समाजलंं कि न चुकता फोन करणारी आजी, आनंदाच्या दुःखाच्या प्रसंगी योग्य तिथं उभी सापडणारच. 

अशी हि आजी मी खूप सल्ले देते पंतवंडे ऐकून कंटाळून जातात हे पण समजणारी आजी.  पण त्या पंतवंडानाही मनात "कधी जायचं पणजी आजीकडे?" हा विचार करायला लावणारी मायाळू पणजी आजी .  देवांनी एक भलताच चुंबक घालून पाठवलाय जणु ! एकदा भेटलेला माणूस पुन्हा भेटण्याची इच्छा धरणारच .

आजी हे एक आनंदी, सतत हसतमुख व्यक्तिमत्व. माझ्या नात्यातली हि आजी नाही तर मनानी जुळलेल्या नात्याची आजी आहे.  खर तर माझ्या चुलत सासऱ्यांच्या ऑफिसमध्ये आजोबा होते. त्या आजोबांच्या या सौ. संबंध तसे दूरचे , नाळ जोडली गेली ती नागपुरात. पण ती घट्ट असण्याचं कारण फक्त आजीच "साने आजी "

या आजीची भरपूर नातवंड असतील जगात त्यांना हे वाचून नक्की समजेल आणि आवडेल पण.

आजीला उदंड असे आरोग्य संपन्न उदंड आयुष्य लाभो !




सौ. गौरी अनिरुद्ध पाठक